Showing posts with label मानसोपचार. Show all posts
Showing posts with label मानसोपचार. Show all posts

Thursday, February 4, 2016

आरोग्यासाठी प्रसन्न मन -3

- डॉ. श्री. बालाजी तांबे
शारीरिक रोगांच्या आधी मनोरोग असावेत. कारण शरीरात रोग येण्यासाठी कारण मनच असते. या मनोरोगात अगदी शेवटचा रोग म्हणजे उन्माद. मनाचे आरोग्य उत्तम असणाऱ्या शंकराचार्य, गौतम बुद्ध, महावीर, येशू ख्रिस्त यांच्यासारख्या व्यक्‍ती जन्मजन्मांतराने एकेका युगात एखादीच झालेली दिसते. मनोरोग नाही अशी व्यक्‍ती सापडणारही नाही आणि मनोरोग असलाच तर तो बरा करणे हे काम महाकर्मकठीण आहे. मनोरोग कुठल्या प्रकारचा आहे व तो कशाप्रकारे प्रकट होतो आहे, त्याची वाटचाल सावकाश आहे की जलद आहे, तो उन्मादाच्या अवस्थेला कधी पोचेल हे सर्व गणित अवघड असते. आपल्या चिंतनाने, ध्यानाने, हवनाने एक वेळ देव प्रसन्न होईल, पण मन प्रसन्न होणे खूप अवघड आहे.

संपूर्ण निरोगी, आरोग्यवान, तेजःपुंज, स्वस्थ मनुष्य ही कल्पना केवळ व्याख्येपुरती आहे का? अशा तऱ्हेची व्यक्‍ती खरोखर अस्तित्वात आहे असे कोणी सांगितले तर, या विधानावर बहुतेक वेळा विश्‍वास ठेवला जाणार नाही. प्रत्येकाला काही ना काही बारीक-सारीक त्रास असतोच. सर्दी-पडसे, गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर थोडा वेळ डोळे चुरचुरणे, कधी तरी एखादा दिवस झोप न येणे किंवा ताप येणे अशा बारीक-सारीक तक्रारी तरी असतातच. काही नाही तर कानदुखी, दाढदुखी अशा तऱ्हेचा एखादा त्रास असू शकतो. सर्वतोपरी आरोग्यवान असलेल्या स्त्रीला पाळी वेळेवर न येणे, अंगावरून कमी-अधिक जाणे असा एखादा त्रास असू शकतो. याचे कारण काय असावे याचा विचार करावा लागेल. 

ऋषी-मुनींनी, भारतीय शास्त्रज्ञांनी भारतीय परंपरेप्रमाणे स्वभावधर्मानुसार, लोककल्याणार्थ खूप संशोधन करून शरीराविषयी, आरोग्याविषयी स्वच्छ कल्पना लिहून ठेवलेल्या आहेत. जगातील प्रत्येक वस्तुमात्राचा उपयोग आरोग्यासाठी कसा करता येईल हेही भारतीय शास्त्रज्ञांनी सांगून ठेवलेले आहे. असे असताना माणसाला आरोग्य का टिकवता येऊ नये? रोगाच्या व्याख्या जरा अवघडच वाटतात. म्हणजे मनुष्याला चारचौघात वावरता येणार नाही, त्याची उपस्थिती आजूबाजूच्या चारचौघांना उपद्रव ठरेल अशा प्रकारच्या एका मानसरोगाचे नाव आहे उन्माद. उन्मादाची व्याख्या करताना मस्तकात मद गेल्यामुळे होणारा अवरोध, त्यातल्या त्यात मनोनाडीत होणारा अवरोध असे आयुर्वेदात सांगितलेले दिसते. हा मद कुठे आहे, कुठे आहे मेदोरोग, कुठे आहे उन्माद हे समजायला आपल्याला बराच अभ्यास करावा लागेल. शारीरिक रोगांच्या आधी मनोरोग असावेत. कारण शरीरात रोग येण्यासाठी कारण मनच असते. या मनोरोगात अगदी शेवटचा रोग म्हणजे उन्माद. त्याच्या आधी अनेक  प्रकारचे मनोरोग सांगितलेले आहेत. आयुर्वेदानुसार मनुष्य म्हणजे केवळ एक ६०-७० किलोचे शरीर, ज्यात हाड, मांस, मेद, मज्जा, रक्‍त, रस व वीर्य हे सर्व घटक असतात असे नव्हे. शरीर म्हणजे हे सर्व घटक असे म्हणणे एखाद्या वस्तूत अमुक तमुक घटक आहेत असे मोघम सांगण्यासारखे आहे. सर्व गंमत आहे ती गणिताची. अन्न खाल्ल्यावर रस तयार होतो, पण कोणी किती अन्न खावे, आपापल्या वजनाच्या हिशेबात खावे, की भुकेच्या हिशेबात खावे, अन्नाच्या प्रकारानुसार त्याचे प्रमाण कमी-जास्त व्हावे की प्रसंगानुसार कमी-जास्त व्हावे? शेवटी आयुष्य संख्येने बांधले जाणारच असते. शरीराचे घटक असलेले सात धातू अन्नामधूनच तयार होतात. त्यामुळे कोणत्या प्रकारचे अन्न विशिष्ट शरीरघटक तयार करण्यासाठी उपयोगी ठरतात हे शोधून काढून त्यानुसार आहार ठरविला तर आरोग्यासाठी उपयोगी ठरेल असे आपल्याला वाटू शकते. परंतु आपल्या शरीरात व्यक्‍तिगत फरकाने किती रस असावा, किती रक्‍त असावे वगैरे मर्यादा कोठे माहीत आहेत? 

याच्याही पेक्षा कळायला अवघड असतात ते मनोदोष. मनाचे आरोग्य उत्तम असणाऱ्या शंकराचार्य, गौतम बुद्ध, महावीर, येशू ख्रिस्त यांच्यासारख्या व्यक्‍ती जन्मजन्मांतराने एकेका युगात एखादीच झालेली दिसते. मनोरोग नाही अशी व्यक्‍ती सापडणारही नाही आणि मनोरोग असलाच तर तो बरा करणे हे काम महाकर्मकठीण आहे. मनोरोग कुठल्या प्रकारचा आहे व तो कशाप्रकारे प्रकट होतो आहे, त्याची वाटचाल सावकाश आहे की जलद आहे, तो उन्मादाच्या अवस्थेला कधी पोचेल हे सर्व गणित अवघड असते. 

म्हणून रोगांची व्याख्या करण्याआधी आयुर्वेदाने स्वास्थ्याची व्याख्या केलेली आहे, ती अशी, 
समदोषः समाग्निश्‍च समधातुमलक्रियः। 
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थमित्यभिधीयते ।। 

वात-पित्त-कफ वगैरे दोष यांचे गणित, हे गणित शास्त्रातील अवघडातील अवघड शाखेचे गणित असावे. कारण वात-पित्त-कफदोष या संकल्पना आहेत, पदार्थ नव्हेत. रस, रक्‍त वगैरे सप्तधातूंचे गणितही अवघड असते. यानंतर येतो तो सम अग्नी. जाठराग्नी किंवा सर्व धातूत अग्नी असतात असे थोडेफार माहीत असते व त्यावरच समाधान मानले जाते. हा अग्नी काय करतो, कुठे असतो? अग्नी धनसंपदा देणारा आहे अशी त्याची व्याख्या केलेली असल्यामुळे तो शरीररूपी धन देणारा आहे. वीर्यातून स्फोट झाल्यावर उत्पन्न होणारे ओज म्हणजे प्रकाश, तसे या अग्नीच्या शक्‍तीद्वारा घडलेल्या कर्मातून उपलब्ध होणारे धनच शरीरालासुद्धा अग्नीत शुद्ध करून तेजस्वी व मजबूत बनविणारे, व्यक्‍तिमत्त्वाची धार अत्यंत सूक्ष्म करणारे असे हे अग्नितत्त्व. अनेक वेळा लोखंडावर अग्निसंस्कार करून तलवारीला धार केली जाते, तसे शरीरातील अग्नी शरीराला व मनाला धारदार बनवितात. म्हणजेच शरीरातील अग्नी व्यवस्थित असला तर व्यक्‍ती रुबाबदार असते, त्याची शरीरसंपदा उत्तम असते, त्याचे कर्म समाजोपयोगी असते, त्याच्याबरोबर आलेली बाह्यसंपदा म्हणजे समृद्धी वगैरे उत्तम असते. हा सर्व विचार करणे आवश्‍यक आहे. अग्नी दूषित झाल्यानंतर उन्माद नक्की ठरलेला आहेच. उन्मादामुळे अग्नी जास्त प्रदीप्त होतो, त्यामुळे उन्मादाचा वेग आला की माणसे कोसळतात, कारण अशा वेळी त्यांच्या शरीरात अग्नी उरलेला नसतो. 

यानंतरच्या ‘प्रसन्नात्मेन्द्रियमनाः’ या शब्दात आत्मा, इंद्रिये व मन यांचा उल्लेख केलेला आहे. आपल्या चिंतनाने, ध्यानाने, हवनाने एक वेळ देव प्रसन्न होईल, पण मन प्रसन्न होणे खूप अवघड आहे, मन प्रसन्न होण्यासाठी मुळात त्याची भेट तर व्हायला पाहिजे!! भल्याभल्यांची स्वतःच्या मनाशी भेट होत नाही. पायाला भिंगरी लागलेल्या व्यक्‍तीला सतत प्रवास करावा लागतो, तसे मनरूपी भिंगरी सतत भिरभिरत असते. ती एका जागी स्थिर राहात नाही, उलटी फिरते, सुलटी फिरते, फिरत आहे असे भासते तेव्हा ती फिरत असते आणि फिरत आहे असे भासते तेव्हा स्थिर असते. अशी ही मनभिंगरी प्रसन्न कशी होणार? मन प्रसन्न असणे, त्यानंतर इंद्रिये प्रसन्न असणे आवश्‍यक आहे. (क्रमशः)
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

आरोग्यासाठी प्रसन्न मन -2

अनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर, असा विचार करत ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते. 

जग हे जडापासून बनलेले आहे. या विश्वातील मायेच्या चमक-दमककडे आकर्षित होऊन किंवा चुकीच्या आवाहनामुळे मनुष्य चुकीच्या मार्गाला जातो. यामुळे मन प्रसन्नता हा सोम्यागोम्यासाठीचा मार्ग नव्हे असे म्हणून आपण मोकळे होतो. पण प्रत्येक माणसाला आज ना उद्या स्वतःचे आरोग्य, समृद्धी, आत्मसमाधान व तेजाचा विचार करावाच लागेल. कारण सरतेशेवटी शांती त्या ठिकाणीच मिळणार असते. 

मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व थोड्या थोड्या फरकाने एकमेकांपासून वेगळे असले, तरी ते सर्व एकच आहेत. यातील बुद्धी आहे महत्त्वाची. अहंकार हा अंधकारच होय. तेथे सगळ्याचाच अभाव असतो. तेथे असतो फक्‍त स्वार्थीपणा व लंपटपणा. चित्त हे बुद्धीचे आदेश मनापर्यंत पोचविण्याचे माध्यम. बुद्धीचे व्यवस्थित मार्गदर्शन मनाला मिळाले तर मन शांत होऊ शकते, प्रसन्न होऊ शकते. एखादा मनुष्य नशीबवान आहे असे आपण म्हणतो. तो नशीबवान होतो, कारण त्याला योग्य वेळी योग्य गोष्टी सुचतात. त्याला खरोखर भगवंतांचा कृपाशीर्वाद मिळत असणार, जेणेकरून त्याला जीव, आत्मा व परमात्म्याच्या श्रेयस गोष्टी सुचतात. बुद्धीने अशा प्रकारे ऐनवेळेला सु-विचार सुचविण्यासाठी, चांगली कल्पना सुचविण्यासाठी, चांगल्या अनुभवाचा साक्षीदार करून देण्यासाठी खूप पूर्वतयारी असण्याची गरज असते. म्हणून ज्ञान हे अनुभवावर आधारित असते.

एक गृहस्थ मोठे कवी होते. त्यांनी गंगेवर एक छान काव्य रचले होते. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. पुरस्कार घेण्यासाठी एवढ्या लांब आलेलो आहोत, तेव्हा गंगास्नान करून जावे अशा हेतूने ते गंगेवर पोचले. ते पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करत होते. काठावर असलेल्या एकाने सांगितले येथे उतरू नका, कारण येथे खूप मगरी, सुसरी आहेत. त्यावर कवी म्हणाले की, मगरी-सुसरी या तर गंगेचे वाहनच आहेत. मी तळापर्यंत जाणारच नाही, कारण वाहनावर गंगा आरूढ झालेली आहे. मी फक्‍त वर वरच्या पाण्यात स्नान करणार आहे. पाण्यात उतरल्यावर मगरीने पाय धरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या वाहनाचा अनुभव आधी घ्यायला पाहिजे होता असे लक्षात आले. गंगेचे वाहन मगर आहे म्हणत असताना मगर गंगेच्या पाण्यावर विहरत असतात, गंगा मगरावर आरूढ झालेली नसते. हा अनुभव नसल्याने नुसत्या शब्दाच्या माध्यमातून लिहिलेल्या काव्याला पुरस्कार मिळू शकतो, पण व्यवहारात त्याचा उपयोग होत नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. शंकरांनी विषप्राशन केल्यानंतर त्यांच्या कंठाची आग होऊ लागली, तेव्हा त्यांनी सर्प थंड असतो म्हणून सर्पाला कंठाभोवती लपेटून घेतले. परंतु प्रत्यक्ष सर्पाचा थंडपणा अनुभवल्यावर मिळणारे ज्ञान वेगळे असते. असे अनेक प्रसंग आठवतील की, ज्यात बुद्धी व बुद्धीवर बसविलेले तर्क यांनाच ज्ञान समजून आचरण केल्याने आयुष्यात चांगल्या संधीला मुकावे लागले. 

अनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर असा विचार करत आपण ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते. विषयांवर जबाबदारी टाकणे म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचे पॅकिंग फारच आकर्षक असल्यामुळे ती वस्तू आपण वापरतो, एखादा मनुष्य दिसायला अतिशय स्मार्ट व रुबाबदार किंवा स्त्री सौंदर्यवान दिसत असल्यामुळे त्यांच्याकडे आमचे मन आकर्षित होते अशा प्रकारे विषयावर जबाबदारी टाकली जाते. विषय मनाला विचलित करतात हे एका दृष्टीने बरोबर आहे. 

प्रत्येक इंद्रिय वेगवेगळ्या गुणांनी बांधलेले असते. विषयांचे पण स्वतःचे गुण ठरलेले असतात. त्यामुळे इंद्रिये विषयाकडे आकर्षित होतात. सृष्टीने सृजनासाठीचे आणि जीवन व्यवस्थित चालण्यासाठी काही नियम केलेले आहेत. त्यातही अशी आकर्षणे निसर्गतःच टाकून ठेवलेली आहेत, उदा. प्रजोत्पादनासाठी उपयोगी पडणारे पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षण. पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षणामुळे जीवनात शृंगाररस उत्पन्न होतो व एकूण जीवनाचे सौंदर्य कळून जीवनाविषयी आकर्षण उत्पन्न होते. विषयांना समजून घेणे खूप आवश्‍यक आहे. विषय कशासाठी आहे हे पाहणे आवश्‍यक असते. शिडी ही वरच्या मजल्यावर जाण्यासाठी साधन आहे. शिडी कितीही उत्तम दर्जाची बनवायची असे ठरविले, तरी ती सोन्याची बनवता येत नाही, कारण सोने मऊ असल्याने सोन्याच्या पायऱ्या वाकू शकतात. शिडीच्या पायऱ्या सुंदर दिसणाऱ्या चकचकीत धातूच्याही करता येत नाहीत, कारण शिडीच्या पायऱ्यांवर पाय द्यायचाच असतो. शिडीवरून चढून गेल्यावर आपल्या परमप्रिय व्यक्‍तीची भेट झाली, तर शिडीची कोणी पूजा करत नाही आणि कायम शिडी बरोबर घेऊनही कोणी फिरत नाही. 

अशा प्रकारे प्रत्येक बाह्यवस्तूचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे प्रत्येकाने नक्की केले, तर विषयांपासून सुटका होण्याचे नक्की होऊ शकते. जेवल्याशिवाय राहता येत नाही. पाण्याला जीवन म्हटले जाते, ते प्रत्येकाला आवश्‍यक असतेच. परंतु ज्या वेळी जिवावर बेतण्याची वेळ येते तेव्हा पाण्यावर भागत नाही. अन्नावाचून चालत नसले, तरी त्यावाचून महिनाभर राहता येऊ शकते. आवडीच्या वस्तू जेवणात असल्या, तर जेवण जाते; अन्यथा तोंडात घास गोल फिरतो असे म्हणणारी व्यक्‍ती उपासमार झाली की गणपतीला वाहिलेल्या दूर्वा खायलाही मागे-पुढे पाहत नाही. 

प्रत्येक विषयाचे चिंतन करून आपले जीवन चालविण्यासाठी, जीवनात हाती घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी मुळात कुठले विषय अगदी निकडीचे आहेत ते ठरविणे, त्या विषयांची वर्गवारी लावून, त्यांचे आपल्या आयुष्यात असलेले प्राधान्य ठरवून नंतर त्या विषयांचे आपल्या आयुष्यातील स्थान नक्की करावे. विवाहिताला पत्नी व तिच्यापासून मिळणारे सुख हा विषय महत्त्वाचा असणे साहजिक आहे. परंतु लग्न न झालेल्या अनेक व्यक्‍ती असतात. आपल्याला जीवनाच्या लक्ष्याप्रत पोचण्यासाठी काय अत्यावश्‍यक आहे हेही ठरवावे लागते. श्रीमद्‌ आदि शंकराचार्यांनी ‘भज गोविन्दम्‌’ या स्तोत्रात ‘एतद्‌ मांसवसादिविकारम्‌’ असे म्हटलेले आहे. म्हणजे ज्या वस्तूंची डोळ्यांना भुरळ पडते ते आयुर्वेदातील मज्जा व मांस यांचे खेळ असतात. तेव्हा त्यांना अवास्तव महत्त्व न देता हे मज्जा व मांस ज्या जिवाशी संबंध ठेवून असतात त्या जिवाचा, त्या व्यक्‍तीचा विचार करणे अधिक आवश्‍यक असते.
असे करत गेल्याने सरतेशेवटी अणूरेणूत असलेल्या परमात्म्यापर्यंत पोचल्यानंतर विषयनिवृत्ती सोपी होऊ शकेल. अशी विषयनिवृत्ती झाली, तर इंद्रियांवर अनुशासन करणे सोपे होईल. 
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

प्रसन्न मन -1

रोगाचे निदान तसेच उपचार करताना, विशेषतः पंचकर्मासारखे उपचार करताना व्यक्‍तीची मनोवृत्ती लक्षात घेणे आवश्‍यक असते. कारण श्रेष्ठ मनोवृत्तीच्या व्यक्‍तीला कितीही त्रास होत असला, तरी त्याची सहनशक्‍ती मोठी असल्याने तो त्रासाचे वर्णन होत असल्यापेक्षा कमी करेल. याउलट हीन, दुर्बल मनोवृत्तीच्या व्यक्‍ती राईचा पर्वत करून सांगण्याचा प्रयत्न करतील. रक्‍तमोक्षण, अग्निकर्म, क्षारकर्मासारखे अवघड उपचार हीन सत्त्वाच्या व्यक्‍तीला करणे बहुधा अशक्‍य असते. श्रेष्ठ मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्‍तीवर उपचार करणे व रोगातून बरे करणे त्यामानाने सोपे असते. सहसा अशा व्यक्‍तींची मूळची ताकद, प्रतिकारशक्‍ती व इच्छाशक्‍ती चांगली असल्याने त्यांना रोग होण्याची शक्‍यताही कमीच असते.


हीन सत्त्व म्हणजे दुर्बल मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्‍ती स्वतः स्वतःला तर धीर देऊ शकत नाहीतच, पण दुसऱ्याने समजावले तरी मनाची वृत्ती बदलवू शकत नाहीत. संकटात यांचे मन अगदीच कावरेबावरे होते. भीती, शोक, लोभ, मोह, अहंकार यांचा या व्यक्‍तींच्या मनावर मोठा पगडा असतो. छोट्या मोठ्या प्रसंगांनाही सामोरे जाणे, धैर्यपूर्वक मार्ग काढणे यांच्यासाठी अवघड असते. एखादी भयानक, अप्रिय, तिटकारा असणारी विकृत कथा ऐकल्यास किंवा पाहिल्यास, तसेच पशू किंवा मनुष्याचे रक्‍त पाहिल्यास यांना मनात विषाद उत्पन्न होतो. मनावर परिणाम होऊ शकतो किंवा घेरी येऊन भान हरपू शकते. कधी कधी तर यामुळे मृत्यूही ओढवू शकतो. 

रोगाचे निदान तसेच उपचार करताना, विशेषतः पंचकर्मासारखे उपचार करताना व्यक्‍तीची मनोवृत्ती लक्षात घेणे आवश्‍यक असते. कारण श्रेष्ठ मनोवृत्तीच्या व्यक्‍तीला कितीही त्रास होत असला तरी त्याची सहनशक्‍ती मोठी असल्याने तो त्रासाचे वर्णन होत असल्यापेक्षा कमी करेल. याउलट हीन, दुर्बल मनोवृत्तीच्या व्यक्‍ती राईचा पर्वत करून सांगण्याचा प्रयत्न करेल. रक्‍तमोक्षण, अग्निकर्म, क्षारकर्मासारखे अवघड उपचार हीन सत्त्वाच्या व्यक्‍तीला करणे बहुधा अशक्‍य असते. श्रेष्ठ मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्‍तीवर उपचार करणे व रोगातून बरे करणे त्यामानाने सोपे असते. सहसा अशा व्यक्‍तींची मूळची ताकद, प्रतिकारशक्‍ती व इच्छाशक्‍ती चांगली असल्याने त्यांना रोग होण्याची शक्‍यताही कमीच असते.  

मन, आत्मा आणि शरीर यापैकी मन सर्वांत महत्त्वाचे कारण मनच आत्म्याशी संयुक्‍त होऊन संपूर्ण शरीराचे नियमन करत असते. म्हणूनच आपली भावनिकता, एखाद्या बिकट प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, आवड-निवड वैगरे सर्व भाव मनाच्या शक्‍तीवरच अवलंबून असतात. मनाची शक्‍ती मानसिकतेवरून ओळखता येते. आयुर्वेदाने मनाच्या शक्‍तीवरून मनाचे तीन भाग केले आहेत. 

तत्र त्रिविधं बलभेदेन - प्रवरं, मध्यमं, अवरं चेति ।
अतश्‍च प्रवरमध्यावरसत्त्वाः पुरुषाः भवन्ति । ....चरक विमानस्थान
१ - प्रवरसत्त्व पुरुष (आत्मतत्त्व) म्हणजे उत्तम मनशक्‍ती असणाऱ्या व्यक्‍ती.
२ - मध्यमसत्त्व पुरुष म्हणजे मध्यम मनशक्‍ती असणाऱ्या व्यक्‍ती.
३ - अवरसत्त्व पुरुष म्हणजे हीन (कमी) मनशक्‍ती असणाऱ्या व्यक्‍ती.
प्रवर अर्थात श्रेष्ठ मनःशक्‍ती असणारी व्यक्‍ती शरीराने बलवान असली-नसली तरी मनाने खंबीर असते. शरीरातील वात-पित्त-कफातील असंतुलनामुळे किंवा बाह्य आघातामुळे कितीही कठीण प्रसंग ओढवला तरीअशी व्यक्‍ती हडबडून किंवा गोंधळून जात नाही. प्रवर सत्त्ववान व्यक्‍ती उत्तम स्मरणशक्‍ती असणाऱ्या बुद्धिमान व उत्साही असतात, भक्‍तिभावाने संपन्न, कृतज्ञ, पवित्र तसेच धीर धरू शकणाऱ्या त्या असतात. प्रसंगी पराक्रम करून दाखविणाऱ्या असतात, त्यांच्या ठिकाणी विषादाचा लवलेश नसतो, त्यांची गती सुव्यवस्थित असते. धडपडणे, ठेच लागणे, अडखळणे अशा गोष्टी त्यांच्याकडून होत नाहीत. त्यांची विचारसरणी व हालचाली गंभीर (म्हणजे सुसूत्रतापूर्ण) असतात. त्यांचे मन आणि बुद्धी सातत्याने कल्याणाच्या मार्गाचाच विचार करत असतात. 
मध्यम म्हणजे साधारण मनःशक्‍ती असणारी व्यक्‍ती दुसऱ्याच्या आधाराने किंवा दुसऱ्याने आश्वस्त केले की, परिस्थितीशी सामना करण्यास तयार होते.  अशा प्रकारे मानसिकतेवरून मनाचे तीन विभाग केले असले तरी मनाची शक्‍ती वाढवता येणे शक्‍य असते. ही मानसशक्‍ती तीन प्रकारची असते. धी, धृती आणि स्मृती या तिन्ही मानसशक्‍ती नीट समजून घेतल्या आणि त्यांना अधिकाधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला तर मनाचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. 

धी-धी म्हणजे मेधा व बुद्धी.
धारणावती धीः मेधा ।...चरक सूत्रस्थान
कोणतीही गोष्ट आकलन करण्याचे, समजून घेण्याचे काम मेधा करते. आपली प्रकृती काय आहे, प्रकृतीला अनुरूप आहार-आचरण म्हणजे नेमके काय हे समजून घेणारी मेधा असते. मेधा ही स्मृतीच्या अलीकडची पायरी असते. एखादी गोष्ट समजली तरच ती नंतर लक्षात राहू शकते. 
निश्‍चयात्मिका धीः बुद्धिः ।...सुश्रुत शारीरस्थान

एखाद्या विषयाचे निश्‍चित, नेमके व खरे ज्ञान करून देते ती बुद्धी. मनाच्या द्विधा अवस्थेतून एका निर्णयाप्रती आणते ती बुद्धी. उदा. तापातून नुकत्याच उठलेल्या व्यक्‍तीला आइस्क्रीम खाण्याची इच्छा झाली तरी बुद्धी त्याला या अवस्थेत आईस्क्रीम खाणे बरोबर नाही हा निर्णय देत असते. एखादा विषय व्यवस्थित मुळापर्यंत नीट समजून ज्ञात करून घेणारी बुद्धी असते. त्यामुळे स्वतःची प्रकृती व्यवस्थित समजून घेणे, आपल्या प्रकृतीला चांगले काय, वाईट काय हे अगदी पक्के जाणून घेणे हे बुद्धीवर अवलंबून असते. प्रकृतीमध्ये काही बदल होत असला, असंतुलन होत असले तर तेही बुद्धीलाच कळू शकते. 
मेधा तसेच बुद्धीने विषय आकलन केला, त्याचे व्यवस्थित ज्ञान करून घेतले, त्यानुसार अचूक निर्णय घ्यायला मदत केली तरी बुद्धीने दिलेला निर्णय कायम ठेवून योग्य ती गोष्ट करण्यास मनाला प्रवृत्त करणारी असते ती धृती.
नियमात्मिका बुद्धिः धृतिः ।...सुश्रुत शरीरस्थान

नुकताच ताप येऊन गेला आहे, अशा अवस्थेत आईस्क्रीम खाणे योग्य नाही असा बुद्धीने निर्णय दिला तरी, आइस्क्रीमच्या मोहात अडकलेल्या मनावर संयम ठेवण्याची जबाबदारी धृतीची असते. 
धृतीप्रमाणेच स्मृतीचेही योगदान महत्त्वाचे असते. 
अनुभवजन्य ज्ञानं स्मृतिः ।

एखादी गोष्ट वाचली, ऐकली आणि ती लक्षात ठेवली म्हणजे ज्ञान झाले असे नाही. माहिती व ज्ञान या दोन्ही गोष्टींमध्ये मोठा फरक असतो. मिळालेल्या माहितीचा अनुभव घेतलेल्याशिवाय त्याला ज्ञान म्हणता येत नाही. अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची आठवण स्मृतीमुळे राहते. मागच्या वेळी आइस्क्रीम खाल्ले होते तेव्हा त्रास झाला होता ही अनुभवजन्यआठवण असली तरच आइस्क्रीमसमोर असूनही खाणे बरोबर नाही हा निर्णय ठाम राहू शकतो. अनुभव मनुष्याला शिकवतो, शहाणे करतो असे म्हटले जाते, ते स्मृतीच्या जोरावरच! नुसती माहिती असली तर ती योग्य वेळी आठवेल न आठवेल याची खात्री देता येत नाही. अनुभव गाठीशी असला तर तो निश्‍चितपणे मार्गदर्शन करू शकतो. 

अशाप्रकारे धी सारासार विचार करून निर्णय देण्याचे काम करते, धृती अहितापासून दूर ठेवणारी असते तर स्मृती वेळेवर पूर्वीचा अनुभव लक्षात आणून सावध करण्याचे काम करते. जोपर्यंत या तिन्ही मानसशक्‍ती कार्यरत असतात, तोपर्यंत मनात सत्त्वगुणाचे आधिक्‍य राहते, मात्र धी, धृती, स्मृती भ्रष्ट झाल्या, आपापले काम योग्य रीतीने करेनाशा झाल्या तर हळूहळू मनात रज तसेच तमदोषाचे प्राबल्य वाढत जाते आणि त्यातून अनेक मानसिक तसेच शारीरिक रोगांना आमंत्रण मिळू शकते.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, February 3, 2016

ताणतणाव

- डाॅ. ह. वि. सरदेसाई
कशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्‍या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.

परिस्थितीत होणारा बदल कमी जास्त प्रमाणात ताण निर्माण करतो. या बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता महत्त्वाची असते. या क्षमतेतील त्रुटी तणाव निर्माण करते. हा बदल कधी कधी तुलनेने नगण्यही असू शकतो. कधी तर झालेला किंवा होऊ घातलेला बदल किफायतशीरदेखील असू शकतो (जसे बढती मिळणे व बदली होणे), अशा कोणत्याही बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता कमी असण्याने माणसाच्या मनोशारीरिक अस्तित्वात विकार होऊ शकतात. कशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्‍या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.

तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगाचा प्रकार वयोमानानुसार बदलू शकतो. पौगंडावस्थेत आपल्या पालकांच्या अपेक्षा, तारुण्यात वैवाहिक साथीदारांसंबंधीची मिलनोत्सुकता, पुढे कामातील वरिष्ठांशी संबंध, आर्थिक स्वास्थ्य-सुबत्ता मिळण्याची आणि ती कमावण्याकरिता करावी लागणारी धडपड, पुढे वैवाहिक जोडीदाराबरोबर सलोख्याचे स्नेह-संबंध टिकणे, वयस्कर वाड-वडिलांच्या प्रकृतीच्या समस्यांना सांभाळणे, लहान मुलांचे बेशिस्त वागणे, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होताना पाहणे, वार्धक्‍याबरोबर येणारी शारीरिक आणि आर्थिक तूट, याबरोबर घसरणारी कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठा आणि नेहमीच असणारी, परंतु वार्धक्‍यात विशेषतः जाणीव होत राहणारी मृत्यूची भीती, ही सारी कमी-जास्त प्रमाणात तणाव निर्माण करणारी कारणे प्रत्येक व्यक्तीत असू शकतात. या कारणांना वास्तवात जाणणे, वास्तव स्वीकारणे आणि वास्तवाचा उपभोग घेण्याची क्षमता जोपासणे, हे खऱ्या समृद्ध मनाचे लक्षण होय.
तणावामुळे व्यक्ती चिंतातुर अथवा खिन्न होऊ शकते. अनेकांना शारीरिक लक्षणे उद्‌भवतात. काही जणांची वृत्ती समस्यांपासून पलायन करण्याची असते. अशा व्यक्ती मद्यपाशात स्वतःला झुगारून देतात किंवा अतिरेकी खातात व स्थूल बनतात किंवा जुगार, रेस अथवा पत्ते खेळणे, अशा वास्तवातून पलायनाच्या मार्गाला लागतात. बहुतेकांना तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगांच्या पुनरावृत्तीचे भय वाटत राहते. (जसे परीक्षा, सभेत भाषण करणे, मुलाखत देणे) काहींना क्रोध येत राहतो (अपेक्षा भंग होणे) काहींना अपराधीपणाची भावना येत राहणे (आपल्या हातून चूक घडली याचा पश्‍चात्ताप, ‘पाप’ घडल्याची टोचणी) काहींना घडून गेलेल्या घटनेबद्दल शरम वाटत राहते, (आपल्या कृत्यांबद्दल अथवा इतरांनी केलेल्या आपल्या ‘अपमाना’बद्दल) अशी भीती, राग, अपराधीपणाची भावना, लाज वाटणे इत्यादी भावना ज्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रसंग घडताना 

निर्माण होतात, त्याचप्रमाणे त्या त्या प्रसंगाच्या आठवणीनेदेखील जशाच्या तशाच निर्माण होतात. या भावनांमुळे व्यक्ती अस्वस्थ होते. माणसाची चिडचिड होते, स्वभाव रागीट किंवा चिडका बनतो, अकारण थकवा येतो, लहान सहान गोष्टींनी (आवाजामुळे) दचकावयाला होते आणि आपण तणावाखाली असण्याची जाणीव होते. या तणावामुळे एकाग्रता शक्‍य होत नाही, मनात विचारांचे वारू बेलगाम संचार करू लागतात, झोपेत व्यत्यय येऊ लागतो (झोप लागण्यास वेळ लागतो, जाग लवकर येते, सारखी जाग येते) अस्वस्थ करणारी स्वप्ने पडू लागतात. आपण आजारी आहोत, या भावनेने व्यक्ती पछाडली जाते, स्वतःला योग्य वाटेल ती औषधे (विनाकारण) घेण्याकडे कल होऊ लागतो. व्यसनाधीनता बळावते. प्रत्यक्ष त्रास होत असल्याने विविध तपासण्यांत फारसा दोष सापडत नाही, याचे नवल वाटू लागते.

बदलांना स्वीकारताना होणारे त्रास हे ‘चिंतातुर’तेपेक्षा वेगळे असतात, याचे ध्यान ठेवावे. शिवाय, इतर मानसिक आजार किंवा स्वभाव-दोष यांपासूनदेखील या परिस्थितीशी ‘जुळवून घेण्यातील त्रुटी’ने होणारे दोष वेगळे असतात. काही शारीरिक आजारांबरोबर आलेल्या मानसिक आजारांचीदेखील दखल घेणे आवश्‍यक असते. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेतील त्रुटीमुळे होणारे त्रास ती परिस्थिती बदलली (परीक्षा किंवा मुलाखत होऊन गेली) की आपोआप शमतात, तसे मानसिक विकारांचे होत नाही. परिस्थिती स्वीकारली म्हणजे जुळवून घेण्याचा प्रश्‍न मागे राहात नाही. परिस्थितीत बदल झाल्यावर येणारे विकार होण्यास जबाबदार असणारा परिस्थितीतील बदल न्यायालयांचे समन्स येणे, मिलनोत्सुक प्रेमसंबंधात विधान होणे) ओळखता येतो. साधारणपणे अशा घटनेचे परिणाम जेव्हा सहा महिने होतात, तेव्हा या तणावांना तीव्र प्रकारचे म्हटले जाते आणि जेव्हा जास्त काळ (अथवा कायम) होत राहणारा त्रास हा दीर्घकाळ चालणारा त्रास मानला जातो.

अशा बदलामुळे आलेल्या घटनांच्या उपचारात विविध प्रकारचे उपाय करणे उपयोगी पडते. सुरवात काही क्रियांपासून करणे इष्ट असते. बरीच माणसे श्‍वास भरभर घेऊ लागतात; परिणामी, रक्तीतील कार्बन-डाय-ऑक्‍साइडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हातापायांच्या बोटांना मुंग्या येतात, नाक व चेहरा किंवा कान येथेही अशा संवेदना जाणवतात. या संवेदनामुळे व्यक्ती आणखीनच भयभीत होते. शरीरक्रियांच्या अज्ञानातून उद्‌भवलेल्या भीतीचे निराकरण करून तक्रार लगेच दूर करण्यासाठी अशा व्यक्तीला एखाद्या (बंद) कागदाच्या पिशवीत श्‍वासोच्छवास करावयास सूचना द्याव्यात. थोड्याच श्‍वसनानंतर मुंग्या येणे थांबेल, भीती जाईल, मग कागदी पिशवी काढावी.
कोणत्याही कारणाने माणसाने श्‍वास भराभर घेतला तरी त्याच्या रक्तातील कार्बन-डाय ऑक्‍साइडचा निचरा होतो. असा निचरा प्रमाणाबाहेर झाल्याने हातापायांना मुंग्या येतात. शिवाय, काही रक्तवाहिन्यांचे आकुंचन होणेही संभवते. आपल्या मेंदूतील टेंपोरल लोब या भागात अशा प्रकारे रक्तवाहिन्यांच्या आकुंचनामुळे प्राणवायूचा पुरवठा कमी पडणे शक्‍य होते. परिणामी, त्या व्यक्तीलाकाही प्रकारचे ‘भास’ होणे शक्‍य आहे. याची माहिती प्राणायामातील ‘भास्त्रिका’ हा प्रकार करणाऱ्या साधकांना असावी.ज्या व्यक्तींना विशिष्ट बदलांमुळे तणाव येतो याची कल्पना असते किंवा देता आली तर अशा प्रसंगांना कसे तोंड द्यावे, याचे समुपदेशन उपयोगी पडते. तणावांची जाणीव होऊ लागताच शवासनासारखे शरीर सैल करणे व श्‍वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून इतर सर्व विचार करण्याकरिता मन मोकळे न ठेवणे याचाही उपयोग होतो. हा एका प्रकारे जागृत मन विचाररहित ठेवण्याचा (ध्यानाचा) प्रयत्न होय.

काही सामाजिक परिस्थितीचा परिणाम तणाव निर्मितीत होणे शक्‍य असते. काहींना गर्दीत जाणे नको वाटते, काहींना नव्या ओळखी करून घ्याव्याशा वाटत नाहीत, व्यासपीठावर जाण्याची अकारण भीती काहींना असते, अशा सामाजिक प्रसंगांना ओळखणे महत्त्वाचे ठरते. या प्रसंगांतून बाहेर पडताना सुरवात अगदी माफक (दोन-तीन माणसे) आकड्यापासून सुरवात करून (किंवा तशी कल्पना करून) त्या प्रसंगांना तोंड देण्याची मनाची तयारी केली जाते. काही वेळा मोठे बदल करावे लागतात. (उदा. नोकरी बदलणे) परंतु, हे निर्णय पूर्ण विचारांच्या नंतरच घ्यावेत.

मानसोपचार क्वचितच लागतो; परंतु समुपदेशन उपयोगी पडते. मनाला भविष्यकाळ किंवा भूतकाळांतील घटनांच्या विचारांत गुंतण्याची सवय लागलेली असते. त्याऐवजी मनाला वर्तमानकाळात आणि आताच्या परिस्थितीत राहण्याचा सराव करणे उपयुक्त ठरते. चिंता ही नेहमीच भवितव्याशी संबंधित तर अपराधीपणा हा नेहमीच भूतकाळात घडलेल्या घटनांबद्दल असतो, याची जाणीव ठेवावी.

काही औषधांचा वापरदेखील उपयोगी ठरतो. अर्थात, कोणत्याही औषधांचा वापर त्या संबंधात ज्ञान आणि वापरण्याचा अनुभव असणाऱ्या (डॉक्‍टर) व्यक्तीनेच करावा. पूर्वी आपल्याला बरे वाटले होते, हा अनुभव किंवा केवळ सद्‌हेतूने सुचविलेले औषध घेणे केवळ निरुपयोगीच नव्हे, तर अपायकारकही ठरू शकते, याचीदेखील जाणीव असावी. अनेक औषधांना नको असणारे परिणाम असतात, कधी कधी हे नको असणारे परिणाम गंभीर परिणाम करू शकतात, घातकही ठरू शकतात. यासंबंधात अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्‌स जनरल हॉस्पिटलमधून प्रसिद्ध झालेल्या एका शोध-निबंधातील माहिती दखलपात्र आहे. सलग दाखल झालेल्या सहाशे रुग्णांना ‘उपचाराचा’ झालेला त्रास अभ्यासला गेला तेव्हा असे आढळले की, या ६०० पैकी २९० रुग्णांना उपचारांचा काहींना काही त्रास झाला. यापैकी ७७ रुग्णांना गंभीर दुखणे झाले, तर १५ रुग्ण त्यांच्या आजारांनी नव्हे, तर उपचारांच्या दुष्परिणामांनी दगावले! लोरॅझिपॅम ०.५ ते १.० मिलीग्रॅम दिवसातून दोन वेळा असे उपयोगी पडणारे औषध डॉक्‍टरांच्या नजरेखाली मर्यादित काळापुरते फायदेशीर ठरू शकते.

सहसा योग्य समुपदेशन व रुग्णाला आजाराच्या स्वरूपाचे ज्ञान देऊन भीती घालविण्याने बरेच रुग्ण बरे होतात. उशिरा केलेले किंवा चुकीचे उपचार, आजार रेंगाळवतात व दीर्घकाळ चालू राहिलेले आजार एकदा जुनाट झाले की बरे होणे कठीण होते.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

खिन्नता

- डॉ. ह. वि. सरदेसाई

एखाद्या न आवडणाऱ्या घटनेनंतर वाईट वाटणे स्वाभाविक असते; परंतु खिन्नता टिकून राहणे ही विकृती होय. एखाद्या व्यक्तीला वाईट वाटले तर त्या व्यक्तीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सहानुभूती अवश्‍य वाटते. खिन्नता निर्माण झाल्यास काळजी घेणाऱ्या (आई-वडिलांना) व्यक्तींच्या मनात अपेक्षाभंग निर्माण होतो. त्यातून अशी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला चिडचिड येऊ शकते. ज्या व्यक्तीला वाईट वाटत असते, त्या व्यक्तीचा आत्मसन्मान टिकलेला असतो. उलटपक्षी खिन्न झालेल्या व्यक्तीला अपराधीपणा आणि स्वतःबद्दल किंमतशून्यतेची भावना बळावलेली असते.

आपल्या ‘फॅमिली डॉक्‍टर’कडे उपचारासाठी गेलेल्या रुग्णांपैकी तीस टक्के रुग्णांच्या तक्रारींचा उगम ‘खिन्नते’तून येतो. आपल्या जनुकीय रचनेवर मेंदूच्या पेशींच्या दळणवळणाचे कार्य अहोरात्र चालू असते. हे दळणवळण ज्या रासायनिक रेणूंमार्फत घडते, त्या रेणूंना न्यूरो-ट्रान्समिटर्स म्हणतात. हे रेणू विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेला, विशिष्ट प्रमाणात निर्माण होणे आणि विशिष्ट वेळांत त्यांचा निचरा होणे आवश्‍यक असते. तसे झाले तरच मेंदूचे कार्य सुरळीतपणे चालू शकते. भावना, विचार आणि अनुभवांची स्मृती योग्य प्रकारे होण्याकरता या कार्याची योग्य प्रकारे कार्यवाही आवश्‍यक असते. या व्यवस्थेवर आपल्या जनुकीय रचनेचा मोठा ताबा असतो. कोणती भावना, कोणत्या वेळी, कोणत्या प्रमाणात निर्माण व्हावी हे या कार्यावर ठरत राहते.

जनुकीय रचनेप्रमाणे, वाढीच्या वयातील अनुभव आणि समस्या यांचादेखील या रसायनांच्या निर्मितीवर परिणाम होत राहतो. काही व्यक्तिमत्त्वातील दोष (समाजाचे स्थैर्य विसकटण्यास जबाबदार असे वागणे ः कायदे न पालणे, इतरांना शारीरिक इजा करण्याकडे प्रवृत्ती असणे, जबाबदारीची जाणीव नसणे) प्रकट होऊ लागतात. या पेक्षाही आई-वडिलांचा विवाह-विच्छेद किंवा वडिलांचे अर्थाजन बंद पडणे या अनुभवांचे दुष्परिणाम होतात. अशा मुलांमध्ये अनेक शारीरिक तक्रारी येतात; परंतु कोणताही आजार आढळून येत नाही. एखाद्या न आवडणाऱ्या घटनेनंतर वाईट वाटणे स्वाभाविक असते; परंतु खिन्नता टिकून राहणे ही विकृती होय. एखाद्या व्यक्तीला वाईट वाटले तर त्या व्यक्तीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सहानुभूती अवश्‍य वाटते. खिन्नता निर्माण झाल्यास काळजी घेणाऱ्या (आई-वडिलांना) व्यक्तींच्या मनात अपेक्षाभंग निर्माण होतो. त्यातून अशी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला चिडचिड येऊ शकते. ज्या व्यक्तीला वाईट वाटत असते, त्या व्यक्तीचा आत्मसन्मान टिकलेला असतो. उलटपक्षी खिन्न झालेल्या व्यक्तीला अपराधीपणा आणि स्वतःबद्दल किंमतशून्यतेची भावना बळावलेली असते.

खिन्नतेने ग्रासलेल्या व्यक्तीला किमान चार प्रकारचे त्रास जाणवू लागतात. १) खिन्नतेची, बरे वाटत नसल्याची भावना आणि परिस्थितीला जुळवून घेण्यातील क्षमतेची त्रुटी, २) खिन्नतेमुळे होणारे आजार, ३) खिन्नता आणि उन्माद यांच्या परिक्रमा आणि ४) आजार आणि उपचार यांच्यातून निर्माण झालेले त्रास, नको असणारे दुष्परिणाम, आजाराला होणारे प्रतिसाद.

१) परिस्थितीत घडलेल्या घटनेला प्रतिसाद म्हणून येणारी खिन्नता. प्रिय व्यक्तीचा विरह अथवा मृत्यू, विवाहविच्छेद, आर्थिक नुकसान, सामाजिक (अथवा कौटुंबिक) आदर गमावणे. अशा घटना घटताना राग येतो, नंतर अपराधीपणाची भावना बळावते. घटना घडल्यावर तीन महिन्यांच्या आंत त्रास होतो. आपले दैनंदिन कार्य करताना अडचणी जाणवू लागतात. थोडेफार वाईट वाटत राहते. चिंता येत राहते. स्वभाव चिडका बनतो. एकाग्रता जमत नाही. काहीही कार्य करण्याबद्दल आत्मविश्‍वास डळमळू लागतो आणि खिन्नतेच्या भावनेच्या जोडीला विविध शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. (पुढे पहावे).
२) मोठ्या प्रमाणात खिन्नतेचे परिणाम ः कोणत्याही बाबीत रस घ्यावासा वाटेनासा होतो. कशाचाही आनंद होत नाही. सगळ्या गोष्टींतून निवृत्त व्हावे ही भावना बळावते. आपले सगळे निर्णय चुकले आहेत, अशी अपराधीभावना येत राहते. मन एकाग्र होऊ शकत नाही. सतत थकवा वाटत राहतो. आता आपली काही किंमत राहिलेली नाही, असे वाटते. ज्या तक्रारींची कारणे सापडू शकत नाहीत, अशा विविध शारीरिक तक्रारी सतत येत राहतात. लैंगिक विषयात आणि संबंधातील रस लोपतो. मृत्यूचे विचार थैमान घालतात. कधी कधी या विचारांचे रूपांतर आचारात (आत्महत्या करण्यात) होऊ शकते. (परीक्षेत किंवा प्रेमात अपयश, आर्थिक नुकसान, प्रिय व्यक्तीचा मृत्यू) यातील बऱ्याच तक्रारी, विशेषतः थकवा, दिवसाच्या सुरवातीला (सकाळी) अधिक जाणवतात. झोपेत व्यत्यय येतो, सहसा भल्या पहाटेच जाग येते व तेव्हा मन खिन्न असते. भूक लागेनाशी होते. वजन कमी होऊ लागते, मलावरोध (शौच्याला घट्ट होणे, मल बाहेर पडण्यात अडचण जाणवणे) बळावतो. एखाद्या रुग्णाला खूप अस्वास्थ्य जाणवते व वास्तवाला अनुरूप नसणारे विचार आणि आजार होऊ लागताच. असा प्रकार वयस्कर रुग्णात अधिक प्रमाणात आढळतो. शंकेखोर प्रवृत्ती वाढते. ‘आपल्याबद्दल माणसे बोलतात, आपल्यामागे आपल्याला नावे ठेवतात’ असे विचार येतात. ‘आपल्याला कॅन्सरसारखा एखादा मोठा आजार झाला आहे’ हा विचार पिच्छा सोडत नाही. काही रुग्णात खूप झोप येऊ लागते, खादाडपणा वाढतो, थकवा असतो; परंतु एखादी बातमी ऐकून खूप उत्साहित होतात. काही रुग्णांना ऋतुमानानुसार आजार दिसू लागतात. या प्रकाराला SAD (Seasonal Affeclive Disorder) म्हणतात. ज्या देशात (अथवा प्रदेशात) हिवाळ्यात दिवस खूपच लहान असतो, तेथे हे आजार अधिक प्रमाणात आढळतात. या रुग्णांना कर्बोदके (साखर, भात, बटाटा) खाण्याची इच्छा बळावते. उत्साह वाटेनासा होतो. खा खा सुटते व झोप पुरेनाशी होते. काही गर्भवती स्त्रियांना बाळंतपणानंतर तीन आठवडे ते सहा महिन्यांनी खिन्नतेचा मोठा विकार जडतो. माफक प्रमाणात थकवा आणि खिन्नता अनेक स्त्रियांना (८० टक्के) बाळंतपणानंतर जाणवू शकतो. दहा ते पंधरा टक्के या नव-मातांना मोठ्या प्रमाणात खिन्नतेचा आजार होऊ शकतो. आपल्या बाळाच्या सुरक्षेबद्दल अतिरेकी चिंता निर्माण होते. या माताना झोप लागत नाही. वागण्यात अतिरेकी चिंता किंवा अविश्‍वास दाखविला जाऊ लागतो. वेळीच उपचार आवश्‍यक असतात.
काही खिन्न व्यक्ती सतत थकलेल्या, निरुत्साही, सर्व कार्यांतून अंग काढून घेणाऱ्या असतात. असा आजार एक-दोन वर्षे चालतो. काही स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या वेळी खिन्नतेने पछाडले जाते, तर काहींना मासिक पाळी येण्यापूर्वीचे दोन आठवडे खिन्नतेचे त्रास होऊ शकतात.

३) उन्माद आणि खिन्नता यांच्या परिक्रमा येणे हा एक स्वतंत्र आजारच मानला जातो. आजाराच्या नावाप्रमाणे रुग्णाला उन्मादाचे आणि खिन्नतेचे आलटून-पालटून झटके येतात. उन्मादाच्या स्थितीत रुग्ण अस्वस्थ आणि बेचैन असतो, त्याला स्वस्थ बसवत नाही. जे डोक्‍यात विचार येतात, त्यांत अतिरेकी उत्साहाने भाग घेतला जातो, चटकन राग येतो. कल्पनांच्या भराऱ्या सुरू होतात. कोणत्याही एका विचारावर किंवा कामांत दीर्घकाळ रस राहत नाही, थोडीच झोप पुरते. या वैचारिक आणि भावनात्मक भराऱ्यांचे ऐकणाऱ्याला सुरवातीला कौतुक वाटते, पण काही वेळातच सारखे बदलणारे विचार, इतरांचा दृष्टिकोन स्वीकारण्यातील त्रुटी, मधून-अधून येणारा थकवा आणि स्वभावातील स्वतःच्या विचारांबद्दलचा भंपक मोठेपणा या अवगुणांची ओळख पटल्यावर ‘नको यांची संगती’ असा विचार मित्रांत फैलावू लागतो. स्वभाव अतिरेकी खर्चिक बनतो. ‘नोकरीवर लाथ मारीन’ अशा विचाराने वारंवार त्यागपत्र देऊन मागून पश्‍चात्तापाची पाळी येते. लग्न घाईत ठरविणे, उरकणे, विवाहबाह्य लैंगिक संबंध जोपासणे, मोठेपणाच्या फुशारक्‍या मारणे अशा वागण्याने कुटुंबीय व स्नेही कंटाळून जातात. दीर्घकाळ मैत्री जोपासणे किंवा स्थिर, सुखी संसार करणे क्वचितच जमते. सामान्यपणे उन्मादाचा काळ हा खिन्नतेच्या काळापेक्षा कमी लांबीचा असतो.

याच प्रकारात ‘सायक्‍लो थायमिक डिसॉर्डर्स’ नावाने ओळखला जाणारा एक भाग असतो. या व्यक्ती सतत काही वेळा खिन्नता तर काही वेळा थोड्या प्रमाणात उन्माद अशा आलटून-पालटून असतात. या व्यक्तींचे वर्णन पुढील श्‍लोकात चांगले आहे - ‘‘क्षणे तुष्ट - क्षणे रुष्टा - तुष्टा रुष्टा - क्षणे क्षणे। अव्यवस्थितचित्तस्य प्रसादोऽपि भयंकर  (लोकोक्ती) (अर्थ - क्षणात समाधान पावणारा तर क्षणात रागावणारा. क्षणाक्षणात रागावणारा तर कधी हसणारा अशा अस्थिर चित्ताच्या माणसाची कृपी ही भयंकर हानिकारक असते. अर्थात्‌ क्षणा-क्षणाला हा अतिशयोक्तीचा भाग आहे. सायक्‍लो थायमिक डिसऑर्डरमध्ये प्रत्येक भावना साधारण दोन वर्षे राहते!

४) आजारांना प्रतिसाद अथवा रासायनिक रेणूंना (औषधांना) प्रतिसाद म्हणून घेणारी खिन्नता बहुतेक सर्व. सौम्य अथवा गंभीर विकारांना आपले अस्तित्व ‘खिन्नता’ अथवा ‘चिंता’ या स्वरूपात प्रतिसाद देतेच. हृदयविकार, पक्षाघात, दीर्घकाळ चालणारे संधिवातासारखे आजार आले म्हणजे खिन्नता येतेच. कॅन्सर झाला आहे, ही बातमी धक्कादायक, चिंताजनक आणि खिन्नता निर्माण करणारी असते. रजोनिवृत्ती संबंधात वर उल्लेख आलेला आहेच. मद्यपान हे खिन्नतेचे आणि आत्मघाताचे महत्त्वाचे कारण असते. ब्लडप्रेशर ताब्यात ठेवण्याकरता एकेकाळी रेसर्पित नावाचे औषध वापरले जाई, त्याने अनेकांना खिन्नता येई. कॉर्टिकोस्टेरॉईडस्‌ आणि गर्भ-प्रतिबंधक गोळ्यांच्या वापराने देखील खिन्नता येते. सध्या ब्लडप्रेशर ताब्यात आणण्याकरता वापरत असणाऱ्या मिथाईल डोपा आणि क्‍लोनिडीन या औषधांच्या वापरात खिन्नता येणे हा एक नको असणारा आहे.

हृदयविकारात वापरले जाणारे डिजिटॅलिस हे जगत्‌विख्यात औषध आणि पार्किन्सन्स डिसीनमध्ये वापरले जाणारे लिव्हीडोपा हे औषध घेणाऱ्यांना डिप्रेशन येते. नेहमीच्या वापरातील औषधांपैकी बीटा ब्लॉकर्स प्रकारची औषधे दीर्घकाळ घेतली तर खिन्नता येऊ शकते. कोणतेही औषध वापरण्यापूर्वी रुग्णाला खिन्नता येण्याचा पूर्व-इतिहास असला तर खात्री करून घेणेच इष्ट असते.

खिन्नता हा विकार अनेकांना असतो व त्याचे परिणाम अनेक प्रकारचे असतात, याची कल्पना समाजाला, रुग्णांना आणि डॉक्‍टरांना असणे आवश्‍यक आहे. विशेषतः थकवा, निरुत्साह, निद्रानाश, भूक न लागणे, वजन कमी होणे, मलावरोध असे वरपांगी शारीरिक दुखणे खिन्नतेमुळे असण्याची शक्‍यता कधीही नजरेआड होऊ देता कामा नये.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

आरोग्यासाठी प्रसन्न मन -1

ज्याला आपण मन म्हणतो त्याचे केंद्र हे फक्‍त मेंदूपुरते मर्यादित आहे का? ज्याअर्थी मनाचा अंमल सर्व शरीरावर असतो त्याअर्थी मन प्रत्येक पेशीत असतेच. माझे मन कशावर तरी बसलेले आहे, माझे मन कशावर तरी जडले आहे असे आपण म्हणतो. याचा अर्थ मन मेंदूपुरते मर्यादित न राहता त्याची व्याप्ती मोठी झालेली असते. मनाची व्याप्ती एवढी छोटी नसते, की ते एका ठिकाणी बसले, की दुसऱ्या ठिकाणी त्याचे कार्य चालत नाही. मन ज्या पद्धतीने चालते त्या पद्धतीने कार्य करण्याची शक्‍ती प्रत्येक पेशीत असते. म्हणजेच प्रत्येक इंद्रियात पण मन असते. आणि त्याचा वापर करून इंद्रियावर जरी बाहेरून बंधन घातले तरी कार्य करत राहते. 

‘मला सगळे कळते’ असे ज्या वेळी माणसाला वाटते, निदान एखाद्या विषयात तरी मी संपूर्ण ज्ञानी आहे (उदा. मला रोगांचे व औषधांचे सर्व कळते असे डॉक्‍टरला वाटते, मला सर्व तांत्रिक कळते असे इंजिनिअरला वाटते, मला संगीतातील सर्व कळते असे संगीतकाराला वाटते) आणि तो स्वतःला मोठे समजतो, त्या वेळी त्याला सम्यक ज्ञान मिळू शकत नाही. सम्यक ज्ञान मिळवण्याची त्याची तयारी नसते. मनुष्य स्वतःला मी मोठा असे समजतो, त्यातून अहंकार उत्पन्न होतो, त्यातून मान-अपमान तयार होतो, एखादी गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे न झाल्यास उत्पन्न होणाऱ्या त्राग्यामुळे राग, क्रोध तयार होतात व यामुळे बेशुद्धी येते. या ऐवजी मनुष्याने गुरूंचे - ज्ञानाचे व अभ्यासाचे मार्गदर्शन घेतले तर तो योग्य मार्गाने आत्मानंदापर्यंत पोचू शकतो. म्हणूनच ‘सद्‌गुरुवाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी’ असे म्हटलेले आहे. पाय का धरायचे, तर सद्‌गुरूंच्या डोक्‍यावर बसायचे नसते, कुठल्याही प्रकारे आव्हान करून, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे वाद करून त्यांना निःशब्द करण्याचा किंवा माझे तेच खरे असे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचा नसतो. गुरूंची कधीही निंदा करायची नसते तर त्याऐवजी त्यांच्या पायाकडे लक्ष

ठेवायचे असते, म्हणजे त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून जायचे असते. ‘मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्‌गुरू पाय दोन्ही’ असे जे म्हटलेले आहे ते यासाठीच. गुरूंचा चेहरा व्यवहारात वेगवेगळा दिसला तरी आतमध्ये गुरूतत्त्व एकच असते. या गुरूतत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली बुद्धीचा वापर होऊ शकतो. शेवटी गुरू काय किंवा तुमची अंतरबुद्धी काय, दोन्ही केवळ रस्ता दाखवण्याचे काम करतात; चालावे लागते स्वतः व्यक्‍तीलाच, म्हणजे शेवटी इंद्रियांचेच व्यापार चालतात. त्या बुद्धीच्या वापरानंतर मनावर ताबा मिळून इंद्रियविजय मिळविणे सोपे होते. इंद्रिये ताब्यात आल्यावर मन प्रसन्नता मिळून शक्‍ती मिळेल, रोगनिवारणही होऊ शकेल. मनाचे आरोग्य आले की, पाठोपाठ शरीराचे आरोग्य येऊ शकते. तेव्हा मन प्रसन्नतेच्या मार्गाने गेले तर आपल्याला शारीरिक आरोग्यही मिळू शकते. 

शेवटी पुन्हा मुद्दा इंद्रियांवरच येऊन थांबला आहे. इंद्रिये शारीरिक पातळीवर असतात, इंद्रियांचे व्यवहार आपल्याला समजू शकतात, कळू शकतात. इंद्रियांचे व्यवहार त्या त्या विषयापुरते, त्या त्या क्षेत्रापुरते चालतात. इंद्रियांना त्यांचे काम करू द्यायचे की थांबवायचे यासाठी व्यवस्था असते. मन प्रसन्नतेतील अडथळे शोधत असताना आपण पुन्हा इंद्रियनिग्रहापर्यंत म्हणजेच इंद्रियांच्या व्यवस्थापनापर्यंत किंवा त्यांच्या अनुशासनापर्यंत येऊन पोचतो. डोळे मिटून घेता येतात, म्हणजे इंद्रियांचे व्यवहार थांबवता येतात किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येते असे आपण समजतो. डोळे बंद करून घेतले तरी डोळ्यांचे आंतरेंद्रिय, विषय पाहिलेला नसताना, आतल्या आत कल्पना करत असते व तो विचार मनापर्यंत पोचवते. परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नसल्यामुळे साहजिकच मन स्वस्थ राहात नाही. 

ज्याला आपण मन म्हणतो त्याचे केंद्र मन हे फक्‍त मेंदूपुरते मर्यादित आहे का? ज्याअर्थी मनाचा अंमल सर्व शरीरावर असतो त्याअर्थी मन प्रत्येक पेशीत असतेच. माझे मन कशावर तरी बसलेले आहे, माझे मन कशावर तरी जडले आहे असे आपण म्हणतो. याचा अर्थ मन मेंदूपुरते मर्यादित न राहता त्याची व्याप्ती मोठी झालेली असते. मनाची व्याप्ती एवढी छोटी नसते की, ते एका ठिकाणी बसले की, दुसऱ्या ठिकाणी त्याचे कार्य चालत नाही. मन ज्या पद्धतीने चालते त्या पद्धतीने कार्य करण्यची शक्‍ती प्रत्येक पेशीत असते. म्हणजेच प्रत्येक इंद्रियात पण मन असते. आणि त्याचा वापर करून इंद्रियावर जरी बाहेरून बंधन घातले तरी कार्य करत राहते. उदा- डोळे मिटून घेतले तरी त्यातले मन डोळ्यांच्या विषयाविषयी चिंतन करून नको नको ते सत्य नसलेले किंवा काल्पनिक  विचार तयार करून त्याभोवती चिंतन करत राहते. हीच खरी अडचण आहे. डोळे मिटून बसले तरी आत चिंतन चालूच राहते, कान बंद केले तरी आपण विचार ‘ऐकत’ राहतो. काही न खाता उपवास करायचा ठरविला तरी काही तरी बहाणा शोधून ‘हे चालेल, ते चालेल’ असे ठरवून खाल्ले जाते. ‘हे खाल्ल्याने मला बरे वाटेल, ते खाल्ल्याने बरे वाटेल, उपवास असल्यामुळे आज अमुक गोष्ट मी खाल्ली नाही तरी उद्या मात्र नक्की खाणार. हा उपवासाचा दिवस कधी संपेल आणि मी भरपूर पोटभर केव्हा खाईन’ वगैरे विचारसुद्धा खाण्याच्या इंद्रियाचेच आहेत. यौवन इंद्रियेसुद्धा मैथुनाविषयी वेगवेगळ्या कल्पना रंगवत राहतात. 

असे सर्व विचार इंद्रियांवर निग्रह केल्यावरही येत राहिलेले असतात, म्हणजे खरे पाहता इंद्रियांचे काम चालू राहिलेलेच असते. या सगळ्यामुळे सम्यक मनाला विचारांना बुद्धीच्या प्रभावाखाली आणून प्रत्यक्ष ज्ञान करून घेऊन मेंदूपर्यंत पोचविण्याची व्यवस्था करण्यास वावच मिळत नाही. तेव्हा मनाला आवरण्यासाठी, इंद्रियांना आवरण्यासाठी बुद्धी हा एकमेव आधार शिल्लक राहतो. म्हणून बुद्ध केव्हा अवतार घेऊन येतील, श्रीकृष्णांनी म्हटल्यानुसार ते केव्हा अवतार घेतील व आम्हाला मदत करतील याची वाट सामान्यजन वर्षानुवर्षे पाहात राहतात. ‘तुझे आहे तुझपाशी’ किंवा ‘काखेत कळसा, गावाला वळसा’ असे जे म्हटले जाते त्याचा अर्थ असा की, प्रत्येकाजवळ त्याच्या आतच आयुष्याला चांगली दिशा दाखवून आनंद मिळविण्यासाठीची बुद्धी असतेच; मिळविलेल्या बुद्धीचा उपयोग करून घेणे प्रत्येकाच्या हातात असते आणि त्यातून ‘नर से नारायण’ स्वतःलाच व्हावे लागते. 

अनुभवातून तावून सुलाखून निघालेली बुद्धी म्हणजे ज्ञान. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी पुस्तकात असतात, पण ते ‘ज्ञान’ नसते ती ‘माहिती’ असते. या माहितीचा वापर करणारे धाडशी व नशिबवान असतात व त्यांनी मिळविलेल्या अनुभवाला ज्ञान म्हणता येते. अशा अनुभवी व्यक्‍तीकडून चांगल्या-वाईटाचे मार्गदर्शन बुद्धीमार्फत करून घेणे हाच शेवटचा उपाय दिसतो. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, December 28, 2011

मानसोपचाराने ठेवा हृदय शाबूत


डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ, पुणे
हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधं, व्यायाम व पथ्यं याबरोबरच मनःस्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रं, तसंच गायडेड इमेजरी यांचा मानसिक-शारीरिक दोन्ही दृष्टींनी चांगला उपयोग होऊ शकतो.

गेल्या काही वर्षांत एक महत्त्वाची संकल्पना मान्यता पावू लागली आहे, ती म्हणजे सायकोन्युरोइम्युनॉलोजी (पीएनआय). शरीर व मन एकमेकांवर कसे परिणाम करतात याचा तो अभ्यास आहे. भारतीयांसाठी खरं तर ही संकल्पना वेद काळापासून आहे. या संकल्पनेवर आधारित एक परिणामकारक तंत्र म्हणजे गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायझेशन.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा शरीरस्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे.

हे तंत्र इतर वैद्यकीय उपचारांना पूरक असेच आहे. मन आणि शरीर यांचा परस्परसंबंध वैद्यकशास्त्राने मान्य केला आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधं, व्यायाम व पथ्यं याबरोबरच मनःस्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रं, तसंच गायडेड इमेजरी यांचा मानसिक-शारीरिक दोन्ही दृष्टींनी चांगला उपयोग होऊ शकतो. ताणतणाव, क्रोध, दुःख, अपराधगंड, भीती आणि इतर नकारात्मक भावना हृदयरोग तसंच मधुमेहासाठी अतिशय घातक आहेत. संशोधनाअंती सिद्ध झालंय, की गायडेड इमेजरी, तसंच इतर स्वास्थ्य तंत्राद्वारा निर्माण होणारी स्वस्थ अवस्था या भावनांचा निचरा करते. रक्तदाब व नाडीची गती, तसंच रक्तातील शर्करा नियंत्रणात आणायला मदत करते. हृदयरोग संशोधनामधील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या डॉ. डीन ओर्निश यांनी सिद्ध केलं होतं, की आहार, व्यायाम तसंच स्वस्थतेची तंत्रं यांनी सीएचडी (कोरोनरी हार्ट डिसीज) वर मात करता येते. याच स्वस्थतेच्या तंत्रांमध्ये गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन फार मोलाचं योगदान देऊ शकते.

अशा पद्धतीची स्वस्थतेची तंत्रं अनेक प्रगत देशांतील क्‍लिनिकमध्ये व इस्पितळात वापरली जातात. त्यानं हॉस्पिटलमध्ये कमी काळ राहावं लागणं, वेदना कमी होणं व काही केसेसमध्ये औषधांचा परिणाम लवकर होणं, ती कमी लागणं, हेही घडलंय.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन -
मन व शरीराचं एकमेकांशी असलेलं नातं व मनाचा शरीरावर होणारा परिणाम या तत्त्वावर हे तंत्र आधारित आहे.

गायडेड इमेजरी ही एक प्रणाली आहे- ज्यामध्ये तुम्ही कल्पनेचा वापर करून स्वस्थता व शांततेच्या निवांत प्रदेशात जाता. निसर्गातील प्रतिमा व दृश्‍यांचा परिणामकारक उपयोग केला जातो. त्यासाठी तज्ज्ञ थेरपिस्टची गरज असते. निवांत व तरल अवस्थेत गेल्यावर तुम्ही तज्ज्ञांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण लक्ष शरीरातील आजारी अवयवावर किंवा विशिष्ट सिस्टिमवर केंद्रित करता. उदा. हृदयरोगात, कोरोनरी हार्ट डिसीज (सीएचडी) मध्ये रोहिणीकाठीण्य म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमध्ये मेद जमा होतो. रोहिण्या अरुंद होतात. या अवस्थेतील व्यक्तीला हृदयाची आजारी स्थिती डोळ्यांसमोर आणायला सांगितली जाते. त्या स्थितीवर फोकस करून रोहिण्यांमधील मेद विरघळत आहे, रोहिण्या रुंद होत आहेत, हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत आहे व प्राणवायू मिळत आहे, हे चित्र तीव्रपणे उभे केले जाते. हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं.

मधुमेहासाठी -
आपला कोमट श्‍वास डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतोय. तिथं विरघळतोय. तेथील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या उघडल्या जातात. त्यांच्यात आवश्‍यक ते बदल, दुरुस्ती होतेय. त्या सक्षम होतात. काही काळ तिथं थांबून हा श्‍वास मेंदूच्या अफलातून अशा जाळ्यांमध्ये शिरतोय. तेथील नाजूक मज्जातंतू व अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांची जाळी उघडली जातात, स्वस्थ होतात. निर्माण झालेले व होऊ शकणारे अवरोध, अडथळे दूर होतात. माझ्या प्रत्येक श्‍वासागणिक विलक्षण तेजस्वी, शीतल आणि सुखद असा प्रकाश जादू करतोय. शरीरातील सर्व सिस्टिम स्वस्थ होत जातात. हाच प्रकाश स्वादुपिंडामध्ये प्रवेश करतोय. तिथं अस्तित्वात असलेल्या पेशींच्या समूहाला उत्तेजित करतोय- ज्यायोगे त्या शरीराला आवश्‍यक तेवढं व शरीर वापरू शकेल एवढंच इन्शुलिन तयार होतंय, ते शरीरातील पेशींपर्यंत व्यवस्थित पोचतं आहे, हे इन्शुलिन एखाद्या किल्लीप्रमाणे काम करत आहे- ज्यायोगे जणू काही अन्नासाठी भुकेल्या पेशींचे दरवाजे उघडत आहेत आणि पेशींना व्यवस्थित अन्नरस मिळत आहे, हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं. वारंवार व प्रभावीपणे उभ्या केलेल्या कल्पनाचित्रांचा, अंतर्मनाच्या शक्तीचा हा विलक्षण आविष्कार असतो.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशनदरम्यान मेंदूतील भावना नियंत्रण केंद्रांकडे सकारात्मक सूचना पाठवल्या जातात, ज्या पुढे ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम व इम्यून सिस्टिमकडे जातात, ज्याचा चांगला परिणाम हार्ट रेट, रक्तदाब, रक्तशर्करा यावर होतो. चांगली संप्रेरकं स्त्रवली जातात. आजार लवकर बरा होण्याच्या दृष्टीनं, शरीर अनुकूल व तत्काळ प्रतिसाद देऊ लागतं. सेशननंतर व्यक्तीला अतिशय शांत, उत्साही व टवटवीत वाटतं. याप्रमाणे प्रकृतीनुसार अनेक सेशन्स केली जातात. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. रक्तशर्करा व लिपीड प्रोफाईलवर अनुकूल परिणाम होतो, आत्मविश्‍वास वाढतो, ताण नाहीसा होतो.
ही उदाहरणं फक्त कल्पना येण्यासाठी दिली आहेत. प्रत्यक्षात आजारी व्यक्तीची भावनिक जडणघडण, एकूण मानसिक स्थिती वगैरे लक्षात घेऊन तज्ज्ञ संहिता तयार करतात. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी संहिता असू शकते व सेशन्सची संख्या वेगळी वेगळी असू शकते. होऊन गेलेला आजार पुन्हा उद्‌भवू नये यासाठीही या तंत्राचा उपयोग होतो.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन तंत्राचा उपयोग पुढील आजारातही होऊ शकतो ः 1) कर्करोग, केमोथेरपी सुसह्य करण्यासाठी, 2) वेगवेगळे ट्यूमर्स, 3) गरोदरपणात, 4) शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेनंतर तब्येतीत सुधारणा होण्यासाठी, 5) शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, 6) नैराश्‍य व मानसिक अस्वस्थतेचे आजार, 7) निद्रानाश व झोपेचे विकार, 8) वजन कमी करणे, 9) मायग्रेन, 10) होऊन गेलेले विकार पुन्हा होण्यापासून प्रतिबंध होणे इत्यादी. डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधे, व्यायाम, पथ्ये यांच्या जोडीला या तंत्राचा, तज्ज्ञांच्या साह्यानं अतिशय परिणामकारक असा उपयोग होऊ शकतो.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Monday, August 16, 2010

मंत्रचळ

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ, पुणे.
नको असणारे, निरर्थक, तर्काला न पटणारे विचार, प्रतिमा इत्यादी पुन्हा पुन्हा व्यक्तींच्या मनात येतात आणि मग अशी व्यक्ती या विचारांमुळे निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेतून सुटका होण्यासाठी त्या विचारांशी निगडित कृती पुन्हा पुन्हा करत राहते.

अजयला सतत आपल्याला जंतुसंसर्ग होईल, अशी भीती वाटत असते. म्हणून तो सारखे हात धूत असतो, अस्वस्थ असतो. श्रीमती जोशी दरवाजाला किंवा गाडीला कुलूप लावल्यानंतर पुन्हा पुन्हा ते नीट लागलंय की नाही, हे तपासत राहतात. संदीप देवाला सारखा नमस्कार करत राहतो. आदित्यला रस्त्यानं जाताना वाहनांच्या नंबरप्लेटमधील आकड्यांची बेरीज करण्याची सवय आहे. एखादं वाहन जरी चुकलं तरी तो अस्वस्थ होतो. ही सगळी मंत्रचळा (जलीशीीर्ळींश उोर्िीश्रीर्ळींश ऊळीीेवशी) च्या (छळवादी विचार व निरर्थक मंत्रचळ लागल्यासारखी एकच कृती पुन्हा पुन्हा करण्याच्या) आजाराची उदाहरणे आहेत. हा आजार आहे. या आजारात नको असणारे, निरर्थक, तर्काला न पटणारे विचार, प्रतिमा इत्यादी पुन्हा पुन्हा व्यक्तींच्या मनात येतात आणि मग अशी व्यक्ती या विचारांमुळे निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेतून सुटका होण्यासाठी त्या विचारांशी निगडित कृती पुन्हा पुन्हा करत राहते.
उदा. बाहेरून घरात आल्यावर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की आपल्याला जंतुसंसर्ग होईल, तर त्या भीतीतून मुक्ततेसाठी, ती व्यक्ती पुन्हा हात धूत राहते. जोपर्यंत हात पूर्ण स्वच्छ झाले आहेत असे त्या व्यक्तीचे समाधान होत नाही तोपर्यंत हे चालूच राहते. या सर्व प्रक्रियेच्या काळात व्यक्ती प्रचंड तणावाखाली असते. मंत्रचळ हा ऊडच-खत प्रमाणे अस्वस्थतेचा आजार आहे. तसेच बऱ्याच वेळा तो इतर मानसिक आजारांशीही संलग्न असू शकतो. मंत्रचळग्रस्त व्यक्ती बहुधा पुढीलपैकी एका प्रकारात मोडते -

1) सतत हात धुणारे. यांना नेहमी जंतुसंसर्गाची भीती वाटत असते. त्यामुळे हात पुन्हा पुन्हा धूत राहतात.
2) पुनःपुन्हा तपासणारे. दाराला कुलूप नीट लागलंय की नाही, गॅस नीट बंद झालाय की नाही, हे परत परत तपासत राहतात. हे केलं नाही तर जबरदस्त धोका किंवा इजा होईल, अशी धारणा करून घेतलेली असते.
3) संशयी आणि पापभावना. यांना प्रत्येक गोष्ट अतिव्यवस्थित लागते. तशी ती नसेल तर आपल्याला जबरदस्त शिक्षा घडेल, अशी भीती मनात असते.
4) अकारण आकडे मोजणे, त्यांची बेरीज करणे वगैरे. यांना विशिष्ट आकडा, रंग, रचना इत्यादी संबंधी अंधश्रद्धा असतात.
5) जुन्या, निरुपयोगी गोष्टी साठवणारे. यांना भीती असते की साठवलेल्या (विनाकारण) गोष्टी जर फेकून दिल्या तर काहीतरी जबरदस्त शिक्षा घडेल.

काही वेळा कुणाच्याही मनात क्वचित मंत्रचळ, छळवादी विचार येतात किंवा हातून क्वचित अशी कृत्ये घडतात. म्हणजे अशी व्यक्ती मंत्रचळग्रस्त आहे, असे नव्हे अशा व्यक्तींचं वागणं थोडं विचित्र असतं (उोर्िीश्रीर्ळींश या अर्थाने), त्यात तर्कसंगती नसते; पण अशी व्यक्ती दैनंदिन जीवन विनाअडथळा जगू शकते. याउलट मंत्रचळग्रस्त व्यक्तीचा, मंत्रचळच विचार आणि वर्तन यामध्ये भरपूर वेळ जातो. त्यांना अस्वस्थतेचा इतका त्रास होतो, की दैनंदिन जीवन जगणं कठीण होऊन जातं.

मंत्रचळाची लक्षणं काळानुरूप कमी-जास्त होतात, तसेच ताणतणावाच्या वेळी अधिक तीव्र होतात. मंत्रचळामधील शंकांमध्ये पुढील विचार असू शकतात-

1) मला जंतुसंसर्ग होईल, माझ्यामुळे इतरांना लागण होईल.
2) मी स्वतःला किंवा इतरांना इजा करून घेईन.
3) अतिशयोक्त लैंगिक किंवा हिंसात्मक विचार वा प्रतिमा.
4) अतिशयोक्त धार्मिक विचार किंवा मूल्यविषयक विचार.
5) अपयशाची अतार्किक भीती
6) प्रत्येक गोष्ट नेहमीच अतिव्यवस्थित, अतिपद्धतशीर, अतियोग्य असलीच पाहिजे.
7) एखादी गोष्ट मला लकी किंवा अनलकी आहे, याविषयी पराकोटीची अंधश्रद्धा.

मंत्रचळमधील कृतीमध्ये पुढील कृती असू शकतात -
1) कुलुपे, गॅसचे नॉब, उपकरणे इ. पुन्हा पुन्हा तपासणे
2) आपले नातेवाईक सुरक्षित आहेत की नाहीत, याची परत परत तपासणी करणे
3) अस्वस्थता कमी करण्यासाठी सारखे आकडे मोजणे, बोटांची हालचाल, काही शब्द पुन्हा पुन्हा उच्चारणे
4) स्वच्छतेत साफसफाईत (स्वतःच्या व घराच्या) अतिशय वेळ घालवणे.
5) कारण नसताना त्याच गोष्टींची पुन्हा पुन्हा रचना करत बसणे
6) धार्मिक भयापोटी, देवाचा कोप होईल म्हणून परत परत नमस्कार करणे, कितीही नमस्कार केले तरी समाधान न होणे, अतिकर्मकांड करणे.
7) जुन्या गोष्टी, रद्दी, डबे ज्यांचा काहीही उपयोग नाही, त्यांचा संग्रह करून ठेवणे.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad