Showing posts with label सुकामेवा. Show all posts
Showing posts with label सुकामेवा. Show all posts

Friday, January 22, 2010

अन्नयोग : सुकामेवा

सुकामेवा लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व जण आवडीने खातात. पौष्टिकतेच्या दृष्टीनेही सुकामेवा उत्तम असतो. आपल्या प्रकृतीला कोणता सुकामेवा किती प्रमाणात खायचा हे समजून घेतले, तर सुक्‍यामेव्याचा आरोग्यासाठी उत्तम उपयोग होऊ शकतो.

काजू
संस्कृतमध्ये काजूतक, मराठी व हिंदीत काजू व इंग्रजीत कॅश्‍यू नट नावाने प्रसिद्ध.
काजुतकस्तु तुवरो मधुरोष्णो लघुः स्मृतः। धातुवृद्धिकरो वातकफगुल्मोदरज्वरान्‌ ।।...निघण्टु रत्नाकर

* रस - मधुर, किंचित तुरट
* वीर्य - उष्ण
* दोष - पित्तवर्धक, वात-कफशामक
* काजू धातूंची वृद्धी करतात. गुल्म, उदर, ज्वरात हितकर असतात; पण पचनशक्‍तीचा विचार करून बेताने खावेत.

खडीसाखर व काजू एकत्र घेतले असता भूक शांत होते व ताकद वाढते.
* कच्च्या काजूंपेक्षा भाजून घेतलेले काजू पचायला सोपे असतात. खारवलेले किंवा मिरपूड लावलेले काजू अतिशय रुचकर लागतात. ओल्या काजूंची भाजी करता येते.
* पुलाव, मसालेभात वा काही भाज्यांमध्ये काजू टाकण्याची पद्धत असते. मधुमेह, पचनविकार, सूज, पित्ताचा त्रास वगैरे विकारांत काजू टाळणेच श्रेयस्कर असते.

पिस्ता
संस्कृतमध्ये निकोचक, मराठी व हिंदीत पिस्ता व इंग्रजीत पिस्ताचिओ नावाने प्रसिद्ध.
निकोचकं गुरु स्निग्धं वृष्योष्णं धातुवर्धकम्‌ । रक्‍तप्रसादनं स्वादु बल्यं पित्तकरं मतम्‌ ।।
तिक्तं सरं च कफहृद्वातगुल्मत्रिदोषजित्‌ ।।...निघण्टु रत्नाकर

* रस - मधुर, र् ीगुण - स्निग्ध, गुरू म्हणजे पचायला जड
* वीर्य - उष्ण, र् ीदोष - पित्तकर, कफ-वातशामक
* पिस्ते धातू वाढवितात. पौष्टिक असतात. ताकद वाढवितात. सारक म्हणजे शौचाला साफ व्हायला मदत करणारे असतात. रक्‍त शुद्ध करतात.
* सहसा पिस्ते खारवूनच खाल्ले जातात. पिस्त्यांमधून काढलेले तेल डोक्‍याला लावल्याने डोके शांत व्हायला मदत मिळते.
* पिस्ते रुचकर व पोषक असले तरी पित्तकर, पचण्यास जड असल्याने एका वेळी खूप खाणे योग्य नसते.

चारोळी
संस्कृतमध्ये प्रियाल वा राजादन, मराठीत चारोळी व हिंदीत चिरोंजी म्हणतात.
चारोली मधुरा वृष्या चाम्ला गुर्वी सरा मता।
स्तम्भकरी स्निग्धा शीतला धातुवर्धिनी ।।
कफकृत्‌ दुर्जरा बल्या प्रिया वातविनाशिनी ।
वृष्या च दाहपित्तघ्नी तत्तैलं मधुरं गुरु ।।...निघण्टु रत्नाकर

* वीर्य - शीत,दोष - पित्तशामक, वातशामक
* चारोळ्या सुका मेवा म्हणून खाल्ल्या जात नाहीत, पण खीर, श्रीखंड वगैरे पक्वान्नांमध्ये चारोळ्या वापरण्याची पद्धत आहे. डिंकाच्या लाडूतही चारोळ्या वापरतात.
* चारोळ्या धातुपोषक असतात, पण पचायला जड असतात.
* चारोळ्या स्वादिष्ट असतात, पण अति प्रमाणात खाल्ल्यास आमदोष वाढू शकतो.

गोडांबी
बिब्ब्याच्या बीमधील मज्जा म्हणजे गोडांबी होय. मराठीत गोडांबी तर इंग्रजीत मार्किंग नट कर्नेल म्हणतात.
भल्लातकस्य बीजं तु कान्तितृप्तिकरं मतम्‌।
गुरु वृष्यं चाग्निदीप्तिकरं दाहकफापहम्‌ ।।
शोषं वातं कृमीन्‌ पित्तमरुचिं चैव नाशयेत्‌ ।।...निघण्टु रत्नाकर
* रस - मधुर
* गुण - गुरू म्हणजे पचण्यास जड
* वीर्य - शीत
* दोष - वात-पित्त-कफनाशक
* गोडांबी बिब्ब्याच्या एकदम विरुद्ध गुणाची असते. बिब्बा पित्त वाढवतो, तर गोडांबी पित्त कमी करते. गोडांबी अतिशय पौष्टिक असते. कांतिवर्धक असते. अग्नीला प्रदीप्त करते. दाह, शोष, अरुची, जंत वगैरेंत हितकर असते.
* डिंकाच्या लाडूत तसेच इतर पौष्टिक रसायनांमध्ये गोडांबी टाकली जाते.

- डॉ. श्री बालाजी तांबे Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Thursday, January 21, 2010

अन्नयोग : सुकामेवा

सुक्‍यामेव्यातील बहुतेक सर्व पदार्थ अतिशय रुचकर असतात; पण प्रत्येक पदार्थाचे आयुर्वेदिक गुण लक्षात घेतले, तर आपल्या प्रकृतीसाठी कोणता सुकामेवा किती प्रमाणात खायचा, कोणते पदार्थ रोज खायचे, कोणते क्वचित खायचे, हे ठरविता येणे शक्‍य आहे.

सुकामेवा नावाप्रमाणेच सुकवलेला असल्याने साठवून ठेवण्यास, आयात-निर्यात करण्यास सुटसुटीत असतो, म्हणूनच जगभरात सुकामेवा खाण्याची पद्धत प्रचलित आहे. सणा-समारंभाला किंवा उत्सवाच्या निमित्ताने सुकामेवा देण्याची पद्धतही मोठ्या प्रमाणावर रूढ झालेली दिसते.

खारीक
विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. संस्कृत; तसेच हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात.
खर्जुरी तुवरा ज्ञेया सा पक्वा मधुरा मता ।
तुवरा शीतला वृष्या श्‍लेष्मशुक्रविवर्धिनी।।
लघ्वी च कृमिकृत्‌ ज्ञेया वातपित्तमदापहा।
मूर्च्छां मदात्ययं दाहं क्षयं चैव विनाशयेत्‌ ।। ...निघण्टु रत्नाकर
रस - मधुर, तुरट
गुण - लघू म्हणजे पचण्यास हलकी
वीर्य - शीत
दोष - वात-पित्तशामक
* खारीक शुक्रधातूसाठी पोषक असते. मूर्च्छा व मद्यपानाने उत्पन्न होणारे रोग, दाह, क्षय यांचा नाश करते; मात्र अति प्रमाणात सेवन केल्यास जंतकारक असते.
* उष्णता वाढल्याने नाकातून रक्‍त येते, त्यावर साजूक तुपात भिजवलेली खारीक खाण्याचा उपयोग होतो.
* खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्‍त असते. कपभर दूध एक-दोन खारकेच्या चूर्णासह उकळवून घेण्याने शरीरशक्‍ती वाढते, शुक्रधातूचे पोषण होते.


खजूर
खजुराला संस्कृतमध्ये खर्जुर, मराठीत खजूर, तर इंग्रजीत डेट म्हणतात.
रस - मधुर, तुरट
गुण - लघू म्हणजे पचण्यास हलका
वीर्य - शीत
दोष - वात-पित्तशामक
* खजूर हृदयासाठी पोषक असतो. साजूक तुपाबरोबर खाण्याने अधिक पथ्यकर बनतो.
* खजूर रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी कोळून घेऊन ते पाणी प्यायले असता शौचाला साफ होण्यास मदत होते.
* खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी मूळव्याधीच्या मोडास दिली असता सूज व वेदना कमी होण्यास मदत मिळते.
* काळा खजूर व तूप हे मिश्रण नियमित घेण्याने रक्‍त वाढते; तसेच मांसधातूचेही पोषण होते.
* खजुरापासून तयार केल्या जाणाऱ्या मद्याला खर्जुरी म्हणतात. हे चवीला अतिशय रुचकर; तसेच पौष्टिक असते.
* साधारणतः एक-दोन खजूर तुपासह खावेत. मधुमेही व्यक्‍तींनी; अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी खजूर नियमित न खाणे चांगले.

जर्दाळू
मराठीमध्ये जर्दाळू तर इंग्रजीमधे ऍप्रिकॉट नावाने प्रसिद्ध. शीत प्रदेशात येणाऱ्या या फळाचा भारतात, आयुर्वेदात कमी उल्लेख होताना दिसतो. जर्दाळू ताजा, ओलाही खाता येतो त्याचप्रमाणे थोडा संस्कार करून टिकविता येतो; तसेच पूर्णतः सुकवूनही ठेवता येतो. जर्दाळूच्या आत बी असते, त्यात बदामासारखी बीजमज्जा असते, तीही खाता येते. आयुर्वेदिक निकष लावता जर्दाळूचे गुणधर्म याप्रमाणे सांगता येतील.
रस - मधुर किंचित आंबट
गुण - स्निग्ध
वीर्य - शीत
दोष - वात-पित्तशामक
* जर्दाळू पौष्टिक असतात, शरीरशक्‍ती वाढवितात, जर्दाळूच्या बीमधला बदाम अतिशय रुचकर व पौष्टिक असतो.


अक्रोड
संस्कृतमध्ये अक्षोट, हिंदीत अखरोट व इंग्रजीत वॉलनट म्हणतात.
वीर्यवृद्धिकरश्‍चोष्णो रुचिदः कफपित्तकृत्‌ ।
गुरुः प्रियो बलकरः कफकृत्‌ मलबन्धकृत्‌।। ...निघण्टु रत्नाकर
रस - मधुर
गुण - गुरू म्हणजे पचायला जड
वीर्य - उष्ण
दोष - कफपित्तवर्धक, वातशामक
* अक्रोड रुचकर असतो, ताकद वाढवतो, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतो, हृदयरोग, रक्‍तक्षय वगैरे त्रासात हितकर असतो.
* अक्रोडाची रचना मेंदूत असणाऱ्या सुरकुत्यायुक्त पांढरट भागाशी (ग्रे मॅटरशी) साधर्म्य दाखविणारी असते आणि अक्रोड मेंदूसाठी हितकारक असतो. अक्रोड पचायला जड असल्याने फार शरीरमेहनत न करणाऱ्यांनी नियमितपणे खाणे चांगले नसते.
* पित्ताचा त्रास असणाऱ्यांनीही अक्रोड जपून खावा.

- डॉ. श्री बालाजी तांबे Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad