Showing posts with label झोप. Show all posts
Showing posts with label झोप. Show all posts

Thursday, January 28, 2010

झोप न लागणे

  डॉ. ह. वि. सरदेसाई
झोप न येणे हे दुर्लक्ष करण्याजोगे लक्षण नाही. निद्रानाशामागचे कारण शोधून त्यावर उपचार करणे महत्त्वाचे असते. झोपेचे औषध घेणे हा क्वचितच योग्य उपचार ठरतो. किंबहुना बहुतेक वेळा तो चुकीचाच मार्ग ठरतो.

आपल्याला पुरेशी झोप येत नसल्याची तक्रार अनेकांची असते. तथापि, झोप लागावयाला लागणाऱ्या वेळेचा अंदाज बहुतेकांचा बरोबर नसतो. आपण जास्त वेळ जागे होतो, असे व्यक्तीला वाटत राहते. त्याचप्रमाणे आपल्याला झोप फारच थोडा वेळ लागल्याचे वाटणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या अंदाजाच्या मानाने जास्त वेळ झोप लागलेली असते. हे खरे असले तरीही झोप अनेक कारणांनी कमी पडू शकते. जेव्हा झोप मानसिक तणावांनी कमी पडते, तेव्हा बहुतेक वेळा झोप लागावयाला लागणारा वेळ लांबलेला असतो. जेव्हा माणसाला खिन्नता येते तेव्हा सहसा जाग पहाटे लवकर येते व फक्त झोप लागत नाही. शारीरिक आजारांनी झोपेत मधे मधे व्यत्यय येत राहतो.

झोप न येणे हे दुर्लक्ष करण्याजोगे लक्षण नाही. निद्रानाशामागचे कारण शोधून त्यावर उपचार करणे महत्त्वाचे असते. झोपेचे औषध घेणे हा क्वचितच योग्य उपचार ठरतो. किंबहुना बहुतेक वेळा तो चुकीचाच मार्ग ठरतो. बहुतेक झोपेच्या औषधांची सवय लागते. सवय लागली की हळूहळू औषधाची मात्रा (गोळ्यांचा डोस) वाढवावी लागते. डोस जास्त झाला की औषधांचे नको असणारे परिणाम (दुष्परिणाम) होऊ लागतात. दिवसा मांद्य येऊ लागते. चालताना तोल जाऊ लागतो. पडण्याची भीती असते. पडून हाडे मोडणे व इतर इजा होतात, वाहन चालविताना वेग व अंतर यांचे अंदाज चुकतात, रक्तदाबावर अनिष्ट परिणाम होतो. उभे राहिल्यावर रक्तदाब कमी होण्याची शक्‍यता असते.

कमी झालेल्या रक्तदाबामुळे उभ्या स्थितीत मेंदूला रक्ताचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यांसमोर अंधेरी येणे, तोल जाऊन पडणे असे प्रकार होतात. अनेक औषधांमुळे यकृताच्या व मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात. बऱ्याच औषधांनी मांड्यांचे स्नायू कमजोर होऊ लागतात व जिने चढणे कठीण होते. शिवाय बहुतेक औषधांनी आलेल्या झोपेने झोप आल्यावर ताजेतवाने वाटत नाही. एकूण झोपेची औषधे घेण्याचा निर्णय फक्त उपचार करणाऱ्या आपल्या डॉक्‍टरांनीच घ्यावा.परिस्थितीत तणाव व मानसिक चिंता हे झोप येण्याला वागणाऱ्या विलंबाचे महत्त्वाचे कारण आहे. त्याचबरोबर चहा, कॉफी किंवा धूम्रपान अशांचे सेवन हेही मेंदूला उत्तेजक ठरते. चहा-कॉफी इत्यादींमध्ये असणारा कॅफेनचा रेणू मेंदूला उत्तेजक असतो, तर धूम्रपानामुळे मिळणारा निकोटीनचा रेणूदेखील उत्तेजक असतो. मद्यपानामुळे येणारा इथाईल अल्कोहोलचा रेणू उत्तेजक नसतो; परंतु त्यामुळे लघवी जास्त होते व झोपमोड होत राहते.

ज्या व्यक्तींना पोटभर अन्न मिळत नाही, त्यांनाही झोप लागणार नाही हे सर्वश्रुत आहेच. झोप नीट न लागण्याची कारणे मानसिक अस्वस्थता असतात. "मॅनिया' या आजारात व्यक्ती अतिउत्साही असते. रात्रभर जागे राहूनही थकण्याचा नामनिशाणा नसतो. चिंतातूर व्यक्तींना झोप लागण्यास वेळ लागतो व खिन्नतेमुळे सहसा सकाळी लवकर जाग येते, हे आपण पाहिले आहे. रात्री झोपेत दचकणे हे चांगल्या प्रकृतीतदेखील होऊ शकते. कधी कधी लहान मुलांना रात्री झोपेत जाग येते व मोठ्याने रडतात, ओरडतात, याला नाईट-मेअर्स nightmares म्हणतात. या प्रसंगाची दुसऱ्या दिवशी मुलाला आठवण नसते. नाईट-मेअर्समुळे अपाय होत नाही, त्याला औषधांची गरज नसते. त्या वेळी मुलाला थोपटून परत झोपविणे एव्हढेच गरजेचे असते. दुसऱ्या एका प्रकारात मुलाला रात्री झोपेत भीतीदायक स्वप्न पडते. (night terrors) मूल घाबरून जागे होते, ओरडते, कधी कधी भीतीमुळे घाम येतो, अशा वेळी मुलाला जागे करावे व आलेला अनुभव स्वप्नाचा होता, असे समजवावे.

मूल परत झोपी जाईल, हा अनुभव दुसऱ्या दिवशी मुलाच्या लक्षात असतो व झोपेतील भीतीदायक स्वप्नही आठवते. वारंवार भीतीदायक स्वप्ने पडत राहिली, तर समुपदेशनाची (Child guidence/ councelling) आवश्‍यकता असते. रात्री झोपेत लघवी होणे हे बहुतेक वेळा लहान वयात घडते; पण मोठ्या व्यक्तींनादेखील असा त्रास होऊ शकतो. रात्री लघवी कपड्यात (बिछान्यात) होण्यास मानसिक तणाव कारणीभूत असावेत, असा वैधकशास्त्राचा पूर्वी समज होता. आता या विकाराला (nocturnal enuresis) काही तरी शारीरिक कारणच असावे, असे मानले जाते. मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पिट्युटरी ग्रंथीतून स्त्रवला जाणारा अँटी डाययुरेटिक हार्मोन (Antidiuretic hourmon) हा स्राव कमी पडण्याने अशी लघवी होते. या स्रावाचा नाकात उडविला जाणारा फवारा बाजारात मिळू शकतो. याच्या वापराने हा त्रास ताब्यात आणता येतो. मुलाला रागावणे किंवा अपराधीपणाची भावना निर्माण करणे या प्रकारांनी हे दोष वाढतात. कधी कधी वहनीतील दोषांमुळे, तर कधी कमरेच्या मणक्‍यातील दोषांमुळेसुद्धा असे घडते. योग्य मूत्रविकारतज्ज्ञांचे मत घेऊन उपचार करावेत.

झोपेत वारंवार व्यत्यय येण्याचे एक गंभीर कारण म्हणजे झोपेत श्‍वास थांबणे, स्वीप एप्नीया सिंड्रोण (slap apnoea syndrone) रात्री झोप नीट न लागण्याने दिवसा व्यक्तीला वारंवार डुलक्‍या येऊ लागतात. वाहन चालविताना मोठाच धोका निर्माण होतो. टाळू, पडजीभ आणि जीभ यांच्यामुळे श्‍वास क्षणमात्र रोखला जातो व व्यक्तीला जाग येते. प्राणवायूचा पुरवठा खंडित होण्याचा दुष्परिणाम फुफ्फुसे व हृदयावर होतो. रक्तदाब वाढतो, मूत्रपिंडांवर विपरीत परिणाम होतो. ज्या व्यक्ती रात्री झोपेत घोरतात, त्यांचे घोरणे अकस्मात बंद होते. वजन जास्त असणे, मानेचा परीघ वाढलेला असणे, पोट सुटणे इत्यादींमुळे हा विकार विकोपाला जातो. झोपेचा अभ्यास करणाऱ्या "निद्रा-प्रयोगशाळे'त तपासणी करून उपचार करून घेणे महत्त्वाचे आहे. हा आजार अंगावर काढू नये. 
 
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Friday, October 3, 2008

आरोग्य वार्ता - झोप हवी कशाला?

आरोग्य वार्ता - झोप हवी कशाला?


(अभिजित मुळ्ये)
इटलीमधल्या दोन रुग्णांनी सध्या शास्त्रज्ञांचीच झोप उडवून टाकली आहे. त्यांना "मल्टिपल सिस्टिम ऍट्रॉफी' हा चेतासंस्थेचा विकार आहे. या रोगामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम झाला आहे. आणि पुढील तपासणीतून "झोपेचे काम काय?' असा अगदी मूलभूत प्रश्‍न तज्ज्ञांना पडला आहे. ........
"स्लीप मेडिसिन' या नियतकालिकात त्याची माहिती प्रसिद्ध झालेली आहे. रॅपिड आय मूव्हमेन्ट म्हणजे बुबुळाची जोरदार हालचाल होत असलेली झोप अर्थात "रेम' स्लीप आणि अशी हालचाल नसलेली झोप म्हणजेच "नॉन रेम' स्लीप असे झोपेचे दोन मुख्य प्रकार असतात. इटलीतील रुग्णांमध्ये झोपेचे हे दोन्ही प्रकार आणि जागेपणाचा अंश एकत्रित दिसून आले आहेत. या रुग्णांची तपासणी करणाऱ्या डॉक्‍टरांना आधी त्यांचा आजार साधा वाटला. पण, झोपेत बडबडणे किंवा हातपाय झाडणे अशा लक्षणांवरच्या उपचारांना पुरेसा प्रतिसाद मिळत नाही, उलट परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, हे लक्षात आल्यावर डॉक्‍टरांनी मेंदूच्या आलेखांवरून (इइजी) काही नवे दिसून येते का, हे पाहण्याचे ठरवले. मेंदूच्या आलेखांवरून (इइजी) "नॉन रेम' झोपेचे हलकी झोप आणि गाढ झोप, असे प्रकार केले जातात. जागृतावस्थेतील इइजी अगदी वेगळ्या प्रकारचे असतात. पण, इटलीतील रुग्णांमध्ये मेंदूचे आलेख झपाट्याने रेम, नॉन रेम आणि जागृतावस्थेत बदलत असल्याने दिसून आले. झोपेतील या गडबडीचा बौद्धिक क्षमतांवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नव्हता. म्हणजेच सर्वसाधारणपणे झोपेमध्ये स्मृतीच्या वर्गवारीचे जे काम केले जाते ते त्यांच्या मेंदूत चोख होत असावे. याचा अर्थ, मुळात "झोपेमध्ये स्मृतीच्या वर्गवारीचे काम केले जाते' हे गृहितकच चूक असू शकेल! म्हणूनच शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे.

- अभिजित मुळ्ये

ad