Thursday, February 4, 2016

आरोग्यासाठी प्रसन्न मन -2

अनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर, असा विचार करत ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते. 

जग हे जडापासून बनलेले आहे. या विश्वातील मायेच्या चमक-दमककडे आकर्षित होऊन किंवा चुकीच्या आवाहनामुळे मनुष्य चुकीच्या मार्गाला जातो. यामुळे मन प्रसन्नता हा सोम्यागोम्यासाठीचा मार्ग नव्हे असे म्हणून आपण मोकळे होतो. पण प्रत्येक माणसाला आज ना उद्या स्वतःचे आरोग्य, समृद्धी, आत्मसमाधान व तेजाचा विचार करावाच लागेल. कारण सरतेशेवटी शांती त्या ठिकाणीच मिळणार असते. 

मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व थोड्या थोड्या फरकाने एकमेकांपासून वेगळे असले, तरी ते सर्व एकच आहेत. यातील बुद्धी आहे महत्त्वाची. अहंकार हा अंधकारच होय. तेथे सगळ्याचाच अभाव असतो. तेथे असतो फक्‍त स्वार्थीपणा व लंपटपणा. चित्त हे बुद्धीचे आदेश मनापर्यंत पोचविण्याचे माध्यम. बुद्धीचे व्यवस्थित मार्गदर्शन मनाला मिळाले तर मन शांत होऊ शकते, प्रसन्न होऊ शकते. एखादा मनुष्य नशीबवान आहे असे आपण म्हणतो. तो नशीबवान होतो, कारण त्याला योग्य वेळी योग्य गोष्टी सुचतात. त्याला खरोखर भगवंतांचा कृपाशीर्वाद मिळत असणार, जेणेकरून त्याला जीव, आत्मा व परमात्म्याच्या श्रेयस गोष्टी सुचतात. बुद्धीने अशा प्रकारे ऐनवेळेला सु-विचार सुचविण्यासाठी, चांगली कल्पना सुचविण्यासाठी, चांगल्या अनुभवाचा साक्षीदार करून देण्यासाठी खूप पूर्वतयारी असण्याची गरज असते. म्हणून ज्ञान हे अनुभवावर आधारित असते.

एक गृहस्थ मोठे कवी होते. त्यांनी गंगेवर एक छान काव्य रचले होते. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. पुरस्कार घेण्यासाठी एवढ्या लांब आलेलो आहोत, तेव्हा गंगास्नान करून जावे अशा हेतूने ते गंगेवर पोचले. ते पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करत होते. काठावर असलेल्या एकाने सांगितले येथे उतरू नका, कारण येथे खूप मगरी, सुसरी आहेत. त्यावर कवी म्हणाले की, मगरी-सुसरी या तर गंगेचे वाहनच आहेत. मी तळापर्यंत जाणारच नाही, कारण वाहनावर गंगा आरूढ झालेली आहे. मी फक्‍त वर वरच्या पाण्यात स्नान करणार आहे. पाण्यात उतरल्यावर मगरीने पाय धरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या वाहनाचा अनुभव आधी घ्यायला पाहिजे होता असे लक्षात आले. गंगेचे वाहन मगर आहे म्हणत असताना मगर गंगेच्या पाण्यावर विहरत असतात, गंगा मगरावर आरूढ झालेली नसते. हा अनुभव नसल्याने नुसत्या शब्दाच्या माध्यमातून लिहिलेल्या काव्याला पुरस्कार मिळू शकतो, पण व्यवहारात त्याचा उपयोग होत नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. शंकरांनी विषप्राशन केल्यानंतर त्यांच्या कंठाची आग होऊ लागली, तेव्हा त्यांनी सर्प थंड असतो म्हणून सर्पाला कंठाभोवती लपेटून घेतले. परंतु प्रत्यक्ष सर्पाचा थंडपणा अनुभवल्यावर मिळणारे ज्ञान वेगळे असते. असे अनेक प्रसंग आठवतील की, ज्यात बुद्धी व बुद्धीवर बसविलेले तर्क यांनाच ज्ञान समजून आचरण केल्याने आयुष्यात चांगल्या संधीला मुकावे लागले. 

अनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर असा विचार करत आपण ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते. विषयांवर जबाबदारी टाकणे म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचे पॅकिंग फारच आकर्षक असल्यामुळे ती वस्तू आपण वापरतो, एखादा मनुष्य दिसायला अतिशय स्मार्ट व रुबाबदार किंवा स्त्री सौंदर्यवान दिसत असल्यामुळे त्यांच्याकडे आमचे मन आकर्षित होते अशा प्रकारे विषयावर जबाबदारी टाकली जाते. विषय मनाला विचलित करतात हे एका दृष्टीने बरोबर आहे. 

प्रत्येक इंद्रिय वेगवेगळ्या गुणांनी बांधलेले असते. विषयांचे पण स्वतःचे गुण ठरलेले असतात. त्यामुळे इंद्रिये विषयाकडे आकर्षित होतात. सृष्टीने सृजनासाठीचे आणि जीवन व्यवस्थित चालण्यासाठी काही नियम केलेले आहेत. त्यातही अशी आकर्षणे निसर्गतःच टाकून ठेवलेली आहेत, उदा. प्रजोत्पादनासाठी उपयोगी पडणारे पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षण. पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षणामुळे जीवनात शृंगाररस उत्पन्न होतो व एकूण जीवनाचे सौंदर्य कळून जीवनाविषयी आकर्षण उत्पन्न होते. विषयांना समजून घेणे खूप आवश्‍यक आहे. विषय कशासाठी आहे हे पाहणे आवश्‍यक असते. शिडी ही वरच्या मजल्यावर जाण्यासाठी साधन आहे. शिडी कितीही उत्तम दर्जाची बनवायची असे ठरविले, तरी ती सोन्याची बनवता येत नाही, कारण सोने मऊ असल्याने सोन्याच्या पायऱ्या वाकू शकतात. शिडीच्या पायऱ्या सुंदर दिसणाऱ्या चकचकीत धातूच्याही करता येत नाहीत, कारण शिडीच्या पायऱ्यांवर पाय द्यायचाच असतो. शिडीवरून चढून गेल्यावर आपल्या परमप्रिय व्यक्‍तीची भेट झाली, तर शिडीची कोणी पूजा करत नाही आणि कायम शिडी बरोबर घेऊनही कोणी फिरत नाही. 

अशा प्रकारे प्रत्येक बाह्यवस्तूचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे प्रत्येकाने नक्की केले, तर विषयांपासून सुटका होण्याचे नक्की होऊ शकते. जेवल्याशिवाय राहता येत नाही. पाण्याला जीवन म्हटले जाते, ते प्रत्येकाला आवश्‍यक असतेच. परंतु ज्या वेळी जिवावर बेतण्याची वेळ येते तेव्हा पाण्यावर भागत नाही. अन्नावाचून चालत नसले, तरी त्यावाचून महिनाभर राहता येऊ शकते. आवडीच्या वस्तू जेवणात असल्या, तर जेवण जाते; अन्यथा तोंडात घास गोल फिरतो असे म्हणणारी व्यक्‍ती उपासमार झाली की गणपतीला वाहिलेल्या दूर्वा खायलाही मागे-पुढे पाहत नाही. 

प्रत्येक विषयाचे चिंतन करून आपले जीवन चालविण्यासाठी, जीवनात हाती घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी मुळात कुठले विषय अगदी निकडीचे आहेत ते ठरविणे, त्या विषयांची वर्गवारी लावून, त्यांचे आपल्या आयुष्यात असलेले प्राधान्य ठरवून नंतर त्या विषयांचे आपल्या आयुष्यातील स्थान नक्की करावे. विवाहिताला पत्नी व तिच्यापासून मिळणारे सुख हा विषय महत्त्वाचा असणे साहजिक आहे. परंतु लग्न न झालेल्या अनेक व्यक्‍ती असतात. आपल्याला जीवनाच्या लक्ष्याप्रत पोचण्यासाठी काय अत्यावश्‍यक आहे हेही ठरवावे लागते. श्रीमद्‌ आदि शंकराचार्यांनी ‘भज गोविन्दम्‌’ या स्तोत्रात ‘एतद्‌ मांसवसादिविकारम्‌’ असे म्हटलेले आहे. म्हणजे ज्या वस्तूंची डोळ्यांना भुरळ पडते ते आयुर्वेदातील मज्जा व मांस यांचे खेळ असतात. तेव्हा त्यांना अवास्तव महत्त्व न देता हे मज्जा व मांस ज्या जिवाशी संबंध ठेवून असतात त्या जिवाचा, त्या व्यक्‍तीचा विचार करणे अधिक आवश्‍यक असते.
असे करत गेल्याने सरतेशेवटी अणूरेणूत असलेल्या परमात्म्यापर्यंत पोचल्यानंतर विषयनिवृत्ती सोपी होऊ शकेल. अशी विषयनिवृत्ती झाली, तर इंद्रियांवर अनुशासन करणे सोपे होईल. 
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad