Showing posts with label दूध. Show all posts
Showing posts with label दूध. Show all posts

Saturday, November 3, 2012

शरदातील पित्तसंतुलन


आयुर्वेदाने फक्‍त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते. चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते. चांदीसुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्तसंतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच. 

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य तीन कालविभाग सर्वांना माहिती असतात. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मधला ऋतू म्हणजे शरद ऋतू. साहजिकच या ऋतूमध्ये एखाद्‌दुसऱ्या सरीचा अपवाद सोडला तर पाऊस जवळजवळ थांबलेला असतो. पावसाळ्यातील काळे ढग जाऊन त्यांची जागा पांढऱ्या ढगांनी घेतलेली असते. दिवसा सूर्याच्या तीव्र किरणांमुळे वातावरण चांगलेच तापते, तर रात्री हवेत गारवा जाणवतो. झेंडू, शेवंती वगैरे लाल फुले फुलतात. निसर्गात आणि वातावरणात हे बदल व्हायला लागले, की शरद ऋतू सुरू झाला असे समजता येते.

निसर्गातील प्रत्येक बदलाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. पावसाळ्यात वातदोषाचा प्रकोप होतो, त्याचबरोबर पाण्यात वाढलेल्या आम्लतेने पित्तदोष साठायला सुरवात झालेली असते. पावसाळ्यातील थंड वातावरण बदलून त्याऐवजी तीव्र सूर्यकिरणे तळपू लागली व हवेतील उष्णता वाढली, की त्याचा परिणाम म्हणून अगोदर साठलेले पित्त अजूनच वाढते. पित्ताचा प्रकोप होतो. पित्ताचा प्रकोप झाला की पित्ताचे अनेक त्रास होऊ शकतात. म्हणून शरद ऋतूची सुरवात झाली, की लगेच पित्त संतुलनासाठी प्रयत्न करणे श्रेयस्कर असते.

पित्त खवळले तर... 
  • शरद ऋतूमध्ये पित्त वाढल्याने होऊ शकणारे त्रास पुढीलप्रमाणे सांगता येतात-
  • हातापायांच्या तळव्यांची आग होणे.
  • डोळे लाल होणे, जळजळणे, पापणीवर रांजणवाडी येणे.
  • शरीर स्पर्शाला गरम लागणे, ताप आल्यासारखे वाटणे.
  • अंगावर गळू येणे, त्यात पाणी किंवा पू होणे.
  • डोळ्यांसमोर अंधारी येणे, चक्कर येणे.
  • त्वचेवर लालसर पुरळ उठणे.
  • मळमळणे, डोके दुखणे, उलटी होऊन पित्त पडून जाणे.
  • घशाशी आंबट येणे.
  • तोंड येणे.
  • नाकातून रक्‍त येणे.
  • लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे.
  • फार तहान लागणे, पाणी प्यायले तरी समाधान न होणे.

अर्थात व्यक्‍तीची प्रकृती, तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराची प्रवृत्ती यासारख्या अनेक मुद्‌द्‌यांवरून यापैकी नेमका कोणता त्रास होईल व त्याची तीव्रता कशी असेल हे ठरत असते. मात्र, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शरद ऋतू सुरू होतो आहे याचे भान ठेवले, खाण्यापिण्यात, वागण्यात आवश्‍यक ते बदल केले तर हे त्रास टाळताही येऊ शकतात.

ऐसा घ्यावा आहार 
पित्त संतुलनासाठी शरद ऋतूत पुढीलप्रमाणे आहारयोजना करायला सांगितली आहे-
  • तत्रान्नपानं मधुरं लघु शीतं सतिक्‍तकम्‌ ।
  • पित्तप्रशमनं सेव्यं मात्रया सुप्रकांक्षितैः ।। ...चरक सूत्रस्थान
  • खाण्यापिण्यात मधुर रस म्हणजेच गोड चव मुख्य असावी.
  • पचण्यास हलके पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करावेत.
  • आहारात काही प्रमाणात कडू चवीच्या पदार्थांचाही समावेश असावा.
  • थंड स्वभावाचे, पित्तशमन करणारे अन्न सेवन करावे.

भारतीय उत्सव, परंपरा आणि आरोग्य यांचा कायम संबंध असतोच. शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या दिवशी खारीक, बदाम, खसखस, साखर वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून, चांदण्यात बसून पिण्याची प्रथा आहे. हा पित्तशमनाचा एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदाने फक्‍त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते. चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते. चांदीसुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्त संतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच.

शरद ऋतूत दूध, घरचे लोणी-साखर, साजूक तूप या गोष्टी अमृतोपम होत, कारण हे सर्व पित्तशमनासाठी उत्तम असतात. मुगाचे लाडू, नारळाची वडी, गोड भात, उकडीचे मोदक, दुधी हलवा, कोहाळेपाक हे गोड पदार्थही शरदामध्ये सेवन करण्यास योग्य असतात. कारले, कडवे वाल, मेथीची भाजी या चवीला कडवट असणाऱ्या भाज्याही अधूनमधून खाणे चांगले असते. साळीच्या लाह्या, मनुका, अंजीर, खडीसाखर हे पदार्थ सेवन करणे, फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, आवळा, डाळिंब, सफरचंद, केळे, ऊस यांना अधिक प्राधान्य देणे, मोरावळा, गुलकंद, दाडिमावलेह सेवन करणेही शरद ऋतूत पथ्यकर असते.

उकळून गार (सामान्य तापमानाचे) पाणी पिणे, पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्ये टाकणे हेसुद्धा या ऋतूत पित्त संतुलनास मदत करते.

भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, घोसाळी, दोडका, भेंडी, कोहळा, पडवळ, परवर, चाकवत, पालक अशा पचायला हलक्‍या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडणे; भाज्या करताना जिरे, हळद, धणे, कोकम, मेथ्या, तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरणे, हिरव्या मिरचीऐवजी शक्‍यतो लाल मिरची, आले वापरणे हेसुद्धा शरदात पित्त वाढू नये म्हणून मदत करणारे असते.

पित्तदोषाला प्रतिबंध 
शरदामध्ये पित्ताचा प्रकोप होतो हे आपण सुरवातीला पाहिले. कोणत्याही दोषाचा प्रकोप होतो तेव्हा तो दोष वाढलेला तर असतोच, पण स्वतःच्या स्थानातून बाहेर पडलेला असतो. म्हणूनच या अवस्थेत त्याला बाहेर काढून टाकणे सहज शक्‍य असते. साहजिकच शरद ऋतूमध्ये विरेचन करून प्रकुपित पित्तदोष शरीराबाहेर काढून टाकला, तर पुढे वर्षभर पित्तासंबंधी कोणताही विकार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अर्थात विरेचन म्हणजे नुसते जुलाबाचे औषध घेणे नव्हे, तर शास्त्रोक्‍त पद्धतीने स्वेदन, स्नेहन वगैरे सर्व पूर्वतयारी करून पित्तदोष लहान आतड्यापर्यंत आणून विरेचनाद्वारा शरीराबाहेर काढून टाकणे हे खरे विरेचन होय. प्रत्येक शरदात जर असे शास्त्रोक्‍त विरेचन करून घेतले तर पचन नीट राहणे, वजन नियंत्रणात राहणे, पर्यायाने कोलेस्टेरॉल, रक्‍तदाब, मधुमेह, हृद्‍रोग वगैरे सर्वच अवघड रोगांना प्रतिबंध करणे शक्‍य असते.

शरदामध्ये पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी नियमित पादाभ्यंग करणेसुद्धा अतिशय उपयुक्‍त असते. शतावरी कल्प, अविपत्तीकर चूर्ण, पित्तशांती गोळ्या वगैरे पित्तशामक रसायने, औषधे या ऋतूत घेणे; जागरणे, उन्हात जाणे टाळणे; धूम्रपान, मद्यपान, मांसाहार वर्ज्य करणे यासारखी काळजी घेतली तर शरदात पित्ताचा त्रास सहन करावा लागणार नाही, उलट शरदातील चांदण्याचा आनंद घेता येईल.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, August 31, 2011

दूध-दही-लोणी-तूप

डॉ. श्री बालाजी तांबे
फक्‍त भारतातच नाही, तर जगभरात ज्या ज्या ठिकाणांना प्राचीन इतिहास आहे, त्या त्या ठिकाणी दूध, लोणी, तूप किंवा चीज याचा वापर होत असल्याचे उल्लेख सापडतात. दूध, लोणी, तूप यांचा वापर फक्‍त खाण्यासाठी नाही, तर औषध म्हणून बाहेरून लावण्यासाठीही केला जात असे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण दूध-दही वगैरेंची उपयुक्‍तता आणि त्यांच्यापासून बनविलेल्या काही पाककृती यांची माहिती घेणार आहोत.

गोकूळ हे श्रीकृष्णांचे बालपणाचे राहण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहेच, पण "गो' म्हणजे गाय आणि "कूळ' म्हणजे घराणे, परंपरा या अर्थाने गो-कुळाची संस्कृती हजारो वर्षांपासून चालत आली आहे. अजूनही लहान-मोठ्या गावातून, काही ठिकाणी शहरातूनही गोकूळ परंपरा टिकून आहे, पर्यायाने आरोग्यही शाबूत आहे. या उलट ज्या ज्या ठिकाणी गोकुळाचा लोप झाला त्या ठिकाणी आरोग्याची अनवस्था ओढवलेली दिसते. गो-कूळ आणि गोकुळातून मिळणाऱ्या दूध, दही, ताक, लोणी, तूप या सगळ्या वस्तूंचे महत्त्व लोप पावू नये यासाठीच जणू योगेश्‍वर श्रीकृष्णांनी त्यांचे बालपण "गोपाळनंदन' म्हणून व्यतीत केले असावे.

फक्‍त भारतातच नाही, तर जगभरात ज्या ज्या ठिकाणांना प्राचीन इतिहास आहे, त्या त्या ठिकाणी दूध, लोणी, तूप किंवा चीज याचा वापर होत असल्याचे उल्लेख सापडतात. दूध, लोणी, तूप यांचा वापर फक्‍त खाण्यासाठी नाही, तर औषध म्हणून बाहेरून लावण्यासाठीही केला जात असे. शिवाजी महाराजांच्या काळातही तुपाच्या विहिरीतील जुने तूप युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना बाहेरून लावण्यासाठी वापरत असत.

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण दूध-दही वगैरेंची उपयुक्‍तता आणि त्यांच्यापासून बनविलेल्या काही पाककृती यांची माहिती घेणार आहोत.
दूध - दूध म्हटले की सर्वसाधारणपणे गाईचे किंवा म्हशीचे दूध डोळ्यासमोर येते. पण आयुर्वेदात या दोघांशिवाय बकरी, उंट, मेंढी, हत्ती, घोडा, हरिण वगैरे प्राण्यांच्या दुधाचे औषधी उपयोगही सांगितलेले आहेत. रोज पिण्यासाठी मात्र गाय वा म्हशीचे दूध उत्तम असते.
दुधाचे सामान्य गुण याप्रमाणे होत,

दुग्धं समधुरं स्निग्धं वातपित्तहरं सरम्‌ ।
सद्यः शुक्रकरं शीतं सात्म्यं सर्वशरीरिणाम्‌ ।।...भावप्रकाश

दूध चवीला मधुर, गुणाने स्निग्ध व वातदोष-पित्तदोष कमी करणारे असते, सारक असते, शीत वीर्याचे असते, तात्काळ शुक्रधातूचे पोषण करते व शरीरासाठी अनुकूल असते.

दुधामुळे जीवनशक्‍ती वाढते, आकलनशक्‍ती सुधारते, ताकद वाढते, तारुण्य टिकून दीर्घायुष्याचा लाभ होतो, तुटलेले हाड सांधते, हाडे बळकट राहतात, ओज वाढते. अनेक मनोरोगात, हृदयरोगात, गर्भाशयाच्या रोगात दूध उत्तम असते.

दूध सर्वांसाठी आवश्‍यक असतेच, आरोग्य टिकावे, जीवनशक्‍ती उत्तम राहावी आणि हाडांचा-सांध्यांचा बळकटपणा कायम राहावा यासाठी दूध नियमित सेवन करणे उत्तम असते. विशेषतः चमचाभर खारकेची पूड टाकून सकाळी कपभर दूध पिणे हाडांसाठी विशेष उपयुक्‍त असते.

शारीरिक श्रम करावे लागत असल्यास, रोजच्या दिनक्रमामुळे थकवा जाणवत असल्यास, जास्ती बोलण्याचे काम करावे लागत असल्यास, तसेच बौद्धिक काम करावे लागत असल्यास दुधाचे नियमित सेवन करणे श्रेयस्कर होय. संगणकावर काम, हवेतील प्रदूषण, जागरणे, प्रखर प्रकाश वगैरे कारणांनी डोळे थकतात, अशा वेळी बंद डोळ्यांवर गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवणेही उत्तम असते.

दही व ताक - दुधाला किंवा सायीला दह्याचे विरजण लावले की त्याचे दही तयार होते. व्यवस्थित लागलेले गोड दही खाण्यास योग्य असते. आंबट दह्यामुळे पित्त-कफदोषांचा प्रकोप होतो. सायीच्या दह्याचा उपयोग घुसळून लोणी काढून तूप करण्यास होतो.

दध्यष्णं दीपनं स्निग्धं कषायानुरसं गुरु ।
पाकेऽम्लं श्‍वासपित्तास्रशोथमेदःकफप्रदम्‌ ।।...भावप्रकाश

दही वीर्याने उष्ण असते व पचण्यासही जड असते. चवीला गोड व मागाहून तुरट असले तरी पचनानंतर आंबट होते. खोकला, दमा, सूज, मेदरोग, कफरोग, रक्‍तरोग यांना उत्पन्न करू शकते.

आयुर्वेदात दही रात्री खाणे वा गरम करून खाणे निषिद्ध मानले आहे. उष्ण ऋतूत म्हणजे वसंत, ग्रीष्म व शरद ऋतूत दही खाणे टाळणे उत्तम असेही सांगितले आहे. दही घुसळून लोणी काढून टाकलेले ताक मात्र अतिशय पथ्यकर असते.

हिंगुजीरयुतं घोलं सैन्धवेन च संयुतम्‌ ।
भवेत्‌ अतीव वातघ्नं अर्शोऽतिसार हृत्परम्‌ ।
रुचिदं पुष्टिदं बल्यं बस्तिशूलविनाशनम्‌ ।।...भावप्रकाश

भाजलेला हिंग, जिरे व सैंधव मीठ मिसळलेले ताक अतिशय वातशामक असते. मूळव्याध, अतिसारसारख्या रोगात उत्तम असते, अतिशय रुचकर व पौष्टिक असते, ताकद वाढवते व मूत्राशयासंबंधित वेदना दूर करते, ताक पचनसंस्थेसाठी उत्तम असते. उलटी, अतिसार, उदरशूळ, जंत, संग्रहणी, मूळव्याध वगैरे त्रासात ताक औषधाप्रमाणे उपयोगी असते. विविध वातविकार, विषमज्वर, प्रमेह, त्वचारोग, सूज वगैरे विकारात पथ्यकर असते.
लोणी : दह्याचे ताक करताना जो स्नेहभाग वेगळा होतो, त्याला लोणी म्हणतात. लोणी ताजे वापरायचे असते. शिळे लोणी किंवा फार काळ टिकू शकणारे लोणी आरोग्यासाठी अहितकर होय.

नवनीतं तु सद्यस्कं स्वादु ग्राहि हिमं लघु ।
मेध्यं किंचित्‌ कषायाम्लमीषत्‌ तक्रांशसंक्रमात्‌।। ...भावप्रकाश

ताजे लोणी चवीला गोड व ताकाचा अंश असल्याने किंचित तुरट व आंबट असते, पचायला हलके, वीर्याने शीत व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, मेधावर्धक म्हणजे आकलनशक्‍ती सुधारणारे असते. लहान मुलांसाठी घरचे ताजे लोणी उत्कृष्ट असते. रोज एक - दोन चमचे लोणी खाण्याने ताकद वाढते, शारीरिक विकास व्यवस्थित होतो आणि आकलनशक्‍ती वाढते.

तूप : तापवलेल्या दुधावरच्या सायीच्या दह्याचे ताक करताना निघालेले लोणी आणि लोण्याचे तूप याप्रकारे तूप बनत असल्याने दूध-लोण्याचा जणू सारभाग म्हणजे तूप असते. म्हणूनच तूप गुणांनी सर्वश्रेष्ठ असते.

घृतं रसायनं स्वादु चक्षुष्यं वन्हिदीपनम्‌ ।
शीतवीर्यं विष अलक्ष्मीपापपित्तानिलापहम्‌ ।।
... भावप्रकाश

शास्त्रोक्‍त पद्धतीचे साजूक तूप हे रसायन गुणांनी युक्‍त असते, चवीला गोड असते, डोळ्यांसाठी हितकर असते तसेच अग्नी प्रदीप्त करते. तूप वीर्याने शीत असते, वात-पित्तदोषांना कमी करतेच, पण विषदोष, अलक्ष्मी, पाप यांचाही नाश करते.

तूप कांतिवर्धक, सौंदर्यवर्धक असते. तूप सेवन करण्याने त्वचेला उचित स्निग्धता मिळून त्वचा घट्ट, चमकदार राहण्यास मदत मिळतेच पण बाहेरून तूप लावण्यानेही त्वचेवरचा काळपटपणा, खरखरीतपणा नाहीसा होण्यास मदत मिळते.

दूध, दही, लोणी वगैरे गोष्टींपासून बनवता येणाऱ्या काही आयुर्वेदिक पाककृती याप्रमाणे होत, थितभक्‍त (ताक-भात)

भक्‍तो मथितयुक्‍तश्‍च स्वादुः शीतः प्रियः स्मृतः ।
रुच्यो अग्निदीपकश्‍चैव पाचकः पौष्टिकः स्मृतः ।।

ग्रहण्यर्शामशूलानां नाशकः संप्रकीर्तितः ।।
...निघण्टु रत्नाकर

ताक घातलेला भात चवीला रुचकर, गोड आणि प्रिय असतो, वीर्याने थंड असतो, पाचक असतो, अग्नीस प्रदीप्त करतो, शरीरासाठी पौष्टिक असतो, ग्रहणी (कोलायटिस), मूळव्याध, आमामुळे होणाऱ्या वेदनांचे शमन करतो.

दध्यादि यूष
दध्यम्ललवणस्नेहतिलमाषैः सुसाधितः ।
यूषः कदम्लकच्छर्दिकफवातहरः प्रियः ।।
...निघण्टु रत्नाकर

व्यवस्थित लागलेले रुचकर दही, मीठ, तूप, तीळ आणि उडीद यांच्यापासून बनविलेले हे यूष (सूप -कढण) अतिशय रुचकर असते. घशाशी आंबट येणे, उलट्या होणे, कफदोष, वातदोष या तक्रारींवर उपयुक्‍त असते. हे यूष बनविण्यासाठी सर्वप्रथम तीळ व उडीद शिजवून कढण बनवायचे असते व त्यात मीठ, दही, मिसळून वरून तुपाची फोडणी द्यायची असते.

दूध-पोहे : साळीचे तांदूळ पाखडून स्वच्छ करून घ्यावेत. ते उकळत्या पाण्यात भिजवून दाबून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम पाणी घालून खापरात भाजून मग कुटावेत. म्हणजे पातळ पोहे तयार होतात. हे पोहे वातशामक असतात, पचण्यास थोडे जड असतात, कफ वाढवतात. हे पोहे दुधात भिजवून सेवन करता येतात.

सक्षीरा बृंहणा वृष्या बल्याः स्निग्धाः सराश्‍च ते ।
...निघण्टु रत्नाकर

दूध-पोहे धातुवर्धक असतात, शुक्रधातूसाठी पोषक असतात, कफ वाढवतात व सारक असतात.

दही-साखरेचे वडे
दही व ताकाचे समभाग मिश्रण करावे व मंद आचेवर आटवण्यास घ्यावे. गोळा तयार होईल इतके आटले की त्याची छोटी पुरी लाटावी. पुरीमध्ये साखरेचे पुरण घालून वडे करावे व तुपात तळावेत.

कफदा पुष्टिदा गुर्वी वृष्या हृद्या प्रकीर्तिता ।
वाताग्निनाशिनी चोक्‍ता दीप्ताग्नीनां हिता मता । व्यवायिनामनिद्राणां हितेति परिकीर्तिता । हे वडे कफकर असतात, शरीरास पुष्ट करतात, पचण्यास जड असतात, शुक्रासाठी हितकर असतात आणि मनाला प्रिय असतात.
पायस
दुग्धस्याष्टमभागेन तन्दुलान्घृतसंस्कृतान्‌ ।
शुद्धेऽर्धपक्वे दुग्धे तु क्षिप्त्‌वा सिद्धा हि क्षीरिका ।।
पायसं शर्करायुक्‍तघृतं प्रक्षेपणात्‌ भवेत्‌ ।
तांदळाच्या आठपट दूध घ्यावे. प्रथम तांदळांना तुपाचा हात चोळावा, भांड्यात दूध घेऊन अग्नीवर ठेवावे, त्यात हे तांदूळ घालून ढवळत राहावे. अर्धे दूध आटले की साखर व तूप घालावे. सर्वात शेवटी थोडी वेलची व केशर घालावे. असा हा पायस धातूंचे पोषण करतो, शरीरबल वाढवतो, वात तसेच पित्तदोषाचे शमन करतो.

रसाला (श्रीखंड) : दही फडक्‍यात बांधून पाणी निथळू द्यावे व राहिलेले घट्ट दही 1280 ग्रॅम घ्यावे. त्यात तूप व मध 40-40 ग्रॅम, साखर दह्याइतकी वा निम्म्या प्रमाणात, दालचिनी, नागकेशर, वेलची, तमालपत्र हे सर्व प्रत्येकी पाच पाच अर्धा ग्रॅम, मिरी व सुंठ 40-40 ग्रॅम याप्रमाणे सर्व वस्तू मिसळाव्यात व कापराने सुगंधित केलेल्या मातीच्या भांड्यावर स्वच्छ सुती कापड बांधून त्यावरून थोड्या थोड्या प्रमाणात गाळून घ्यावे.

शुक्रकृत्‌ बल्या रोचनी वातपित्तजित्‌ ।
गुरुः स्निग्धा प्रतिश्‍यायं विशेषेण विनाशयेत्‌ ।।
पुष्टिदा कान्तिकृत्‌ वृष्या कफकृच्छ्रमनाशिनी ।।
...निघण्टु रत्नाकर

या पद्धतीने बनविलेले श्रीखंड अत्यंत रुचकर व वात-पित्तदोषांना जिंकणारे असते, ताकद वाढविते, शुक्रधातूस हितकर असते, त्वचेची कांती वाढविते, शरीराची पुष्टी करवते, प्रतिश्‍याय म्हणजे पडसे दूर करते.

दूधपाक : हाही दूध व तांदळापासून तयार होतो. पायसाप्रमाणे यातही तांदूळ दुधासह शिजवले जातात पण यात दुधाच्या मानाने अगदी कमी तांदूळ असतात व दूध थोडे आटवून घट्ट केलेले असते. दूधपाक शीतल गुणधर्माचा, शरीरशक्‍ती वाढविणारा, स्टॅमिना वाढण्यास मदत करणारा व पौष्टिक असतो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्‍तीपर्यंत सर्वांसाठी उत्तम असतो.

Friday, February 5, 2010

अन्नयोग : दूध 2

जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये बाळाचा विकास सर्वस्वी दुधावरच होत असतो. अर्थातच आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम असते.
दुधाला पूर्णान्न समजले जाते, कारण जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये बाळाचा विकास सर्वस्वी दुधावरच होत असतो. अर्थातच आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम असते. काही कारणास्तव आईचे दूध न मिळाल्यास गाईचे वा बकरीचे दूध बाळाला देता येते.
आयुर्वेदात आठ प्राण्यांच्या दुधाचे स्वतंत्र गुण सांगितले आहेत. मागच्या वेळेला आपण गाय, म्हैस, बकरी व उंटिणीच्या दुधाचे गुणधर्म पाहिले, आता घोडी वगैरे इतर प्राण्यांच्या दुधाचे गुणधर्म आपण पाहू.

घोडी वगैरे एक खूर असणाऱ्या प्राण्यांचे दूध
बल्यं स्थैर्यकरं सर्वमुष्णं चैकशफं पयः । साम्लं सलवणं रुक्षं शाखावातहरं लघु ।।...चरक सूत्रस्थान
* चव - आंबट व किंचित खारट
* गुण - रुक्ष, लघु म्हणजे पचायला सोपे
* वीर्य - उष्ण
एक खूर असणाऱ्या प्राण्यांचे दूध बलवर्धक, शरीराला स्थिरता देणारे व हाता-पायातील वातदोष दूर करणारे असते.

मेंढीचे दूध
हिक्काश्‍वासकरं तूष्णं पित्तश्‍लेष्मलमाविकम्‌ ।...चरक सूत्रस्थान
* वीर्य - उष्ण
* दोष - पित्त व कफवर्धक
मेंढीचे दूध उचकी व दमा उत्पन्न करणारे व अतिशय गरम असते. मेंढीच्या दुधाला एक प्रकारचा दुर्गंध येतो, त्यामुळे मेंढीचे दूध सहसा प्यायले जात नाही. शिवाय ते उष्ण असल्यानेही नियमित घेणे अयोग्य होय.

हत्तिणीचे दूध हस्तिनीनां पयो बल्यं गुरु स्थैर्यकरं परम्‌ ।...चरक सूत्रस्थान
हत्तिणीचे दूध बलदायक व शरीराला स्थिर करणारे असते मात्र पचण्यास अवघड असते.

स्त्रीचे दूध
जीवनं बृंहणं सात्म्यं स्नेहनं मानुषः पयः । नावनं रक्‍तपित्ते च तर्पणं चाक्षिशूलिनाम्‌ ।।...चरक सूत्रस्थान
स्त्रीचे दूध अर्थात स्तन्य नवजात बालकासाठी जीवनदायक असते, सर्व धातूपोषक असते, अनुकूल असते व शरीराला उचित स्निग्धता देते. नाकातून रक्‍त येत असल्यास नाकात घालण्यासाठी आणि डोळे दुखत असल्यास डोळ्यात घालण्यासाठी स्तन्य वापरता येते.

दहीदही तयार करण्यासाठी गाईचे वा म्हशीचे दूध वापरले जाते. दूध तापवून त्याला विरजण लावले की त्याचे दही तयार होते. दुधाला लावायचे विरजण पारंपरिक, हजारो वर्षांपासून चालत आलेले व प्राणिज असायला हवे. लिंबाची वाळवलेली साल दुधात टाकूनही दही तयार होते पण अशा वनस्पतिज विरजणाने तयार झालेले दही खरे दही नव्हे. पारंपरिक, प्राणिज विरजण लावल्यानंतर त्याचे नीट दही लागायला पुरेसा वेळ द्यावा लागतो. रात्री उशिरा विरजण लावले व सकाळी लवकर दही तयार झाले असे समजणे योग्य नाही. विरजण लावल्यावर त्याचे नीट दही होण्यासाठी 10-11 तास द्यावे लागतात. दूध व्यवस्थित व पूर्णपणे विरजण्यासाठी किंवा दुधाचे संपूर्णपणे दह्यात परिवर्तन होण्यासाठी त्यावर सूर्याच्या प्रकाशाचा थोडा संस्कार होणे आवश्‍यक असते. थंडीच्या दिवसात दही जमायला थोडा अधिक वेळ लागतो. उन्हाळ्यात त्या मानाने दही लवकर लागते.
या प्रकारे योग्य विरजण, पुरेसा वेळ या गोष्टी सांभाळून जे दही लागते ते पुरेसे पाणी टाकून रवीने नीट घुसळले व त्यातून लोणी बाजूला काढले की जे ताक तयार होते ते खरे ताक. मुळात जर दहीच योग्यप्रकारे तयार केलेले नसेल तर त्यातून तयार होणारे ताक, लोणी, तूप वगैरे योग्य नसतील.
संपूर्ण जगभर दही खाण्याची पद्धत दिसते पण दह्याचे गुणधर्म पाहून ते आपल्या प्रकृतीला अनुकूल आहे वा नाही हे पाहणे आवश्‍यक होय.
रोचनं दीपनं वृष्यं स्नेहनं बलवर्धनम्‌ ।पाकेऽम्लमुष्णं वातघ्नं मल्यं बृंहणं दधि ।।...चरक सूत्रस्थान

* रस -मधुर, आंबट किंचित तुरट
* गुण - गुरु म्हणजे पचण्यास जड, स्निग्ध
* वीर्य - उष्ण
* विपाक - आंबट
* दोष - वातनाशक पण पित्त-कफवर्धक

दही चवीला रुचकर असते, योग्य प्रमाणात सेवन केले असता ताकद वाढवते, शरीराला स्निग्धता देते तसेच अग्नी प्रदीप्त करते, पण दह्यामुळे शरीरातील स्रावांचे प्रमाण वाढते.

दह्यामुळे अंगावर सूज येऊ शकते, सर्दी-खोकला होऊ शकतो, चरबी वाढू शकते. म्हणून दही नियमितपणे खाणे योग्य नसते. वजन जास्ती असणाऱ्यांनी, त्वचारोग असणाऱ्यांनी, सर्दी-खोकला होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी, यकृत-वृक्क या अवयवांची कार्यक्षमता कमी झालेली असणाऱ्यांनी, उष्ण प्रकृती असणाऱ्यांनी दही नियमित वा वारंवार खाणे टाळणे उत्तम होय.
सूर्यास्तानंतर दही नुसते खाऊ नये तर मुगाचे कढण, मध, तूप, खडीसाखर, आवळकाठी, सैंधव यापैकी एका पदार्थासह खावे असेही संदर्भ आहेत. एकंदर पाहता दही खूपच काळजीपूर्वक खायला हवे. आंबट व शिळे दही खाणे निश्‍चितपणे टाळावे कारण अशा दह्याने रक्‍तदोष तयार होतो. परिणामतः त्वचारोग, तोंड येणे, पाळीच्या वेळेला अतिरक्‍तस्राव होणे, शरीराला दुर्गंधी येणे यासारखे अनेक त्रास होऊ शकतात. अदमुरे म्हणजे विरजण लावल्यानंतर चार - पाच तासात बनलेले, नीट न लागलेले दही. अदमुऱ्या दह्याने त्रिदोषांचा प्रकोप होतो, म्हणून असे दही खाणे अयोग्य होय. नीट लागलेल्या दह्याचे पाणी मात्र औषधी असते. शरीरातील सर्व स्रोतसांची शुद्धी करण्याचा गुण दह्याच्या पाण्यात असतो. म्हणूनच अनेक औषधी तेला-तुपावर दह्याच्या पाण्याचा संस्कार केलेला असतो.

- डॉ. श्री बालाजी तांबे Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Friday, January 29, 2010

अन्नयोग : दूध

गोरस म्हणजे दूध. दूध व दही, ताक, लोणी, तूप, पनीर, खवा वगैरे दुधाचे पदार्थ. त्यांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग यांच्याबाबत समज-गैरसमज अधिक दिसतात.
'अन्नयोग' या सदरात आपण धान्यवर्ग, शमी (कडधान्ये) वर्ग, शाक (भाज्या, फळभाज्या) वर्ग, फळवर्ग वगैरे वर्गात येणाऱ्या विविध द्रव्यांची माहिती घेतली, मसाल्याच्या पदार्थांचेही आयुर्वेदीय गुणधर्म पाहिले. आता आपण माहिती घेणार आहोत गोरस वर्गाची. गोरस म्हणजे दूध. दूध व दही, ताक, लोणी, तूप, पनीर, खवा वगैरे दुधाचे पदार्थ सर्वांच्या परिचयाचे असतात, मात्र त्यांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग यांच्याबाबत समज-गैरसमज अधिक दिसतात. अन्नयोगामधून आपण दूध व दुधाच्या पदार्थांचे नेमके गुणधर्म पाहणार आहोत.

चरकसंहितेत आठ प्राण्यांच्या दुधाचे वेगवेगळे गुणधर्म दिलेले आहेत. गाय, म्हैस, बकरी, उंट, घोडी, मेंढी, हत्तीण व स्त्रीदुग्ध याप्रमाणे आठ प्रकारच्या दुधांचे गुणधर्म ग्रंथात दिलेले आहेत,

गाईचे दूध स्वादु शीतं मृदु स्निग्धं बहलं श्‍लक्ष्णपिच्छिलम्‌ ।
गुरु मन्दं प्रसन्नं च गव्यं दशगुणं पयः ।।
तदेव गुणमेवौजं सामान्यात्‌ अभिवर्धयेत्‌ ।
प्रवरं जीवनीयानां क्षीरमुक्‍तं रसायनम्‌ ।।...चरक सूत्रस्थान
* रस - मधुर
* गुण - मृदू, स्निग्ध, श्‍लक्ष्ण (गुळगुळीत),
पिच्छिल (चिकट), गुरु म्हणजे पचण्यास जड, मंद, प्रसन्नता देणारे
* वीर्य - शीतल
* गाईचे दूध व ओज यांचे गुणधर्म एकसारखे असल्यामुळे गाईच्या दुधामुळे ओज वाढते, जीवन देणाऱ्या सर्व द्रव्यांमध्ये व रसायन द्रव्यांमध्ये गाईचे दूध श्रेष्ठ होय.
* आहारद्रव्य म्हणून गाईचे दूध उत्तम असतेच, पण औषधातही गाईचे दूध मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. औषधी तेल वा तूप बनविताना गाईच्या दुधाच्या भावना दिल्या जातात. अनेक द्रव्यांची शुद्धी करण्यासाठी गाईचे दूध वापरले जाते. गाईचे दूध मेंदू व हृदयासाठी उत्तम असते.
* लघवीस आग होत असल्यास, अडखळत होत असल्यास, तसेच लघवी होताना वेदना होत असल्यास एक कप गाईचे दूध दोन चमचे गूळ टाकून घेण्याने बरे वाटते.
* पित्त वाढल्यामुळे पोटात दुखत असल्यास, आग होत असल्यास सामान्य तापमानाचे गाईचे दूध खडीसाखरेसह घोट घोट घेण्याने बरे वाटते.

म्हशीचे दूधहिषीणां गुरुतरं गव्यात्‌ शीततरं पयः ।स्नेहान्यूनमनिद्राय हितम्‌ अत्यग्नये च तत्‌ ।।....चरक सूत्रस्थान

* म्हशीचे दूध पचण्यास जड व गाईच्या दुधापेक्षा थंड असते. मात्र म्हशीच्या दुधात स्नेहांश अधिक असतो.
* सध्या सहज उपलब्ध असणारे दूध म्हणजे गाईचे वा म्हशीचे दूध. म्हशीच्या दुधातला जडपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे पाणी टाकून उकळता येते वा सुंठीने संस्कारित करता येते. गाईचे दूध सर्वोत्तम असते व त्यानंतर म्हशीचे दूध पिण्यासाठी वापरता येते.
* दूध हाडांसाठी पोषक असल्याने वाढत्या वयाच्या मुलांनी तसेच स्त्रियांनी नियमित दूध घेणे उत्तम असते. खारकेची पूड टाकून उकळलेले दूध हाडांसाठी विशेष पोषक असते.
* घसा कोरडा पडणे, अकारण धडधडणे, अस्वस्थ वाटणे, अशक्‍तता जाणवणे वगैरे तक्रारींवर दूध, खडीसाखर व तूप यांचे मिश्रण घेण्याचा उपयोग होतो.
* डोळ्यांची आग होत असल्यास गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या बंद डोळ्यांवर ठेवण्याने बरे वाटते.
* पोटात जखमा होणे (अल्सर), कावीळ, नाक-गुद-मूत्र वगैरेंमार्गे रक्‍तस्राव होत असल्यास फक्‍त दूध व साळीच्या लाह्या, दूध व भात एवढेच खाण्याने पटकन बरे वाटते व शरीराची ताकदही टिकून राहते.

बकरीचे दूध छागं कषायमधुरं शीतं ग्राहि पयो लघु ।रक्‍तपित्तातिसारघ्नं क्षयकासज्वरापहम्‌ ।।...चरक सूत्रस्थान
* रस - मधुर व तुरट
* गुण - लघु म्हणजे पचण्यास हलके
* वीर्य -शीत
* बकरीचे दूध मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, रक्‍तपित्त, जुलाब, क्षय, खोकला, ज्वर वगैरेंमध्ये हितकर असते.
* क्षयरोग, कोरडा खोकला, ढास लागणे वगैरे तक्रारींमध्ये बकरीचे दूध विशेष उपयुक्‍त असते. नाकातून रक्‍त येण्याची सवय असणाऱ्यांनी बकरीच्या दुधाचे नस्य करण्याचा उपयोग होतो. जुलाब होत असताना गाई-म्हशीचे दूध पिता येत नाही, मात्र बकरीचे दूध घेण्याचा उपयोग होतो.

उंटिणीचे दूध
रुक्षोष्णं क्षीरमुष्ट्रीणां इषत्सलवणं लघु ।शस्तं वातकफानाहक्रिमिशोफोदरार्शसाम्‌ ।।...चरक सूत्रस्थान
* रस - मधुर, किंचित खारट
* गुण - रुक्ष, लघु म्हणजे पचण्यास हलके
* वीर्य - उष्ण
* दोष - वात-कफशामक
* उंटिणीचे दूध आनाह म्हणजे पोट फुगणे, जंत होणे, अंगावर सूज येणे, पोटात पाणी होणे, मूळव्याध वगैरे त्रासांवर तसेच त्वचेच्या विकारात हितावह असते.

- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405 Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Saturday, December 19, 2009

दूध न पचणे

दूध पचणे महत्त्वाचे असते. दूध पचत नसेल तर आहार परिपूर्ण होण्यात मोठीच अडचण येईल. काही वेळा आपल्या आतड्यातील पाचक रसातील दोषांमुळे दूध पचत नाही.

लोह वगळता दुधातून आपल्या जीवनाला आवश्‍यक सर्व घटक मिळू शकतात. प्रथिने, मेद, कर्बोदके, जीवनसत्त्वे, क्षार या सर्वांचा दूध हा एक चांगला स्रोत असतो. ६०० मिलिलिटर दुधातून मानवाच्या गरजेतील ७/८ कॅल्शिअम, १/३ रायबोफ्लेविन, १/४ प्रथिने आणि १/५ जीवनसत्त्व "अ' उपलब्ध होते. उष्मांकदेखील चांगल्या प्रमाणात मिळतात. दुधातून केसीन नावाचे प्रथिन मिळते. जठरातील हायड्रोक्‍लोरिक ऍसिडमुळे ते गोठते. त्यामुळे दूध घेतल्यावर पोट भरल्याची भावना दीर्घकाळ राहते. केसीनमधून आपल्याला आवश्‍यक ती सर्व अमायनो ऍसिड्‌स (Essential Amino Acids) मिळू शकतात. शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी, पाचक रसांच्या उत्पादनासाठी, विविध अंतर्ग्रंथींच्या स्रावांच्या (Harmone) निर्मितीसाठी, रक्तातील प्रथिनांच्या बांधणीसाठी आणि अनेक विकर (Enzymes) तयार करण्यासाठी ही अमायनो ऍसिड्‌स आवश्‍यक असतात. यासाठी दूध पचणे महत्त्वाचे असते. दूध पचत नसले तर आहार परिपूर्ण होण्यात मोठीच अडचण येईल.

दूध न पचण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आपल्या आतड्यातील पाचक रसातील दोष असणे, हे होय. दुधामध्ये लॅक्‍टोज (Lactose) नावाची शर्करा असते. ही शर्करा ग्लुकोज आणि गॅलॅक्‍टोज (Glucose & Galactose) या दोन शर्करांच्या रेणूंच्या संयोगातून बनलेली असते. मानवी आतड्यातून ग्लुकोज व गॅलॅक्‍टोज वेगवेगळे शोषले जाऊ शकतात; परंतु त्यांच्या संयोगाने निर्माण झालेला लॅक्‍टोज रेणू शोषला जाऊ शकत नाही. लॅक्‍टोजचे विघटन होणे आवश्‍यक असते. हे विघटन लहान आतड्यातील लॅक्‍टेझ (Lactase) नावाच्या विकराने होते. आतड्यात लॅक्‍टेझची निर्मिती पुरेशी झाली नाही, तर लॅक्‍टोजचे विघटन होत नाही. लॅक्‍टोज हा रेणू जसाचा तसा पुढे मोठ्या आतड्यात जातो. मोठ्या आतड्यातील जीवाणू (Bacteria) या लॅक्‍टोजच्या रेणूचे हायड्रोजेन, कार्बन-डाय- ऑक्‍साइड आणि शॉर्टचेन फॅटी ऍसिड्‌स या रेणूत विघटन करतात. लॅक्‍टोजचा रेणू लहान आतड्यातून पुढे जाताना
आपल्याबरोबर पाण्याचे रेणू नेतो. त्यामुळे जुलाब होणे, शौचाला भसर होणे, पोट फुगणे असे त्रास होऊ लागतात.

तीस टक्के भारतीयांमध्ये लॅक्‍टेझ पुरेशा प्रमाणात कार्य करीत नसावे, असा अंदाज आहे. काहींच्या आतड्याची जन्मतःच लॅक्‍टेझ तयार करण्याची क्षमता आनुवंशिकतेमुळे कमी असते. अनेकांच्या बाबतीत आतड्यात झालेल्या जीवाणू- विषाणू- एकपेशीय परोपजीवी जंतूंमुळे ही क्षमता कमी होते. आहारातील त्रुटीमुळे लॅक्‍टेझ तयार करण्याकरता लागणारी अमायनो ऍसिड्‌स मिळाली नाहीत तरीही हाच परिणाम होतो. आतड्यांच्या अस्तरातील पेशी लॅक्‍टेझ हे विकर तयार करतात. आतड्याचे अस्तर सतत नवे तयार होत राहते. अमायनो ऍसिड्‌स व इतर जीवनावश्‍यक अन्नघटक उपलब्ध झाले नाहीत तर हे अस्तर तयार होण्यात अडचण निर्माण होते. शिवाय इतर कोणत्याही कारणाने जुलाब होत राहिले तर लॅक्‍टोज पचविले जात नाही. लहान मुलांना अनेक कारणांमुळे जुलाब होणे संभवते. कारण कोणतेही असले तरी जुलाब होत असणाऱ्या अर्भकाला लॅक्‍टोज पचत नाही. असे लॅक्‍टोजचे अपचन तीन ते चार महिने टिकू शकते.

ज्या व्यक्तीला दूध पचत नाही त्याने दुधाचे सेवन मर्यादित ठेवावे. सहसा २४० मिलिलिटरपर्यंत दुधाचे २४ तासांतील सेवन बहुतेकांना सहन होते. दुधाबरोबर इतर धान्ये मिसळली तर पचन संस्थेवर ताण कमी येतो. दूध-भात, दूध-पोहे, दुधात कुस्करून ठेवलेली चपाती किंवा भाकरी, खीर, कॉर्नफ्लेक्‍स व दूध असे सेवन चांगले. दुधाचे दही होताना लॅक्‍टोजचे रूपांतर लॅक्‍टिक ऍसिडमध्ये होते. त्यामुळे ज्यांना दूध पचत नाही, त्यांनी दही किंवा ताक घेणे श्रेयस्कर. दूध चांगले उकळून घेण्यानेसुद्धा फायदा होतो. कारण लॅक्‍टोजचे रूपांतर परत कर्बोदकांत व कार्बनच्या अणूंत (Caramalization) होण्यास मदत होते. लॅक्‍टेझचा अभाव असणाऱ्या ज्या व्यक्तींना मलावरोध होतो त्यांनी आहारात दूध वाढविल्यास चांगल्या प्रतीचा आहार मिळेल व मलावरोध दूर होईल. बाजारात लॅक्‍टेझ मिळू शकते. एक लिटर दुधात ५ ते १० थेंब मिसळून ते दूध शीतपेटीत (Refrigerator) २४ तास ठेवावे, म्हणजे लॅक्‍टेझच्या अभावाचा दुष्परिणाम होणार नाही.

दूध न पचण्याची इतरही कारणे असू शकतात. दुधात अनेक जीवाणू सहज वाढू शकतात. न उकळलेले दूध कधीच निर्जंतुक नसते. दूध गोळा करताना स्वच्छतेकडे किती लक्ष दिले जाते, हे फार महत्त्वाचे असते. या जीवाणूंमुळे विषमज्वर (Typhoid), पॅराटॉयफॉईड, ऍमिबिक डिसेंट्री, बॅसिलरी डिसेंट्री असे आजार होतात. शिवाय टी.बी., घटसर्प, पटकी, पोलियो मायलायटिस इत्यादी आजार पसरू शकतात. दूध पाश्‍चराइज केले म्हणजे ते सेवण्यास योग्य होते. पाश्‍चरायझेशनमध्ये दूध वेगवेगळ्या तापमानापर्यंत तापवून लगेच गार केले जाते. दूध उकळण्याने ते निर्जंतुक होते व पचनासही सोपे होते. दुधातील चरबी कमी करण्याने, म्हणजे साय काढण्यानेदेखील दूध पचनास सुलभ बनते. तापवून साय काढण्याने दुधातील चरबीचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे ज्यांच्या रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे त्यांनाही ते उपयुक्त ठरते.

- डॉ. ह. वि. सरदेसाई
--
Madhu Milan
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Friday, August 28, 2009

दूधदुभतं, आरोग्य लाभतं


दूध सर्वांसाठीच आवश्‍यक असतं. दुधामुळे जीवनशक्‍ती वाढते, आकलनशक्‍ती सुधारते, ताकद वाढते, तारुण्य टिकून दीर्घायुष्याचा लाभ होतो. हे दूध ताजं असावं. महिनोन्‌महिने टिकवून ठेवलेलं किंवा पावडर स्वरूपातील नसावं. दूध आरोग्य देणारं औषध असतं.
दूधदुभतं म्हणजे दूध आणि दुधाचे दही, लोणी, तूप वगैरे पदार्थ. भारताला "गोकुळा'ची हजारो वर्षांची परंपरा आहेच; पण संपूर्ण जगभर हजारो वर्षांपासून दूध व दुधाच्या पदार्थांचा आरोग्यासाठी वापर केला जात असल्याचे दिसून येते. वैदिक संस्कृतीत, वैदिक वाङ्‌मयात दूध, लोणी, तुपाचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पश्‍चिमेकडच्या देशातही चीज बनविण्याची हजारो वर्षांची परंपरा दिसून येते.
आयुर्वेदात दूध-दुभत्याचे गुणधर्म सांगण्यासाठी "दुग्धवर्ग' असा एक विशेष वर्गच सां गितला आहे. या दुग्धवर्गात दूध, मलई, दही, ताक, लोणी व तूप यांचा मुख्यत्वे अंतर्भाव होतोच, पण खरवस, पनीर, दह्याचे पाणी वगैरेंचे गुणधर्मही दुग्धवर्गात सांगितलेले आहेत.
दूध - दूध म्हटले की सर्वसाधारणपणे गाईचे किंवा म्हशीचे दूध डोळ्यांसमोर येते. पण आयुर्वेदात या दोघांशिवाय बकरी, उंट, मेंढी, हत्ती, घोडा, हरिण वगैरे प्राण्यांच्या दुधाचे औषधी उपयोगही सांगितलेले आहेत. रोज पिण्यासाठी मात्र गाय वा म्हशीचे दूध उत्तम असते.
दुधाचे सामान्य गुण याप्रमाणे होत,
दुग्धं समधुरं स्निग्धं वातपित्तहरं सरम्‌ ।
सद्यः शुक्रकरं शीतं सात्म्यं सर्वशरीरिणाम्‌ ।।
...भावप्रकाश
दूध चवीला मधुर, गुणाने स्निग्ध व वातदोष-पित्तदोष कमी करणारे असते, सारक असते, शीत वीर्याचे असते, तत्काळ शुक्रधातूचे पोषण करते व शरीरासाठी अनुकूल असते.
दुधामुळे जीवनशक्‍ती वाढते, आकलनशक्‍ती सुधारते, ताकद वाढते, तारुण्य टिकून दीर्घायुष्याचा लाभ होतो, तुटलेले हाड सांधते, हाडे बळकट राहतात, ओज वाढते. अनेक मनोरोगात, हृदयरोगात, गर्भाशयाच्या रोगात दूध उत्तम असते.
दूध सर्वांसाठी आवश्‍यक असतेच, आरोग्य टिकावे, जीवनशक्‍ती उत्तम राहावी आणि हाडांचा-सांध्यांचा बळकटपणा कायम राहावा यासाठी दूध नियमित सेवन करणे उत्तम असते. विशेषतः चमचाभर खारकेची पूड टाकून सकाळी कपभर दूध पिणे हाडांसाठी विशेष उपयुक्‍त असते.
लहान मुलांनी नियमित दूध घेतल्याने त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला हातभार लागतो. "संतुलन चैतन्य कल्पा'सारखे रसायन टाकून दूध घेतल्याने दुधाचे गुण अजूनच वृद्धिंगत होतात.
गर्भारपण व बाळंतपणातही शतावरी कल्प टाकून दूध घेणे उत्तम असते. याने स्त्रीची ताकद चांगली राहतेच पण बाळालाही पोषण मिळू शकते.
शारीरिक श्रम करावे लागत असल्यास, रोजच्या दिनक्रमामुळे थकवा जाणवत असल्यास, जास्ती बोलण्याचे काम करावे लागत असल्यास तसेच बौद्धिक काम करावे लागत असल्यास दुधाचे नियमित सेवन करणे श्रेयस्कर होय.
संगणकावर काम, हवेतील प्रदूषण, जागरणे, प्रखर प्रकाश वगैरे कारणांनी डोळे थकतात, अशा वेळी बंद डोळ्यांवर गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवणेही उत्तम असते.
दूध दिवसा पिणे चांगले असते. रात्री दूध प्यायचे असले तर इतर जेवण वर्ज्य करून नुसतेच दूध प्यावे, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.
खरवस तसेच पनीर पौष्टिक असले तरी पचायला जड असतात, कफदोष वाढविणारे असतात. त्यामुळे ज्यांचा अग्नी उत्तम स्थितीत आहे अशांसाठी योग्य असतात.
मलई - दूध तापवून त्यावर जमलेली मलई थंड असते, वात-पित्तशामक असते, गुणांनी स्निग्ध व जड असते, शरीरपुष्टी करते, ताकद वाढवते.
दही व ताक - दुधाला किंवा सायीला दह्याचे विरजण लावले की त्याचे दही तयार होते. व्यवस्थित लागलेले गोड दही खाण्यास योग्य असते. आंबट दह्यामुळे पित्त-कफदोषांचा प्रकोप होतो. सायीच्या दह्याचा उपयोग घुसळून लोणी काढून तूप करण्यास होतो.
दध्यष्णं दीपनं स्निग्धं कषायानुरसं गुरु ।
पाके।म्लं श्‍वासपित्तास्रशोथमेदःकफप्रदम्‌ ।।
...भावप्रकाश
दही वीर्याने उष्ण असते व पचण्यासही जड असते. चवीला गोड व मागाहून तुरट असले तरी पचनानंतर आंबट होते. खोकला, दमा, सूज, मेदरोग, कफरोग, रक्‍तरोग यांना उत्पन्न करू शकते.
आयुर्वेदात दही रात्री खाणे वा गरम करून खाणे निषिद्ध मानले आहे. उष्ण ऋतूत म्हणजे वसंत, ग्रीष्म व शरद ऋतूत दही खाणे टाळणे उत्तम असेही सांगितले आहे.
दही घुसळून लोणी काढून टाकलेले ताक मात्र अतिशय पथ्यकर असते.
हिंगुजीरयुतं घोलं सैन्धवेन च संयुतम्‌ ।
भवेत्‌ अतीव वातघ्नं अर्शो।तिसार हृत्परम्‌ ।
रुचिदं पुष्टिदं बल्यं बस्तिशूलविनाशनम्‌ ।।
...भावप्रकाश
भाजलेला हिंग, जिरे व सैंधव मीठ मिसळलेले ताक अतिशय वातशामक असते. मूळव्याध, अतिसारसारख्या रोगात उत्तम असते, अतिशय रुचकर व पौष्टिक असते, ताकद वाढवते व मूत्राशयासंबंधित वेदना दूर करते, ताक पचनसंस्थेसाठी उत्तम असते. उलटी, अतिसार, उदरशूळ, जंत, संग्रहणी, मूळव्याध वगैरे त्रासात ताक औषधाप्रमाणे उपयोगी असते. विविध वातविकार, विषमज्वर, प्रमेह, त्वचारोग, सूज वगैरे विकारात पथ्यकर असते.
लोणी - दह्याचे ताक करताना जो स्नेहभाग वेगळा होतो, त्याला लोणी म्हणतात. लोणी ताजे वापरायचे असते. शिळे लोणी किंवा फार काळ टिकू शकणारे लोणी आरोग्यासाठी अहितकर होय.
नवनीतं तु सद्यस्कं स्वादु ग्राहि हिमं लघु ।
मेध्यं किंचित्‌ कषायाम्लमीषत्‌ तक्रांशसंक्रमात्‌ ।।
...भावप्रकाश
ताजे लोणी चवीला गोड व ताकाचा अंश असल्याने किंचित तुरट व आंबट असते, पचायला हलके, वीर्याने शीत व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, मेधावर्धक म्हणजे आकलनशक्‍ती सुधारणारे असते.
लहान मुलांसाठी घरचे ताजे लोणी उत्कृष्ट असते. रोज एक - दोन चमचे लोणी खाण्याने ताकद वाढते, शारीरिक विकास व्यवस्थित होतो आणि आकलनशक्‍ती वाढते. गर्भवती स्त्रीने गर्भारपणात घरचे ताजे लोणी खाणे गर्भाच्या एकंदर विकासासाठी उत्तम असते.
मूळव्याधीमध्ये, विशेषतः मळाचा खडा होण्याची, रक्‍त पडण्याची, आग होण्याची प्रवृत्ती असता लोणी नियमित खाणे उत्तम असते. त्वचेचा वर्ण उजळण्याच्या दृष्टीने लोणी खाणे उत्तम असतेच पण बाहेरून लावणेही उपयुक्‍त असते. विशेषतः उन्हाच्या संपर्कात येणाऱ्या त्वचेवर, मेक-अप काढल्यानंतर त्या ठिकाणी थोडेसे लोणी जिरवले तर त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.
हातापायांची आग, अशक्‍तपणा, पायाला भेगा, त्वचा कोरडी होणे वगैरे त्रास होत असणाऱ्यांनी रोजच्या आहारात लोणी-साखरेचा समावेश करणे उत्तम असते.
जुने किंवा दीर्घकाळ टिकणारे लोणी ताज्या लोण्याच्या विरुद्ध गुणांचे असते.
सक्षारकटुकाम्लत्वात्‌ छर्द्यर्शः कुष्ठकारकम्‌ ।
श्‍लेष्मलं गुरु मेदःस्थं नवनीतं चिरन्तनम्‌ ।।
...भावप्रकाश
शिळे लोणी खारट व आंबट होत असल्याने उलटी, मूळव्याध व त्वचारोग उत्पन्न करते. शिळे किंवा दीर्घकाळ टिकणारे लोणी कफदोष वाढवते, पचण्यास अतिशय जड असते आणि मेद वाढवते.
अनेक दिवसांपर्यंत साठवून ठेवता येणारे लोणी सेवन करताना या गोष्टीचा विचार करायला हवा.
तूप - तापवलेल्या दुधावरच्या सायीच्या दह्याचे ताक करताना निघालेले लोणी आणि लोण्याचे तूप याप्रकारे तूप बनत असल्याने दूध-लोण्याचा जणू सारभाग म्हणजे तूप असते. म्हणूनच तूप गुणांनी सर्वश्रेष्ठ असते.
घृतं रसायनं स्वादु चक्षुष्यं वदिीपनम्‌ ।
शीतवीर्यं विष अलक्ष्मीपापपित्तानिलापहम्‌ ।।
...भावप्रकाश
शास्त्रोक्‍त पद्धतीचे साजूक तूप हे रसायन गुणांनी युक्‍त असते, चवीला गोड असते, डोळ्यांसाठी हितकर असते तसेच अग्नी प्रदीप्त करते. तूप वीर्याने शीत असते, वात- पित्तदोषांना कमी करतेच पण विषदोष, अलक्ष्मी, पाप यांचाही नाश करते.
तूप कांतिवर्धक, सौंदर्यवर्धक असते. तूप सेवन करण्याने त्वचेला उचित स्निग्धता मिळून त्वचा घट्ट, चमकदार राहण्यास मदत मिळतेच पण बाहेरून तूप लावण्यानेही त्वचेवरचा काळपटपणा, खरखरीतपणा नाहीसा होण्यास मदत मिळते.
बुद्धी, स्मृती, आकलनशक्‍ती या तिन्ही प्रज्ञाभेदांसाठी तूप उत्कृष्ट असते. शिक्षण क्षेत्रातील व्यक्‍तींनी, बौद्धिक काम करावे लागणाऱ्यांनी, तसेच कामाचा ताण असणाऱ्यांनी नियमित तूप सेवन करणे उत्तम असते.
तुपामुळे बुद्धिसंपन्नता मिळतेच पण जीवनशक्‍ती वाढते, प्रतिकारशक्‍ती वाढते. एकंदर तेजस्विता वाढते म्हणूनच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्वांसाठी तूप उत्तंम असते. गर्भारपणात व बाळंतपणात स्त्रीने खाल्लेल्या तुपाचा तिला स्वतःला व बालकालाही फायदा होतो. सहा महिन्यांनंतर बालकाला बाहेरचे अन्न सुरू केले, की त्यालाही घरचे तूप देणे सुरू करता येते.
मलावरोधाचा त्रास असल्यास गरम पाण्यासह एक - दोन चमचे तूप घेण्याचा उपयोग होतो. याने अग्नीची ताकद तर वाढतेच, शिवाय पचनसंस्थेतील रुक्षता दूर होऊन पोट साफ व्हायला मदत मिळते.
झोप शांत लागत नसणाऱ्यांनी, अतिताणाचे काम असणाऱ्यांनी, वारंवार डोके दुखण्याची प्रवृत्ती आऱ्यांनी आहारात तुपाचा पुरेसा समावेश करणे चांगले असतेच पण रात्री झोपताना नाकात साजूक तुपाचे तीन - चार थेंब टाकणे, टाळूवर तूप जिरवणे उत्तम असते. यासाठी साध्या तुपापेक्षा "नस्यसॅन'सारखे औषधी तूप वापरले तर अधिक चांगला गुण येताना दिसतो.
मानसिक विकारांवर तुपासारखे उत्तम औषध नाही असे म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरू नये. उन्माद, अपस्मार, नैराश्‍य यांसारख्या विकारात आहारासह तूप खाणे आणि "संतुलन ब्रह्मलीन घृता'सारखे औषधांनी सिद्ध तूप खाणे या दोहोंचाही अप्रतिम उपयोग होताना दिसतो.
जखम भरून येण्यासाठीसुद्धा तुपाचा उपयोग होताना दिसतो. खरचटणे, भाजणे अशा तऱ्हेच्या जखमांवर तूप लावल्यास आग व वेदना कमी होतात व जखम पटकन भरून येते. जुनाट जखमाही तुपाच्या, विशेषतः औषधी तुपाच्या योगे भरून येताना दिसतात.
तुपाचा विशेष गुण म्हणजे तूप जेवढे जुने तेवढे अधिक गुणकारी होते. विशेषतः मानसिक रोगांवर, नेत्ररोगांवर व विषरोगांवर जुने तूप अधिक प्रभावी असते. जुन्या तुपाने जखमाही अधिक चांगल्या प्रकारे भरून येतात.
अशा प्रकारे दूध व दुधाच्या पदार्थांचा रोजच्या आहारात योग्य स्वरूपात, योग्य प्रमाणात वापर केला तर त्यामुळे आरोग्याचा लाभ होऊ शकतो.
डॉ. श्री बालाजी तांबे

ad