Showing posts with label अग्नी. Show all posts
Showing posts with label अग्नी. Show all posts

Saturday, November 3, 2012

शरदातील पित्तसंतुलन

आयुर्वेदाने फक्‍त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते. चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते. चांदीसुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्तसंतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच. 

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य तीन कालविभाग सर्वांना माहिती असतात. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मधला ऋतू म्हणजे शरद ऋतू. साहजिकच या ऋतूमध्ये एखाद्‌दुसऱ्या सरीचा अपवाद सोडला तर पाऊस जवळजवळ थांबलेला असतो. पावसाळ्यातील काळे ढग जाऊन त्यांची जागा पांढऱ्या ढगांनी घेतलेली असते. दिवसा सूर्याच्या तीव्र किरणांमुळे वातावरण चांगलेच तापते, तर रात्री हवेत गारवा जाणवतो. झेंडू, शेवंती वगैरे लाल फुले फुलतात. निसर्गात आणि वातावरणात हे बदल व्हायला लागले, की शरद ऋतू सुरू झाला असे समजता येते.

निसर्गातील प्रत्येक बदलाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. पावसाळ्यात वातदोषाचा प्रकोप होतो, त्याचबरोबर पाण्यात वाढलेल्या आम्लतेने पित्तदोष साठायला सुरवात झालेली असते. पावसाळ्यातील थंड वातावरण बदलून त्याऐवजी तीव्र सूर्यकिरणे तळपू लागली व हवेतील उष्णता वाढली, की त्याचा परिणाम म्हणून अगोदर साठलेले पित्त अजूनच वाढते. पित्ताचा प्रकोप होतो. पित्ताचा प्रकोप झाला की पित्ताचे अनेक त्रास होऊ शकतात. म्हणून शरद ऋतूची सुरवात झाली, की लगेच पित्त संतुलनासाठी प्रयत्न करणे श्रेयस्कर असते.

पित्त खवळले तर... 
  • शरद ऋतूमध्ये पित्त वाढल्याने होऊ शकणारे त्रास पुढीलप्रमाणे सांगता येतात-
  • हातापायांच्या तळव्यांची आग होणे.
  • डोळे लाल होणे, जळजळणे, पापणीवर रांजणवाडी येणे.
  • शरीर स्पर्शाला गरम लागणे, ताप आल्यासारखे वाटणे.
  • अंगावर गळू येणे, त्यात पाणी किंवा पू होणे.
  • डोळ्यांसमोर अंधारी येणे, चक्कर येणे.
  • त्वचेवर लालसर पुरळ उठणे.
  • मळमळणे, डोके दुखणे, उलटी होऊन पित्त पडून जाणे.
  • घशाशी आंबट येणे.
  • तोंड येणे.
  • नाकातून रक्‍त येणे.
  • लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे.
  • फार तहान लागणे, पाणी प्यायले तरी समाधान न होणे.

अर्थात व्यक्‍तीची प्रकृती, तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराची प्रवृत्ती यासारख्या अनेक मुद्‌द्‌यांवरून यापैकी नेमका कोणता त्रास होईल व त्याची तीव्रता कशी असेल हे ठरत असते. मात्र, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शरद ऋतू सुरू होतो आहे याचे भान ठेवले, खाण्यापिण्यात, वागण्यात आवश्‍यक ते बदल केले तर हे त्रास टाळताही येऊ शकतात.

ऐसा घ्यावा आहार 
पित्त संतुलनासाठी शरद ऋतूत पुढीलप्रमाणे आहारयोजना करायला सांगितली आहे-
  • तत्रान्नपानं मधुरं लघु शीतं सतिक्‍तकम्‌ ।
  • पित्तप्रशमनं सेव्यं मात्रया सुप्रकांक्षितैः ।। ...चरक सूत्रस्थान
  • खाण्यापिण्यात मधुर रस म्हणजेच गोड चव मुख्य असावी.
  • पचण्यास हलके पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करावेत.
  • आहारात काही प्रमाणात कडू चवीच्या पदार्थांचाही समावेश असावा.
  • थंड स्वभावाचे, पित्तशमन करणारे अन्न सेवन करावे.

भारतीय उत्सव, परंपरा आणि आरोग्य यांचा कायम संबंध असतोच. शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या दिवशी खारीक, बदाम, खसखस, साखर वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून, चांदण्यात बसून पिण्याची प्रथा आहे. हा पित्तशमनाचा एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदाने फक्‍त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते. चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते. चांदीसुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्त संतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच.

शरद ऋतूत दूध, घरचे लोणी-साखर, साजूक तूप या गोष्टी अमृतोपम होत, कारण हे सर्व पित्तशमनासाठी उत्तम असतात. मुगाचे लाडू, नारळाची वडी, गोड भात, उकडीचे मोदक, दुधी हलवा, कोहाळेपाक हे गोड पदार्थही शरदामध्ये सेवन करण्यास योग्य असतात. कारले, कडवे वाल, मेथीची भाजी या चवीला कडवट असणाऱ्या भाज्याही अधूनमधून खाणे चांगले असते. साळीच्या लाह्या, मनुका, अंजीर, खडीसाखर हे पदार्थ सेवन करणे, फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, आवळा, डाळिंब, सफरचंद, केळे, ऊस यांना अधिक प्राधान्य देणे, मोरावळा, गुलकंद, दाडिमावलेह सेवन करणेही शरद ऋतूत पथ्यकर असते.

उकळून गार (सामान्य तापमानाचे) पाणी पिणे, पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्ये टाकणे हेसुद्धा या ऋतूत पित्त संतुलनास मदत करते.

भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, घोसाळी, दोडका, भेंडी, कोहळा, पडवळ, परवर, चाकवत, पालक अशा पचायला हलक्‍या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडणे; भाज्या करताना जिरे, हळद, धणे, कोकम, मेथ्या, तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरणे, हिरव्या मिरचीऐवजी शक्‍यतो लाल मिरची, आले वापरणे हेसुद्धा शरदात पित्त वाढू नये म्हणून मदत करणारे असते.

पित्तदोषाला प्रतिबंध 
शरदामध्ये पित्ताचा प्रकोप होतो हे आपण सुरवातीला पाहिले. कोणत्याही दोषाचा प्रकोप होतो तेव्हा तो दोष वाढलेला तर असतोच, पण स्वतःच्या स्थानातून बाहेर पडलेला असतो. म्हणूनच या अवस्थेत त्याला बाहेर काढून टाकणे सहज शक्‍य असते. साहजिकच शरद ऋतूमध्ये विरेचन करून प्रकुपित पित्तदोष शरीराबाहेर काढून टाकला, तर पुढे वर्षभर पित्तासंबंधी कोणताही विकार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अर्थात विरेचन म्हणजे नुसते जुलाबाचे औषध घेणे नव्हे, तर शास्त्रोक्‍त पद्धतीने स्वेदन, स्नेहन वगैरे सर्व पूर्वतयारी करून पित्तदोष लहान आतड्यापर्यंत आणून विरेचनाद्वारा शरीराबाहेर काढून टाकणे हे खरे विरेचन होय. प्रत्येक शरदात जर असे शास्त्रोक्‍त विरेचन करून घेतले तर पचन नीट राहणे, वजन नियंत्रणात राहणे, पर्यायाने कोलेस्टेरॉल, रक्‍तदाब, मधुमेह, हृद्‍रोग वगैरे सर्वच अवघड रोगांना प्रतिबंध करणे शक्‍य असते.

शरदामध्ये पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी नियमित पादाभ्यंग करणेसुद्धा अतिशय उपयुक्‍त असते. शतावरी कल्प, अविपत्तीकर चूर्ण, पित्तशांती गोळ्या वगैरे पित्तशामक रसायने, औषधे या ऋतूत घेणे; जागरणे, उन्हात जाणे टाळणे; धूम्रपान, मद्यपान, मांसाहार वर्ज्य करणे यासारखी काळजी घेतली तर शरदात पित्ताचा त्रास सहन करावा लागणार नाही, उलट शरदातील चांदण्याचा आनंद घेता येईल.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Monday, October 24, 2011

आरोग्यप्रकाश

डॉ. श्री बालाजी तांबे
घरात श्री गजाननाचे आगमन होणार म्हणून गणपती उत्सवाच्या वेळी साधारणतः संपूर्ण घर साफ करून घेऊन रंगरंगोटीही केली जाते. ज्यांच्या घरात नवरात्र बसते ते नवरात्रापूर्वी घराचा कानाकोपरा रंगवून घेतात, घर सजवतात. हे दोन्ही धार्मिकतेत मोडणारे उत्सव सोडले तरी दीपावलीचा उत्सव सर्व जातिधर्माचे लोक साजरा करतात. या उत्सवाच्या निमित्ताने घराला डागडुजी, रंगरंगोटी करतात, घरात एखादी नवीन वस्तू घेतली जाते, घर सजविले जाते. घर उठून दिसावे, डोळ्यांत भरावे म्हणून घराच्या बाहेरच्या बाजूला आकाशकंदील टांगले जातात, घराला रोषणाई केली जाते. अगदीच काही नाही तरी घराबाहेर चार - सहा पणत्या तरी पेटवून ठेवल्या जातात.

जीवन हा एक उत्सव आहे असे लक्षात घेतले, तर ज्या वेळी प्राणशक्‍ती विकसित होऊन टाळूच्या जागी ब्रह्मरंध्रामध्ये प्रकाशते, तो जीवनाचा महोत्सव म्हणायचा. दीपावली साजरी करण्यासाठी जशी घराची रंगरंगोटी, आरास केली जाते तसे हा महोत्सव साजरा करताना शरीराकडे लक्ष का दिले जात नाही? शरद ऋतूत पित्त वाढणे प्रकृतीचा नियम आहे. वाढलेले पित्त शरीरातून बाहेर काढण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी विरेचनासारखी योजना आयुर्वेदाने केली आहे. पंचतत्त्वांच्या शुद्धीसाठी, तसेच त्रिदोषांच्या शुद्धीसाठी पंचकर्माची योजना केली, तर मग पंचकर्मासारखे वा विरेचनासारखे आयुर्वेदिक उपचार मनुष्य का करून घेत नाही?

पूर्वी, दीपावलीचा महोत्सव असो, वा घरात यज्ञयाग, लग्न वगैरे मोठा प्रसंग असो, शरीरशुद्धी प्राधान्याने केली जात असे. प्रत्येक व्यक्‍ती त्याच्या शरीररूपी घरात राहते, नंतर हे शरीर चुना-माती-विटांनी बांधलेल्या घरात राहते. नुसतेच माती-विटांच्या घराला चांगले ठेवणे योग्य नाही; पण कालमहिमा असा की, फक्‍त बाह्य आवरणाला व वरवरच्या दिखाव्याला व देखाव्यालाच महत्त्व आल्यानंतर शरीर हे आत्म्याचे खरे घर असल्याचे विस्मरणात गेले असावे. शरीराची नुसतीच शुद्धी करून चालत नाही तर शरीरावर तेज दिसेल, लोक आकर्षित होतील, त्यातून एकमेकांशी चांगले संबंध जुळतील व ती व्यक्‍ती सर्वांना हवीहवीशी वाटेल याचीही आवश्‍यकता असते. मायकेल जॅक्‍सन, एलव्हिस प्रेस्ली, सध्या प्रसिद्ध असलेली पॉप गायिका लेडी गागा; तसेच काही भारतीय चित्रपटांतून दाखविलेल्या नृत्यांमध्ये नृत्य करणाऱ्याच्या पोशाखाला छोटे छोटे विजेचे दिवे लावून नृत्य करणाऱ्याचे शरीर आकर्षक केलेले दिसते. म्हणजे शरीर आकर्षक करून इतरांना दृष्टिसुख देणे आवश्‍यक असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. असे असताना शरीरशुद्धी करून शरीराची कांती व तेज वाढेल अशी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, हे लक्षात घेऊन दीपावलीचा महोत्सव सुरू केलेला असावा.

एक गोष्ट निश्‍चित, की नुसत्या शरीरशुद्धीने येणारे तेज चारी दिशांना फाकण्यास असमर्थ ठरेल, त्यासाठी विशेष आहार व रसायनाची व्यवस्था करावी लागेल. याच उद्देशाने दीपावली महोत्सवात खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. दिवाळीच्या फराळात असणाऱ्या अनारसे, करंजीसारख्या पदार्थांमुळे वीर्यवृद्धी पर्यायाने तेजवृद्धी होतेच.

शरीराबरोबरच मनाचेही आरोग्य उत्तम राहावे या दृष्टिकोनातून शरीराला व मनाला विश्रांती मिळण्याच्या हेतूने या महोत्सवात रोजच्या व्यवसायातून किंवा शालेय शिक्षणातून सुटी घेऊन स्वतःकडे लक्ष देण्याची योजना केलेली दिसते. तसेच, नवीन वस्त्रे धारण करणे, दागदागिने घालणे या गोष्टी शरीराला सजवण्याच्या दृष्टीने योजलेल्या दिसतात. मनाचे आरोग्य हे शांत चित्तवृत्तीबरोबरच प्रेमाविष्कारावर, तसेच इतरांशी जमवून घेण्याच्या व घेण्यापेक्षा देण्याच्या स्वभावावर अवलंबून असते. म्हणून आपल्याकडे पाहुण्यांना काही दिवसांसाठी वा भोजनासाठी आमंत्रित करणे, आपल्या इष्टमित्रांबरोबर सहलीला जाणे वगैरे कार्यक्रम आयोजित केलेले दिसतात. मनाची सर्वात अधिक शुद्धी दातृत्वाने होते व त्यामुळे माणसेही जोडली जातात म्हणून दीपावलीच्या निमित्ताने एकमेकांना भेट देण्याचा पायंडा शास्त्रोक्‍त पायावर उभा आहे असे दिसते.

दीपावली उत्सवाची सुरुवात पशुत्वावर विजय मिळाल्याप्रीत्यर्थ गोमातेच्या पूजनाने होते आणि शास्त्र व आप्तवचन यांना मान देण्यासाठी गुरुद्वादशीच्या पूजनाने होते.

शरीर तेजस्वी राहण्यासाठी औषधी वनस्पतींनी बनविलेले उटणे-उद्वर्तन लावून अप्रतिम आयुर्वेदिक तेलाने अभ्यंग मसाज घेण्याची पद्धत सुचविलेली दिसते. दीपावली हा प्रकाशाचा महोत्सव असल्याने शरीराचे तेज प्रकट व्हावे म्हणून दीप घेऊन ओवाळण्याची पद्धत आहे असे दिसते. म्हणून नरकचतुर्दशीच्या दिवशी अर्धे स्नान झाल्यावरपण ओवाळण्याची पद्धत आहे.

आपल्या आसपास असलेल्या जडवस्तू आपल्या जीवनात महत्त्वाच्या आहेत, त्यांच्याशिवाय आपले जीवन सुरळीत चालणार नाही. तसेच शरीर, संपत्ती येथेच सोडून जावे लागत असले, तरी जिवंत असेपर्यंत त्यांचे महत्त्व जाणून घेऊन धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन यांची योजना केलेली दिसते.

पाडव्याच्या दिवशी प्रेमाच्या संबंधासाठी, भाऊबिजेच्या दिवशी नातेसंबंधासाठी आणि या सर्व संबंधांना पावित्र्य मिळावे या हेतूने ओवाळण्याची योजना केलेली दिसते.

शरीरशुद्धी व तेजवृद्धी याने आत्मदीप प्रकट झाला, की एकूणच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रेमाची नाती अधिक दृढ होतात. भाऊ-बहीण हे रक्‍ताच्या नात्याचे अत्यंत पवित्र स्वरूप असून, त्यादृष्टीने बहीण-भावांचे प्रेम व्यक्‍त करण्यासाठी असते भाऊबीज. या दिवशी तेजवृद्धीला अधिक उजाळा मिळण्याच्या दृष्टीने बहीण भावाला ओवाळते व भाऊ बहिणीला भाऊ-बहिणीच्या नात्याचे, स्त्रीत्वाचे, स्त्रीच्या अपेक्षांचे रक्षण करण्याचे वचन देतो.

या दीपमहोत्सवामध्ये शक्‍तीचा प्रभाव अत्युच्च शिखरावर असतो. इतकेच नव्हे तर, न दिसणारी शक्‍ती प्रत्यक्ष दृश्‍यरूप प्रकाशापर्यंत पोचलेली असते. अशा वेळी प्रत्येक अणुरेणूत, जडवस्तूत असलेल्या परमेश्‍वराचे अस्तित्व, वस्तूला असलेल्या भावना आणि एकूण निसर्गचक्राचे गणित समजले, की तुळशीच्या लग्नामागचे रहस्यपण उलगडते. एकूणच हा दीपावली महोत्सव प्रत्येक व्यक्‍तीला आनंदाच्या उच्च शिखरावर तर नेतोच; पण भारतीय परंपरेलासुद्धा अत्युच्च स्थानावर प्रकाशमान करतो.

'फॅमिली डॉक्‍टर'च्या सर्व वाचकांस विक्रम संवत्‌ 2068 हे वर्ष व दीपावली महोत्सव संपूर्ण आरोग्याचा, उत्कर्षाचा, समृद्धीचा, मैत्री-शांती-आनंदपूर्ण जावो.
 
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Sunday, March 20, 2011

रंग अग्नीचे

हिरण्यकश्‍यपूपासून नरसिंहापर्यंतच्या सर्व कथानकापासून जणू प्रेरणा घेऊन आयुर्वेदाने अनेक उपचारपद्धतींची योजना केली असावी. स्वेदन चिकित्सेचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत, पण होलिका उत्सवातील स्वेदन चिकित्सेला तोड नाही.

उन्हाळा कोणालाच आवडत नाही. उष्णतेमुळे शरीरातील रस कमी होतो, आर्द्रता कमी होते. उष्णतेमुळे केवळ मनुष्याच्या शरीरातीलच नाही तर सर्व वनस्पतींमधील रसही कमी होतो. सूर्य मनुष्याच्या व वनस्पतींमधील रसाचे आकर्षण करून घेतो. जीवनरस कमी झाला की साहजिकच आयुष्यही कमी होते. झाडाची फांदी ओली असली की ती मोडायला त्रास होतो पण तीच फांदी वाळली की काडकन मोडते. उन्हाळ्यात घामाघूम होणे हा त्रास सर्वांनाच जाणवतो. त्यातून समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी, दमट हवेच्या ठिकाणी तर घामाचा त्रास सहन करण्याच्या पलीकडे असतो.

खाल्लेल्या अन्नाचा, पेयांचे पचन झाल्यावर त्यातील मलभाग शरीराबाहेर टाकावाच लागतो. विष्ठा, मूत्र या रूपाने सर्वाधिक मलभाग बाहेर जातो परंतु कानात, नाकात येणारा मळ किंवा घाम हा सुद्धा बाहेर जावा लागतो. घाम येण्यामुळे शरीर थंड होण्यासाठी मदत मिळते. उष्णतेमुळे शरीरातील चलनवलन वाढले, रक्‍ताभिसरण वाढले व त्वचा प्रसरण पावली की घाम येणे सोपे होते.

ह्याच तत्त्वाचा उपयोग करून शरीरात साठलेला मलभाग सैल करून घामाच्या माध्यमातून शरीराबाहेर घालवणे हा उपचार करता येतो. शरीरशुद्धीसाठी व कायाकल्पासाठी सांगितलेली पंचकर्म क्रिया म्हणजेच शरीरशुद्धीची प्रक्रिया. ह्यात विरेचनामार्फत, वमनामार्फत किंवा बस्तीमार्फत शरीर शुद्ध करता येते. परंतु मुळात त्यासाठी शरीरात लपलेला दोष, आमद्रव्य किंवा विष सैल करून मुख्य प्रवाहात आणून नंतर ते बाहेर ढकलणे आवश्‍यक असते. म्हणून शरीराला अभ्यंग करून स्वेदनपेटिकेचा उपयोग केला असता शरीराच्या त्वचेवरील रंध्रे उघडून त्यातून घामाद्वारे मलभाग बाहेर टाकता येतो. स्वेदनपेटिका म्हणजे एका बंद पेटिकेत व्यक्‍तीला डोके बाहेर राहील असे बसविल्यानंतर आत वाफ सोडली जाते. ही वाफ सर्व शरीरावर काम करते व स्वेदन होण्यास मदत करते. या वाफेत औषधी तेले टाकली तर अधिक उपयोग होताना दिसतो. सर्दी झालेली असताना सुंठ, गवती चहा, तुळशीची पाने वगैरे पाण्यात टाकून वाफारा घेतल्यास सर्दी वितळवून बाहेर काढता येते असा अनुभव सर्वांना असतोच.

शिशिर ऋतूत साठलेला कफ पातळ होऊन वसंत ऋतूत बाहेर यायला लागला की होणारा त्रास सर्वांच्याच परिचयाचा असतो. हा त्रास कमी करण्यासाठी आयुर्वेद व भारतीय संस्कृती यांनी एकत्रित विचार करून उपाययोजना म्हणून आयोजन केलेले आहे होलिका उत्सवाचे. तसेही सोप्या पद्धतीने, सामुदायिक रीत्या, अनेक लोकांना उपयोग होईल अशा प्रकारचे स्वेदन करण्यासाठी आयुर्वेदाने होळीत पेटविलेल्या अग्नीसारखीच व्यवस्था सुचविलेली आहे.

सध्या आधुनिक सौना पद्धतीत संपूर्ण बंद खोलीत व्यक्‍तीला बसवून उष्णता निर्माण केली जाते वा वाफ सोडली जाते, पण हे आयुर्वेदाला मान्य नाही. कारण मूत्रपिंडांच्या ठिकाणी व डोक्‍याच्या भागाला कुठल्याही प्रकारे अधिक उष्णता लागू नये हा संकेत त्यात मोडला जातो. डोक्‍याला उष्णता लागू नये या हेतूने डोक्‍यावर ओला टॉवेल ठेवला तर एक वेगळाच उपद्रव होण्याची शक्‍यता असते. म्हणून उघड्या जागेत वर छत असेल पण मध्यभागी त्याला एक भोक उघडे ठेवलेले असेल व संपूर्ण गोलाकार सर्व बाजूंनी साधारणतः एक मीटरभर उंचीची भिंत बांधून व्यवस्थित आडोसा केलेला असेल अशा तऱ्हेने, मध्यभागी अग्नी पेटवून सर्वांनी अग्नीभोवती गोलाकार बसावे अशी योजना केलेली असते म्हणजे साधारणतः शरीराला व्यवस्थित उष्णता लागते. डोके रुमाल किंवा टोपीने झाकून ठेवायचे असते, तसेच जाड आवरण येईल असा रुमाल वगैरे मूत्रपिंडांच्या भोवती बांधून बसायचे असते.

ही व्यवस्था म्हणजे आयुर्वेदाची एक होलिकोत्सवाची ही आवृत्ती आहे असे लक्षात येते. होळीच्या कथेतील होलिका राक्षसीला असा वर मिळालेला असतो की तुला अग्नीपासून भय नाही. म्हणून तिने प्रल्हादाला म्हणजे सात्त्विकतेला स्वतःच्या बरोबर घेऊन अग्नी पेटवून घेतला जेणेकरून प्रल्हादाला मृत्यू येईल ही कल्पना. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्‍यपूने होलिका राक्षसीबरोबर ठरविलेले हे षड्‌यंत्र होते. पण झाले भलतेच, प्रल्हाद जिवंत राहिला आणि होलिका मात्र जळून गेली. नेहमीच सात्त्विकता शिल्लक राहते व पाप नष्ट होते.

याच प्रमाणे स्वेदनोपचाराद्वारे शरीरातील आवश्‍यक यंत्रणा शिल्लक राहते व दोष जळून जातात. 15-20 मिनिटे स्वेदन झाल्यावर शरीर कोरडे करून शांतपणे विश्रांती घ्यावी अशी अपेक्षा असते. स्वेदनाच्या वेळी आत किती तापमान असावे हे रुग्ण व उपचार करणाऱ्याने परिस्थिती पाहून ठरवायचे असते. तसेच वाफेबरोबर कुठले औषधी द्रव्य योजावे हे रुग्णाच्या प्रकृतीनुसार ठरविता येते. स्वेदनाचा फायदा प्रत्येक रुग्णाला होतो. स्वेदन हे एक पंचकर्मापूर्वीचे आवश्‍यक असलेले पूर्वकर्म आहे. परंतु विरेचन, वमनसहित पंचकर्म करायचे नसेल तरी अधून मधून बाष्पस्वेदन व अभ्यंग करण्याने तारुण्य राखण्यास किंवा आरोग्य राखण्यास खूप मदत होते.

हिरण्यकश्‍यपूपासून नरसिंहापर्यंतच्या सर्व कथानकापासून जणू प्रेरणा घेऊन आयुर्वेदाने अनेक उपचारपद्धतींची योजना केली असावी. स्वेदन चिकित्सेचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत, पण होलिका उत्सवातील स्वेदन चिकित्सेला तोड नाही. तसेच रंगारंग उत्सवामुळे येणाऱ्या वसंतोत्सवाचे स्वागत करून नवतारुण्याच्या व चैतन्याच्या अनुभवाचा आनंद ही तर सर्वात मोठी चिकित्सा. फक्‍त उधळण्याचे रंग नैसर्गिकच असावेत.

ad