कशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.
परिस्थितीत होणारा बदल कमी जास्त प्रमाणात ताण निर्माण करतो. या बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता महत्त्वाची असते. या क्षमतेतील त्रुटी तणाव निर्माण करते. हा बदल कधी कधी तुलनेने नगण्यही असू शकतो. कधी तर झालेला किंवा होऊ घातलेला बदल किफायतशीरदेखील असू शकतो (जसे बढती मिळणे व बदली होणे), अशा कोणत्याही बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता कमी असण्याने माणसाच्या मनोशारीरिक अस्तित्वात विकार होऊ शकतात. कशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.
तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगाचा प्रकार वयोमानानुसार बदलू शकतो. पौगंडावस्थेत आपल्या पालकांच्या अपेक्षा, तारुण्यात वैवाहिक साथीदारांसंबंधीची मिलनोत्सुकता, पुढे कामातील वरिष्ठांशी संबंध, आर्थिक स्वास्थ्य-सुबत्ता मिळण्याची आणि ती कमावण्याकरिता करावी लागणारी धडपड, पुढे वैवाहिक जोडीदाराबरोबर सलोख्याचे स्नेह-संबंध टिकणे, वयस्कर वाड-वडिलांच्या प्रकृतीच्या समस्यांना सांभाळणे, लहान मुलांचे बेशिस्त वागणे, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होताना पाहणे, वार्धक्याबरोबर येणारी शारीरिक आणि आर्थिक तूट, याबरोबर घसरणारी कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठा आणि नेहमीच असणारी, परंतु वार्धक्यात विशेषतः जाणीव होत राहणारी मृत्यूची भीती, ही सारी कमी-जास्त प्रमाणात तणाव निर्माण करणारी कारणे प्रत्येक व्यक्तीत असू शकतात. या कारणांना वास्तवात जाणणे, वास्तव स्वीकारणे आणि वास्तवाचा उपभोग घेण्याची क्षमता जोपासणे, हे खऱ्या समृद्ध मनाचे लक्षण होय.
तणावामुळे व्यक्ती चिंतातुर अथवा खिन्न होऊ शकते. अनेकांना शारीरिक लक्षणे उद्भवतात. काही जणांची वृत्ती समस्यांपासून पलायन करण्याची असते. अशा व्यक्ती मद्यपाशात स्वतःला झुगारून देतात किंवा अतिरेकी खातात व स्थूल बनतात किंवा जुगार, रेस अथवा पत्ते खेळणे, अशा वास्तवातून पलायनाच्या मार्गाला लागतात. बहुतेकांना तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगांच्या पुनरावृत्तीचे भय वाटत राहते. (जसे परीक्षा, सभेत भाषण करणे, मुलाखत देणे) काहींना क्रोध येत राहतो (अपेक्षा भंग होणे) काहींना अपराधीपणाची भावना येत राहणे (आपल्या हातून चूक घडली याचा पश्चात्ताप, ‘पाप’ घडल्याची टोचणी) काहींना घडून गेलेल्या घटनेबद्दल शरम वाटत राहते, (आपल्या कृत्यांबद्दल अथवा इतरांनी केलेल्या आपल्या ‘अपमाना’बद्दल) अशी भीती, राग, अपराधीपणाची भावना, लाज वाटणे इत्यादी भावना ज्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रसंग घडताना
निर्माण होतात, त्याचप्रमाणे त्या त्या प्रसंगाच्या आठवणीनेदेखील जशाच्या तशाच निर्माण होतात. या भावनांमुळे व्यक्ती अस्वस्थ होते. माणसाची चिडचिड होते, स्वभाव रागीट किंवा चिडका बनतो, अकारण थकवा येतो, लहान सहान गोष्टींनी (आवाजामुळे) दचकावयाला होते आणि आपण तणावाखाली असण्याची जाणीव होते. या तणावामुळे एकाग्रता शक्य होत नाही, मनात विचारांचे वारू बेलगाम संचार करू लागतात, झोपेत व्यत्यय येऊ लागतो (झोप लागण्यास वेळ लागतो, जाग लवकर येते, सारखी जाग येते) अस्वस्थ करणारी स्वप्ने पडू लागतात. आपण आजारी आहोत, या भावनेने व्यक्ती पछाडली जाते, स्वतःला योग्य वाटेल ती औषधे (विनाकारण) घेण्याकडे कल होऊ लागतो. व्यसनाधीनता बळावते. प्रत्यक्ष त्रास होत असल्याने विविध तपासण्यांत फारसा दोष सापडत नाही, याचे नवल वाटू लागते.
बदलांना स्वीकारताना होणारे त्रास हे ‘चिंतातुर’तेपेक्षा वेगळे असतात, याचे ध्यान ठेवावे. शिवाय, इतर मानसिक आजार किंवा स्वभाव-दोष यांपासूनदेखील या परिस्थितीशी ‘जुळवून घेण्यातील त्रुटी’ने होणारे दोष वेगळे असतात. काही शारीरिक आजारांबरोबर आलेल्या मानसिक आजारांचीदेखील दखल घेणे आवश्यक असते. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेतील त्रुटीमुळे होणारे त्रास ती परिस्थिती बदलली (परीक्षा किंवा मुलाखत होऊन गेली) की आपोआप शमतात, तसे मानसिक विकारांचे होत नाही. परिस्थिती स्वीकारली म्हणजे जुळवून घेण्याचा प्रश्न मागे राहात नाही. परिस्थितीत बदल झाल्यावर येणारे विकार होण्यास जबाबदार असणारा परिस्थितीतील बदल न्यायालयांचे समन्स येणे, मिलनोत्सुक प्रेमसंबंधात विधान होणे) ओळखता येतो. साधारणपणे अशा घटनेचे परिणाम जेव्हा सहा महिने होतात, तेव्हा या तणावांना तीव्र प्रकारचे म्हटले जाते आणि जेव्हा जास्त काळ (अथवा कायम) होत राहणारा त्रास हा दीर्घकाळ चालणारा त्रास मानला जातो.
अशा बदलामुळे आलेल्या घटनांच्या उपचारात विविध प्रकारचे उपाय करणे उपयोगी पडते. सुरवात काही क्रियांपासून करणे इष्ट असते. बरीच माणसे श्वास भरभर घेऊ लागतात; परिणामी, रक्तीतील कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हातापायांच्या बोटांना मुंग्या येतात, नाक व चेहरा किंवा कान येथेही अशा संवेदना जाणवतात. या संवेदनामुळे व्यक्ती आणखीनच भयभीत होते. शरीरक्रियांच्या अज्ञानातून उद्भवलेल्या भीतीचे निराकरण करून तक्रार लगेच दूर करण्यासाठी अशा व्यक्तीला एखाद्या (बंद) कागदाच्या पिशवीत श्वासोच्छवास करावयास सूचना द्याव्यात. थोड्याच श्वसनानंतर मुंग्या येणे थांबेल, भीती जाईल, मग कागदी पिशवी काढावी.
कोणत्याही कारणाने माणसाने श्वास भराभर घेतला तरी त्याच्या रक्तातील कार्बन-डाय ऑक्साइडचा निचरा होतो. असा निचरा प्रमाणाबाहेर झाल्याने हातापायांना मुंग्या येतात. शिवाय, काही रक्तवाहिन्यांचे आकुंचन होणेही संभवते. आपल्या मेंदूतील टेंपोरल लोब या भागात अशा प्रकारे रक्तवाहिन्यांच्या आकुंचनामुळे प्राणवायूचा पुरवठा कमी पडणे शक्य होते. परिणामी, त्या व्यक्तीलाकाही प्रकारचे ‘भास’ होणे शक्य आहे. याची माहिती प्राणायामातील ‘भास्त्रिका’ हा प्रकार करणाऱ्या साधकांना असावी.ज्या व्यक्तींना विशिष्ट बदलांमुळे तणाव येतो याची कल्पना असते किंवा देता आली तर अशा प्रसंगांना कसे तोंड द्यावे, याचे समुपदेशन उपयोगी पडते. तणावांची जाणीव होऊ लागताच शवासनासारखे शरीर सैल करणे व श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून इतर सर्व विचार करण्याकरिता मन मोकळे न ठेवणे याचाही उपयोग होतो. हा एका प्रकारे जागृत मन विचाररहित ठेवण्याचा (ध्यानाचा) प्रयत्न होय.
काही सामाजिक परिस्थितीचा परिणाम तणाव निर्मितीत होणे शक्य असते. काहींना गर्दीत जाणे नको वाटते, काहींना नव्या ओळखी करून घ्याव्याशा वाटत नाहीत, व्यासपीठावर जाण्याची अकारण भीती काहींना असते, अशा सामाजिक प्रसंगांना ओळखणे महत्त्वाचे ठरते. या प्रसंगांतून बाहेर पडताना सुरवात अगदी माफक (दोन-तीन माणसे) आकड्यापासून सुरवात करून (किंवा तशी कल्पना करून) त्या प्रसंगांना तोंड देण्याची मनाची तयारी केली जाते. काही वेळा मोठे बदल करावे लागतात. (उदा. नोकरी बदलणे) परंतु, हे निर्णय पूर्ण विचारांच्या नंतरच घ्यावेत.
मानसोपचार क्वचितच लागतो; परंतु समुपदेशन उपयोगी पडते. मनाला भविष्यकाळ किंवा भूतकाळांतील घटनांच्या विचारांत गुंतण्याची सवय लागलेली असते. त्याऐवजी मनाला वर्तमानकाळात आणि आताच्या परिस्थितीत राहण्याचा सराव करणे उपयुक्त ठरते. चिंता ही नेहमीच भवितव्याशी संबंधित तर अपराधीपणा हा नेहमीच भूतकाळात घडलेल्या घटनांबद्दल असतो, याची जाणीव ठेवावी.
काही औषधांचा वापरदेखील उपयोगी ठरतो. अर्थात, कोणत्याही औषधांचा वापर त्या संबंधात ज्ञान आणि वापरण्याचा अनुभव असणाऱ्या (डॉक्टर) व्यक्तीनेच करावा. पूर्वी आपल्याला बरे वाटले होते, हा अनुभव किंवा केवळ सद्हेतूने सुचविलेले औषध घेणे केवळ निरुपयोगीच नव्हे, तर अपायकारकही ठरू शकते, याचीदेखील जाणीव असावी. अनेक औषधांना नको असणारे परिणाम असतात, कधी कधी हे नको असणारे परिणाम गंभीर परिणाम करू शकतात, घातकही ठरू शकतात. यासंबंधात अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधून प्रसिद्ध झालेल्या एका शोध-निबंधातील माहिती दखलपात्र आहे. सलग दाखल झालेल्या सहाशे रुग्णांना ‘उपचाराचा’ झालेला त्रास अभ्यासला गेला तेव्हा असे आढळले की, या ६०० पैकी २९० रुग्णांना उपचारांचा काहींना काही त्रास झाला. यापैकी ७७ रुग्णांना गंभीर दुखणे झाले, तर १५ रुग्ण त्यांच्या आजारांनी नव्हे, तर उपचारांच्या दुष्परिणामांनी दगावले! लोरॅझिपॅम ०.५ ते १.० मिलीग्रॅम दिवसातून दोन वेळा असे उपयोगी पडणारे औषध डॉक्टरांच्या नजरेखाली मर्यादित काळापुरते फायदेशीर ठरू शकते.
सहसा योग्य समुपदेशन व रुग्णाला आजाराच्या स्वरूपाचे ज्ञान देऊन भीती घालविण्याने बरेच रुग्ण बरे होतात. उशिरा केलेले किंवा चुकीचे उपचार, आजार रेंगाळवतात व दीर्घकाळ चालू राहिलेले आजार एकदा जुनाट झाले की बरे होणे कठीण होते.
No comments:
Post a Comment