Thursday, February 4, 2016

आरोग्यासाठी प्रसन्न मन -3

- डॉ. श्री. बालाजी तांबे
शारीरिक रोगांच्या आधी मनोरोग असावेत. कारण शरीरात रोग येण्यासाठी कारण मनच असते. या मनोरोगात अगदी शेवटचा रोग म्हणजे उन्माद. मनाचे आरोग्य उत्तम असणाऱ्या शंकराचार्य, गौतम बुद्ध, महावीर, येशू ख्रिस्त यांच्यासारख्या व्यक्‍ती जन्मजन्मांतराने एकेका युगात एखादीच झालेली दिसते. मनोरोग नाही अशी व्यक्‍ती सापडणारही नाही आणि मनोरोग असलाच तर तो बरा करणे हे काम महाकर्मकठीण आहे. मनोरोग कुठल्या प्रकारचा आहे व तो कशाप्रकारे प्रकट होतो आहे, त्याची वाटचाल सावकाश आहे की जलद आहे, तो उन्मादाच्या अवस्थेला कधी पोचेल हे सर्व गणित अवघड असते. आपल्या चिंतनाने, ध्यानाने, हवनाने एक वेळ देव प्रसन्न होईल, पण मन प्रसन्न होणे खूप अवघड आहे.

संपूर्ण निरोगी, आरोग्यवान, तेजःपुंज, स्वस्थ मनुष्य ही कल्पना केवळ व्याख्येपुरती आहे का? अशा तऱ्हेची व्यक्‍ती खरोखर अस्तित्वात आहे असे कोणी सांगितले तर, या विधानावर बहुतेक वेळा विश्‍वास ठेवला जाणार नाही. प्रत्येकाला काही ना काही बारीक-सारीक त्रास असतोच. सर्दी-पडसे, गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर थोडा वेळ डोळे चुरचुरणे, कधी तरी एखादा दिवस झोप न येणे किंवा ताप येणे अशा बारीक-सारीक तक्रारी तरी असतातच. काही नाही तर कानदुखी, दाढदुखी अशा तऱ्हेचा एखादा त्रास असू शकतो. सर्वतोपरी आरोग्यवान असलेल्या स्त्रीला पाळी वेळेवर न येणे, अंगावरून कमी-अधिक जाणे असा एखादा त्रास असू शकतो. याचे कारण काय असावे याचा विचार करावा लागेल. 

ऋषी-मुनींनी, भारतीय शास्त्रज्ञांनी भारतीय परंपरेप्रमाणे स्वभावधर्मानुसार, लोककल्याणार्थ खूप संशोधन करून शरीराविषयी, आरोग्याविषयी स्वच्छ कल्पना लिहून ठेवलेल्या आहेत. जगातील प्रत्येक वस्तुमात्राचा उपयोग आरोग्यासाठी कसा करता येईल हेही भारतीय शास्त्रज्ञांनी सांगून ठेवलेले आहे. असे असताना माणसाला आरोग्य का टिकवता येऊ नये? रोगाच्या व्याख्या जरा अवघडच वाटतात. म्हणजे मनुष्याला चारचौघात वावरता येणार नाही, त्याची उपस्थिती आजूबाजूच्या चारचौघांना उपद्रव ठरेल अशा प्रकारच्या एका मानसरोगाचे नाव आहे उन्माद. उन्मादाची व्याख्या करताना मस्तकात मद गेल्यामुळे होणारा अवरोध, त्यातल्या त्यात मनोनाडीत होणारा अवरोध असे आयुर्वेदात सांगितलेले दिसते. हा मद कुठे आहे, कुठे आहे मेदोरोग, कुठे आहे उन्माद हे समजायला आपल्याला बराच अभ्यास करावा लागेल. शारीरिक रोगांच्या आधी मनोरोग असावेत. कारण शरीरात रोग येण्यासाठी कारण मनच असते. या मनोरोगात अगदी शेवटचा रोग म्हणजे उन्माद. त्याच्या आधी अनेक  प्रकारचे मनोरोग सांगितलेले आहेत. आयुर्वेदानुसार मनुष्य म्हणजे केवळ एक ६०-७० किलोचे शरीर, ज्यात हाड, मांस, मेद, मज्जा, रक्‍त, रस व वीर्य हे सर्व घटक असतात असे नव्हे. शरीर म्हणजे हे सर्व घटक असे म्हणणे एखाद्या वस्तूत अमुक तमुक घटक आहेत असे मोघम सांगण्यासारखे आहे. सर्व गंमत आहे ती गणिताची. अन्न खाल्ल्यावर रस तयार होतो, पण कोणी किती अन्न खावे, आपापल्या वजनाच्या हिशेबात खावे, की भुकेच्या हिशेबात खावे, अन्नाच्या प्रकारानुसार त्याचे प्रमाण कमी-जास्त व्हावे की प्रसंगानुसार कमी-जास्त व्हावे? शेवटी आयुष्य संख्येने बांधले जाणारच असते. शरीराचे घटक असलेले सात धातू अन्नामधूनच तयार होतात. त्यामुळे कोणत्या प्रकारचे अन्न विशिष्ट शरीरघटक तयार करण्यासाठी उपयोगी ठरतात हे शोधून काढून त्यानुसार आहार ठरविला तर आरोग्यासाठी उपयोगी ठरेल असे आपल्याला वाटू शकते. परंतु आपल्या शरीरात व्यक्‍तिगत फरकाने किती रस असावा, किती रक्‍त असावे वगैरे मर्यादा कोठे माहीत आहेत? 

याच्याही पेक्षा कळायला अवघड असतात ते मनोदोष. मनाचे आरोग्य उत्तम असणाऱ्या शंकराचार्य, गौतम बुद्ध, महावीर, येशू ख्रिस्त यांच्यासारख्या व्यक्‍ती जन्मजन्मांतराने एकेका युगात एखादीच झालेली दिसते. मनोरोग नाही अशी व्यक्‍ती सापडणारही नाही आणि मनोरोग असलाच तर तो बरा करणे हे काम महाकर्मकठीण आहे. मनोरोग कुठल्या प्रकारचा आहे व तो कशाप्रकारे प्रकट होतो आहे, त्याची वाटचाल सावकाश आहे की जलद आहे, तो उन्मादाच्या अवस्थेला कधी पोचेल हे सर्व गणित अवघड असते. 

म्हणून रोगांची व्याख्या करण्याआधी आयुर्वेदाने स्वास्थ्याची व्याख्या केलेली आहे, ती अशी, 
समदोषः समाग्निश्‍च समधातुमलक्रियः। 
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थमित्यभिधीयते ।। 

वात-पित्त-कफ वगैरे दोष यांचे गणित, हे गणित शास्त्रातील अवघडातील अवघड शाखेचे गणित असावे. कारण वात-पित्त-कफदोष या संकल्पना आहेत, पदार्थ नव्हेत. रस, रक्‍त वगैरे सप्तधातूंचे गणितही अवघड असते. यानंतर येतो तो सम अग्नी. जाठराग्नी किंवा सर्व धातूत अग्नी असतात असे थोडेफार माहीत असते व त्यावरच समाधान मानले जाते. हा अग्नी काय करतो, कुठे असतो? अग्नी धनसंपदा देणारा आहे अशी त्याची व्याख्या केलेली असल्यामुळे तो शरीररूपी धन देणारा आहे. वीर्यातून स्फोट झाल्यावर उत्पन्न होणारे ओज म्हणजे प्रकाश, तसे या अग्नीच्या शक्‍तीद्वारा घडलेल्या कर्मातून उपलब्ध होणारे धनच शरीरालासुद्धा अग्नीत शुद्ध करून तेजस्वी व मजबूत बनविणारे, व्यक्‍तिमत्त्वाची धार अत्यंत सूक्ष्म करणारे असे हे अग्नितत्त्व. अनेक वेळा लोखंडावर अग्निसंस्कार करून तलवारीला धार केली जाते, तसे शरीरातील अग्नी शरीराला व मनाला धारदार बनवितात. म्हणजेच शरीरातील अग्नी व्यवस्थित असला तर व्यक्‍ती रुबाबदार असते, त्याची शरीरसंपदा उत्तम असते, त्याचे कर्म समाजोपयोगी असते, त्याच्याबरोबर आलेली बाह्यसंपदा म्हणजे समृद्धी वगैरे उत्तम असते. हा सर्व विचार करणे आवश्‍यक आहे. अग्नी दूषित झाल्यानंतर उन्माद नक्की ठरलेला आहेच. उन्मादामुळे अग्नी जास्त प्रदीप्त होतो, त्यामुळे उन्मादाचा वेग आला की माणसे कोसळतात, कारण अशा वेळी त्यांच्या शरीरात अग्नी उरलेला नसतो. 

यानंतरच्या ‘प्रसन्नात्मेन्द्रियमनाः’ या शब्दात आत्मा, इंद्रिये व मन यांचा उल्लेख केलेला आहे. आपल्या चिंतनाने, ध्यानाने, हवनाने एक वेळ देव प्रसन्न होईल, पण मन प्रसन्न होणे खूप अवघड आहे, मन प्रसन्न होण्यासाठी मुळात त्याची भेट तर व्हायला पाहिजे!! भल्याभल्यांची स्वतःच्या मनाशी भेट होत नाही. पायाला भिंगरी लागलेल्या व्यक्‍तीला सतत प्रवास करावा लागतो, तसे मनरूपी भिंगरी सतत भिरभिरत असते. ती एका जागी स्थिर राहात नाही, उलटी फिरते, सुलटी फिरते, फिरत आहे असे भासते तेव्हा ती फिरत असते आणि फिरत आहे असे भासते तेव्हा स्थिर असते. अशी ही मनभिंगरी प्रसन्न कशी होणार? मन प्रसन्न असणे, त्यानंतर इंद्रिये प्रसन्न असणे आवश्‍यक आहे. (क्रमशः)
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad