रोगाचे निदान तसेच उपचार करताना, विशेषतः पंचकर्मासारखे उपचार करताना व्यक्तीची मनोवृत्ती लक्षात घेणे आवश्यक असते. कारण श्रेष्ठ मनोवृत्तीच्या व्यक्तीला कितीही त्रास होत असला, तरी त्याची सहनशक्ती मोठी असल्याने तो त्रासाचे वर्णन होत असल्यापेक्षा कमी करेल. याउलट हीन, दुर्बल मनोवृत्तीच्या व्यक्ती राईचा पर्वत करून सांगण्याचा प्रयत्न करतील. रक्तमोक्षण, अग्निकर्म, क्षारकर्मासारखे अवघड उपचार हीन सत्त्वाच्या व्यक्तीला करणे बहुधा अशक्य असते. श्रेष्ठ मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तीवर उपचार करणे व रोगातून बरे करणे त्यामानाने सोपे असते. सहसा अशा व्यक्तींची मूळची ताकद, प्रतिकारशक्ती व इच्छाशक्ती चांगली असल्याने त्यांना रोग होण्याची शक्यताही कमीच असते.
हीन सत्त्व म्हणजे दुर्बल मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्ती स्वतः स्वतःला तर धीर देऊ शकत नाहीतच, पण दुसऱ्याने समजावले तरी मनाची वृत्ती बदलवू शकत नाहीत. संकटात यांचे मन अगदीच कावरेबावरे होते. भीती, शोक, लोभ, मोह, अहंकार यांचा या व्यक्तींच्या मनावर मोठा पगडा असतो. छोट्या मोठ्या प्रसंगांनाही सामोरे जाणे, धैर्यपूर्वक मार्ग काढणे यांच्यासाठी अवघड असते. एखादी भयानक, अप्रिय, तिटकारा असणारी विकृत कथा ऐकल्यास किंवा पाहिल्यास, तसेच पशू किंवा मनुष्याचे रक्त पाहिल्यास यांना मनात विषाद उत्पन्न होतो. मनावर परिणाम होऊ शकतो किंवा घेरी येऊन भान हरपू शकते. कधी कधी तर यामुळे मृत्यूही ओढवू शकतो.
रोगाचे निदान तसेच उपचार करताना, विशेषतः पंचकर्मासारखे उपचार करताना व्यक्तीची मनोवृत्ती लक्षात घेणे आवश्यक असते. कारण श्रेष्ठ मनोवृत्तीच्या व्यक्तीला कितीही त्रास होत असला तरी त्याची सहनशक्ती मोठी असल्याने तो त्रासाचे वर्णन होत असल्यापेक्षा कमी करेल. याउलट हीन, दुर्बल मनोवृत्तीच्या व्यक्ती राईचा पर्वत करून सांगण्याचा प्रयत्न करेल. रक्तमोक्षण, अग्निकर्म, क्षारकर्मासारखे अवघड उपचार हीन सत्त्वाच्या व्यक्तीला करणे बहुधा अशक्य असते. श्रेष्ठ मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तीवर उपचार करणे व रोगातून बरे करणे त्यामानाने सोपे असते. सहसा अशा व्यक्तींची मूळची ताकद, प्रतिकारशक्ती व इच्छाशक्ती चांगली असल्याने त्यांना रोग होण्याची शक्यताही कमीच असते.
मन, आत्मा आणि शरीर यापैकी मन सर्वांत महत्त्वाचे कारण मनच आत्म्याशी संयुक्त होऊन संपूर्ण शरीराचे नियमन करत असते. म्हणूनच आपली भावनिकता, एखाद्या बिकट प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, आवड-निवड वैगरे सर्व भाव मनाच्या शक्तीवरच अवलंबून असतात. मनाची शक्ती मानसिकतेवरून ओळखता येते. आयुर्वेदाने मनाच्या शक्तीवरून मनाचे तीन भाग केले आहेत.
तत्र त्रिविधं बलभेदेन - प्रवरं, मध्यमं, अवरं चेति ।
अतश्च प्रवरमध्यावरसत्त्वाः पुरुषाः भवन्ति । ....चरक विमानस्थान
१ - प्रवरसत्त्व पुरुष (आत्मतत्त्व) म्हणजे उत्तम मनशक्ती असणाऱ्या व्यक्ती.
२ - मध्यमसत्त्व पुरुष म्हणजे मध्यम मनशक्ती असणाऱ्या व्यक्ती.
३ - अवरसत्त्व पुरुष म्हणजे हीन (कमी) मनशक्ती असणाऱ्या व्यक्ती.
प्रवर अर्थात श्रेष्ठ मनःशक्ती असणारी व्यक्ती शरीराने बलवान असली-नसली तरी मनाने खंबीर असते. शरीरातील वात-पित्त-कफातील असंतुलनामुळे किंवा बाह्य आघातामुळे कितीही कठीण प्रसंग ओढवला तरीअशी व्यक्ती हडबडून किंवा गोंधळून जात नाही. प्रवर सत्त्ववान व्यक्ती उत्तम स्मरणशक्ती असणाऱ्या बुद्धिमान व उत्साही असतात, भक्तिभावाने संपन्न, कृतज्ञ, पवित्र तसेच धीर धरू शकणाऱ्या त्या असतात. प्रसंगी पराक्रम करून दाखविणाऱ्या असतात, त्यांच्या ठिकाणी विषादाचा लवलेश नसतो, त्यांची गती सुव्यवस्थित असते. धडपडणे, ठेच लागणे, अडखळणे अशा गोष्टी त्यांच्याकडून होत नाहीत. त्यांची विचारसरणी व हालचाली गंभीर (म्हणजे सुसूत्रतापूर्ण) असतात. त्यांचे मन आणि बुद्धी सातत्याने कल्याणाच्या मार्गाचाच विचार करत असतात.
मध्यम म्हणजे साधारण मनःशक्ती असणारी व्यक्ती दुसऱ्याच्या आधाराने किंवा दुसऱ्याने आश्वस्त केले की, परिस्थितीशी सामना करण्यास तयार होते. अशा प्रकारे मानसिकतेवरून मनाचे तीन विभाग केले असले तरी मनाची शक्ती वाढवता येणे शक्य असते. ही मानसशक्ती तीन प्रकारची असते. धी, धृती आणि स्मृती या तिन्ही मानसशक्ती नीट समजून घेतल्या आणि त्यांना अधिकाधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला तर मनाचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.
धी-धी म्हणजे मेधा व बुद्धी.
धारणावती धीः मेधा ।...चरक सूत्रस्थान
कोणतीही गोष्ट आकलन करण्याचे, समजून घेण्याचे काम मेधा करते. आपली प्रकृती काय आहे, प्रकृतीला अनुरूप आहार-आचरण म्हणजे नेमके काय हे समजून घेणारी मेधा असते. मेधा ही स्मृतीच्या अलीकडची पायरी असते. एखादी गोष्ट समजली तरच ती नंतर लक्षात राहू शकते.
निश्चयात्मिका धीः बुद्धिः ।...सुश्रुत शारीरस्थान
एखाद्या विषयाचे निश्चित, नेमके व खरे ज्ञान करून देते ती बुद्धी. मनाच्या द्विधा अवस्थेतून एका निर्णयाप्रती आणते ती बुद्धी. उदा. तापातून नुकत्याच उठलेल्या व्यक्तीला आइस्क्रीम खाण्याची इच्छा झाली तरी बुद्धी त्याला या अवस्थेत आईस्क्रीम खाणे बरोबर नाही हा निर्णय देत असते. एखादा विषय व्यवस्थित मुळापर्यंत नीट समजून ज्ञात करून घेणारी बुद्धी असते. त्यामुळे स्वतःची प्रकृती व्यवस्थित समजून घेणे, आपल्या प्रकृतीला चांगले काय, वाईट काय हे अगदी पक्के जाणून घेणे हे बुद्धीवर अवलंबून असते. प्रकृतीमध्ये काही बदल होत असला, असंतुलन होत असले तर तेही बुद्धीलाच कळू शकते.
मेधा तसेच बुद्धीने विषय आकलन केला, त्याचे व्यवस्थित ज्ञान करून घेतले, त्यानुसार अचूक निर्णय घ्यायला मदत केली तरी बुद्धीने दिलेला निर्णय कायम ठेवून योग्य ती गोष्ट करण्यास मनाला प्रवृत्त करणारी असते ती धृती.
नियमात्मिका बुद्धिः धृतिः ।...सुश्रुत शरीरस्थान
नुकताच ताप येऊन गेला आहे, अशा अवस्थेत आईस्क्रीम खाणे योग्य नाही असा बुद्धीने निर्णय दिला तरी, आइस्क्रीमच्या मोहात अडकलेल्या मनावर संयम ठेवण्याची जबाबदारी धृतीची असते.
धृतीप्रमाणेच स्मृतीचेही योगदान महत्त्वाचे असते.
अनुभवजन्य ज्ञानं स्मृतिः ।
एखादी गोष्ट वाचली, ऐकली आणि ती लक्षात ठेवली म्हणजे ज्ञान झाले असे नाही. माहिती व ज्ञान या दोन्ही गोष्टींमध्ये मोठा फरक असतो. मिळालेल्या माहितीचा अनुभव घेतलेल्याशिवाय त्याला ज्ञान म्हणता येत नाही. अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची आठवण स्मृतीमुळे राहते. मागच्या वेळी आइस्क्रीम खाल्ले होते तेव्हा त्रास झाला होता ही अनुभवजन्यआठवण असली तरच आइस्क्रीमसमोर असूनही खाणे बरोबर नाही हा निर्णय ठाम राहू शकतो. अनुभव मनुष्याला शिकवतो, शहाणे करतो असे म्हटले जाते, ते स्मृतीच्या जोरावरच! नुसती माहिती असली तर ती योग्य वेळी आठवेल न आठवेल याची खात्री देता येत नाही. अनुभव गाठीशी असला तर तो निश्चितपणे मार्गदर्शन करू शकतो.
अशाप्रकारे धी सारासार विचार करून निर्णय देण्याचे काम करते, धृती अहितापासून दूर ठेवणारी असते तर स्मृती वेळेवर पूर्वीचा अनुभव लक्षात आणून सावध करण्याचे काम करते. जोपर्यंत या तिन्ही मानसशक्ती कार्यरत असतात, तोपर्यंत मनात सत्त्वगुणाचे आधिक्य राहते, मात्र धी, धृती, स्मृती भ्रष्ट झाल्या, आपापले काम योग्य रीतीने करेनाशा झाल्या तर हळूहळू मनात रज तसेच तमदोषाचे प्राबल्य वाढत जाते आणि त्यातून अनेक मानसिक तसेच शारीरिक रोगांना आमंत्रण मिळू शकते.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love
No comments:
Post a Comment