Friday, November 20, 2009

अन्नयोग : फळे

रसरशीत फळे सर्वांनाच हवीहवीशी वाटतात, फळांचा योग्य प्रमाणात, योग्य स्वरूपात केलेला वापर आरोग्यासाठीही निश्‍चितपणे हितकर असतो. आजही आपण फळांचे आयुर्वेदिकदृष्ट्या गुणधर्म पाहणार आहोत...

- डॉ. श्री बालाजी तांबे

जांभूळ

तत्फलं तुवरं चाम्लं मधुरं शीतलं मतम्‌रच्यं रूक्षं ग्राहकं तु लेखनं कण्ठदूषकम्‌।।
स्तंभकरं वातकारकं कफपित्तनुत्‌। आध्मानकारकं प्रोक्तं पूर्ववैद्यैर्मनीषिभिः।। ...निघण्टु रत्नाकर

* जांभूळ चवीला तुरट, आंबट-गोड असते, वीर्याने शीत असते, रुचकर असते. मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, अतिरिक्‍त वाढलेल्या धातूंचे लेखन करते. कफ तसेच पित्तदोषास कमी करते पण वात वाढवते. अतिप्रमाणात जांभळे खाल्ल्यास घसा खराब होऊ शकतो, मलावष्टंभाचा त्रास होऊ शकतो व पोटात वायू धरू शकतो.
* पित्त वाढल्यामुळे मळमळत असल्यास जांभळाचा रस खडीसाखरेसह मिसळून तयार केलेले चाटण थोडे थोडे घेण्याने बरे वाटते.
* भूक लागत नसल्यास जांभळाचा एक चमचा रस व आल्याचा अर्धा चमचा रस जेवणापूर्वी घेण्याचा उपयोग होतो.
* जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या केल्यास दात व हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते.

कवठ

तत्पक्वं रूचिदं चाम्लं कषायं ग्राहि मधुरम्‌। कण्ठशुद्धिकरं शीतं गुरू वृष्यं च दुर्जरम्‌।।
श्‍वासं क्षयं रक्‍तरूजं वान्तिं वातश्रमं तथा। हिध्मानं च विषं ग्लानिं तृषां दोषत्रयं तथा।।...निघण्टु रत्नाकर

* कवठाचे पिकलेले फळ चवीला आंबट-गोड व तुरट असते, वीर्याने शीत असते व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. कवठातील धागे व बिया पचण्यास जड असल्यामुळे कवठ जड समजले जाते. कवठ कंठाची शुद्धी करते, दमा, क्षयरोग, रक्‍तविकार, उलटी, वातदोष, श्रम, उचकी, विष, तृष्णा, ग्लानी वगैरे तक्रारीत हितकर असते. तिन्ही दोषांचे संतुलन करते.
* पिकलेल्या कवठातील बिया व रेषा काढून टाकून शिल्लक राहिलेल्या गराची गुळासोबतची चटणी अतिशय रोचक असते, यामुळे भूकही वाढते.
* शौचासह आव, मूळव्याध वगैरे त्रासावर कवठाचा बिया व धागे काढलेला गर ताकासह घेण्याचा उपयोग होतो.
* कवठाचा साखरेसह तयार केलेला मुरांबा पाचक म्हणून चांगला असतो.

बोरे

तच्च पक्वं तु मधुरं अम्लमुष्णं कफप्रदम्‌। ग्राहकं लघु रूच्यं तु वाय्वतीसारशोषहृत्‌।।
रक्‍तश्रमहरं प्रोक्तं पण्डितैश्‍चरकादिभिः।...निघण्टु रत्नाकर

* बोराचे पिकलेले फळ चवीला गोड-आंबट असते, वीर्याने उष्ण असते व कफ वाढवणारे असते. चवीला रुचकर, पचण्यास हलके असे बोर मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, वात दोषास कमी करते, जुलाब थांबवते, रक्‍तविकार, श्रम, शोष वगैरे त्रासातही हितकर असते.
* म्हणून ताजी बोरे खाल्ली जातात, पण औषधात सुकलेल्या बोरांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. औषध म्हणून लहान बोरे वापरणे चांगले असते, आकाराने मोठ्या पण बेचव बोरांचा औषध म्हणून उपयोग होत नाही.
* खूप श्रमांनी येणारा थकवा दूर होण्यासाठी पिकलेली गोड बोरे खाण्याचा उपयोग होतो.
* कोरडे उमासे येत असल्यास, मळमळ होत असल्यास ताजी बोरे चघळून खाण्याचा उपयोग होतो.
* तापामध्ये शरीराचा दाह होत असल्यास सुक्‍या बोरांचा काढा खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो, यामुळे तापही उतरतो.
* वारंवार जुलाब होत असल्यास, भूक लागत नसल्यास, जिभेवर पांढरा थर साठत असल्यास सुक्‍या बोरांचे जिरे, काळे मीठ, डाळिंबाचे दाणे टाकून तयार केलेले सार घेण्याचा उपयोग होतो, याने तोंडाला चवही येते.

- डॉ. श्री बालाजी तांबे

Thursday, November 19, 2009

अन्नयोगः फळे

फळे रसाने युक्‍त असल्याने स्वादिष्ट असतात. अंजीर व पपई पित्त कमी करतात. सफरचंद शक्तिवर्धक आहे, तर संत्रे थकवा दूर करते.
डॉ. श्री बालाजी तांबे.

बहुतेक सर्व फळे दिसायला आकर्षक असतात व रसाने युक्‍त असल्याने खाण्यासही स्वादिष्ट असतात. प्रकृतीनुरूप फळांचे सेवन आरोग्यासाठी निश्‍चितच लाभदायक असते. आज आपण सहसा सर्व प्रकृतीच्या व्यक्‍तींना मानवणारी काही फळे पाहणार आहोत.

अंजीर
अंजीर शीतलः स्वादुर्गुरु रक्‍तरुजाहरः । दाहं वातं पित्तं च नाशयेत्‌ तृप्तिदो मतः ।। ... निघण्टु रत्नाकर
* अंजीर चवीला मधुर व शीत वीर्याचे असते. वात, तसेच पित्तदोषाचे शमन करणारे असते. शरीरात दाह होत असल्यास, रक्‍तदोष असल्यास अंजीर खाणे विशेष हितावह असते. अंजीर तृप्ती करणारे असते.
* ताजे अंजीर फक्‍त उन्हाळ्यात उपलब्ध असते. सुके अंजीर मात्र वर्षभर मिळते.
* अशक्‍तपणा, हातापायांची जळजळ, तोंड कोरडे पडणे वगैरे तक्रारी असल्यास काही दिवस एक-दोन ताजी अंजिरे खडीसाखरेसह खाण्याचा उपयोग होतो.
* उपवास, उन्हात जाणे, जागरणे करणे यामुळे वाढणारे पित्त कमी होण्यासाठीही ताजे अंजीर खाणे उत्तम असते. पिकलेल्या अंजिराचा जॅम पित्तशामक व रक्‍त वाढविणारा असतो.

सफरचंद
कषायमधुरं शीतं ग्राहि सिम्बितिका फलम्‌ ।...चरक सूत्रस्थान
* सफरचंद चवीला गोड, किंचित तुरट असते. वीर्याने शीत असते व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते.
* आतड्यांची शक्‍ती कमी झाल्याने शौचाला पातळ होत असल्यास वाफवलेले सफरचंद खाणे उत्तम असते.
* नियमित सफरचंद खाण्याने रक्‍त वाढण्यास मदत मिळते. लहान मुलांसाठी, तसेच गर्भारपणातही सफरचंद खाणे उत्तम असते. सफरचंद खाण्याने क्वचित मलावष्टंभाचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी सफरचंद वाफवून खावे.
* अतिताण, कमी झोप, अति श्रम यामुळे स्टॅमिना कमी होत असल्यास, अनुत्साह वाटत असल्यास सफरचंद वाफवून काढलेला गर व साखर एकजीव करून खाण्याचा उपयोग होतो.
* कीटकनाशके वापरलेली असल्याची मोठी शक्‍यता असल्याने सफरचंद खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुणे व साल काढून खाणे श्रेयस्कर ठरते.

पपई
तत्पक्वं मधुरं रुच्यं पित्तनाशकरं गुरु । ... निघण्टु रत्नाकर
* पिकलेली पपई चवीला मधुर, अतिशय रुचकर व पित्तनाशक असते.
* पपई उष्ण असते असा सामान्यतः समज दिसतो, पण पपईमुळे पित्त कमी होते, असा आयुर्वेदात स्पष्ट उल्लेख आहे.
* पपईच्या एक-दोन फोडी खाल्ल्याने अन्नपचन सुधारते, भूकही चांगली लागण्यास मदत मिळते.
* आहारात पपईचा नित्य अंतर्भाव केल्यास जंत होण्याची प्रवृत्ती नष्ट होते.
* मासिक पाळीच्या वेळेस अंगावरून कमी रक्‍तस्राव होत असल्यासही पपईच्या एक-दोन फोडी रोज आहारात असल्यास उपयोग होतो.
* पपईमध्ये गर्भाशयाचा संकोच करण्याचा गुण असल्याने गर्भारपणात पपई खाऊ नये.
* कच्च्या पपईची भाजी करण्याची पद्धत असते, पण कच्च्या पपईने कफदोष व वातदोषाचा प्रकोप होतो.

संत्रे
विशदं गुरु रुच्यं च सरं चोष्णं सुगन्धिकम्‌। स्वादु चामं कृमीन्वातं श्रमं शूलं च नाशयेत्‌।। ...निघण्टु रत्नाकर
* ताजे व गोड संत्रे रुचकर व सुगंधी असते. वीर्याने उष्ण असते, गुणाने विशद म्हणजे स्वच्छ करणारे व सारक असते. आम, जंत, वात, श्रम, तसेच वेदना कमी करणारे असते.
* ताज्या संत्र्याचा रस थोडेसे मीठ टाकून घेतल्यास थकवा दूर होतो. विशेषतः उन्हातून आल्यावर किंवा शरीरश्रमांमुळे घाम येऊन शीण येतो तो दूर करण्यासाठी संत्रे उत्तम असते.
* गर्भारपणात होणाऱ्या उलट्या, मळमळ, अन्न न जाणे अशा वेळी थोड्या थोड्या वेळाने संत्र्याचा रस घेण्याचा उपयोग होतो.
* भूक लागली तरी अन्न खावेसे वाटत नाही, अशा वेळी संत्र्याची साल व बिया काढलेली संत्र्याची फोड मीठ व मिऱ्याची पूड टाकून खाण्याचा उपयोग होतो.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405

Wednesday, November 18, 2009

लवकर निजे, लवकर उठे -2

निसर्गचक्राला धरून केलेली प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी चांगली असते. वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे हे निसर्गचक्राला धरून तर आहेच, शिवाय अतिशय सोपे व सर्वस्वी आपल्या हातात आहे. "लवकर निजे, लवकर उठे' असे म्हणताना त्यात पुरेशी झोप घ्यावी, हेही सांगितलेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने दुपारची झोप किंवा जागरण टाळायला हवे.
- डॉ. श्री बालाजी तांबे


आरोग्यरक्षणासाठी शंभर टक्के आपल्या हातात असलेली आणि अगदी सहजपणे कोणालाही करता येईल अशी एकमेव गोष्ट म्हणजे लवकर झोपणे व लवकर उठणे. झोपणे व उठणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी वाटल्या, तरी त्या परस्परसंबंधित असतात. लवकर उठले की लवकर झोप येते आणि लवकर झोपले की लवकर उठणेही सोपे जाते.

ब्राह्ममुहूर्तावर उठा
दिनचर्येची सुरवात अर्थातच उठण्याने होते. आयुर्वेदात नुसतेच लवकर उठावे एवढे सांगितलेले नाही, तर ब्राह्ममुहूर्तावर उठावे, असे सांगितले आहे.
रात्रेः उपान्त्यो मुहूर्तो ब्राह्मः ।
अहोरात्रीचा शेवटचा मुहूर्त म्हणजे ब्राह्ममुहूर्त. आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र वगैरे प्राचीन भारतीय शास्त्रात मुहूर्त हे कालगणनेचे एक मान सांगितले आहे. 24 तासांचे जर 15 भाग केले, तर त्यातला एक भाग म्हणजे एक मुहूर्त. म्हणजेच एक तास 36 मिनिटे. रात्रीचा शेवटचा मुहूर्त असताना, म्हणजे साधारणपणे सूर्योदयापूर्वी दीड तास असताना उठणे म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठणे. आयुर्वेदात सांगितले आहे,

ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत्‌ स्वस्थो रक्षार्थमायुषः। तत्र सर्वाघशान्त्यर्थं स्मरेच्च मधुसूदनः।। ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
आयुष्याचे रक्षण करण्यासाठी निरोगी मनुष्याने ब्राह्ममुहूर्तावर उठावे व सर्व पाप, सर्व संकटे दूर होण्यासाठी मधुसूदनाचे स्मरण करावे.
ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ब्राह्ममुहूर्त हा ज्ञानोपासना करण्यासाठी सर्वोत्तम काळ समजला जातो. विद्यार्थ्याने अभ्यास करण्यासाठी, एखाद्या कलावंताने कलेची उपासना करण्यासाठी, तसेच साधकाने साधना करण्यासाठी ब्राह्ममुहूर्त उत्तम असतो. मन एकाग्र होणे, बुद्धी-स्मृती-मेधा वगैरे प्रज्ञाभेद सर्वाधिक कार्यक्षमतेने काम करणे साध्य होण्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उपासना, साधना करणे चांगले असते, असे समजले जाते.
ब्राह्ममुहूर्तावर उठल्यावर अजून एक गोष्ट आपोआप साध्य होते व ती म्हणजे मलविसर्जन व्यवस्थित होते. आयुर्वेदात सांगितले आहे,

जातवेगः समुत्सृजेत्‌। ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान

आयुष्याची इच्छा करणाऱ्या व्यक्‍तीने ब्राह्ममुहूर्तावर उठून वेग उपस्थित झाल्यास अडवू नये. मलविसर्जन ही क्रिया वाताच्या आधिपत्याखाली येते. निसर्गचक्रासारखेच शरीरातही वात-पित्त-कफदोषाचे एक चक्र असते. यात अहोरात्र- म्हणजे 24 तासांचे सहा विभाग केलेले असतात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या 12 तासांचे तीन भाग केले तर त्यातला पहिला भाग कफाचा, दुसरा पित्ताचा व तिसरा वाताचा असतो. म्हणजेच दिवसाच्या पहिल्या एक तृतीयांश भागात कफदोषाचे आधिक्‍य असते, मधल्या एक तृतीयांश भागात पित्तदोष विशेषत्वाने कार्यक्षम असतो तर शेवटच्या एक तृतीयांश भागात वातदोष अधिक उत्कट होत असतो. दिवसाचे हे चक्र रात्रीही याच क्रमाने पुन्हा होते.

विसर्जन क्रिया वाताच्या आधिपत्याखाली येत असल्याने ती क्रिया सकाळी कफाचा काळ सुरू होण्यापूर्वी, म्हणजे सूर्योदयापूर्वी होणे उत्तम असते. वाताच्या काळात वाताची क्रिया अधिक चांगल्या प्रकारे होत असल्याने सकाळी लवकर उठल्याने पोट साफ व्हायला खूपच चांगला हातभार लागत असतो. नियमितपणे रोजच्या रोज पोट साफ झाले तर त्यामुळे अनेक रोगांना प्रतिबंध होऊ शकतो व आरोग्य नीट राहू शकते हे सर्वज्ञात आहे.

पुरेशी झोप घ्या
"लवकर निजे लवकर उठे' असे म्हणताना त्यात पुरेशी झोप घ्यावी हेही सांगितलेले आहे. वय, प्रकृती, काम, हवामान वगैरे अनेक गोष्टींवर झोपेचे प्रमाण अवलंबून असते. उदा.- लहान मुलांना मोठ्यांपेक्षा जास्त झोप मिळणे आवश्‍यक असते. वात, तसेच पित्त प्रकृतीच्या व्यक्‍तींना स्वभावतःच झोप कमी असते, पण वास्तविक त्यांनी पुरेसे व शांतपणे झोपणे आवश्‍यक असते. शारीरिक श्रम, प्रवास करणाऱ्यांना झोप थोडी जास्त लागू शकते. तसेच शरीरशक्‍ती कमी असणाऱ्या ऋतूत झोपेची आवश्‍यकता वाढू शकते. योग्य वेळेला, योग्य प्रमाणात घेतलेली झोप आहाराप्रमाणेच शरीराचे पोषण करत असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

आहारादिवत्‌ निद्रा देहस्थितिकारिणी तथा सुखदुःखे, पुष्टिकार्श्‍ये, बलाबले, वृषताक्‍लीबता ज्ञानाज्ञानं जीवितमरणं च निद्रायत्ते ।। ...चरक सूत्रस्थान
आहाराप्रमाणेच झोपसुद्धा देहस्थितीची कारक असते. योग्य झोपेमुळे सुख, पुष्टी, बल, वृषता, ज्ञान, जीवन या सर्व गोष्टी अवलंबून असतात; तर अयोग्य झोपेमुळे दुःख, कृशता, अशक्‍तता, नपुंसकता, अज्ञान, मरणसुद्धा येऊ शकते. बऱ्याच जणांना दुपारी झोपण्याची सवय असते, पण दिवसा झोपणे कफ-पित्त वाढविणारे असते. शिवाय त्यामुळे स्थूलता, आम्लपित्त, मधुमेह वगैरे अनेक विकारांना आमंत्रण मिळू शकते. शिवाय दिवसा झोपण्याने रात्री वेळेवर झोप येत नाही. म्हणजे "लवकर निजे लवकर उठे' सांभाळणे अवघड होऊन बसते.

जागरणाचे दुष्परिणाम
'लवकर निजे लवकर उठे' या उक्‍तीला नाट लागतो तो जागरणामुळे. जागरण झाले की सकाळी उशिरा उठणे ओघाने आलेच. बऱ्याचदा असे दिसते, की "जागरण करू नका' असे सांगितले की समोरची व्यक्‍ती "पण मी सकाळी उशिरा उठतो, माझी झोप पूर्ण होते,' असे सांगते. पण झोपेच्या बाबतीत पुरेशा तासांइतकेच महत्त्व योग्य वेळी झोप घेण्यालाही असते, हे लक्षात घ्यावे लागते. रात्रीच्या जागरणांनी अंगात रुक्षता वाढते, वात वाढतो, तसेच पित्तही वाढते. उशिरा उठल्याने अंग जड होते, उत्साह वाटत नाही, शौचाला साफ होत नाही.
अवेळी झोपण्याने शरीरावर काय दुष्परिणाम होतात, हे आयुर्वेदात सांगितलेले आहे...
अकालशयनात्‌ मोह-ज्वर स्तैमित्य-पीनस-शिरोरुक्‌-शोफ-हृल्लास-स्रोतोरोध-अग्निमंदता भवन्ति । ...अष्टांगहृदय सूत्रस्थान

अवेळी झोपल्याने, म्हणजेच रात्री उशिरा, जेवणानंतर लगेच, दुपारी दोनप्रहरी झोपणे वगैरे प्रकारे झोपण्याने :

* विचारांचा गोंधळ होतो.
* शरीर थिजलेले वाटते.
* वारंवार सर्दी, डोकेदुखीचा त्रास जाणवतो.
* अंगावर सूज येते.
* मळमळ होते.
* शरीरातील स्रोतसे अवरुद्ध झाल्याने शरीर आंबल्यासारखे वाटते.
* अग्नी मंद होतो.

निसर्गचक्राला धरून केलेली प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी चांगली असते हे सर्व जाणतातच. वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे हे निसर्गचक्राला धरून तर आहेच, शिवाय अतिशय सोपे व सर्वस्वी आपल्या हातात आहे. तेव्हा "लवकर निजे लवकर उठे, त्यासी ऋद्धी-सिद्धी भेटे' या उक्‍तीचा अनुभव घेऊन पाहावा हे उत्तम!


योग्य व पुरेशा झोपेचे फायदे
पुरेशी व योग्य झोप मिळते आहे का, हे समजण्यासाठी आयुर्वेदाने योग्य झोपेचे सांगितलेले फायदे बघायला हवेत.
कालशयनात्‌ पुष्टिवर्णबलोत्साह अग्निदीप्तिअतंद्रा धातुसात्म्यानि भवन्ति।
...सुश्रुत चिकित्सास्थान
* शरीर पुष्ट होते. या ठिकाणी पुष्ट शब्दाचा अर्थ जाड होणे, असा अपेक्षित नाही, तर सर्व धातूंनी शरीर संपन्न असणे म्हणजे पुष्ट असणे.
* पुरेशा व योग्य वेळेला घेतलेल्या झोपेने कांती उजळते, शरीरवर्ण उत्तम राहतो.
* शरीराची ताकद, स्टॅमिना चांगला राहतो.
* उत्साह म्हणजे आपणहून काहीतरी छान करण्याची भावना तयार होते, सर्जनता वाढते.
* अग्नी प्रदीप्त होतो, पचन सुधारते.
* डोळ्यांवर झापड वगैरे येत नाही.
* सर्व धातू समस्थितीत राहतात.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405