Showing posts with label सूर्यनमस्कार. Show all posts
Showing posts with label सूर्यनमस्कार. Show all posts

Wednesday, March 19, 2014

पाठदुखीमुळे मन अस्वस्थ होते, जीव त्रस्त होतो. एवढेच नव्हे, तर इंद्रियांना काम करण्यासाठी संवेदना व शक्‍ती पूर्ण न मिळाल्यामुळे जीवन यशस्वी करण्यास अडचण येऊ शकते. शरीरात घडणाऱ्या सर्व घटना, शरीराने केलेल्या सर्व हालचाली, इंद्रिये करतात ते सर्व काम मुख्यतः पाठीलाच करावे लागते. त्यामुळेच काही चांगले काम केले की शाबासकी मिळते ती पाठीलाच.

काही चांगले काम केले की पाठ थोपटायची पद्धत असते; तसेच आत्मीयतेची, मित्रत्वाची थापही पाठीवरच असते. हात, पाय, तोंड वगैरे अवयव काम करतात; पण केलेल्या कामाची शाबासकी मात्र मिळते पाठीला. असे का असावे? याचे साधे, सोपे कारण असे आहे, की शरीरात घडणाऱ्या सर्व घटना, शरीराने केलेल्या सर्व हालचाली, इंद्रिये करतात ते सर्व काम मुख्यतः पाठीलाच करावे लागते. पाठीवरच्या थापेमुळे पाठीतील ताणाला व दुखण्याला बरे वाटते. पाठ म्हणजे मुख्यतः मेरुदंड. शरीरात अनेक अंतरेंद्रिये व बहिरेंद्रिये काम करत असतात; परंतु पाठीच्या आता असलेल्या मज्जारज्जूचे संरक्षण करण्यासाठी जेवढी काळजी घेतलेली दिसते, त्याभोवती जेवढे मजबूत कवच दिलेले दिसते, तेवढे संरक्षण शरीरातील कुठल्याही अवयवाला दिलेले दिसत नाही. मज्जारज्जूचे संरक्षण करणाऱ्या मेरुदंडाची रचना खूप गुंतागुंतीची असते. शरीर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, मागे, पुढे कुठेही वाकवावे लागते त्यामुळे मेरुदंडाची विशेष रचना केलेली दिसते. जिला 24 बाय 365 नव्हे तर 24 बाय 36500 दिवस (100 वर्षांच्या आयुष्यात 24 तास) काम करावे लागते ती आहे पाठ व मज्जारज्जू. शरीराच्या सर्व तऱ्हेच्या हालचाली, मग त्या स्वेच्छेने असोत, अजाणतेपणी केलेल्या असोत किंवा रिफ्लेक्‍स म्हणून झालेल्या असोत; त्या सर्व मज्जारज्जूंच्या मार्फत चालतात. आरोग्यशास्त्रात ज्याला इफरंट व एफरंट संवेदना (मेंदूकडून येणाऱ्या व मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना) त्या सर्व मज्जारज्जूच्या मार्फत चालू असतात. मेरुदंडामध्ये रज्जू असते व त्यात विशिष्ट द्रवही असतो, जो मेंदूत असलेल्या द्रवाशी जोडलेला असतो. काही काम या द्रवात असलेल्या विशेष गुणामुळे होते व काही काम मज्जातंतूंमार्फत मज्जारज्जूतून होऊ शकते. उजव्या हाताचे पहिले बोट उंच करावे असा विचार बोटापर्यंत पोचवून ते हलवायला लागणारी शक्‍ती पुरविण्याचे काम, तसेच बोट किती उंच करायचे, किती वाकवायचे, हे सर्व कार्य मज्जारज्जूमार्फत चालते. तसेच कुठेतरी पायावर मुंगी चढली तर येणारी संवेदना मेंदूला कळविण्याचे कामही मज्जारज्जूमार्फतच चालते.

मज्जारज्जूवर ताण नको
मेरुदंड वर किंवा खाली पक्का बांधलेला नसतो. तर तो वर व खाली अशा दोन्ही बाजूंना लटकल्यासारखा असतो. मांस, मज्जा यांच्या साह्याने त्याला जागेवर ठेवलेले असते. ज्याच्या आत मज्जारज्जू असतो, तो मेरुदंड हाडांनी बनलेला असल्याने वजनदार असतो. मनुष्य काम करत असताना, उभे असताना, बसलेला असताना मेरुदंड खालच्या बाजूला सरकण्याची शक्‍यता असते. म्हणून वयानुसार मानेची लांबी कमी होऊन डोके खांद्याकडे टेकायला सुरुवात होते, मेरुदंड खाली उतरायला लागतो. उतरलेला मेरुदंड नुसतीच मनुष्याची उंची कमी करतो असे नव्हे, तर मेरुदंडातून निघणारी नस दबली गेल्यामुळे हातापायांना मुंग्या येणे, बधिरता येणे वगैरे त्रास होऊ शकतात. योगशास्त्रातील षट्‌चक्रे वैश्‍विक शक्‍ती व शरीरातील शक्‍ती, तसेच प्राणशक्‍ती, विचारांतील शक्‍ती, इच्छाशक्‍ती अशा शक्‍तीच्या अनेक स्पंदनांना एकमेकांशी पाहिजे तेव्हा संपर्क ठेवून किंवा संपर्क न ठेवता आपापल्या मार्गाने जाण्यासाठी केलेली व्यवस्था असते. हेसुद्धा सगळे मज्जारज्जूशीच जोडलेले असते.

एकूण काय, तर मज्जारज्जूवर एकूण खूप ताण असतो. मज्जारज्जूवर ताण आला तर पाठीचे स्नायू ताणले जातील, यात काही संशय नाही. त्यामुळे मानेचे, खांद्याचे, कंबरेचे स्नायू दुखतात, असा अनेकांचा अनुभव असतो. सतत चालणाऱ्या चलनवलनामुळे वातवृद्धी होते. सरळ न बसणे, काम करताना मेरुदंडाला त्याच्या मूळ आकारात न ठेवता काम करणे, गुडघ्यात न वाकता कंबरेत वाकून वजन उचलणे, खुर्चीवर वेडेवाकडे बसणे, खुर्चीच्या खाली पाय घालून उगाचच हलवत बसणे अशा तऱ्हेच्या चुकीच्या वागण्यामुळेही मज्जारज्जूवर ताण येऊन पाठदुखीची सुरवात होते.

सूर्यनमस्कार हा उत्तम उपाय
सूर्यनमस्कारासारखी आसने करणे, प्राणायामाने नाडीशुद्धी करणे, प्रकृतीला अनुकूल व सात्त्विक आहाराचे सेवन करून शरीराच्या सर्व स्नायूंमधील वात-पित्त कमी ठेवणे, योग्य वेळेस पोट साफ ठेवणे, पोटाचा घेर वाढू न देणे, कंबरेपासून मानेपर्यंत तेल लावून अभ्यंग करणे (कुंडलिनी तेल) वगैरे उपचारांद्व्रारा पाठीच्या दुखण्यावर इलाज करावा लागतो.

मेरुदंडाची वा मणक्‍याची झीज झाल्यासही मज्जारज्जूवर ताण येण्याची शक्‍यता असते, त्यामुळेही पाठदुखी होऊ शकते. अपचनामुळे झालेल्या पोटातील वायूमुळे पाठ दुखू शकते. गरोदरपणात पोटाचे वजन पुढच्या बाजूला वाढल्यामुळे मेरुदंडावर बाक आल्याने पाठ दुखू शकते. तेव्हा पाठदुखीचे कारण शोधून काढून इलाज करावा लागतो.

पाठदुखीमुळे मन अस्वस्थ होते, जीव त्रस्त होतो. एवढेच नव्हे, तर इंद्रियांना काम करण्यासाठी संवेदना व शक्‍ती पूर्ण न मिळाल्यामुळे जीवन यशस्वी करण्यास अडचण येऊ शकते. म्हणून महत्त्व आहे मेरुदंडाचे, पाठीचे तसेच पाठीच्या आरोग्याचे.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Tuesday, January 14, 2014

लठ्ठपणावर उपचार

- डॉ. श्री बालाजी तांबे
व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते. 

कितीही प्रयत्न केले तरी वाढलेले वजन कमी होत नाही, अशी तक्रार अनेकांची असते. काही जणांचा असाही अनुभव असतो, की आटोकाट प्रयत्न करून थोडे वजन कमी झाले तरी तसेच राहत नाही; पुन्हा वाढते आणि उलट पूर्वीपेक्षा अजूनच वाढते. लठ्ठपणा हा वरवर पाहता खूप त्रासदायक, वेदनादायक विकार नसला तरी त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन चरकसंहितेमध्ये अतिलठ्ठपणा ही निंद्य अवस्था असते असे सांगितले आहे.

एका बाजूने मेद कमी करायचा ठरविले तरी दुसऱ्या बाजूने वातदोष वाढणार नाही, वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीराची ताकद, उत्साह, सतेजता लोप पावणार नाही, याचे भान ठेवावे लागते आणि त्यासाठी आहार, आचरण, औषध व उपचार ही चतुःसूत्री पाळणे आवश्‍यक असते. यापैकी आहाराबाबतची सविस्तर माहिती आपण मागच्या वेळेला घेतली आहे. लठ्ठपणा असल्यास आचरणामध्ये आयुर्वेदाने सुचविलेले मुख्य मुद्दे याप्रमाणे होत,

  • अस्वप्न - कमी झोप
  • चिंतन - मानसिक व्यग्रता
  • आतपसेवन - उन्हाचा संपर्क
  • शारीरिक व्यायाम
  • अध्व - पायी चालणे

कमी झोप सुचवण्यामागे रात्रीची झोप कमीत कमी, जितकी आवश्‍यक आहे तेवढीच घेणे आणि दुपारी अजिबात न झोपणे, या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. कधीतरी जागरण झाले तरी चालू शकेल, पण झोप झाली तरी लोळत राहणे, सूर्योदयानंतरही झोपून राहणे, जेवणानंतर विश्रांती म्हणून झोपून जाणे, या गोष्टी टाळायला हव्यात.

मानसिक पातळीवर आळस येऊ नये, आरामाची प्रवृत्ती बळावू नये, हेसुद्धा लठ्ठपणावरील उपचारांत सांभाळावे लागते. मन कामात व्यस्त राहिले, चिंतन करण्याजोग्या गोष्टीत गुंतून राहिले तर त्याचाही वजन कमी होण्यासाठी उपयोग होतो.

थोडा वेळ उन्हात बसणे हा लंघनानाच एक प्रकार असतो. सकाळी आठच्या आधी किंवा संध्याकाळी पाचनंतर कोवळे ऊन अंगावर घेण्यानेसुद्धा वजन कमी होण्यास मदत मिळते. अगोदर अंगाला तेल लावून, सकाळच्या उन्हात सूर्यनमस्कार घालणे, हा त्यातला सर्वोत्कृष्ट उपचार म्हणता येईल.

व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. व्यायामाच्या बाबतीतला एक अनुभव असा, की प्रकृतीला अनुरूप असणारे, सहज करता येण्याजोगे, न थकवणारे व्यायाम करणेच हितावह असते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते.

योग्य औषधयोजना हीसुद्धा वजन कमी होण्यास सहायक असते. सहसा ही औषधे मेदाचे लेखन (अवाजवी मेद खरवडून काढणे) करण्याबरोबरीने वाताचे शमन करणारी, पचन सुधारणारी असतात. उदा.- गुग्गुळ, वावडिंग, त्रिफळा, नागरमोथा, चित्रक, सुंठ वगैरे. फक्‍त मेदनलेखन इतकाच उद्देश ठेवला व कडू, तुरट चवीच्या द्रव्यांचा भडिमार केला तर त्यामुळे वात वाढतो व अजूनच समस्या निर्माण होऊ शकतात. अमुक एक पेय प्या व वजन कमी करा, महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी करा, या प्रकारे दावे करणाऱ्या बहुतेक औषधांमध्ये कडू, तिखट, तुरट द्रव्यांचा समावेश असतो, याचे भान ठेवायला हवे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीपरीक्षण करून घेऊन योग्य औषध सुरू करणे सर्वोत्तम असते. मात्र तत्पूर्वी लगेच सुरू करता येतील अशी काही घरगुती औषधे पुढीलप्रमाणे आहेत-

  • "काथ' हा वजन कमी करण्यासाठी उत्तम असतो. चांगल्या प्रतीच्या काथाचे दीड ते दोन ग्रॅम चूर्ण रोज पाण्याबरोबर व विड्याच्या पानाबरोबर घेण्याने वजन कमी होण्यास मदत होते.
  • जेवणानंतर दोन चमचे लिंबाचा रस एक कपभर पाण्यात घेण्यानेसुद्धा मेद कमी होण्यास मदत मिळते.
  • सकाळी उठल्यावर कपभर कोमट किंवा सामान्य तापमानाच्या पाण्यात चमचाभर मध टाकून घेण्यानेही वजन कमी होण्यास मदत मिळते.
  • माक्‍याचा रस मेद साठलेल्या ठिकाणी हलक्‍या हाताने जिरवला तर त्यामुळे वजन कमी होण्यास, विशेषतः मेदाच्या गाठी तयार झालेल्या असल्यास त्या वितळण्यास मदत मिळते.

लठ्ठपणाच्या पाठोपाठ घाम अधिक प्रमाणात येणे, घामाला तीव्र गंध असणे याही तक्रारी उद्‌भवतात. याचे कारण म्हणजे मेदाचा मल घाम असतो, त्यामुळे मेद वाढला की पाठोपाठ घामाचे प्रमाण वाढणे स्वाभाविक असते. घाम कमी होण्यासाठी, तसेच तेवढ्या मर्यादेत मेदधातू कमी होण्यासाठी आयुर्वेदात काही लेप सुचवले आहेत.

शिरीष-लामज्जक-हेम-लोध्रैस्त्वग्‌-दोष-संस्वेदहरः प्रघर्षः ।
पत्राम्बुलोहाभय चन्दनानि शरीरदौर्गन्ध्यहरः प्रदेहः ।। ...भैषज्यरत्नावली 


शिरीष वृक्षाची साल, खस, नागकेशर, लोध्र याचे चूर्ण त्वचेवर चोळल्याने घामाचे प्रमाण कमी होते. तमालपत्र, वाळा, अगरू, हिरडा, चंदन यांचे चूर्ण पाण्यात मिसळून शरीरावर लेप लावण्याने शरीराचा दुर्गंध नाहीसा होतो.
अशा प्रकारे थोडे बाहेरून, थोडे आतून औषधोपचार करण्याने हळूहळू वजन कमी होताना दिसते.

आहार, आचरण, औषधानंतर येतात ते उपचार. अभ्यंग हा वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय होय. वातशामक व मेदनाशक द्रव्यांनी संस्कारित केलेले अभ्यंग सिद्ध तेलासारखे तेल संपूर्ण अंगभर जिरवणे व त्यानंतर औषधी वाफेच्या मदतीने स्वेदन करणे, हा उपचार आठवड्यातून 1-2 वेळा घेता येतो. संपूर्ण अंगाला अभ्यंग तर स्वतःचा स्वतःला रोज करता येण्याजोगा असतो. या प्रकारे अभ्यंग करण्याचा किंवा तज्ज्ञ परिचारकाकडून नीट शास्त्रशुद्ध अभ्यंग व स्वेदन घेण्याचा अजून एक फायदा म्हणजे, यामुळे वाढलेल्या वजनाच्या पाठोपाठ येणाऱ्या समस्यांना आळा बसू शकतो.

उद्वर्तन - उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ ।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान 


कफदोष कमी करून साठलेल्या मेदाला वितळविण्यासाठी उद्वर्तन उपचार उत्तम होय. उद्वर्तन म्हणजे विशिष्ट द्रव्यांचे बारीक चूर्ण संपूर्ण अंगाला ठराविक पद्धतीने चोळणे. अभ्यंगासारखा हासुद्धा एक मसाजच असतो, फक्‍त यात तेलाऐवजी बारीक चूर्ण वापरले जाते. घरच्या घरी स्नानाच्या आधी उटणे अंगाला लावतात, त्याप्रमाणे उद्वर्तनाचे कोरडे चूर्ण चोळता येते. मात्र तज्ज्ञ परिचारकाकाडून व्यवस्थित उद्वर्तन करून घेण्याचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होताना दिसतो.

शरीरशुद्धी - वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी. शरीरशुद्धी म्हणजे शरीरातील अनावश्‍यक गोष्टी अति प्रमाणात साठल्याने दोषरूप झालेले भाव शरीराबाहेर काढून टाकणे. लठ्ठपणामध्ये साठून राहिलेला "मेद' हा मुळात धातू असला तरी अतिप्रमाणात वाढला की दोषच म्हणावा लागतो. शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी केली असता असा दोषस्वरूप मेद कमी होऊ शकते. याबाबतचा अनुभव असा, की जेवढे वजन कमी होणे अपेक्षित आहे, ते सर्वच्या सर्व पंचकर्माच्या कालावधीत कमी होईलच असे नसते. उदा.- एखाद्या व्यक्‍तीचे वजन 20 किलो अधिक असले तर शास्त्रोक्‍त विरेचन, विशेष मेदनाशक तेलाचा बस्ती, अभ्यंग, उद्वर्तन, स्वेदन वगैरे उपचारांच्या साह्याने पंचकर्माच्या दरम्यान 6-8 किलो वजन कमी झाले तरी शरीरशुद्धीद्वारा एकदा आतील मेदसंचयाची प्रवृत्ती बदलली, आहार-आचरणामध्ये अनुकूल बदल केले, की पंचकर्मानंतरही क्रमाक्रमाने वजन कमी होताना दिसते. एकाएकी वजन कमी होण्याने शरीरावर होऊ शकणारे दुष्परिणाम यात होत नाहीत, शिवाय अशा प्रकारे हळू हळू उतरलेले वजन सहसा पुन्हा वाढतही नाही. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Monday, January 14, 2013

नमन तेजाला!

डॉ. श्री बालाजी तांबे
भारतात दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या समजल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे सर्वांच्या कल्याणाची शुद्ध बुद्धी देण्यासाठी वापरलेला गायत्री मंत्र आणि दुसरे म्हणजे त्याचीच उपचारपद्धतीरूप असलेला सूर्यनमस्कार. वेद - पुराणात, रामायणात सूर्योपासना सांगितलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात श्री समर्थ रामदास स्वामींनी सूर्यनमस्काराचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. बाहेरच्या सर्व जगताला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्थान आपल्या मेंदूत असते आणि शरीरात असलेल्या शक्‍तीला जागृत करण्याचे कामही सूर्यच करत असतो. शरीर कमावणे, व्यायाम करणे एवढाच सूर्यनमस्काराचा मर्यादित हेतू नसतो, तर सूर्यनमस्कारामुळे तेजाची उपासना होते, ज्यामुळे स्वतःचा विषय व अभ्यास बरोबर सांभाळला जाऊन समाजाला एक उत्तम जीवन अर्पण करणे हाही उद्देश साध्य होतो.

सर्वच प्राचीन संस्कृतींमध्ये सूर्याला देवता समजून त्याची पूजा, उपासना करण्याबद्दल संदर्भ सापडतात. भारतातही वेद, पुराणांमध्ये तसेच इतर प्राचीन साहित्यात सूर्योपासना, सूर्यासंबंधी मंत्र, सूक्‍त वगैरेंचा उल्लेख सापडतो. वैयक्‍तिक पातळीवर सर्वांत सुलभ पद्धतीने सूर्याची उपासना करता यावी यासाठी भारतामध्ये सूर्यनमस्कारांची परंपरा आहे. रामायणामधील "आदित्य हृदयम्‌' या भागामध्ये मंत्रासहित जी सूर्योपासना सांगितली आहे, ती सध्याच्या प्रचलित सूर्यनमस्कारांशी खूप मिळती-जुळती आहे असे दिसते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात श्री समर्थ रामदास स्वामींनी सूर्यनमस्काराचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. सर्व जगभरात सूर्यनमस्कार आज प्रसिद्ध झाले असले, तरी ते भारतात अतिप्राचीन काळापासून सर्वपरिचित आहेत.

लहानपणी 12 सूर्यनमस्कार घातल्यावर,
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्य्रं नोपजायते ।।


आणि

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम्‌ ।
सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्‌ ।।


हे दोन मंत्र म्हणून सूर्याचा प्रकाश ज्यात पडलेला आहे असे तीर्थ घेतले आहे की नाही यावर वडीलमंडळींचे लक्ष असे. एवढा मोठा झाला आहेस तरी 12 सूर्यनमस्कारांवर थांबला आहेस, 108 सूर्यनमस्कारांना केव्हा पोचणार, वगैरे चौकशीही होत असे.

सूर्यनमस्कारात अनेक आसने अंतर्भूत असल्यामुळे आणि सूर्यनमस्कारामुळे शरीरातील हॉर्मोनल सिस्टिम व जाठराग्नी संतुलित होत असल्यामुळे सूर्यनमस्काराला अतिशय महत्त्व आलेले आहे.

भारतात दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या समजल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे सर्वांच्या कल्याणाची शुद्ध बुद्धी देण्यासाठी वापरलेला गायत्री मंत्र आणि दुसरे म्हणजे त्याचीच उपचारपद्धतीरूप असलेला सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारामध्ये जमिनीवर संपूर्ण डोके टेकल्यावर होणारा शरणागत प्रणाम हा भौतिकाचे सर्व फायदे देणारा आहे. सूर्यनमस्काराची एक स्थिती, ज्यात आकाशाकडे पाहिल्यावर संपूर्ण दृष्टी व्यापक करून सर्वांभूती असलेला परमेश्‍वर हा किती उच्च संकल्पना आहे हेही दाखवले जाते. पूर्वीच्या काळी सूर्यनमस्काराबरोबर बहुतेक वेळा दंड-बैठका काढल्या जात असत. पण खरे पाहता सूर्यनमस्कारात दंड व बैठका दोन्ही अंतर्भूत झालेले दिसतात. सूर्यनमस्कारांमुळे मनगटातील ताकद वाढत असे, मांड्या, पोटऱ्या, पाय, गुडघे मजबूत होत असत.

मेरुदंड खाली सरकल्यामुळे पाठ, मान, कंबर यांची दुखणी होऊ शकतात. अशा वेळी पायांना वजन बांधून शरीर खालच्या बाजूला ओढण्याचा (ट्रॅक्‍शन) उपचार केला जातो. सूर्यनमस्कार करते वेळी ट्रॅक्‍शन हा उपचार आपोआपच होतो.

सूर्यप्रकाशामध्ये जी व्हिटॅमिन्स मिळू शकतात, त्यामुळे दूध पचायला मदत मिळत असावी, हे लक्षात घेऊन सूर्यनमस्कार घालून झाल्यावर मुलांना ग्लासभर दूध देण्याची पद्धत रूढ होती. त्यामुळे अस्थी, मज्जा अशा सर्व धातूंचे पोषण व्यवस्थित होत असे व सरतेशेवटी सूर्यनमस्कार करणाऱ्याला या तेजाच्या उपासनेमुळे वीर्यवृद्धी व स्मरणशक्‍ती या दोन्हींचा लाभ होत असे. बाहेरच्या सर्व जगताला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्थान आपल्या मेंदूत असते व शरीरात असलेल्या या शक्‍तीला जागृत करण्याचे कामही सूर्यच करत असतो.

दोन्ही पायाचे चवडे व तळहात जमिनीवर ठेवून संपूर्ण शरीर झोक्‍यासारखे फिरवून वर उचलणे, संपूर्ण शरीर डोंगर असल्यासारखे इंग्रजी अक्षरातील उलट्या त च्या आकारात आणणे किंवा भुजंगासारखा फणा काढून मेरुदंडाला पोटाकडून ताण देणे याचेही फायदे सूर्यनमस्कारात मिळतात. सूर्यनमस्कार सोपे करण्यासाठी कोपरे, गुडघे जमिनीवर टेकणे वगैरे काही सुधारणा केलेल्या दिसतात, पण असे बदल केल्याने सूर्यनमस्काराचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.

एकूण शरीर कमावणे, व्यायाम करणे एवढाच सूर्यनमस्काराचा मर्यादित हेतू नसतो, तर सूर्यनमस्कारामुळे तेजाची उपासना होते, ज्यामुळे स्वतःचा विषय व अभ्यास बरोबर सांभाळला जाऊन समाजाला एक उत्तम जीवन अर्पण करणे हाही उद्देश साध्य होतो.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

सूर्यनमस्कार


डॉ. श्री बालाजी तांबे

सूर्यनमस्कार हे सूर्योपासनेचे एक अंग असल्याने सकाळी, उगवत्या सूर्याकडे अभिमुख होऊन ते करायचे असतात. किती सूर्यनमस्कार केले यापेक्षा त्यातील प्रत्येक आसन, प्रत्येक स्थिती किती अचूक साधता आली, हे पाहणे महत्त्वाचे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सूर्याची शक्‍ती व ऊर्जा स्वीकारण्यासाठी तत्पर राहणे होय.

शरीर, प्राणशक्‍ती व मन अशा तिन्ही पातळ्यांवर काम करू शकेल असा, कमीत कमी वेळात करता येईल असा आणि तरीही करायला सहज सोपा असा उत्तम व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार, असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरू नये.

सूर्यनमस्कार हे सूर्योपासनेचे एक अंग असल्याने सकाळी, उगवत्या सूर्याकडे अभिमुख होऊन करायचे असतात. तसेच इतर कोणत्याही व्यायामाप्रमाणे सूर्यनमस्कार अनशापोटी करणे अपेक्षित असते. संध्याकाळी सुद्धा सूर्यनमस्कार करता येतात. मात्र त्यापूर्वी कमीत कमी दोन तास तरी काहीही खाल्लेले नसावे.

सुरवातीला प्रत्येकाने आपली प्रकृती, शक्‍ती, स्टॅमिना यांचा विचार करून जमतील तेवढेच सूर्यनमस्कार घालणे चांगले. नंतर सराव होईल तसतशी संख्या वाढत जाईल आणि कमीत कमी 12 सूर्यनमस्कार घालता येतील. अनेक वर्षे नियमित सूर्यनमस्कार करणारे व उत्तम शरीरशक्‍ती असणारे लोक 12, 24, 36 असे बाराच्या पटीत सूर्यनमस्कार घालू शकतात. मात्र त्यासाठी सराव व अभ्यास फार महत्त्वाचा असतो.

किती सूर्यनमस्कार केले यापेक्षा त्यातील प्रत्येक आसन, प्रत्येक स्थिती किती अचूक साधता आली, हे पाहणे महत्त्वाचे. घाईघाईने सूर्यनमस्कार आटोपून मोकळे होण्याऐवजी त्यातील नेमकेपण अंगी बाणवणे, शारीरिक हालचालींना संयत श्‍वासाची साथ लाभण्याकडे लक्ष देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सूर्याची शक्‍ती व ऊर्जा स्वीकारण्यासाठी तत्पर राहणे होय.

सूर्यनमस्कारातील आसने
सूर्यनमस्काराच्या बारा क्रिया कोणकोणत्या असतात व त्या कशा करायच्या असतात हे बहुतेक सर्वांना माहिती असते, मात्र संपूर्ण, सर्वांगसुंदर योग असे ज्यांना संबोधले जाते त्या सूर्यनमस्कारामध्ये कोणकोणती योगासने समाविष्ट केलेली आहेत आणि त्यांचे उपयोग काय असतात हे आपण पाहणार आहोत.

प्रणमासन ः सूर्यनमस्कारातील पहिली व शेवटची स्थिती म्हणजे "प्रणमासन' होय. या स्थितीला समस्थिती असेही म्हटले जाते. यामुळे शरीर तसेच मन स्थिर होण्यास मदत मिळते. स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग व्हावा, शरीरबांधा नीट राहावा, यासाठीही ही स्थिती मदत करणारी असते.

हस्तउत्तानासन ः यानंतरची दुसरी तसेच शेवटून दुसरी म्हणजे अकरावी स्थिती म्हणजे "ऊर्ध्वनमस्कार' किंवा "हस्तउत्तानासन'. यामध्ये पाठीचा कणा मागच्या बाजूला वाकत असल्याने पोटाचे स्नायू ताणले जातात. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळते, पचन सुधारते, पाठीचे स्नायू मजबूत होतात. या स्थितीमध्ये श्‍वास आत घेतला जात असल्याने खांद्याचे तसेच छातीचे स्नायू ताणले जातात, यामुळे फुप्फुसांचे स्थितिस्थापकत्व सुधारण्यास मदत मिळते.

पादहस्तासन ः तिसरी व दहावी स्थिती म्हणजे "पादहस्तासन'. यात अगोदरच्या ऊर्ध्वनमस्कारात डोक्‍याच्या वर असणारे हात श्‍वास सोडत सोडत पायाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर ठेवून डोके गुडघ्यांना लावायचे असतात. यामुळे मेंदूपर्यंत रक्‍ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होते, प्राणशक्‍तीचा पुरवठा होतो, स्मरणशक्‍ती व आकलनशक्‍ती सुधारण्यास मदत मिळते. हृदय तसेच फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, सायटिका वगैरे पायांच्या नसांसंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होतो, पायांची ताकद वाढते, पोट व कंबरेच्या ठिकाणची चरबी कमी होण्यास मदत मिळते. पोट व ओटीपोटावर दाब आल्याने स्त्रियांमध्ये पाळी नियमित येण्यास मदत मिळते.

अश्‍वसंचलनासन ः चवथी व नववी स्थिती म्हणजे अश्‍वसंचलनासन. यात एक पाय हातांच्या जवळ असतो, दुसरा मात्र शक्‍य तितका मागे नेलेला असतो व मान किंचित वर उंचावलेली असते. यामध्ये पायांचे स्नायू, नितंबातील स्नायू ताणले जातात त्यामुळे लवचिकता वाढण्यास मदत मिळते. यामुळे पाठीच्या कण्याची ताकद वाढते, शरीरबांधा नीट राहण्यास मदत मिळते. सायटिकामुळे वेदना होत असल्यास त्या कमी होतात. मूत्रसंस्था तसेच प्रजननसंस्थेच्या आरोग्यासाठीही ही स्थिती हितावह असते.

अधोमुखश्‍वानासन ः पाचवी व आठवी स्थिती म्हणजे "अधोमुखश्‍वानासन'. या क्रियेत श्‍वास सोडायचा असतो. कुत्रा आळस देताना ज्याप्रमाणे पाठ उंच करतो, पुढचे पाय पसरून संपूर्ण शरीराला ताण देतो, तशीच ही स्थिती दिसते. या आसनामुळे मस्तक, तसेच पायांची शक्‍ती वाढते, खांदे मजबूत होतात. त्या ठिकाणची जखडण दूर होते. पायामध्ये, पोटऱ्यांमध्ये गोळे येणे कमी होते. मेंदूला रक्‍ताचा पुरवठा अधिक प्रमाणात झाल्यामुळे डोके शांत व्हायला, ताण कमी व्हायलाही मदत मिळते.

अष्टांग नमस्कार ः सहावी स्थिती म्हणजे "अष्टांग नमस्कार'. दोन पाय, दोन गुडघे, छाती, हनुवटी व दोन हात या आठ अंगांचा जमिनीला स्पर्श होतो म्हणून या स्थितीला अष्टांग नमस्कार असे म्हणतात. अधोमुखश्‍वानासनानंतर श्‍वास सोडत सोडत कपाळ, नाकाचे अग्र, हनुवटी, छाती, पोट यांचा क्रमाक्रमाने जमिनीला स्पर्श करत दोन्ही हातांवर यायचे असते. याच्या अभ्यासाने हात व खांद्यांच्या स्नायूंना मजबुती मिळते पोटाच्या स्नायूंची ताकद वाढते.

भुजंगासन ः यानंतरची सातवी स्थिती म्हणजे "भुजंगासन'. अष्टांगनमस्कारानंतर आपोआप भुजंगासनाची स्थिती येते. यामध्ये दोन्ही हात सरळ असतात व संपूर्ण शरीराचे वजन हात व पायाच्या चवड्यांवर तोललेले असते. या आसनामध्ये श्‍वास आत घ्यायचा असतो व मान शक्‍य तितकी मागे न्यायची असते. हे आसन पाठीच्या कण्यासाठी खूप लाभदायक असते. स्लिप डिस्क होऊ नये म्हणून याचा उपयोग होतो. हे आसन करताना श्‍वास आत घ्यायचा असल्याने फुप्फुसांची क्षमता वाढण्यास मदत मिळते. मलावष्टंभ, गॅसेस वगैरे तक्रारींमध्येही हे आसन गुणकारी असते. भुजंगासनानंतर पुन्हा उलट्या क्रमाने अधोमुखश्‍वानासन, अश्‍वसंचलनासन, पादहस्तासन, हस्तउत्तानासन करत शेवटी प्रणमासन ही स्थिती येते आणि सूर्यनमस्काराचे एक आवर्तन पूर्ण होते.

जसजसा सराव होत जातो, तसतशी आसनांमधील नेमकेपण साधता येते, विशेषतः अश्‍वसंचलनासन, अष्टांगनमस्कार, उत्तानासन वगैरे आसनांना सिद्ध होण्यास नियमित अभ्यासाची गरज असते. श्‍वासाची लयबद्धता सांभाळणेसुद्धा सरावाने साध्य होते.

सूर्याची बारा नावे
सूर्याच्या नावांचे मंत्र म्हणून 12 नमस्कार करण्याची पद्धत आहे. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पूष, हिरण्यगर्भ, मरीची, आदित्य, सवितृ, अर्क व भास्कर ही सूर्याची बारा नावे होत. शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक पातळीवर परिणाम देणारे, सहजसोपे असे सूर्यनमस्कार प्रत्येकाने स्वक्षमतेनुसार घातले तर त्यामुळे दीर्घायुष्य, बल, शक्‍ती, तेजस्विता मिळेल यात शंका नाही.

सूर्यनमस्काराचे फायदे अनेक
नियमित सूर्यनमस्कार करण्याचे अनेक फायदे आहेत. यात प्रामुख्याने पाय, पाठ, पोट या भागातील रक्‍ताभिसरण सुधारते, स्नायूंमधील लवचिकता वाढते, पोटावर येणाऱ्या दाबामुळे पचन सुधारते. सूर्यनमस्काराचा सराव झाला की, त्यातून श्‍वासाचे नियमन आपोआप साधते, यामुळे श्‍वसनसंस्था, रक्‍ताभिसरण संस्था, चेतासंस्था या सर्व संस्थांना उत्तेजना मिळते, अंतस्रावी ग्रंथींनाही प्रेरणा मिळते. सूर्य हा ऊर्जेचा अविनाशी स्रोत आहे हे आपण जाणतो. सूर्यनमस्कारांमुळे आपल्याही शरीराला या ऊर्जेचा परिणाम मिळतो, यातूनच चैतन्याचा, उत्साहाचा लाभ होतो, कुंडलिनी शक्‍तीलाही चेतना मिळू शकते.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, September 12, 2012

आरोग्यस्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

जीवनाचे लक्ष्य तन-मन-आत्म्याने कुठल्याही अडचणीशिवाय साधता यावे, हीच मुक्‍ती व हाच मोक्ष. त्यात पहिला अडसर येतो तो शारीरिक अनारोग्याचा. शरीराला आरोग्यवान ठेवण्यासाठी आवश्‍यकता असते अन्नाची व आचरणाची; परंतु मन हे शरीराच्या आरोग्याचा विचार न करता स्वतःला जे आवडेल किंवा स्वतःने जे ठरविले असेल तोच आहारविहार निवडते. यातून उद्‌भवतो अनावस्थेचा प्रसंग. ज्यात भोगावे लागतात शारीरिक हाल, तोंड द्यावे लागते रोगांना. एका बाजूने मनाला येईल ते खाण्याचे स्वातंत्र्य व दुसऱ्या बाजूने रोगाने होणारे शोषण हे पारतंत्र्य. अशा स्वातंत्र्याचा काय उपयोग? आरोग्यस्वातंत्र्याचा सूर्य पाहायचा असेल तर आयुर्वेदातल्या स्वस्थ वृत्ताच्या नियमांकडे डोळेझाक करता येणार नाही.

हे सर्व विश्‍व व जीवन चालवणारी अशी एक सुसूत्र व्यवस्थित संकल्पना आणि शक्ती अस्तित्वात आहे हे प्रत्येकास जाणवतेच, तसेच काही गोष्टी किंवा प्रसंग हे अनाकलनीय राहतात. या सर्व संकल्पना ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला देव असे म्हटले जाते. या देवाशी म्हणजेच सर्व विश्‍वाशी संबंध जोडणारा तो धर्म समजला जातो. तेव्हा देव आणि धर्म यांच्यापासून सुटे होणे किंवा स्वातंत्र्य मिळविणे ही केवळ काल्पनिक मनोधारणा होऊ शकते. इंद्रियांना जेवढे समजते तेवढेच सत्य, हा झाला भौतिकवाद, परंतु त्याच्याही पलीकडे असलेल्या अनाकलनीय अस्तित्वाचा परिणाम होताना नक्कीच दिसतो, हा झाला अध्यात्मवाद. म्हणून आत्मविश्‍वास आणि श्रद्धा याच्यापासून स्वतंत्र होता येत नाही. म्हणजेच मनाला स्व-तंत्राप्रमाणे वागून चालत नाही.

विश्‍वनियमांना आणि निसर्गनियमांना धरून, तसेच कालबाह्य न होणारे असे आयुर्वेद हे शास्त्र सृष्टीतील सर्व प्राणिमात्र आणि त्यातल्या त्यात मनुष्यमात्र यांचे शारीरिक, मानसिक व आत्मिक जीवन प्रगल्भ होऊन त्याला आरोग्यस्वातंत्र्य नित्य अनुभवता यावे यासाठी तयार केलेले आहे. त्यामुळे ते जुने (out dated) कधीच होत नाही. त्यात सांगितलेले नियम, ऋतुचर्या, आहार-विहार, स्वास्थ्याचे नियम हे सर्व बदलून चालणार नाहीत, पण ते का व कशासाठी सांगितले, हे समजून घेऊन आजच्या काळातही ते कसे पाळायचे, एवढेच प्रत्येक मनुष्याच्या हातात असते. आयुर्वेदच नव्हे, तर श्रीमद्‌भगवद्‌गीता, वेद, उपनिषदे यातील सर्व ज्ञान हे मनुष्यमात्राला कायम उपयोगी पडणारे म्हणजे आधुनिक काळातही उपयोगी पडणारे आहे. बदललेल्या परिस्थितीत जीवनाचा हेतू व निसर्गाचे विज्ञान बदलत नसते, तेव्हा त्यात सांगितलेले नियम कसे पाळायचे, एवढेच ठरविणे मनुष्याच्या हातात असते व असे केल्याने आरोग्यस्वातंत्र्य उपभोगता येऊ शकते. काही नियम अवघड वाटले तरी ते शेवटी अंतिम फायद्याचे म्हणजेच श्रेयस्करही आहेत, हे लक्षात ठेवून आयुर्वेदच मनुष्याला खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव देऊ शकतो.

मनाला असे वाटते, की मनच सर्वांत मोठे, सर्वांवर राज्य करणारे, सर्वांत शहाणे आणि सर्व भोग मी एकट्यानेच घ्यावेत. भोग ज्या शरीराच्या माध्यमातून घ्यायचे त्या शरीराचा विचार न करता, म्हणजेच स्वतःच्या प्रकृतीला न झेपतील असे भोग घेण्याचे स्वातंत्र्य मनाला हवे असते. लहान मुलालाही त्याच्या मनाविरुद्ध काही झालेले आवडत नाही; परंतु मनाला जे चांगले ते शरीराला व आत्म्यालाही चांगले असावे हा विचार न करता मन स्वतंत्रपणे वागण्याचा प्रयत्न करते. कौटुंबिक आणि सामाजिक परंपरा आणि आजूबाजूच्या सर्वांना आवडेल, न आवडेल याचा विचार न करता आहारविहार करणे, वाटेल तसे कपडे घालणे, मैथुनादी क्रिया करणे हे मनाला आवडते आणि तसे वागणे म्हणजे स्वातंत्र्य मिळाले, अशी समजूत करून घेतली जाते. या समजुतीला पुष्टी म्हणून आर्थिक स्वातंत्र्य मिळाले म्हणजे सर्व काम झाले, असे मन ठरविते. परंतु अशा मानसिक स्वातंत्र्यामुळे आपल्या स्वतःच्या माणसांपासून, समाजापासून दूर होणे, एकटेपणा अनुभवणे आणि त्यातून शारीरिक रोग आणि मानसिक विकृती उत्पन्न होणे व शेवटी अधोगती होणे यांना तोंड द्यावे लागते. एखाद्या गोष्टीपासून त्रास होतो म्हणून त्यापासून मुक्ती मिळवताना दुसऱ्या त्रास देणाऱ्या गोष्टी ओढवून घेण्यात काहीच अर्थ नाही.

काळाचे गणित समजणे बऱ्याच वेळा खूप अवघड असते. प्रत्येक व्यक्‍ती 30 वर्षांपूर्वीच्या आपल्या आधीच्या व्यक्‍तीला "जुन्या काळातील व्यक्‍ती' असे संबोधते. "त्या वेळी परिस्थिती वेगळी होती, आता काळ पुढे गेला आहे, आता सुधारणा झाल्या आहेत, जग बदलले आहे,' अशा तऱ्हेचे प्रस्ताव मांडून स्वतःचे मन मानेल तसे वागण्याचे समर्थन केले जाते. हीच गोष्ट पिढ्या न्‌ पिढ्या चालू राहिलेली दिसते. आधुनिकता म्हणजे काय, काळ ही काय चीज आहे हे पूर्णपणे समजलेले दिसत नाही. जुन्या परंपरा मोडून काढाव्यात व जग बदलेल तसे वागावे, असे म्हणणे सोपे आहे; पण त्या परंपरा काही विशिष्ट फायद्याच्या हेतूने व स्वातंत्र्याचा आनंद घेत असताना त्याची शारीरिक पातळीवर भलतीच किंमत मोजावी लागू नये, यासाठी तयार केलेल्या असू शकतात, हे विचारात घेणे आवश्‍यक आहे. एका बाजूने परंपरा सांभाळत असता दुसऱ्या बाजूने काळाबरोबर बदल घडवणे, एका बाजूने स्वातंत्र्य उपभोगत असता मनाच्या वृत्ती भरकटणार नाहीत हे बघावे लागेल, तरच कुठल्या तरी अडचणीत न सापडता म्हणजे नवीन नवीन रोगाला तोंड न द्यावे लागता, मानसिक असंतुलन, नैराश्‍य यांना सामोरे जावे लागणार नाही, हेही पाहणे आवश्‍यक ठरते. परंपरा व सामाजिक रूढी पाळत असताना व्यक्तीच्या नैसर्गिक गरजा पूर्ण होतात की नाही, हेही पाहावे लागते. खरे तर प्रत्येक व्यक्तीने म्हणजे त्याच्या मनाने स्वतःपुरते स्वार्थी विचार न जोपासता सर्वांचे हित होईल व सर्व सुखी होतील, हे उद्दिष्ट ठेवून स्वातंत्र्याचा विचार करावा लागेल.

बऱ्याच वर्षांच्या पारतंत्र्यानंतर भारत देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र होऊनही आता अनेक वर्षे लोटली आहेत. देश स्वतंत्र झाला म्हणजे भारतीय स्वतंत्र झाले. भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले म्हणजे त्यांना प्रत्यक्षात काय मिळाले? देशातील लोकांना न आवडणाऱ्या, त्यांच्या हिताच्या व त्यांना समृद्धीकडे नेणाऱ्या वाटा रोखणाऱ्या गोष्टी कराव्या लागणे आणि शोषण होणे म्हणजे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्‍ती हे स्वातंत्र्य.

प्रत्येक व्यक्‍तीला दैनंदिन जीवनात दुसऱ्याची गुलामगिरी करावी लागू नये, आनंदाने जगता यावे, आपले देशबांधव व कुटुंबीय यांच्याबरोबर आरोग्यपूर्ण सुखाने जगता यावे यासाठी स्वातंत्र्य हवे असते. परकीयांची सत्ता गेली व ते करत असलेले शोषण थांबले, पण इतर कुठल्याही प्रकारचे शोषण चालू राहिले तर त्या स्वातंत्र्याचा काय उपयोग? आरोग्यस्वातंत्र्याचेही असेच असते. मनुष्याला अस्तित्वात येण्याबरोबरच मिळालेले शरीर, मन व आत्मा या सर्व साधनांद्वारा जीवन फुलवून, आनंदात जगून, ज्या ठिकाणाहून मनुष्य पृथ्वीवर आला त्या मूळ स्थानाकडे जाता यावे, तेथे पुन्हा आनंदाने समर्पित होता यावे हा स्वातंत्र्याचा मूळ उद्देश. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "जयो।स्तु ते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे' या काव्यात "मोक्ष मुक्‍ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती' असे म्हटलेले आहे. तेव्हा जीवनाचे लक्ष्य तन-मन-आत्म्याने कुठल्याही अडचणीशिवाय साधता यावी, हीच मुक्‍ती व हाच मोक्ष. त्यात पहिला अडसर येतो तो शारीरिक अनारोग्याचा.

शरीराला वाढते ठेवण्यासाठी, आरोग्यवान ठेवण्यासाठी आवश्‍यकता असते अन्नाची व आचरणाची. परंतु मन हे शरीराच्या आरोग्याचा विचार न करता स्वतःला जे आवडेल किंवा स्वतःने जे ठरविले असेल तोच आहारविहार निवडते. यातून उद्‌भवतो अनावस्थेचा प्रसंग. ज्यात भोगावे लागतात शारीरिक हाल, तोंड द्यावे लागते रोगांना. एका बाजूने मनाला येईल ते खाण्याचे स्वातंत्र्य व दुसऱ्या बाजूने रोगाने होणारे शोषण, हे पारतंत्र्य. अशा स्वातंत्र्याचा काय उपयोग?

तेव्हा आरोग्यस्वातंत्र्याचा सूर्य पाहायचा असेल तर आयुर्वेदातल्या स्वस्थ वृत्ताच्या नियमांकडे डोळेझाक करता येणार नाही.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Friday, January 13, 2012

ऊब सूर्याची सूर्योपासना

डॉ. श्री बालाजी तांबे

सूर्योपासनेचे महत्त्वाचे अंग म्हणजे सूर्यनमस्कार. सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याच्या दिशेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करण्याने सूर्यशक्‍तीचा लाभ होतो, अग्नीचे पचनसामर्थ्यही वाढते. शारीरिक पातळीवर सूर्योपासना करणे म्हणजे अग्निसंवर्धनासाठी प्रयत्न करणे. म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने अग्नितत्त्वाचे आधिक्‍य असणारे तीळ, उष्ण वीर्याचा गूळ खाण्याची पद्धत आहे.


संपूर्ण विश्‍वाला आपल्या प्रकाशाने व तेजाने उजळवून टाकणाऱ्या सूर्याला सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भारतीयांनी तर सूर्योपासना ही सर्वश्रेष्ठ उपासना मानली आहे. ऊर्जेचा मूळ स्रोत असतो सूर्य. सूर्यकिरणांच्या साहाय्यानेच अन्नधान्याची निर्मिती होऊ शकते आणि यातूनच सर्व जिवांचे पोषण होत असते. पाणी असो, गवत असो, भाज्या, फळे, धान्य, मांस असे काहीही असो, ते शरीरात स्वीकारले जाण्यासाठी, शरीराकडून पचले जाण्यासाठी आणि त्यापासून शरीरावश्‍यक ऊर्जा, शक्‍ती तयार होण्यासाठी एक विशिष्ट संरचना प्रत्येक सजीव प्राणिमात्राला लाभलेली असते. या संरचनेतील प्रमुख घटक म्हणजे जाठराग्नी हा सूर्याचे प्रतीकरूप असतो.

सूर्य संपूर्ण विश्‍वाला ऊब देतो, तसाच जाठराग्नी शरीराला आतून ऊब देत असतो. ऊर्जा, उत्साह, शक्‍ती, सृजनता, सकारात्मकता वगैरे सर्व गोष्टींचे प्रकाशाशी अतूट नाते असते. आयुर्वेदातही अग्नीची कार्ये सांगताना या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. म्हणूनच सूर्योपासना व अग्नीचे रक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सूर्योपासनेचे महत्त्वाचे अंग म्हणजे सूर्यनमस्कार. सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याच्या दिशेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करण्याने सूर्यशक्‍तीचा लाभ होतो, अग्नीचे पचनसामर्थ्यही वाढते. नियमित सूर्यनमस्कार करण्याचे फायदे याप्रकारे सांगता येतात.


शारीरिक फायदे
- सूर्यकिरण हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम असतात. त्यामुळे उगवत्या सूर्यासमोर सूर्यनमस्कार घालण्याने हाडे मजबूत होतात, एकंदर व्यायामाच्या पद्धतीमुळे मांसपेशी घट्ट व स्थिर व्हायला मदत मिळते.
- सूर्यनमस्कारातील विविध आसने अशा प्रकारची आहेत, की त्यामुळे शरीरातील बहुतेक सर्व मोठ्या सांध्यांची हालचाल होते व त्यातूनच एकंदर लवचिकता कायम राहण्यास मदत मिळते.
- सूर्यनमस्कारामुळे एकंदर शरीरठेवण नीट राहायला मदत मिळते, दंड मजबूत होतात, पोटावरील अतिरिक्‍त मेद कमी होतो. शिवाय सूर्यनमस्कार एका विशिष्ट गतीने, विशिष्ट क्रमाने करावयाचा असल्याने एकंदर दैनंदिन हालचालींमध्ये सुसूत्रता येण्यास मदत मिळते, शारीरिक हावभावांमध्ये लालित्य येते.
- सूर्य म्हणजे ऊर्जेचे भांडार. म्हणूनच साक्षात ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्याची उपासना केली की शक्‍ती आपोआपच मिळते, उत्साह, स्फूर्तीचा अनुभव घेता येतो.
- डोळ्यांचे आरोग्य सूर्याशी संबंधित असते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. नियमित सूर्यनमस्कार दृष्टीसाठी हितकर होत.

मानसिक फायदे
- सूर्यनमस्कार करताना श्‍वासाची लय आपसूकच सांभाळली जाते, त्यालाच जर मंत्रांची जोड दिली तर प्राणनियमन व मंत्रोच्चारण यांचा समन्वय साधला जाऊन मनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात.
- विशेषतः एकाग्रता साधण्यासाठी, निर्णयक्षमता वाढविण्यासाठी सूर्योपासना उपयोगी पडताना दिसते.

किमान बारा सूर्यनमस्कार नियमित घालायचे असतात, मात्र प्रत्येकाच्या शक्‍तीनुसार, स्टॅमिन्यानुसार ही संख्या बदलू शकते, सहसा असेही दिसते, की नियमितता ठेवली की हळूहळू स्टॅमिना वाढून 12,24, ....108 असे चढत्या क्रमाने सूर्यनमस्कार घालता येतात.

त्र पाठीचा त्रास असणाऱ्यांना, खाली वाकणे शक्‍य नसणाऱ्यांना सूर्यनमस्कार घालता येत नाहीत. हृद्रोग किंवा तत्सम गंभीर आजार असणाऱ्यांनाही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार करावेत. अशा व्यक्‍तींना सूर्यनमस्कारातील आसने स्वतंत्ररीत्या व सोपी करून करण्याचा अधिक चांगला उपयोग होताना दिसतो.

मैत्रीचा तिळगूळ
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रभाव कमी होत असतो. म्हणून प्रत्येक वर्षी पौषात 14 जानेवारीला मकरसंक्रांत येते, तेव्हा सूर्याची उपासना आवर्जून केली जाते. शारीरिक पातळीवर सूर्योपासना करणे म्हणजे अग्निसंवर्धनासाठी प्रयत्न करणे. म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने अग्नितत्त्वाचे आधिक्‍य असणारे तीळ, उष्ण वीर्याचा गूळ खाण्याची पद्धत आहे. पारंपरिक रिवाजानुसार तीळ फक्‍त खाण्यासाठीच वापरायचे नसून तीळ-मिश्रित पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगाला लावणे, तीळ अग्नीवर टाकून धूप करणे, तिळाचे दान करणे वगैरे मार्गांनीही उपयोगात आणले जातात.

तीळ-गूळ खाण्याने अग्नीची ताकद वाढली की ऊब मिळते. ऊब हा शब्द प्रेम, आपुलकी यांना समानार्थी वापरला जातो. ऊब हवीहवीशी वाटते तसेच प्रेम, आपुलकी, मैत्रीभावही हवेहवेसे वाटणारे असतात. म्हणूनच ""तिळगूळ घ्या गोड बोला'' असे म्हणण्याची, सर्वांच्या प्रती असणारा मैत्रीभाव गोड बोलून दाखवण्याची आणि ऊब देणारा तिळगूळ वाटण्याची पद्धत पडली असावी.


डोळ्यांसाठी सूर्योपासना
सूर्योपासना करण्याचे अजून एक उत्तम साधन म्हणजे आकाशध्यान. संक्रांतीच्या निमित्ताने आकाशात पतंग उडवण्याची परंपराही अनेक ठिकाणी असते. यामुळे सूर्यस्नानही होते, एकाग्रता, अचूकता वाढण्यास मदत मिळते.

सूर्योपासना ही डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची असते. सूर्याचा आणि डोळ्यांचा संबंध सुचवणारी एक कथा सुश्रुतसंहितेत सांगितली आहे. जनकराजाने एकदा यज्ञात प्राण्यांचा बळी दिला. पण निरपराध प्राण्यांवर झालेला अन्याय पाहून भगवान विष्णू राजावर रागावले व त्यांनी शाप दिल्याने जनकाची दृष्टी गेली.

चूक लक्षात आल्यावर जनकाने प्रायश्‍चित्त म्हणून कठोर तपस्या केली. तेव्हा संतुष्ट झालेल्या सूर्यदेवांनी जनकाला पुन्हा दृष्टी दिली व बरोबरीने चक्षुर्वेदाचे ज्ञानही दिले. दृष्टी तेजस्वरूप असते असे आयुर्वेदातही सांगितलेले आहे. डोळ्यातील अग्नितत्त्व मंदावू नये म्हणून अंजनासारखे उपचार सुचवलेले आहेत. सूर्य हे डोळ्यांचे अधिदैवत आहे असाही आयुर्वेदात उल्लेख आहे.

गर्भसंस्कारातील महत्त्व
सूर्योपासनेला गर्भसंस्कारातही महत्त्वाचे स्थान आहे. गर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी गर्भवती स्त्रीने उगवत्या सूर्याची पूजा करण्यास सांगितले आहे.

अर्चेत्‌ आदित्यमुद्यन्तं गन्धधूपार्घ्यवार्जपैः ।
...काश्‍यप शारीरस्थान

गर्भवती स्त्रीने उदय होणाऱ्या सूर्याची गंध, धूप, नैवेद्य तसेच जप करून पूजा करावी. गर्भवतीने अस्त होणाऱ्या सूर्याकडे पाहू नये असेही पुढे काश्‍यपाचार्य सांगतात.

सूर्योपासना हा भारतीय संस्कृतीतील अविभाज्य भाग आहे. उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे, ब्राह्ममुहूर्तावर उठून अभ्यास करणे, सूर्यनमस्कार घालणे, सौरसूक्‍त वगैरे वेदमंत्रांचे श्रवण-पठण करणे असे सूर्योपासनेचे अनेक पैलू असून त्यांचा उद्देश आरोग्यरक्षण, ऊर्जासंवर्धन, उत्साह-स्फूर्तीवर्धन हाच आहे. संक्रांतीच्या निमित्ताने सूर्योपासनेला सुरुवात केली तर आपल्यालाही हे लाभ निश्‍चित मिळतील.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Saturday, January 7, 2012

ऊब सूर्याची

डॉ. श्री बालाजी तांबे


उगवत्या सूर्याचा प्रकाश कृमीनाशक असतो. मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते. त्वचारोग नाहीसा करण्यासाठी, अंतःशुद्धीसाठी सूर्यकिरणांचा उपचार म्हणून वापर केला जातो.

थंडीचा कडाका वाढला, की सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेण्यासारखे दुसरे सुख नसावे. वर्षभर ऊब देण्याचे काम सूर्यनारायण करत असतातच, पण हिवाळ्यात ही ऊब हवीहवीशी वाटणारी असते.

सूर्यकिरणांच्या माध्यमातून सूर्य ऊब तर देतोच; शिवाय आरोग्य राखण्यासही मोठा हातभार लावत असतो. दमट हवामानात, अंधाऱ्या जागी जीवजंतू वाढतात, रोगराई फैलावते, हे सर्वज्ञात आहे. सूर्यप्रकाशात मात्र जंतुसंसर्गाचा आपोआपच प्रतिबंध होत असतो. वेदांमध्ये तर उगवत्या सूर्याचा प्रकाश कृमीनाशक असतो असे स्पष्ट सांगितले आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत असावी; घर, मंदिर, चिकित्सागृह वगैरेंचे मुख्य दार पूर्वेकडे असावे असा वास्तुशास्त्राचा नियम असावा.

सूर्याची ऊब सूर्यकिरणांतून मिळते; मात्र त्यांचा संपूर्ण फायदा होण्यासाठी ती कोवळी असावी लागतात. सूर्यकिरणांतून "ड'जीवनसत्त्वाची पूर्ती होते, असे आधुनिक शास्त्रातही सांगितलेले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये हाडे ठिसूळ झाल्याने हात-पाय वाकू लागले (मुडदूस) तर सध्याच्या काळातही "सौरचिकित्सा' म्हणजे सूर्यप्रकाशात बसवले जाते. शरीराचा फिकटपणा, निस्तेजता कमी होण्यासाठीही सूर्याची ऊब महत्त्वाची असते. त्वचा तेजस्वी व्हावी, त्वचेवर नैसर्गिक चमक यावी यासाठी आजही थंड प्रदेशातील म्हणजे नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणचे स्त्री-पुरुष प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा किंवा सूर्यकिरणांप्रमाणे असणाऱ्या विशिष्ट किरणांचा उपयोग करतात. तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळवंडू शकते, हेही सर्वज्ञात आहेच.

आतपसेवनाचा उपचार
आयुर्वेदानेही वजन कमी करणाऱ्या, शरीराला हलकेपणा आणणाऱ्या उपचारांमध्ये "आतपसेवन' म्हणजे सूर्यप्रकाशात बसण्याचा समावेश केला आहे.

लंघनप्रकारः आतपसेवनम्‌ ।
ध्यबलस्थूलमनुष्येषु स्थौल्यापनयनाय ।...चरक सूत्रस्थान

चांगली किंवा मध्यम ताकद असणाऱ्या स्थूल मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते.
सुश्रुतसंहितेत सूर्यकिरणांचे अजूनही फायदे सांगितले आहेत,

दुष्टव्रणपीडितेषु कुष्ठिषु तैलपानाभ्यङ्‌गाद्‌ अनन्तरमन्तःशोधनार्थं प्रयुक्‍तश्‍चिकित्सोपक्रमः ।
जुना, दूषित व्रण नष्ट करण्यासाठी, त्वचारोग नाहीसा करण्यासाठी, अंतःशुद्धीसाठी सूर्यकिरणांचा उपचार म्हणून वापर केला जातो.
स्वेद उपचार समजावतानाही अनेक ठिकाणी उन्हाचा वापर केलेला आढळतो. काही मानसिक रोगांवर उपचार म्हणून उन्हात बसवावे, झोपवावे असे उल्लेख सापडतात. एकंदरच आरोग्य टिकवताना किंवा मिळवताना सूर्याची मोठी आवश्‍यकता असते.

ब्रह्मांडी सूर्य, तैसे पिंडी पित्त
"पिंडी ते ब्रह्मांडी' हा आयुर्वेदातला महत्त्वाचा सिद्धान्त आहे. जे काही विश्‍वात आहे ते सर्व सूक्ष्म स्वरूपात शरीरात आहे. याच तत्त्वानुसार जसा बाह्य जगतात सूर्य आहे, तसे शरीरात पित्त आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.

विसर्गादानविक्षेपैः सोमसूर्यानिलः यथा ।
धारयन्ति जगद्देहं कफपित्तानिलस्तथा ।।

सूर्य जसे बाह्यसृष्टीत परिवर्तनाचे, पचनाचे काम करतो, तसेच त्याचे प्रतीकस्वरूप असणारे पित्त अन्नपचनासाठी शरीरातील धातुपरिवर्तनासाठी जबाबदार असते. हेच पित्त शरीराची ऊब कायम ठेवण्यासाठी मदत करणारे असते.

सूर्याचा आणि पित्ताचा प्रवासही एकाच पद्धतीने होत असतो. दुपारी बारा वाजता सूर्य सर्वाधिक प्रखर असतो, याच वेळी शरीरातील पाचकपित्ताची पाचनक्षमता सर्वोत्तम असते. म्हणूनच दुपारचे जेवण वेळेवर घ्यावे व चारही ठाव परिपूर्ण असावे असे आयुर्वेद सांगतो.

सूर्याच्या उबेत तेलाची सिद्धता
अशा प्रकारे सूर्याचा उपयोग आयुर्वेदाने अनेक प्रकारांनी करून घेतला आहे. यालाच योगशास्त्राने जोड दिली आणि त्यातून सूर्यनमस्कार हा योगप्रकार साकार झाला.

सूर्याच्या उष्णतेचा उपयोग आयुर्वेदाने काही विशिष्ट तेले बनविण्यासाठी केला आहे. शिरोरोगावर "महानील' नावाचे तेल सांगितले आहे.
या तेलाचे वैशिष्ट्य असे, की हे तेल सिद्ध करण्यासाठी अग्नीचा उपयोग केलेला नाही, तर "आदित्यपाक' करायला सांगितला आहे.

कुर्यात्‌ आदित्यपाकं वा यावत्‌ शुष्को भवेत्‌ रसः ।...अष्टांगसंग्रह उत्तरतंत्र
आदित्यपाक करण्यासाठी सर्व गोष्टी लोखंडाच्या भांड्यात एकत्र करून भांडे उन्हात ठेवले जाते व सूर्याच्या उष्णतेने हलके हलके त्यातला जलांश उडून गेला की उरलेले तेल गाळून घेऊन वापरले जाते. सूर्यशक्‍तीचा असाही वापर करून घेतलेला आहे.

त्वचारोगासाठी आतपस्वेद
याशिवाय त्वचारोगावर उपचार करतानाही आतपस्वेद म्हणजे सूर्यकिरणांच्या उष्णतेचा उपयोग करून घेतला आहे.

कुष्ठ, तमालपत्र, मनःशिळा वगैरे द्रव्ये तेलात मिसळून तयार झालेल्या मिश्रणाचा तांब्याच्या भांड्याला लेप करावा व नंतर तो लेप "सिध्म कुष्ठ' (एक त्वचारोग) झालेल्या ठिकाणी लावून रुग्णाला उन्हात बसवावे. याप्रमाणे सात दिवस केल्यास सिध्म कुष्ठ बरे होते, असे चरक संहितेत सांगितलेले आढळते.
याचप्रमाणे कोड आले असताही विशिष्ट औषधांचा लेप लावून किंवा औषधी तेल लावून त्या ठिकाणी सूर्यप्रकाश घ्यावा असे सांगितले जाते. काही पाठात तर रक्‍तशुद्धीकर वनस्पतींचा रस पिऊन अंगाला तेल लावून सूर्यकिरणात बसायला सांगितले आहे.

सुश्रुतसंहितेमध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग जलशुद्धीसाठीसुद्धा सांगितला आहे.

व्यापन्नस्य चाग्निक्वथनं सूर्यातपप्रतापनं....। सुश्रुत सूत्रस्थान

दूषित पाणी निर्दोष करण्यासाठी अग्नीच्या उष्णतेने कढवावे किंवा सूर्यप्रकाशात (उन्हात) सडकून तापवावे.

सूर्यशक्‍तीचा संबंध आपल्या शरीरातील चेतासंस्थेच्या व हाडांच्या आरोग्याशीही असतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे अंधार नाहीसा झाला की निसर्ग जागा होतो व सर्वदूर उत्साह संचारतो, तसेच मेंदू व चेतातंतूंचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, चेतनत्व येण्यासाठीही सूर्यशक्‍तीची आवश्‍यकता असते.
स्वतःची प्रकृती, वय, प्रदेशानुसार सूर्यकिरणांची तीव्रता वगैरे गोष्टींचा नीट विचार करून सूर्यशक्‍तीची उपासना केली, सूर्याची ऊब मिळवली तर तनाचे व मनाचेही आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत मिळेल हे नक्की.

सूर्यनमस्काराचा फायदा
सूर्यनमस्कार मुळात उगवत्या सूर्याकडे तोंड करून करायचे असतात. यामुळे कृमिनाशन आपोआपच घडते, शिवाय सूर्यनमस्कारात समाविष्ट केलेल्या आसनांचाही फायदा मिळतो. सूर्यनमस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे ते करायला फारसा वेळ लागत नाही, पण त्यातून अनेक आसनांचे फायदे मिळतात. नियमितपणे सूर्यनमस्कार घालायला लागले की त्यातून श्‍वासाचेही नियंत्रण आपोआपच साधले जाते.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Friday, January 6, 2012

सर्व उबेचा प्रणेता - सूर्य

डॉ. श्री बालाजी तांबे
सूर्य केवळ प्रकाश देत नाही, तर ऊबही देतो. म्हणून जीवन जगण्यासाठी शक्‍ती व प्रेरणा मिळते. तसे पाहताना व्यायामाची ऊब मिळते, तीसुद्धा नाभीच्या ठिकाणी असलेल्या मणिपूर चक्रातील सूर्याच्या उत्तेजनेमुळेच. आहारातून मिळणारी ऊब हीसुद्धा जाठराग्नीमुळे मिळते. तसे पाहता आहार सूर्यामुळे मिळतो, तेव्हा सूर्य हाच सर्व उबेचा प्रणेता आहे असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. सर्व आरोग्याचा, दीर्घायुष्याचा व शतायुष्याचा कारक सूर्यच आहे. अग्नी सूर्याचा प्रतिनिधी आहे, असे समजूनच जगात ठिकठिकाणी अग्निपूजा होत असते.

"संध्याकाळचा बाहेर जातो आहेस. रात्री परत येताना थंड वारा डोक्‍याला व कानाला लागेल, तेव्हा मफलर व स्वेटर घेऊन जा,' अशा तऱ्हेचा सल्ला ऐकू येऊ लागला की थंडीचे दिवस आले आहेत असे कळते. ऋतू थंडीचा असला, तरी दिवसा थंडीचे फार कौतुक होत नाही. कारण आकाशातील सूर्य फारसा प्रखर नसला तरी तो सगळ्यांना तापवत ठेवतो, म्हणजेच ऊब देतो. हिल स्टेशनला, डोंगरावर वगैरे गेले तर तेथे एकूणच वारे जास्त असल्यामुळे सूर्य असला तरी दिवसाही थंड वाटते. तेथे झाडी वगैरे वाढलेली असली तर त्यामुळेही वातावरण थंड राहते.

आपल्याला असे वाटते, की सूर्य फक्‍त प्रकाश देतो, त्याच्यामुळे आपल्याला दिवसा दिवे वापरावे लागत नाहीत व खर्च वाचतो. परंतु सूर्य केवळ प्रकाश देत नाही, तर ऊबही देतो. म्हणून जीवन जगण्यासाठी शक्‍ती व प्रेरणा मिळते. तसे पाहताना व्यायामाची ऊब मिळते तीसुद्धा नाभीच्या ठिकाणी असलेल्या मणिपूर चक्रातील सूर्याच्या उत्तेजनेमुळेच. आहारातून मिळणारी ऊब हीसुद्धा जाठराग्नीमुळे मिळते. तसे पाहता आहार सूर्यामुळे मिळतो, तेव्हा सूर्य हाच सर्व उबेचा प्रणेता आहे, असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही.

सकाळी सूर्योदयापूर्वी उठून व्यायाम, स्नान वगैरे आटोपून उगवत्या सूर्याची ऊब शरीराला मिळवून दिली की आरोग्य उत्तम राहते, असा सर्वांचा अनुभव असतो. अग्नी सूर्याचा प्रतिनिधी आहे असे समजूनच जगात ठिकठिकाणी अग्निपूजा होत असते. सूर्याचे आभार मानावे तेवढे थोडेच असते.
सूर्य उगवला आहे वा मावळला आहे किंवा आता दिवस आहे वा रात्र आहे, हे दृष्टिहीन माणसालाही वातावरणातील तापमानात होणाऱ्या बदलामुळे कळू शकते.

सूर्याच्या उबेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी योजना करता येते सूर्यनमस्कारांची. या सूर्यनमस्कारांमुळे नाभीच्या ठिकाणी असलेल्या मणिपूर चक्रातील सूर्याला जागृत करणे म्हणजेच त्याचा प्रकाश आतून सगळीकडे खेळवणे, हे काम शक्‍य होते. सूर्य जसा सर्वांना प्रकाश देतो तसे जगात प्रत्येक व्यक्‍तीने चमकावे, सूर्याप्रमाणे आपणही जगाला काही द्यावे, अशी प्रेरणा घ्यावी. सूर्योपासनेने वाढलेल्या श्रद्धेचाही खूप मोठा फायदा होतो. हे सर्व लक्षात घेतले तर सूर्यापासून ऊब मिळविण्याचे फायदे पटू शकतील. काही ऋतूंमध्ये दिवसभरात सूर्य अगदी कमी वेळ आकाशात असतो. अशा काळात व थंड प्रदेशात येणारी अडचण लक्षात घेतली तर सूर्य व सूर्यापासून मिळणारी ऊब या गोष्टींचे महत्त्व आपल्याला पटेल व सूर्यावरची श्रद्धा वाढू शकेल.

सर्वांत महत्त्वाची सूर्योपासना म्हणजे सूर्योदयाच्या वेळी कमीत कमी बारा सूर्यनमस्कार घालणे. "क्रियायोगा'च्या पुस्तकात या क्रियेला इंग्रजीत cosmic prayer (कॉस्मिक प्रेअर) असे नाव दिलेले आहे. त्यावरूनही ही वैश्‍विक कल्याणाची क्रिया आहे हे लक्षात येईल. सूर्यनमस्कारात अनेक प्रकारच्या शारीरिक अवस्था अभिप्रेत असतात. मुख्य म्हणजे डोके उचलून पाठीला ताण दिल्यानंतर सूर्यचक्राचा विकास होण्यासाठी खास मदत मिळते आणि शरीरातील अग्नी म्हणजे सर्व हॉर्मोनल संस्था संतुलित राहून आरोग्याला मदत मिळते व शरीरात ऊब राहते. सर्व आरोग्याचा, दीर्घायुष्याचा व शतायुष्याचा कारक सूर्यच आहे, हे आपल्या सर्वांना अनुभवाने माहीत असते. शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी, म्हणजेच दीर्घायुष्यासाठी व भरपूर ताकद मिळविण्यासाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो.

वनस्पतींना सूर्याचे प्रेम अधिक असते. कारण त्यांनासुद्धा उबेचीच आवश्‍यकता असते. प्रयोगात असे दिसून आलेले आहे, की शेतातील रोपांना संगीत ऐकवले असता किंवा त्यांची प्रेमाने देखभाल केली असता कणसे अधिक भरतात, तसेच अधिक चांगल्या प्रतीचे धान्य तयार होते. पण तरीही वनस्पतींना सूर्यप्रकाशाची गरज असतेच. बाटलीत झाड लावून ती बाटली घरात ठेवली तर झाड खिडकीच्या दिशेने वाढते, हा प्रयोग शाळेत असताना सर्व मुलांनी केलेला असतो. म्हणजे वनस्पतींनाही ओढ असते सूर्यप्रकाशाची व सूर्याच्या उबेची.

एकूण, सूर्य सर्व प्राणिमात्रांना ऊब देतो, माया देतो; पण ती पित्याच्या प्रेमाची ऊब असते. तेव्हा एका विशिष्ट वेळी वडील रागावलेले असताना मुलाला वडिलांकडून लाडाची अपेक्षा करता येत नाही, तसे दुपारी सूर्याचा प्रकाश वाढल्यानंतर किंवा काही विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट ऋतूत सूर्याची ऊब घेता येत नाही. परंतु थंडीत सूर्याची ऊब सर्वांना आवश्‍यक असते. सूर्याच्या उबेचे महत्त्व सर्वांना पटण्यासारखे आहे.

www.balajitambe.com

ad