Showing posts with label आग्र्याचा पेठा. Show all posts
Showing posts with label आग्र्याचा पेठा. Show all posts

Friday, November 25, 2011

आग्र्याचा पेठा

डॉ. श्री बालाजी तांबे
शरीरातील कडकी, उष्णता हा आरोग्याचा मुख्य शत्रू. शरीरातील व पोटातील उष्णतेमुळे अनेक प्रकारचे रोग होतात. कोहळ्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला तर शरीरातील कडकी कमी होऊन शरीर थंड होते. कोहळा हा नुसताच थंड नसून शांतही असतो. म्हणूनच कोहळ्याचा उपयोग मानसिक रोगांमध्ये केलेला असावा. मनुष्यमात्राला हवी शांती. शांती म्हणजेच थंडपणा, शांती म्हणजेच वृत्तीरहित मन, शांती म्हणजेच आराम व समाधान. कुठल्याही प्रकारचा कितीही मानसिक ताण आला तरी जो मनुष्य शांत असतो तो सर्व आघात सहन करू शकतो. असा मनुष्य विश्‍वात घडणाऱ्या घटनांना किंवा त्या व्यक्‍तीच्या आयुष्यात घडणाऱ्या नको वाटणाऱ्या घटनांना सामोरे जाऊ शकतो किंवा त्यांचे निवारण करू शकतो.

कोठल्याही प्राण्याचे अंडे दृष्टी आकर्षित करून घेते, कारण त्याचा आकार. हा एक विशिष्ट आकार ज्याला भूमितीमध्ये पॅराबोलिक (अंडाकृती) म्हणतात, तो एक निसर्गाचा महत्त्वाचा आविष्कार आहे व तो सर्व ठिकाणी पाहायला मिळतो. एका टोकाला थोडासा निमुळता, तसेच गोल नाही व लांबटही नाही, अशा प्रकारे सर्व बाजूंनी कुठेही कोपरा नसलेला, वाहता वर्तुळाकार असा हा आकार. कोहळा हे असे एक फळ आहे की त्याचा आकार फारच सुंदर असतो, ज्याला संस्कृतमध्ये कूष्मांड (उष्णता नसलेले अंडे) व हिंदीमध्ये पेठा म्हणतात. तसेच त्याचे शरीराशी साधर्म्य असे, की कोहळ्यावर एक प्रकारची लव असते, ती नंतर झडून जाते. कोहळ्याचा बाहेरून रंग पांढरा म्हणावा की हिरवा म्हणावा कळत नाही, पांढरट-हिरवट असतो. कोहळ्याच्या आत जणू बर्फ भरलेला असतो. त्याची प्रचिती पेठा नावाची बर्फी खाताना येते. दाताने पेठा तोडताना पांढरा स्वच्छ बर्फाचा तुकडा तोडतो आहोत असा भास होतो. परंतु तो नुसताच रंगाला व स्पर्शाला बर्फासारखा नसून गुणांनी अत्यंत थंड असतो. कोहळा शीतवीर्य व वीर्यवर्धक असतो. बदाम हे छोटेसे फळ असून त्यात ओलावा कमी व तेल अधिक असते, बदाम स्पर्शाला कठीण, फोडायला कडक व वीर्यवर्धक असतो. पण बदाम सर्वांनाच परवडतो असे नाही, कोहळा मात्र सर्वांना परवडतो.

शरीरातील कडकी, उष्णता हा आरोग्याचा मुख्य शत्रू. शरीरातील व पोटातील उष्णतेमुळे अनेक प्रकारचे रोग होतात. कोहळ्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला तर शरीरातील कडकी कमी होऊन शरीर थंड होते. कोहळ्याचा दुसरा एक महत्त्वाचा गुण म्हणजे तो वेलीवरून तोडल्यावर वर्षभर टिकू शकतो. आतून उष्णता असली की वस्तू लवकर खराब होते व तिची वाटचाल क्षरणाकडे वेगाने होते. कोहळा हा नुसताच थंड नसून शांतही असतो. म्हणूनच कोहळ्याचा उपयोग मानसिक रोगांमध्ये केलेला असावा. मनुष्यमात्राला हवी शांती. शांती म्हणजेच थंडपणा, शांती म्हणजेच वृत्तीरहित मन, शांती म्हणजेच आराम व समाधान. कुठल्याही प्रकारचा कितीही मानसिक ताण आला तरी जो मनुष्य शांत असतो तो सर्व आघात सहन करू शकतो. असा मनुष्य विश्‍वात घडणाऱ्या घटनांना किंवा त्या व्यक्‍तीच्या आयुष्यात घडणाऱ्या नको वाटणाऱ्या घटनांना सामोरे जाऊ शकतो किंवा त्यांचे निवारण करू शकतो. मनुष्य उष्ण प्रकृतीचा, गरम डोक्‍याचा, पित्तकर स्वभावाचा असला तर तो चिडचिड करतो, लगेच कावतो, ओरडतो, रागावतो, मारामारीपर्यंतही पोचू शकतो. कोहळ्याची बरोबरी आतून शांत असलेल्या व्यक्‍तीशी केली तर सर्व दुष्ट शक्‍तींना सामोरे जायची ताकद कोहळ्यात कशी असते हे समजते. म्हणूनच भारतीय परंपरेत घराबाहेर कोहळा लटकवून ठेवण्याची पद्धत दिसते. यामुळे बाहेरून येणारी वाईट दृष्टी, वाईट शक्‍ती असे अनाकलनीय अदृष्ट आघात कोहळ्यावर पडल्यावर कोहळा त्यांना निवृत्त करू शकतो, त्यांचा पराजय करू शकतो कारण तो स्वतः आत शांत व प्रेमाचा ओलावा धरून असतो. कारागृहात असणाऱ्या कैद्यांना शिक्षा करत असताना ती शिक्षा त्याला न होता त्याच्या दुर्बुद्धीला व्हावी व दुर्बुद्धी निघून जावी तसेच दुष्ट शक्‍तीमधील दुष्टत्वाचे अस्तित्व विरून जावे हाच उद्देश असतो. दुष्टपणा ह्या संकल्पनेत दुसऱ्याचे अधिकार बळकवणे अभिप्रेत असते, त्यामुळे सर्व दुष्ट शक्‍तींना प्रलोभन दाखवून गप्प करता येते किंवा नष्ट करता येते किंवा त्यांच्यात बदल घडविता येतो. प्राण व जीवन हे सर्वांना प्रिय असते व सर्वांनाच आवश्‍यक असते. त्यासाठी दुष्ट मनुष्य सूड म्हणून एखाद्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो, तशा दुष्ट शक्‍ती पण कुठल्यातरी जिवंत प्राण्याचा बळी मागत असतात. त्यांना बळी तर द्यायचा नाही, पण त्यांची इच्छा पूर्ण करून त्यांच्यातील दुष्टपणा घालवायचा ह्या उद्देशाने कुठलेही चांगले कृत्य करत असताना विघ्न टाळण्यासाठी भारतीय परंपरेत बळी देण्याची प्रथा सुरू झालेली आहे. हा बळी प्रत्यक्ष प्राण्याचा न देता कोहळ्याचा बळी देण्याचे शास्त्र शोधून काढले असावे. सुरुवातीला कोहळा व दुष्ट शक्‍ती ह्यांच्यात साम्य दिसावे व आकर्षण वाटावे म्हणून कापलेल्या कोहळ्यावर लाल गुलाल टाकून वर उडदाचे काही दाणे वगैरे टाकायची पद्धत ठेवली, जेणेकरून दुष्ट शक्‍ती कोहळ्याकडे आकर्षित होऊन त्या दुष्ट शक्‍तीचे तामसिकत्व कोहळ्याच्या सात्त्विकतेत विसर्जित होऊन जाईल. अर्थात काही तामसिक माणसे प्रत्यक्ष प्राण्यांचा बळी देण्यात समाधान मानत असली तरी गरज दुष्ट शक्‍तींचा बीमोड करणे हीच असते, त्यासाठी प्राणी मारण्याची आवश्‍यकता नाही. असा हा कोहळा, जो बळी देण्यापासून खाण्यापर्यंत उपयोगाला येतो, दारासमोर टांगता येतो, घरात ठेवता येतो, वेळप्रसंगी अन्न म्हणून उपयोगात आणता येतो. कोहळ्याचा रस, कोहळ्याची भाजी, कोहळ्याचे वाळवलेले सांडगे, कोहळ्याची मिठाई-पेठा अशा सर्व प्रकारे कोहळा हे बहुगुणी फळ उपयोगात आणले जाते. आग्र्याचा पेठा खूप प्रसिद्ध आहे. पूर्वी सैनिकांना टिकाऊ व ताकद वाढविणारी, सहज पचणारी मिठाई व अन्न म्हणून पेठा बनविला गेला. आग्र्याच्या मानसिक रुग्णांसाठी पण त्याचा उपयोग होत असावा. कोहळ्याचे उत्पादन करणे अत्यंत सोपे आहे. चांगल्या प्रकारे शेती केली तर एका वेलीवर 30-40 कोहळे येऊ शकतात. कोहळ्याची कीर्ती पाहून त्याचा उपचारात वापर केल्याने अनेक रुग्णांना जीवदान मिळालेले आहे. Life Style, Marathi Blog

कोहळा




Admagnet - X

डॉ. श्री बालाजी तांबे
स्वयंपाक, औषधीकरणात कोहळा वापरला जातो. यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्‍यकता असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूळ यांतही औषधी गुणधर्म असतात.

कोहळा हे काकडीच्या जातीतील फळ होय. भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंड्याच्या आकाराचे; पण साधारण दहा-बारा पट मोठे असते. ताज्या फळावर पांढरी दाट लव असते, काही काळाने ही लव गळून जाते. कोहळा हिरव्या रंगाचा असतो. कोहळ्याचा वेल असतो, पाने खरखरीत असतात, तर फुले पिवळ्या रंगाची असतात. वसंत ऋतूमध्ये फुले येतात. ग्रीष्मात फळे धरतात. ही फळे तयार होईपर्यंत शरद-हेमंत ऋतू उजाडतो.

स्वयंपाक, औषधीकरणात तर कोहळा वापरला जातोच, पण यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्‍यकता असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूळ औषधी गुणधर्माचे असतात. चांगली जमीन असली तर एका वेलाला 50-60 कोहळे धरतात. कोवळा कोहळा खाण्यास निषिद्ध समजला जातो. पूर्ण वाढ झालेला, तयार झालेला कोहळा वापरण्यास योग्य असतो. असा कोहळा वेलावरून काढून घेतल्यावर वर्षभर टिकू शकतो.

कोहळ्याला संस्कृत भाषेत कुष्मांड असे म्हणतात, ज्याच्या बीजात किंचितही उष्णता नाही तो कुष्मांड. अर्थातच कोहळा शीतल गुणाचा असतो. याशिवाय कोहळ्याच्या वेलीला पुढीलप्रमाणे पर्यायी नावे आहेत-

महत्फला, बृहत्फला - मोठे फळ असणारी
क्षीरफला- दुधासारखा पांढरा गर असणारे फळ असणारी
स्थिरफला - जिचे फळ दीर्घ काळ टिकते ती
सोमका - शीतल गुणधर्माची
पीतपुष्पा - पिवळ्या रंगाची फुले असणारी
कुष्मांडाला हिंदीत पेठा, इंग्रजीत ऍश गोर्ड, गुजरातीत कोहळू म्हटले जाते, तर याचे बोटॅनिकल नाव बेनिनकासा सेरिफेरा (Benincasa cerifera) असे आहे.

धातुपोषक, पित्तनाशक
आयुर्वेदाच्या ग्रंथात कोहळ्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे सांगितले आहेत-
कुष्माण्डं बृंहणं वृष्यं गुरू पित्तास्रवातनुत्‌ । बालं पित्तापहं शीतं मध्यमं कफकारकम्‌ ।।
वृद्धं नातिहिमं स्वादु सक्षारं दीपनं लघु । बस्तिशुद्धिकरं चेतोरोगहृत्सर्वदोषजित्‌ ।।
...भावप्रकाश

कोहळा धातूंची ताकद वाढवतो, विशेषतः शुक्रधातूला पोषक असतो. पित्तनाशक, रक्‍तदोष दूर करणारा आणि वातसंतुलन करणारा असतो. तयार झालेला ताजा कोहळा अतिशय थंड असल्याने, पितशमनास उत्तम असतो.

तोच काही दिवसांनी मध्यम पिकला की प्राकृत कफाचे पोषण करतो, तर साधारण जून झाला असता पचण्यास हलका होतो, साधारण थंड असतो, चवीला गोड, क्षारयुक्‍त असतो, अग्नीला प्रदीप्त करतो, बस्ती (मूत्राशयाची) शुद्धी करतो, सर्व दोषांना संतुलित करतो. पथ्यकर असतो आणि सर्व प्रकारच्या मानसिक रोगांवर उपयोगी असतो.

कोहळ्याची भाजी
कोहळा धुवून त्याची साल काढून घ्यावी. कापून आतल्या बिया काढून टाकाव्यात. गराचे साधारण दीड सेंटिमीटर लांबी-रुंदी-उंचीचे तुकडे करावेत. पातेल्यात तूप घ्यावे. गरम झाले की त्यात जिरे, हिंग, किसलेले आले टाकावे. हवे असल्यास मिरचीचे तुकडे टाकावेत. जिरे तडतडले की कोहळा टाकून, हलवून वर झाकण ठेवावे. कोहळा शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे फोडी फार नरम होणार नाहीत याकडे लक्ष ठेवावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. वरून ओल्या नारळाचा कीस तसेच बारीक कापलेली कोथिंबीर घालावी. कधीतरी रुचिपालट म्हणून भाजी शिजताना मोड आलेल्या मेथ्या, हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ घालता येते. या प्रकारची कोहळ्याची भाजी अतिशय पथ्यकर, रुचकर आणि पचण्यास हलकी असते. भाकरीबरोबर खाण्यास छान लागते.

कोहळ्याचे रायते
कोहळा धुवून त्याची साल काढून टाकावी. कापून आतल्या बिया वेगळ्या कराव्यात. बारीक तुकडे करावेत. पातेल्यात थोडेसे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, बारीक वाटलेली मिरची टाकावी. झाकण ठेवून शिजू द्यावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. शिजल्यावर वेगळ्या भांड्यात गार करायला ठेवावे. गार झाल्यावर वरून दही व कापलेली कोथिंबीर घालावी.

औषधी कोहळा
- कोहळा औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापरला जातो-
- कोहळा बस्तीशुद्धिकर व शीत वीर्याचा असल्याने लघवी साफ होण्यास मदत करतो. त्यामुळे लघवीला जळजळ होत असल्यास, लघवी अडखळत किंवा पूर्ण होत नसल्यास व्यवस्थित तयार झालेल्या कोहळ्याच्या गराचा चार - पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जिरे पूड व चिमूटभर धणे पूड टाकून घेण्याचा उपयोग होतो.
- आम्लपित्ताचा त्रास होण्याची सवय असणाऱ्यांनी सकाळी कोहळ्याचा चार-पाच चमचे रस साखरेसह घेणे चांगले असते. डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे यासारखे त्रास बंद होतात.
- मूतखडा किंवा लघवीतून खर जाते त्या विकारावर कोहळ्याचा चार-पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जवखार टाकून घेण्याचा फायदा होतो.
- लघवी अडली असल्यास किंवा पूर्ण साफ होत नसल्यास किसलेला कोहळ्याचा गर ओटीपोटावर ठेवण्याचा उपयोग होतो.
- शरीरात उष्णता अति प्रमाणात वाढल्याने नाकातून रक्‍त येते, लघवीतून रक्‍त जाते किंवा शौचावाटे रक्‍तस्राव होतो. यावर चार चमचे कोहळ्याचा रस व दोन चमचे ताज्या आवळ्याचा रस हे मिश्रण खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो.
- तीव्र प्रकाशात, संगणकावर दीर्घ काळ काम करण्याने किंवा प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांतून पाणी येणे यांसारख्या तक्रारींवर डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवण्याचा व नाकात साजूक तुपाचे थेंब टाकण्याचा उपयोग होतो.
- तापामुळे हाता-पायांच्या तळव्यांची तीव्र जळजळ होते. अशा वेळी तळव्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवल्याने बरे वाटते.
- कोहळ्याचे बी सोलून घेऊन व्यवस्थित सुकवून ठेवता येते. हे बी दुधात शिजवून तयार झालेली खीर खाल्ल्यास धातूंचे पोषण होते, शरीर भरण्यास मदत मिळते.
- वीर्यवृद्धीसाठी कोहळ्याचा पाक उत्तम असतो. शुक्राणूंची संख्या किंवा गती कमी असणे, अशक्‍तपणा जाणवणे वगैरे त्रासांवर, तसेच कोणत्याही दीर्घ आजारपणामुळे येणारी अशक्‍तता दूर होण्यास, शस्त्रकर्मानंतर कोहळ्यापासून तयारी केलेले धात्री रसायनासारखे रसायन घेणे उत्तम असते.
- जून कोहळा क्षारयुक्‍त व अग्निदीपनास मदत करणारा असल्याने, कोहळ्याचा क्षार करता येतो. हा क्षार पोटदुखीवर उत्तम असतो, पचनास मदत करतो.
- पेठा ही उत्तर भारतातील, आग्रा येथील प्रसिद्ध मिठाई कोहळ्यापासून बनविलेली असते. गुलाबाच्या अर्कासह तयार केलेला पेठा अतिशय चविष्ट असतो, तसेच पौष्टिकही असतो.
- दक्षिण भारतात सांबार करताना त्यात कोहळा टाकण्याची पद्धत आहे. कोहळ्याचे सांडगे करून ठेवता येतात. तसेच कोहळ्याची भाजी, रायता, सूप वगैरेही बनवता येते. पथ्यकर असा कोहळा स्वयंपाकात या प्रकारे वापरला तर त्याचा आरोग्य राखण्यास निश्‍चित हातभार लागतो.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad