Showing posts with label चिंता. Show all posts
Showing posts with label चिंता. Show all posts

Friday, October 3, 2008

मना सज्जना

मना सज्जना


बुद्धी, संयम व स्मृती भ्रष्ट झाल्या, की व्यक्‍तीकडून अनुचित, अयोग्य कार्य घडते, त्यातून रोगाची सुरवात होते, असे प्रज्ञापराधाचे वर्णन आयुर्वेदाने केले आहे. यात मनाचा मोठा सहभाग असतो; कारण बुद्धीने योग्य काय, अयोग्य काय याचा सारासार विचार मनासमोर ठेवला, तरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या इंद्रियांवर वर्चस्व मनाचेच असते. ......
शरीर व मन यांचा संबंध प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. आयुर्वेदात या संबंधात सांगितले आहे,

रुपस्य सत्त्वस्य च सन्ततिर्या नोक्‍तस्तदादिर्नहि सो।
स्ति कश्‍चित्‌ ।
... चरक शारीरस्थान

शरीर व मन यांचा संबंध अनादी काळापासून चालत आलेला आहे. जेव्हापासून हे जग आहे, तेव्हापासून शरीर व मन एकमेकांशी निगडित आहेत. म्हणूनच रोग शारीरिक असो वा मानसिक, त्यावर उपचार करताना मनाला प्राधान्य द्यावे लागते. आयुर्वेदाने रोगांची तीन मुख्य कारणे सांगितलेली आहे. त्यात प्रज्ञापराध हा सर्वात महत्त्वाचा सांगितला. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, संयम व स्मृती भ्रष्ट झाल्या की व्यक्‍तीकडून अनुचित, अयोग्य कार्य घडते, त्यातून सर्व दोष बिघडतात आणि रोगाची सुरुवात होते असे प्रज्ञापराधाचे वर्णन केलेले आहे. मात्र यात मनाचा मोठा सहभाग असतो. कारण बुद्धीने योग्य काय अयोग्य काय याचा सारासार विचार मनासमोर ठेवला तरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या इंद्रियांवर वर्चस्व मनाचेच असते. त्यामुळे शेवटी मनाला जे हवे तेच कार्य घडते.

यच्च अन्यदीदृशं कर्म रजोमोहसमुत्थितम्‌ ।
प्रज्ञापराधं तं शिष्टा ब्रुवते व्याधिकारणम्‌ ।।
... चरक शारीरस्थान

रज व तम गुणाने आविष्ट झालेले मन जेव्हा इंद्रियांकडून चुकीची कार्य करवून घेते तेव्हा त्याला प्रज्ञानपराध असे म्हणतात. या सर्व वर्णनावरून एक गोष्ट लक्षात येते की प्रज्ञापराध होऊ नये असे वाटत असेल म्हणजेच रोगाला आमंत्रण द्यायचे नसेल तर मन शुद्ध व सात्त्विक असायला हवे असेल तर मनाचे दोष - रज व तम - कमी व्हायला हवेत, मनावर नियंत्रण ठेवता यायला हवे. मनावर नियंत्रण कोण ठेवते हे आयुर्वेदात खालील प्रमाणे सांगितले आहे.

इन्द्रियाभिग्रहः कर्म मनसः स्वस्यनिग्रहः ।
... चरक शारीरस्थान

इंद्रियांचे संचालन करणे, इंद्रियांचे नियमन करणे, स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवणे अर्थात अहितकर विषयांपासून स्वतःला परावृत्त करणे, ही मनाची कार्ये आहेत. म्हणजेच मनावर नियंत्रण स्वतः मनच ठेवू शकते. बऱ्याचदा आपण अनुभवतो की एखादी गोष्ट करण्याचा मोह होत असतो, बुद्धी-धृती मनाला बजावत असतात की हे करणे योग्य नाही तरीही मन जोपर्यंत मोहापासून स्वतःला परावृत्त करत नाही तोपर्यंत मनाची द्विधा स्थिती चालू राहते. मनाने बुद्धीला कौल दिला तर प्रापराध टळतो अन्यथा मनाने स्वतःचीच मनमानी केली तर प्रज्ञापराध घडतो आणि आपण चुकीचे काम करून बसतो.

मनाने बुद्धीचे ऐकावे यासाठी मनाला अनुशासनाच्या बेडीत अडकवणे भाग असते. याचसाठी आयुर्वेदाने सद्‌वृत्त सांगितले आहे. शरीराच्या आरोग्यासाठी स्वस्थवृत्त तर मनाच्या आरोग्यासाठी व संपन्नतेसाठी सद्‌वृत्त हवेच.

सद्‌वृत्तातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत -
-सकाळ संध्याकाळ स्नानसंध्या करावी.
-अग्नीची उपासना करावी.
-गुरु, आचार्य, सिद्ध यांची पूजा करावी.
-पाय स्वच्छ ठेवावेत.
-अपवित्र, अप्रशस्त वस्तूकडे पाहू नये.
-अन्नाची निंदा करू नये.
-निंद्य व्यक्‍तीचे म्हणजे चुकीची कामे करण्याऱ्या व्यक्‍तीचे अन्न खाऊ नये.
-रात्रीच्या वेळी दही खाऊ नये.
-शास्त्राने सांगितलेल्या, स्वतः केलेल्या किंवा एखाद्या संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करू नये.
-रात्री भटकू नये.
-अनोळख्या ठिकाणी भटकू नये.
-सायंकाळी भोजन, शयन, अध्ययन व मैथुन करू नये.

अशा अनुशासनाने मनाला नियंत्रित केले तर त्यास चुकीचे निर्णय घेण्यापासून परावृत्त करता येते.

मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुसरी उपयुक्‍त योजना म्हणजे श्‍वासावर नियंत्रण.

"प्राणो येन बध्यते मनः तेनैव बध्यते' असे शास्त्र सांगते. प्राण म्हणजे श्‍वास, श्‍वासावर नियंत्रण ठेवणाऱ्या ज्या सर्व क्रिया आहेत, त्यामुळे मनावरही नियंत्रण मिळवता येते. मनाचा व श्‍वासाचा संबंध आपण अनुभवतोच. मन अस्वस्थ असले की श्‍वसनाचा वेग वाढतो तर मन शांत असले की श्‍वसनही संथ होते. म्हणूनच दीर्घश्‍वसन हे मनःशांतीसाठी उत्तम असते. अनुलोम-विलोम, प्राणायाम, ॐकार गूंजन यांच्या नियमित अभ्यासाने हळूहळू मनाची ताकद वाढून संयमशक्‍ती वाढून मनावर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.

वाढत्या मानसिक ताणाला बळी पडायचे नसेल, प्रज्ञापराधापासून दूर राहून निरोगी दीर्घायुष्याचा लाभ घ्यायचा असेल तर रोज किमान २५-३० मिनिटे श्‍वासनियमन करायला हवे.

रज-तम हे मनाचे दोष वाढले की त्यातून मानसिक रोग निर्माण होतात. मानसिक रोग होण्याची शक्‍यता कोणामध्ये असते हे आयुर्वेदात याप्रमाणे सांगितले आहे,
-अतिशय भित्र्या स्वभावाच्या व्यक्‍ती
-शरीरात दोष वाढलेल्या व्यक्‍ती
-अनुचित आहार करणाऱ्या व्यक्‍ती
-अनुचित पद्धतीच्या शरीरक्रिया करणाऱ्या व्यक्‍ती
-अतिशय अशक्‍त व क्षीण व्यक्‍ती
-चंचल स्वभावाच्या व्यक्‍ती
-काम-क्रोध-लोभ वगैरे षड्रिपूंच्या आहारी जाणाऱ्या व्यक्‍ती
-बुद्धी विचलित झालेल्या व्यक्‍ती

मानस रोगांमध्ये शरीरशुद्धी सर्वप्रथम येते. शरीर शुद्ध झाले का मनही शांत व्हायला मदत मिळते.
हृदिन्द्रियशिरःकोष्ठे संशुद्धे वमनादिभिः ।
मनः प्रसादमाप्नोति स्मृतिं संज्ञां च विन्दति ।।
... चरक चिकित्सास्थान

विरेचनादी पंचकर्मांनी हृदय, इंद्रिये, शिर व शरीर उत्तम रीतीने शुद्ध झाले की मन प्रसन्न होते, स्मरणशक्‍तीही वाढते अर्थातच मानस रोग बरे होण्याची पूर्वतयारी होते.

मानसरोगांमध्ये जुने तूप, गोमूत्र, शतावरी-ब्राह्मी-जटामांसी वगैरे मन-बुद्धीची ताकद वाढविणारी द्रव्ये, जीवनीय औषधांसारखी एकंदर जीवनशक्‍ती वाढविणारी उपयुक्‍त द्रव्ये असतात. बरोबरीने विशिष्ट औषधीद्रव्य शरीरावर धारण करणे, यज्ञ-यागादी कर्मे करणे, धूप करणे, दान करणे यासारख्या ग्रहचिकित्सेतील उपायही योजायचे असतात.

मानसिक रोगाची भीती बाळगण्याची गरज कोणाला नसते? हे याप्रमाणे सांगितले आहे,

निवृत्तामिषमद्यो यो हिताशी प्रयतः शुचिः ।
... चरक चिकित्सास्थान

-जो मद्य व मांस सेवन करत नाही.
-जो प्रकृतीला अनुरूप हितकर आहार सेवन करतो.
-जो प्रत्येक कार्य सावधानपूर्वक करतो
-जो पवित्र व शुद्ध असतो.

तेव्हा या सर्व गोष्टींची काळजी घेतली, मन सैरभैर न सोडता अनुशासित केले, योग- प्राणायामादी क्रियांनी मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून शरीर व मन दोघांचेही आरोग्य अबाधित राहील व निरामय आयुष्याचा आनंद घेता येईल.

मन मोकळं मोकळं!

मन मोकळं मोकळं!


(डॉ. राजेंद्र बर्वे)
मुक्त मन म्हणजे स्वैराचारी किंवा सैरभैर मन नव्हे! स्वैरता म्हणजे स्वतंत्रता! प्रत्येकाचं मन अगदी जन्मतः मुक्त असतं. माणूस हा "बॉर्न फ्री' प्राणी आहे, असं म्हणतात ते या अर्थानं. मन मुक्त असलं तरी ते अनिर्बंध नसतं. त्या मुक्त मनाला आंजारून गोंजारून कामाला लावल्यास मनाची महाप्रचंड शक्ती, अचाट सामर्थ्य पणाला लावता येते. .......
स्वतःच्या मनाशी आणि माणसाच्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न सर्व तत्त्वज्ञ, आध्यात्मिक गुरू आणि मार्गदर्शकांनी केला आहे. बहिणाबाईसारखी अनागरी स्त्री असो की रामदासांसारखे राजगुरू असोत, माणसांच्या मनाचा शोध सगळ्यांनी घेतलाय. बहिणाबाई "मन' म्हणजे देवाजीला जागेपणी पडलेलं "सपान' मानतात; तर रामदासांसारखे गुरुजन मनाच्या विविध गुणांना जोपासण्यासाठी काय करायला हवं ते ठासून काव्यरूपातून प्रतिपादित करतात. अगदी एकविसाव्या शतकातला विद्याविभूषित तरुण मनाशी भेटगाठ घेऊन त्याला संगणक विज्ञानाच्या अवकाशात नेऊ पाहतो. प्राचीन काळापासून ते अर्वाचिन वर्तमानापर्यंत मनाची महती सर्वांना विदीत झाली आहे.

मन म्हणजे नेमकं काय? मनाचा अवयव कोणता? मनामध्ये असतं म्हणजे नेमकं कुठे? मन आणि शरीर यांचा परस्पर संबंध काय? या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत की एकाच नाण्याच्या दोन बाजू? मन कुठे संपतं, आणि शरीर कुठे सुरू होतं?

मना-मनात संवाद घडतो तेव्हा काही वेळ एकही शब्द उच्चारलेला नसतो, तरी इथूनचे तिथे कसे पोहोचते? मन मोठं कर, म्हणजे काय? मनी वसे ते स्वप्नी दिसे? मग स्वप्नात पाहिलेलं जातं कुठं? येतं कुठून? परत परत का येतं? आपण मनाची खूणगाठ मारून लक्षात ठेवतो, मनाशी खूणगाठ कशांनी मारतो? कुठे मारतो?

"मन मनास उमजत नाही, आधार कुठे शोधावा?' असं कवी अगतिकतेनं म्हणतो. तेव्हा मनाला आधार कोण देतं? मनोभावे प्रार्थना केली की सारं काही प्राप्त होतं, असं म्हणतात. इथे मनोभावे म्हणजे काय? तो कर्ता, कर्मणी की भावे प्रयोग!

मनासंदर्भातल्या अनेक प्रश्‍नांची ही सूक्ष्म झलक आहे. यातील बऱ्याचशा प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी संशोधन चालू आहे. सद्य शतकातील मानवापुढचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्याचं "मन.'

या सर्व प्रश्‍न, उपप्रश्‍न आणि अनुत्तरित प्रश्‍नांना आपण किंचित बाजूला सारून मनाच्या काही अत्यंत महत्त्वाच्या गुणधर्माविषयी चर्चा करू, त्यातूनच कदाचित वरील प्रश्‍नांची उत्तरं नाहीत, निदान प्रश्‍न तरी नीट समजतील.

मनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं, तर "मन' ही सर्वस्वी मुक्त गोष्ट असते. मुक्त म्हणजे अगदी "मनोजवं मारुत तुल्य वेगं.' म्हणजे वाऱ्यासारखं मोकळं आणि क्षणोक्षणी बदलणारं, परिवर्तित होत असतं.

तुम्हीदेखील इथपर्यंतचा मजकूर लक्षपूर्वक वाचला असेल आणि एखाद्या निमिषार्धात तुमचं मन या कागदावरून उडून अमेरिकेतल्या आपल्या मुलाशी मनानं हितगुज करीत असेल किंवा अगदी काल रात्री ऐकलेल्या एखाद्या विनोदाला आठवून हसत सुटेल! याचा अर्थ मन कधीही स्थिर नसतं. ते एके जागी बांधून राहत नाही. अशा रीतीने ते कल्पनाविश्‍वात भूतकाळ-वर्तमान-भविष्यकाळात भ्रमण करतं. ते केव्हा कुठे कसं जाईल याचा नेम सांगता येत नाही.

म्हणजे मन वाऱ्यासारखं मुक्त असतं, माकडासारखं चंचल, हरिणासारखं चपळ, बिबळ्या वाघासारखं झपाटलेलं असतं. मनाचा हा गुणधर्म खरोखरंच एकमेवाद्वितीय आहे. माणसाच्या मनाइतकं या पृथ्वीवरच नव्हे; तर अखिल विश्‍वात काही नाही! मन इतकं मुक्त असण्याचं कारण मन म्हणजे मनाचा अवयव म्हणजे मानवी मेंदू हा अत्यंत उत्क्रांत प्रक्रिया करणारा अनाकलनीय संगणक आहे. करोडो पेशींनी बनलेल्या मेंदूची रचना विशेष आहे. या सर्व पेशी आपल्या दहा-बारा अँटेनासारख्या धाग्यासारख्या प्रोसेसिसनी सदैव जोडलेल्या असतात. त्या कोणत्याही क्षणी, कुठल्याही पेशीजालाशी विजेच्या वेगाने संपर्क साधतात. मनात केवळ विविध विचारांची जाळी असतात असं नव्हे; तर या सर्व विचारपेशींचा मेंदूमधल्या भावनिक पेशीजालाशी (इमोशनल ब्रेन) अतूट संबंध असतो. इतकंच काय मेंदूमधल्या या अंतर्गत पेशींचा शरीरातील सर्व पेशींशी क्षणोक्षणी संपर्क असतो. रंग, गंध, चव, श्रवण आणि स्पर्श, संवेदना देणाऱ्या ज्ञानेंद्रियातल्या पेशी मेंदूतल्या पेशींशी सदैव कुजबुजत असतात. म्हणूनच, एखाद्या सुवासानं आपण काही समजण्याच्या आत भूतकाळातल्या रम्य आठवणीत हरवून जातो. या प्रक्रिया इतक्‍या वेगानं घडतात की त्या घडताहेत याचीही जाणीव होत नाही.

मेंदूतल्या पेशीजालाचं हे जाळं अजूनही पूर्णपणे आकलनीय झालेलं नाही. मेंदूतल्या पेशीजालांच्या अशा परस्परांतल्या संबंधाच्या नेटवर्कच्या अनन्वित शक्‍यतामुळेच मन इतकं मुक्त आणि वेगवान असतं.

अर्थात, प्रशिक्षण आणि प्रतिक्षिप्त यांच्या आधारे या पेशीजालांच्या नेटवर्कमध्ये काही साचेबद्धता निर्माण होते. एखादी कृती परत परत केल्यास, त्या गोष्टीची सवय जडते. ती सफाईदारपणे होते. त्यात कौशल्य प्राप्त होते. उदा. आपण सायकल चालवायला शिकतो तेव्हा पडत झडत प्रयत्न करून आपण त्यावर स्वार होतो, चालवू लागतो. पुढे पुढे ते काम आपण सफाईदारपणे आणि कुशलतेने करू शकतो. त्या ऍक्‍शनची इतकी सवय होते, की आपण आपोआप-नकळतपणे त्या कृती करू लागतो. सुरुवातीला आपल्या मुक्त मनाला आवरून एकाग्र करून त्या कृती आत्मसात करतो. त्यांची सवय झाली की त्या कृती आपसुक घडतात.

याचा अर्थ मन मुक्त असलं तरी ते अनिर्बंध नसतं. त्या मुक्त मनाला आंजारून गोंजारून कामाला लावल्यास मनाची सर्व शक्ती पणाला लावता येते.

मन मुक्त असतं; पण त्याला बांधताही येतं, हेच यावरून सिद्ध होतं.

मुक्तावस्था हा मनाचा महत्त्वाचा गुणधर्म आपण इथे विस्तारानं तपासला. त्या मुक्तपणामागची शरीरशास्त्रीय कारणं पाहिली. इथे मुक्त मन म्हणजे स्वैराचारी किंवा सैरभैर मन असा अर्थ होत नाही हे लक्षात घ्यावं. अर्थात स्वैरता म्हणजे स्वतंत्रता! प्रत्येक माणसाचं मन अगदी जन्मतः मुक्त असतं. माणूस हा एक "बॉर्न फ्री' प्राणी आहे, असं म्हणतात ते या अर्थानं.

बॉर्न फ्री असल्यानं वर म्हटल्याप्रमाणे त्या मनात महाप्रचंड शक्ती असते. अचाट सामर्थ्य असतं. चंद्रावर जाण्याची, स्वप्न पाहण्याची शक्ती असते, त्याप्रमाणे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी वापरावी लागणारी बुद्धीही असते. म्हणूनच एकांतवासात अडकलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फक्त शरीर त्या कोठडीत होते, मन मात्र मुक्त होते. कविता रचित होते. स्वा. सावरकरांनी आपल्या मुक्त मनाला मोकळं सोडलेलं नव्हतं. तर कामाला लावलं आणि त्यातूनच अत्यंत ओजस्वी कविता निर्माण झाल्या.

या उदाहरणांवरून, आपण एक पायरी पुढे गेलो आहोत. मनाचा आणखी एक गुणधर्म आपण तपासतो आहोत. माणूस "बॉर्न फ्री' आहे. त्यामध्येच त्याला "फ्रीडम ऑफ चॉईस' आहे. म्हणजे निवडीचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. इथे निवडीचे स्वातंत्र्य याचा नेमका अर्थ कळायला हवा.

रामदास स्वामी म्हणतात, "मना सज्जना भक्तीपंथेचि जावे' म्हणजे रामदासांना या फ्रीडम ऑफ चॉईसचं भान निर्माण करायचं आहे किंवा असावं. त्यांना अभिप्रेत असलेली ही "फ्रीडम ऑफ चॉईस' खूप व्यापक अर्थाची संकल्पना आहे. फ्रीडम ऑफ चॉईस म्हणजे "आज मी कोणता पोशाख घालू?' स्कॉच पिऊ की रम? रेसला जाऊ की रमी खेळू? असल्या निर्णयांचा चॉईस आपल्याला असतो, याची जाणीव रामदासस्वामींना करून द्यायची नव्हती आणि वाचकांनीही तसा अर्थ लावू नये!

मग "फ्रीडम ऑफ चॉईस' म्हणजे काय? रामदास स्वामी म्हणतात, फ्रीडम ऑफ चॉईस म्हणजे जीवनक्रमण्याचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य.

मना सज्जना, तू जीवनाचा कोणता पंथ स्वीकारणार आहेस? भक्तिमार्ग की भोगाची वाट? तुला यापैकी कोणतीही वाट निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, याची मला जाणीव आहे! माणसाचं मन मुक्त असल्यानं जीवन कसं जगावं? कसं जगू नये हे ठरविण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे. म्हणून मनाच्या सज्जनपणाला आव्हान करून मी असं ठामपणे (कान पिळून) सांगतो की भोगाच्या आणि उपभोगाच्या, अनैतिकतेच्या आणि नकारात्मकतेच्या शेकडो वाटा तुला भेटतील; पण तू मात्र भक्तिमार्ग स्वीकार. भक्तिमार्ग म्हणजे सत्यत्वावर भक्ती. भक्ती म्हणजे देवत्वावर भक्ती, सत्यम शिवम सुंदरमवर भक्ती. रामदासस्वामींनी म्हटले, की भक्तिमार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, हे विसरू नका.

म्हणून भक्तिमार्ग हा होकारात्मक मार्ग स्वीकारणं श्रेयस्कर आहे.

मनाची स्वतंत्रता आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन्ही संकल्पना आपल्याला रामदास स्वामींच्या मनाच्या श्‍लोकात आढळतात. यातील मनाची स्वतंत्रता त्यांनी गृहीत धरली आहे; तर निवडीचं स्वातंत्र्य कसं वापरावं याविषयी नेमकी सल्लामसलत केली आहे. त्यांचे श्‍लोक प्रामुख्याने आनंदी व प्रसन्न मनाकरता दिलेली "प्रिस्क्रिप्शन' आहेत.

मानवी मनाचा आवाका इतका प्रचंड आणि अवाढव्य आहे की त्याला शिस्त लावण्यासाठी आणि होकारात्मक दिशेनं जाण्यासाठी रचलेले हे श्‍लोक आहेत.

यापूर्वी, मनाला प्रशिक्षण दिल्याने (इथे उल्लेख केलेलं सायकल चालवायला शिकण्याचं उदाहरण) मनाची स्वैर शक्ती कशी प्रभावी ठरते, याचा विचार केला.

रामदास स्वामी मनाच्या प्रशिक्षणाचे असे अनेक (भक्ती) मार्ग सुचवितात. जेणेकरून मनाच्या सामर्थ्याला गवसणी घालून त्याला योग्य दिशा देता येईल.

"मना सज्जना भक्तीपंथेचि जावे' या चरणाचा मला उलगडलेला आणि भावलेला हा अर्थ! इति.

- डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचारतज्ज्ञ, मुंबई

Saturday, August 23, 2008

चिंता

चिंता


(डॉ. श्री बालाजी तांबे)
चिंता हा एक मनोविकार आहे, असे आयुर्वेद म्हणतो. चिंता ही उन्माद, अपस्मारासारख्या मानसिक रोगांचे एक कारण असून अति चिंतेमुळे शरीरातील जलतत्त्वात बिघाड होतो, निद्रानाश होतो, निद्रानाशामुळे वात-पित्त हे दोन्ही दोष बिघडू शकतात. म्हणजेच चिंता ही अनेक प्रकारच्या असंतुलनाला कारणीभूत असते, असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे. ........
चिंता हा शब्द आला आहे चिंतनावरून. चिंतन, म्हणजे विचार करणे हा मनाचा विषय असतो. म्हणूनच मनाला चित्त असेही म्हणतात.
कर्तव्यतया अकर्तव्यतया वा यन्मनसा चिन्त्यते तत्‌ मनोविषयः ।
... चरक शारीरस्थान

काय करावे व काय करू नये हे ठरविण्यासाठी मन चिंतन करीत असते. या चिंतनावर बुद्धी आपला निर्णय देते आणि मन या निर्णयाला अनुसरून किंवा डावलून इंद्रियांना काय करायचे ते सांगते.

चिंतनातून निर्णय घेतला गेला तर त्याप्रमाणे कार्य होते आणि त्या वेळेपुरते ते चिंतन, तो विषय संपतो. पण, जेव्हा कर्तव्य आणि अकर्तव्य म्हणजेच काय करावे व काय करू नये यांचे द्वंद्व सुरू राहते, त्यातून चिंतेचा उगम होतो. चिंता हा एक मनोविकार आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. तसेच, चिंता ही उन्माद, अपस्मारासारख्या मानसिक रोगांचे एक कारण सांगितले आहे. "चिन्त्यानां चातिचिन्तनात्‌' म्हणजे अतिचिंतन करणे हे रसवह स्रोतस, पर्यायाने शरीरातील जलतत्त्व बिघडण्याचे एक कारण सांगितले आहे. चिंतेमुळे निद्रानाश होतो, निद्रानाशामुळे वात-पित्त हे दोन्ही दोष बिघडू शकतात. एकूणच चिंता ही अनेक प्रकारच्या असंतुलनाला कारणीभूत असते.

स्त्री काय किंवा पुुरुष काय दोघांनाही चिंता त्रासदायक असतेच. स्त्रियांमध्ये रसधातू हा एक महत्त्वाचा धातू असतो. स्त्रीचे स्त्रीत्व, तिचा नाजूकपणा, संवेदनशीलता, एवढेच नव्हे तर कांती, सतेजता हे सारे रसधातूवर अवलंबून असते.

चिंता रसधातूला सुकवते, शुक्रधातू अशक्‍त करते. स्त्रीच्या बाबतीत हे दोन्ही धातू कमकुवत झाले की गर्भाशय, बीजाशय वगैरे स्त्रीविशिष्ट अवयवांच्या कार्यात बिघाड होऊ शकतो. महिन्या-महिन्याला होणारा रजःस्राव हा रसधातूचा उपधातू असतो. म्हणजे पाळी नियमित येणे, व्यवस्थित येणे हे रसधातूवर अवंलबून असते असे आयुर्वेदाने सांगितले आहे. बाळंतपणानंतर स्तन्य येण्याची क्रियासुद्धा रसधातूवरच अवलंबून असते.

रसनिमित्तमेव स्थौल्यं कार्श्‍यं च ।
... सुश्रुत सूत्रस्थान

शरीराची स्थूलता किंवा कृशतासुद्धा रसधातूवरच अवलंबून असते. स्त्रीमध्ये जसा रसधातू महत्त्वाचा तसा पुरुषामध्ये शुक्रधातू महत्त्वाचा असतो. पौरुषत्व, संतती एवढेच नाही तर पुरुषाचे कर्तृत्व, धडाडी या गोष्टीही शुक्रधातूशी संबंधित असतात. स्त्रीमध्येही गर्भधारणा, गर्भपोषण व्यवस्थित होण्यासाठी शुक्रधातू योग्य असणे आवश्‍यक असते.

रसधातूचा संबंध हृदयाशीही असतो.
रसवहानां स्रोतसां हृदयं मूलं दश च धमन्यः ।
... चरक चिकित्सास्थान

चिंता झाली व रसवहस्रोतस बिघडले की त्याचा परिणाम म्हणून हृदय व धमन्यांमध्ये बिघाड होऊ शकतो. अति मानसिक ताण आला, खूप चिंता असली की हृद्रोग होतो हे आपण प्रत्यक्षातही अनुभवतो.

अशा प्रकारे चिंता शरीरात बरेच बिघाड करू शकते.

चिंता हा मनाचा विकार असल्याने चिंता दूर करायची असली तर मानसिक संतुलन प्रस्थापित करणे आवश्‍यक आहे. चिंता दूर करण्याचा एक उपाय म्हणून आयुर्वेदाने आश्‍वासन चिकित्सा सांगितली आहे.

आश्‍वासयेद्‌ सुहृद्वा तं वाक्‍यैर्धर्मार्थसंहितैः ।
... चरक चिकित्सास्थान

चिंताग्रस्त मनुष्याला जवळच्या व्यक्‍तीने धीर द्यावा, ज्याची चिंता आहे तो विषय व्यवस्थित मार्गी लागेल याचा विश्‍वास देण्याचा प्रयत्न करावा. त्याला काहीतरी अद्‌भुत दाखवून चिंतापूर्ण विषयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा.

एखाद्या कारणाने थोड्या वेळासाठी चिंताग्रस्त होणे वेगळे पण सतत चिंताग्रस्त राहणे हा एक मानसरोगच समजायला हवा. मनाचे चिंतनाचे काम बुद्धीच्या साहाय्याने एक निर्णयापर्यत पोचत नाही तोपर्यंत चिंता शरीर व मनाला पोखरत राहते. म्हणूनच रोग समजता येईल अशा चिंतेवर काम करण्यासाठी मन व बुद्धी या दोघांचीही शक्‍ती वाढवावी लागते. त्यासाठी मानसरोगातल्या उपचारांची मदत होऊ शकते.

यासाठी पुराणघृत म्हणजे दहा वर्षे जुने तूप चांगले असते. १०० वर्षांचे प्रपुराणघृत तर सर्व मानसरोगांवर उत्तम असते. असे घृत नुसते बघण्याने, स्पर्श करण्याने किंवा नस्य घेण्यानेही मानसरोग दूर होतात असे सांगितले आहे. याशिवाय पंचगव्य घृत, कल्याणक घृत ही सुद्धा चिंताग्रस्त मनुष्याला उपयुक्‍त ठरणारे असतात.

कल्याणक घृताच्या फलश्रुतीत सांगितले आहे,
भूतोपहतचित्तानां गद्‌गदानाम्‌ अचेतसाम्‌ ।।
... चरक चिकित्सास्थान

अदृश्‍य शक्‍तींनी ज्याचे चित्त बिघडले आहे, ज्याला स्पष्ट बोलता येत नाही व ज्याचे मन दुर्बल झाले आहे, त्याला कल्याणक घृताचा उपयोग होतो. "संतुलन ब्हमलीन घृत', पंचगव्य घृतही मनाची, बुद्धीची शुद्धी करून मन-बुद्धीची ताकद वाढवणारे आहे.

घृतसेवनाप्रमाणेच मानसरोगात सांगितलेली धूपनचिकित्सा, अभ्यंग नस्य व मुख्य म्हणजे विशेष द्रव्ये शरीरावर धारण करणे, विशिष्ट नियम-व्रतांचे पालन करणे, सिद्ध औषधांचा प्रयोग करणे वगैरे उपायही मन-बुद्धीला ताकद देऊन चिंता दूर करण्यास मदत करू शकतात.

-----------------------------------------------------
आश्‍वासन चिकित्सा
चिंता हा मनाचा विकार असल्याने चिंता दूर करायची असली तर मानसिक संतुलन प्रस्थापित करणे आवश्‍यक आहे. चिंता दूर करण्याचा एक उपाय म्हणून आयुर्वेदाने आश्‍वासन चिकित्सा सांगितली आहे. चिंताग्रस्त मनुष्याला जवळच्या व्यक्‍तीने धीर द्यावा, ज्याची चिंता आहे तो विषय व्यवस्थित मार्गी लागेल याचा विश्‍वास देण्याचा प्रयत्न करावा. त्याला काहीतरी अद्‌भुत दाखवून चिंतापूर्ण विषयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा.
-----------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे

ad