Showing posts with label शाकाहारी. Show all posts
Showing posts with label शाकाहारी. Show all posts

Sunday, April 17, 2011

शाकाहार

डॉ. श्री बालाजी तांबे
अन्नाचे मुख्य कार्य शरीर, बल, प्राणशक्‍ती व मनोधारणा तयार करणे हेच आहे. तेव्हा आपल्या शरीराला जे मानवेल, म्हणजेच नैसर्गिकरीत्या पचून बल देईल, असे अन्न प्रत्येकाने खावे. केवळ शाकाहारच षड्ररसपूर्ण व चार प्रकारचे अन्न पुरवू शकतो.

शा काहार व मांसाहार असे आहाराचे दोन प्रकारात वर्गीकरण होते. आयुर्वेदात भाज्या, फळे वगैरे शाकाहारी द्रव्यांचे गुणधर्म सांगितले आहेत, त्याचप्रमाणे विविध पक्षी-प्राण्यांच्या मांसाचे गुणधर्मही वर्णन केले आहेत. मात्र आयुर्वेदातील "अन्नयोग' संकल्पना अंमलात आणायची ठरविले, औषधे बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकद्रव्यांचा आढावा घेतला तर मांसाहारापेक्षा शाकाहारालाच अधिक महत्त्व दिलेले आढळते.

"चतुर्विध आहार' ही संकल्पना आयुर्वेदात तसेच इतरही भारतीय शास्त्रांमध्येही आहे. पेय म्हणजे पिण्यास योग्य पदार्थ, लेह्य म्हणजे चाटून खाण्याजोगे पदार्थ, भोज्य म्हणजे सहज खाता येतील असे पदार्थ आणि भक्ष्य म्हणजे चावून खाण्याजोगे पदार्थ असा चार प्रकारचा आहार असावा. कारण असा आहार शरीरपोषण व्यवस्थित करण्यास सक्षम असतो. या प्रकारचे चतुर्विधत्व आहारातून सहज शक्‍य असते. मांसाहार हा फक्‍त भक्ष्य प्रकारात आणि मांसापासून "मांसरस (सूप)' तयार केला तर, फार तर पेय प्रकारात बसू शकतो.

आयुर्वेदाने अन्नयोग संकल्पनेमध्ये षड्रस म्हणजे मधुर, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट अशा सहा चवींचा समावेश केला आहे.

सर्व रसाभ्यासो बलकराणां श्रेष्ठः ।एक रसाभ्यासो दौर्बल्यकराणाम्‌ ।।...चरक सूत्रस्थान

सहाही रसांचे (चवींचे) सेवन बल वाढवण्यासाठी व स्वास्थ्य टिकवण्यासाठी अत्यावश्‍यक आहे. केवळ एक-दोन रसांचे सेवन केल्यास मनुष्याला दुर्बलता येते व त्यातून विविध रोगही उद्भवू शकतात.

शाकाहारातून षड्रस
धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे यांचे गुणधर्म पाहिले असता लक्षात येते, की त्यांच्या योग्य संयोगातून आपणास सहाही रस मिळू शकतात. ऋतूंनुसार मिळणाऱ्या भाज्या व फळांतूनही त्या त्या ऋतूतील दोषस्थितीचे संतुलन करता येऊ शकते. याउलट मांसाहाराचा विचार केल्यास समजते, की बहुतांशी सर्व प्रकारचे मांस मधुर रसाचे आहे. क्वचित एखादेच मांस मधुर रसासह तुरट रसाचे किंवा तिखट विपाकाचे आहेत. अर्थात त्यामुळे मांसाहार हा पूर्ण आहार होऊ शकत नाही. आयुर्वेदात मांसाचे जे गुणधर्म सांगितले आहेत, त्यानुसार बहुतेक सर्व मांस पचण्यास अतिशय अवघड, उष्णता वाढविणारे व कफ, पित्तदोष वाढविणारे असतात असे समजते म्हणूनच जे नित्य व्यायाम करतात व ज्यांचा अग्नी प्रदीप्त आहे अशा व्यक्‍ती जर असा मांसाहार पचवू शकल्या तरच त्यापासून त्यांचे बल वाढू शकते, शुक्रधातूला शक्‍ती मिळू शकते.

मांसाहार पचन क्षमतेत घट
सध्याची जीवनशैली पाहता, हवामानातील बदल पाहता मांसाहार अनुकूल ठरण्याची शक्‍यता फारच कमी झालेली दिसते. मांसाहार पचण्यासाठी शारीरिक मेहनत आवश्‍यक असते, सध्या शरीराच्या तुलनेत मानसिक, बौद्धिक श्रमांचेच प्रमाण इतके वाढले आहे की मांसाहार पचवण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होते आहे.

निसर्गातही काही पक्षी व प्राणी शाकाहारी तर काही मांसाहारी असतात असे आढळते. मात्र या प्राण्यांच्या शरीरशास्त्राचा, शरीरक्रियांचा अभ्यास केला तर शाकाहारी प्राण्यांपेक्षा मांसाहारी प्राण्यांची मूलभूत जडणघडण विशेष पद्धतीने झाली आहे असे समजते. मांसाहारी प्राण्यांमधली आक्रमकता वेगळी असते, त्यांची मानसिकता, जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते. त्यांचे दात व पचनसंस्था वेगळ्या तऱ्हेने विकसित झालेली असते. मानवी शरीराची जडणघडण या पद्धतीची नाही. प्राण्यांपेक्षा वेगळी जीवनपद्धती, वेगळी मानसिकता असणे अपेक्षित असणाऱ्या मनुष्यप्राण्यासाठी मांसाहार हा आदर्श नाही. औषधातही फार क्वचित ठिकाणी मांसाचा अंतर्भाव केलेला आढळतो. खूपच धातुक्षय झाला असेल, तातडीने शक्‍ती देण्याची आवश्‍यकता असेल, तेव्हासुद्धा मांसाहारापेक्षा मांसरस (सूप) घ्यायला सांगितलेला दिसतो. मांससूप तृप्ती करणारे आहे. ज्याचे शरीर सुकत चालले आहे, जो रोगापासून मुक्‍त झाला आहे, जो स्वभावतःच कृश आहे व ज्यांचे शुक्र क्षीण झाले आहे त्यांनी मांससूप सेवन करावे असे चरकाचार्य म्हणतात. पण त्याच्याच पुढे ते असेही म्हणतात, व्यायामनित्याः । अर्थात जे नित्य व्यायाम करतात, म्हणजेच ज्यांचा जाठराग्नी प्रदीप्त असल्याने पचायला जड असणाऱ्या मांसाला पचवण्यास समर्थ आहे त्यांनीच मांससूप सेवन करावे. मद्य व मांस दोन्हीही राजस, तामस व मनोदोष वाढवणारे आहेत.

शाकाहार सुरक्षित
आहार सेवनाचा मुख्य उद्देश असतो, शरीराचे धारण करणे, शरीरावश्‍यक सर्व तत्त्वांची पूर्ती होणे. हा उद्देश पूर्ण होण्याबरोबरच दुसऱ्या बाजूने त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना याकडे लक्ष देणेही आवश्‍यक असते. जसे गाडीमध्ये इंधन टाकताना आपण ते जितक्‍या चांगल्या प्रतीचे, जितके शुद्ध स्वरूपातील निवडू तितकी गाडी अधिक चांगली पळते, अधिक टिकते. शाकाहार व मांसाहार दोन्हीही पोट भरण्यास सक्षम असले तरी मांसाहाराच्या तुलनेत शाकाहार शरीराबरोबरच मानसिक पातळीवरसुद्धा अधिक सुरक्षित असतो, नुकसान न करणारा असतो.

सध्या तर प्राण्यांचे वजन वाढावे, अंडी मिळण्याचे प्रमाणे वाढावे, कमीत कमी वेळात अधिक अंडी मिळावीत म्हणून अनेक अनैसर्गिक औषधांचा, हॉर्मोन्सचा सर्रास वापर केला जातो. ही सर्व शरीरघातक, अनैसर्गिक तत्त्वे मांसाहारात तशीच राहतात, मांसाहार सेवन करण्याच्या पोटात जातात, त्यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

बऱ्याचदा शाकाहारातून जीवनावश्‍यक सर्व तत्त्वांची पूर्ती होत नाही म्हणून मांसाहार आवश्‍यक आहे असा प्रचार केला जातो, पण संतुलित शाकाहार म्हणजे दूध, तूप, भाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये वगैरे सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहार असला तर त्यातून सर्व आवश्‍यक तत्त्वे मिळू शकतात व ती सहज पचतात.

एक गोष्ट लक्षात घ्यावी की खाणे जरी आपल्या हातात असले तरी पचवणे आपल्या हातात नाही. शेवटी जिभेला चांगले लागणारे असो, खाण्यापूर्वी ते अन्न कसेही असो, पचनानंतर त्याचे काय होते त्यालाच महत्त्व असते. म्हणजे त्यापासून कशा प्रकारचे शरीर, बल, प्राणशक्‍ती व मनोधारणा तयार होते हेच महत्त्वाचे ठरते.

तेव्हा आपल्या शरीराला जे मानवेल, म्हणजेच नैसर्गिक रीत्या पचून बल देईल, असे अन्न प्रत्येकाने खावे. पूर्वी आपण पाहिले आहेच की केवळ शाकाहारच षड्ररसपूर्ण व चार प्रकारचे अन्न पुरवू शकतो. तेव्हा शाकाहाराचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने शाकाहार करावा.


- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

शाकाहारीच महावीर-बलवान

डॉ. श्री बालाजी तांबे
प्राणीदया, भूतदया आणि ऍनिमल प्रोटेक्‍शन संबंधी गप्पा मारणारे लोक एका बाजूने शिकारीच्या विरोधात बोलतात, इतकेच नव्हे तर सर्कसमध्ये प्राण्यांकडून काम करवून घेण्यावर पण बंधने आणू इच्छितात. पण नंतर स्वयंपाकघरात गाय, बकरी, कोंबडी यांच्यावर ताव मारतात. जोपर्यंत जगातला मांसाहार संपूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत भूतदया, प्राणीदया याविषयी बोलण्याचा कुणालाच अधिकार नाही. हिंसा - अहिंसा, पचनशक्‍ती, मेंदूचे स्वास्थ, आक्रमक व हिंसक वृत्तीमुळे समाजास होणारा त्रास या सर्वांचा विचार मांसाहार करण्यापूर्वी करावाच लागेल. पण खरे पाहता शाकाहार हाच नैसर्गिक आहार आहे.

भगवान महावीरांचे मनुष्यमात्रावर असंख्य उपकार आहेत. त्यांनी दिलेल्या उपदेशातील एक महत्त्वाचा उपदेश म्हणजे अहिंसा, मनुष्याचा आहार शाकाहारीच असावा व सूर्यास्तानंतर रात्री जेवू नये. आरोग्याच्या तंबूचा आहार हा मुख्य खांब. वीरत्व हे सात्त्विक वीर्यावर अवलंबून असते व खरा ताकदवान वीर मनाला जिंकतो. यासाठी लागतो शाकाहार. भगवान महावीरांनी दिलेली ही शिकवण मनुष्यमात्रावर खचितच उपकार करणारी आहे. भगवान महावीर यांची उद्या (शनिवारी) जयंती. भगवान महावीरांप्रमाणेच मनाला जिंकणारे बलवान म्हणजे महावीर हनुमान होत. या महारुद्र हनुमानांची जयंतीही आणखी तीन दिवसांनी (18 एप्रिल) येत आहे. हनुमानजी वानरस्वरूप आहेत. वानर पण शुद्ध शाकाहारी असतात. त्यामुळे त्यांना बुद्धी व उडण्यासाठी हलकेपण व ताकद साहजिकच मिळते.

च्याही आधी वनस्पतींची सृष्टी होती. आणि जीवनाची मुख्य गरज वनस्पतीच आहेत. शरीराच्या सर्वच्या सर्व गरजा वनस्पतिजन्य अन्नच भागवू शकते. मांसाहार करायचा ठरवला तरी वनस्पतिज द्रव्ये, मसाले वगैरे लावल्याशिवाय मांस खाता येणार नाही आणि पचवताही येणार नाही, आणि बरोबरीने शाकाहारी अन्न हे तर खावेच लागेल. जीवनाच्या दोन महत्त्वाच्या गरजा, अन्न-पाणी व संरक्षण या आहेत. उत्क्रांतीबरोबर संरक्षणासाठी प्राणी अधिकाधिक हिंस्र बनत गेले. 'जीवो जीवस्य जीवनम्‌" या न्यायाने मोठे प्राणी छोट्या प्राण्यांना खाणे साहजिक होते. यात मोठे म्हणजे केवळ आकाराने मोठे असा अर्थ नाही, तर हिंसक वृत्तीने मोठे. गाय कुत्र्यापेक्षा मोठी असते आणि हत्ती वाघ-सिंहापेक्षा मोठा असतो. परंतु गाय व हत्ती दोन्ही शाकाहारी आहेत. तसं पाहता अनेक प्राणी सुद्धा शाकाहारीच आहेत. मनुष्याच्या जास्त जवळ असणारे व मनुष्याला विशेष उपयोगी असणाऱ्या प्राण्यातील बकरी, गाय व घोडा हे प्राणी शाकाहारी आहेत. गाय अन्न देते व घोडा संरक्षणासाठी उपयोगी येतो. एकंदरीत गाय, घोडा, उंट, हत्ती, शेळी, मेंढी ह्या सर्वांचा मनुष्यजातीस एवढा उपयोग होतो की जणू त्यांच्यावाचून जीवन चालणारच नाही. मनुष्याने मांस खाण्याचे ठरवले ते नेमके ह्या शाकाहारी प्राण्यांचे! अर्थात मांसाहारी प्राण्यांची हत्या करणे व त्यांचे मांस पचवणे तेवढे सोपे नाहीच! जाठराग्नीने जरी यदा कदाचित ते पचवले तरी त्यामुळे निर्माण होणारी वृत्ती व मनोधारणा पचणे मात्र शक्‍य नाही. 'अन्नाद्‌ भवन्ति भूतानि" असे श्रीमद्‌भगवद्‌गीतेत म्हटलेले आहे. हे सांगताना अन्नामुळे केवळ शरीर तयार होते एवढेच सांगण्याचा उद्देश नसून एकूण प्राणिमात्र, त्यांच्यातील भेद, त्यांचे विशेषत्व व त्यांचे स्वभाव हे सर्व अन्नावर अवलंबून असतात व अन्नाच्या गुणधर्माप्रमाणे शरीराचे गुणधर्मही तयार होतात. भौगोलिक परिमितीप्रमाणे ज्या ठिकाणी मानवाची वस्ती असेल त्या ठिकाणी राहण्यासाठी काहीतरी खावे लागत असताना प्राणिज मांस खाण्याची वेळ आली असावी. पण त्यानंतर मनुष्याच्या विकासाबरोबर काय खावे, काय खाऊ नये, कसे खावे, हे सर्व ठरत असताना शेवटी शाकाहार सोपा, सर्वोत्तम व सर्वगुणसंपन्न असल्याचे माणसाच्या निदर्शनास आले. खायचेच झाले तर कोणत्या प्राण्याचे मांस खावे, कशासाठी खावे, त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम काय होतील हे सर्व शोधून काढले. आयुर्वेदाने त्याचे वात-पित्त-कफ व इतर गुण यांचा अभ्यास करून मांसाहार कोणी करावा, कोणी करू नये, हे शास्त्र विकसित केले. मजबूत बाहू व भरदार छाती असताना तलवार किंवा बंदूक उचलणे सोपे जाते आणि पायात व मांड्यात ताकद असताना दऱ्याखोऱ्यात पळणे, घोड्यावर मांड टाकून बसणे सोपे जाते. तेव्हा ही कामे करणाऱ्यांसाठी मांसाहार सुचवला गेला असावा. स्वसंरक्षणासाठी असो किंवा देशरक्षणासाठी असो, निधडी छाती, धाडशी स्वभाव पण मांसाहारामुळे कदाचित मिळत असावा. परंतु शरीरातल्या बऱ्याच अवयवांना मांसाहार अजिबात मानवत नाही. किंबहुना हृदय व मेंदूच्या रोगांची कारणे मांसाहारात सापडतील. प्राणी मरताना जो त्रास मारणाऱ्याच्या हृदय व मेंदूला होईल व जो आघात सहन करावा लागेल त्यामुळे मनुष्य शाकाहाराकडेच वळेल. सध्या बऱ्याच वेळा चालणे, योग, व्यायाम या गोष्टी तर नियमाने केल्या जात नाहीतच, बाहेर जाण्यासाठी सहसा वाहनाचाच उपयोग होतो, जिने चढण्याऐवजी लिफ्ट चा वापर होतो, ऑफिस मध्ये किंवा कामाच्या ठिकाणी दिवसभर वातानुकूलित बंद खोलीत बसून राहावे लागते अशा वेळी मांसाहार हा आरोग्याऐवजी रोगच वाढवेल आणि त्याचबरोबर मांसाहाराने उत्पन्न झालेल्या धातूंचा शरीरपुष्टीसाठी उपयोग न झाल्यामुळे मानसिक अस्वास्थ्य, चंचलता, क्रोध, आक्रमकता या तामसिक प्राण्यांकडून आलेल्या गुणांचीच वाढ होऊ शकेल. वेगवेगळ्या प्राण्यांच्या स्वभावाचा त्यांच्या शरीरावयवात, मांसात पण गुण असतो. शेळी, बकरी, डोंगरात खूप फिरून अनेक औषधींचा समावेश असलेला झाडपाला खाते, तिचा स्वभाव वेगळ्या गुणाचा आणि कोंबडी, जी उकिरड्यावर फिरून केरकचरा, जंतू, अळ्या खाते तिचा स्वभाव वेगळा. मांसाहाराचा उपयोग शारीरिक मजबुतीसाठी झाला तर होऊ शकतो पण त्याचा मन व मेंदूूच्या आरोग्यासाठी उपयोग न होता नुकसानच होते. ज्यांना सतत मेंदूची किंवा बुद्धीची कामे करावी लागतात आणि शारीरिक हालचाली व व्यायाम होत नाही त्यांच्यासाठी उत्तम आहार म्हणजे शाकाहार! प्राण्यांमध्ये असलेले रोग सहसा मांसाहाराशिवाय मनुष्यात प्रविष्ट होत नाहीत. एका संशोधनाद्वारे असेही निदर्शनाला आलेले आहे की एड्‌स चा व्हायरस फार पूर्वी प्रथम प्राण्यात तयार झाला आणि त्या प्राण्याचे मांस खाल्ल्याने माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर तो वाढला.

शाकाहार की मांसाहार हे ठरवताना पर्यावरणाचा पण विचार महत्त्वाचा ठरतो. अनेक प्राणी त्यांच्या प्राणीवंशातून नष्ट होत असल्याने त्यांना मारण्यावर बंदी घालावी लागलेली आहे.

प्राणी पाळून, तो वाढवून म्हणजे त्याचे उत्पादन करून, मांसाहारासाठी वापरण्याची पद्धत सोयीची झाली परंतु त्यात त्यांना दिलेले खाणे व त्यांचे वजन वाढवून आरोग्य टिकवण्यासाठी दिलेल्या औषधांचे दुष्परिणामही मांस खाणाऱ्यांना भोगावे लागतात. मॅड काऊ डिसीज  (Mad Cow Disease), कोंबड्यांचा पक्षीरोग ही नुकतीच घडलेली उदाहरणे सर्वांना माहीत आहेतच. मुळात प्राण्यांना वाढवण्यासाठी जेवढा शाकाहार दिला जातो त्याचे गणित पण उलटेच आहे. म्हणजे एका विशिष्ट अन्नसंख्येत जेवढी शाकाहारी माणसे पोट भरू शकतात तेवढेच अन्न प्राण्यांना देऊन त्या मांसाहारातून फारच कमी माणसांचे पोट भरेल. म्हणून मांसाहार खूप महाग असतो. मांसाहार व मासे-आहाराची चटक लागल्यामुळे रोज जेवणात त्या वस्तू पाहिजेतच या अट्टहासापायी अनेक कुटुंबे अत्यंत गरीब राहतात, त्यांना मुलांचे शिक्षण किंवा महत्त्वाच्या कौटुंबिक गरजा सुद्धा भागवता येत नाहीत. महाग असल्यामुळे पूर्वीच्या काळी काहीतरी विशेष मेजवानी म्हणून भारतात व परदेशातही क्वचित प्रसंगी मांसाहार केला जात असे. म्हणजे जरी एखाद्या मनुष्य मांसाहार करत असला तरी फार क्वचित प्रसंगी होत असे त्यामुळे एकूणच जीवन शांततापूर्ण व्यतीत होत असे.

ह्यूमन राइट्‌स म्हणजे मनुष्याला जगण्याच्या हक्काची चर्चा जगात सर्वत्र चालते. पण इतर प्राणिमात्रांच्या हक्काचे काय? प्राणीदया, भूतदया आणि ऍनिमल प्रोटेक्‍शन संबंधी गप्पा मारणारे लोक एका बाजूने शिकारीच्या विरोधात बोलतात इतकेच नव्हे तर सर्कसमध्ये प्राण्यांकडून काम करवून घेण्यावर पण बंधने आणू इच्छितात पण नंतर स्वयंपाकघरात गाय, बकरी, कोंबडी यांच्यावर ताव मारतात. जोपर्यंत जगातला मांसाहार संपूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत भूतदया, प्राणीदया याविषयी बोलण्याचा कुणालाच अधिकार नाही. बऱ्याच वेळा स्वतः पाळून, स्वतः मारून मांसाहार करावा असे मुद्दाम एवढ्यासाठीच सांगितले जाते की मांसाहार खाल्ल्यानंतर स्वतःच्या हृदय व मेंदूला होणाऱ्या पचनोत्तर शारीरिक त्रासापूर्वी प्राण्याला मारताना व प्राणी मरताना जो त्रास मारणाऱ्याच्या हृदय व मेंदूला होईल व जो आघात सहन करावा लागेल त्यामुळे सहसा मारणारा मनुष्य शाकाहाराकडेच वळेल, परंतु हा प्रयोग प्रत्यक्ष करण्याची गरज नाही. साध्या तर्काने ही गोष्ट समजू शकते.

हिंसा, अहिंसा, पचनशक्‍ती, मेंदूचे स्वास्थ, आक्रमक व हिंसक वृत्तीमुळे समाजास होणारा त्रास या सर्वांचा विचार मांसाहार करण्यापूर्वी करावाच लागेल. पण खरे पाहता शाकाहार हाच नैसर्गिक आहार आहे.

- डॉ. श्री बालाजी तांबे
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad