Showing posts with label केस. Show all posts
Showing posts with label केस. Show all posts

Sunday, July 11, 2010

टक्कल

डॉ. ह. वि. सरदेसाई

डोक्‍यावरील त्वचेला विकार झाला तर तेथील केस गळणे स्वाभाविक आहे. तसे नसताना केस कोणत्या भागावरून अधिक प्रमाणात गेले आहेत हे पाहून टक्कल पडण्याचे कारण समजू शकते. कधी केस एकाच ठिकाणावरून गळालेले असतात. तर कधी सर्व डोक्‍यावरचे केस गळून जातात.

काही वेळा केस गळण्याचा व शारीरिक आजाराचा संबंध असतो; परंतु बहुतेक वेळा टक्कल पडण्याचा परिणाम मानसिक अस्वास्थ्य निर्माण करण्याकडेच होत असतो. आपल्या डोक्‍यावरील त्वचेला विकार झाला तर तेथील केस गळणे स्वाभाविक आहे. तसे नसताना केस कोणत्या भागावरून अधिक प्रमाणात गेले आहेत हे पाहून टक्कल पडण्याचे कारण समजू शकते. कधी केस एकाच ठिकाणावरून गळालेले असतात. (लोकालाईझ्ड : localized) कधी सर्व डोक्‍यावरचे केस गळून जातात. (जनरलाईझ्ड … generalized) किंवा ते नर प्रवृत्तीनुसार (male patterned) गळतात. केसांची वाढ केसांच्या मुळातील एका लहान गोलाकार कांद्यावजा भागातून होते.

हेअर बल्ब (hair bulb) साधारण केस या बल्बमधून एकूण एक ते पाच वर्षांपर्यंतसुद्धा वाढत राहू शकतो, याला ऍनाजेन (anagen) स्थिती म्हणतात. वाढ थांबली की, हा बल्ब कोमेजतो. आता केस वाढण्याचे थांबते, केसाच्या वाढीची विश्रांतीची स्थिती (telogen phase) सुरू होते. ही स्थिती तीन महिने टिकते व केस गळू लागतात (catagen phase)निरामय प्रौढ व्यक्तीचे 50 ते 100 केस दररोज टेलोनेन स्थितीत जातात, म्हणजे 3 महिन्यांनी ते 50 ते 100 केस रोज गळतात. शरीरात घडणाऱ्या अनेक घटनांचा केसांच्या वाढींवर परिणाम होतो. त्यामुळे वाढीची ऍनॅजेन स्थिती संपुष्टात येते व टेलोजेन स्थिती लवकरच सुरू होते. बाळंतपण, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर थांबविणे, कोणत्याही कारणाने ताप येणे, रक्तस्राव होणे, शस्त्रक्रिया होणे, हृदयविकाराचा झटका येणे, पक्षाघात होणे, कोणत्याही कारणाने झपाट्याने वजन कमी होणे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणे किंवा कोणताही मोठा मानसिक ताण येणे यांसारख्या कारणांनी टेलोनेन स्थिती मोठ्या प्रमाणात सुरू होते. असा प्रसंग येथून गेल्यावर तीन महिन्यांनी केसांची गळती सुरू होते. केस गळू लागले तरी डोक्‍यावरच्या त्वचेत कोणताही आजार आढळून येत नाही. केस विंचरताना मोठ्या प्रमाणात फणीवर येतात, सकाळी उशीवर केस आढळतात. प्रत्यक्ष केस मोकळे तर (निरामय स्थितीत 50 ते 100 केस मोजता येतील) मोठ्या आजारानंतर तीन महिन्यांनी हा आकडा 300 ते 400 पर्यंत जातो. हे सगळे केस परत येतात. संतुलित आहार, नियमाने केलेला व्यायाम, अंतर्बाह्य स्वच्छता आणि मानसिक स्वास्थ्य इकडे लक्ष दिले तर पुरेसे आहे. कोणत्याही औषधांची गरज नसते.

कधी कधी वाढ होण्याच्या स्थितीत, ऍनाजेन फेजमध्ये डोक्‍यावरील केसांची वाढ खुंटते व केस गळू लागतात. कॅन्सरच्या उपचाराकरिता वापरण्यात येणाऱ्या सायटोटॉक्‍झिक (cytotoxic)  औषधांचा हा ज्ञात परिणाम आहे. रक्त गोठू नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या अँटिकोऍग्युलंट (anticoagulant)  औषधांचादेखील असा दुष्परिणाम होणे संभवते. जीवनसत्व अ दीर्घकाळ अतिरेकाने सातत्याने घेत राहण्यानेदेखील असाच दुष्परिणाम होणे शक्‍य आहे. काही व्यक्तींना "मल्टिव्हिटॅमिन'ची एक गोळी घेण्याने आपली प्रकृती सुधारले असे वाटते, तर काहींना जीवनसत्व अ घेण्याने आपली दृष्टी चांगली राहील असे वाटते. हे भ्रम आहेत. उलटपक्षी या गोळ्यातील काही रेणू दीर्घकाळ घेण्याने शरीरात साचतात व अपायकारक ठरतात हे ध्यानात ठेवले पाहिजे. संपूर्ण डोक्‍यावरचे केस जाण्याच्या कारणामध्ये काही अंतर्ग्रंथींचे आजार असतात. थॉयरॉईड ग्रंथीचे कार्य नीट न झाल्यास मिक्‍झिडिया (myxoedema)  हा विकार जडतो. डोक्‍यावरचे केस विरळ होऊ लागतात. चेहरा सुजतो, आवाज बसतो, मलावरोध होण्याची प्रवृत्ती होते. थंडी फार वाजते. सर्व हालचाली संथ होऊ लागतात. खिन्नता जाणवू लागते. या आजारावर चांगले उपचार करता येतात. आजाराचे निदान रक्तातील ढडक या संप्रेरकाच्या वाढलेल्या पातळीवरून करता येते. मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पिट्युटरी ग्रंथीचे काम नीट न झाल्यास हायपोपिट्युटॅरिझम (hypopituitarism)  हा विकार होतो.

पिट्युटरी ग्रंथी सर्व अंतर्ग्रंथींच्या कामावर ताबा ठेवते. स्वाभाविकपणे पिट्युटरी ग्रंथीचे कार्य नीट न झाल्याने सगळ्याच अंतर्ग्रंथी अकार्यक्षम होतात. थॉयरॉईड ग्रंथीचेदेखील कार्य नीट होत नाही. तथापि, ढडक ची पातळी वाढत नाही. शिवाय हायपोपिट्युटॅरिझमध्ये स्त्रियांप्रमाणे पुरुषांच्या चेहऱ्यांवरील केस नाहीसे झालेले असतात. चेहऱ्यावरील त्वचेला सुरकुत्या पडतात. शरीरातील त्वचा मऊ असते. केसदेखील नरम असतात. मिक्‍झिडीमामध्ये त्वचा खरबरीत असते आणि केस राठ असतात. मिक्‍झिडीमामध्ये आवाज जाड आणि बसलेला असतो, तर हायपोपिट्युटॅरिझममध्ये आवाजात फरक पडलेला जाणवत नाही. बाळंतपणाच्या वेळेस अतिरेकी रक्तस्राव होणे हे पिट्युटरी ग्रंथीचे कार्य थांबण्याचे कारण असते.

आपल्या मानेमध्ये पॅराथॉयरॉईड नावाच्या ग्रंथी असतात. शरीरातील कॅल्शियमच्या चयापचयावर या ग्रंथीचा मोठाच प्रभाव असतो. या ग्रंथीचे काम कमी झाल्यास हायपोपॅराथॉयरॉयडिझम (hypopara thyradism) हा विकार होतो. पाठ दुखते. पाठीचा कणा वाकेनासा होतो. लहान वयात मोतिबिंदू होतो. काहींना फिट्‌स येतात. अनेकांना हातापायाची बोटे वेडीवाकडी होण्याचे झटके (tetany)  येत राहतात. हायपोपॅराथॉयरॉयडिक्‍स असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्‍यावरील केस विरळ होत जातात. या सर्व आजारात लवकरात लवकर निदान होणे महत्त्वाचे आहे. कारण एकदा केस गळण्यावर योग्य उपचार करूनदेखील पूर्वीसारखा केशसंभार परत येईल असे नसते.

मस्तकावरील त्वचेला झालेल्या आजाराने केसांच्या मुळांना अपाय होणे स्वाभाविक आहे. अगदी लहान अर्भकांच्या डोक्‍यावरील विशिष्ट जागेवरचे केस उशीवर डोके घासून घासून गळून पडतात. कारण त्यांना डोक्‍याला एटॉपिक एक्‍झिमा (atopic eczema) होतो. अशा विकारांना दीर्घकाळ उपाय करावे लागतात. म्हणून स्टेरॉईड्‌स असणारी मलमे जपून वापरावीत. प्रौढांच्या डोक्‍यावरील त्वचेला बुरशीमुळे दाह होतो. टिनिया कॅपिटिस (tinea capitis)  डोक्‍यात जिवाणूंमुळे लहान लहान पुटकुळ्या आल्या तर त्या-त्या ठिकाणचे केस गळून जातात. अर्थात कोणत्याही प्रकारचा त्वचेचा आजार दिसला तर त्याचे निदान करून योग्य उपचार केल्याशिवाय केस गळणे थांबणार नाही हे उघडच आहे. डोक्‍यात कोंडा होणे हे केस गळण्याचे नेहमी आढळणारे कारण होय. त्वचेच्या आवरणातून मृत पेशींचे पुंजके बाहेर टाकले जातात. या मृत पेशींमध्ये काही जिवाणू आणि बुरशीसदृश्‍य किटाणूंमुळे दाह होतो, खाज सुटते. या खवल्यांमधील जिवाणूंमुळे हे खवले खांद्यावर व पाठीवर पडतात तेव्हा तिथेही आग होते व तेथे पुरळ उठते. कोंडा निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण "सिबॉरिक' (seborrhocic)  प्रकारचा त्वचेचा विकार होणे. हा का होतो हे अद्याप कळत नाही. याच्या उपचारात पोटात घेण्याची औषधे क्वचितच लागतात. सॅलिसिलिक ऍसिड, सेलेनियम सल्फर आणि टार असणारा शॅम्पू वापरण्याने फायदा होतो. कोमट पाण्याने डोके धुऊन शॅम्पू चांगला चोळावा. दोन ते तीन मिनिटे शॅम्पू डोक्‍यावर लागलेला ठेवावा व मग डोके धुवावे. हे सुरवातीला रोज करावे. एकदा कोंडा गेल्यावर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शॅम्पू वापरावा.

बऱ्याच वेळा केस गळून पडण्याची कारणे सापडत नाहीत. ऍलोपेशिया एरिआटा (alopecia areata) या विकारात एका भागावरील केस अकस्मात गळून टक्कल पडते. ऍलोपेशिया टोटॅलिस (alopecia totalis) या विकारात थोड्याच दिवसांत संपूर्ण डोक्‍यातील केस गळून पडतात. क्वचित ऍलोपेशिया युनिव्हर्सलिस (alopecia universelis) होतो. यात डोके, भुवया, दाढी, मिशा, छाती व हातापायाचेसुद्धा केस गळून पडतात. या विकारांचे कारण कळत नाही; परंतु बऱ्याच रुग्णांचे केस परत येतात हा दिलासा आहे. याला एक वर्ष लागते. कदाचित मानसिक तणाव या आजाराला कारणीभूत असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नर प्रवृत्तीच्या टकलावर उपाय नसतो, असे टक्कल रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांनाही पडू शकते.
---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Thursday, February 4, 2010

केसांची काळजी

डॉ. रचिता धुरत,
प्राध्यापक व विभागप्रमुख,
त्वचा व गुप्तरोग चिकित्सा विभाग,
बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, मुंबई.

प्रत्येक स्त्रीला आपले केस काळेभोर, लांबलचक, घनदाट व रेशमी असावेत, असे वाटत असते; परंतु हे सौभाग्य प्रत्येकाला प्राप्त होते असे नाही, पण आपल्याला मिळालेल्या नैसर्गिक केसांची निगा योग्य तऱ्हेने राखून आपण आपले केस आकर्षक बनवू शकता.
हल्ली तरुण मंडळी केसांना आकर्षक करण्यासाठी केसांना वेगवेगळे कलर करतात. काहीजण केस सरळ करून तर काहीजण कुरळे करून घेतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारची केसांची रचना करून आपल्या केसांचे सौंदर्य खुलवू शकतात.
केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे. गरम पाण्याच्या शॉवरखाली केस धुऊ नये कारण शॉवरमधून येणाऱ्या गरम पाण्याची तीव्रता लक्षात येत नाही. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. केस धुताना जोरजोरात घासू नये त्यामुळे केसातील क्युटिकलला इजा पोहोचते व केस राठ होण्याची शक्यता असते.
केस चमकदार करण्यासाठी कंडिशनरचा वापर आठवडय़ातून एकदा तरी करावा. शाम्पू केलेल्या केसांवर लिंबूपाणी घालूनसुद्धा केस चमकदार करता येतात.
केसांची निगा राखताना केसांचे आरोग्य व केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरली जाणारी प्रसाधने यांचा विचार करणे आवश्यक आहे. केसांच्या आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे केसांची स्वच्छता व संतुलित आहार.
केसांची उत्तम स्वच्छता राखण्यासाठी कोणता/ कुठला शाम्पू वापरावा, केस आठवडय़ातून किती वेळा धुवावे, केसांना तेल लावावे किंवा लावू नये, केस कसे सुकवावे अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण करत असतो.
केस सुकवताना जास्त काळजी घ्यावी लागते. केस ओले असताना विंचरू नयेत कारण केस तुटण्याची शक्यता अधिक असते. केस ओले असताना कमकुवत असतात. केस धुतल्यावर टॉवेलने केसांचा घट्ट आंबाडा बांधू नये. केसांचे पाणी टॉवेलने टिपावे व केस दोन भागांत विभागून सुकवावे. केस सुकवताना गरम हेअर ड्रायरचा वापर शक्यतो टाळावा. केस उन्हात सुकवू नये. पंख्याखाली केस सुकवणे अधिक चांगले. केस वाळवताना केस झटकू नये. केस साधारण ओलसर असताना थोडे केसांना तेल किंवा live-on conditioner चोळावे त्यामुळे केस मऊ राहण्यास मदत होते.
केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळापासून टोकापर्यंत खोबरेल तेल लावल्यामुळे केसांमधील आद्र्रता टिकून राहते. केस मऊ होतात; परंतु फार जास्त प्रमाणात केसांना तेल चोळल्यावर शाम्पूसुद्धा केस साफ करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरावा लागतो व त्यामुळे केस अधिक कोरडे होऊ शकतात.
तुमचे केस कोरडे असतील तर दररोज केस धुऊ नये. टू इन वन (कंडिशनरमिश्रित) शाम्पू न वापरता वेगळ्या कंडिशनरचा वापर केस धुतल्यानंतर करावा. आपल्या केसांसाठी योग्य असलेल्या एकाच ब्रॅण्डचा शाम्पू व कंडिशनर वापर करावा.
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Thursday, January 28, 2010

रहस्य केसांचे!

मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे.. सळसळीत, रेशमी, काळेभोर, लांबसडक केस म्हणजे जणू सौंदर्याचा मापदंडच! एक लांबसडक केस चेहऱ्यातील अनेक उणिवा भरून काढेल तर खुरटे, आखूड केस सुंदर चेहऱ्यालादेखील बाधा आणतील. म्हणूनच बहुधा आपल्याच देशात नव्हे तर जगभरात हजारो वर्षांपासून लांबसडक केसांचं अतिशय आकर्षण आहे. आपले केस लांबसडक, सळसळते नसल्याचं दु:ख सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखाने एकदा मुलाखतीत बोलून दाखवलं होतं! मध्यंतरीच्या काळात काही वर्षे आपल्याकडे आखूड केसांची फॅशन आली होती खरी, पण ती अगदीच तात्पुरती. एरवी कामिनी कौशल, मधुबाला, साधना, जयाप्रदा, परवीन बाबी, करिश्मा कपूरपासून आजच्या करीना, कतरीना, बिपाशा बासू, विद्या बालनपर्यंत प्रत्येक काळात लांबसडक केसांचीच फॅशन होती आणि आजही आहे. हेअर स्टाईलचे प्रकार बदलले असतील, पण केसांच्या लांबीचं आकर्षण तेच आहे.
लांब केस हे सौंदर्याचंच नाही तर सामाजिक प्रतिष्ठेचंदेखील लक्षण मानलं जात असे. पूर्वापार इजिप्त, ग्रीक, रोमन वगैरे देशांतील उमराव घराण्यातील स्त्रिया लांबसडक केस राखत असत. केस मेंदीने रंगवून त्यावर सोनेरी चमकी पसरवून फुलांची सजावट करण्याचा हक्क फक्त उमराव घराण्यातील स्त्रियांनाच होता. गरीब वा गुलाम स्त्री- पुरुषांना डोक्यावर केस राखता येत नसत. जपानमध्ये मात्र कुलीन स्त्रीपेक्षा ‘गेईशा’ (पुरुषांचं नृत्य गायनाने मनोरंजन करणाऱ्या स्त्रिया)चेच केस अधिक लांब असत. उंच मनोऱ्यासारखी केशरचना आणि त्यावर हिरेमोत्यानं मढवलेल्या छोटय़ा कंगव्यांची सजावट करण्याची पद्धत होती. आजही जपानमध्ये लग्न समारंभात वधूची अशीच मनोऱ्यासारखी उंच केशरचना केली जाते!
लांब केस आणि तारुण्य हे समीकरण तर सांगायलाच नको. वाढत्या वयात शारीरिक तसेच मानसिक बदलांमुळे केस गळू लागतात त्यामुळे ते आपोआपच कापून टाकण्याकडचा कल अधिक वाढतो. केस जर अधिक काळ लांबसडक राहावे असं वाटत असेल तर त्यासाठी लहानपणापासून आहारविहाराच्या सवयी योग्य असणं गरजेचं आहे. केसांना सगळ्यात जास्त गरज असते ती पोटातून जाणाऱ्या खनिज द्रव्यांची आणि केस स्वच्छ राखण्याची. त्यासाठी भरपूर पाणी प्यावे, मोड आलेली कडधान्ये, गाजरसारख्या पदार्थाचा आहारात समावेश असावा आणि निदान एक दिवसाआड तरी तेल- शांपू लावून केस धुवावेत.’

गरजेनुसार मोकळे सोडता येतात किंवा बांधून ठेवता येतात म्हणून लांब केसांचं आकर्षण सर्वानाच असतं. लांब केस सुंदर दिसत असले तरी त्यांची काळजीही खूप घ्यावी लागते. ज्यांना लांब केस आवडतात, ते मेंटेन करण्याची जबाबदारीही त्या स्वखुशीने पेलतात. आईकडून हा वारसा मुली खरेतर जपत आल्या आहेत. सध्याच्या काळात लांबसडक केस असलेल्या मुली अपवादच.

Saturday, August 22, 2009

तेलाने केस खरंच वाढतात का?

केसांचे आरोग्य प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरते. केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग आणि तेल सांगितली आहेत. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होईल. त्यामुळे अमुक तेल लावले, की केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
डोळे, दात, चेहऱ्याची ठेवण, त्वचेचा रंग वगैरे गोष्टी व्यक्‍तिविशिष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्‍तीत वेगवेगळ्या असतात. तसेच केसांची ठेवण, केसांची प्रत, केसांचा रंग तसेच केसांची लांबी वगैरे गोष्टीसुद्धा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरत असतात. म्हणूनच प्रकृतिपरीक्षणात "केस' हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो.
तेलाने केस वाढतात का हे समजण्यासाठी आधी केसांची मूलभूत माहिती घ्यायला हवी. आयुर्वेदाने केसांचा संबंध हाडांशी असतो असे सांगितले आहे.
स्यात्‌ किट्टं केशलोमास्थ्नो ।
...चरक चिकित्सास्थान
अस्थिधातूचा मलभाग म्हणजे केस व रोम होत. अस्थिधातू तयार होतानाच केस तयार होतात व म्हणूनच केसांचा हाडांशी खूप जवळचा संबंध असतो. हाडे अशक्‍त झाली तर त्याचा केसांवर दुष्परिणाम होतो असेही आयुर्वेदात सांगितले आहे.
केशलोमनखश्‍मश्रुद्विजप्रपतनं श्रमः ।
ज्ञेयमस्थिक्षये लिं सन्धिशैथिल्यमेव च ।।
..... चरक सूत्रस्थान
केस, रोम, नख, दाढी-मिशांचे केस गळणे तसेच दात तुटणे, फार परिश्रम न करताही थकवा जाणवणे, सांध्यांमध्ये शिथिलता जाणवणे ही सर्व लक्षणे हाडांचा क्षय झाल्यामुळे उद्‌भवतात.
प्रकृतीनुसारही केस निरनिराळे असतात. कफप्रकृतीचे केस आदर्श म्हणावे असे असतात. दाट, मऊ, लांब व सहसा न गळणारे, न पिकणारे केस कफाचे असतात, पित्तप्रकृतीमध्ये केस गळण्याची, पिकण्याची प्रवृत्ती बरीच असते, तसेच पित्ताचे केस मऊ असले तरी फार दाट नसतात. वातप्रकृतीचे केस राठ असतात, केसांची टोके दुभंगणे, केस तुटणे व गळणे वगैरे लक्षणे वातप्रकृतीमध्ये दिसतात.
आनुवंशिकतेचाही केसांशी संबंध असू शकतो. आजीचे, आईचे लांब केस असण्याची प्रवृत्ती असली तर मुलीचेही केस लांब असण्याची शक्‍यता मोठी असते, अर्थात आनुवंशिकता प्रकृतीमध्ये अंतर्भूत असतेच.
या सर्व माहितीवरून लक्षात येऊ शकते की केसांवर प्रकृतीचा व हाडांचा मोठा प्रभाव असतो.
केशवर्धनासाठी योग व तेले
केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग दिलेले आहेत, अनेक तेलेही सांगितली आहेत की ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहील व केस वाढतील. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. अमुक तेल लावले की माझे केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
बऱ्याचदा केसांच्या बाबतीत फक्‍त बाह्योपचार पुरेसे आहेत असे समजले जाते. अमुक तेल लावले, अमुक पदार्थ वापरून केस धुतले की चांगले राहतील, वाढतील अशी अपेक्षा ठेवली जाते, मात्र त्याहून अधिक महत्त्व अस्थिपोषक द्रव्ये घेण्याला असते. दूध, खारीक, शतावरी कल्प, नैसर्गिक कॅल्शियम असणारी शंखभस्म, प्रवाळभस्म, कुक्कुटाण्डत्वक्‌ यांसारखी द्रव्ये केसांच्या आरोग्यासाठी बाह्योपचारापेक्षा अधिक उपयुक्‍त असतात. बऱ्याचदा असे दिसते की हाडांशी संबंधित विकारांवर उपचार करत असता केसांमध्ये अनपेक्षित सुधारणा होताना दिसते किंवा च्यवनप्राश, सॅनरोझसारखी एकंदर प्रतिकारशक्‍ती वाढवणारी रसायने नियमित सेवन केली, प्रकृतीनुरूप आहार-आचरणाने दोष संतुलित ठेवता आले तर केस गळायचे थांबतात, काही लोकांचे अकाली पांढरे झालेले केस काळे होताना
दिसतात.
केसांची निगा राखण्यामध्ये तेल लावणे महत्त्वाचे असते यात संशय नाही. अस्थिधातू, केस हे शरीरघटक वाताच्या आधिपत्याखाली येतात आणि वात म्हटला की त्याला संतुलित ठेवण्यासाठी तेलासारखा दुसरा श्रेष्ठ उपचार नाही. केसांना तेल लावण्याने त्यांच्यातला वात नियंत्रित राहतो, अर्थातच केस तुटणे, कोरडे होणे, दुभंगणे, गळणे या सर्वांना प्रतिबंध होतो.
केसांच्या मुळाशी तेल लावल्याने केस मजबूत व्हायला मदत मिळते. डोक्‍यात कोंडा होणे, खवडे होणे वगैरे त्रास सहसा होत नाहीत, मात्र हे सर्व फायदे मिळण्यासाठी तेल चांगल्या प्रतीचे, केश्‍य म्हणजे केसांना हितकर द्रव्यांनी सिद्ध केलेले असावे लागते. असे सिद्ध तेल केसांच्या मुळांना लावले की लगेचच आतपर्यंत शोषले जाते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य नीट राहायला मदत मिळते. मात्र कच्चे तेल म्हणजे ज्याच्यावर अग्निसंस्कार झालेला नाही असे तेल कितीही शुद्ध असले, भेसळमुक्‍त असले तरी ते आतपर्यंत जिरण्यास अक्षम असल्याने केसांना तेलकटपणा आणण्याशिवाय फारसे उपयोगी पडत नाही. उलट केस तेलकट झाले की तेल काढून टाकण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून बनविलेले शांपू, साबण वापरावे लागतात, ज्यांचे वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात.
केस निरोगी हवेत
तेल लावण्याने केसांचे आरोग्य सुधारत असल्याने काही प्रमाणात केस लांब होण्यासाठीही फायदा होऊ शकतो; पण त्या लांब होण्याला प्रकृतीची, वयाची, एकंदर शरीरशक्‍तीची मर्यादा राहील हे लक्षात घ्यायला हवे.
केसांच्या लांबीची चर्चा करताना एक गोष्ट समजून घ्यायला हवी की केस नुसतेच लांब असण्यापेक्षा ते निरोगी असणे अधिक महत्त्वाचे असते. मूळचे लांब केसही गळत असले, तुटत असले आणि निर्जीव दिसत असले तर आकर्षक वाटणे शक्‍य नसते. त्यामुळे केसांची नुसती लांबी वाढविण्याच्या मागे न लागता केस बळकट राहतील, छान तेजस्वी राहतील, काळे राहतील याकडे लक्ष द्यायला हवे.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून उपाय
केश्‍य द्रव्यांनी सिद्ध केलेले व आतपर्यंत जिरणारे "संतुलन व्हिलेज हेअर तेला'सारखे तेल केसांना नियमितपणे लावणे केसांसाठी उत्तम असते. कृत्रिम रंग, गंध घालून तयार केलेले तेल टाळणेच श्रेयस्कर होय.
केस धुण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून तयार केलेली उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिक द्रव्ये, उदा., शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरेंचे मिश्रण किंवा तयार "संतुलन सुकेशा' वापरणे चांगले असते.
आठवड्यातून दोन वेळा केस धुवावे.
केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
आठवड्यातून एकदा, केस धुण्याआधी केसांच्या मुळाशी लिंबाची फोड चोळून नंतर अर्धा तास कोरफडीचा गर लावून ठेवण्यानेही केसांचे आरोग्य चांगले राहते. केस गळणे, कोंडा होणे वगैरेंना प्रतिबंध होतो.
आहारात दूध, खारीक, शतावरी कल्प, "कॅल्सिसॅन', "सॅनरोझ' वगैरेंचा समावेश असू द्यावा.
उन्हात फिरताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी उपाय योजणे, उष्णतेजवळ किंवा संगणकावर काम असल्यास, रात्रीची जागरणे किंवा रात्रपाळी असल्यास पित्त कमी करण्यासाठी "सॅनकूल चूर्ण', "संतुलन पित्तशांती गोळ्या', नियमित पादाभ्यंग वगैरे उपाय योजणेही केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते.
डॉ. श्री बालाजी तांबे

ad