Showing posts with label दिनचर्या. Show all posts
Showing posts with label दिनचर्या. Show all posts

Friday, July 17, 2015

शरीराचे घड्याळ

भौतिक प्रगतीच्या मागे धावणाऱ्यांना निसर्ग माफ करत नाही. निसर्ग माणसाला त्याच्या चुकीची नेहमीच शिक्षा देत असतो. गगनचुंबी इमारती बांधल्यावर तेथे साहजिकच सूर्यप्रकाशाचा अभाव असतो व त्यामुळे त्यात राहणाऱ्यांना सूर्यप्रकाशाचे फायदे मिळू शकत नाहीत. अशा ठिकाणी भर दुपारी बारा वाजता सूर्यप्रकाश आला, तरी यात राहणारी मंडळी सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांपासून वंचित राहतात. एकंदर मनुष्याच्या डोळ्यांना सूर्यप्रकाश दिसणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शरीराच्या घड्याळाला ट्युनिंग होत राहते. सूर्य जसजसा आकाशात सरकतो तसे शरीराचे घड्याळ चालू राहते. जेथे विज्ञान प्रगत झालेले आहे अशा देशांमध्ये या गोष्टी लक्षात घेऊन आठवड्यातून एक दिवस का होईना बागबगीचांमध्ये जाणे, उपवनांमध्ये सगळ्यांनी जमणे अशा तऱ्हेचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत, तसेच सूर्यकिरणांतील नीलतरंग पण आरोग्यासाठी उपयुक्‍त असतात हे लक्षात आले आहे.

डॉ. श्री. बालाजी तांबे
मनुष्याला काळाचे भान कसे झाले? एक तर बाह्यवातावरणात झालेल्या बदलांमुळे किंवा दुसरे स्वतःच्या आत आलेल्या अनुभवांमुळे. बाहेरचा बदल सर्वप्रथम दोन प्रकारे लक्षात आला. बाहेर एक तर प्रकाश आहे किंवा अंधार आहे हे लक्षात आले. त्यामुळे दिवस व रात्र हे काळाचे दोन मोठे विभाग लक्षात आले. शरीराच्या आत अनुभवाला येणाऱ्या बदलांमध्ये भूक लागणे व मलविसर्जन प्रवृत्ती होणे या दोन उलट-सुलट क्रिया लक्षात आल्या. हेही लक्षात आले, की प्रकाश देणारा व बाह्यवातावरणाचे भान करून देणारा आकाशातील भानू - सूर्य नियमाने उगवतो व मावळतो. बाह्य वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार शरीरात काय बदल होतात हे मनुष्याच्या लक्षात आले. बाह्य वातावरणातील उष्णतेमुळे होणाऱ्या बदलामुळे वारा जोरात वाहू लागतो किंवा थांबतो आणि एका चक्राची सुरवात होते हेही लक्षात आले. शरीरावर या सर्व बाह्य वातावरणाचा मुख्य म्हणजे सूर्याचा परिणाम होऊन शरीराचेही एक घड्याळ तयार होते. या घडाळाचा अभ्यास करून आयुर्वेदाने पंचमहाभूतांची चालणारी कार्ये, त्यांचे अपापसांतील संबंध व त्यातून सर्व वस्तुजातावर विशेष परिणाम कसा घडतो हे दाखवून दिले. या परिणामांचा अभ्यास करून वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष निसर्गात व शरीरात क्रमाने कसे वाढतात हे लक्षात घेतले, उदा. वसंत ऋतूत हलकी उष्णता वाढते, त्यानंतर ग्रीष्म ऋतूत कडक उन्हाळा सुरू होतो, हेमंत ऋतूत हलकी थंडी पडते व नंतर येणाऱ्या शिशिर ऋतूत कडक थंडी पडते वगैरे. या ऋतूंचा शरीरावर परिणाम होत असतो, उदा. शिशिर ऋतूत कफ साठू लागतो व वसंतात त्याचा प्रकोप होतो; ग्रीष्मात वात साठतो, तर नंतर येणाऱ्या वर्षा ऋतूंत वाताचा प्रकोप होतो वगैरे. अशा प्रकारे तीन दोषांत होणारे सहा बदल लक्षात घेऊन काळ सहा ऋतूंमध्ये विभागला आहे हे लक्षात येते. हे ऋतुचक्र व दिवस-रात्रीचे चक्र पुन्हा पुन्हा चालते हे मनुष्याच्या लक्षात आले. सहा ऋतू एकानंतर एक परत परत येतात हे लक्षात आल्यावर वर्षाची संकल्पना लक्षात आली. हा सर्व अनुभव सर्वसामान्यांना येण्यासारखा होता. त्यासाठी फार मोठ्या संशोधनाची गरज नव्हती.

तात्पर्य हे, की मनुष्याच्या शरीरावर बाह्य वातावरणातील उष्णतेचा, सूर्यप्रकाशाचा परिणाम होतो व त्यातून त्याचे जन्म-मरणाचे चक्रही उत्पन्न होते. काळानुसार शरीरात अनेक बदल होत असतात, तसेच कालानुसार जन्म-मरणाच्या चक्रातही बदल होत असतात. 

मनुष्याला सूर्याचे महत्त्व पटल्यामुळे ‘भास्कराय नमः’ ही प्रथम प्रार्थना त्याच्या तोंडून बाहेर पडली. जो सर्वांना ज्ञान देतो व ज्याच्यावर सगळ्या जगाचे अस्तित्व अवलंबून आहे अशा तेज देणाऱ्या, तेजाचे अनुभव देणाऱ्या सूर्याला देवत्व बहाल केले. हा रोज नियमाने उगवणारा सूर्य सर्वांना मदत करतो, त्यामुळे त्याला मित्र असेही म्हटले जाऊ लागले. तो जणू आकाशात उडणारा पक्षी आहे म्हणून त्याला खग म्हटले जाऊ लागले. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पूष, हिरण्यगर्भ, मरीची, आदित्य, सवितृ, अर्क, भास्कर अशी सूर्याची बारा नावे घेऊन सकाळी सूर्यनमस्कार घातले जाऊ लागले. आरोग्यासाठी, चांगल्या जीवनासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि ज्ञानाच्या समाधानासाठी हा पहिला योगप्रकार मनुष्याच्या जीवनात सहजरीत्या अंतर्भूत झाला. आरोग्यासाठी सूर्यप्रकाशाची, सूर्यकिरणांची अत्यंत आवश्‍यकता असते हे आता सर्व जगाला पटलेले आहे. 

शरीराचे घड्याळ वेळच्या वेळी चालले नाही तर शरीराचे आरोग्य नीट राहणार नाही हे लहान मुलालाही कळते. भूक लागल्यानंतर अगदी तान्हे मूलही कसे आकांत करते हे प्रत्येक आईच्या अनुभवाचे असते. भूक लागल्यानंतर शरीराची प्रत्येक पेशी अशाच प्रकारे आकांत करते. ती वेळ सांभाळली गेली नाही, शरीराचे घड्याळ सांभाळले नाही तर रोगोत्पत्ती होते. त्यात एक मोठी अडचण अशी दिसून आली, की प्रत्यक्ष सूर्यप्रकाश अंगावर आल्यावर शरीरात काही विशेष जीवनसत्त्वे तयार होतात. त्यामुळे सतत बंद खोलीत राहणाऱ्यांच्या व सतत विजेच्या दिव्यांमध्ये बसून काम करणाऱ्यांच्या आरोग्यात बदल व्हायला लागतात व आजारपण वाढायला लागते. मनुष्याने मोठा गुन्हा केला तर त्याला सर्वप्रथम अंधारकोठडीत टाकले जाते म्हणजे त्याला इतर लोकांपासून व सूर्यप्रकाशापासून तोडले जाते, जेणेकरून त्याला काळाचे भान राहणार नाही. 

भौतिक प्रगतीच्या मागे धावणाऱ्यांना निसर्ग माफ करत नाही. निसर्ग माणसाला त्याच्या चुकीची नेहमीच शिक्षा देत असतो. गगनचुंबी इमारती बांधल्यावर तेथे साहजिकच सूर्यप्रकाशाचा अभाव असतो व त्यामुळे त्यात राहणाऱ्यांना सूर्यप्रकाशाचे फायदे मिळू शकत नाहीत. अशा ठिकाणी भर दुपारी बारा वाजता सूर्यप्रकाश आला, तरी यात राहणारी मंडळी सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांपासून वंचित राहतात. एकंदर मनुष्याच्या डोळ्यांना सूर्यप्रकाश दिसणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शरीराच्या घड्याळाला ट्युनिंग होत राहते. सूर्य जसजसा आकाशात सरकतो तसे शरीराचे घड्याळ चालू राहते. जेथे विज्ञान प्रगत झालेले आहे अशा देशांमध्ये या गोष्टी लक्षात घेऊन आठवड्यातून एक दिवस का होईना बागबगीचांमध्ये जाणे, उपवनांमध्ये सगळ्यांनी जमणे अशा तऱ्हेचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर केले सुरू होत आहेत, तसेच सूर्यकिरणांतील नीलतरंग पण आरोग्यासाठी उपयुक्‍त असतात हे लक्षात आले आहे. 

प्राचीन भारतीय संस्कृतीतही उपवनांमध्ये जमणे, वृक्षपूजा करणे, सकाळी सूर्याला अर्घ्य देणे अशा पद्धती रूढ होत्या. तसे पाहता, सूर्य हा पावसा-पाण्यासाठीही जबाबदार असतो. आपण सर्वांना पुन्हा सूर्यप्रकाशात येऊन आरोग्य, ऐश्वर्य व समाधान मिळण्याच्या हेतूने फूल ना फुलाची पाकळी म्हणून सूर्याला पळीभर अर्घ्य देण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

निसर्गचक्र आणि दिनचर्या

डॉ. श्री. बालाजी तांबे
वयानुसारही शरीरातील वात-पित्त-कफाचा प्रभाव बदलत असतो. आयुर्वेदाने वयाचे तीन भाग केलेले आहेत... बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था! बाल्यावस्थेत स्निग्ध, बलस्वरूप कफाचे आधिक्‍य असते, कारण या काळात शरीराची वाढ होणे अपेक्षित असते. सर्व धातूंना योग्यप्रकारे पोषण मिळून शरीराला दृढ बनविण्याचे काम हा कफ करत असतो. म्हणून लहान वयात कफदोष वाढणार नाही, पण बलस्वरूप, निरोगी कफाचे पोषण होईल यासाठी दूध, लोणी, तूप, सुका मेवा यांसारख्या पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करायचा असतो. लहान वयात संतुलित कफाचा योग्य प्रकारे परिपोष झाला की त्याचा फायदा पुढे आयुष्यभर होऊ शकतो.
- डॉ. श्री बालाजी तांबे

कोणतेही काम वेळेवर केले की चांगल्या प्रकारे होते आणि नंतर होणारा मनस्ताप टाळता येतो, हा आपल्या सर्वांचा रोजचा अनुभव असतो. उदा. विजेचे किंवा टेलिफोनचे बिल भरायचे असले तर दिलेल्या अंतिम तारखेच्या आत ते भरणे सयुक्‍तिक असते. तारीख उलटून गेली तर दंड भरावा लागतो, फारच उशीर झाला तर घर अंधारात बुडू शकते. अगदी असेच आपल्या शरीराच्या बाबतीतही असते. चौरचौघांमध्ये किंवा समाजामध्ये कसे वागावे, बोलावे हे आपल्या सर्वांना माहिती असते. पण स्वतःच्या आरोग्यासाठी शरीराकडून कोणत्या वेळी काय करून घ्यायला हवे, हेसुद्धा समजून घ्यायला हवे. 

याचसाठी आयुर्वेदाने ‘दिनचर्या’ ही संकल्पना समजावलेली आहे. दररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेक गोष्टी करत असतो. त्या वेळेवर केल्या तर त्या सहजतेने होतात, शिवाय चांगल्या प्रकारे होतात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. कोणत्या वेळी काय काम करावे, हे निसर्गचक्रानुसार ठरवले जाते. उदा. पहाटे सूर्योदय होतो त्या वेळी किंवा त्याच्या आधीच उठणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते. रात्री वेळेवर झोपले व रात्री शांत झोप लागलेली असली तर सकाळी लवकर उठणे सोपे असते. 

एकदा सूर्य वर आला आणि अंगात आळस भरला की उठता उठवत नाही, शिवाय उठल्यावर उत्साह वाटत नाही, हा अनुभव सर्वांचा असतो. 
निसर्ग व शरीर यांचे हे समांतर रीतीने चालणारे चक्र पुढील सूत्रातून समजावलेले आहे,

वयोऽहोरात्रिभुक्तानां तेऽन्तमध्यादिगाः क्रमात्‌ । 
... अष्टांगहृदय सूत्रस्थान
वात-पित्त-कफ हे दोष, वय, दिवस, रात्र व अन्नपचन होत असताना अनुक्रमे अंती, मध्यकाळी व प्रारंभी अधिक बलवान असतात व विशेषत्वाने कार्यरत असतात.

दिवसाचे १२ तास आणि रात्रीचे १२ तास यांचे प्रत्येकी तीन-तीन भाग केले असता पहिल्या भागात कफाचे आधिक्‍य असते, म्हणजे सकाळी व संध्याकाळी ६ ते १० हा काळ कफाचा समजला जातो. मधला भाग म्हणजे दुपारी व मध्यरात्री १० ते २ या काळात पित्त वाढत असते, तर तिसऱ्या भागात म्हणजे दुपारी २ ते ६ व रात्रीच्या शेवटी २ ते ६ हा काळ वाताचा असतो. वात-पित्त-कफ यांचे असे ठराविक वेळेला वाढण्याचे आणि नंतर आपोआप कमी होण्याचे चक्र आपल्या शरीरात अविरत, रोजच्या रोज चालू असते.

वात हे शरीरात गती व हालचाल करू शकणारे तत्त्व होय. त्यामुळे झोपेतून उठण्याची क्रिया तसेच पोट साफ होण्याची क्रिया वाताच्या कार्यक्षेत्रातील असते. वरील सूत्रात सांगितल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता वाताचा काळ संपतो. म्हणजे सहज उठायचे असेल तर वाताच्या काळातच उठायला हवे. एकदा का सहा वाजल्यानंतर कफाचा काळ सुरू झाला की उठणे अधिकाधिक अवघड होत जाते. सकाळी लवकर उठण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वाताच्या काळात मलमूत्रविसर्जन सुलभ व योग्य प्रकारे होऊ शकते, कफाचा काळ सुरू झाला की विसर्जनाची क्रिया पूर्ण होणे अवघड होते, पर्यायाने अख्खा दिवस आळसात जाऊ शकतो. 

पहाटे सहानंतर कफाचा कालावधी सुरू होतो. ‘कफ’ हा शांत, स्थिर स्वभावाचा असल्याने सकाळच्या वेळी अभ्यास किंवा उपासना करणे मन एकाग्र होण्याच्या दृष्टिकोनातून सोपे असते. तसेच सकाळच्या या कफाच्या काळात मुखातील अतिरिक्‍त कफाची शुद्धी व्हावी यासाठी गंडुष, कफनाशक वनस्पतींनी मुखमार्जन वगैरे उपचार करायचे असतात. डोळ्यांत अंजन घालून तेथून कफदोष दूर केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. सकाळच्या वेळी व्यायाम करण्याचा फायदा सर्वाधिक असतो. कारण, कफाच्या काळात केलेल्या व्यायामाने शरीरात कफदोष संतुलित राहतो. मेदसुद्धा अति प्रमाणात वाढत नाही, एकंदर शरीरसौष्ठव आणि दिवसभरासाठी आवश्‍यक असणारी स्फूर्ती मिळवून ठेवता येते. कफदोषामुळे शरीरात येणारा जडपणा, आळस, मंदपणा दूर होण्यासाठी आपल्या भारतीय परंपरेत सकाळच्या वेळी सूर्यस्नान घेण्यास सुचवले आहे. सकाळी जोपर्यंत सूर्याची किरणे फार तीव्र नसतात तोपर्यंत म्हणजे उन्हाळ्यात आठच्या आधी, हिवाळ्यात नऊपर्यंत अगोदर अंगाला तेल लावून थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे किंवा सूर्यकिरणांत सूर्यनमस्कार करणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते, हाडांची बळकटी टिकविणारे, रोगप्रतिकारशक्‍ती नीट ठेवण्यास कारणीभूत असणारे असते, तसेच मधुमेह होण्यास प्रतिबंध करणारे डी जीवनसत्त्व फक्‍त सूर्यप्रकाशातच शरीर तयार करू शकते, असे आधुनिक विज्ञानाने शोधून काढले आहे. मात्र, फार तीव्र सूर्यप्रकाश त्वचेसाठी धोकादायक असू शकतो. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात १०-१५ मिनिटांसाठी बसणे किंवा सूर्यप्रकाशात सूर्यनमस्कार करणे आरोग्यासाठी उत्तम होय. 

पित्त हे पचनाचे कार्य करणारे तत्त्व आहे. त्यामुळे पित्ताच्या काळात अर्थात दुपारी १२ ते १ च्या दरम्यान जेवल्यास अन्नाचे पचन सहज होऊ शकते. जेवणाची वेळ होऊनही जेवले नाही तरी निसर्गचक्रानुसार पाचक पित्त

स्रवतेच आणि त्याला पचवायला काही नसले की त्यामुळे पोटात, आतड्यात उष्णता वाढत राहते. आयुर्वेदात तर सांगितले आहे की संधुक्षित झालेल्या अग्नीला पचविण्यासाठी अन्न मिळाले नाही तर तो शरीरधातूंना पचवायला सुरवात करतो, परिणामी शरीरातील आवश्‍यक तत्त्वे जळून जातात. याचसाठी वेळेवर जेवणे महत्त्वाचे होय. वेळेवर न जेवता फार उशिरा जेवले तर तोपर्यंत स्रवलेले पाचक पित्त विरून गेलेले असते. परिणामतः अन्न योग्य प्रकारे पचू शकत नाही, पचनसंस्थेवर अतिरिक्‍त ताणही येतो. प्रत्यक्षातही असे दिसते की अनेक दिवस वेळेवर न जेवणाऱ्या व्यक्‍तींना अपचन, गॅसेस, वजन वाढणे अशा प्रकारचे अनेक त्रास होऊ लागतात. हे सर्व टाळायचे असेल तर दुपारचे जेवण पित्ताच्या काळात म्हणजे १२ ते १ या अवधीत करणे उत्तम होय. 
झोपण्याच्या बाबतीतही त्रिदोषांचे हे चक्र ध्यानात घ्यावे लागते. झोप येते ती कफामुळे. कफाचा काळ रात्री १०-११ वाजेपर्यंत असते. त्यामुळे या वेळेपर्यंत झोपल्यास झोप लगेच लागते व ती झोप शांत असते. याउलट रात्री ११च्या पुढेही जागत राहिले म्हणजे पित्ताचा काळ सुरू झाला की त्याने शरीरात पित्तदोषाचे असंतुलन व्हायला सुरवात झाल्याने अंग गरम होणे, डोळ्यांची व हातापायांच्या तळव्यांची आग होणे, डोके दुखणे, केस गळणे वगैरे विविध तक्रारींना आमंत्रण मिळते. रात्रपाळी करणाऱ्या किंवा विमानात काम करणाऱ्या असंख्य व्यक्‍तींचा हा अनुभव आहे. 

वयानुसारही शरीरातील वात-पित्त-कफाचा प्रभाव बदलत असतो. आयुर्वेदाने वयाचे तीन भाग केलेले आहेत, बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था. बाल्यावस्थेत स्निग्ध, बलस्वरूप कफाचे आधिक्‍य असते कारण या काळात शरीराची वाढ होणे अपेक्षित असते. सर्व धातूंना योग्य प्रकारे पोषण मिळून शरीराला दृढ बनवण्याचे काम हा कफ करत असतो. म्हणून लहान वयात कफदोष वाढणार नाही, पण बलस्वरूप, निरोगी कफाचे पोषण होईल यासाठी दूध, लोणी, तूप, सुका मेवा यासारख्या पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करायचा असतो. लहान वयात संतुलित कफाचा योग्य प्रकारे परिपोष झाला की त्याचा फायदा पुढे आयुष्यभर होऊ शकतो.

तारुण्यावस्थेत पित्ताचे आधिक्‍य असते त्यामुळे तारुण्यात जोम, स्फूर्ती, मिळून उत्साहपूर्णता मिळू शकते व धडाडीची कामे होऊ शकतात. मात्र अति उत्साहाने शरीराची ताकद विनाकारण खर्च होणार नाही, उलट ताकद टिकून राहील यासाठी काळजी या काळात घ्यायची असते. 

वृद्धावस्थेत वात वाढतो त्यामुळे शरीराची शक्‍ती हळूहळू कमी होणे, इंद्रियांची ताकद क्षीण होणे स्वाभाविक असते, म्हणूनच या काळात वाताला शक्‍य तेवढे संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. 

अशा प्रकारे निसर्गाचे चक्र लक्षात घेऊन जीवनाचा क्रम तसेच रोजचा दिनक्रम आखला तर आरोग्य टिकेलच शिवाय जीवनाचा अधिकाधिक आनंद घेता येईल.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

ad