Wednesday, February 3, 2016

खिन्नता

- डॉ. ह. वि. सरदेसाई

एखाद्या न आवडणाऱ्या घटनेनंतर वाईट वाटणे स्वाभाविक असते; परंतु खिन्नता टिकून राहणे ही विकृती होय. एखाद्या व्यक्तीला वाईट वाटले तर त्या व्यक्तीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सहानुभूती अवश्‍य वाटते. खिन्नता निर्माण झाल्यास काळजी घेणाऱ्या (आई-वडिलांना) व्यक्तींच्या मनात अपेक्षाभंग निर्माण होतो. त्यातून अशी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला चिडचिड येऊ शकते. ज्या व्यक्तीला वाईट वाटत असते, त्या व्यक्तीचा आत्मसन्मान टिकलेला असतो. उलटपक्षी खिन्न झालेल्या व्यक्तीला अपराधीपणा आणि स्वतःबद्दल किंमतशून्यतेची भावना बळावलेली असते.

आपल्या ‘फॅमिली डॉक्‍टर’कडे उपचारासाठी गेलेल्या रुग्णांपैकी तीस टक्के रुग्णांच्या तक्रारींचा उगम ‘खिन्नते’तून येतो. आपल्या जनुकीय रचनेवर मेंदूच्या पेशींच्या दळणवळणाचे कार्य अहोरात्र चालू असते. हे दळणवळण ज्या रासायनिक रेणूंमार्फत घडते, त्या रेणूंना न्यूरो-ट्रान्समिटर्स म्हणतात. हे रेणू विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेला, विशिष्ट प्रमाणात निर्माण होणे आणि विशिष्ट वेळांत त्यांचा निचरा होणे आवश्‍यक असते. तसे झाले तरच मेंदूचे कार्य सुरळीतपणे चालू शकते. भावना, विचार आणि अनुभवांची स्मृती योग्य प्रकारे होण्याकरता या कार्याची योग्य प्रकारे कार्यवाही आवश्‍यक असते. या व्यवस्थेवर आपल्या जनुकीय रचनेचा मोठा ताबा असतो. कोणती भावना, कोणत्या वेळी, कोणत्या प्रमाणात निर्माण व्हावी हे या कार्यावर ठरत राहते.

जनुकीय रचनेप्रमाणे, वाढीच्या वयातील अनुभव आणि समस्या यांचादेखील या रसायनांच्या निर्मितीवर परिणाम होत राहतो. काही व्यक्तिमत्त्वातील दोष (समाजाचे स्थैर्य विसकटण्यास जबाबदार असे वागणे ः कायदे न पालणे, इतरांना शारीरिक इजा करण्याकडे प्रवृत्ती असणे, जबाबदारीची जाणीव नसणे) प्रकट होऊ लागतात. या पेक्षाही आई-वडिलांचा विवाह-विच्छेद किंवा वडिलांचे अर्थाजन बंद पडणे या अनुभवांचे दुष्परिणाम होतात. अशा मुलांमध्ये अनेक शारीरिक तक्रारी येतात; परंतु कोणताही आजार आढळून येत नाही. एखाद्या न आवडणाऱ्या घटनेनंतर वाईट वाटणे स्वाभाविक असते; परंतु खिन्नता टिकून राहणे ही विकृती होय. एखाद्या व्यक्तीला वाईट वाटले तर त्या व्यक्तीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सहानुभूती अवश्‍य वाटते. खिन्नता निर्माण झाल्यास काळजी घेणाऱ्या (आई-वडिलांना) व्यक्तींच्या मनात अपेक्षाभंग निर्माण होतो. त्यातून अशी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला चिडचिड येऊ शकते. ज्या व्यक्तीला वाईट वाटत असते, त्या व्यक्तीचा आत्मसन्मान टिकलेला असतो. उलटपक्षी खिन्न झालेल्या व्यक्तीला अपराधीपणा आणि स्वतःबद्दल किंमतशून्यतेची भावना बळावलेली असते.

खिन्नतेने ग्रासलेल्या व्यक्तीला किमान चार प्रकारचे त्रास जाणवू लागतात. १) खिन्नतेची, बरे वाटत नसल्याची भावना आणि परिस्थितीला जुळवून घेण्यातील क्षमतेची त्रुटी, २) खिन्नतेमुळे होणारे आजार, ३) खिन्नता आणि उन्माद यांच्या परिक्रमा आणि ४) आजार आणि उपचार यांच्यातून निर्माण झालेले त्रास, नको असणारे दुष्परिणाम, आजाराला होणारे प्रतिसाद.

१) परिस्थितीत घडलेल्या घटनेला प्रतिसाद म्हणून येणारी खिन्नता. प्रिय व्यक्तीचा विरह अथवा मृत्यू, विवाहविच्छेद, आर्थिक नुकसान, सामाजिक (अथवा कौटुंबिक) आदर गमावणे. अशा घटना घटताना राग येतो, नंतर अपराधीपणाची भावना बळावते. घटना घडल्यावर तीन महिन्यांच्या आंत त्रास होतो. आपले दैनंदिन कार्य करताना अडचणी जाणवू लागतात. थोडेफार वाईट वाटत राहते. चिंता येत राहते. स्वभाव चिडका बनतो. एकाग्रता जमत नाही. काहीही कार्य करण्याबद्दल आत्मविश्‍वास डळमळू लागतो आणि खिन्नतेच्या भावनेच्या जोडीला विविध शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. (पुढे पहावे).
२) मोठ्या प्रमाणात खिन्नतेचे परिणाम ः कोणत्याही बाबीत रस घ्यावासा वाटेनासा होतो. कशाचाही आनंद होत नाही. सगळ्या गोष्टींतून निवृत्त व्हावे ही भावना बळावते. आपले सगळे निर्णय चुकले आहेत, अशी अपराधीभावना येत राहते. मन एकाग्र होऊ शकत नाही. सतत थकवा वाटत राहतो. आता आपली काही किंमत राहिलेली नाही, असे वाटते. ज्या तक्रारींची कारणे सापडू शकत नाहीत, अशा विविध शारीरिक तक्रारी सतत येत राहतात. लैंगिक विषयात आणि संबंधातील रस लोपतो. मृत्यूचे विचार थैमान घालतात. कधी कधी या विचारांचे रूपांतर आचारात (आत्महत्या करण्यात) होऊ शकते. (परीक्षेत किंवा प्रेमात अपयश, आर्थिक नुकसान, प्रिय व्यक्तीचा मृत्यू) यातील बऱ्याच तक्रारी, विशेषतः थकवा, दिवसाच्या सुरवातीला (सकाळी) अधिक जाणवतात. झोपेत व्यत्यय येतो, सहसा भल्या पहाटेच जाग येते व तेव्हा मन खिन्न असते. भूक लागेनाशी होते. वजन कमी होऊ लागते, मलावरोध (शौच्याला घट्ट होणे, मल बाहेर पडण्यात अडचण जाणवणे) बळावतो. एखाद्या रुग्णाला खूप अस्वास्थ्य जाणवते व वास्तवाला अनुरूप नसणारे विचार आणि आजार होऊ लागताच. असा प्रकार वयस्कर रुग्णात अधिक प्रमाणात आढळतो. शंकेखोर प्रवृत्ती वाढते. ‘आपल्याबद्दल माणसे बोलतात, आपल्यामागे आपल्याला नावे ठेवतात’ असे विचार येतात. ‘आपल्याला कॅन्सरसारखा एखादा मोठा आजार झाला आहे’ हा विचार पिच्छा सोडत नाही. काही रुग्णात खूप झोप येऊ लागते, खादाडपणा वाढतो, थकवा असतो; परंतु एखादी बातमी ऐकून खूप उत्साहित होतात. काही रुग्णांना ऋतुमानानुसार आजार दिसू लागतात. या प्रकाराला SAD (Seasonal Affeclive Disorder) म्हणतात. ज्या देशात (अथवा प्रदेशात) हिवाळ्यात दिवस खूपच लहान असतो, तेथे हे आजार अधिक प्रमाणात आढळतात. या रुग्णांना कर्बोदके (साखर, भात, बटाटा) खाण्याची इच्छा बळावते. उत्साह वाटेनासा होतो. खा खा सुटते व झोप पुरेनाशी होते. काही गर्भवती स्त्रियांना बाळंतपणानंतर तीन आठवडे ते सहा महिन्यांनी खिन्नतेचा मोठा विकार जडतो. माफक प्रमाणात थकवा आणि खिन्नता अनेक स्त्रियांना (८० टक्के) बाळंतपणानंतर जाणवू शकतो. दहा ते पंधरा टक्के या नव-मातांना मोठ्या प्रमाणात खिन्नतेचा आजार होऊ शकतो. आपल्या बाळाच्या सुरक्षेबद्दल अतिरेकी चिंता निर्माण होते. या माताना झोप लागत नाही. वागण्यात अतिरेकी चिंता किंवा अविश्‍वास दाखविला जाऊ लागतो. वेळीच उपचार आवश्‍यक असतात.
काही खिन्न व्यक्ती सतत थकलेल्या, निरुत्साही, सर्व कार्यांतून अंग काढून घेणाऱ्या असतात. असा आजार एक-दोन वर्षे चालतो. काही स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या वेळी खिन्नतेने पछाडले जाते, तर काहींना मासिक पाळी येण्यापूर्वीचे दोन आठवडे खिन्नतेचे त्रास होऊ शकतात.

३) उन्माद आणि खिन्नता यांच्या परिक्रमा येणे हा एक स्वतंत्र आजारच मानला जातो. आजाराच्या नावाप्रमाणे रुग्णाला उन्मादाचे आणि खिन्नतेचे आलटून-पालटून झटके येतात. उन्मादाच्या स्थितीत रुग्ण अस्वस्थ आणि बेचैन असतो, त्याला स्वस्थ बसवत नाही. जे डोक्‍यात विचार येतात, त्यांत अतिरेकी उत्साहाने भाग घेतला जातो, चटकन राग येतो. कल्पनांच्या भराऱ्या सुरू होतात. कोणत्याही एका विचारावर किंवा कामांत दीर्घकाळ रस राहत नाही, थोडीच झोप पुरते. या वैचारिक आणि भावनात्मक भराऱ्यांचे ऐकणाऱ्याला सुरवातीला कौतुक वाटते, पण काही वेळातच सारखे बदलणारे विचार, इतरांचा दृष्टिकोन स्वीकारण्यातील त्रुटी, मधून-अधून येणारा थकवा आणि स्वभावातील स्वतःच्या विचारांबद्दलचा भंपक मोठेपणा या अवगुणांची ओळख पटल्यावर ‘नको यांची संगती’ असा विचार मित्रांत फैलावू लागतो. स्वभाव अतिरेकी खर्चिक बनतो. ‘नोकरीवर लाथ मारीन’ अशा विचाराने वारंवार त्यागपत्र देऊन मागून पश्‍चात्तापाची पाळी येते. लग्न घाईत ठरविणे, उरकणे, विवाहबाह्य लैंगिक संबंध जोपासणे, मोठेपणाच्या फुशारक्‍या मारणे अशा वागण्याने कुटुंबीय व स्नेही कंटाळून जातात. दीर्घकाळ मैत्री जोपासणे किंवा स्थिर, सुखी संसार करणे क्वचितच जमते. सामान्यपणे उन्मादाचा काळ हा खिन्नतेच्या काळापेक्षा कमी लांबीचा असतो.

याच प्रकारात ‘सायक्‍लो थायमिक डिसॉर्डर्स’ नावाने ओळखला जाणारा एक भाग असतो. या व्यक्ती सतत काही वेळा खिन्नता तर काही वेळा थोड्या प्रमाणात उन्माद अशा आलटून-पालटून असतात. या व्यक्तींचे वर्णन पुढील श्‍लोकात चांगले आहे - ‘‘क्षणे तुष्ट - क्षणे रुष्टा - तुष्टा रुष्टा - क्षणे क्षणे। अव्यवस्थितचित्तस्य प्रसादोऽपि भयंकर  (लोकोक्ती) (अर्थ - क्षणात समाधान पावणारा तर क्षणात रागावणारा. क्षणाक्षणात रागावणारा तर कधी हसणारा अशा अस्थिर चित्ताच्या माणसाची कृपी ही भयंकर हानिकारक असते. अर्थात्‌ क्षणा-क्षणाला हा अतिशयोक्तीचा भाग आहे. सायक्‍लो थायमिक डिसऑर्डरमध्ये प्रत्येक भावना साधारण दोन वर्षे राहते!

४) आजारांना प्रतिसाद अथवा रासायनिक रेणूंना (औषधांना) प्रतिसाद म्हणून घेणारी खिन्नता बहुतेक सर्व. सौम्य अथवा गंभीर विकारांना आपले अस्तित्व ‘खिन्नता’ अथवा ‘चिंता’ या स्वरूपात प्रतिसाद देतेच. हृदयविकार, पक्षाघात, दीर्घकाळ चालणारे संधिवातासारखे आजार आले म्हणजे खिन्नता येतेच. कॅन्सर झाला आहे, ही बातमी धक्कादायक, चिंताजनक आणि खिन्नता निर्माण करणारी असते. रजोनिवृत्ती संबंधात वर उल्लेख आलेला आहेच. मद्यपान हे खिन्नतेचे आणि आत्मघाताचे महत्त्वाचे कारण असते. ब्लडप्रेशर ताब्यात ठेवण्याकरता एकेकाळी रेसर्पित नावाचे औषध वापरले जाई, त्याने अनेकांना खिन्नता येई. कॉर्टिकोस्टेरॉईडस्‌ आणि गर्भ-प्रतिबंधक गोळ्यांच्या वापराने देखील खिन्नता येते. सध्या ब्लडप्रेशर ताब्यात आणण्याकरता वापरत असणाऱ्या मिथाईल डोपा आणि क्‍लोनिडीन या औषधांच्या वापरात खिन्नता येणे हा एक नको असणारा आहे.

हृदयविकारात वापरले जाणारे डिजिटॅलिस हे जगत्‌विख्यात औषध आणि पार्किन्सन्स डिसीनमध्ये वापरले जाणारे लिव्हीडोपा हे औषध घेणाऱ्यांना डिप्रेशन येते. नेहमीच्या वापरातील औषधांपैकी बीटा ब्लॉकर्स प्रकारची औषधे दीर्घकाळ घेतली तर खिन्नता येऊ शकते. कोणतेही औषध वापरण्यापूर्वी रुग्णाला खिन्नता येण्याचा पूर्व-इतिहास असला तर खात्री करून घेणेच इष्ट असते.

खिन्नता हा विकार अनेकांना असतो व त्याचे परिणाम अनेक प्रकारचे असतात, याची कल्पना समाजाला, रुग्णांना आणि डॉक्‍टरांना असणे आवश्‍यक आहे. विशेषतः थकवा, निरुत्साह, निद्रानाश, भूक न लागणे, वजन कमी होणे, मलावरोध असे वरपांगी शारीरिक दुखणे खिन्नतेमुळे असण्याची शक्‍यता कधीही नजरेआड होऊ देता कामा नये.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad