Showing posts with label आयुर्वेद. Show all posts
Showing posts with label आयुर्वेद. Show all posts

Tuesday, May 26, 2009

"देण्या''ची जाणीव देणारा मॉर्निंग वॉक

"मॉर्निंग वॉक'' ही कल्पना जरी खूप आकर्षक असली, तरी ती कृतीत आणणं हे महाकठीण काम. याचा अनुभव मी पुरेपूर घेतला आहे. मी "मॉर्निंग वॉक'ला जाईन असं मला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं. मला साधं पित्त झाल्याचं निमित्त झालं. ती बातमी सोसायटीत पसरली.
माझा अशक्तपणा हा विषय माझ्यापुरता मर्यादित न राहता त्याला सार्वजनिक रूप प्राप्त झालं आणि एके दिवशी भल्या सकाळी कॉलबेल वाजली. दार उघडायच्या आत अगदी जोरात अधिकारवाणीने मारलेली हाक आली, "काय विनायकराव! अरे कसलं पित्ताचं दुखणं घेऊन बसला आहात? आळस झाडून "मॉर्निंग वॉक''ला चला माझ्याबरोबर! प्रकृती कशी ठणठणीत होते पाहा!''
तात्या सान्यांना समोर पाहताच माझ्या पोटात गोळा आला. ते बोलल्याप्रमाणेच वागत असत. त्यांच्या हुकमी आवाजातील हुकमापुढे माझं काहीच चालणार नाही याची खात्रीच होती. ते पुढे म्हणाले, "अरे! गेली १७ वर्षे "मॉर्निंग वॉक''ला जातो आहे मी! एका पैचही औषध लागत नाही मला. प्रकृती बघ कशी ठणठणीत आहे! वहिनी, मी यांना आजपासून रोज नेणार आहे, समजलं का!' खरोखरच मला तयार होऊन त्यांच्याबरोबर बाहेर पडणं नाईलाजाने भाग पडलं.
एक मात्र खरं, की नंतर मला खूप इंटरेस्ट निर्माण झाला "मॉर्निंग वॉक'मध्ये! सुमारे १५-२० जणांचा तो ग्रुप होता. कुणी काठी घेऊन चालणारे, कुणी मफलर गुंडाळून चालणारे, कुणी "नी कॅप' लावणारे, कुणी कर्णयंत्र लावणारे, कुणाला स्पॉंडिलिसीसचा पट्टा तर कुणाला स्वेटर! अनेक तऱ्हा होत्या. लहानमोठी दुखणी होती काहींना, परंतु एक गोष्ट मात्र निश्‍चित, सर्वांची मनं उल्हासित, अगदी ताजी टवटवीत होती. हसत खिदळत तो ग्रुप चालला होता अगदी मजेत.
बरेचसे माझ्या ओळखीचे तर काही अनोळखी, पण नंतर आमच्या सर्वांचीच मनं आपुलकीच्या धाग्यांनी घट्ट विणली गेली. एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही अजाणतेपणाने मिसळून जात असू आणि आपल्या अडीअडचणी, दुःखं, कौटुंबिक प्रश्‍न, तेवढ्या वेळेपुरते तरी पूर्णपणे विसरून जात असू. आयुष्यातील जुने अनुभव, नोकरीतील चांगल्या-वाईट आठवणी, मान-अपमानाचे प्रसंग, नातेसंबंधांतील तणाव, राजकारण, भ्रष्टाचार, शिक्षण क्षेत्रातील, संरक्षण व्यवस्थेतील गोंधळ इत्यादींपैकी कोणत्याही गोष्टींवरील चर्चा वर्ज्य नव्हती.
आम्ही प्रत्येक जण निरनिराळ्या क्षेत्रातले असल्यामुळे गप्पांना आणि अनुभवांना तोटा नव्हता. आम्ही सर्व जण मिळून एकमेकांचे वाढदिवस, नातवंडांचे वाढदिवस साजरे करतो. एका दिवसाची एखादी सहल काढून निसर्गाच्या सान्निध्याचा आस्वाद मनमुराद लुटतो. बागेत जाऊन लहान मुलांना खेळवतो. दोन जण मेडिकलच्या दुकानातून आवश्‍यक ती औषधं आणून देतात, आजारी माणसाकडे हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाला मदत करण्यासाठी आम्ही तत्पर असतो. लहान मुलांना शाळेत पोहोचवणं, बॅंकेची कामं करणं, भाजी आणून देणं अशा प्रकारची कामं आमचं "मॉर्निंग वॉक' मंडळ करतं.
आपण समाजाचा एक महत्त्वाचा घटक असून, समाजाचं आपण काही देणं लागतो, ते देऊन टाकणं आवश्‍यक आहे. अशा प्रकारची उदात्त भावना आमच्या मनात "मॉर्निंग वॉक''मुळेच वाढीला लागली आहे हे कबूल करायलाच पाहिजे.
- अरुण भालेराव, डोंबिवली

Saturday, April 4, 2009

मजबूत हाडांसाठी सूर्यप्रकाश

व्हिटॅमिन्स आपल्या शरीरातल्या अनेक रासायनिक प्रक्रियांसाठी आवश्‍यक आहेत. त्यांचे दोन प्रकार. त्यांपैकी बी आणि सी ही पाण्यात विरघळणारी, तर ए.डी.इ.के. ही तेलात किंवा चरबीत एकरूप होणारी. ड जीवनसत्त्वाचे विशेष म्हणजे ते त्वचेमध्ये सूर्यप्रकाशातल्या अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांमुळे तयार होते. आहारातून मिळते ते फार थोडे म्हणजे सुमारे 10% इतकेच. कॉडलिव्हर ऑइल, कोळंबी, अंड्याचा बलक, प्राण्याचे यकृत इत्यादींमध्ये भरपूर "ड' जीवनसत्त्व असते. दुधात मात्र फारसे नसते. तसेच वनस्पतींमधील "ड' जीवनसत्त्वही रासायनिक दृष्ट्या वेगळे असते. त्वचेखाली बनलेले तसेच आतड्यातून शोषलेले "ड' जीवनसत्त्व नंतर यकृत आणि मूत्रपिंडात जाऊन कार्यकारी बनते. म्हणजेच या अवयवांची पुरेशी कार्यक्षमता त्यासाठी आवश्‍यक आहे. रक्तामध्ये "ड' जीवनसत्त्वाचे प्रमाण 30 नॅनोग्रॅम/ मि.लि. यापेक्षा कमी असू नये.

कार्य
"ड' जीवनसत्त्वामुळे शरीरात कॅल्शिअमचे संतुलन राखले जाते. कॅल्शिअम हे हाडांच्या ताकदीसाठी अत्यावश्‍यक आहेच. याखेरीज मज्जतंतूंमधील संज्ञावहन, स्नायूंचे आकुंचन, हृदयाचे स्पंदन, रक्त साकळणे, अन्नपचन, तसेच संप्रेरकांची कार्यक्षमता यासाठीही कॅल्शिअम अत्यावश्‍यक आहे. "ड' जीवनसत्त्वही शरीरात संप्रेरकासारखे (हॉर्मोन) कार्य करते. शरीरातल्या सर्वच पेशींची वाढ होण्यासाठी आणि त्या कार्यक्षम होण्यासाठी "ड' जीवनसत्त्व आवश्‍यक आहे. त्यामुळेच स्नायूंचीही ताकद राखली जाते. अशक्त स्नायूंमुळे धडपडून हाडे मोडण्याची शक्‍यता जास्त. या कमजोरीमुळे खाली सहजपणे बसता येत नाही. बसले तर उठता येत नाही. चालताना बदकासारखी छोटी फाकलेली पावले पडतात आणि तोल सांभाळता येत नाही. वयस्कर स्त्रियांमधली पाठदुखी अनेकदा अपुऱ्या "ड' जीवनसत्त्वामुळे होते. "ड' जीवनसत्त्व स्वाभाविक प्रतकारशक्तीला बलवान बनवते. त्यामुळे टीबी (क्षय) सारख्या जंतूंचा प्रतरोध होऊ शकतो. संग्रहणीसारख्या प्रतकारशक्तीच्या आजारातही त्याचे महत्त्व आहे. गुडघ्याच्या संधिवातात इ जीवनसत्त्वाने कूर्चेची कमी झीज होते. पुरेशा "ड' जीवनसत्त्वामुळे आमवात (ऱ्हुमॅटॉइड संधिवात) होण्याची शक्‍यता कमी असते. आणि झाला तरी तो कमी तीव्रतेचा असतो. ब्लडप्रेशर, मधुमेह, भ्रमिष्टपणा (स्कीझोफ्रेनिया) आणि उदासीनता (डिप्रेशन) तसेच छाती, आतडे, प्रोस्टेट इत्यादींच्या कॅन्सरमध्येही "ड' जीवन सत्त्वाची कमतरता, हे एक कारण मानले जाऊ लागले आहे.

सूर्यप्रकाश
चेहरा आणि हात अर्धा तास सूर्य प्रकाशात राहिले तरच त्वचेखाली "ड' जीवनसत्त्व बनण्याची प्रक्रया सुरू होते. त्यामुळे पुरेसा वेळ सूर्यप्रकाशात राहणे, हाच "ड' जीवनसत्त्व मिळवण्याचा सर्वांत प्राकृतिक मार्ग आहे. सूर्यप्रकाशाची प्रत ढगाळ वातावरण आणि हवेच्या प्रदूषणामुळे कमी होते. सकाळी लवकरचा तसेच संध्याकाळचा सूर्यप्रकाशही यासाठी उपयोगाचा नाही. त्वचा काळसर असणे, अंगभर कपडे (बुरखा, घुंघट, रुमाल, ओढणी) घालणे, घर किंवा ऑफिसच्या बाहेर न पडणे यामुळे भर दुपारीसुद्धा आपल्यापैकी बहुतेकांना सूर्यप्रकाशाचा स्पर्शही होत नाही.


डॉ. श्रीकांत वाघ
ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट, पुणे.

असत्याचा व्हायरस

आजारपणाचे मूळ शोधताना वागणुकीतील अनियमितता. जंतुसंसर्ग, अति घाई, वंशपरंपरागत बाधा, औषधांचे दुष्परिणाम अशी अनेक कारणे दिली तरी मनुष्याला सशक्‍त करण्यासाठी व रोग झाला तर रोगाचे मूळ कशात आहे हे समजून त्यावर इलाज करत येत नाहीत तोपर्यंत हा विषय कळला असे म्हणता येणार नाही. आयुर्वेदाने मात्र स्वास्थ्याची व्याख्या करून रोग कसा होते याचे व्यवस्थित मार्गदर्शन केलेले आहे. शारीरिक, मानसिक व आत्मिक प्रसन्नता आणि सर्व प्रकारचे काम करण्यासाठी शक्‍ती आणि उत्साह असणे अशी आरोग्याची व्याख्या करून, सर्व आजारांचे मूळ प्रज्ञापराधात आहे असेही आयुर्वेदाने सांगितले.

प्रज्ञापराधाची अगदी खालची पातळी म्हणजे खोटे बोलणे. खोटे बोलण्यातही दोन प्रकार असतात. एक म्हणजे समजून उमजून जाणीवपूर्वक खोटे बोलणे. दुसरे म्हणजे अजाणतेपणी खोटे बोलणे. झालेल्या प्रसंगाची वा घडलेल्या प्रसंगाची स्मृती न राहिल्यमुळे अजाणतेपणी खोटे बोलले जाते. पण, आपण खोटे बोलत आहोत हे त्या व्यक्‍तीला मान्य नसते.
आरोग्याची काळजी घेताना प्रज्ञापराधाचे, मनाचे व एकूण इंद्रियव्यापारांचे स्थान मेंदूत आहे, असे गृहीत आहे. मेंदूच्या आरोग्याची नीट काळजी घेतली नाही तर तरुण वयातच विस्मृतीसारखे रोग जडतात. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची सवय केली नाही तर मुळात गोष्ट केली गेली तरीही मेंदूत त्या गोष्टीची नोंद व्यवस्थित होत नाही व मग अशा वेळी त्या घटनेची स्मृती जागृत होण्याचा प्रश्‍नच राहात नाही.
मला सगळे समजते, मी किती मोठा / मोठी आहे, मी केले आहे ते बरोबरच आहे अशा प्रवृत्तीमुळेसुद्धा मेंदूच्या कार्यक्षमतेत बाधा उत्पन्न होते. मी असे बोललोच नाही, मी असे सांगितलेच नाही, मी असे केलेच नाही, अशा समजुतीतून मनुष्य दुराग्रही होऊन त्याला आपण सत्य बोलतो वा मी करतो ते बरोबरच आहे असे वाटत असले तरी ते असत्यच असते. उलट त्यामुळे मेंदूला अधिक इजा पोचते. तेव्हा रोजच्या व्यवहारातील हा खोटे बोलण्याचा प्रकार सर्वाधिक अनुभवाला येतो व त्यामुळे वितंडवाद वाढून मने कलुषित होतात व अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होतात.
एखाद्याने जरासा विचार करून माझे काहीतरी चुकीचे असेल, कदाचित मला आता आठवत नसेल व वस्तुस्थिती कदाचित वेगळी असू शकेल असे मान्य केले तर शरीरावर व मेंदूवर होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतील. मेंदू संगणाकासारखा काम करतो. त्यामुळे उलटसुलट वा चुकीच्या आज्ञा दिल्या तर मेंदूच्या कार्यव्यवस्थेत बाधा येते हे निश्‍चित.
एखाद्याला रस्ता सांगताना, "प्रथम डावीकडे वळा, तेथे एक पिवळे घर दिसेल तेथून उजवीकडे वळा, नंतर थोडे मागे येऊन उजव्या हाताने पुढे जाऊन डावीकडे वाळा, तेथून बरेचसे सरळ गेले की डावी-उजवी न करता समोरचा रस्ता सुरू झाल्या झाल्या डावीकडे वळा' अशा सूचना लक्षात ठेवणे मेंदूला खूप अवघड जाते व नंतर चुका घडण्याचा संभव असतो. कारण ही माहिती कार्यान्वित करण्यासाठी खूप शक्‍ती खर्च होते.
आपल्याकडून चूक घडली आहे हे लक्षात न घेता पुढच्या आज्ञा दिल्याने वा चिडचिड करण्याने मेंदूला अधिक इजा होते. हाताने एखादे काम करायचे असताना काम कुठले, त्यासाठी कुठल्या अवयवांची कशी हालचाल करावी लागणार, त्यासाठी किती शक्‍ती लागणार, काय काय तयारी करावी लागणार हे ठरविणे तसेच पूर्वीचे काम संपविल्यानंतर काम करण्याचीही आज्ञा मेंदूने हाताला देणे गरजेचे असते. यात गोंधळ झाला तर कार्यसिद्धी निश्‍चितच होऊ शकत नाही व मेंदूवर ताण येऊन प्रज्ञापराध घडण्याची शक्‍यता असते.
डोळ्याने दिसणे, कानाने ऐकणे, अन्न पचविणे, हृदयाचे काम नीट चालू ठेवून रक्‍तदाब योग्य ठेवणे, वेळेवर मलमूत्र विसर्जन करणे अशी अनेक आतली व बाहेरची कामे मेंदूला करावी लागतात. मेंदूवर ताण आला असता सर्व इंद्रियांच्या कामात बाधा निर्माण होते, त्रास व्हायला लागतो आणि काही दिवसांनी त्रासाचे रूपांतर रोगात होते.
जाणून बुजून खोटे बोलणारे अनेक असतात. खोटे बोलत असताना किमान दहा वेळ मेंदूतून आज्ञा येते की आपण हे काही जिभेला बोलायला सांगतो आहे ते चूक आहे. कारण मेंदूत उपलब्ध माहिती काही वेगळेच सांगत असते. तरीही तिकडे दुर्लक्ष केले जाते. ही विसंगत माहिती कुठे साठवायची हे मेंदूला नीटपणे न कळल्यामुळे मेंदूची कार्यव्यवस्था बिघडून जाते. स्वतःच्या फायद्यासाठी खोटे बोलणाऱ्या मंडळीच्या मेंदूचे आणि स्वतःचा फायदा असो की नसो खोटे बोलून स्वतःचे व दुसऱ्याचे नुकसान करणाऱ्या मंडळींच्या मेंदूचे नुकसान सारखेच होते.
करतो आहे ते बरोबर नाही, हे निसर्गाला धरून नाही, न्यायाला धरून नाही, एकूण कल्याणाच्या विरुद्ध आहे हे समजत असतानासुद्धा खोडे बोलणाऱ्यांना प्रज्ञापराधाची शिक्षा लगेचच मिळते. बहुतेक सगळे रोग मानसिक संबंधातून झालेल्या ताणामुळे तयार होतात हे सत्य सर्वांनीच मान्य केलेले आहे. पण शेवटी मन म्हणजे विचारांशी साठवणूक व देवाणघेवाण करणारी एक बॅंकच आहे. त्यामुळे असत्याचा परिणाम मनरूपी बॅकेची दिवाळखोरी होण्यात प्रत्ययाला येतो.
सत्यवचनाचे एवढे माहात्म्य का? प्रभू श्रीरामचंद्रांना एकवचनी, सत्यवचनी, दिलेले वचन पाळणाऱ्या कुलात जन्म घेतलेला असे का म्हटले जाते याचे महत्त्व आपल्याला यावरून पटू शकते. तोंडातून निघालेला शब्द व धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही, असे म्हटले जाते. तेव्हा खोटे बोलून नंतर त्यावर सारवासारवी करण्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रभू श्रीराम सत्यवचनी व दिलेले वचन पूर्ण पाळणारे होते म्हणूनच त्यांच्या आयुष्यात अनेक घटना घडूनही श्रीराम पूजनीय व अवतारी पुरुषच राहिले.
- डॉ. श्री. बालाजी तांबे

Tuesday, September 9, 2008

श्‍वास आणि बुद्धीचा परस्परसंबंध

श्‍वास आणि बुद्धीचा परस्परसंबंध

(वैद्य विनिता बेंडाळे) फुप्फुसाची कार्यक्षमता जितकी चांगली तितकी बुद्धीची तल्लखता अधिक, असे आधुनिक शास्त्राच्या लक्षात आले आहे. पण, असे का होते याचे स्पष्टीकरण आयुर्वेदाने फार पूर्वीच देऊन ठेवलेले आहे. .........काही दिवसांपूर्वीच्या "फॅमिली डॉक्‍टर'च्या अंकात "आरोग्य वार्ता' या सदरात एक माहितीपर लेख वाचनात आला. श्‍वसन प्रक्रिया अथवा फुफ्फुसाची कार्यशक्ती जितकी चांगली तितकी बुद्धीची तल्लखता अधिक असते, असे संशोधन नुकतेच अमेरिकेत प्रसिद्ध झाल्याचे या लेखात म्हटले होते. त्याचा कार्यकारणभाव मात्र समजू शकत नसल्याचे या संशोधनामध्ये नमूद केले गेले आहे. हे वाक्‍य वाचले आणि मनात आले, आपल्या आयुर्वेदशास्त्रातील काही मूलभूत सूत्रांनुसार हा कार्यकारणभाव तर सहज स्पष्ट होतो. प्राण, उदान, व्यान, समान व अपान हे वातदोषाचे पाच प्रकार आहेत. यांपैकी श्‍वसन प्रक्रियेमध्ये प्राण व उदान हे वायू सक्रिय आहेत. श्‍वसन म्हणजे नि-श्‍वास (श्‍वास आत घेणे) व उच्छ्वास (श्‍वास बाहेर सोडणे) यांची लयबद्ध सतत प्रक्रिया. नि- श्‍वास हे प्राणवायूचे, तर उच्छ्वास हे उदान वायूचे कार्य होय. म्हणजेच या दोन्ही क्रिया घडणे ही प्राण व उदानाची जबाबदारी असते. आयुर्वेद शास्त्रानुसार वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांची व त्यांच्या असलेल्या प्रत्येकी पाच प्रकारांची (प्रत्येकी पाच प्रकारचे वात, पित्त व कफ) शरीरातील स्थाने निश्‍चित केलेली आहेत व त्यानुसार त्यांना आपापली कार्येही विभागून दिली गेली आहेत. एखाद्या सैन्यातील सैनिकांप्रमाणे या सर्वांची जागा व स्थाने निश्‍चित केलेली दिसतात. त्यानुसार प्राणवायूचे प्रमुख स्थान हे "शिर' (मस्तक) आहे, तर नासिका (नाक), मुख, कंठ, उर (छाती), हृदय व कोष्ठ ही त्याची संचारी स्थाने सांगितली आहेत. म्हणजे या सर्व ठिकाणी प्राणवायूचा संचार आहे व शिरामध्ये अवस्थिती आहे. प्रामुख्याने त्याचा मुक्काम शिरामध्ये असतो; तसेच संचारी स्थानांमध्ये. प्राणवायूची विविध कार्ये १) प्राणावलंबन - शरीरातील प्राणाचे (जीवन) धारण करणे. २) नि-श्‍वास - श्‍वास आत घेणे (निश्‍वासो ताम श्‍वासस्य अंत- प्रवेशनम्‌) ३) अन्नप्रवेश - अन्न प्रवेशाबरोबरच अन्नाचे धारण, निस्सरण, म्हणजे पचन प्रक्रियेतील सहभागही चक्रदत्त या चरक संहितेच्या टीकाकाराने स्पष्ट केला आहे. ४) हृदयधारण - हृदयाचे आरोग्य राखण्यामध्ये सहभाग घेणे. ५) चित्त व बुद्धीचे धारण - मनाचे आरोग्य राखणे व बुद्धी तल्लख ठेवणे. ६) इंद्रियधारण - पंचेंद्रियांची कामे व्यवस्थित पार पाडण्यास मदत करणे. ७) ष्ठिवन, क्षवथु, उद्‌गार - थुंकणे, शिंक येणे, ढेकर येणे. उदान वायूची स्थाने विचारात घेता "उर' (छाती) हे त्याचे अवस्थिती स्थान असून नाक, नाभी व कंठ ही त्याची संचारी स्थाने आहेत. उदान वायूची कार्ये १) वाक्‌प्रवृत्ती - बोलणे २) प्रयत्न - प्रयत्न करण्याची वृत्ती ३) ऊर्जा - कार्य करण्यासाठी आवश्‍यक शक्ती ४) बल - शरीरातील सर्व धातूंचे बल ५) वर्ण - कांती ६) स्मृती - स्मरणशक्ती वरील प्रस्तावनेवरून हे लक्षात येते, की उर हे दोघांचेही स्थान असल्याकारणाने व श्‍वसनप्रक्रिया ही या दोघांवरही अवलंबून असल्याकारणाने फुफ्फुसाशी या दोन्ही वायूंचा संबंध निश्‍चित होतो. तसेच कार्याचा विचार करायचा झाल्यास नि-श्‍वास व बुद्धीचे धारण करणे ही प्राणवायूची कार्ये आहेत व उच्छ्वास व स्मृती ही उदान वायूची कार्ये आहेत. फुफ्फुसांची कार्यशक्ती जितकी चांगली असेल तितकी प्राण व उदानाची कार्यशक्ती उत्तम ठरते. त्यामुळे त्यांची सर्वच कामे उत्तम प्रकारे पार पडतात. या इतर कार्यांमध्ये बुद्धीचे धारण करणे व स्मृती या प्रक्रियांचा अंतर्भाव आहे, हे आपण पाहिलेच आहे. अशा प्रकारे अमेरिकेतील संशोधनाचा कार्यकारणभाव आयुर्वेदाच्या या मूलभूत सिद्धान्तामध्ये स्पष्ट होतो. प्राणायामामुळे बुद्धी तल्लख होणे, एकाग्रता वाढणे, पचन सुधारणे, मन शांत होणे, हृदयाचे विकार नियंत्रित ठेवण्यास मदत होणे इ. अनेकविध फायदे अनेकांच्या अनुभूतीस येतात. प्राण व उदानाची कार्ये लक्षात घेतल्यास या सर्वांचा कार्यकारणभावही सहज स्पष्ट होऊ शकेल. अनंत व शाश्‍वत अशा आयुर्वैदशास्त्राच्या गाभ्यातील अशी अनेक मूलतत्त्वे संशोधन स्वरूपाने प्रसिद्ध झाल्यास ती अधिक स्पष्ट स्वरूपात जगासमोर येण्यास निश्‍चित मदत होईल. - वैद्य विनिता बेंडाळे आयुर्वेदतज्ज्ञ, पुणे.

ad