Showing posts with label वैद्यकाच्या दाही दिशा. Show all posts
Showing posts with label वैद्यकाच्या दाही दिशा. Show all posts

Sunday, August 29, 2010

वैद्यकाच्या दाही दिशा : ताई ची आणि ची गाँग

वैद्यकाच्या दाही दिशा : ताई ची आणि ची गाँगBookmark and SharePrintE-mail
डॉ. उल्हास कोल्हटकर 
चीनच्या सुंग घराणे राज्यातील (इ. स. ९६० ते १२७९) चँग सॅन फेंग नावाच्या टाओपंथीय, मार्शल आर्ट प्रवीण मुनीची ही गोष्ट! (कदाचित कल्पितही असू शकेल!) त्याने एकदा प्रचंड सारस पक्ष्याची व एका सर्पाची लढाई पाहिली. ज्या लवचिकतेने, सफाईने व गतीने त्या छोटय़ाशा सर्पाने त्याच्याहून खूप मोठय़ा व ताकदवान सारस पक्षाशी लढत दिली, स्वसंरक्षण केले व योग्यवेळी चपळतेने, आक्रमण करून शेवटी त्याचा पराभव केला, त्याने चँग सॅन फेंग आश्चर्यचकित व प्रभावित झाला व त्याच वेळी त्याने या लवचिकतेचा, गतीचा व नैसर्गिक डौलदार हालचालींचा आपल्या स्वत:च्या खास मार्शल आर्ट पद्धतीत अंतर्भाव करण्याचे ठरविले व त्यातूनच आज सर्वपरिचत अशा चीनी ‘ताई ची’ या पद्धतीचा जन्म झाला असे मानले जाते. या सर्व हालचालींना पारंपरिक ‘टाओ’ पद्धतीच्या श्वसनाची जोड दिली गेली, ज्यामुळे जीवनउर्जा (ची) शरीरात प्रवाहित होण्यास मदत होते, असे चीनी वैद्यक मानते.
* इतिहास : परंपरा असे मानते की, भारतातून चीनमध्ये आलेल्या गौतमबुद्धाच्या परात्पर शिष्याने, बोधीधर्माने, इ.स.च्या पाचव्या शतकात, शाओलिन मंदिरातील साधूंना झेन मुष्टीयुद्धाचे शिक्षण दिले ज्यातून पुढे ‘कूँग फू’ विकसित झाले व त्यातूनच मार्शल आर्टस निर्माण झाले. उपरोल्लेखित चँग सॅन फेंगने सुरुवातीस विविध ‘तेरा’ हालचाली निश्चित केल्या. ज्यातून पुढे विविध ‘ताई ची’ पद्धतींचा विकास झाला. आज ताई ची (Tai chi) किंवा ताई ची चुआन (Taichi Quan) ची विविध तंत्रे उपलब्ध असली तरी आधुनिक जगाला माहीत असलेली व लोकप्रिय तंत्रे म्हणजे- याँग (यातही दीर्घ व छोटय़ा अशा दोन पद्धती आहेत), वू (wu), सन (SUN), शेन (chen), वूडँग (wudang), ली (Lee) इ.
* शास्त्रीय बैठक : विविध शास्त्रीय संशोधनातून, नियमित ताई ची व्यायामांमुळे स्नायूंचे, सांध्यांचे व विशेषकरून चेतासंस्थेचे शिथिलीकरण साधले जाते असे दाखवून देण्यात आले आहे. चेतासंस्थेवरील या परिणामांमुळे, आंतरस्र्रावी ग्रंथी व शरीराच्या प्रतिरक्षाप्रणालीवरही सकारात्मक परिणाम साधला जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढते व त्यामुळे चयापचयात (metabolism) तसेच प्रतिकारक्षमतेत लक्षणीय सुधारणा होते. विविध प्रकारच्या हालचालींमुळे स्नायू व सांधे अधिक लवचिक होतात, रक्ताभिसरण सुधारते तर टाओ श्वसनामुळे श्वसनाची गुणवत्ताही सुधारण्यास मदत होते. ताई ची मध्ये मूलत: हालचालींना वा व्यायामाला, श्वसनाची व ध्यानाची जोड दिल्याने शारीरिक फायद्यांबरोबर, मानसिक व आध्यात्मिक फायदे साधण्याला मिळू शकतात व या सर्वाचा एकत्रित परिणाम त्याच्या र्सवकष आरोग्यावर (wholistic health) सकारात्मक रितीने होताना दिसतो.
* ताई ची सराव नेमका कसा करतात? 
वर उल्लेखिल्याप्रमाणे ‘ताई ची’ वेगवेगळ्या पद्धतीने साधता येते. उदा. यांग पद्धतीनमध्ये हालचाली संथ, लयबद्ध, वाहत्या पण ताकदवान असतात तर शेन पद्धतीत त्यांची गती संथ ते जलद असी बदलती असते. एकच पद्धत योग्य अशी धारणा ‘ताई ची’मध्ये नाही. अर्थात कोणत्याही ताई ची पद्धतीत हालचालींनी तयार होत असलेल्या आकृतीबंधाला, रचनेला किंवा आकाराला (Form) खूप महत्त्व असते. विशिष्ट, डौलदार, संथ हालचालींचा एखादा गट म्हणजे फॉर्म! हा फॉर्म दीर्घ किंवा छोटा असू शकतो. परंपरेनुसार दीर्घ आकृतीबंध हा १०८ हालचालींचा असतो व त्याला २० मिनिटांपासन ते १ तासापर्यंत वेळ लागू शकतो तर छोटा आकृतीबंध हा ३७ ते ४८ हालचालांची असून त्याला सहसा ५ ते १० मिनिटांचा कालावधी पुरतो. या सर्व हालचाली मूलत: स्वसंरक्षणात्मक असून त्यांची नावेही हालचाल निर्देशक अशी असतात. उदा. Kick with Right heel किंवा Punch with concealed fist B. या सर्व हालचाली एका संथ, वाहत्या श्रेणीत, क्रमाने केल्या जातात व त्यामुळे शिथिलीकरणाबरोबरच शरीर, मन व आत्म्याचे संतुलन साधले जाते अशी चीनी वैद्यकाची धारणा आहे. मेरिडियन्समधून वाहणारी जीवनउर्जा या हालचालींमुळे नियमित होते, योग्य दिशेने प्रवाहित होते. तसेच रक्ताभिसरण व कसिकाभिसरण योग्य तऱ्हेने होते असा चीनी वैद्यक दावा करते. निसर्गाशी जवळीक साधण्याच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे ‘ताईची’ हालचाली उघडय़ावर म्हणजे बागांमध्ये, वृक्षांच्या सान्निध्यात केल्या जातात.
* ची गाँग (Qi Gong) : ताई ची वर्णन चलन ध्यान किंवा walking meditation  असेही केले जाते. आधुनिक जगामध्ये व विशेषत: पाश्चात्य देशांमध्ये आज ताई ची खूपच लोकप्रिय आहे. त्यामानाने त्याचे ‘संथ’ भावंड, ची गाँग (Qi Gong) लोकांना तसे कमी माहितीचे आहे, पण दोघांचीही शास्त्रीय व तात्त्विक बैठक सारखीच आहे. ची गाँग म्हणजे जीवन उर्जेचे संवर्धन (Energy Cultivatio) तर ताई ची म्हणजे त्याचेच गतिमान रुप हे ध्यानात घेतले तर ची गाँग समजणे सोपे जाईल. भारतीय योगाप्रमाणेच ची गाँग ही आरोग्यरक्षणाची, रोगनिवारणाची, बरे होण्याची आणि आध्यात्मिक प्रगतीची चीनी पद्धत आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. ची (Qi) म्हणजे जीवन उर्जा व Gong म्हणजे सराव, क्षमता किंवा फायदा. ची गाँग म्हणजे थोडक्यात ‘जीवनउर्जा संस्करण व संवर्धन’ पद्धत.या ची गाँगच्याही अनेक पद्धती अस्तित्वात असून त्यांचे स्थिर (यात स्थिर बसणे, उभे राहाणे किंवा पहुडणे व केवळ ‘मनाचा’ उपयोग करणे हे अपेक्षित असते), श्वसनावर आधारित किंवा गतिमान (हात, पाय वा हातापायांच्या हालचाली, विविध प्राण्यांप्रमाणे हालचाली यांचा यात समावेश होतो) असे तीन प्रकारे वर्गीकरण करता येते.
* इतिहास : ताई ची प्रमाणेच ची गाँगचा इतिहासही जवळजवळ ३००० वर्षांचा असून विविध उत्खननांत याचे पुरावे मिळाले आहेत. यापैकी दोन महत्त्वाचे म्हणजे इ. स. पूर्व ६०० या काळातील झौ (ZHOU) घराण्याच्या राजेशाही दरम्यानचा ची गाँगचे सिद्धांत व सराव यावर भाष्य करणारा मजकूर कोरलेला गळ्यातील एक किमती हार व इ. स. १० च्या आसपासचे हॅन राजवटी (Han Dunasty) च्या कालखंडातले एक रेशीम पेंटिंग ज्यावर ची गाँगच्या विविध हालचाली चित्रीत करण्यात आल्या आहेत. विविध टाओ आणि बुद्ध धर्मीय साधूंच्या पंथांच्या माध्यमातून ही ‘ची गाँग’ परंपरा विकसित होत गेली व अन्यथा घटकेला चीनमध्ये जवळजवळ एक लक्ष विविध पद्धती अस्तित्वात आहेत अशी मान्यता आहे. असे असले तरी या विविध पद्धतींमागची चीनी वैद्यकीय बैठक एकच आहे व ती म्हणजे- शरीरात खेळणाऱ्या जीवन उर्जेचे संवर्धन; तिच्या प्रवाहात अडथळा असल्यास तो दूर करणे; शरीरांतर्गत व बाह्य उर्जेचे रक्षण, संस्करण व संवर्धन! शरीरांतर्गत उर्जेचे संतुलन साधून सर्व अवयवांचे व शरीरांतर्गत प्रणालींचे आरोग्य सुधारण्याच्या तंत्राला ठी्र Nei Dan(Inner elixir of life) असे म्हणतात तर बाह्य धोक्यांपासून शरीराचे रक्षण करण्याच्या ची गाँग wei Dan (external elixir of life) असे म्हणतात.
पाश्चात्य देशात या ची गाँगचा अधिक प्रसार व्हावा म्हणून आता या पद्धतींमागची ‘सांस्कृतिक पाश्र्वभूमी’ थोडी बाजूला ठेवून त्याला पाश्चात्यांच्या सांस्कृतिक पाश्र्वभूमीची डूब देण्याचेही प्रयत्न आज जगभर चालू आहेत.
* ताई ची वन ची गाँग नेमके कोठे उपयुक्त?  
या दोन्ही पद्धतीत शारीरिक हालचाली (व व्यायाम), श्वसन आणि ध्यान यांचा सुंदर मिलाफ साधला आहे हे एव्हाना चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आले असेलच. साहजिकच या पद्धतींचा उपयोग ताणतणाव दूर करण्याकरिता व तणावजन्य बहुतेक रोगांवर होऊ शकतो हे समजून येईल. ताणतणाव, नाहकचिंता, उच्चरक्तदाब, सांधेदुखी, अपघातातून पुनर्वसन होताना अशा सर्व स्थितीत या पद्धती रुग्णाला खूपच दिलासा देताना आढळून आल्या आहेत. याव्यतिरिक्त अस्थिविरलता टाळण्याकरिता, सांधे व स्नायू लवचिक ठेवण्याकरिता प्रतिबंधात्मक म्हणूनही या पद्धतीचा वापर करता येतो असे दिसून आले आहे. भारतीय आयुर्वेदाप्रमाणेच दीर्घपरंपरा असलेले चीनी वैद्यक आता सर्व जगभर लोकप्रिय होऊ लागले आहे ही पर्यायी वैद्यक क्षेत्रात एक आशादायक बाब आहे
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Wednesday, July 14, 2010

वैद्यकाच्या दाही दिशा : अस्तित्वाचे हार्डवेअर सांभाळा.

डॉ. उल्हास कोल्हटकर
विविध व्याधी विकारांवर उपलब्ध असलेल्या उपचारपद्धतींकडे एक धावती नजर टाकली तरी त्यांचे अधिष्ठान फार पूर्वीच्या काळी फक्त ‘देह’ हेच होते उदा. मसाज, सांधे व मऊ उती यांच्या मसाजावर अधिष्ठित चिनी उपचारपद्धत टय़ुइना (Tuina) इ. व आता त्या अधिकाधिक ‘मना’धिष्ठित होत चालल्या आहेत. उदा. डॉ. बारव पुष्पोपचार पद्धती इ. हे सहज लक्षात येते. वास्तविक अस्तित्वाचे दोन्ही आयाम ‘मन’ व ‘देह’ हे महत्त्वाचे आहेत, परस्परावलंबी आहेत व कोणत्याही व्याधी विकारात दोघांवर उपचार महत्त्वाचे असतात हे विसरून चालणार नाही. दीर्घकालिक हृदयविकाराने वा किडनीच्या विकाराने ग्रस्त व्यक्ती हताश होतात, निराश होतात व त्यांना मानसोपचारांची गरज लागते तर नैराश्यग्रस्त मनोरुग्णांना मसाज, व्यायाम इ.ची जोड दिल्यास त्यांची स्थिती सुधारते. आज ‘मनो’धिष्ठित उपचारपद्धती अधिक लोकप्रिय होत चालल्या असल्या तरी ‘देहा’वर उपचार विसरून चालणार नाही. सॉफ्टवेअर तर उत्तम हवेच; पण त्याच्या आविष्कृतीकरिता ‘हार्डवेअर’ ही तितकेच महत्त्वाचे व त्याचे आरोग्य सांभाळणे व बिघडल्यास ते दुरुस्त करणे हेही अति आवश्यक! जगभर व विशेष करून युरोप-अमेरिकेत लोकप्रिय असलेली एक हार्डवेअर थेरपी म्हणजे ‘ऑस्टिओपथी!’ एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकन फिजिशिअन्सपैकी सुमारे ५.५ टक्के फिजिशिअन्स हे ऑस्टिओपथिक फिजिशिअन आहेत हे लक्षात घेतले तर ऑस्टिओपथीची लोकप्रियता ध्यानात येण्यास वेळ लागणार नाही. काय आहे ही ऑस्टिओपथी?
इतिहास : डॉ. अ‍ॅन्ड्रय़ू टेलर स्टील (Dr. Andrew Still’’) 
हा कान्सास प्रांतातील बाल्ड्विन शहराजवळ राहणारा ‘अमेरिकन सिव्हिल वॉर’मधील एक नेता. हाा ऑस्टिओपथीचा जनक. त्याने १० मे १८९२ रोजी मिसुरी प्रांतातील ‘कर्कस्व्हिले’ येथे अमेरिकन स्कूल ऑफ ऑस्टिओपथीची स्थापना केली. आज त्याच स्कूलची मोठी A. T. still University  झाली आहे. ऑस्टिओपथीच्या शास्त्रशुद्ध शिक्षणाचा इतका व्यापक पाया व अभ्यासक्रम डॉ. टेलर यांनी तयार केला, की मिसुरी राज्याने त्यांच्या ऑस्टिओपथी स्कूलला, स्नातकांना इतर डॉक्टरांप्रमाणे ‘एम. डी.’ डिग्री देण्याचीही अनुमती दिली; पण आपले वैशिष्टय़ जपण्याकरिता डॉ. टेलरने ती नाकारून ‘डी. ओ.’ (डॉक्टर ऑफ ऑस्टिओपथी) अशी डिग्री देणे चालू केले. आज अमेरिकेत अन्य डॉक्टरांप्रमाणे औषधे वा आवश्यक तेव्हा शल्यक्रिया वापरणारे असे ‘ऑस्टिओपथी फिजिशिअन’ हे वेगळे असून ‘नॉनफिजिशिअन ऑस्टिओपाथ’ जे केवळ Osteopathic Manipulative Treatment (OMT)  देतात असे वेगळे आहेत, त्यांचे अभ्यासक्रम वेगळे आहेत व विविध अमेरिकन राज्यात त्यांच्याकरिता वेगवेगळे वैद्यकीय कायदेकानू लागू आहेत. युरोप व कॉमनवेल्थ देशांत हे दुसऱ्या प्रकारचे उपचारक   अधिक लोकप्रिय असून, त्यांची उपचारपद्धती ही कायद्याच्या दृष्टीने ‘पर्यायी’ उपचारपद्धती म्हणून गणली जाते, असे उपचारक स्वत:ला चेता-स्नायू- अस्थि विशेषज्ञ  M. N. M. S. Specialis  म्हणवून घेताना आढळतात.
‘स्नायू अस्थि व सांधे ‘यांचा सांगाडा व त्याचे आरोग्य राखणे हे ऑस्टिओपथीच्या तत्त्वानुसार अतिमहत्त्वाचे असते. त्यातील बिघाड हा चेतासंस्थेच्या ऊर्जेत व पर्यायाने सर्व शरीराच्या ऊर्जेत बिघाड घडवून आणतो व रोगनिर्मिती होते, असे हे शास्त्र मानते. या सांगाडय़ाच्या आरोग्यावर आतील अवयवांचेही आरोग्य अवलंबून असते व हीच मध्यवर्ती कल्पना मानून सन १९४० च्या दरम्यान एच. व्ही. हुवर व एम. डी. यंग या दोन ऑस्टिओपायनी ? व्हिसेरल ? ऑस्टिओपथी  (Visceral osteopathy)  म्हणजे अवयवाधिष्ठित ऑस्टिओपथी अशी नवीन शाखा निर्माण केली.
कवटीची हाडे व मणके यांच्या संरक्षणात मेंदू व मज्जारज्जू कालक्रमणा करतात. त्यांच्या (मेंदू व मज्जारज्जू) भोवती  Meninges  चे संरक्षक आवरण असते तर मस्तिष्कद्रवात (Cercbrospinalflnid) ते एक प्रकारे डुंबत असतात. या रचनेत काही बदल झाल्यास, मस्तिष्कद्रवाच्या प्रवाहात अडथळे आल्यास, या संपूर्ण रचनेच्या आतील दाबात काही फरक पडल्यास त्यामुळे चेतासंस्थेच्या (व पर्यायाने संपूर्ण शरीराच्या) कार्यात बिघाड होतो, हा बदल डोक्यावरून हात फिरवून वा पाठीच्या मणक्यांवरून हात फिरवून तज्ज्ञाला जाणवू शकतो व योग्य त्या ठिकाणी दाब देऊन तो हा बदल नाहिसा करून ही संपूर्ण रचना पूर्वस्थितीत आणू शकतो या गृहीत तत्त्वावर डॉ. विल्यम सुदरलँड (Dr. william Sutherland) याने  Cranial Ostcopathy ही एक नवीन शाखा अस्तित्वात आणली. मुख्यत्वे खालच्या मणक्यांवर आधारित अशी  Craniosaoral Theropy  सुद्धा अस्तित्वात आहे. अर्थात व्हिसेरल, क्रॅनिअल वा क्रॅनिओर्सेक्रल या सर्व पद्धतींबाबत क्लासिकल ऑस्टिओपाय वा अन्य डॉक्टरांच्या मनात अजूनही प्रचंड शंका आहेत.
ऑस्टिओपथीचा परिणाम नेमका कसा होतो?
अस्थि, स्नायू, सांधे- जोड उती’ यांचा प्रचंड सांगाडा हा चेतासंस्था वा शरीरांतर्गत अन्य अवयव संस्था यांच्या संरक्षणाकरिता, परस्परसंपर्काकरिता व बाह्यजगातील हालचालींकरिता आवश्यक आहे हे सहज मान्य होण्यासारखे आहे; पण जवळजवळ सर्वच व्याधी विकारांचे उगमस्थान या सांगाडय़ातच असते व तो ठीकठाक केल्यास संपूर्ण आरोग्यप्राप्ती होते व आता ज्ञात असलेल्या वैद्यकीय माहितीमुळे, पचनी पडणे थोडे कठीणच आहे. अर्थात ऑस्टिओपथीतील मुख्य  Manipulation बरोबरीनेच आहार, व्यायाम, ढब सुधारणे, व्यावसायिक उपदेश (Ocupaticnal advise)  इ.चा वापर केल्याने अनारोग्यकारक विविध घटकांचा परामर्श घेतला जाऊन, आरोग्यप्राप्ती तणावजन्य डोकेदुखी अशा विविध दुखण्यात ऑस्टिओपथीमुळे जे उत्तम परिणाम मिळतात त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केल्यानंतर हे परिणाम या थेरपीमुळे कदाचित शरीरात निर्माण होणाऱ्या सूजनिवारक ‘इंटरल्युकिन्स’ या द्रव्यांमुळे (Antiintlammatary Interleukins)  होत असावेत, असे दृष्टोत्पत्तीस आले आहे. डिसेंबर २००७ च्या ‘जर्नल’ ऑफ अमेरिकन ऑस्टिओपथिक असोसिएशन’मध्ये या संबंधीची सविस्तर माहिती आली आहे ती जिज्ञासुनी जरूर पाहावी.
आपली बिघडलेली स्थिती नीट करण्याची प्रत्येक शरीराची आपली अंतर्गत अशी क्षमता असते. शरीराची ही बरे होण्याची क्षमता ‘अस्थि, स्नायू, सांधे, जोड उती’ या यंत्रणेमार्फत पूर्वस्थितीत आणणे हे ‘ऑस्टिओपथी’ या उपचार पद्धतीचे मध्यवर्ती तत्त्व होय.
ऑस्टिओपथी कोठे उपयुक्त?
आज कंबरदुखीपासून ते फुप्फुसांच्या संक्रमणापर्यंत अनेक व्याधीविकारांवर ऑस्टिओपथीचे उपचार होत असले तरी प्रामुख्याने कंबरदुखी, पाठदुखी, तणावजन्य डोकेदुखी या विकारांवर ऑस्टिओपथी जास्तीत जास्त गुणकारी असते, असे म्हणता येईल. याव्यतिरिक्त खेळांमधील दुखापतींवर तसेच सांध्याच्या लवचिकतेकरिताही ऑस्टिओपथीचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे ऑस्टिओपथ सांगतात.
मुळात, आरोग्याचा शारीरिक आयाम ऑस्टिओपथी अधोरेखित करतो व त्यातच तिचे महत्त्व व ताकद लपलेले आहेत, असे नमूद करावेसे वाटते.
ऑस्टिओपथीची आठ प्रमुख तत्त्वे :
१) शरीर ही एक स्वयंपूर्ण यंत्रणा आहे.
२) शरीररचना व शरीराचे कार्य परस्परावलंबी असतात.
३) शरीराची स्वनियंत्रणाची अशी यंत्रणा असते.
४) शरीराची स्वसंरक्षणाची व स्वत:ला ‘बरे करण्याची’ क्षमता असते.
५) ही क्षमता ओलांडल्यास रोगनिर्मिती होते.
६) शरीरस्वास्थ्याकरिता शरीरांतर्गत द्रवांची (Body Fluids) हालचाल आवश्यक.
७) चेतासंस्था व ‘नसा’ (Nwrves) यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
८) रोगाचे देहिक घटक, रोगट स्थिती राहण्यास मदत करतात (व म्हणून त्यावर उपचार महत्त्वाचे!---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Tuesday, June 15, 2010

वैद्यकाच्या दाही दिशा : ‘देही’ असो द्यावे समाधान.

डॉ. उल्हास कोल्हटकर ,
‘चित्ती असो द्यावे समाधान’ या संतवचनाला अनुसरून आणि अगदी आधुनिक चेतावैद्यकाच्या सिद्धांतानुसारही, शरीरस्वास्थ्याकरिता मानसिक समाधान असणे अत्यावश्यक असते. तसे असेल तर शरीरात अनेक प्रकारची पोषक चेतारसायने उदा. आनन्दामाईड्स निर्माण होऊन एकप्रकारची ‘फील गुड’ भावना तर निर्माण होतेच, पण रक्तदाब, रक्तशर्करा पातळी नियमनापासून ते विविध संप्रेरकांचा समतोल साधण्यापर्यंत अनेक गोष्टी साध्य होतात. भारतासारख्या आध्यात्मिक (?) देशात म्हणूनच फार पूर्वीपासून, ‘शेकडो विचारवंतांनी व संतांनी मानसिक समाधानावर भर दिलेला दिसतो. पण म्हणून ‘देहीक समाधानाकडे’, शरीराच्या यांत्रिक सुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आधुनिक शरीर-मनवैद्यक (Body Mind Medicine) या गोष्टीकडे कटाक्षाने अंगुलीनिर्देश करताना दिसते. मनाइतकेच ‘शरीर’ जपणे स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
‘शरीर’ जपणे याचा अर्थ त्यातील अवयव, उती जपणे; त्याची यंत्रणा कार्यक्षम ठेवणे आणि विचार उद्भवल्यास त्यावर त्वरित उपचार करणे व रोग होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. या दृष्टीकोनातूनच आज पर्यायी वैद्यक विश्वात अॅक्युप्रेशर, अलेक्झांडर टेक्निक, किरोप्रॅक्टीक, मसाज, ऑस्टिओपथी, पिलेट्स, टय़ूइना इ. अशा अनेकविध उपचारपद्धती प्रचलित दिसतात. यापैकी काहींचा आपण आता परिचय करून घेणार आहोत.
आपल्या शरीरातील सगळ्यात मोठा अवयव कोणता असा तुम्हाला प्रश्न विचारला तर आपल्या डोळ्यासमोर हृदय, यकृत, मूत्रपिंड इ. अवयव तरळू लागतील. पण सगळ्यात मोठा अवयव म्हणजे आपली ‘अस्थि-स्नायू’ संस्था होय. याच संस्थेमुळे इतर अवयवांना संरक्षण मिळते. याच संस्थेमुळे आपण चालू, धावू, बोलू, खाऊ शकतो, चित्र काढू शकतो किंवा नाचू शकतो आणि युद्ध करू शकतो किंवा शल्यक्रियाही करू शकतो! हाच अवयव शरीराला उपलब्ध, असलेल्या ऊर्जेचा सगळ्यात मोठा हिस्सा वापरतो व याच अवयवातील बिघाड बहुसंख्य वेळेला आपल्याला ताबडतोब डॉक्टरांकडे धाव घेण्यास भाग पाडतो व म्हणूनच या अवयवासंबंधित  उपचार पद्धतींना जगात भलताच भाव आहे. या उपचार पद्धतींमधील एक वैशिष्टय़पूर्ण (आणि काहीशी वादग्रस्तही!) पद्धती म्हणजे किरोप्रॅक्टीक! आज मुंबई-पुणे यासारख्या महानगरांमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके किरोप्रॅक्टर असले तरी अमेरिका-ऑस्ट्रेलिया, कॅनडा व काही युरोपियन देशांमध्ये त्यांची संख्या हजारोंनी आहे. तेथे ही उपचारपद्धती कायदेशीर मान्यताप्राप्त असून, हेल्थप्लॅन संमतही असते. जागतिक आरोग्य संघटनेनेही किरोप्रॅक्टिक (chiropractic) उपचारासंबंधी, प्रशिक्षणासंबंधी व व्यवसायाविषयी काही नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली आहेत.
ल्ल काय आहे हे किरोप्रॅक्टिक?
डॅनियल डेव्हिड पामर या ‘किरोप्रॅक्टिक’च्या जनकाच्या सिद्धांतानुसार मानवी आरोग्याचा पाया म्हणजे मानवी चेतासंस्था व तिचा मुख्य आधार म्हणजे पाठीचा कणा. (आश्चर्य म्हणजे योगामध्येही पाठीच्या कण्यास म्हणजे मेरुदंडास व त्याच्या सरळ असण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे!) या कण्यातील मणके सरकल्यास (Vertebral Sublvxation) त्यामुळे त्यातून बाहेर पडणाऱ्या नसांवर दाब पडून त्यांच्या कार्यात व पर्यायाने ज्या अवयवाला या नसा संदेश पोहोचवितात वा ज्यापासून संदेश आणून तो मेंदूपर्यंत पोहोचवतात त्या अवयवाचे कार्य बिघडते व रोगनिर्मिती होते. डी.डी. पामरने पुढे या ‘नसा’ दाबल्या जाण्याच्याऐवजी मणके सरकण्यामुळे त्यांच्या कार्यस्पंदनात बिघाड होऊन, अवयवांचे कार्य बिघडते असा सैद्धान्तिक बदल केला. हे सरकलेले मणके ‘हाताने’ परत जागच्या जागी सरकविणे (Spinal Manipulation) म्हणजे डी.डी. पामर यांच्या मते ‘किरोप्रॅक्टिक’! कंबरदुखीपासून, अर्धशिशीपर्यंत आणि लहान मुलांच्या अंथरुण ओले करण्याच्या विकृतीपासून ते आंत्रव्रणापर्यंत विविध विकारांवर किरोप्रॅक्टिकचा उपयोग होतो असे या उपचारपद्धतीचे समर्थक सांगतात.
अर्थात ‘अशास्त्रीय पंथ’ म्हणून या पद्धतीची हेटाळणी करणारेही (आधुनिक वैद्यकाचे उपासक असणारे) अनेक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या उपचारपद्धतीची मार्गदर्शक तत्त्वे सांगताना सन २००५ मध्ये, मणके सरकणे हा किरोप्रॅक्टिकचा सिद्धान्त, प्रत्यक्ष मणका सरकण्यासंबंधीचा (Physical or Structural displacement) नसून, ते सरकणे कार्यदृष्टीने (म्हणजे functional) आहे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बरेचसे वाद मिटावेत असे वाटते.
किरोप्रॅक्टिकची वेगवेगळी तंत्रे- आज युरोप अमेरिकेत या उपचारपद्धतीची कॉलेजेस असून त्यातील शिक्षणक्रम व कालावधी निश्चित केलेला असतो. अमेरिकेतील बहुतेक राज्यांत किरोप्रॅक्टिक पद्धतीने उपचार करणाऱ्यांना औषधांचे प्रिस्क्रीप्शन लिहिण्याची वा शल्यक्रिया करण्याची परवानगी नसते. तसेच त्यांना प्रमाणीकरण करणे (Accredition) आवश्यक असते. किरोप्रॅक्टिकचे दोन मुख्य प्रवाह आहेत. अ) पारंपरिक (Straight)- हे पामर यांनी विकसित केलेल्या मूळ पद्धतीशी इमान राखून आहेत. वैश्विक बुद्धिमत्ता, वैयक्तिक बुद्धिमत्ता (शरीरांतर्गत संतुलन) आणि प्रकृती स्वास्थ्य यांचे एकमेकांशी दृढ नाते असून मेरुदंडातील बिघाड हे प्रकृती अस्वास्थ्याचे प्रमुख कारण होय असेही परंपरा मानते. ब) आधुनिक Mixers)- मेरूदंडातील बिघाडाव्यतिरिक्त प्रकृती अस्वास्थ्याची अनेक कारणे असू शकतात व त्याकरिता Spinal Manipulation च्या व्यतिरिक्त व्यायाम, मसाज, आहार, अॅक्युपंक्चर इ.चाही योग्य पूरक वापर करण्यास हरकत नाही असे हा प्रवाह मानतो. आज जगात पारंपरिकपेक्षा या Mixers चेच प्रमाण अधिक आहे व यामुळेच किरोप्रॅक्टिकमध्ये पूर्वी मान्य नसलेले पुरावाधिष्ठित वैद्यकाचे (Evidence Based Medicine) महत्त्व वाढीस लागलेले दिसते व ते स्वागतार्हच आहे. आज किरोप्रॅक्टिकची जी विविध तंत्रे विकसित झाली आहेत ती पुढीलप्रमाणे-
१)Diversified Technique  २) स्प्रिंगचा वापर असलेला Activator Technique . ३) थॉम्पसन तंत्र  ४) गॉनस्टीड तंत्र ५) कॉक्सचे Flexion/ Distraction तंत्र ६) क्रॅनियल तंत्र. ७( सॅक्रो ऑक्सिपिटल तंत्र ८) Applied Kinesiology ९) Nimmo Receptor Tonus तंत्र १०) भूलशास्त्राचा वापर करून मणके बसविणे.
भविष्यकालीन वेध- मानवी शरीराचा डोलारा उभा करण्यात, तो सावरण्यात व सांभाळण्यात अस्थि, स्नायू (Musculoskeletal System) व जोडपेशींचे (Connective Tissues) अनन्यसाधारण योगदान आहे. या उतींकडे केवळ जड (Mechanical) दृष्टीने न पाहता, एक अवयव म्हणून पाहणे आवश्यक आहे असा मतप्रवाह अनेक वर्षांपासून वैद्यकक्षेत्रात आढळतो. या अवयवाच्या आरोग्यावर इतर अवयवांचे आरोग्य अवलंबून आहे, असेही ठाम प्रतिपादन काहीजण करताना आढळतात. (किरोप्रॅक्टिक हे त्यापैकी एक!)
शरीरांतर्गत सर्व जोडपेशी (डोक्यापासून पायापर्यंत) एकमेकाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जोडलेल्या असतात व हे महापटल सर्व शरीराला आधारभूत असते हे ध्यानात घेतले तर Spinal Manipulation चे महत्त्व थोडेथोडे ध्यानात येऊ लागते. अर्थात या विषयावर सखोल संशोधन होणे तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच अशा प्रकारचे उपचार करून घेणे योग्य. भविष्यात या शास्त्राकडून अधिक अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. मनाच्या समाधानाबरोबरच ‘देह’ ही समाधानी असणे र्सवकष आरोग्याच्या दृष्टीने कसे आवश्यक आहे ते एव्हाना ध्यानात आले असेलच!
ल्ल  किरोप्रॅक्टिक कोठे उपयुक्त?
आजतागायतच्या उपलब्ध माहितीनुसार पुढील विकारांवर ही उपचारपद्धती कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त होऊ शकते (अर्थात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच!)- कंबरदुखी- बेल्स पाल्सी (Bell's Palsy) मान दुखणे Infantile Erb's Palsy तणावजन्य डोकेदुखी, प्रौढांमधील पाठीच्या कण्याची वक्रता (Adult Scoliosis) मुलांमधील अंथरूण ओले करण्याची विकृती
यासाठी वापरू नये- ऱ्हुमॅटॉईड सांधेदुखी, अस्थिविरलता

या शास्त्राचा जनक डॅनियल डेव्हिड पामर हा मूळचा कॅनेडियन, पण नंतर आयोव्हा प्रांतात डॅव्हनपोर्ट येथे स्थायिक झाला. सुरुवातीस त्याने मधमाशीपालन, रास्पबेरी विकणे, किराणामालाचे दुकान चालविणे असे विविध उद्योग केले. नंतर तो चुंबकोपचार शिकला व सन १८८० मध्ये त्याने आयोव्हात आपला दवाखाना थाटला. सन १८९५ मध्ये त्याच्या बिल्डिंगमधील दरवानावरच्या उपचारादरम्यान त्याने आपल्याला साधारण सतरा वर्षांपूर्वी पाठदुखीने कसे संत्रस्त केले व त्या पाठीच्या लचकण्यामुळेच आपण बहिरेही कसे झालो ते पामरला ऐकविले. दरवानाच्या पाठीवर उपचार करताना त्याचा एक मणका जागेवरून सरकल्याचे पामरच्या लक्षात आले, त्याने तो परत जागेवर बसविला आणि अहो आश्चर्यम्! पामरच्या म्हणण्यानुसार त्याची पाठदुखी तर पळालीच पण त्याचे बहिरेपणही नाहीसे झाले! आणि किरोप्रॅक्टिकचा जन्म झाला. पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्याच्या मुलाने म्हणजे बार्टलेट जोशुआ पामरने हे शास्त्र अधिक विकसित व लोकप्रिय केले. अमेरिकन मेडिकल असोसिएशनने १९८७ पर्यंत ही उपचारपद्धती बहिष्कृतच केली होती. पण Antitrust कायद्यांतर्गत ही असोसिएशन १९८७ साली किरोप्रॅक्टिक विरोधातील एक केस हरली व नंतर राजकीय समर्थनामुळे ही उपचारपद्धती युरोप अमेरिकेत झपाटय़ाने लोकप्रिय झाली.    ’

---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Friday, May 14, 2010

वैद्यकाच्या दाही दिशा : पूर्णोपचार (होलिस्टिक मेडिसिन)

डॉ. उल्हास कोल्हटकर ,
डॉ. मॅकगिनिस आणि डॉ. फोजी यांनी १९९३ सालच्या ‘जामा’मध्ये (जर्नल ऑफ दी अमेरिकन मेडिकल असोसिएशन) एक लेख लिहून त्या काळातील अमेरिकेतील मृत्यूस कारणीभूत होणाऱ्या अशा दहा प्रमुख व्याधी विकारांचा मागोवा घेतला होता. त्यांच्या मते वरकरणी यात जरी कर्करोग, हृदयविकार, मधुमेह व एड्स असे रोग दिसत असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन पाहिल्यास, मूलभूत कारणे काही वेगळीच दिसतात व ती म्हणजे तंबाखू सेवन, मदिरापान, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, काही टाळता येण्याजोगी संक्रमणे, व्यसने, औषधांचे गंभीर दुष्परिणाम, इ. इ. यापैकी अनेक मृत्युदूतांना थोपविणे आपल्याला सहज शक्य आहे पण त्याकरिता आपल्याला, १) शरीर-मन-चेतनेचे अद्वैत २) ‘शरीर-मन-चेतना’ व बाह्य़ भौतिक आणि सामाजिक वातावरणाचा एकमेकांवरील होणारा परिणाम ३) शरीराचा मनावर व मनाचा शरीरावर होणारा परिणाम यांची जाणीव होणे अत्यावश्यक आहे. अशी जाणीव झाल्यास शरीराच्या माध्यमातून मनावर  (Body work therapies) व मनाच्या माध्यमातून शरीरावर (mind- body medicine) उपचार करणे शक्य आहे. यातूनच अनेक प्रकारच्या पूर्णोपचारांचा (Holistic Medicine) जन्म झाला आहे.
इतिहास : वास्तविक पाहता ‘मन आणि शरीराची’ एकात्मता हा काही नवा सिद्धांत नव्हे. अगदी वेद-उपनिषदांच्या कालखंडापासून (इ. स. पूर्वी साधारण : १५०० ते १००० वर्षे) ‘यथा अन्नं तथा मन:’ किंवा ‘मन: एव कारणं मनुष्याणां बन्धमोक्षयो:’ अशा प्रकारचे सिद्धांत आपल्याकडे तसेच अशाच प्रकारचे सिद्धांत पाश्चात्त्य देशांमध्येही प्रचलित व मान्य होते. पण साधारणपणे ३००-३५० वर्षांपूर्वीपासून हे सिद्धांत मागे पडून प्रथम शरीर व मनाची व नंतर शरीराचीही कार्टेशियन पद्धतीने विभागणी होऊन निरनिराळ्या विभागांकरिता निरनिराळे उपचार व तज्ज्ञमंडळी जन्माला येऊ लागली परंतु आता विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकात मन आणि शरीराचे अद्वैत व त्यांचा एकमेकांवर होणरा परिणाम स्पष्ट होऊ लागला असून आधुनिक विज्ञानाचे त्यावर शिक्कामोर्तबही होत चालले आहे. (पाहा तक्ता क्र. १ व २). या पाश्र्वभूमीवर शरीर व मन या ‘पूर्णा’वर शरीराच्या वा मनाच्या माध्यमातून कोणकोणत्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत ते बघणे उद्बोधक ठरावे.
* मनाच्या माध्यमातून शरीरावर व मनावर उपचार (Mind- Body Medicine) यात चार प्रमुख व काही अन्य उपचार पद्धतींचा समावेश होतो.
१) ध्यान आणि शिथिलोपचार , २) प्रतिमातंत्र, ३) जैव प्रतिज्ञापन, ४) संमोहन , ५) अन्य - ऑटोजेनिक ट्रेनिंग, गेस्टाल्ट थेरपी, ईएमडीआर (Eye Movement Densitization and Reprocessing), जेकबसन्स प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन, एनएलपी, विवेकनिष्ठ भावना-वर्तनोपचार (REBT) इ.
* शरीराच्या माध्यमातून शरीरमनावर उपचार - यात पुढील उपचार पद्धतींचा समावेश होतो.
१. अ‍ॅक्युप्रेशर २. अलेक्झांडर टेक्निक ३. किरो प्रॅक्टिक ४. क्रॅनिअल टेक्निक ५. फेल्डेनक्रेस तंत्र ६. जलोपचार ७. मसाज ८. लिम्फॅटिक पम्पिंग अँड ड्रेनेज ९.ऑस्टिओपथी १०. फिजिकल थेरपी ११. पिलेट्स १२. रिफ्लेक्सॉलॉजी १३. रोल्फिंग १४. ताई-ची १५. टय़ूईना, इ.
* मन, शरीर आणि चेतना यावर एकाच वेळी उपचार-योगोपचार पद्धती.
यापैकी मन-शरीर पद्धतींचा विचार आपण प्रथम करू या.
पर्यायी वैद्यकाच्या विविध शाखा व तंत्रांपैकी मनाच्या माध्यमातून शरीर व मनावर करावयाची उपचारतंत्रे, आधुनिक वैद्यकाला कदाचित अधिक जवळची वाटतात, कारण त्यांना अनेक वेळा आधुनिक वैद्यकाच्या सिद्धांताची बैठक असते व आधुनिक तंत्रविज्ञानाने त्यांचे परिणामही दृश्य स्वरूपात मोजता येतात. ‘शिथिलीकरण’ आणि ‘ताणव्यवस्थापन’ हे दोन मूलभूत घटक अशा प्रकारच्या सर्व मन-शरीर पूर्णोपचारांची महत्त्वाची अंगे आहेत.
शिथिलीकरणामुळे होणारे प्रमुख फायदे म्हणजे -
* रक्तामधील शर्करा, कोलेस्टिरॉल व एपिनेफ्रीन या संप्रेरकाची पातळी कमी होते.
* उच्च रक्तदाब कमी होऊन हृदयावरील ताण कमी होतो.
* श्वसनाचा वेग मंदावतो. फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते व चयापचयाचा वेग कमी होतो.
* स्नायू शिथिल होतात व म्हणून त्यातील लॅक्टिक अ‍ॅसिडची पातळी कमी होते.
* पचन सुधारते.
* त्वचेचे तापमान कमी होते, घाम कमी होतो.
ताणतणाव हे अनेक रोगांचे उदा. हृदयविकार, मधुमेहसदृश स्थिती, अर्धशिशी, पोटाचे व पचनाचे विविध विकार, आंत्रव्रण, आम्लपित्त, काही त्वचाविकार, दम्याचे काही प्रकार इ. इ., उगमस्थान असल्याने ‘ताणव्यवस्थापन’ हे उपचारांमध्ये अतिमहत्त्वाचे ठरते. आधुनिक जीवनशैलीमध्ये नाहक चिंता निर्माण करणारे विचार, गर्दी, अनियंत्रित रहदारी, कामाचे ओझे, अतिमहत्त्वाकांक्षा, डेड्लाइन्स अशा अनेक गोष्टींमुळे शरीर-मनाला सातत्याने ताणतणावाखाली राहावे लागते. त्यातच जर जनुकीय पाश्र्वभूमी ही रोगाकरिता पूरक असेल तर रोगनिर्मिती हमखास होते. हे लक्षात घेतले तर ‘शिथिलीकरण’ व ‘ताणव्यवस्थापन’ व त्या दृष्टीने मन-शरीर उपचारपद्धती या किती महत्त्वाच्या व हितकारक आहेत हे सांगणे न लगे. त्यातही या पद्धतींची खासियत म्हणजे नेहमीच्या उपचारपद्धतींना या पूर्णत: पूरक आहेत. पूर्णोपचार पद्धतींचे एक वैशिष्टय़ म्हणजे त्या केवळ रोग लक्षणे नाहीशी करून थांबत नाहीत तर शरीर-मन व चेतना यांची एकसंधता साधतात. पुढील लेखांकात या विविध पद्धतींची थोडक्यात माहिती घेऊ या.

मनाचा शरीरावर होणारा परिणाम

अ- भावना - उदा. राग, चेहरा लाल होणे, शरीराचे तापमान वाढणे, रक्तदाब वाढणे, हृदयगती वाढणे.
अनुराग : गाल लाल होणे.
भीती : घाम फुटणे, हृदयगती वाढणे वा अति कमी होणे.
ब- ताणतणाव - प्रतिरक्षाप्रणालीचे कार्य मंदावणे.
हृदयगती वाढणे, पचनसंस्था मंदावणे.
क- हास्यविनोद -  उच्च रक्तदाब कमी होणे.
’ तणावकारण संप्रेरकाची पातळी कमी होणे.
’ प्रतिरक्षाप्रणाली सुधारणे (T cells व B cells च्या संख्येत व कार्यात वाढ).
’ रक्तातील शिथिलताकारकच्या चेतारसायनांची. उदा. एन्डॉर्फिन्स पातळी वाढणे.
ड- प्रतिमातंत्र - उदा. चिंच खाण्याच्या विचाराने, प्रतिमेने तोंडाला पाणी सुटणे.
’ हिमालयात ध्यान लावण्याच्या प्रतिमेने प्रगाढ शक्तीचा अनुभव येणे, इ.
इ- ‘प्लासिबो’ परिणाम (placebo effect) - औषध नसतानाही एखाद्या गोष्टीचा श्रद्धेमुळे औषधासारखा परिणाम.
शरीराचा मनावर होणारा परिणाम
अ- व्यायाम - मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढतो.
* एन्डॉर्फिन्स व इतर चेतारसायनांचे प्रमाण वाढते व शांतता लाभते.
* मेंदूतील सिरोटोनिनच्या पातळीत बदल.
* चेतापेशींच्या वाढीला पोषक अशा इऊठा चेतारसायनाच्या पातळीत वाढ.
ब- मसाज व तत्सम तंत्रे - तणावकारक संप्रेरकांच्या पातळीत घट, शिथिलीकरण.
क- ढब - पोक काढणे- नैराश्य, दुर्बलतेची भावना, श्वसनावर परिणाम. ताठ कणा, मान- उत्साह, उत्तेजना, आनंद, सकारात्मक दृष्टिकोन.
ड- शांत संगीत - एन्डॉर्फिन्स पातळीत वाढ म्हणून शांत भावना.
ध्वनिप्रदूषण - वैचारिक गोंधळ, स्मृतिभ्रंश, निद्रानाश.
इ- श्वसन - दीर्घ, खोल श्वासोच्छ्वास : तणावकारक संप्रेरकांची पातळी कमी.
जलद, उथळ श्वास : भीती, चिंताकारक
फ- लैंगिक संप्रेरके - इस्ट्रोजेन व टेस्टोस्टिरोनच्या पातळीनुसार विचार व वर्तनात लक्षणीय फरक.
---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

वैद्यकाच्या दाही दिशा : ।। आहार हेच औषध।। (न्यूट्रास्यूटिकल्स)

डॉ. उल्हास कोल्हटकर,
आहारशास्त्र हे एकमेव असे शास्त्र असावे की ज्यात आपणाला सर्व काही कळते अशी आपल्यापैकी बऱ्याच जणांची समजूत असते. दुर्दैवाने परिस्थिती बहुसंख्य वेळा उलटीच असते. आधुनिक तंत्र-विज्ञानामुळे आरोग्य शास्त्राची व आधुनिक वैद्यकाची क्षितिजे विस्तारू लागल्यापासून तर, आहारशास्त्र अधिकाधिक प्रगत व गुंतागुंतीचे होऊ लागले आहे.केवळ पोषणापुरत्याच त्याच्या मर्यादा न राहता, विविध आजारांच्या उपचारांमध्ये व रोगप्रतिबंधनामध्येही ‘आहारा’ची भूमिकाही अधिक ठळक होऊ लागली आहे. जणुकीय पाश्र्वभूमी लाभलेल्या जीनॉमिक्स (GENOMICS) च्या सहाय्याने उपचारांमध्ये अतिविशिष्ट वैयक्तिक आहाराचा (Personalised Food Therapy) उपयोग हे आहारशास्त्राचे एक नवे क्षितीज. या सर्व घडामोडींना, विशेष करून आहाराचा औषध म्हणून उपयोग करण्याच्या शास्त्राचे विशेषकरून आहाराचा औषध म्हणून उपयोग करण्याच्या शास्त्राचे सन १९८९ मध्येच ‘फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन इन मेडिसीन’ यू.एस..च्या संस्थापक चेअरमन डॉ. स्टीफन डिफेलिस यांनी छान बारसे केले आहे व ते म्हणजे- न्यूट्रास्यूटिकल्स- न्यूट्रिशन + फार्मास्युटिकल्स- आहार + औषध! तसे पाहिले तर गेल्या काही शतकातील आहाराविषयीचा आपला संकुचित दृष्टीकोन सोडला, तर आयुर्वेदाने आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात आहाराचा र्सवकष व सखोल विचार केल्याचे लक्षात येते. ‘औषधं जान्हवी तोयं’ (गंगेचे पाणी म्हणजे औषधच!), ‘रसोद्भव: पुरुष:’ (अन्न) रसातूनच व्यक्तीची निर्मिती होते!), ‘यथा अन्नं, तथा मन:’ (जसे अन्न तसे मन!) यासारखे औपनिषदिक् विचार म्हणजे एका अर्थाने आरोग्यविषयक ब्रह्मवाक्येच! आयुर्वेदाची ‘आहार’ संकल्पनाही अशीच व्यापक व वैशिष्टय़पूर्ण आढळते. त्या शास्त्रानुसार आपल्या शरीरात पंचज्ञानेंद्रियामार्फत जे जे काही ग्रहण केले जाते, ते ते त्या त्या इंद्रियांचा, म्हणजे पर्यायाने शरीराचा आहार. उदा. रसनेमार्फत (जीभ) घेतले जाणारे अन्न म्हणजे स्थूल आहार, दृश्ये हा दृष्टीचा आहार, गंध हा घ्राणेंद्रियाचा (नाक) आहार, श्रृती (ऐकणे) हा कानाचा आहार तर स्पर्श हा त्वचेचा आहार! व म्हणून आहाराचा विचार म्हणजे या सर्वाचा विचार आणि आरोग्याकरिता योग्य व सात्त्विक आहार म्हणजे या सर्व दृष्टीकोनातून योग्य व सात्त्विक आहार! अर्थात आपल्या आजच्या लेखमर्यादेत आपण ‘आहारा’चा केवळ पारंपरिक स्थूल अर्थानेच, म्हणजे ‘खायचे अन्न’ या दृष्टीकोनातूनच विचार करणार आहोत.
इतिहास : ‘न्यूट्रास्यूटिकल्स’ हे नाव जरी नवीन असले तरी अन्नाचा औषध म्हणून वापर ही कल्पना तशी जुनीच आहे. आधुनिक वैद्यकाचा जनक ‘हिप्रोक्रेटिस’ ही योग्य आहाराचा उपचाराकरिता पुरस्कार करत असे. आयुर्वेदाने तर आरोग्य टिकविण्याकरिता व संवर्धनाकरिता ज्या स्वास्थ्यवृत्ताचा पुरस्कार केला त्याचा बराच भाग आहारविषयकच आहे. आयुर्वेदामध्ये रुग्णोपचारांमध्ये आहारविषयक ‘पथ्य-अपथ्य’ संकल्पनाही खूपच दृढमूल आहेत. आधुनिक कालखंडामध्ये बघितल्यास एकोणविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेमध्ये थायरॉईड ग्रंथीच्या ‘गॉयटर’ (Goitre) या विकासाकरिता आयोडिनयुक्त मीठाच्या वापराची संकल्पना प्रथम मांडली गेली असे आढळते आणि आज तर नेहमीच्या वापरातल्या खाद्यपदार्थाचे अनेक आरोग्यविषयक गुणधर्म नव्याने लक्षात येत आहेत. उदा. टोमॅटोमधील लायकोपीन द्रव्यामुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांना आळा बसतो; साल्मन माशातील ‘ओमेगा ३’ या द्रव्यामुळे धमन्यांची लवचिकता टिकून राहते, इ. तर काही धान्ये वा भाजीपाला यांचे नवीन पद्धतीने, म्हणजे हायब्रिडीकरण किंवा जैवतंत्रज्ञानाने जनुकीय रचनेत बदल करून उत्पादन होत आहे. उदा. बीटा कॅरोटीन द्रव्याने (जे गाजरात भरपूर असते व शरीरातील विटामीन ए करिता वा अ‍ॅण्टीअ‍ॅक्सिडंट म्हणून ज्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे) युक्त असा तांदूळ किंवा विटामिन संपृक्त ब्रोकोली ही भाजी इ.

आहारस्फोट- आहार व आरोग्य यांचा अन्योन्य संबंध अधिकाधिक स्पष्ट होत जाणे, माहिती व तंत्रविज्ञानाचा स्फोट, दीर्घायुषी लोकांचे वाढते प्रमाण, नेहमीच्या आरोग्यसेवांच्या वाढत्या किमती आणि रोगप्रतिबंधनाविषयक वाढती जागृती अशा अनेकविध कारणांमुळे हा ‘आहारस्फोट’ होत आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.
न्यूट्रॉस्यूटिकल्स म्हणजे नेमके काय?
डॉ. स्टीफन डिफेलिस यांच्या व्याख्येनुसार आपल्या नेहमीच्या पोषणमूल्यांव्यतिरिक्त (म्हणजे विटामिन्स, क्षार, स्निग्ध- पिष्टमय- प्रथिन पदार्थ इ. इ.) रोगप्रतिबंधन व रोगोपचारांचे (यात अ‍ॅनेमियाचा समावेश नाही) मूल्य असणारे वैद्यकीय व आरोग्यदृष्टीने फायदेशीर असे सर्व अन्नपदार्थ म्हणजे न्यूट्रॉस्यूटिकल्स! यात फळे, भाज्या, धान्य, मासे, दूध, दुग्धजन्य पदार्थ अशा सर्व पारंपरिक अन्नपदार्थाचा समावेश तर होऊ शकतोच. पण शेतीतंत्रज्ञानाने (हायब्रिडीकरण काही जैवतंत्रज्ञान इ.) निर्माण झालेली नवीन प्रकारची धान्ये किंवा भाजीपाला तसेच काही पारंपरिक पदार्थाचे मूल्यवर्धन उदा. कॅल्शियममुक्त ऑरेंज ज्यूस, फोलिक अ‍ॅसिडयुक्त पीठे इ. अशा अनेक अपारंपरिक अन्नपदार्थाचाही समावेश होतो. या क्षेत्रात नित्यनवीन संशोधन होत असून विविध पारंपरिक अन्नपदार्थातील गुणवान द्रव्ये आढळून येऊ लागली आहेत. (सोबतचा तक्ता पाहा.) अर्थात या सर्व अन्नघटकांची व जुन्या वा नव्या अन्नपदार्थाची मानवी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता आणि व्यावहारिक उपयुक्तता यासंबंधी अधिकाधिक संशोधन होणे महत्त्वाचे आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनालयाच्या माध्यमातून अशा प्रकारची उत्पादने निर्माण करण्यासंबंधीचे तसेच त्यांच्या जाहिराती (काय नमूद करावे वा काय नमूद करता येणार नाही) यासंबंधी एक अधिक व्यापक सरकारी धोरण असणे आवश्यक आहे असे वाटते. युरोप व अमेरिकेमध्ये तेथीलोऊअ तसेच ‘न्यूट्रिशन लेबलिंग अँड एज्युकेशन अ‍ॅक्ट’ (NLEA) इ. माध्यमातून अशी बरीच उपयुक्त नियंत्रणे आणण्याचे प्रयत्न केले गेले आहेत व जात आहेत.
भविष्यवेध- आरोग्य जागृतीमुळे समाजाचा व वैद्यकाचाही रोगप्रतिबंधनाकडे वाढता कल लक्षात घेतला तर आहारोपचारांना, म्हणजेच न्यूट्रास्यूटिकल्सना नजिकच्या भविष्यात अधिक चांगले दिवस येतील अशी स्पष्ट सुचिन्हे दिसतात. एकटय़ा अमेरिकेतच २००३ साली वार्षिक ३१ बिलियन अमेरिकी डॉलर्सची उलाढाल असणारा न्यूट्रामेटिकल्सचा उद्योग आज ८६ बिलियन डॉलर्सपर्यंत झेपावला आहे. भारतातही आजमितीस रु. ४४०० कोटींचा उलाढाल असणारा उद्योग येत्या ३ वर्षांत दुप्पट होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. युरोप व जपानमध्ये तर या उद्योगाची व्याप्ती अमेरिकेहून प्रचंड आहे. एकटय़ा जपानमध्ये सुमारे ४७ टक्के लोक एखादे तरी न्यूट्रॉस्यूटिक दररोज वापरतात असे काही सर्वेक्षणे सांगतात. भारतीय उद्योजकांनीही हे संकेत जाणून पुढे जाणे आवश्यक आहे असे मुद्दामहून नमूद करावेसे वाटते. आहारोपचार अथवा न्यूट्रास्यूटिकल्सनी आपल्या उपचारात भविष्यात अतिमहत्त्वाचे स्थान मिळविले तर आश्चर्य वाटावयास नको. अखेर ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हेच खरे!
---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad