Showing posts with label शरीरशुद्धी. Show all posts
Showing posts with label शरीरशुद्धी. Show all posts

Tuesday, January 14, 2014

लठ्ठपणावर उपचार

- डॉ. श्री बालाजी तांबे
व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते. 

कितीही प्रयत्न केले तरी वाढलेले वजन कमी होत नाही, अशी तक्रार अनेकांची असते. काही जणांचा असाही अनुभव असतो, की आटोकाट प्रयत्न करून थोडे वजन कमी झाले तरी तसेच राहत नाही; पुन्हा वाढते आणि उलट पूर्वीपेक्षा अजूनच वाढते. लठ्ठपणा हा वरवर पाहता खूप त्रासदायक, वेदनादायक विकार नसला तरी त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन चरकसंहितेमध्ये अतिलठ्ठपणा ही निंद्य अवस्था असते असे सांगितले आहे.

एका बाजूने मेद कमी करायचा ठरविले तरी दुसऱ्या बाजूने वातदोष वाढणार नाही, वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीराची ताकद, उत्साह, सतेजता लोप पावणार नाही, याचे भान ठेवावे लागते आणि त्यासाठी आहार, आचरण, औषध व उपचार ही चतुःसूत्री पाळणे आवश्‍यक असते. यापैकी आहाराबाबतची सविस्तर माहिती आपण मागच्या वेळेला घेतली आहे. लठ्ठपणा असल्यास आचरणामध्ये आयुर्वेदाने सुचविलेले मुख्य मुद्दे याप्रमाणे होत,

  • अस्वप्न - कमी झोप
  • चिंतन - मानसिक व्यग्रता
  • आतपसेवन - उन्हाचा संपर्क
  • शारीरिक व्यायाम
  • अध्व - पायी चालणे

कमी झोप सुचवण्यामागे रात्रीची झोप कमीत कमी, जितकी आवश्‍यक आहे तेवढीच घेणे आणि दुपारी अजिबात न झोपणे, या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. कधीतरी जागरण झाले तरी चालू शकेल, पण झोप झाली तरी लोळत राहणे, सूर्योदयानंतरही झोपून राहणे, जेवणानंतर विश्रांती म्हणून झोपून जाणे, या गोष्टी टाळायला हव्यात.

मानसिक पातळीवर आळस येऊ नये, आरामाची प्रवृत्ती बळावू नये, हेसुद्धा लठ्ठपणावरील उपचारांत सांभाळावे लागते. मन कामात व्यस्त राहिले, चिंतन करण्याजोग्या गोष्टीत गुंतून राहिले तर त्याचाही वजन कमी होण्यासाठी उपयोग होतो.

थोडा वेळ उन्हात बसणे हा लंघनानाच एक प्रकार असतो. सकाळी आठच्या आधी किंवा संध्याकाळी पाचनंतर कोवळे ऊन अंगावर घेण्यानेसुद्धा वजन कमी होण्यास मदत मिळते. अगोदर अंगाला तेल लावून, सकाळच्या उन्हात सूर्यनमस्कार घालणे, हा त्यातला सर्वोत्कृष्ट उपचार म्हणता येईल.

व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. व्यायामाच्या बाबतीतला एक अनुभव असा, की प्रकृतीला अनुरूप असणारे, सहज करता येण्याजोगे, न थकवणारे व्यायाम करणेच हितावह असते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते.

योग्य औषधयोजना हीसुद्धा वजन कमी होण्यास सहायक असते. सहसा ही औषधे मेदाचे लेखन (अवाजवी मेद खरवडून काढणे) करण्याबरोबरीने वाताचे शमन करणारी, पचन सुधारणारी असतात. उदा.- गुग्गुळ, वावडिंग, त्रिफळा, नागरमोथा, चित्रक, सुंठ वगैरे. फक्‍त मेदनलेखन इतकाच उद्देश ठेवला व कडू, तुरट चवीच्या द्रव्यांचा भडिमार केला तर त्यामुळे वात वाढतो व अजूनच समस्या निर्माण होऊ शकतात. अमुक एक पेय प्या व वजन कमी करा, महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी करा, या प्रकारे दावे करणाऱ्या बहुतेक औषधांमध्ये कडू, तिखट, तुरट द्रव्यांचा समावेश असतो, याचे भान ठेवायला हवे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीपरीक्षण करून घेऊन योग्य औषध सुरू करणे सर्वोत्तम असते. मात्र तत्पूर्वी लगेच सुरू करता येतील अशी काही घरगुती औषधे पुढीलप्रमाणे आहेत-

  • "काथ' हा वजन कमी करण्यासाठी उत्तम असतो. चांगल्या प्रतीच्या काथाचे दीड ते दोन ग्रॅम चूर्ण रोज पाण्याबरोबर व विड्याच्या पानाबरोबर घेण्याने वजन कमी होण्यास मदत होते.
  • जेवणानंतर दोन चमचे लिंबाचा रस एक कपभर पाण्यात घेण्यानेसुद्धा मेद कमी होण्यास मदत मिळते.
  • सकाळी उठल्यावर कपभर कोमट किंवा सामान्य तापमानाच्या पाण्यात चमचाभर मध टाकून घेण्यानेही वजन कमी होण्यास मदत मिळते.
  • माक्‍याचा रस मेद साठलेल्या ठिकाणी हलक्‍या हाताने जिरवला तर त्यामुळे वजन कमी होण्यास, विशेषतः मेदाच्या गाठी तयार झालेल्या असल्यास त्या वितळण्यास मदत मिळते.

लठ्ठपणाच्या पाठोपाठ घाम अधिक प्रमाणात येणे, घामाला तीव्र गंध असणे याही तक्रारी उद्‌भवतात. याचे कारण म्हणजे मेदाचा मल घाम असतो, त्यामुळे मेद वाढला की पाठोपाठ घामाचे प्रमाण वाढणे स्वाभाविक असते. घाम कमी होण्यासाठी, तसेच तेवढ्या मर्यादेत मेदधातू कमी होण्यासाठी आयुर्वेदात काही लेप सुचवले आहेत.

शिरीष-लामज्जक-हेम-लोध्रैस्त्वग्‌-दोष-संस्वेदहरः प्रघर्षः ।
पत्राम्बुलोहाभय चन्दनानि शरीरदौर्गन्ध्यहरः प्रदेहः ।। ...भैषज्यरत्नावली 


शिरीष वृक्षाची साल, खस, नागकेशर, लोध्र याचे चूर्ण त्वचेवर चोळल्याने घामाचे प्रमाण कमी होते. तमालपत्र, वाळा, अगरू, हिरडा, चंदन यांचे चूर्ण पाण्यात मिसळून शरीरावर लेप लावण्याने शरीराचा दुर्गंध नाहीसा होतो.
अशा प्रकारे थोडे बाहेरून, थोडे आतून औषधोपचार करण्याने हळूहळू वजन कमी होताना दिसते.

आहार, आचरण, औषधानंतर येतात ते उपचार. अभ्यंग हा वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय होय. वातशामक व मेदनाशक द्रव्यांनी संस्कारित केलेले अभ्यंग सिद्ध तेलासारखे तेल संपूर्ण अंगभर जिरवणे व त्यानंतर औषधी वाफेच्या मदतीने स्वेदन करणे, हा उपचार आठवड्यातून 1-2 वेळा घेता येतो. संपूर्ण अंगाला अभ्यंग तर स्वतःचा स्वतःला रोज करता येण्याजोगा असतो. या प्रकारे अभ्यंग करण्याचा किंवा तज्ज्ञ परिचारकाकडून नीट शास्त्रशुद्ध अभ्यंग व स्वेदन घेण्याचा अजून एक फायदा म्हणजे, यामुळे वाढलेल्या वजनाच्या पाठोपाठ येणाऱ्या समस्यांना आळा बसू शकतो.

उद्वर्तन - उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ ।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान 


कफदोष कमी करून साठलेल्या मेदाला वितळविण्यासाठी उद्वर्तन उपचार उत्तम होय. उद्वर्तन म्हणजे विशिष्ट द्रव्यांचे बारीक चूर्ण संपूर्ण अंगाला ठराविक पद्धतीने चोळणे. अभ्यंगासारखा हासुद्धा एक मसाजच असतो, फक्‍त यात तेलाऐवजी बारीक चूर्ण वापरले जाते. घरच्या घरी स्नानाच्या आधी उटणे अंगाला लावतात, त्याप्रमाणे उद्वर्तनाचे कोरडे चूर्ण चोळता येते. मात्र तज्ज्ञ परिचारकाकाडून व्यवस्थित उद्वर्तन करून घेण्याचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होताना दिसतो.

शरीरशुद्धी - वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी. शरीरशुद्धी म्हणजे शरीरातील अनावश्‍यक गोष्टी अति प्रमाणात साठल्याने दोषरूप झालेले भाव शरीराबाहेर काढून टाकणे. लठ्ठपणामध्ये साठून राहिलेला "मेद' हा मुळात धातू असला तरी अतिप्रमाणात वाढला की दोषच म्हणावा लागतो. शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी केली असता असा दोषस्वरूप मेद कमी होऊ शकते. याबाबतचा अनुभव असा, की जेवढे वजन कमी होणे अपेक्षित आहे, ते सर्वच्या सर्व पंचकर्माच्या कालावधीत कमी होईलच असे नसते. उदा.- एखाद्या व्यक्‍तीचे वजन 20 किलो अधिक असले तर शास्त्रोक्‍त विरेचन, विशेष मेदनाशक तेलाचा बस्ती, अभ्यंग, उद्वर्तन, स्वेदन वगैरे उपचारांच्या साह्याने पंचकर्माच्या दरम्यान 6-8 किलो वजन कमी झाले तरी शरीरशुद्धीद्वारा एकदा आतील मेदसंचयाची प्रवृत्ती बदलली, आहार-आचरणामध्ये अनुकूल बदल केले, की पंचकर्मानंतरही क्रमाक्रमाने वजन कमी होताना दिसते. एकाएकी वजन कमी होण्याने शरीरावर होऊ शकणारे दुष्परिणाम यात होत नाहीत, शिवाय अशा प्रकारे हळू हळू उतरलेले वजन सहसा पुन्हा वाढतही नाही. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Friday, April 18, 2008

शरीरशुद्धी

शरीरशुद्धी
सौंदर्याला सर्वांत घातक काय? असा प्रश्‍न विचारला तर त्याचे उत्तर येईल "शरीरात साठणारी विषद्रव्ये'. आहाराद्वारे, पाण्याद्वारे, हवेद्वारे आपल्या शरीरात अनेक विषद्रव्ये प्रवेशित होत असतात. मल-मूत्र-घामामार्फत बरीचशी विषद्रव्ये शरीराबाहेर जात असली तरी हे काम रोजच्या रोज अगदी १०० टक्के होतेच असे नाही. परिणामत- हळू हळू शरीरात विषद्रव्ये साठत जातात. त्यातूनच मग रंग काळवंडणे, वजन वाढणे, निस्तेज होणे, उत्साह कमी होणे यासारखे त्रास जाणवू लागतात. अशा परिस्थितीत नुसत्या औषधांनी त्रास कमी करण्यापेक्षा मूळ कारण असणारी विषद्रव्ये शरीराबाहेर काढून टाकणे सर्वोत्तम असते. विशेषत- पंचकर्मातील विरेचन आणि बस्ती या दोन कर्मांद्वारे शरीरातील पित्त व वात दोषांचे संतुलन साधले गेले आणि विषद्रव्ये दूर झाली की सौंदर्यावरचे सावटही दूर होऊ शकते. त्रास होत नसला तरी वयाच्या पस्तिशी-चाळिशी दरम्यान एकदा शरीरशुद्धी करणे सौंदर्य तसेच आरोग्यासाठीही हितकर असते. अशा प्रकारची शरीरशुद्धी शास्त्रोक्‍त पद्धतीने व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे उत्तम असतेच. बरोबरीने घरच्या घरी पंधरा दिवसातून एकदा तीन-चार जुलाब होतील एवढ्या प्रमाणात प्रकृतीनुरूप जुलाबाचे औषध घेणेही उपयुक्‍त असते. यासाठी एरंडेल तेल, त्रिफळा, गंधर्वहरीतकी आदी औषधे घेता येतात.

पंचकर्म म्हणजे शरीरातील प्रत्येक पेशी शुद्ध होणे. आजकाल बहुतांशी वेळेला नुसता मसाज, स्वेदन, शिरोधारा वगैरे वरवरचे उपचार करण्याला "पंचकर्म' संबोधले जाते. परंतु, पंचकर्म म्हणजे शरीर आतूनही स्वच्छ करणे. जसे "संतुलन पंचकर्मा'मध्ये अंतर्स्नेहन, बह्रिस्नेहन, स्वेदन, विरेचन, बस्ती, नस्य वगैरे उपचारांचा समावेश असतो. यामुळे शरीरातील पेशी न्‌ पेशी शुद्ध होते, पुनर्जीवित होते, सतेज होते. याने सौंदर्य व आरोग्य दोन्हीचाही लाभ होतो. सर्वप्रथम अशी शरीरशुद्धी करून घेतली आणि नंतर आयुर्वेदिक पद्धतीने फेशियल, रक्‍तशुद्धिकर द्रव्यांची बस्ती वगैरे उपचार घेतले तर त्वचा नितळ, सतेज होणे सहज शक्‍य असते. नुसत्या मसाज, शिरोधारा यांनी असे परिणाम मिळत नाहीत.

पोट साफ ठेवणे तर सौंदर्यासाठी खूपच आवश्‍यक असते. खाल्लेल्या अन्नाचे सप्तधातूत व पर्यायाने शक्‍तीत रूपांतरण होण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्‍यक असते, जेणेकरून शरीराला सौष्ठवही येते.

शल्यचिकित्सेने शरीरात ताबडतोब बदल करून घेता येत असला तरी तसे न करता शरीराला तेल लावणे, जेणेकरून शरीरावर जमलेला मेद कमी होऊ शकतो, नितंब, वक्षस्थळ वगैरे ठिकाणी तेल लावून त्यांचे सौष्ठव टिकविता येते, असे आयुर्वेदाने सांगितले आहे. या व अशा तत्सम आयुर्वेदिक उपचारांनी नुसतेच सौंदर्य वाढते असे नाही तर शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन राहून सर्वांगीण मदत मिळते.

आहार व आचरण
योग्य आहार आरोग्यासोबत सौंदर्यासाठीही आवश्‍यक असतो. सौंदर्यासाठी वात-पित्तदोष नियंत्रित रहायला हवेत आणि शरीरपोषक कफदोषाचे पोषण व्हायला हवे. त्यासाठी आहारात दूध, साजूक तूप, यासारखी शरीरपोषक स्निग्ध द्वव्ये; मनुका, अंजीर, डाळिंबासारखी रस- रक्‍तधातुपोषक फळे; खारीक, डिंकाचे लाडू, खसखस आदी अस्थिधातुपोषक पदार्थ यांचा समावेश असावा. केशर, हळद, मध, साळीच्या लाह्या, खडीसाखर रक्‍तशुद्धिकर व शरीरपोषक असल्याने सौंदर्यासाठी उत्तम. असे सौंदर्याला हितकर पदार्थ आहारात असायला हवेत तसेच त्वचेला, केसांना बिघडवू शकणारे, बांधा बेडौल करू शकणारे पदार्थ टाळायलाही हवेत. उदा. तिळाचे, मोहरीचे तेल खाणे टाळावे. चिंच, मिरची, टोमॅटो, आंबट दही, अननस यांचा अतिरेक टाळावा. दूध व फळे एकत्र करू घेऊ नयेत. मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे. रासायनिक खते, फवारे यांवर जोपासलेल्या भाज्या-फळे टाळाव्यात. दीर्घकाळ टिकण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केलेले, प्रिझर्वेव्हिज्‌ घातलेले अन्न टाळावे. प्रक्रिया करून डब्यात भरून ठेवलेले फळांचे रस, शीतपेये, फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे टाळावे.

वेळेवर पुरेशी झोप घेणे, नियमित वेळेला जेवणे, केस-डोळे-त्वचा यांना तीव्र ऊन फार वेळ लागू न देणे, दुपारी न झोपणे, मल-मूत्रादि नैसर्गिक वेग बळेच धरून न ठेवणे आरोग्यासोबत सौंदर्यासाठीही हितकर असते.

व्यायाम व योग
सौंदर्यासाठी तेज हवे आणि तेजासाठी प्राणशक्‍तीचे संचरण व्हायला हवे. मन जेवढे शांत व प्रसन्न तेवढे सौंदर्याला पूरक. रागाने नैराश्‍याने किंवा शोकाने मन ग्रासले की तेज आणि पर्यायाने सौंदर्य कमी होते. प्रसन्न मन आणि प्राण संचरण हे दोन्ही साध्य होण्यासाठी नियमित योग-व्यायाम महत्त्वाचा होय. नियमित चालणे, जॉगिंग, पोहणे आदी व्यायाम सर्वांनाच अनुकूल असतात. बरोबरीने सूर्यनमस्कार, शीतली क्रिया, अनुलोम-विलोम, प्राणायाम, समर्पण-स्थैर्य आदी संतुलन क्रियाही परिणामकारी ठरतात.

थोडक्‍यात सौंदर्य व आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, जीवन सर्वार्थाने जगण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्या अत्यावश्‍यक असतात. पंचक्रियांच्या साहाय्याने सौंदर्य टिकविण्याचा व वाढविण्याचा प्रयत्न केला तर याचा अनुभव निश्‍चितच घेता येईल.

- डॉ. श्री बालाजी तांबे.

ad