Showing posts with label गुडघेदुखी. Show all posts
Showing posts with label गुडघेदुखी. Show all posts

Saturday, December 10, 2011

थंडीतील उपचार - मसाज 1


डॉ. श्री बालाजी तांबे
निरोगी शरीराला उचित स्निग्धता अत्यावश्‍यक असते. म्हणूनच आयुर्वेदाने अभ्यंगाच्या माध्यमातून "बाह्यस्नेहन' रोजच्या दिनक्रमात अंतर्भूत केले आहे. अभ्यंग हिवाळ्यात तर करायचा असतोच, पण संपूर्ण वर्षभर अधूनमधून अभ्यंग करणे प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी उत्तम असते.

थंडी पडली, की वातावरणात कोरडेपणा वाढतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही. शरीराला आतून-बाहेरून स्निग्धतेची आवश्‍यकता भासू लागते. याला आयुर्वेदात "स्नेहन' असे नाव दिलेले आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही यंत्राला वंगणाची आवश्‍यकता असते, साध्या वाहनातही नुसते इंधन घालणे पुरत नाही, त्याप्रमाणे निरोगी शरीराला उचित स्निग्धता अत्यावश्‍यक असते. म्हणूनच आयुर्वेदाने अभ्यंगाच्या माध्यमातून "बाह्यस्नेहन' रोजच्या दिनक्रमात अंतर्भूत केले आहे. अभ्यंग हिवाळ्यात तर करायचा असतोच, पण संपूर्ण वर्षभर अधून मधून अभ्यंग करणे प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी उत्तम असते.

अभ्यंग शब्दातील "अंग' हे क्रियापद गती या अर्थाने आलेले आहे. जेथे जेथे गती असते तेथे उष्णता व ऊब तयार होतेच उदा. थंडीच्या दिवसांत एका ठिकाणी बसले किंवा उभे पाहिले की वाजणारी थंडी चालले, पळले की अजिबात वाजेनाशी होते. त्याचप्रमाणे संपूर्ण शरीरात ज्या क्रियेमुळे गतीमानता येते, अशा अभ्यंगाने शरीराला ऊब मिळणे सहज शक्‍य असते.

अभ्यंगातून ऊब
ऊब ही रक्‍ताभिसरणावरही अवलंबून असते. फार वेळ एका ठिकाणी बसल्यावर पायाला मुंग्या येतात. अशा वेळी पाय थंड पडतो, याचा सगळ्यांना अनुभव असेल. पाय हलवला आणि रक्‍ताभिसरण पूर्ववत सुरू झाले की पायाचे तापमान पुन्हा पूर्वीसारखे होते. अभ्यंगामुळे रक्‍ताभिसरणाला मदत मिळत असल्याने अभ्यंग शरीराला ऊब देण्यास उत्तम असतो. शरीरातील ऊब कमी झाली की हालचालींवरही मर्यादा येतात. आईस्क्रीम खाल्ल्यामुळे जीभ गारठली की बोलता येत नाही, हात गारठले की बोटे जखडल्यासारखी वाटतात, याचाही सर्वांना अनुभव असेल. म्हणूनच सर्व हालचाली व्यवस्थित व्हाव्यात, हालचालींमधला सहजपण, चपळपणा कायम राहावा, यासाठीही अभ्यंग, अभ्यंगातून मिळणारी ऊब आवश्‍यक असते.

अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणे. हे तेल वातशामक, सुगंधी द्रव्यांनी संस्कारित असावे, असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे.

यथा जातान्न पानेभ्यो मारुतघ्नैः सुगन्धिभिः ।
अथर्तु सस्पर्श सुखैस्तैलैः अभ्यंगमाचरेत्‌ ।। ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान

वातशामक, सुगंधी द्रव्यांनी संस्कारित असे ऋतूला व प्रकृतीला अनुकूल तेल, जे स्पर्श केले असता सुखकर असते, अभ्यंगासाठी वापरावे. क्वचित काही ठिकाणी औषधांनी संस्कारित तूप किंवा वसा (मांसातील स्निग्ध पदार्थ) वापरण्यासही सांगितले आहे. मात्र सहसा तिळाचे तेल अभ्यंगासाठी उत्तम समजले जाते.

रोज करायचा अभ्यंग स्वतः स्वतःला करायचा असतो. मात्र प्रशिक्षित परिचारकाकडून (ट्रेंड थेरपिस्ट) अभ्यंग करून घेण्याचे फायदे वेगळे असतात. विशेषतः पंचकर्म करताना बाह्यस्नेहन म्हणून करायचा अभ्यंग किंवा वातविकारात उपचार म्हणून घ्यायचा अभ्यंग किंवा अति प्रवास, अति दगदग, अति मानसिक ताण यांचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून घ्यायचा अभ्यंग हा मसाजिस्ट - थेरपिस्टकडून करून घेणे अधिक गुणकारी असते.

पेशीच्या ठेवणीनुसार मसाज
मसाज करणाऱ्याला मानवी शरीराचे रचनात्मक व क्रियात्मक ज्ञान असणे आवश्‍यक असते. विविध मांसपेशी, त्यांचा उगम, विस्तार, दिशा यांची सविस्तर माहिती असावी लागते. सांध्यांच्या ठिकाणी असणारी दोन किंवा अधिक हाडांची रचना, सांध्यांना पकडून ठेवणाऱ्या स्नायूंची रचना, रक्‍तवाहिन्या, मज्जातंतूंचे स्थान, विविध मर्मे वगैरे अनेक गोष्टी मसाज करण्यापूर्वी माहीत असाव्या लागतात.

मसाजचे परिणाम सर्व शरीरात होत असले तरी मसाज केला जातो तो वरच्यावरच. त्वचेच्या आश्रयाने राहणारे भ्राजक पित्त तेलाचा स्वीकार करून त्याचे पचन करून ते सर्व शरीरपोषणासाठी शोषून घेते. अर्थात यासाठी वापरले जाणारे तेलही उत्तम प्रतीचे, औषधांनी सिद्ध केलेले व अग्नीचा यथायोग्य संस्कार झाल्याने "सूक्ष्म' अर्थात लहानात लहान पोकळीतही पोचण्याचे सामर्थ्य असणारे असावे लागते. नुसतेच अर्क किंवा सुगंध घातलेले तेल किंवा कमी दर्जाचे तेल, कच्चे तीळ तेल वा खोबरेल तेल वापरून कितीही चांगला मसाज केला तरी त्याने तेलाचे आतपर्यंत जिरण्याचे व त्यायोगे धातुपोषणाचे कार्य होऊ शकत नाही.

मसाज करताना प्रत्येक पेशीचा आकार ध्यानात घ्यावा लागतो. नाजूक पेशीच्या ठिकाणी मसाजही नाजूकपणेच करावा लागतो, तर बळकट पेशीला मसाज करताना बळ पणाला लावावे लागते. तसेच पेशीचा आकार, तिची दिशा, लांबी यावरून त्या ठिकाणी कसा मसाज करायचा ते ठरवले जाते. पेशीच्या नैसर्गिक ठेवणीनुसार मसाज केल्यास तो सुखावहही ठरतो व उपयोगीही असतो; अन्यथा त्याने पीडा कमी होण्याऐवजी वाढूही शकते.

'मर्मा'वर बोट
मसाजचा विचार करताना "मर्म' हाही विचारात घेण्याजोगा महत्त्वाचा मुद्दा होय. प्राणशक्‍तीचे अस्तित्व सर्व शरीरात असले तरी काही विशिष्ट ठिकाणी ती अधिक प्रमाणात एकवटलेली असते. आयुर्वेदात या विशिष्ट ठिकाणांना "मर्म' ही संज्ञा दिली आहे. मर्माच्या ठिकाणी शरीरातील शिरा, स्नायू, संधी, अस्थी, मांस यांपैकी एकाहून अधिक घटक एकत्र आलेले असतात व त्यामुळे मसाज करताना त्याच्या ठिकाणी किती प्रमाणात दाब द्यावा, किती वेळ दाब द्यावा, या गोष्टीचा विचार करावा लागतो.

मसाजचे सार्वदैहिक मसाज आणि स्थानिक मसाज असे दोन प्रकार संभवतात. वातशमनासाठी आणि शरीरशक्‍ती वाढून स्वास्थ्य टिकवण्यासाठी केला जाणारा मसाज सर्व शरीरभर केला जातो; मात्र पाठ दुखत असल्यास नुसत्या पाठीला किंवा पायाला सुन्नपणा आला असल्यास फक्‍त पायांना असा स्थानिक मसाजही केला जातो.

संपूर्ण शरीराचा मसाज होण्यासाठी साधारणतः एक तास लागू शकतो. मसाज झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तास विश्रांती घ्यावी, वाऱ्याचा झोत अंगावर येणार नाही याची काळजी घ्यावी. वाहनातून जायचे झाल्यास कानाला स्कार्फ बांधावा. थंडीच्या दिवसांत पायात मोजे घालावेत. अशा प्रकारे अभ्यंग, मसाजसाठी रोजच्या व्यापातून थोडा वेळ काढला, तर त्यामुळे जीवन उबदार व्हायला आणि जीवनाचा आनंद द्विगुणित व्हायला निश्‍चित हातभार लागेल.

मसाज करण्याचा सर्वसाधारण क्रम
- मसाज करताना सर्वप्रथम तेलाचे दोन थेंब टाळूवर हलक्‍या हाताने चोळावेत, तसेच कानांमध्ये व नाभीवर दोन-तीन थेंब टाकावेत. मसाज करताना नेहमी पायापासून सुरवात करावी. प्रथम पायाच्या तळव्यांवर तेल जिरवावे. मसाज करताना पायाच्या तळव्यापासून सुरवात करावी. घोटा, गुडघा या ठिकाणी गोलाकार मसाज करावा. पोटरी, मांडीला सोसवेल त्याप्रमाणे दाब देऊन मोकळे करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर दुसरा पाय करावा.

- यानंतर हाताच्या तळव्यापासून सुरवात करावी, मनगट व कोपरावर वर्तुळाकार तर बाकी दंडाला वगैरे अंगठा व चार बोटे यांच्या साहाय्याने दाब सोसवेल अशा पद्धतीने मसाज करावा.
- पोटावर मसाज करताना मोठ्या आतड्याची रचना व गती ध्यानात घ्यावी लागते. फार दाब न देता वर्तुळाकार गतीने मसाज केल्यास आतड्यातील वायूला स्वाभाविक गती मिळते व सरून जायला मदत होते.
- कूस व छातीवरती हलक्‍या हाताने मसाज करावा. छातीवर दोन्ही हातांनी छातीच्या हाडापासून ते खांद्यापर्यंत मसाज करावा.
- नितंब, अंसफलक (scapula) यांठिकाणी मांसपेशी व हाडाच्या आकारानुरूप गोलाकार मसाज करावा. कंबर व संपूर्ण पाठीलाही खालून वरपर्यंत सरळ रेषेत मागे पाहिल्याप्रमाणे वाहक, कंपन वगैरे पद्धतीने मसाज करावा. मानेवर मात्र दाब न देता हलक्‍या हाताने तरंग पद्धतीने वर जावे. पाठ व मानेला जोडणाऱ्या मांसपेशी त्रिकोणाकार असल्याने त्यांच्यावर मसाज करताना त्यांचा विशिष्ट आकार ध्यानात घ्यावा लागतो. चेहऱ्यावरही मसाज अत्यंत हलक्‍या हाताने करावा व त्याची दिशा जबड्यापासून ते कानशिलापर्यंत ठेवावी.
- मसाज करताना वापरावयाचे तेल किंचित गरम करून वापरावे. याने वात शमन व्हायला अधिक मदत मिळते, तसेच तेलाचे शोषणही अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.
- मसाज घेताना पोट रिकामे असू नये, तसेच जेवल्याजेवल्याही मसाज घेऊ नये.
- मसाज करायची जागा हवेशीर असावी; मात्र प्रत्यक्ष हवेचा झोत अथवा वारा येणार नाही याची काळजी घ्यावी. खोलीत पुरेसा उजेड असावा.
- मसाज घेताना शयनस्थिती सर्वांत उत्तम होय. पालथे झोपलेल्या स्थितीत पाठीचा कणा, मान, नितंब, यावर मसाज केला जातो, तर पाठीवर झोपलेल्या स्थितीत हात, पाय, पोट, छाती व चेहऱ्यावर मसाज केला जातो. एखाद्या व्यक्‍तीला झोपणे, विशेषतः पालथे झोपणे शक्‍य नसेल, तर मात्र मसाज बसूनही करता येतो.

उबदार अभ्यंग -2


डॉ. श्री बालाजी तांबे
आपल्याला ऊब ही हवीच असते. उबेचे महत्त्व समजल्यामुळे मनुष्य दोन पायांवर उभा राहिला व त्याने आपला मेरुदंड पृथ्वीच्या काटकोनात आणून ठेवला. उठून बसल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते, रक्‍तप्रवाह मेंदूकडे जाऊ लागतो व त्यातूनच ध्यानासाठी, योगासने करण्यासाठी, शरीरस्वास्थ्य, आत्म्याचे स्वास्थ्य, आत्म्याचे कल्याण ह्यासाठी पद्मासनात ताठ बसावे हा शोध लागला. मात्र, थंडीच्या दिवसात उबदार रजई पांघरून घेऊन झोपणे कल्याणकारक असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्तम तेलाचा अभ्यंग हा खरा थंडीवरचा उपचार.
उबेचे माहात्म्य आपण सर्वांनी जाणून घेतलेले आहे व त्यामुळे लहान मुले आईच्या कुशीत येऊन का झोपतात ह्याचा बरोबर उलगडा होऊ शकतो. शरीरात पायापर्यंत रक्‍तप्रवाह पोचला नाही, काही कारणांनी पायामध्ये पाणी राहून पाय जड झाला, थंड पडला किंवा डोक्‍याला वारा लागल्यामुळे डोके थंड झाले, तर चोळल्याने म्हणजे घर्षणाने ऊब मिळते. छाती व छातीच्या आसपासचा भाग नेहमी गरम राहतो, कारण हृदय सतत धडकत असते. त्याचे आकुंचन-प्रसरण सतत चालू असल्यामुळे मिठी मारताना, कुशीत येताना छातीजवळ डोके वा शरीर येण्याने ऊब चांगली मिळते, हा सर्वांच्याच अनुभवाचा विषय असतो.

एक गोष्ट नक्की, की आपल्याला ऊब ही हवीच असते. परंतु अति ऊब वा अति अग्नी त्रासदायक ठरू शकतो. पृथ्वीचे तापमान वाढते आहे व त्यामुळे वातावरणात बदल होत आहेत. वृक्ष, वनराई, नद्या, पर्वत, बर्फाच्छादित शिखरे यात होणाऱ्या बदलांमुळे पृथ्वीवर अनर्थ ओढवेल की काय, अशी शंकेची पाल मनात चुकचुकलेली आहे. योग्य प्रमाणात अग्नी म्हणजे ऊब. शरीर गरम झाले, की तापावर औषध द्यावे लागते. ज्याचे शरीर जास्त प्रमाणात उष्ण राहते, त्याला थकवा लवकर येतो, अर्थात त्या प्रमाणात त्याचे आयुष्यही कमी होते.

तेव्हा एका बाजूने उष्णता-ऊब आवश्‍यक असते, तर दुसऱ्या बाजूने अति उष्णता कामाची नसते. थंडी वाजल्यावर एखादा मनुष्य थोडे चालून आला किंवा जागच्या जागी पळाला, तर त्याला बरे वाटते. परंतु तो खूप पळाला, तर दमून जाणे, पाय दुखणे वगैरे त्रास होऊ शकतात. मनुष्येतर प्राणिमात्रांचा मेरुदंड जमिनीला समांतर असतो, परंतु उबेचे महत्त्व समजल्यामुळे मनुष्य दोन पायांवर उभा राहिला व त्याने आपला मेरुदंड पृथ्वीच्या काटकोनात आणून ठेवला. हे गणित लक्षात घेतले तर उठून बसले, की थंडी कमी का होते हे लक्षात येईल. पळाल्यानंतर थंडी खूप कमी होईल हे वेगळे, पण उठून बसल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते, रक्‍तप्रवाह मेंदूकडे जाऊ लागतो व त्यातूनच ध्यानासाठी, योगासने करण्यासाठी, शरीरस्वास्थ्य, आत्म्याचे स्वास्थ्य, आत्म्याचे कल्याण ह्यासाठी पद्मासनात ताठ बसावे हा शोध लागला. बरे वाटावे, उत्साह यावा यासाठी बसणे किंवा उभे राहणे आवश्‍यक असते. तसेच 24 तासातील निदान सहा - सात तास आडवे राहिले नाही, तर मनुष्य उष्णतेमुळे थकून जातो. म्हणून थंडी वाजते आहे ह्या कारणासाठी झोपायचेच नाही असे ठरवून चालत नाही.

थंडीच्या दिवसात, मग ती गुलाबी थंडी असो, कडकडीत थंडी असो,छान पैकी उबदार रजई पांघरून घेऊन झोपणे कल्याणकारक असते.
जमिनीवर मांडी घालून ताठ बसणे किंवा ऊबदार रजई घेऊन झोपणे हा झाला तात्पुरता इलाज. परंतु थंडीपासून खरे संरक्षण केवळ कुडकुडणे थांबवून मिळू शकत नाही. उत्तम तेलाचा अभ्यंग हा खरा थंडीवरचा उपचार. आपण दीपावलीच्या वेळी अंगाला तेल-उटणे लावून ओवाळतो, ते येणाऱ्या थंडीत अभ्यंग आवश्‍यक करावा लागेल हे लक्षात ठेवण्यासाठी. अभ्यंग करत असताना खोलीत खूप थंड वातावरण नसावे. अभ्यंगाच्या वेळी बाहेर खूप थंडी असेल तर खोलीत शेगडी पेटवून ठेवावी

Friday, December 9, 2011

उबदार अभ्यंग -1


डॉ. श्री बालाजी तांबे
केव्हातरी थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता येते.

थंडीच्या दिवसांत असते थंडगार वातावरण, थंडगार हवा, थंडगार पाणी, थंडगार स्पर्श. थंडी म्हणजे गोठणे. गोठणे याचा अर्थ इतरांपासून वेगळे पडणे. सर्व जगात पूजा होते अग्नीची. कारण तो सर्वांना आकर्षित करतो, जवळ आणतो. या अग्नीचे आकर्षण एवढे असते, की शरीरातूनसुद्धा पाहिली जाते ऊब. हालचाल करत नसलेल्या माणसाच्या कपाळाला स्पर्श करून पाहतात, की तो आहे की गेला. म्हणजेच त्याच्या शरीरात ऊब आहे की तो थंड पडला, हे पाहिले जाते. त्याच्या स्पर्शावरून कळते, की जीवन प्रवाहित आहे की नाही. जीवनप्रवाहातून वेगळेपणा कोणालाच आवडत नाही. जीवनप्रवाहात राहणे व जीवनाची ऊब मिळविणे, त्याचा आनंद घेणे प्रत्येकालाच आवडते.

अशा या थंडीमध्ये, एकसंध असलेली शरीराची त्वचा किंवा स्नायू गोठायला म्हणजे आखडायला सुरवात होते. त्वचेचा काही भाग गोठला, आखडला की इतर भागापासून सुटा पडतो, म्हणजेच शरीरावर भेगा पडायला सुरवात होते, शरीर तडतडायला लागते आणि कंड सुटायला लागते.

हे सर्व टाळण्यासाठी औषध एकच असते व ते म्हणजे ऊब. आपल्याला ऊब अनेक प्रकारे मिळते. ऊब मिळवायचा सोप्यात सोपा मार्ग म्हणजे शरीर चोळणे, घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे, मसाज करणे. त्यानंतर ऊब मिळविण्यासाठी करावी लागते धावपळ, म्हणजेच व्यायाम. तसेच ऊब मिळविण्यासाठी योग्य आहाराची योजना करणे आवश्‍यक असते. तसे पाहता थंडीच्या दिवसांत बाहेर सूर्यप्रकाशात, त्याच्या उबेत बसण्याएवढे आनंददायक दुसरे काही नाही. म्हणून सूर्यध्यान, खास ऊब देणाऱ्या पदार्थांचे सेवन अशा गोष्टींपासून ऊब मिळविणे आवश्‍यक असते. त्यानंतरही समाधान झाले नाही तर शेकोटी पेटवून बसणे, होळीसारखे उत्सव साजरे करणे, अशा प्रकारच्या योजना करून मनुष्य ऊब मिळविण्याच्या मागे लागतो. अर्थात थंडीच्या दिवसांत उबदार कपडे घालून संरक्षण करता येते.

थंडी हा ऋतू चांगला असतो. त्यामुळेच आपण पाहतो, की थंड प्रदेशांतील लोक भरपूर अन्न खातात, पेये पितात, मेहनत करतात, ते उंचेपुरे, गोरेगोमटे असतात. पण तेथली थंडी सहन करण्यासाठी ऊब आवश्‍यक असतेच. तेथे घरे गरम करण्याची व्यवस्था असते, गरम कपडे वापरावे लागतात.

भारतासारख्या प्रदेशात एकमेकाला भेटल्यानंतर दुरूनच नमस्कार करून मिळालेली ऊब पुरेशी ठरते, पण थंड प्रदेशांत गेले तर हाताला हात मिळवून उबेचे आदान-प्रदान व्हावे लागते आणि एवढ्याने समाधान झाले नाही तर कडकडून मिठी मारावी लागते.

शरीराच्या एखाद्या भागाला, पायाच्या बोटाला रक्‍ताभिसरण कमी झाले, तेवढा भाग रक्‍तसंचारापासून वंचित झाला तर तेवढा भाग थंड पडून बधिर होण्याची, तेथे मुंग्या येण्याची शक्‍यता असते. असे झाल्यास नखावर खाजवले असता पुन्हा तेथील रक्‍ताभिसरण वाढून ऊब निर्माण होते व त्रास जातो. हात गार पडून लिहिता येत नाही, काम होत नाही, अशा वेळी दोन हात एकमेकांवर घासण्याची क्रिया साहजिकच घडते. थोडी अधिक माहिती असणारा मनुष्य पुढून-मागून सर्व दिशांनी हात घासतोच व बरोबरीने बोटे एकमेकांत अडकवून, दाबून धरून ओढायचा प्रयत्न करतो, म्हणजे बोटांच्या कडांचे, दोन बोटांच्या मध्ये असलेल्या जागेचे घर्षण होते आणि उबेचा उत्साह येतो. पाठीवर थाप मारायची, हाही एक ऊब देण्याचाच प्रकार.

हे सर्व लक्षात घेतले तर ऊब देणे, रक्‍ताचा संचार वाढवणे, थंडीमुळे किंवा इतर कारणामुळे अवघड जागी साकळलेले रक्‍त किंवा अडकलेला रक्‍तप्रवाह दूर करण्यासाठी त्या ठिकाणी घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे- मसाज देणे अभिप्रेत असते. परंतु शरीराचे दोन भाग एकमेकांवर घासताना ते जर कोरडे असतील तर त्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या उष्णतेमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. शिवाय मुख्य म्हणजे स्नेहन, मैत्री, आपुलकी शरीराशी व्हावी लागते, त्यासाठी तेलाने किंवा तत्सम पदार्थाने मसाज करणे अभिप्रेत असते. नुसते वास दिलेले तेल असेल तर त्याचा उपयोग होत नाही. उलट अशा असंस्कारित तेलाच्या वापरामुळे त्वचेवरची रंध्रे बंद होतात. असे तेल वापरून मसाज घेताना वाटलेले सुख नंतर महागात पडते.

म्हणून आयुर्वेदाने अभ्यंगासाठी वेगवेगळ्या प्रकारची अनेक तेले सुचविलेली आहेत. ही तेले बनविताना वेगवेगळ्या वनस्पती, दूध, दही, ताक, निवळी अशी अनेक द्रव्ये वापरलेली असतात, अगदी केशर, कापरासारखी द्रव्येही वापरलेली असतात. अशा तेलाने योग्य मसाज केला तर नुसती तात्पुरती ऊब न येता शरीरात टिकून राहणारी व शरीराला फायदा करणारी ऊब तयार होते. तेव्हा थंडीच्या दिवसांत प्रत्येकाने खास मसाजसाठी तयार केलेले अप्रतिम अभ्यंग तेल घेऊन स्वतःच शरीरावर चोळून व्यवस्थित मसाज करावा. जमेल त्यांनी उपचार केंद्रात जाऊन प्रशिक्षित परिचारकाकडून मसाज करून घ्यावा.

केव्हातरी थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता येते.                        

Monday, October 24, 2011

वातव्याधीचे निदान - 2


डॉ. श्री बालाजी तांबे
संपूर्ण शरीराला व्यापून असणारा वातदोष शरीरातील प्रत्येक हालचालीचा प्रेरक असतो. वातदोष बिघडला तर शरीरात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी लक्षणे उत्पन्न करू शकतो.

वातदोष शरीरातील प्रत्येक हालचालीचा प्रेरक असतो. अर्थातच, संपूर्ण शरीराला तो व्यापून असतो. जोपर्यंत तो संतुलित असतो, तोपर्यंत आपली कामे व्यवस्थित करत असतो. मात्र, वातदोष बिघडला तर शरीरात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी लक्षणे उत्पन्न करू शकतो. उदा. कोठ्यामध्ये वात बिघडला तर त्यामुळे पुढील त्रास होतात -

- मल-मूत्रप्रवृत्ती होत नाही.
- हृदयरोग होतो.
- पोटात वाताचा गोळा अनुभूत होतो.
- बरगड्या दुखतात.
- मूळव्याधीचा त्रास होतो.

संपूर्ण शरीरात वात प्रकुपित झाला तर, त्यामुळे....
- शरीरात कुठेही फडफडल्यासारखे, स्फुरण पावल्यासारखे अनुभूत होते.
- संपूर्ण शरीरातील हाडे असह्य दुखतात.
- सर्व सांधे दुखतात.

गुदभागी वात बिघडला, तर.....
- मलमूत्रप्रवृत्ती अजिबात होत नाही किंवा व्यवस्थित होत नाही.
- पोटात दुखते, गॅसेस होतात.
- पाय, मांड्या, कंबर, पाठ या ठिकाणी वेदना होतात.
- हे अवयव सुकतात, बारीक होतात.
- मूतखड्याचा त्रास होतो.

आमाशयाच्या (खाल्लेले अन्न सर्वप्रथम साठते तो अवयव) ठिकाणी वात वाढला, तर....
- पोट, बरगड्या, हृदय, नाभीच्या भोवती वेदना होतात.
- खूप तहान लागते, घसा कोरडा पडतो.
- ढेकर येत राहतात.
- खोकला येतो, श्‍वासाची गती वाढते.

कान, नाक, डोळे वगैरे इंद्रियांच्या ठिकाणी वात वाढला तर त्यांची कार्यक्षमता कमी होते किंवा नष्ट होते.
उदा. श्रवणदोष तयार होतो, नाकाने वास येत नाही, डोळ्यांना दिसत नाही.

त्वचेच्या ठिकाणी किंवा रसधातूमध्ये वात बिघडला, तर....
- त्वचा कोरडी होते, फुटते.
- त्वचा निस्तेज होते, काळवंडते, ताणली जाते व पातळ-दुर्बल होते.
- बोटांचे छोटे-छोटे सांधे दुखू लागतात.
- रक्‍तधातूच्या ठिकाणी वाताचा प्रकोप झाला, तर...
- संपूर्ण शरीरात वेदना होतात.
- सर्वांगात दाह होतो.
- शरीराचा वर्ण बिघडतो.
- वजन कमी होते, खावेसे वाटत नाही.
- अनुत्साह प्रतीत होतो.
- शरीरावर पुरळ, फोड वगैरे येतात.

मांस व मेदाच्या ठिकाणी वातदोष वाढला, तर....
- संपूर्ण शरीराला जडपणा येतो, सुया टोचल्यासारखे वाटते.
- खूप थकवा जाणवतो, मार लागल्यावर शरीर ठणकावे त्याप्रमाणे वेदना होतात.

अस्थी व मज्जाधातूच्या ठिकाणी वात वाढला, तर....
- हाडांमध्ये तुटल्याप्रमाणे वेदना होतात.
- लहानमोठे सर्व सांधे फार दुखतात.
- ताकद कमी होते.
- मनुष्य अशक्‍त, बारीक होतो.

शुक्रधातूच्या ठिकाणी वात प्रकुपित झाला, तर -
- वीर्यस्खलन होत राहते किंवा अजिबात होत नाही.
- सहसा गर्भधारणा होत नाही, मात्र झाली तरी गर्भस्राव, गर्भपात होतो किंवा गर्भात विकृती येते.

शिरांमध्ये, रक्‍तवाहिन्यांमध्ये वात वाढला, तर.....
- शिरा संकोच पावतात किंवा शिरांच्या भिंतीतील स्थितिस्थापकत्व कमी होऊन शिरा विस्तारतात, शिथिल होतात.

सांध्यांमध्ये वात प्रकुपित झाला, तर.....
- संधिबंध शिथिल होतात.
- सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही.
- सांध्यांवर सूज येते व तीव्र वेदना होतात.

पुढच्या वेळी आपण अजून वातव्याधींचे प्रकार पाहणार आहोत.                        

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

वातव्याधीचे निदान -1


डॉ. श्री बालाजी तांबे
वात शरीराचे आरोग्य सांभाळत असतो. वातदोषाच्या असंतुलनाने वातव्याधी होतात. वातदोष कोणत्या कारणाने आणि कोणत्या स्थानी उद्‌भवतो, यावर त्याची लक्षणे व रोग ठरतात.

वातदोषाच्या असंतुलनामुळे होणारे व्याधी म्हणजे वातव्याधी. वातव्याधीचे अनेक प्रकार असतात, मात्र या सर्वांचे मूळ कारण बिघडलेल्या वातात असते.

वातव्याधीची कारणे
- कोरड्या आणि थंड पदार्थांचे अतिसेवन करणे.
- फार कमी खाणे.
- मैथुन अतिप्रमाणात करणे.
- रात्री जागरणे करणे.
- नियमांचे पालन न करता अशास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्मादी उपचार करणे.
- कोणत्याही कारणाने शरीरातून अतिप्रमाणात रक्‍तस्राव होणे.
- उड्या, पोहणे, व्यायाम वगैरेंचा अतियोग होणे.
- वेड्यावाकड्या किंवा अति प्रमाणात हालचाली करणे.
- रसादी सप्तधातूंपैकी कोणताही एक किंवा अधिक धातू क्षीण होणे.
- अतिप्रमाणात चिंता वा शोक करणे.
- रोगामुळे वजन कमी होणे.
- मल-मूत्रादी नैसर्गिक वेग धरून ठेवणे.
- शरीरात आमदोष साठणे.
- मार लागणे.
- उपवास करणे.
- हृदय, मेंदू व बस्ती (किडनी व युरिनरी ब्लॅडर) या मर्मस्थानांमध्ये बिघाड होणे.
- हत्ती, घोडा, गाडी, विमान वगैरेंतून वेगाने प्रवास करणे.

या सर्व कारणांमुळे कुपित झालेला वातदोष शरीरातील स्रोतसांचा आश्रय घेतो आणि शरीरात एखाद्या ठिकाणी किंवा संपूर्ण शरीरात अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करतो.

वातव्याधी होण्यापूर्वी शरीरावर दिसणारी लक्षणे -
ज्या प्रकारचा वातव्याधी होणार असेल त्याचीच लक्षणे कमी प्रमाणात दिसू लागतात. उदा. कंपवात हा वातव्याधी होणार असला तर अगोदर लिहिताना हात कापणे, बारीकशी गोष्ट करताना हात थरथरणे अशी लक्षणे दिसू लागतात. ही वातरोगाची सूचक लक्षणे सुद्धा कमी-जास्ती होत राहतात. वाताची तीव्रता कमी झाली की शरीरात हलकेपणा येतो, मात्र वात वाढला तर पुन्हा पूर्वरूपे दिसू लागतात.

वातदोषाच्या असंतुलनामुळे अनेक रोग होऊ शकतात. या रोगांची माहिती आपण घेणार आहोतच, त्यापूर्वी वात-असंतुलनामुळे दिसणारी सामान्य लक्षणे काय असतात हे पाहू या.

संकोचः पर्वणां स्तम्भो भोऽस्थ्नां पर्वणामपि ।
रोमहर्षः प्रलापश्‍च पाणिपृष्ठशिरोग्रहः ।।
खाञ्ज......पुाल्यकुब्जत्वं शोथो।ऽऽनामनिदद्रता ।
गर्भशुक्ररजोनांशः स्पदनं गांत्रसुप्तता ।।
शिरोनासाक्षिजत्रूणां ग्रीवायाश्‍चापि हुण्डनम्‌ ।
स्तोदोऽर्तिराक्षेपो मुहुश्‍चायास एव च ।।...माधवनिदान


- हाता-पायाची बोटे आखडतात, हात बंद-उघड होऊ शकत नाहीत.
- हाडांमध्ये तीव्र वेदना होतात, बोटांमध्ये तीव्र वेदना होतात.
- अंगावर अकारण काटा येतो.
- अकारण बडबड केली जाते.
- पाय, पाठ व डोके आखडते.
- पाठीला कुबड येते.
- मनुष्य चालण्यास असमर्थ होतो.
- अंगावर सूज येते.
- झोप कमी येते.
- गर्भधारणा होण्यास त्रास होतो किंवा झालेली गर्भधारणा टिकत नाही.
- पुरुषांमध्ये पुनरुत्पादनाची शक्‍ती कमी होते.
- स्त्रीमध्ये रजःप्रवृत्ती कमी किंवा अकाली थांबते.
- संपूर्ण शरीरात किंवा शरीराच्या एका भागात कंप होऊ लागतो, तसेच बधिरपणा येतो.
- मान ताठ राहत नाही, डोक्‍यात तीव्र वेदना होतात.
- गंधज्ञानाची क्षमता कमी वा नष्ट होते.
- डोळे बारीक होतात, छाती-मानेतही जखडल्यासारखे वाटते.
- सर्व अंगात वेदना होतात, अस्वस्थता प्रतीत होते.

वातदोषाचे वैशिष्ट्य असे, की तो कारणानुसार आणि स्थानानुसार अनेक लक्षणे, अनेक रोग उत्पन्न करू शकतो. उदा. वातदोष त्वचेच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर त्वचा कोरडी होऊन भेगा पडू शकतात. सांध्यांच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर सांधे आखडू शकतात, नसांच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर बधिरपणा येऊ शकतो वगैरे. याविषयीची अधिक माहिती आपण पुढच्या वेळी पाहणार आहोत.                        

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Sunday, October 18, 2009

गुडघेदुखी टाळण्यासाठी फिजिओथेरपी


आजकाल वाढत्या वयात गुडघेदुखीचे प्रमाण नक्कीच वाढत चालले आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांची गुडघेदुखी डोकेदुखी झाली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे वाढते वजन, वाढता आहार आणि बैठे काम!
जसे वय वाढत जाते तशी स्नायूंची नैसर्गिक क्षमता कमी होऊ लागते, तसेच अस्थिबंधने अधिक लुळी पडतात. त्यामुळे सांध्यांची झीज होऊ लागते. वाढत्या वजनाने व व्यायामाच्या अभावाने ही क्रिया लवकर आणि वेगाने सुरू होते. अर्थात या क्रियेचा वेग प्रत्येकात निराळा असतो व काही अंशी तो आपल्या कौटुंबिक इतिहासावरही अवलंबून आहे.
सहसा उतारवयात येणारी गुडघेदुखी अचानक उद्‌भवत नाही. हळूहळू ती वाढत जाते. म्हणूनच सुरवातीला तिच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्षच केले जाते. जेव्हा दुखणे आपल्या "हाताबाहेर' जाते तेव्हा आपण डॉक्‍टरांकडे "धावतो'. विविध उपचारपद्धती आपापल्या मतानुसार "ट्राय' करतो आणि दुखण्याबद्दलच्या संभ्रमाला सुरवात होते. कारण प्रत्येक शास्त्राचे वेगवेगळे नियम आणि विचारसरणी असते. त्यामुळे मोठ्या अडचणीत आपण पडतो. काही डॉक्‍टर पहिल्यांदा वजन कमी करायला सांगतात, तर काही "जास्त चालू नका' असा सल्ला देतात. आता चालले नाही तर वजन वाढते आणि चालले तर गुडघेदुखी...
यातून फिजिओने असा मार्ग काढतात - प्रथम गरजेनुसार फिजिओथेरपीची उपकरणे (उदा.- अल्ट्रासाउंड, डाएथर्मी/ आय.एफ.टी.ई.) वापरून दुखणे कमी केले जाते.
या दुखणे कमी असलेल्या काळाचा वापर व्यायाम सुरू करण्यासाठी केला जातो. ज्यांना दुखणे कमी प्रमाणात किंवा अधूनमधून आहे त्यांचे लगेच व्यायाम सुरू केले जातात. हे व्यायाम दोन प्रकारांत मोडतात. एक - मांडीचे स्नायू बळकट करण्यासाठी, दोन - गुडघ्याच्या बाजूचे सर्व स्नायू लवचिक करण्यासाठी. जेव्हा हे स्नायू बळकट, तसेच लवचिक असतात तेव्हा ते गुडघ्यावर येणारे शरीराचे वजन अंशतः स्वतः पेलू शकतात. त्यामुळे सांध्यांची झीज कमी होते. परिणामी दुखणेही. हे व्यायाम अतिशय हलक्‍या पद्धतीचे असतात. त्यामुळे त्यास वयाचे, तसेच कुठल्याही मेडिकल प्रॉब्लेमचे बंधन नाही.
व्यायामांची सुरवातीला ४-५ सीटिंग्ज घेणे फायद्याचे असते, जेणेकरून व्यायामातील बारकावे लक्षात येतात. नियमित व्यायाम सुरू केल्यानंतर तीन आठवड्यांत मांडीचे स्नायू बळकट होऊ लागतात. त्यानंतर चालणे सुरू केल्यास त्रास होत नाही. कारण बळकट झालेले स्नायू गुडघ्याला आधार देतात.
या पहिल्या तीन आठवड्यांच्या काळात सायकलिंग/ पोहणे इ. गुडघ्यांवर वजन न येणारे व्यायाम करण्यास काहीच हरकत नाही, तरी आपण आपल्या थेरपिस्टला विचारून सुरवात करावी. या काळात गुडघ्यांचे अर्गोनोमिक्‍स पाळणे गरजेचे आहे.
अर्गोनोमिक्‍स म्हणजे एखादी हालचाल कशी करावी किंवा करू नये, याचे नियम- जेणेकरून सांध्यांवर येणारा अतिरिक्त भार कमी होईल. जसे गुडघेदुखी टाळण्यासाठी ज्या स्थितीत गुडघा जास्त वाकलेला असतो ती स्थिती टाळावी, मांडी घालून बसू नये, उकिडवे बसू नये, शक्‍यतो कमोड वापरावा, जास्त वेळ उभे राहणे टाळावे, दोन्ही पायांवर समान वजन देऊन चालावे, खुर्चीवरून उठताना हातावर वजन देऊन उठावे, अतिरिक्त जिना चढणे-उतरणे टाळावे, इ.
एक-दोन महिन्यांत नियमित व्यायामाने व अर्गोनोमिक्‍सने आपल्याला नक्कीच चांगला बदल दिसतो, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या उपचार पद्धतीत कोणतेही दुष्परिणाम नाहीत! तेव्हा अशा रीतीने फिजिओने ही डोकेदुखी आपण पळवून लावू शकता.
- डॉ. सुप्रिया अंतरकर, पुणे

गुडघेदुखी

गुडघेदुखी

पर्यायी नांवं
वेदना – गुडघा

कारणे
शारीरिक कार्यांदरम्यान किंवा अनावश्यक ताणल्यामुळं, अतिवापर केल्यानं सामान्यतः गुडघेदुखी उत्पन्न होते. अतिलठ्ठपणामुळं गुडघ्याची समस्या वाढण्याचा धोका अधिक असतो. गुडघेदुखी पुढील कारणांनी देखील होतेः

* संधिशोथ
* गुडघ्यावर वारंवार दाब पडल्यामुळं होणारा दाह (जसे बराचवेळ गुडघ्यावर वाकणे, अतिवापर, किंवा जखम).
* जिन्यावरुन वर-खाली जाण्यामुळं गुडघ्यातील वेदना आणखी तीव्र होत जाणे
* फाटलेली कूर्चा किंवा संधिबंध
* ताण किंवा खेचले जाणे
* गुडघ्याची वाटी सरकणे
* संधिमधे दाह होणे
* गुडघ्याला जखम होणे
* कटीतील समस्या – गुडघ्यात जाणवणारी वेदना इथे होऊ शकते.

गुडघेदुखीला कारणीभूत ठरणा-या कमी सामान्य स्थितीमधे हाडात गाठ होण्याचा समावेश आहे.

घरगुती उपचार

गुडघेदुखीची अनेक कारणं, विशेषतः अतिवापर किंवा अति शारीरिक कार्य यांच्याशी संबंधित कारणांवर स्वतःहून केलेल्या निगेला चांगला प्रतिसाद मिळतोः

* विश्रांती घेणे आणि वेदना तीव्र करणारी कामं टाळणे, विशेषतः वजन पेलावी लागणारी कामं.
* बर्फाचा वापर करणे. प्रथम, तो दर तासाला 15 मिनिटापर्यंत लावावा. पहिल्या दिवसानंतर, दिवसातून किमान चारवेळा बर्फ लावावा.
* आपला गुडघा शक्य तितका उंचावर ठेवा म्हणजे सूज कमी करता येईल.
* वेदना आणि सूज यांच्यासाठी औषध घ्या.
* गुडघ्यांच्या खाली किंवा मधे उशी ठेवून झोपावे.

Saturday, October 17, 2009

गुडघेदुखी टाळण्यासाठी..


उतारवयात येणारी गुडघेदुखी अचानक उद्‌भवत नाही. हळूहळू ती वाढत जाते. गुडघ्याच्या स्थितीनुसार फिजिओथेरपीने मार्ग काढता येऊ शकतो. प्रथम गरजेनुसार फिजिओथेरपीची उपकरणे वापरून दुखणे कमी केले जाते.
आपल्यापैकी बऱ्याच जणांची गुडघेदुखी ही डोकेदुखी झाली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे वाढते वजन, वाढता आहार आणि बैठे काम! जसे वय वाढत जाते तशी स्नायूंची नैसर्गिक क्षमता कमी होऊ लागते, तसेच अस्थिबंधने अधिक लुळी पडतात, त्यामुळे सांध्यांची झीज होऊ लागते. वाढत्या वजनाने व व्यायामाच्या अभावाने ही क्रिया लवकर आणि वेगाने सुरू होते. अर्थात या क्रियेचा वेग प्रत्येकात निराळा असतो व काही अंशी तो आपल्या कौटुंबिक इतिहासावरही अवलंबून आहे.
सहसा उतारवयात येणारी गुडघेदुखी अचानक उद्‌भवत नाही. हळूहळू ती वाढत जाते. म्हणूनच सुरवातीला तिच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्षच केले जाते. जेव्हा दुखणे आपल्या "हाताबाहेर' जाते तेव्हा आपण डॉक्‍टरांकडे "धावतो'. विविध उपचार पद्धती आपापल्या मतानुसार "ट्राय' करतो आणि दुखण्याबद्दलच्या संभ्रमाला सुरवात होते. कारण प्रत्येक शास्त्राचे वेगवेगळे नियम आणि विचारसरणी असते. त्यामुळे मोठ्या अडचणीत आपण पडतो. काही डॉक्‍टर पहिल्यांदा वजन कमी करायला सांगतात, तर काही "जास्त चालू नका' असा सल्ला देतात. आता चालले नाही तर वजन वाढते आणि चालले तर गुडघेदुखी...!
यातून गुडघ्याच्या स्थितीनुसार फिजिओथेरपीने मार्ग काढता येऊ शकतो. प्रथम गरजेनुसार फिजिओथेरपीची उपकरणे (उदा. - अल्ट्रासाउंड/ डाएथर्मी/ आय.एफ.टी.ई.) वापरून दुखणे कमी केले जाते.
या दुखणे कमी असलेल्या काळाचा वापर व्यायाम सुरू करण्यासाठी केला जातो. ज्यांना दुखणे कमी प्रमाणात किंवा अधूनमधून आहे, त्यांचे लगेच व्यायाम सुरू केले जातात. हे व्यायाम दोन प्रकारात मोडतात. एक - मांडीचे स्नायू बळकट करण्यासाठी, दोन - गुडघ्याबाजूचे सर्व स्नायू लवचिक करण्यासाठी. जेव्हा हे स्नायू बळकट, तसेच लवचिक असतात, तेव्हा ते गुडघ्यांवर येणारे शरीराचे वजन अंशतः स्वतः पेलू शकतात. त्यामुळे सांध्यांची झीज कमी होते. परिणामी, दुखणेही. हे व्यायाम अतिशय हलक्‍या पद्धतीचे असतात. त्यामुळे त्याला वयाचे बंधन नाही. सुरवातीला व्यायामाची चार-पाच सीटिंग्ज घेणे फायद्याचे असते. जेणेकरून व्यायामातील बारकावे लक्षात येतात. नियमित व्यायाम सुरू केल्यानंतर तीन आठवड्यांत मांडीचे स्नायू बळकट होऊ लागतात. त्यानंतर चालणे सुरू केल्यास त्रास होत नाही. कारण बळकट झालेले स्नायू गुडघ्यांना आधार देतात.
या पहिल्या तीन आठवड्यांच्या काळात सायकलिंग/ पोहणे इत्यादी गुडघ्यांवर वजन न येणारे व्यायाम करण्यास काहीच हरकत नाही. तरी आपण आपल्या थेरपिस्टला विचारून सुरवात करावी. या काळात गुडघ्यांचे अर्गोनोमिक्‍स पाळणे गरजेचे आहे.
अर्गोनोमिक्‍स म्हणजे एखादी हालचाल कशी करावी किंवा करू नये याचे नियम- जेणेकरून सांध्यांवर येणारा अतिरिक्त भार कमी होईल. जसे गुडघेदुखी टाळण्यासाठी ज्या स्थितीत गुडघे जास्त वाकलेले असतात, ती स्थिती टाळावी. मांडी घालून बसू नये. उकिडवे बसू नये. शक्‍यतो कमोड वापरावा. जास्त वेळ उभे राहणे टाळावे. दोन्ही पायांवर समान वजन देऊन चालावे. खुर्चीवरून उठताना हातांवर वजन देऊन उठावे. अतिरिक्त जिना चढणे-उतरणे टाळावे, इत्यादी.
एक-दोन महिन्यांत नियमित व्यायामाने व अर्गोनोमिक्‍सने आपल्याला नक्कीच चांगला बदल दिसतो. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या उपचार पद्धतीत कोणतेही दुष्परिणाम नाहीत! तेव्हा अशा रीतीने फिजिओथेरपीने ही डोकेदुखी आपण "पळवून लावू' शकता.
डॉ. सुप्रिया अंतरकर, पुणे

ad