Showing posts with label डॉ. श्री बालाजी तांबे. Show all posts
Showing posts with label डॉ. श्री बालाजी तांबे. Show all posts

Tuesday, January 14, 2014

लठ्ठपणावर उपचार

- डॉ. श्री बालाजी तांबे
व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते. 

कितीही प्रयत्न केले तरी वाढलेले वजन कमी होत नाही, अशी तक्रार अनेकांची असते. काही जणांचा असाही अनुभव असतो, की आटोकाट प्रयत्न करून थोडे वजन कमी झाले तरी तसेच राहत नाही; पुन्हा वाढते आणि उलट पूर्वीपेक्षा अजूनच वाढते. लठ्ठपणा हा वरवर पाहता खूप त्रासदायक, वेदनादायक विकार नसला तरी त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन चरकसंहितेमध्ये अतिलठ्ठपणा ही निंद्य अवस्था असते असे सांगितले आहे.

एका बाजूने मेद कमी करायचा ठरविले तरी दुसऱ्या बाजूने वातदोष वाढणार नाही, वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीराची ताकद, उत्साह, सतेजता लोप पावणार नाही, याचे भान ठेवावे लागते आणि त्यासाठी आहार, आचरण, औषध व उपचार ही चतुःसूत्री पाळणे आवश्‍यक असते. यापैकी आहाराबाबतची सविस्तर माहिती आपण मागच्या वेळेला घेतली आहे. लठ्ठपणा असल्यास आचरणामध्ये आयुर्वेदाने सुचविलेले मुख्य मुद्दे याप्रमाणे होत,

  • अस्वप्न - कमी झोप
  • चिंतन - मानसिक व्यग्रता
  • आतपसेवन - उन्हाचा संपर्क
  • शारीरिक व्यायाम
  • अध्व - पायी चालणे

कमी झोप सुचवण्यामागे रात्रीची झोप कमीत कमी, जितकी आवश्‍यक आहे तेवढीच घेणे आणि दुपारी अजिबात न झोपणे, या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. कधीतरी जागरण झाले तरी चालू शकेल, पण झोप झाली तरी लोळत राहणे, सूर्योदयानंतरही झोपून राहणे, जेवणानंतर विश्रांती म्हणून झोपून जाणे, या गोष्टी टाळायला हव्यात.

मानसिक पातळीवर आळस येऊ नये, आरामाची प्रवृत्ती बळावू नये, हेसुद्धा लठ्ठपणावरील उपचारांत सांभाळावे लागते. मन कामात व्यस्त राहिले, चिंतन करण्याजोग्या गोष्टीत गुंतून राहिले तर त्याचाही वजन कमी होण्यासाठी उपयोग होतो.

थोडा वेळ उन्हात बसणे हा लंघनानाच एक प्रकार असतो. सकाळी आठच्या आधी किंवा संध्याकाळी पाचनंतर कोवळे ऊन अंगावर घेण्यानेसुद्धा वजन कमी होण्यास मदत मिळते. अगोदर अंगाला तेल लावून, सकाळच्या उन्हात सूर्यनमस्कार घालणे, हा त्यातला सर्वोत्कृष्ट उपचार म्हणता येईल.

व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. व्यायामाच्या बाबतीतला एक अनुभव असा, की प्रकृतीला अनुरूप असणारे, सहज करता येण्याजोगे, न थकवणारे व्यायाम करणेच हितावह असते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते.

योग्य औषधयोजना हीसुद्धा वजन कमी होण्यास सहायक असते. सहसा ही औषधे मेदाचे लेखन (अवाजवी मेद खरवडून काढणे) करण्याबरोबरीने वाताचे शमन करणारी, पचन सुधारणारी असतात. उदा.- गुग्गुळ, वावडिंग, त्रिफळा, नागरमोथा, चित्रक, सुंठ वगैरे. फक्‍त मेदनलेखन इतकाच उद्देश ठेवला व कडू, तुरट चवीच्या द्रव्यांचा भडिमार केला तर त्यामुळे वात वाढतो व अजूनच समस्या निर्माण होऊ शकतात. अमुक एक पेय प्या व वजन कमी करा, महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी करा, या प्रकारे दावे करणाऱ्या बहुतेक औषधांमध्ये कडू, तिखट, तुरट द्रव्यांचा समावेश असतो, याचे भान ठेवायला हवे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीपरीक्षण करून घेऊन योग्य औषध सुरू करणे सर्वोत्तम असते. मात्र तत्पूर्वी लगेच सुरू करता येतील अशी काही घरगुती औषधे पुढीलप्रमाणे आहेत-

  • "काथ' हा वजन कमी करण्यासाठी उत्तम असतो. चांगल्या प्रतीच्या काथाचे दीड ते दोन ग्रॅम चूर्ण रोज पाण्याबरोबर व विड्याच्या पानाबरोबर घेण्याने वजन कमी होण्यास मदत होते.
  • जेवणानंतर दोन चमचे लिंबाचा रस एक कपभर पाण्यात घेण्यानेसुद्धा मेद कमी होण्यास मदत मिळते.
  • सकाळी उठल्यावर कपभर कोमट किंवा सामान्य तापमानाच्या पाण्यात चमचाभर मध टाकून घेण्यानेही वजन कमी होण्यास मदत मिळते.
  • माक्‍याचा रस मेद साठलेल्या ठिकाणी हलक्‍या हाताने जिरवला तर त्यामुळे वजन कमी होण्यास, विशेषतः मेदाच्या गाठी तयार झालेल्या असल्यास त्या वितळण्यास मदत मिळते.

लठ्ठपणाच्या पाठोपाठ घाम अधिक प्रमाणात येणे, घामाला तीव्र गंध असणे याही तक्रारी उद्‌भवतात. याचे कारण म्हणजे मेदाचा मल घाम असतो, त्यामुळे मेद वाढला की पाठोपाठ घामाचे प्रमाण वाढणे स्वाभाविक असते. घाम कमी होण्यासाठी, तसेच तेवढ्या मर्यादेत मेदधातू कमी होण्यासाठी आयुर्वेदात काही लेप सुचवले आहेत.

शिरीष-लामज्जक-हेम-लोध्रैस्त्वग्‌-दोष-संस्वेदहरः प्रघर्षः ।
पत्राम्बुलोहाभय चन्दनानि शरीरदौर्गन्ध्यहरः प्रदेहः ।। ...भैषज्यरत्नावली 


शिरीष वृक्षाची साल, खस, नागकेशर, लोध्र याचे चूर्ण त्वचेवर चोळल्याने घामाचे प्रमाण कमी होते. तमालपत्र, वाळा, अगरू, हिरडा, चंदन यांचे चूर्ण पाण्यात मिसळून शरीरावर लेप लावण्याने शरीराचा दुर्गंध नाहीसा होतो.
अशा प्रकारे थोडे बाहेरून, थोडे आतून औषधोपचार करण्याने हळूहळू वजन कमी होताना दिसते.

आहार, आचरण, औषधानंतर येतात ते उपचार. अभ्यंग हा वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय होय. वातशामक व मेदनाशक द्रव्यांनी संस्कारित केलेले अभ्यंग सिद्ध तेलासारखे तेल संपूर्ण अंगभर जिरवणे व त्यानंतर औषधी वाफेच्या मदतीने स्वेदन करणे, हा उपचार आठवड्यातून 1-2 वेळा घेता येतो. संपूर्ण अंगाला अभ्यंग तर स्वतःचा स्वतःला रोज करता येण्याजोगा असतो. या प्रकारे अभ्यंग करण्याचा किंवा तज्ज्ञ परिचारकाकडून नीट शास्त्रशुद्ध अभ्यंग व स्वेदन घेण्याचा अजून एक फायदा म्हणजे, यामुळे वाढलेल्या वजनाच्या पाठोपाठ येणाऱ्या समस्यांना आळा बसू शकतो.

उद्वर्तन - उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ ।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान 


कफदोष कमी करून साठलेल्या मेदाला वितळविण्यासाठी उद्वर्तन उपचार उत्तम होय. उद्वर्तन म्हणजे विशिष्ट द्रव्यांचे बारीक चूर्ण संपूर्ण अंगाला ठराविक पद्धतीने चोळणे. अभ्यंगासारखा हासुद्धा एक मसाजच असतो, फक्‍त यात तेलाऐवजी बारीक चूर्ण वापरले जाते. घरच्या घरी स्नानाच्या आधी उटणे अंगाला लावतात, त्याप्रमाणे उद्वर्तनाचे कोरडे चूर्ण चोळता येते. मात्र तज्ज्ञ परिचारकाकाडून व्यवस्थित उद्वर्तन करून घेण्याचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होताना दिसतो.

शरीरशुद्धी - वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी. शरीरशुद्धी म्हणजे शरीरातील अनावश्‍यक गोष्टी अति प्रमाणात साठल्याने दोषरूप झालेले भाव शरीराबाहेर काढून टाकणे. लठ्ठपणामध्ये साठून राहिलेला "मेद' हा मुळात धातू असला तरी अतिप्रमाणात वाढला की दोषच म्हणावा लागतो. शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी केली असता असा दोषस्वरूप मेद कमी होऊ शकते. याबाबतचा अनुभव असा, की जेवढे वजन कमी होणे अपेक्षित आहे, ते सर्वच्या सर्व पंचकर्माच्या कालावधीत कमी होईलच असे नसते. उदा.- एखाद्या व्यक्‍तीचे वजन 20 किलो अधिक असले तर शास्त्रोक्‍त विरेचन, विशेष मेदनाशक तेलाचा बस्ती, अभ्यंग, उद्वर्तन, स्वेदन वगैरे उपचारांच्या साह्याने पंचकर्माच्या दरम्यान 6-8 किलो वजन कमी झाले तरी शरीरशुद्धीद्वारा एकदा आतील मेदसंचयाची प्रवृत्ती बदलली, आहार-आचरणामध्ये अनुकूल बदल केले, की पंचकर्मानंतरही क्रमाक्रमाने वजन कमी होताना दिसते. एकाएकी वजन कमी होण्याने शरीरावर होऊ शकणारे दुष्परिणाम यात होत नाहीत, शिवाय अशा प्रकारे हळू हळू उतरलेले वजन सहसा पुन्हा वाढतही नाही. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Tuesday, September 9, 2008

मंत्र बुद्धिवर्धनाचे

मंत्र बुद्धिवर्धनाचे

(डॉ. श्री बालाजी तांबे) आपण करीत असलेले प्रत्येक छोटे-मोठे कार्य, आपल्याला घ्यावा लागणारा प्रत्येक छोटा- मोठा निर्णय "योग्य' असायला हवा असला, तर त्यासाठी बुद्धी व त्यापाठोपाठ धृती सक्षम, सुयोग्य असायला हव्यात. बुद्धीची असमर्थता हे तमोगुणाचे दर्शक आहे, असेही आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले आहे. तसेच, ज्याप्रमाणे प्यायचे पाणी स्वच्छ ठेवायचे असेल, तर आपण स्वच्छ भांड्यातच ठेवू, तसे मन शुद्ध राहायला हवे असेल, बुद्धी प्रसन्न असायला हवी असेल, तर शरीर शुद्ध ठेवणे अपरिहार्य आहे. ......."देवा, मला शक्‍ती, बुद्धी, युक्‍ती दे' असे मागणे लहानपणी मागितल्याचे बहुतेकांना आठवत असेल. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवामध्ये चेतनेपाठोपाठ काही तत्त्वे येत असतात, त्यातलेच एक बुद्धी. कुशाग्र बुद्धी, मंद बुद्धी, साधारण बुद्धी असे शब्द आपण व्यवहारात वापरतो. बुद्धीचे असे सर्व प्रकार तिच्या शुद्धतेमुळे, बुद्धीवर झालेल्या संस्कारांमुळे पडत जातात. म्हणूनच बुद्धितत्त्व हे जरी चेतनतत्त्वाच्या जोडीने आपोआप येत असले तरी त्यावर संस्कार करणे शक्‍य असते व त्यातूनच ते संपन्न व उत्तम बनू शकते. बुद्धी म्हणजे "हुशारी' हे जरी खरे असले तरी फक्‍त परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यापुरती बुद्धीची आवश्‍यकता असते असे नव्हे. बुद्धी संपन्न करण्याचे उपाय पाहण्यापूर्वी, बुद्धी म्हणजे नेमके काय व तिचे खरे योगदान काय असते हे पाहू या. आयुर्वेदशास्त्रात बुद्धीची व्याख्या केली आहे, निश्‍चयात्मिका धी- बुद्धि- । ... सुश्रुत शारीरस्थान जी निश्‍चित, पक्का निर्णय करू शकते ती बुद्धी होय. समं बुद्धिर्हि पश्‍यति । ... चरक शारीरस्थान जे जसे आहे तसेच पाहणारी एकटी बुद्धीच असते. बुद्धिमत्ता हे सात्त्विकतेचेही प्रतीक असते. सात्त्विक व्यक्‍तीमध्ये बुद्धी "सम' म्हणजे आपले काम चोखपणे पार पाडणारी असते, तर तामसिक व्यक्‍तीमध्ये बुद्धी "मूढ' झालेली असते, दुष्ट झालेली असते. एखाद्या गोष्टीचे ज्ञान होण्यासाठी, त्यानुसार कर्म करण्यासाठी इंद्रिये, मन, बुद्धी अशी साखळी कार्यान्वित होणे भाग असते. ज्ञान कसे होते हे आयुर्वेदात याप्रमाणे सांगितलेले आहे. इन्द्रियेणेन्द्रियार्थो हि समनस्केन गृह्यते । ... चरक शारीरस्थान सर्वप्रथम ज्ञानेंद्रिये म्हणजे डोळे, कान, जीभ, नाक व त्वचा या अवयवात राहणारी इंद्रिये आपापल्या विषयाचे मनाच्या सोबतीने ग्रहण करते. कल्पते मनास तूर्ध्वं गुणतो दोषतो।थवा । ... चरक शारीरस्थान यानंतर मन त्यातील गुण व दोष यांचा विचार करते, अमुक गोष्ट केल्याने काय होईल, न केल्याने काय होईल याचा अंदाज मन घेते. जायते विषये तत्र या बुद्ध्रिनिश्‍चयात्मका । ... चरक शारीरस्थान चांगले काय, वाईट काय हे मनाने तोलले तरी त्यातून एका निर्णयाला येण्यासाठी बुद्धीची आवश्‍यकता असते. मनाला एकटे सोडले तर ते द्विधेत सापडते. म्हणून, द्विधा मन-स्थितीतून बाहेर निघणे बुद्धीमुळेच शक्‍य होत असते. व्यवस्यति तया वक्‍तुं कर्तुं वा बुद्धिपूर्वकम्‌ । बुद्धीने घेतलेल्या निर्णयानुसार ती व्यक्‍ती कार्य करण्यास प्रवृत्त होते. बुद्धीने घेतलेला निर्णय योग्य असला तरी तो तसाच्या तसा अंमलात आणण्यासाठी मनाचे सहकार्य लागतेच. यासाठी बुद्धीचीच पाठराखीण म्हणता येईल अशा "धृती'ची योजना केलेली असते. बुद्धीने घेतलेला निर्णय मनाने स्वीकारावा व कर्मेंद्रियांना योग्य कर्म करण्याची आज्ञा द्यावी यासाठी धृती मनाला नियंत्रित करत असते. या साऱ्याचा अर्थ असा की, आपण करत असलेले प्रत्येक छोटे मोठे कार्य, आपल्याला घ्यावा लागणारा प्रत्येक छोटा-मोठा निर्णय "योग्य' असायला हवा असला तर त्यासाठी बुद्धी व त्यापाठोपाठ धृती सक्षम, सुयोग्य असायला हव्यात. बुद्धी, धृती, स्मृती हे प्रज्ञाभेद सांगितले असले तरी त्यात पहिली बुद्धी येते कारण ती सर्वात महत्त्वाची असते. बुद्‌ध्या विषमविज्ञानं विषमं च प्रवर्तनम्‌ । प्रज्ञापराधं जानीयान्मनसो गोचरं हि तत्‌ ।। ... चरक शारीरस्थान जे जसे आहे तसेच समजण्याची बुद्धीची क्षमता नाहीशी झाली (विषमज्ञान) आणि त्यामुळे ती अनुचित कर्माचा निर्णय करू लागली (विषमप्रवर्तन) तर त्यामुळे प्रज्ञापराध घडतो आणि त्यातून दु-ख, सर्व शारीरिक मानसिक रोगांची उत्पत्ती होते. बुद्धीची असमर्थता हे तमोगुणाचे दर्शक आहे असेही आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले आहे. थोडक्‍यात, फक्‍त अभ्यास करणाऱ्यांनाच बुद्धिसंपन्नतेची आवश्‍यकता असते असे नाही, तर आरोग्यपूर्ण व संपन्न जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला बुद्धी संपन्न राहावी, समर्थ राहावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. "मन-शुद्धौ बुद्धिप्रसाद-' म्हणजे बुद्धिप्रसादनासाठी मन शुद्ध असणे आवश्‍यक आहे, असे सुश्रुतसंहितेत म्हटले आहे म्हणून बुद्धिवर्धनाची इच्छा असणाऱ्यांनी मनात रज, तम वाढू नयेत याकडे लक्ष ठेवायला हवे. त्यासाठी सात्त्विक व साधा आहार, सद्वर्तन, प्रकृतीनुरूप आचार वगैरे गोष्टींकडे लक्ष ठेवता येते. मन-बुद्धी ही तत्त्वे पांचभौतिक शरीरापेक्षा वेगळी असली तरी जोवर जीव आहे, चेतना आहे तोपर्यंत ती शरीरातच असतात. ज्याप्रमाणे प्यायचे पाणी स्वच्छ ठेवायचे असेल तर आपण स्वच्छ भांड्यातच ठेवू तसे मन शुद्ध राहायला हवे असेल, बुद्धी प्रसन्न असायला हवी असेल तर शरीर शुद्ध ठेवणे अपरिहार्य आहे. आयुर्वेदात विरेचन प्रक्रिया समजावल्यानंतर जी उत्तम विरेचनाची लक्षणे सांगितली त्यात शरीर हलके होणे, भूक लागणे वगैरे शारीरिक लक्षणांचा उल्लेख केलाच व बरोबरीने बुद्धी, इंद्रिये व मन शुद्ध होते असेही सांगितले. प्रत्यक्षातही याचा असंख्य वेळेला अनुभव येताना दिसतो. बुद्धी संस्कारांनी संपन्न करता येते. आयुर्वेदाने नवजात बालकांसाठी "सुवर्णप्राशन' संस्कार सांगितला आहे तो यासाठीच. षड्‌ भि र्मासै- श्रुतधर- सुवर्णप्राशनाद्‌ भवेद्‌ । ... कश्‍यप सूत्रस्थान जन्मल्यापासून सहा महिन्यांचे होईपर्यंत बाळाला रोज सुवर्णप्राशन म्हणजे मधासह शुद्ध सोने उगाळून चाटवले तर बालक "श्रुतधर' म्हणजे एकदा ऐकलेले लक्षात ठेवू शकेल असे बुद्धिसंपन्न होते. तूप, बदाम, शतावरी, ब्राह्मी, सुवर्ण, केशर, बदाम, खडीसाखर ही द्रव्ये बुुद्धिवर्धक असतात. त्यामुळे मोठ्या वयातही या द्रव्यांचे नियमित सेवन करता आले तर ते बुद्धिवर्धनासाठी, बुद्धिसंपन्नतेसाठी उत्तम असते. त्यादृष्टीने सुवर्णसिद्धजल, केशर-सुवर्णवर्खयुक्‍त "संतुलन बालामृत', शतावरी-केशर- सुवर्णवर्खयुक्‍त "संतुलन अमृतशतकरा', पंचामृत, ब्रह्मलीन घृत, "संतुलन डिव्हाईन सिरप' "संतुलन सूर्यप्राश', आत्मप्राश वगैरे योगांचा रोजच्या आहारात समावेश करता येतो. आयुर्वेदाने बुद्धिवर्धनासाठी उत्तमोत्तम रसायनयोगही सांगितले आहेत, उदा. मधुकेनतवक्षीर्या पिपल्ल्या सिन्धुजन्मना । पृथग्लोहै- सुवर्णेन वचया मधुसर्पिषा ।। सितया वासमायुक्‍ता समायुक्‍ता रसायनम्‌ । त्रिफला सर्वरोगघ्नी मेधायु- स्मृतिबुद्धिदा ।। ... अष्टांगसंग्रह उत्तरस्थान ज्येष्ठमध, वंशलोचन, पिंपळी, सैंधव, सुवर्ण, लोह, रौप्य, वेखंड, मध, तूप, खडीसाखर व त्रिफळा यांचे मिश्रण सेवन केल्यास सर्व रोगांचा नाश होतो व मेधा, आयुष्य, स्मृती, बुद्धी यांचा लाभ होतो. ब्राह्मी वचा सैन्धवशङ्‌खपुष्पी मत्स्याक्षकब्रह्मसुवर्चलैन्द्रै- । वैदेहिना च त्रियवा- पृथक्‍स्युर्यवौ सुवर्णस्य तिलोविषस्य । सपिर्षश्‍च पलमेकत एतद्‌ योजयेत्‌ परिणते च घृताढ्यम्‌ ।। भोजनं समधुवत्सरमेवं शीलयन्नाधिकधीस्मृतिमेधा- ।। ब्राह्मी, वेखंड, सैंधव, शंखपुष्पी, मत्स्याक्षी, ब्रह्मसुवर्चला, ऐन्द्रि, पिंपळी, प्रत्येकी तीन यव प्रमाण,सुवणर्‌ दोन यव प्रमाण, वत्सनाभ एक तिल प्रमाण, घृत चार तोळे प्रमाणात मिसळून रोज सकाळी खावे, त्यानंतर भूक लागली असता भरपूर तुपयुक्‍त भोजन मधासह घ्यावे. याप्रमाणे वर्षभर केल्यास बुद्धी, स्मृती व मेधा वाढतात. बुद्धीवर संस्कार होण्यासाठी आयुर्वेदाने इतरही उपाय सुचविले आहेत, सतताध्ययनं वाद- परतन्त्रावलोकनं तद्विद्याचार्यसेवा इति बुद्धि मेधाकरो गण- । ... सुश्रुत चिकित्सास्थान - सातत्याने अध्ययन करणे, मनापासून शास्त्र अभ्यासणे. - सहाध्यायी व्यक्‍तीबरोबर शास्त्राबद्दल संवाद साधणे. - आपल्या शास्त्राशी संबंधित इतर शास्त्रांची माहिती करून घेणे. - ज्या शास्त्राचे अध्ययन करायचे असले त्या आचार्यांच्या सहवासात राहून त्यांची सेवा करणे. यातून आणखीही एक गोष्ट लक्षात येते की बुद्धी संन्न ठेवाची असली तर तिचा वापर करत राहणे आव्यक आह. धूळ खात पडलेली तलवार जशी गंजून निकामी होऊ शकते तसेच बुद्धीच्या बाबतीत घडता कामा नये. बुद्धीने शेवटपर्यत सम राहायला हवे असेल, योग्य निर्णय घेऊन जीवन सुखी व्हायला हवे असेल तर बुद्धीवर या प्रकारचे संस्कार करत राहायला हवेत. - डॉ. श्री बालाजी तांबे

बुद्धं शरणं गच्छामि

बुद्धं शरणं गच्छामि

(डॉ. श्री बालाजी तांबे) नैसर्गिक नियमांना अनुसरून असलेला योग्य निर्णय अति जलद गतीने घेण्यासाठी आवश्‍यक शक्‍ती म्हणजे बुद्धी. बुद्धिवर्धनासाठी शरीराबरोबरच मेंदूचे आरोग्य, अनुभवाचे ज्ञान आणि संस्कार यांची आवश्‍यकता असते. अशी बुद्धी गणपतीकडे मागितली जाते. ........दशावतारापैकी सध्याचे युग भगवान बुद्ध यांच्या अवताराचे युग आहे, याचा प्रत्यय ठायी ठायी येतो. सध्या बुद्धिमान माणसांची चलती आहे, असे आपल्याला दिसते. मात्र, सध्याचे युग हे कलियुग असल्यामुळे बुद्धी विधायक कार्यासाठी न वापरता निसर्ग, प्राणी व मनुष्याचे शोषण करण्यासाठी वापरली जात आहे, हे आजच्या काळाचे दुर्भाग्य. बुद्धीची वाढ होत असल्याचे तर दिसते; पण शारीरिक कष्टांची उपेक्षा करण्याचा भाव वाढत असल्यामुळे सध्या बुद्धिमान मनुष्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहताना दिसतात. शरीराशिवाय मनुष्याचे अस्तित्व टिकू शकत नाही. मनुष्याची व्याख्या करायची म्हटल्यास मनाचा विकास व प्रकाश विशेषत्वाने जाणवेल अशा मर्यादेत पोचेल तो मनुष्य असे म्हणावे. म्हणूून "मन एव मनुष्याणाम्‌' असे म्हणतात. चराचरातल्या सर्वांनाच मन असते म्हणजे मनुष्याला मन असते तसेच ते इतर प्राण्यांना व वनस्पतीलाही असते. परंतु, मनाचा विकास माणसाएवढा कोणाहीमध्ये झालेला दिसत नाही. महत्त्व कितीही असले तरी मनाचा उपयोग होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्‍यकता असते. एक म्हणजे शरीर व शरीराबरोबरच आवश्‍यक असते बुद्धी. शरीर असते वाहनासारखे आणि बुद्धी असते सारथ्यासारखी. या दोन्ही गोष्टीत कुठल्याही प्रकारचा दोष आला तर त्यातून मनोदोष उत्पन्न होतो. कर्मयोगाचे महत्त्व ओळखून कष्ट केले नाहीत तर शरीराचे आरोग्य टिकत नाही. बुद्धीला व्यवस्थित प्रशिक्षण मिळालेले नसेल तर ती शरीर व मन या दोघांनाही कुठल्यातरी ठेचकाळणाऱ्या रस्त्यावरून नेऊन एखाद्या खड्ड्यात पाडते. बुद्धीला नेहमीच महत्त्व होते व राहीलही. महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे सारथ्य केले व युद्धात विजय मिळाला. लढणार होते अर्जुन, भीम वगैरे पांडव, पण विजय मात्र झाला श्रीकृष्णांचा!! म्हणून शेवटी "यत्र योगेश्‍वरो कृष्णः' असेच म्हटले गेले. सारथ्य म्हणजे मार्गदर्शन. बुद्धी एकूण जीवनव्यवहाराचे संपूर्ण मार्गदर्शन करून मनुष्याला यशाच्या शिखराकडे पोचवू शकते. या विश्‍वातील कुठल्याही गोष्टीची दोन स्वरूपे असतात. एक भौतिक मायेचे व दुसरे त्यातील शक्‍तिसंकल्पनेचे. म्हणून बुद्धीला कार्यरत ठेवण्यासाठी मेंदूचे आरोग्य खूप आवश्‍यक असते. मेंदूच्या भौतिक माध्यमातून बुद्धीचे कार्य चालते त्यातली शक्‍तिसंकल्पना मात्र संस्कार व प्रशिक्षण यांच्यामार्फतच तयार केली जाते. बुद्धी असा शब्दप्रयोग केला तरी त्यात स्मृती, धृती वगैरेंचा अंतर्भाव असतोच. संकल्पना समजण्यासाठी सर्व इंद्रियांची क्षमता आवश्‍यक असते. इंद्रियांचे आरोग्य व्यवस्थित नसेल तर मुळात विषय समजणारच नाही व त्याचे ज्ञान होणार नाही. एखादी गोष्ट दिसल्यावर वा ऐकल्यावर ती मेंदूत व्यवस्थित जागी ठेवल्यास हव्या त्या वेळी सापडेल किंवा त्या विभागातील किंवा परस्परसंबंधातील इतर वस्तूंबरोबर आवश्‍यकता वाटल्यास उपलब्ध होऊ शकेल. अशा अनेक गुणांनी संस्कारित करून माहिती साठवावी लागते व योग्य वेळी स्थळ व काळ यांचा विचार करून योजनेला अनुकूल अशी सर्व परिस्थिती पडताळून निर्णय घेण्याची आवश्‍यकता असते. खरे तर बुद्धी म्हणजेच निर्णय घेण्याची क्षमता. बुद्धिहीन मनुष्यही एखादा निर्णय चटकन घेईल. परंतु, त्या निर्णयानंतर इच्छित कार्य होणे अवघड होते व चटकन घेतलेला निर्णय अंगाशी येतो. भगवद्‌गीतेत अर्जुनाने म्हटलेले आहे, "कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताःयच्छ्रेयः स्यान्निश्‍चितं ब्रूहि तन्मेशिष्यस्ते।हं शाघि मां त्वां प्रपन्नम्‌।' म्हणजे हे भगवंता, निसर्गाला, उत्क्रांतीच्या एकूण प्रक्रियेला व यशाला अनुकूल निर्णय घेण्यास मी असमर्थ आहे. माझी मूढावस्था निर्माण झालेली आहे. तेव्हा, मला तू संस्कार दे. "शाधि' म्हणजे दीक्षा देणे व दीक्षेमध्ये नुसती माहिती वा वस्तू देणे अभिप्रेत नसून संस्कार देणे अभिप्रेत असते. बुद्धीसाठी संस्कारांची देणगी लागते. योग्यायोग्यतेचा निर्णय करणारी ती बुद्घी. एखादा निर्णय घेण्यापूर्वी मेंदूत खूप मोठी प्रक्रिया घडावी लागते. म्हणून मेंदूकडे सतत प्राणशक्‍तीचा पुरवठा होत राहावा व त्या ठिकाणी उष्णता तयार होणार नाही अशी खबरदारी घ्यावी लागते. इंद्रियांची साथ असली, शांतपणे अंतर्मुख होऊन विचार करण्याची सवय असली आणि यथायोग्य संस्कार मिळालेले असले तरच अचूक निर्णय घेता येतो व असा मनुष्य बुद्धिमान समजला जातो. अति जलद व योग्य निर्णय व तोही धर्माला म्हणजे नैसर्गिक स्वभावाला अनुसरून घेण्यासाठी आवश्‍यक शक्‍ती म्हणजे बुद्धी. इतर शारीरिक आरोग्याबरोबरच मेंदूचे आरोग्य, जीवनात जगताना मिळालेले अनुभवाचे ज्ञान व संस्कार बुद्धिवर्धनासाठी आवश्‍यक असतात. मनुष्याला पुन्हा बुद्धत्वाकडे जायचे असेल तर बुद्धीची उपासना करावीच लागेल. चांगली बुद्धी मिळावी अशी प्रार्थना बुद्धिदात्या गणपतीकडे केली जातेच. पण, नुसती प्रार्थना करून बुद्धी वाढेल असे नाही. त्यासाठी वाचन, सराव, प्रवास, यात्रा, अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, सणवार या सर्वांच्या माध्यमातून जीवनानुभव मिळविण्याचा प्रयत्न एका बाजूने करत असताना मेंदूला घातक ठरतील असे पदार्थ न खाणे, सिगारेट, मद्य किंवा अन्य ड्रग्जच्या सवयींपासून दूर राहणे, मेंदूला उपयुक्‍त असणाऱ्या रसायनांचे सेवन करणे आवश्‍यक असते. शेवटी स्वतःच स्वतःला समजून घ्यायचे असते. ज्यामुळे आत्मज्ञान होते ती खरी बुद्धी व आत्मज्ञान झालेले ते बुद्ध. म्हणून माणसे बुद्धीला व बुद्धांना शरण जातात. तर्कशास्त्राचा उपयोग करून, संख्याशास्त्राचा उपयोग करून मुख्यतः बौद्धिक पातळीवर संबंध ठेवून बुद्धी सहसा निर्णय घेत राहते, या कार्यात डाव्या बाजूच्या मेंदूची मदत होते. उजव्या बाजूचा मेंदू भावनात्मक, प्रेमाच्या ओलाव्यातून निर्णय घेत राहतो म्हणून खरे तर नुसत्या तर्कशुद्ध बुद्धीने निर्णय घेतला तर फारसा उपयोग होत नाही. भावनेची जोड मिळाली तरच ती बुद्धी पूर्ण स्वरूपात आहे असे म्हणता येते. माणसे भावनेने जोडली जातात. शेवटी माणसे जोडण्यावर जीवनाचे यश असल्यामुळे भावनिक संबंध महत्त्वाचे ठरतात. दोन्ही अंगांचा विचार करून जर निर्णय घेतला गेला, तर ती बुद्धी सर्वश्रेष्ठ असे म्हणायला हरकत नाही. भौतिक स्वार्थाच्या विचाराला धरून जाणारी बुद्धी कोणासही सुखी करू शकत नाही. अप्पलपोटेपणा करणारी दुर्बुद्धी तर आपलेपणा वाढविणारी सुबुद्धी. वस्तुनिष्ठ विचारांना भावनिक प्रेमाचा ओलावा असला तरच मनुष्य यशस्वी होऊन आनंद मिळवू शकतो. सुबुद्धी म्हणजेच संतुलित बुद्धी असणारा बुद्धिमान. - डॉ. श्री बालाजी तांबे www.ayu.de

Friday, May 16, 2008

आहार हेच औषध

आहार हेच औषध


(डॉ. श्री बालाजी तांबे)
औषधांसाठी अनुपान म्हणून आहारद्रव्यांचा वापर करणे किंवा आहाराचाच औषधासारखा वापर करणे यासाठी आयुर्वेदाने विकसित केलेल्या काही "आहारकल्पनां'ची माहिती आपण गेल्या अंकात घेतली. आता लाजाम्ण्ड, पेया, विलेपी आणि यवागू या कल्पनांची माहिती पाहू. .......
आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये, लाजमण्ड, म्हणजे साळीच्या लाह्यांच्या मण्ड, ही एक अतिशय उपयुक्‍त कल्पना सांगितलेली आहे.

लाजमण्ड
साळीच्या लाह्यांच्या १४ पट पाणी घ्यावे व मंद आचेवर एकत्र शिजवावे. लाह्या शिजून अगदी मऊ झाल्या की अग्नीवरून काढून गाळून घ्यावे. मिळालेल्या द्रवामध्ये चवीनुसार सैंधव, सुंठ, मिरी, पिंपळी, तूप, साखर व कोकम, लिंबू वा चांगेरीची पाने यापैकी एखादे आंबट द्रव्य मिसळून प्यायला द्यावे.

असा हा लाजमण्ड बनविणे अतिशय सोपे असते, चवीला अतिशय रुचकर असतोच, शिवाय याचे खालीलप्रमाणे अनेक उपयोगही असतात,
- लाजमण्डामुळे अग्नी संधुक्षित होतो, पचनशक्‍ती सुधारते.
- शरीरातील अनुलोमनाची प्रक्रिया सुधारल्याने मलविसर्जन सहज होण्यास उपयोग होतो.
- हृदयासाठी हितकर असतो.
- विशेषत- वमन-विरेचनाने ज्यांचे शरीर शुद्ध झालेले आहे, त्यांच्यासाठी लाजमण्ड अतिशय पथ्यकर असतो.
- लाजमण्ड पिण्याने श्रमपरिहार होऊन थकवा दूर होतो.
- ताप आला असता, जुलाब होत असता, न शमणारी तहान लागत असता लाजमण्ड पिणे उत्तम असते.
- चक्कर, मूर्च्छा, दाह वगैरे त्रासातही लाजमण्डाचा उपयोग होतो.
- पित्त-कफदोषांचे असंतुलन दूर होते व रस-रक्‍त वगैरे सर्व धातू सम-अवस्थेत येण्यास हातभार लागतो.

असा हा गुणांनी संपन्न व सात्त्विक असल्याने कल्याणकारी असतो असेही चरकाचार्य सांगतात.
- हा लाजमण्ड बालक, वृद्ध, स्त्रिया व नाजूक प्रकृतीच्या सर्व व्यक्‍तींसाठी अतिशय हितकर असतो.

पेया
मण्डानंतर येते "पेया'. या दोघांमध्ये एवढाच फरक असतो की मण्डाध्ये अन्नाची शिते नसतात, तो पूर्णपणे गाळून घेतलेला असतो तर "पेया'मध्ये अन्नाची शिते तशीच ठेवली जातात.

तांदळाची पेया बनविण्यासाठी तांदूळ भरडून जरा बारीक केले जातात. त्यात १४ पट पाणी घालून मंद आचेवर शिजविले जातात. तांदूळ शिजले की त्यात चवीनुसार सैंधव, सुंठ, मिरी, पिंपळी, तूप वगैरे द्रव्ये टाकून पिण्यासाठी दिली जाते.

पेया पचायला हलकी असते, अग्नी प्रदीप्त करते, मूत्राशयाची शुद्धी करते, वाताचे अनुलोमन करते, घाम येण्यास मदत करते, ताप व उदररोगामध्ये हितकर असते.

विलेपी
पेयानंतर येते "विलेपी'. विलेपीमध्ये द्रवभाग कमी तर अन्नांश जास्ती असतो.

तांदळाची विलेपी बनविण्यासाठी तांदूळ भरडून बारीक केले जातात. तांदळाच्या चार पट पाणी घालून शिजवले जातात. तांदूळ पूर्णपणे शिजले की त्यात सैंधव, पिंपळी, सुंठ, मिरी, पिंपळी, तूप मिसळून खायला दिली जाते.

अशी ही विलेपी पचायला हलकी व तृप्तीकर असते, हृदयासाठी हितकर असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, पथ्यकर असते, ताकद वाढविते, पित्ताचे शमन करते, तहान तसेच भूक शमवते व बृंहण म्हणजे शरीर भरायला मदत करते.

लहान मुलांसाठी, वजन कमी असणाऱ्यांसाठी, पचन मंद असणाऱ्यांसाठी, पित्ताचा त्रास होणाऱ्यांसाठी अशी विलेपी खाणे उत्तम असते, नुसत्या तांदळाऐवजी तांदूळ-मुगाच्या मिश्रणापासूनही विलेपी बनविता येते.

यवागू
पथ्य कल्पनेत यानंतर येते "यवागू'. यवागू बनविताना किती पाणी घ्यायचे याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. आपण शारंगधरसंहितेत दिलेली पद्धत पाहणार आहोत,

साध्यं चतुष्पलं द्रव्यं चतु-षष्टिपले।म्बुनि ।
तत्क्वाथेनार्धशिष्टेन यवागुं साधयेत्‌ घनाम्‌ ।।
... शारंगधर

तांदूळ कुटून जाडसर बारीक करावेत. तांदळाच्या १६ पट पाणी घालून शिजवायला ठेवावेत व निम्मे पाणी उडून जाईपर्यंत शिजवावेत व दाट यवागू तयार करावी. यात आवश्‍यकतेनुसार सैंधव, पिंपळी, सुंठ, मिरी, पिंपळी, तूप मिसळून गरम गरम खायला द्यावे.

विलेपी व यवागू या दोन्ही कल्पना तयार झाल्यावर जवळजवळ एकसारख्याच दिसतात मात्र विलेपीपेक्षा यवागूवर अग्निसंस्कार अधिक काळ होत असल्याने ती पचायला अधिक हलकी असते.

यवागुर्ग्राहिणी बल्या तर्पणी वातनाशिनी ।
यवागू वातदोष शमवते, शरीराची तृप्ती करते, ताकद वाढवते व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते.
यवागू बनविताना तांदूळ-मूग, तांदूळ-उडीद, तांदूळ-मूग-तीळ असे मिश्रणही वापरले जाते.

मण्ड, पेया, विलेपी, यवागू या पथ्यकल्पना बनविताना साध्या पाण्याऐवजी कैक वेळा औषधीजलाचाही वापर केला जातो. उदा. भूक लागत नसली, अजीर्णामुळे पोट दुखत असले तर पिंपळी, पिंपळीमूळ, चव्य, चित्रक, सुंठ ही द्रव्ये पाण्यासह उकळून सर्वप्रथम औषधीजल तयार करावे मग त्याच्या साहाय्याने यवागू सिद्ध करावी असे, आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले आहे. जुलाब होत असताना, पचनशक्‍ती मंदावलेली असताना कवठ, बेल, चांगेरी, डाळिंबाचे दाणे, ताक यांच्या साहाय्याने बनविलेली पेया नुसत्या पाण्यापासून बनविलेल्या पेयापेक्षा अधिक गुणकारी असते.

चरकसंहितेमध्ये अशा २८ पथ्य-कल्पना वर्णन केलेल्या आहेत.

- डॉ. श्री बालाजी तांबे

Saturday, April 26, 2008

आवाज

आरोग्य आवाजाचे


(डॉ. श्री बालाजी तांबे)
आवाज टिकवायचा असेल तर त्यासाठी आरोग्यही चांगले हवे. विशेषतः उदान वायू संतुलित ठेवायला हवा. कफदोष प्राकृत प्रमाणात व प्राकृत स्वरूपात राहील याकडे लक्ष ठेवायला हवे आणि शुक्रधातू संपन्नावस्थेत राहण्यासाठीही प्रयत्न करायला हवा. ........
व्यक्‍ती निरोगी आहे का हे पडताळण्यासाठी तसेच ती व्यक्‍ती रोगी असल्यास रोगाचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी आयुर्वेदाने अष्टविध परीक्षा सांगितल्या आहेत. त्यातील एक परीक्षा आहे आवाजाची म्हणजे स्वराची परीक्षा. आरोग्य निर्देशक म्हणून जी सहज समजून येण्यासारखी लक्षणे असतात, त्यात आवाजात बदल झालेला आहे काय याचा अंतर्भाव केलेला असतो. म्हणूनच आरोग्य सांभाळण्यासाठी आवाजाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे लागते. आयुर्वेदात आवाजाला "स्वर' म्हटलेले आहे. मुळात स्वर उत्पन्न होतो तो उदान वायूमुळे आणि आपल्याला तो घशातून आल्यासारखा वाटत असला तरी स्वराचे उगमस्थान असते नाभी. उदानवायूचे स्थान आहे नाभीपासून ते कंठापर्यंत.

उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च ।
वाक्‍प्रवृत्ति प्रयत्नोर्जा बलवर्णादि कर्म च ।।
... चरक चिकित्सास्थान

उदान वायूचे स्थान नाभी, छाती व कंठ असून वाक्‍प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होत असतात. याशिवाय प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात. या ठिकाणी एक गोष्ट सहज लक्षात येईल की बल आणि वाक्‍प्रवृत्ती या दोन्ही गोष्टी उदानवायूशी संबंधित असल्याने बल कमी झाले की आवाजही क्षीण होतो. याचा पडताळा अनेक वेळा येतो.

स्वराचा संबंध दोषांमधल्या उदान वायूशी जसा असतो तसाच तो प्रकृतींपैकी कफप्रकृतीशी व धातूंपैकी शुक्रधातूशी असतो. कफप्रकृतीचे वर्णन करताना अष्टांगहृदयात सांगितलेले आहे,
जलदाम्भोधिमृदङ्सिंहघोषः ।
... अष्टांगहृदय

कफप्रकृतीच्या व्यक्‍तीचा आवाज मेघ, समुद्र, मृदंग, सिंह यांच्या आवाजाप्रमाणे धीरगंभीर असतो. याउलट वातप्रकृती असणाऱ्या व्यक्‍तीचा आवाज चिरका, फुटका, ऐकू नयेसे वाटेल असा असतो. शुक्रसार पुरुषाचे वर्णन "प्रसन्नस्निग्ध वर्णस्वरा' असे केलेले आहे. म्हणजे संपन्न शुक्रधातू असणाऱ्या व्यक्‍तीचा आवाज अतिशय प्रसन्न, स्निग्ध व ऐकत राहावा असा असतो.

या सर्व संदर्भावरून एक गोष्ट लक्षात येते की आवाजाचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्यासाठी उदान वायू संतुलित ठेवायला हवा, कफदोष प्राकृत प्रमाणात व प्राकृत स्वरूपात राहील याकडे लक्ष ठेवायला हवे तसेच शुक्रधातू संपन्नावस्थेत राहण्यासाठी प्रयत्न करायला हवा. म्हणजेच आवाज नीट राहण्यासाठी प्रत्येकाने अगोदरपासून काळजी घ्यायला हवी.

यादृष्टीने खालील आयुर्वेदिक उपायांचा उपयोग होऊ शकतो.
रात्री झोपण्यापूर्वी नाकात साजूक तुपाचे किंवा "नस्य सॅन घृता'सारख्या सिद्ध घृताचे दोन-तीन थेंब टाकणे.
इरिमेदादि तेल किंवा "सुमुख तेल'मिश्रित कोमट पाणी तोंड भरेल एवढ्या प्रमाणात गालात आठ-दहा मिनिटांसाठी किंवा नाकाडोळ्यातून पाणी येईपर्यंत धरून ठेवणे. याप्रकारे आठवड्यातून ए-दोन वेळा केल्याने आवाज तर चांगला राहतोच पण दात आणि हिरड्यांचेही आरोग्य नीट राहते.
रोज सकाळी दात घासण्यापूर्वी आयुर्वेदोक्‍त दंतधावन क्रियेत सुचवलेल्या तुरट, तिखट, कडू चवीच्या द्रव्यांचा किंवा तयार "संतुलन योगदंती' चूर्णाचा वापर करणे. यामुळे घशातील अतिरिक्‍त कफ सुटा होऊन बाहेर पडून गेला की आवाज चांगला राहतो.
जेवणानंतर लवंग, ओवा, बडीशेप, सुंठ वगैरे पाचक व कफनाशक द्रव्यांपासून बनविलेले मुखशुद्धिकर चूर्ण सेवन करण्याने घसा व स्वरयंत्रातील अतिरिक्‍त कफ कमी झाला की आवाज नीट राहू शकतो.
ज्येष्ठमधाचा तुकडा चघळणे, काळ्या मनुका चावून खाणे, खडीसाखरेचा खडा तोंडात धरणे, साळीच्या लाह्या खाणे या गोष्टी घशासाठी चांगल्या असतातच, बरोबरीने शुक्रधातूची ताकद वाढविण्यासही हातभार लावणाऱ्या असतात.
रोज सकाळ-संध्याकाळ एक-दोन चिमूट हळद आणि थोडे पाणी घालून उकळवून गाळून घेतलेल्या दुधात शतावरी कल्प, "अनंत कल्प'सारखी शुक्रवर्धक व स्वर्य (स्वराला हितकर) योग टाकून घेणेही आवाजासाठी उत्तम होय.
शक्‍य तेव्हा गरम पाणी पिणे, विशेषतः पावसाळ्यात व हिवाळ्यात घशाला बरे वाटेल एवढ्या तापमानाचे गरम पाणी पिणे आवाजासाठी हितकर होय.
जेवणाच्या सुरुवातीला गरम वरण-भात-तूप खाणे हे सुद्धा घसा आणि स्वरयंत्राला आवश्‍यक ती मृदुता व स्निग्धता देण्यास उपयुक्‍त असते.

एकाएकी आवाज बदलणे व बदलल्यानंतर बरेच दिवस पूर्ववत न होणे हे एखाद्या व्याधीचेही लक्षण असू शकते. उदा. थायरॉईड ग्रंथीमधील बिघाड, क्षयरोग, कर्करोग, घशामध्ये अर्बुद तयार होणे वगैरे. यामुळे आवाज बदलल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यायलाच हवा. साध्या भाषेत ज्याला आवाज बसणे म्हणतात, त्यातही आवाज बदलतो, पण तो रोग म्हणून गणला जात नाही तर ते एक लक्षण असते, त्याची सामान्य कारणे याप्रमाणे सांगता येतात,

सर्दीमुळे स्वरयंत्र, घसा वगैरे अवयवांना सूज येणे.
फार वेळ, फार उंच आवाजात बोलण्याने किंवा गाण्याने आवाजावर अतिरिक्‍त ताण येणे.
फार आंबट, फार थंड, आईस्क्रीम, कडक, तेलकट किंवा तत्सम घशाला त्रासदायक ठरेल असे पदार्थ खाणे.
आम्लपित्ताच्या त्रासामुळे घशात आंबट येणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे या कारणां मुळे आवाज बदलू शकतो.

अशा परिस्थितीत सर्वप्रथम ज्या कारणामुळे आवाज बसला असेल ते कारण थांबवणे भाग असते. त्याखेरीज खालील उपाय योजता येतात.
सीतोपलादी चूर्ण आवाजासाठी हितकर असते, मात्र ते शुद्ध घटकद्रव्यांपासून बनविलेले असायला हवे. सितोपलादी चूर्ण पाण्याबरोबर किंवा मध-तुपात मिसळून घेणे आवाजासाठी हितकर असते.
ज्येष्ठमधाच्या काढ्यात थोडेसे तूप मिसळून घेण्यानेही आवाज सुधारण्यास मदत होते.
हळद, सैंधव मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याने बसलेला आवाज सुधारतो.
घसा जड होऊन बोलायला त्रास होत असल्यास दालचिनी चघळण्याचा, कंकोळ, लवंग तोंडात घरण्याचा उपयोग होतो.
आवाज बसला असून घसा दुखत असल्यास तूप व गूळ घालून भात खावा व वर कोमट पाणी प्यावे.
आवाज बसला असताना किंवा बोलण्यास त्रास होत असताना आंबट फळे, दही, आंबट ताक पिणे टाळावे; जांभूळ, कच्चे कवठ, सीताफळ, फणस, कलिंगड वगैरे फळे खाऊ नयेत; तळलेले पदार्थ पूर्ण टाळावेत.
अतिश्रम टाळावेत; थंड पाण्याने स्नान करणे टाळावे, दिवसा झोपू नये.

आयुर्वेदात "स्वरभेद' नावाचा एक रोग सांगितला आहे. याचेही मुख्य लक्षण आवाज बदलणे हेच असते. प्रकुपित झालेले वातादी दोष स्वरवाही स्रोतसांमध्ये जाऊन स्वर बिघडवतात तेव्हा स्वरभेद होतो, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. वातज, पित्तज, कफज, त्रिदोषज, क्षयज, मेदज असा सहा प्रकारचा स्वरभेद असू शकतो. यातील वातज, पित्तज, कफज हे प्रकार साध्य असतात तर त्रिदोषज, क्षयज व मेदज हे प्रकार असाध्य असतात.

--------------------------------------------------------------------
असा निर्माण होतो आवाज
घ शामध्ये अन्ननलिका आणि श्‍वासनलिका जिथे वेगळ्या केल्या जातात तेथेच स्वरयंत्र असते. अन्ननलिका आणि श्‍वासनलिका एका झाकणासारख्या झडपेने वेगळ्या केल्या जातात. त्याला "एपिग्लॉटिस' असे म्हणतात. स्वरयंत्र या एपिग्लॉटिसच्या खाली आणि "ट्रॅकिआ' म्हणजे फुफ्फुसांकडून येणाऱ्या श्‍वासनलिकेच्या भागाच्या वर असते. स्वरयंत्रात दोन पातळ आडव्या पट्ट्या असतात, ज्यांच्या कंपनांमुळे आवाज निर्माण होतो. या पट्ट्या पाठीच्या कण्याच्या बाजूला ऍरेटिनॉइड कार्टिलेजला तर पुढील कंठाच्या बाजूस थॉयराइड कार्टिलेजला जोडलेल्या असतात. दोन्ही बाजूंनी त्या स्वरयंत्राच्या आतल्या भिंतींना स्नायूंद्वारे जोडलेल्या असतात. आणि त्यांचा मधला भाग मोकळा असतो. प्रामुख्याने श्‍लेष्मल पेशींनी बनलेल्या या पट्ट्यांमध्ये काही स्नायूतंतूही असतात. या पट्ट्यांची कंपने "व्हेगस' चंतातंतूंद्वारे नियंत्रित केली जातात. त्यांना होणारा रक्ताचा पुरवठा अगदीच कमी असल्याने त्या मोतिया पांढऱ्या रंगाच्या दिसतात. हवेच्या योग्य दाबाने या पट्ट्यांची वेगवेगळी कंपने निर्माण केली जातात, त्यामुळे वेगवेगळे स्वर निर्माण होतात. हवेच्या दाबामुळे दूर ढकलल्या गेलेल्या या पट्ट्या त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळे पुन्हा एकत्र येतात आणि हवेच्या दाबाने पुन्हा दूर ढकलल्या जातात. हे चक्र सतत सुरू राहते आणि आवाज निर्माण होतो. प्रत्येकाच्या आवाजाची प्रत ही त्याच्या स्वरयंत्रातील या दोन पट्ट्यांची लांबी, जाडी, आकार, त्यावरील ताण यावर अवलंबून असते.

--------------------------------------------------------------------
आवाज कुणाचा?
आपल्या घशात असलेल्या स्वरयंत्रामधल्या स्नायूंच्या दोन पट्ट्यांच्या कंपनांमुळे आवाज निर्माण होतो. घशातून निर्माण झालेला ध्वनी जीभ, जबडा, टाळू, ओठ यांच्या प्रभावामुळे बदलत जातो आणि आपल्या तोंडून "आवाज' बाहेर पडतो. बोलाण्यासाठी, गाण्यासाठी, हसण्यासाठी, रडण्यासाठी, ओरडण्यासाठी या आवाजाचा वापर केला जातो. या आवाजातील चढ-उतारांवरून क्रोध, आश्‍चर्य, आनंद यासारख्या भावना व्यक्त केल्या जाऊ शकतात. तर त्याचा प्रभावी वापर करून गायक संगीत निर्माण करतात. पूर्ण वाढ झालेल्या पुरुषांच्या आवाजाची कंप्रता सर्वसाधारणपणे १२५ हर्टझ्‌ एवढी असते. स्त्रियांच्या आवाजाची कंप्रता २१० हर्टझ्‌ तर मुलांच्या आवाजाची कंप्रता ३०० हर्टझ्‌ असते.

--------------------------------------------------------------------
आवाज जपण्यासाठी
चरकसंहितेत दहा कण्ठ्य द्रव्ये सांगितलेली आहेत. कण्ठ्य म्हणजे कंठाला, घशाला हितकर. अनंतमूळ, उसाचे मूळ, ज्येष्ठमध, पिंपळी, मनुका, विदारीकंद, कायफळ, हंसपादी, बृहती, कंटकारी ही द्रव्ये स्वराला हितकर असतात. प्रकृृतीनुरूप व दोषाच्या असंतुलनानुसार या द्रव्यांचा काढा, चूर्ण करून किंवा या द्रव्यांनी सिद्ध तेल वा तूप बनवून वापरणे आवाजासाठी हितकर असते. कण्ठ्य द्रव्यांपासून "संतुलन स्वरित'सारख्या गोळ्या तयार करून ठेवता येतात व या गोळ्या गवई, प्रवचनकार, वक्‍ते यांनी नित्य सेवन केल्यास आवाज उत्तम ठेवण्यास मदत मिळते.
--------------------------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे

नादानुसंधान

नादानुसंधान


(डॉ. श्री बालाजी तांबे)
शारीरिक, मानसिक, आत्मिक असे सर्व प्रकारचे आरोग्य मिळविण्याचे मुख्य साधन आहे नादयोगातील ॐकार. थोडी मेहनत करून आवाजाचे आरोग्य सुधारायचे आणि ॐकार उपासना करून पुन्हा आपले आरोग्य चांगले ठेवायचे, असे एक सुंदर चक्र चालू ठेवल्यास नादानुसंधान अनुभवणे शक्‍य आहे. .......
जरा काही कुठे खुट्ट झाले की लगेचच हृदयाचे ठोके आपोआप वाढतात. नादापासून सर्व विश्‍वाची उत्पत्ती झालेली आहे असे केवळ भारतीयच नव्हे तर जगातील बहुतेक सर्व संस्कृतीत समजले जाते. हेही खरेच आहे की मनुष्य आहे म्हणून जग आहे व जग आहे म्हणून मनुष्य आहे. मनुष्य आहे असे केव्हा म्हणायचे तर त्याच्या छातीची धडधड सुरू असली तर! म्हणूनही कदाचित म्हटले जात असावे की या आवाजामुळे सर्व जग तयार झाले. मनुष्याचे अस्तित्व आवाजावरच आहे. हा नित्य चालणारा आवाज अनाकलनीय, अद्वितीय व अनादी अशा स्पंदनातून तयार झालेला आहे.

आवाजाविषयी शाळेत शिकत असताना फोर्क दाखविला जातो. फोर्कवर आघात केल्यावर तो स्पंदित होतो, असा स्पंदन पावणारा फोर्क टेबलावर टेकविला तर एक विशिष्ट आवाज येतो, पाण्याच्या ग्लासवर टेकविला तर वेगळा आवाज येतो आणि पाण्यामध्ये स्पंदने दिसू लागतात.

प्राणस्पंदन म्हणजे जगाच्या मुळाशी असलेला जो प्राण, जी ऊर्जा, जी शक्‍ती ती स्वतःचे अस्तित्व स्पंदनरूपाने सांगू इच्छिते. ही सवय शेवटी प्रत्येक प्राणिमात्रात येते. जन्माला आलेले बालक जोपर्यंत ट्यां।।हां असे रडून "मी आलो' असे सांगत नाही तोपर्यंत बाकीच्यांचे श्‍वास अडकलेले असतात, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही. एकदा का बालकाने आवाज काढला की सर्वांना हायसे होते. दुसऱ्याशी आवाजाच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी मूल रडते. स्वतःचे अस्तित्वाची इतरांनी दखल घ्यावी या हेतूने या आवाजाची योजना झालेली दिसते. म्हणून आवाजाला खूप महत्त्व आहे.

माणसाला नाद उत्पन्न करताच आला नाही व हा उत्पन्न केलेला नाद संपर्कासाठी उपयोगात आणता आला नाही तर त्या आवाजाला काही महत्त्व नाही. तसेच, त्या माणसालाही काही महत्त्व नाही. आपले म्हणणे काय आहे हे मांडण्यासाठी बोलावे लागतेच. एखाद्याला "पुन्हा, असे करशील तर सांगून ठेवतो' असे दरडावत असतानाचा आवाज स्त्रीआवाजासारखा बारीक आणि चिरका असला तर त्या वाक्‍याला काही अर्थ राहणार नाही. अशा दरडावणीला कोणी विचारणार नाही, उलट हसतीलच. तेव्हा आवाज शक्‍तीचे निदर्शनही करत असल्यामुळे तो दमदार, भरदार, व्यक्‍तिमत्वाला शोभेल असा असावा. लहान मूल घोगऱ्या आवाजात बोलायला लागले किंवा एखादा म्हातारा मनुष्य बारीक, चिरक्‍या आवाजात बोलायला लागला तर विनोदी ठरते.

म्हणून आवाजाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. माणसाला जन्मतः कंठ उत्तम असणे आवश्‍यक आहे. त्याचे आरोग्य टिकावे यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करणे आवश्‍यक असते. आवाज म्हणजे आत असलेल्या श्क्‍तीचे स्पंदन आहे हे लक्षात ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणून शक्‍ती कमी झाल्यावर आवाज क्षीण होतो, बोलवत नाही व अशा वेळी डोळे आकाशाकडे लागले तर कुणाला नवल वाटण्याचे कारण नाही. आवाज शक्‍तीवर अवंलबून असतो तसेच एकूण आवाजाचा दमदारपणा व तो प्रगट करण्याची कालमर्यादा फुप्फुसांवर अवलंबून असते. म्हणून फुप्फुसे मजबूत असणेही आवश्‍यक असते. सर्वात मोठा आवाज म्हणजे भुभुःकार. हा भुभुःकार वानरांपासून वा वानरांची देवता असलेल्या हनुमंतापासून येतो. हनुमंत ही देवता शक्‍तीची आहे हेही सर्वांना माहीत असते. शक्‍ती कमवणे हे आवाजाचे आरोग्य टिकविण्याचे एक मोठे साधन आहे. स्त्री व पुरुषांचे कंठ वेगळ्या तऱ्हेने निर्माण झालेले असतात. पुरुषांचा स्वर स्त्रियांच्या स्वराच्या साडेतीन मात्रा खाली असतो. पुरुषी किंवा बायकी आवाजाची गुणवत्ता वेगळी असल्यामुळे, पुरुषाचा बायकी आवाज वा बाईचा पुरुषी आवाज असणे अनैसर्गिक समजले जाते.

किती वेळ सातत्याने बोलता येईल हेही महत्त्वाचे असते. अगदी दोन मिनिटे बोलल्यावर कंठशोष होऊ नये आणि अर्ध्या तासाच्या संभाषणात २५ वेळा पाण्याचा घोट घ्यायला लागू नये. सध्या सर्वात चलतीचा विषय आहे राजकारण. राजकारणही आवाजावरच चालते. लोकांना खरी-खोटी आश्‍वासने देताना उपयोगी पडतो तो आवाजच. तो आवाज लोकांचा विश्‍वास बसेल, असा असला पाहिजे. गायक, नट, प्रवचनकार यांच्यासाठी जसा आवाज महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे राजकारण्यांसाठीही आवाज महत्त्वाचा आहे. निवडणुका जवळ आल्या की आवाज उ त्तम असायला पाहिजेच. आवाजाच्या जातीप्रमाणे आवाजाचे आरोग्य सांभाळण्याची आवश्‍यकता असते. नुसता शब्द प्रकट झाला म्हणजे आवाज चांगला आहे, असे म्हणता येणार नाही. लावणी, पोवाडा हे प्रकार गाणाऱ्यांचे आवाज तर वेगळे असावेतच परंतु प्रेमगीत, भावगीत, भक्‍तिगीत गाणाऱ्यांचेही आवाज वेगळे असावे लागतात. त्या आवाजाचे आरोग्यही तसेच सांभाळावे लागते.

लहानपणी जर स्तोत्रे, परवचे तोंडपाठ करण्याचा प्रयत्न केलेला असला तर आवाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होतो. आवाज चांगला राहण्यासाठी कफदोष नसावा, तसेच वातदोषही नसावा. एकूणच तिन्ही दोष आवाजावर परिणाम करणारे ठरतात. पण कफ- वातदोषयुक्‍त आवाज दुसऱ्याला भीती उत्पन्न करणारा किंवा शंका उत्पन्न करणारा असतो. पित्तदोषाचा आवाजातून आततायीपणा किंवा "मी म्हणतो तेच खरे' असा ठामपणा जाणवतो. एकूण त्रिदोषांचे समत्व असेल तर आवाज व त्यासाठी कंठ उत्तम तयार असावा. सराव करण्याने आवाज सुदृढ होतो, कंठ तयार होतो. वीर्यधातूशी आवाजाचा संबंध असल्यामुळे अति मैथुनाने आवाज बिघडतो, तर वीर्यसंवर्धनामुळे आवाज कर्णमधुर होतो.

ताकद देणारे पदार्थ सेवन करण्याने, तूप, मध वगैरे सेवन करण्याने आवाज सुधारायला मदत होते. गरम पाण्यात पुदिना, मध, सुंठ घालून पिण्यानेही आवाजाचे आरोग्य सुधारते. कंकोळ तोंडात धरण्याने आवाजाचे आरोग्य सुधारते. नको ते पदार्थ खाण्याने, सारखे पोट बिघडलेले असल्याने, अति मद्यपान करण्याने वा धूम्रपान करण्याने कंठाला सूज आल्याने आवाज खराब होतो.

आवाज हे विचार प्रकट करण्याचेही साधन आहे. म्हणजेच प्रथम विचार स्पष्ट असणे आवश्‍यक असते. विचार स्पष्ट नसणाऱ्या व्यक्‍तीत जिव्हादोष नसला तरी बोलण्यात ततपप... वा आ, उं... ची बाराखडी असलेली आढळते. एखादी कल्पना सांगताना स्वतःला शंका व ज्याला ऐकवले जात आहे तो ऐकत आहे की नाही व त्यानुसार वागेल की नाही याची शंका असली तर आवाज नीट उमटत नाही. बोलणे नीट होण्यासाठी विचार सुस्पष्ट असावे लागतात. विचार सुस्पष्ट असण्यासाठी योग्य वाचन व शिक्षण असावे लागते, स्वतःविषयी आत्मविश्‍वास असावा लागतो तसेच दुसऱ्यांविषयी प्रेम असावे लागते. बेंबीपासून उत्पन्न होणारा एकच आवाज, व तो म्हणजे "ॐ'. नुसते आवाजाचे आरोग्य नाही तर सर्व अवयवांचे, शारीरिक, मानसिक, आत्मिक असे सर्व प्रकारचे आरोग्य मिळविण्याचे मुख्य साधन आहे, नादयोगातील ॐकार. म्हणून थोडी मेहनत करून आवाजाचे आरोग्य सुधारावयाचे व सुधारलेल्या आवाजाने ॐकार उपासना करून पुन्हा आपले आरोग्य चांगले ठेवायचे असे चक्र चालू ठेवल्यास जीवनातील गंमत अनुभवताना नादानुसंधान व शांती अनुभवणे शक्‍य आहे.

- डॉ. श्री बालाजी तांबे

Friday, April 18, 2008

शरीरशुद्धी

शरीरशुद्धी
सौंदर्याला सर्वांत घातक काय? असा प्रश्‍न विचारला तर त्याचे उत्तर येईल "शरीरात साठणारी विषद्रव्ये'. आहाराद्वारे, पाण्याद्वारे, हवेद्वारे आपल्या शरीरात अनेक विषद्रव्ये प्रवेशित होत असतात. मल-मूत्र-घामामार्फत बरीचशी विषद्रव्ये शरीराबाहेर जात असली तरी हे काम रोजच्या रोज अगदी १०० टक्के होतेच असे नाही. परिणामत- हळू हळू शरीरात विषद्रव्ये साठत जातात. त्यातूनच मग रंग काळवंडणे, वजन वाढणे, निस्तेज होणे, उत्साह कमी होणे यासारखे त्रास जाणवू लागतात. अशा परिस्थितीत नुसत्या औषधांनी त्रास कमी करण्यापेक्षा मूळ कारण असणारी विषद्रव्ये शरीराबाहेर काढून टाकणे सर्वोत्तम असते. विशेषत- पंचकर्मातील विरेचन आणि बस्ती या दोन कर्मांद्वारे शरीरातील पित्त व वात दोषांचे संतुलन साधले गेले आणि विषद्रव्ये दूर झाली की सौंदर्यावरचे सावटही दूर होऊ शकते. त्रास होत नसला तरी वयाच्या पस्तिशी-चाळिशी दरम्यान एकदा शरीरशुद्धी करणे सौंदर्य तसेच आरोग्यासाठीही हितकर असते. अशा प्रकारची शरीरशुद्धी शास्त्रोक्‍त पद्धतीने व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे उत्तम असतेच. बरोबरीने घरच्या घरी पंधरा दिवसातून एकदा तीन-चार जुलाब होतील एवढ्या प्रमाणात प्रकृतीनुरूप जुलाबाचे औषध घेणेही उपयुक्‍त असते. यासाठी एरंडेल तेल, त्रिफळा, गंधर्वहरीतकी आदी औषधे घेता येतात.

पंचकर्म म्हणजे शरीरातील प्रत्येक पेशी शुद्ध होणे. आजकाल बहुतांशी वेळेला नुसता मसाज, स्वेदन, शिरोधारा वगैरे वरवरचे उपचार करण्याला "पंचकर्म' संबोधले जाते. परंतु, पंचकर्म म्हणजे शरीर आतूनही स्वच्छ करणे. जसे "संतुलन पंचकर्मा'मध्ये अंतर्स्नेहन, बह्रिस्नेहन, स्वेदन, विरेचन, बस्ती, नस्य वगैरे उपचारांचा समावेश असतो. यामुळे शरीरातील पेशी न्‌ पेशी शुद्ध होते, पुनर्जीवित होते, सतेज होते. याने सौंदर्य व आरोग्य दोन्हीचाही लाभ होतो. सर्वप्रथम अशी शरीरशुद्धी करून घेतली आणि नंतर आयुर्वेदिक पद्धतीने फेशियल, रक्‍तशुद्धिकर द्रव्यांची बस्ती वगैरे उपचार घेतले तर त्वचा नितळ, सतेज होणे सहज शक्‍य असते. नुसत्या मसाज, शिरोधारा यांनी असे परिणाम मिळत नाहीत.

पोट साफ ठेवणे तर सौंदर्यासाठी खूपच आवश्‍यक असते. खाल्लेल्या अन्नाचे सप्तधातूत व पर्यायाने शक्‍तीत रूपांतरण होण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्‍यक असते, जेणेकरून शरीराला सौष्ठवही येते.

शल्यचिकित्सेने शरीरात ताबडतोब बदल करून घेता येत असला तरी तसे न करता शरीराला तेल लावणे, जेणेकरून शरीरावर जमलेला मेद कमी होऊ शकतो, नितंब, वक्षस्थळ वगैरे ठिकाणी तेल लावून त्यांचे सौष्ठव टिकविता येते, असे आयुर्वेदाने सांगितले आहे. या व अशा तत्सम आयुर्वेदिक उपचारांनी नुसतेच सौंदर्य वाढते असे नाही तर शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन राहून सर्वांगीण मदत मिळते.

आहार व आचरण
योग्य आहार आरोग्यासोबत सौंदर्यासाठीही आवश्‍यक असतो. सौंदर्यासाठी वात-पित्तदोष नियंत्रित रहायला हवेत आणि शरीरपोषक कफदोषाचे पोषण व्हायला हवे. त्यासाठी आहारात दूध, साजूक तूप, यासारखी शरीरपोषक स्निग्ध द्वव्ये; मनुका, अंजीर, डाळिंबासारखी रस- रक्‍तधातुपोषक फळे; खारीक, डिंकाचे लाडू, खसखस आदी अस्थिधातुपोषक पदार्थ यांचा समावेश असावा. केशर, हळद, मध, साळीच्या लाह्या, खडीसाखर रक्‍तशुद्धिकर व शरीरपोषक असल्याने सौंदर्यासाठी उत्तम. असे सौंदर्याला हितकर पदार्थ आहारात असायला हवेत तसेच त्वचेला, केसांना बिघडवू शकणारे, बांधा बेडौल करू शकणारे पदार्थ टाळायलाही हवेत. उदा. तिळाचे, मोहरीचे तेल खाणे टाळावे. चिंच, मिरची, टोमॅटो, आंबट दही, अननस यांचा अतिरेक टाळावा. दूध व फळे एकत्र करू घेऊ नयेत. मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे. रासायनिक खते, फवारे यांवर जोपासलेल्या भाज्या-फळे टाळाव्यात. दीर्घकाळ टिकण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केलेले, प्रिझर्वेव्हिज्‌ घातलेले अन्न टाळावे. प्रक्रिया करून डब्यात भरून ठेवलेले फळांचे रस, शीतपेये, फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे टाळावे.

वेळेवर पुरेशी झोप घेणे, नियमित वेळेला जेवणे, केस-डोळे-त्वचा यांना तीव्र ऊन फार वेळ लागू न देणे, दुपारी न झोपणे, मल-मूत्रादि नैसर्गिक वेग बळेच धरून न ठेवणे आरोग्यासोबत सौंदर्यासाठीही हितकर असते.

व्यायाम व योग
सौंदर्यासाठी तेज हवे आणि तेजासाठी प्राणशक्‍तीचे संचरण व्हायला हवे. मन जेवढे शांत व प्रसन्न तेवढे सौंदर्याला पूरक. रागाने नैराश्‍याने किंवा शोकाने मन ग्रासले की तेज आणि पर्यायाने सौंदर्य कमी होते. प्रसन्न मन आणि प्राण संचरण हे दोन्ही साध्य होण्यासाठी नियमित योग-व्यायाम महत्त्वाचा होय. नियमित चालणे, जॉगिंग, पोहणे आदी व्यायाम सर्वांनाच अनुकूल असतात. बरोबरीने सूर्यनमस्कार, शीतली क्रिया, अनुलोम-विलोम, प्राणायाम, समर्पण-स्थैर्य आदी संतुलन क्रियाही परिणामकारी ठरतात.

थोडक्‍यात सौंदर्य व आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, जीवन सर्वार्थाने जगण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्या अत्यावश्‍यक असतात. पंचक्रियांच्या साहाय्याने सौंदर्य टिकविण्याचा व वाढविण्याचा प्रयत्न केला तर याचा अनुभव निश्‍चितच घेता येईल.

- डॉ. श्री बालाजी तांबे.

Thursday, April 17, 2008

फळे खा! आरोग्य राखा!!


फळे खा! आरोग्य राखा!!


(डॉ. श्री बालाजी तांबे)
"ऍपल अ डे कीप्स द डॉक्‍टर अवे' असं म्हणतात खरं. पण, फळं आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त म्हणतात ते नेमकं कशामुळे, हे अनेकदा आपल्याला माहीत नसतं. ........
आयुर्वेदात औषधीद्रव्यांची जशी माहिती दिलेली आहे, तशी आहारद्रव्यांचेही सविस्तर वर्णन केलेले आहे. धान्यवर्ग, कडधान्यवर्ग, शाकवर्ग, फलवर्ग असे निरनिराळे वर्ग आयुर्वेदिक संहितांमध्ये दिलेले आहेत. रसाळ फळे दिसायला आणि चविलाही छान असतात. योग्य प्रमाणात, योग्य तऱ्हेने प्रकृतीचा विचार करून खाल्लेली फळे आरोग्यासाठीही उत्तम असतात. फळ नेहमी ताजे व योग्य ऋतूत तयार झालेले असावे. कच्चे किंवा अनेक दिवसांचे जुने फळ खाणे टाळावे. सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या व नियमित सेवन केल्या जाणाऱ्या फळांची आयुर्वेदातील माहिती या प्रमाणे सांगता येईल.

द्राक्षे
फळांचा राजा म्हणून जरी आंबा प्रसिद्ध असला तरी गुणांच्या दृष्टीने विचार करता द्राक्षे सर्व फळात उत्तम समजली जातात. आयुर्वेदात तर "द्राक्षा फलोत्तमा 'असे सांगितलेले आहे.
पक्वं चेन्मधुरं तथा।म्लसहितं तृष्णास्रपित्तापहम्‌ ।
पक्वं शुष्कतमं श्रमार्तिशमनं सन्तर्पणं पुष्टिदम्‌ ।।
... राजनिघण्टु

पिकलेली द्राक्षे चवीला गोड व थोडी आंबट असतात. तहान, रक्‍तविकार व पित्तदोष यामध्ये हितकर असतात. व्यवस्थित पिकलेली तसेच सुकविलेली द्राक्षे थकवा दूर करतात, वेदना शमवितात, तृप्ती करतात व पौष्टिक असतात. ताज्या द्राक्षांचा रस घेणेही आरोग्यासाठी उत्तम असते. एका वेळेला साधारण ४०-५० मिली इतका रस घेता येतो. यातच चमचाभर मध घातल्यास चवही छान लागते व पोषक गुणही वाढतो. द्राक्षांच्या रसाने पित्त कमी होते, लघवीला साफ होते, शरीरातील विषारांचे प्रमाणही कमी होते. कच्ची, आंबट द्राक्षे मात्र पित्त वाढवत असल्याने न खाणेच चांगले. वास्तविक सर्वच फळे खाण्यापूर्वी वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची असतात. द्राक्षांवर कीटकनाशकांचा फवारा मारलेला असल्याने व द्राक्षांची साल काढणे शक्‍य नसल्याने द्राक्षे फारच काळजीपूर्वक स्वच्छ करावी लागतात. यासाठी द्राक्षे मीठ विरघळवलेल्या पाण्यात अर्धा तास भिजत घालावीत व नंतर वाहत्या पाण्यात व्यवस्थित धुवून खावीत.

डाळिंब
हेही आरोग्यासाठी उत्तम फळ असते.
अम्लं कषायमधुरं वातघ्नं ग्राहि दीपनम्‌ । मधुरं पित्तनुत्‌ तेषां पूर्व दाडिमुत्तमम्‌ ।।
... चरक सूत्रस्थान

चवीला गोड, आंबट व तुरट लागणारे डाळिंब वातदोषाचे शमन करते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते व जाठराग्नीला प्रदीप्त करते. तर गोड डाळिंब पित्तशामक असते व उत्तम समजले जाते. डाळिंब हृदयासाठीही हितकर असते.

गोड डाळिंबाचा रस उत्तम पित्तशामक असतो, विशेषतः घशा-पोटात जळजळ होत असताना, लघवीस आग होत असताना, मळमळत असताना खडीसाखर मिसळलेला डाळिंबाचा रस घोट घोट घेण्याचा उपयोग होतो. डाळिंबामुळे रक्‍तधातूचे पोषण होत असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी गोड डाळिंबाचा रस उत्तम असतो. गर्भारपणात सुरुवातीचे तीन-चार महिने पित्ताचा त्रास होतो, उलट्या होतात, अन्न नकोसे वाटते अशा वेळी गोड डाळिंबाचा रस थोडा थोडा घ्यावा. याने पित्त तर शमतेच पण ताकदही नीट राहते. त्रास होत नसला तरी गर्भारपणात डाळिंब खाणे चांगलेच असते. डाळिंबाच्या रसापासून बनविलेला दाडिमावलेह पित्तासाठी प्रभावी औषध समजले जाते.

सफरचंद
बाराही महिने मिळणारे हे फळ आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असते.
कषायमधुरं शीतं ग्राहि सिम्बितिकाफलम्‌ ।
... चरक सूत्रस्थान

चवीला गोड, किंचित तुरट असणारे सफरचंद वीर्याने शीत व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मसदत करते. सफरचंद पचनसंस्थेतील अतिरिक्‍त उष्णता कमी करणारे असल्याने वारंवार तोंड येणे, शौचाला न बांधता होणे, अन्नपचनाची शक्‍ती कमी होणे, पित्तामुळे पोटात दुखणे वगैरे तक्रारींसाठी वापरता येते. पचन खालावलेले असताना, भूक मंद झालेली असताना वाफवलेले सफरचंद खाणे अधिक चांगले असते. लहान मुलांना, वाढत्या वयाच्या मुलांना सफरचंदाचा गर (पल्प) चिमूटभर वेलची व केशर टाकून देण्याने पोषक ठरतो, शरीर भरून येण्यासाठी उपयोगी पडतो.

पपई
तत्पक्वं मधुरं रुच्यं पित्तनाशकरं गुरु ।
... निघण्टु रत्नाकर
पिकलेली पपई चवीला गोड, अतिशय रुचकर व पित्तशामक असते. अति प्रमाणात सेवन केल्यास गुरु म्हणजे पचायला जड वाटली तरी योग्य प्रमाणात घेतली असता पाचक असते. दुपारच्या जेवणासह किंवा जेवणानंतर पपईच्या एक-दोन फोडी खाल्ल्यास अन्नपचन व्यवस्थित होते. ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी अंगावरून कमी प्रमाणात जाते, पोट दुखण्याचा त्रास होतो, त्यांनी रोज दुपारी पपईची एक फोड खाण्याचा उपयोग होतो. पपईचे पळ गर्भाशयसंकोच करणारे असल्याने बाळंतपणानंतर घेण्यासही उत्तम असते, मात्र गर्भारपणात पपई घेऊ नये.

अंजीर
तर्पणं बृंहणं फल्गु गुरु विष्टम्भि शीतलम्‌ ।
... चरक सूत्रस्थान
अंजीर शीत वीर्याचे, शरीर तृप्त करणारे, मांसधातूला पोषक असते. अंजिराचे ताजे फळ पित्त तर कमी करतेच पण रस-रक्‍तधातूसाठी पोषक ठरते. संगणकावर काम करणाऱ्यांनी, सातत्याने उपवास करणाऱ्यांनी, रात्रपाळी किंवा जागरणे करणाऱ्यांनी अंजिराच्या ऋतूत रोज एक-दोन अंजिर खावेत. पाळीच्या वेळेस कमी रक्‍तस्राव होणाऱ्या स्त्रीने तसेच हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी अंजिरे अवश्‍य खावीत. पिकलेल्या अंजिराचा जॅमही रक्‍तवृद्धी करण्यास उत्तम असतो.

आंबा
पक्वमाम्रं जयेत्‌ वायुं मांसशुक्रबलप्रदम्‌ ।।
... चरक सूत्रस्थान
पिकलेला आंबा वाताला जिंकतो अर्थात कमी करतो, मांसधातू, शुक्रधातूला पोषक असतो, शरीरशक्‍ती वाढवतो. आंब्याचे फळ तीन महिन्यांचे झाले की झाडावरून खाली काढले जाते व गवताच्या अढीत ठेवून पिकवले जाते. पूर्ण पिकलेले आंब्याचे फळ दिसायला, चवीला तसेच वासाला उत्तम असते. पूर्ण पिकलेला आंबा खाण्यापूर्वी साधारण तासभर साध्या पाण्यात भिजत ठेवावा व नंतर रस काढून खावा. वाटीभर आंब्याच्या रसात एक-दोन चमचे साजूक तूप व चिमूट-दोन चिमूट मिरपूड वा सुंठीचे चूर्ण टाकून घेतल्यास आंबा पचायला मदत होते व पचलेला आंबा ताकद वाढवतो, हृदयाला पोषक ठरतो, शुक्रघातू वाढवतो, शरीर भरायला व वजन वाढायला मदत करतो. कच्चा आंबा अर्थात कैरी मात्र पित्तकर असते. उन्हाळ्यामध्ये कैरीचे पन्हे अधून मधूून पिणे योग्य असले तरी अति प्रमाणात कैरीचा वापर न करणेच चांगले. मधुमेहाच्या व्यक्‍तींनी मात्र आंबा खाऊ नये.

संत्रे
मधुरं किञ्चिदम्लं च हृद्यं भक्‍तप्ररोचकम्‌ ।
दुजर्रं वातशमनं नागरङफलं गुरु ।।
... चरक सूत्रस्थान
संत्री चवीला आंबट-गोड असतात, हृदयाला पोषक असतात, जेवणाची रुची वाढवितात, वातदोषाचे शमन करतात, गुरु गुणाची असतात. संत्रे आंबट असल्याने पित्तप्रकृतीसाठी अनुकूल नसते.

मोसंबे
मोसंबी चवीला गोड असल्याने पित्तप्रकृतीसाठीही उत्तम असतात. पथ्यकर असल्याने तापात, आजारपणातही मोसंबीचा रस देता येतो. मोसंबीचा रस गाळून घेतला तर कफदोषही वाढवत नाही.
मोसंबी चवीला संत्र्यापेक्षा गोड असल्याने अधिक गुणकारी असतात. या दोन्ही फळांचा रस रसधातूसाठी उत्तम असतो. अतिरिक्‍त श्रम झाल्याने थकवा आला, उन्हामुळे किंवा व्यायामामुळे घाम आल्याने शरीरातील जलांश कमी झाला की संत्र्या-मोसंबीचा रस घेणे चांगले असते. संत्री तसेच मोसंबी हृदयाला हितकर व रुचकर असल्याने अकारण धडधड होत असल्यास, छातीत अस्वस्थता जाणवत असल्यास मध तसेच खडीसाखर टाकलेला संत्र्या- मोसंबीचा रस घोट घोट घेण्याचा फायदा होतो. अर्थात हृदयामध्ये विकृती असल्यास बरोबर ीने इतर औषधांची आवश्‍यकता असतेच. भूक लागते पण जेवायची इच्छा होत नाही अशा वेळी संत्र्या-मोसंबीचा रस मीठ-जिरे-ओवा यासह घोट घोट घेण्याने तोंडाला रुची येते. पित्ताची प्रकृती असणाऱ्यांनी किंवा पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी संत्र्यापेक्षा मोसंबीचा वापर अधिक करणे चांगले. वारंवार सर्दी, खोकला होणाऱ्या व्यक्‍तींनी संत्र्याचा वापर वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करू नये.

जांभूळ
जांभळ्या रंगाची जांभळे पावसाळ्याच्या सुरुवातीस मिळतात.
कषायमधुरप्रायं गुरु विष्टम्भि शीतलम्‌ ।
जाम्बवं कफपित्तघ्नं ग्राहि वातकरं परम्‌ ।।
... चरक सूत्रस्थान
गोड व तुरट चवीची जांभळे शीत वीर्याची असतात, कफ व पित्तदोष कमी करतात पण मलावष्टंभ करतात, पचायला जड असतात आणि वातवर्धक असतात. पित्त वाढल्यामुळे मळमळत असल्यास किंवा जुलाब होत असल्यास थोडी जांभळे खाण्याने बरे वाटते.. मधुमेहाच्या व्यक्‍तींसाठी जांभूळ पथ्यकारक समजले जात असले तरी ती फार प्रमाणात खाणे अयोग्य होय.

कलिंगड
बाहेरून हिरवट-काळपट व आतून लाल रंगाचे कलिंगडाचे वर्णन आयुर्वेदात या प्रमाणे केलेले आहे.
कलिंगं शीतलं बल्यं मधुरं तृप्तिकारकम्‌ ।
गुरु पुष्टिकरं ज्ञेयं मलस्तम्भकरं तथा ।।
कफकृत दृष्टि पित्ते च शुक्रधातोश्‍च नाशनम्‌ ।।
... निघण्टु रत्नाकर
कलिंगड चवीला गोड, वीर्याने शीत व तृप्ती करणारे असते. कफवर्धक व गुरु गुणाचे असल्याने पुष्टिकर व बलवर्धक असते, मात्र अति प्रमाणात घेतल्यास मलावष्टंभ होतो, दृष्टी तसेच शुक्रधातूचा नाश होतो. जून कलिंगड पित्तवर्धक असते.

केळे
केळ्याच्या अनेक जाती आहेत. त्यांच्या गुणांमध्ये थोडा-फार फरक असतो. त्यातल्या त्यात सोनकेळी किंवा वेलची केळी उत्तम समजली जातात.
सुवर्णमोचा मधुरा हिमा च स्वल्पाशने दीपनकारिणी च ।
तृष्णापहा दाहविमोचनी च कफावहा वृष्यकरी गुरुश्‍च ।।
... राजनिघण्टु
सोनकेळे चवीला गोड, वीर्याने शीत व गुरु गुणाचे असते. थोड्या प्रमाणात सेवन केले असता अग्निदीपन करते, तहान शमवते, दाह कमी करते, कफदोष वाढविते, शुक्रधातूला हितकर असते.
छातीत, पोटात जळजळ होणे, पित्तामुळे पोटात दुखणे वगैरे त्रास वारंवार होत असल्यास केळ्याचे नियमित सेवन करण्याचा उपयोग होतो. अकारण वजन कमी होत असल्यास, अशक्‍तता जाणवत असल्यास किंवा वजन वाढत नसल्यास केळे-मध-तूप एकत्र करून खाण्याचा उपयोग होतो. वात व पित्तप्रकृतीसाठी केळे चांगले असतेच मात्र कफप्रकृतीच्या व्यक्‍तीने केळ्यावर मध व वेलची पूड टाकून खावे.

टरबूज
हनुमान जयंतील? ?र्साद म्हणून खाल्ले जाणारे टरबूज स्वादिष्ट, वीर्याने शीत व कफवर्धक असते, तृप्ती देते, ताकद वाढवते, शुक्रधातूला हितकर असते. टरबूजाच्या सेवनाने कोठा शुद्ध होतो, शरीरश्रम नाहीसे होतात, दाह शमतो, वात व पित्त दोषांचे शमन होते. टरबूज उन्मादावर म्हणजे मनोभ्रम, वेड्यासारखे वागण्यावरही उपयुक्‍त असते. कलिंगडाप्रमाणे टरबूजही जुने झाल्यास पित्त वाढवते.

पेरू
पिकलेला पेरू चवीला गोड आणि कफवर्धक असतो, तर कच्चा पेरू तुरट असतो. कच्चा पेरू खाऊ नये आणि पिकलेला पेरू शक्‍यतो बिया काढून खावा. पिकलेला पेरू खाण्याने मलप्रवृत्ती साफ व्हायला मदत मिळते, जेवणानंतर पोटात आग होणाऱ्यांनी पेरूच्या एक- दोन फोडी खाण्याचा उपयोग होतो. वारंवार सर्दी, खोकला होणाऱ्यांनी, दम्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी पेरू खाऊ नये. तसेच रात्री पेरू खाणे टाळावे.

सिताफळ
सीताफलं तु मधुरं शीतं हृद्यं बलप्रदम्‌ ।
... निघण्टु रत्नाकर
सिताफळ चवीला मधुर, वीर्याने शीत, रुचकर व ताकद देणारे असते, पित्तशामक व कफवर्धक असते. उष्णतेचा त्रास असणाऱ्यांसाठी सिताफळ चांगले असते, मात्र ते पचायला जड असल्याने पचनशक्‍तीचा विचार करून खावे. विशेषतः उन्हाच्या दिवसात, शरद ऋतूत पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून सिताफळ खावे. वारंवार सर्दी, खोकला, दमा होण्याची सवय असणाऱ्यांनी, अंगावर सूज येणाऱ्यांनी, वजन जास्ती असणाऱ्यांनी मधुमेहाच्या रोग्यांनी सिताफळ खाऊ नये.

अननस
पिकलेला अननस आंबट-गोड व सुगंधी असतो. अननस योग्य प्रमाणात घेतल्यास पचनास सहायक ठरू शकतो. विशेषतः कफदोष वाढल्यामुळे पचन मंदावले असल्यास अननसाच्या फोडी चावून खाण्याचा उपयोग होतो. मात्र रिकाम्या पोटी अननस मुळीच घेऊ नये, गर्भवतीने अननस खाऊ नये. पित्ताचा त्रास होणाऱ्यांनी, पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी, वारंवार सर्दी होणाऱ्यांनी अननस न खाणेच चांगले. अशा प्रकारे आपापल्या प्रकृतीचा, दोषप्रकृतीचा विचार करून योग्य त्या फळांचे सेवन करण्याने आरोग्य टिकवण्याचा प्रयत्न करता येतो. फळे खाताना लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे फळे किंवा फळांचा रस उपाशीपोटी, विशेषतः सकाळी नाश्‍त्यासाठी घेऊ नये. तसेच, रात्रीच्या जेवणानंतरही घेऊ नये. जेवणासह किंवा मधल्या वेळेत फळे खाणे उत्तम असते. फळे व दूध एकत्र करून खाऊ नये. तसेच, फळे खाल्ल्यावर लगेच दूध पिऊ नये.

----------------------------------------------------------------------
आजार रोखणारी फळे!
फळांमुळे आजारांना प्रतिबंध करता येतो तसाच आजारांनंतर शरीराची कमी झालेली शक्ती भरून काढण्यासाठीही फळांचा उपयोग होतो. फळांतील विविध पोषक घटकांमुळे हे शक्‍य होते. अन्नपदार्थांचे पचन लवकर व्हावे यासाठी त्यांत पाण्याचे प्रमाण चांगले असावे लागते. फळांमध्ये निसर्गतःच पाण्याचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्यांचे पचन लवकर होते. चांगले होते.

फळांतील शर्करेचे ज्वलन शरीरात लवकर होते आणि या क्रियेत निर्माण होणारी द्रव्ये शरीराला त्रासदायक नसतात. या तुलनेत मेद आणि प्रथिनांचे शरीराला आवश्‍यक असलेल्या ऊर्जेत रूपांतर करणे अधिक गुंतागुंतीचे असते. या प्रक्रियेत निर्माण होणारी रसायने शरीराला त्रासदायक ठरू शकतात. प्रथिनांची निर्मिती अमायनो ऍसीडस्‌पासून होते. आपल्या शरीरात एकूण २० वेगवेगळ्या अमायनो ऍसीडस्‌चा वापर केला जातो. त्यापैकी आठ अमायनो ऍसीडस्‌ शरीराला अत्यावश्‍यक असतात. केळ्यासारख्या अनेक फळांमध्ये ही सर्व अमायनो ऍसीडस्‌ असतात.
----------------------------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला.

Tuesday, April 15, 2008

स्तंभन, संतर्पण आणि अपतर्पण

स्तंभन, संतर्पण आणि अपतर्पण


(डॉ. श्री बालाजी तांबे)
शरीराला शीतलता प्रदान करणारी स्तंभन उपचारपद्धती सहा उपचारपद्धतींच्या गटात सर्वांत शेवटी येते. या सहा उपचारपद्धती शरीरधातूंचे पोषण करणाऱ्या आणि पोषण न करणाऱ्या - म्हणजेच संतर्पण आणि अपतर्पण - अशा दोन गटांत विभागल्या गेलेल्या आहेत. .......
सहा मुख्य उपचारांमधील शेवटचा उपचार आहे स्तंभन. हा स्वेदनाच्या विरुद्ध गुणाचा असतो. म्हणजे स्वेदनामुळे घाम येतो, उष्णता निर्माण होते, त्या उलट स्तंभनामुळे शीतलता उत्पन्न होते, अतिरिक्‍त द्रवता कमी होते.

स्तंभनाची आवश्‍यकता कोणाला असते हे चरक संहितेमध्ये या प्रकारे सांगितलेले आहे,
पित्तक्षाराग्निदग्धा ये वम्यतीसारपीडिताः ।
विषस्वेदातियोगार्ताः स्तंभनीया निदर्शिताः ।।
... चरक सूत्रस्थान

पित्त प्रकृती असल्यास, क्षारप्रयोग वा अग्निकर्म अधिक प्रमाणात झाल्यास, उलट्या अथवा जुलाब होत असल्यास, शरीरातील विषद्रव्ये अतिवेगाने बाहेर पडत असल्यास, घाम अति प्रमाणात येत असल्यास स्तंभन उपचार करणे आवश्‍यक असते.

सामान्यतः मधुर, कडू, तुरट चवीच्या व शीत वीर्याच्या गोष्टी स्तंभन करणाऱ्या असतात, उदा. लाह्या, आवळा, नागरमोथा, जांभूळ वगैरे. अशा प्रकारे आयुर्वेदात लंघनापासून स्तंभनापर्यंत सहा प्रकारचे उपचार सांगितलेले आहेत. जो रुग्णाच्या स्थितीनुसार, रोगानुसार या सहाही उपचारांची योग्य योजना करू शकतो, तोच श्रेष्ठ वैद्य होय, असेही चरकाचार्य म्हणतात. या सहा उपचारांचे दोन गटात वर्गीकरण करता येते. "संतर्पण' करणारे व "अपतर्पण' करणारे. संतर्पण म्हणजे शरीरधातूंचे पोषण करणे, शरीराला सुख देणे, तृप्ती करणे. एका नियत प्रमाणापर्यंत संतर्पणाची आवश्‍यकता प्रत्येकालाच असते. शरीराची ताकद वाढविण्यासाठी, धातूंना बलवान बनविण्यासाठी संतर्पण अत्यावश्‍यक असते. बृंहण, स्नेहन व स्तंभन हे तीन उपचार संतर्पण गटात बसतात. परंतु, या उपचारांचे फायदे मिळण्यासाठी, खऱ्या अर्थाने संतर्पण होण्यासाठी ते योग्य तऱ्हेने, यथोचित प्रमाणात करणेही तेवढेच आवश्‍यक असते. अन्यथा संतर्पणजन्य रोग निर्माण होतात. आयुर्वेदात संतर्पणजन्य रोगाची कारणे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत.

स्निग्ध, पचायला जड, कफवर्धक अन्न, मिठाया अति प्रमाणात खाणे.
नवीन (एक वर्ष न झालेले) धान्य, नवीन मद्याचे सेवन करणे.
दूध, तूप, गुळापासून बनविलेल्या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन करणे.
पिष्टमय पदार्थ अति प्रमाणात खाणे.
शारीरिक श्रम, व्यायाम वगैरे न करणे.
दिवसा झोपणे किंवा दिवसभर आरामात बसून राहणे.

या कारणांमुळे संतर्पणाचा अतिरेक होऊन संतर्पणजन्य रोग निर्माण होतात.

संतर्पणजन्य रोग याप्रमाणे होत. प्रमेह, कोठ (अंगावर गांधीप्रमाणे चकत्या उठणे), कंडू (खाज सुटणे), पाण्डुरोग (शरीर निस्तेज होणे), त्वचारोग, आमदोष, लघवी अडखळत होणे, जेवणात रुची नसणे, डोळ्यांवर झापड येणे, मैथुनसामर्थ्य नष्ट होणे, अतिस्थूलता, आळस, अंग जड होणे, इंद्रिये जडावणे, बुद्धी जड होणे, सदैव चिंताग्रस्त राहणे, अंगावर सूज येणे वगैरे.

संतर्पणाच्या विरुद्ध असते अपतर्पण. त्यामुळे संतर्पणजन्य रोगांवर उपचार म्हणून अपतर्पण करता येते. अपतर्पणामध्ये लंघन, रूक्षण, स्वेदन या तीन उपचारांचा समावेश होतो.

शरीरधातूंची अवाजवी प्रमाणात झालेली वाढ कमी करण्यासाठी, अनावश्‍यक कफदोष, मेद, आळस झडण्यासाठी अपतर्पणाची गरज असली तरी ते प्रमाणापेक्षा अधिक होऊन चालत नाही. वजन वाढू नये यासाठी किंवा वाढलेला मेद कमी व्हावा यासाठी शरीरपोषक द्रव्यांचे अजिबात सेवन न करण्याने, मेद झडून जाण्यासाठी रुक्ष, उष्ण द्रव्यांचे, औषधांचे अतिसेवन करण्याने अपतर्पण होताना दिसते. रक्‍तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्‌स प्रमाणापेक्षा वाढू नये यासाठी गोळ्या घेत राहण्यानेही हळूहळू अपतर्पणाची लक्षणे दिसू लागतात.

आयुर्वेदात अपतर्पणजन्य रोग या प्रमाणे सांगितलेले आहेत,
शरीर तसेच जाठराग्नीची ताकद कमी होणे.
त्वचेची कांती, ओज, शुक्रधातू, मांसधातू यांचा क्षय होणे.
ताप, बरगड्यांमध्ये वेदना, अरुची, श्रवणशक्‍ती कमी होणे, मनोभ्रम, प्रलाप, हृद्रोग, मल-मूत्राचा अवरोध, शरीरात वेदना, संधिशूळ, विविध वातरोग उत्पन्न होणे.

ज्या प्रमाणे संतर्पणजन्य रोगांवर अपतर्पण उपचार करायचे असतात, तसेच अपतर्पणजन्य रोगांवर संतर्पण उपचार करायचे असतात.
या उपचारांची थोडक्‍यात माहिती आपण पुढच्या वेळेला पाहू.

- डॉ. श्री बालाजी तांबे

Friday, April 4, 2008

डोळ्यांच्या आरोग्यासाठी नेत्रबस्ती


(डॉ. श्री बालाजी तांबे)
आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार नेत्रदोष कोणत्या असंतुलनामुळे झाला आहे, हे लक्षात घेऊन उपचारांचे स्वरूप व कालावधी त्या अनुषंगाने बदलला जातो. .......
डोळे म्हणजे शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय. जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी सर्वच इंद्रिये संपन्न असायला हवीत हे खरे असले तरी त्यातल्या त्यात डोळे अग्रणी ठरावेत. अष्टांगसंग्रहात डोळ्यांचे महत्त्व अशा प्रकारे सांगितले आहे,

चक्षुरक्षायां सर्वकालं मनुष्यैःयत्नः कर्तव्यो जीविते यावदिच्छा ।व्यर्थो लोको।य़ं तुल्यरात्रिनिन्दवानांपुंसामन्धानां विद्यमाने।पि वित्ते ।।
... अष्टांगसंग्रह उत्तरस्थान

जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मनुष्याने डोळ्यांच्या रक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. अंध व्यक्‍तीजवळ धन-संपत्ती असली तरी त्याच्यासाठी दिवस व रात्र एकच असल्याने सर्वच व्यर्थ होते.

डोळे अतिशय संवेदनशील तसेच नाजूक असतात. बाह्य वातावरण, शरीरातील दोष-धातूंची स्थिती एवढेच नाही तर मानसिक अवस्थेचाही डोळ्यांवर चांगला-वाईट परिणाम होत असतो. दृष्टी म्हणजेच दिसण्याची क्रिया योग्य असण्यासाठी दर्शनग्रहण करणारे चक्षुरेंद्रिय तर चांगले हवेच पण ते ज्या आधारे राहते ते डोळेरूपी अवयवही उत्तम असायला हवेत.

चष्मा लागतो म्हणजेच दृष्टी किंवा नजर कमकुवत होते. यामागे अनेक बिघाड असू शकतात. या बिघाडांची अनेक कारणे असू शकतात. सगळेच बिघाड झटपट दूर होतील असे नाही पण आयुर्वेदशास्त्रात नेत्ररोगाची कारणे, प्रकार व उपचार यांची सविस्तर माहिती दिलेली आढळते.

सुश्रुतसंहितेमध्ये ७६ प्रकारचे नेत्ररोग वर्णन केलेले आहेत, तर वाग्भटाचार्यांच्या मते ९४ प्रकारचे नेत्ररोग आहेत. नेत्रदोषाचे निदान करताना तो वातदोषातील बिघाडामुळे झाला आहे का पित्तदोषातील असंतुलनामुळे झाला आहे का कफदोष अति प्रमाणात वाढल्यामुळे झाला आहे हे मुख्यत्वाने पहावे लागते, तसेच रक्‍तात बिघाड झाल्याने, शरीरधातूंची ताकद कमी झाल्याने दृष्टी खालावते आहे का होही पाहावे लागते. अर्थातच उपचारांचे स्वरूप व उपचारांचा कालावधी त्या अनुषंगाने बदलत जातो.

सर्वसाधारणपणे नेत्ररोगावर खालील प्रकारचे उपचार केले जातात.

नेत्रबस्ती (नेत्रतर्पण) - यामध्ये उडदाच्या पिठाच्या सहायाने डोळ्यांभोवती पाळे तयार केले जाते व त्यात डोळा, पापण्या व पापण्यांचे केस बुडतील एवढ्या प्रमाणात औषधांनी सिद्ध केलेले तेल अथवा तूप भरले की डोळ्यांची उघडझाप करायची असते आणि साधारणपणे १५ ते २५ मिनिटांपर्यंत अशी नेत्रबस्ती घ्यायची असते. रोगाच्या अवस्थेनुसार ही नेत्रबस्ती रोज वा एक दिवसा आड घेता येते. नेत्रबस्तीमुळे डोळ्यांची ताकद तर वाढतेच पण दृष्टीही सुधारू शकते. नेत्रबस्तीत वापरलेल्या औषधी द्रव्यांचा परिणाम दृष्टिनाडीपर्यंत सुद्धा पोचू शकतो.

नस्य - सिद्ध घृत वा तेल नाकामध्ये टाकणे म्हणजे नस्य होय. नाक, कान व डोळे ही तिन्ही इंद्रिये एकमेकांशी संबंधित असतात हे सर्वज्ञातच आहे. आयुर्वेदात तर या तिन्ही इंद्रियांचा शिरामध्ये ज्या एका बिंदूपाशी संयोग होतो त्याला "शृंगाटक मर्म' अशी संज्ञा दिलेली आहे. नस्याद्वारे औषध शृंगाटक मर्मापर्यंत पोचले की त्याचा डोळ्यांवर, दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच दृष्टी सुधारण्यासाठी नस्य हा एक महत्त्वाचा उपचार असतो.

शिरोबस्ती - नेत्रबस्तीमध्ये जसे डोळ्यांभोवती पाळे बांधले जाते, तसेच शिरोबस्तीमध्ये डोक्‍यावर उंच टोपी घातल्याप्रमाणे उडदाच्या पिठाच्या व चामड्याच्या साहाय्याने पाळे बांधले जाते व त्यात सिद्ध घृत वा सिद्ध तेल ३० ते ९० मिनिटांपर्यंत भरून धारण केले जाते. या उपचारांचा डोळ्यांशी प्रत्यक्ष संबंध येत नसला तरी प्रत्यक्षात त्याचा उपयोग दृष्टी सुधारण्यासाठी तसेच नेत्ररोगनिवारणासाठी होताना दिसतो.

पुटपाक - नेत्रबस्तीप्रमाणेच या उपचारामध्ये वनस्पतीचा ताजा रस डोळ्यांवर धारण केला जातो. ज्या द्रव्यांचा रस निघत नाही अशा द्रव्यांचा रस पुटपाक पद्धतीने काढला जातो.

अंजन - डोळ्यात काजळाप्रमाणे औषध घालणे म्हणजे अंजन करणे होय. अंजन ज्या द्रव्यांपासून बनविले जाते त्यानुसार त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य असते. काही अंजनांमुळे डोळ्यांचे प्रसादन होते म्हणजेच डोळ्यांचा थकवा दूर होतो. संगणक वगैरे प्रखर गोष्टींकडे सातत्याने बघितल्यामुळे येणारा डोळ्यांवरचा ताण नाहीसा होण्यास मदत मिळते. उदा. "सॅन अंजन -क्‍लिअर'. काही अंजनांमुळे डोळ्यातील अतिरिक्‍त कफ वाहून जातो व डोळे स्वच्छ होतात. उदा. रसांजन

नेत्रधावन - त्रिफळा, लोध्र वगैरे द्रव्यांच्या काढ्याने डोळे धुणे म्हणजे नेत्रधावन. यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, कंड, चिकटपणा वगैरे त्रास दूर होतात.

वर्ती - डोळ्यांना व दृष्टीला हितकर असणारी द्रव्ये घोटून, वाळवून वातीप्रमाणे बारीक वर्ती (लांबुडकी मात्रा) केली जाते व ती मध, त्रिफळा काढा वगैरे द्रवात बुडवून डोळ्यामध्ये फिरवली जाते किंवा उगाळून घातली जाते. यामुळे डोळ्यांची शक्‍ती वाढते, विविध नेत्ररोग बरे होतात, दृष्टी सुधारण्यासाठी मदत मिळते.

चक्षुष्य बस्ती - मध, तेल, शतपुष्पा, एरंडमूळ, ज्येष्ठमध वगैरे द्रव्यांपासून तयार केलेली चक्षुष्य बस्ती बस्तीरूपाने (आयुर्वेदिक एनिमा) घेण्यानेही दृष्टी सुधारायला मदत मिळते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी हे उपचार उत्तम असतातच, बरोबरीने डोळ्यांना हितकर द्रव्यांचे सेवन करण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो. त्रिफळा हे चूर्ण डोळ्यांसाठी उत्तम असते, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण मध व तुपासह घेणे हितकारक असते. त्रिफळा, दारुहळद वगैरे द्रव्यांपासून बनविलेले त्रिफळा घृत, जीवनीय गणातील औषधांचा विशेष संस्कार केलेले "संतुलन सुनयन घृत' यांचाही नेत्ररोगावर खूप चांगला उपयोग होतो. नवायास लोह, रौप्य भस्म, मौक्‍तिक भस्म वगैरे औषधी योगही डोळ्यांसाठी उत्तम असतात.

नेत्ररोग झाल्यावर किंवा चष्मा लागल्यावर उपचार करण्यापेक्षा डोळे निरोगी राहण्यासाठी अगोदरपासून काळजी घेणे निश्‍चितच चांगले असते. त्यादृष्टीने डोळ्यात आयुर्वेदिक अंजन घालणे, नेत्र्य द्रव्यानी सिद्ध तेल उदा., "संतुलन सुनयन तेल' टाकणे, पादाभ्यंग करणे, तोंडात थोडे पाणी घेऊन व गाल फुगवून बंद डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारणे, जेवणानंतर दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर घासून डोळ्यांना लावणे यासारखे साधे सोपे पण प्रभावी उपचार करता येतात.

डोळ्यांसाठी विशेष हितकर पदार्थ - मूग, जव, लाल तांदूळ, जुने तूप, कुळीथ सूप, पेज, कण्हेरी, गाजर, मेथी, पालक, पपई, सुरण, परवर, वांगे, काकडी, मुळा, मनुका, गाईचे दूध, तूप, साखर, धणे, सैंधव, मध, वगैरे आहारातील गोष्टी; पुनर्नवा, माका, कोरफड, त्रिफळा, चंदन, कापूर, लोध्र वगैरे औषधी द्वव्ये.

डोळ्यांसाठी अहितकर गोष्टी - क्रोध, शोक, मैथुन, अश्रू-वायू-मूत्र वगैरे वेगांचा अवरोध करणे, रात्री जड भोजन करणे, सातत्याने उन्हात किंवा उष्णतेसन्निध राहणे, फार बोलणे, वमन, अतिजलपान, दही, पालेभाज्या, टरबूज, मोड आणलेली कडधान्ये, मासे, मद्य, पाण्यातील प्राणी, मीठ, अतिशय तिखट, अतिशय आंबट व जड अन्नपान, मोहरीचे तेल, रात्रीचे जागरण वगैरे.

--------------------------------------------------------------------
डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी
- रात्री उशिरापर्यंत जागू नये, लवकर झोपावे. रात्री नाकात साजूक तुपाचे थेंब टाकावेत.
- टी.व्ही., संगणकाचा स्क्रीन वा तेजस्वी प्रकाशाकडे सतत पाहू नये,
- योगशास्त्रातील सर्वांगासन, त्राटक, नेत्रक्रिया कराव्यात.
- शुद्ध आयुर्वेदिक काजळ (सौंदर्य प्रसाधनातील नव्हे), अंजन नित्य वापरावे. पुरुषांना काळे काजळ घालणे योग्य वाटत नसले तर "संतुलन काजळ- क्‍लिअर' वापरावे. "संतुलन सुनयन घृता' सारखे योग नियमित वापरावेत.
- दूध, लोणी, गाजर, मेथी, पालक, पपई वगैरे भाजीपाला व फळे आहारात अवश्‍य सेवन करावे.
--------------------------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे

ad