Showing posts with label फळे. Show all posts
Showing posts with label फळे. Show all posts

Friday, November 20, 2009

अन्नयोग : फळे

रसरशीत फळे सर्वांनाच हवीहवीशी वाटतात, फळांचा योग्य प्रमाणात, योग्य स्वरूपात केलेला वापर आरोग्यासाठीही निश्‍चितपणे हितकर असतो. आजही आपण फळांचे आयुर्वेदिकदृष्ट्या गुणधर्म पाहणार आहोत...

- डॉ. श्री बालाजी तांबे

जांभूळ

तत्फलं तुवरं चाम्लं मधुरं शीतलं मतम्‌रच्यं रूक्षं ग्राहकं तु लेखनं कण्ठदूषकम्‌।।
स्तंभकरं वातकारकं कफपित्तनुत्‌। आध्मानकारकं प्रोक्तं पूर्ववैद्यैर्मनीषिभिः।। ...निघण्टु रत्नाकर

* जांभूळ चवीला तुरट, आंबट-गोड असते, वीर्याने शीत असते, रुचकर असते. मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, अतिरिक्‍त वाढलेल्या धातूंचे लेखन करते. कफ तसेच पित्तदोषास कमी करते पण वात वाढवते. अतिप्रमाणात जांभळे खाल्ल्यास घसा खराब होऊ शकतो, मलावष्टंभाचा त्रास होऊ शकतो व पोटात वायू धरू शकतो.
* पित्त वाढल्यामुळे मळमळत असल्यास जांभळाचा रस खडीसाखरेसह मिसळून तयार केलेले चाटण थोडे थोडे घेण्याने बरे वाटते.
* भूक लागत नसल्यास जांभळाचा एक चमचा रस व आल्याचा अर्धा चमचा रस जेवणापूर्वी घेण्याचा उपयोग होतो.
* जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या केल्यास दात व हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते.

कवठ

तत्पक्वं रूचिदं चाम्लं कषायं ग्राहि मधुरम्‌। कण्ठशुद्धिकरं शीतं गुरू वृष्यं च दुर्जरम्‌।।
श्‍वासं क्षयं रक्‍तरूजं वान्तिं वातश्रमं तथा। हिध्मानं च विषं ग्लानिं तृषां दोषत्रयं तथा।।...निघण्टु रत्नाकर

* कवठाचे पिकलेले फळ चवीला आंबट-गोड व तुरट असते, वीर्याने शीत असते व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. कवठातील धागे व बिया पचण्यास जड असल्यामुळे कवठ जड समजले जाते. कवठ कंठाची शुद्धी करते, दमा, क्षयरोग, रक्‍तविकार, उलटी, वातदोष, श्रम, उचकी, विष, तृष्णा, ग्लानी वगैरे तक्रारीत हितकर असते. तिन्ही दोषांचे संतुलन करते.
* पिकलेल्या कवठातील बिया व रेषा काढून टाकून शिल्लक राहिलेल्या गराची गुळासोबतची चटणी अतिशय रोचक असते, यामुळे भूकही वाढते.
* शौचासह आव, मूळव्याध वगैरे त्रासावर कवठाचा बिया व धागे काढलेला गर ताकासह घेण्याचा उपयोग होतो.
* कवठाचा साखरेसह तयार केलेला मुरांबा पाचक म्हणून चांगला असतो.

बोरे

तच्च पक्वं तु मधुरं अम्लमुष्णं कफप्रदम्‌। ग्राहकं लघु रूच्यं तु वाय्वतीसारशोषहृत्‌।।
रक्‍तश्रमहरं प्रोक्तं पण्डितैश्‍चरकादिभिः।...निघण्टु रत्नाकर

* बोराचे पिकलेले फळ चवीला गोड-आंबट असते, वीर्याने उष्ण असते व कफ वाढवणारे असते. चवीला रुचकर, पचण्यास हलके असे बोर मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, वात दोषास कमी करते, जुलाब थांबवते, रक्‍तविकार, श्रम, शोष वगैरे त्रासातही हितकर असते.
* म्हणून ताजी बोरे खाल्ली जातात, पण औषधात सुकलेल्या बोरांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. औषध म्हणून लहान बोरे वापरणे चांगले असते, आकाराने मोठ्या पण बेचव बोरांचा औषध म्हणून उपयोग होत नाही.
* खूप श्रमांनी येणारा थकवा दूर होण्यासाठी पिकलेली गोड बोरे खाण्याचा उपयोग होतो.
* कोरडे उमासे येत असल्यास, मळमळ होत असल्यास ताजी बोरे चघळून खाण्याचा उपयोग होतो.
* तापामध्ये शरीराचा दाह होत असल्यास सुक्‍या बोरांचा काढा खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो, यामुळे तापही उतरतो.
* वारंवार जुलाब होत असल्यास, भूक लागत नसल्यास, जिभेवर पांढरा थर साठत असल्यास सुक्‍या बोरांचे जिरे, काळे मीठ, डाळिंबाचे दाणे टाकून तयार केलेले सार घेण्याचा उपयोग होतो, याने तोंडाला चवही येते.

- डॉ. श्री बालाजी तांबे

Thursday, November 19, 2009

अन्नयोगः फळे

फळे रसाने युक्‍त असल्याने स्वादिष्ट असतात. अंजीर व पपई पित्त कमी करतात. सफरचंद शक्तिवर्धक आहे, तर संत्रे थकवा दूर करते.
डॉ. श्री बालाजी तांबे.

बहुतेक सर्व फळे दिसायला आकर्षक असतात व रसाने युक्‍त असल्याने खाण्यासही स्वादिष्ट असतात. प्रकृतीनुरूप फळांचे सेवन आरोग्यासाठी निश्‍चितच लाभदायक असते. आज आपण सहसा सर्व प्रकृतीच्या व्यक्‍तींना मानवणारी काही फळे पाहणार आहोत.

अंजीर
अंजीर शीतलः स्वादुर्गुरु रक्‍तरुजाहरः । दाहं वातं पित्तं च नाशयेत्‌ तृप्तिदो मतः ।। ... निघण्टु रत्नाकर
* अंजीर चवीला मधुर व शीत वीर्याचे असते. वात, तसेच पित्तदोषाचे शमन करणारे असते. शरीरात दाह होत असल्यास, रक्‍तदोष असल्यास अंजीर खाणे विशेष हितावह असते. अंजीर तृप्ती करणारे असते.
* ताजे अंजीर फक्‍त उन्हाळ्यात उपलब्ध असते. सुके अंजीर मात्र वर्षभर मिळते.
* अशक्‍तपणा, हातापायांची जळजळ, तोंड कोरडे पडणे वगैरे तक्रारी असल्यास काही दिवस एक-दोन ताजी अंजिरे खडीसाखरेसह खाण्याचा उपयोग होतो.
* उपवास, उन्हात जाणे, जागरणे करणे यामुळे वाढणारे पित्त कमी होण्यासाठीही ताजे अंजीर खाणे उत्तम असते. पिकलेल्या अंजिराचा जॅम पित्तशामक व रक्‍त वाढविणारा असतो.

सफरचंद
कषायमधुरं शीतं ग्राहि सिम्बितिका फलम्‌ ।...चरक सूत्रस्थान
* सफरचंद चवीला गोड, किंचित तुरट असते. वीर्याने शीत असते व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते.
* आतड्यांची शक्‍ती कमी झाल्याने शौचाला पातळ होत असल्यास वाफवलेले सफरचंद खाणे उत्तम असते.
* नियमित सफरचंद खाण्याने रक्‍त वाढण्यास मदत मिळते. लहान मुलांसाठी, तसेच गर्भारपणातही सफरचंद खाणे उत्तम असते. सफरचंद खाण्याने क्वचित मलावष्टंभाचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी सफरचंद वाफवून खावे.
* अतिताण, कमी झोप, अति श्रम यामुळे स्टॅमिना कमी होत असल्यास, अनुत्साह वाटत असल्यास सफरचंद वाफवून काढलेला गर व साखर एकजीव करून खाण्याचा उपयोग होतो.
* कीटकनाशके वापरलेली असल्याची मोठी शक्‍यता असल्याने सफरचंद खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुणे व साल काढून खाणे श्रेयस्कर ठरते.

पपई
तत्पक्वं मधुरं रुच्यं पित्तनाशकरं गुरु । ... निघण्टु रत्नाकर
* पिकलेली पपई चवीला मधुर, अतिशय रुचकर व पित्तनाशक असते.
* पपई उष्ण असते असा सामान्यतः समज दिसतो, पण पपईमुळे पित्त कमी होते, असा आयुर्वेदात स्पष्ट उल्लेख आहे.
* पपईच्या एक-दोन फोडी खाल्ल्याने अन्नपचन सुधारते, भूकही चांगली लागण्यास मदत मिळते.
* आहारात पपईचा नित्य अंतर्भाव केल्यास जंत होण्याची प्रवृत्ती नष्ट होते.
* मासिक पाळीच्या वेळेस अंगावरून कमी रक्‍तस्राव होत असल्यासही पपईच्या एक-दोन फोडी रोज आहारात असल्यास उपयोग होतो.
* पपईमध्ये गर्भाशयाचा संकोच करण्याचा गुण असल्याने गर्भारपणात पपई खाऊ नये.
* कच्च्या पपईची भाजी करण्याची पद्धत असते, पण कच्च्या पपईने कफदोष व वातदोषाचा प्रकोप होतो.

संत्रे
विशदं गुरु रुच्यं च सरं चोष्णं सुगन्धिकम्‌। स्वादु चामं कृमीन्वातं श्रमं शूलं च नाशयेत्‌।। ...निघण्टु रत्नाकर
* ताजे व गोड संत्रे रुचकर व सुगंधी असते. वीर्याने उष्ण असते, गुणाने विशद म्हणजे स्वच्छ करणारे व सारक असते. आम, जंत, वात, श्रम, तसेच वेदना कमी करणारे असते.
* ताज्या संत्र्याचा रस थोडेसे मीठ टाकून घेतल्यास थकवा दूर होतो. विशेषतः उन्हातून आल्यावर किंवा शरीरश्रमांमुळे घाम येऊन शीण येतो तो दूर करण्यासाठी संत्रे उत्तम असते.
* गर्भारपणात होणाऱ्या उलट्या, मळमळ, अन्न न जाणे अशा वेळी थोड्या थोड्या वेळाने संत्र्याचा रस घेण्याचा उपयोग होतो.
* भूक लागली तरी अन्न खावेसे वाटत नाही, अशा वेळी संत्र्याची साल व बिया काढलेली संत्र्याची फोड मीठ व मिऱ्याची पूड टाकून खाण्याचा उपयोग होतो.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405

Wednesday, November 11, 2009

अन्नयोग : फळे


फळे खाणे आरोग्यासाठी हितकारक असते. पण फलाहार हा मुख्य आहाराचा पर्याय असता कामा नये. फळे सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत आणि जेवणानंतर लगेचही खाऊ नयेत. फळे दुधाबरोबर खाऊ नयेत. ती कापल्यानंतर लगेच खावीत.

- डॉ. श्री बालाजी तांबे


संतुलित आहारात फळांचा अंतर्भाव आवश्‍यक असतो. आयुर्वेदाने "फलवर्ग'' म्हणून वेगळा वर्ग सांगितला आहे. त्यात अनेक फळांची माहिती दिलेली आहे. योग्य प्रमाणात व प्रकृतीला अनुकूल फळे सेवन करणे आरोग्यासाठी हितकर होय. पण फळे सेवन करताना वेळ, पद्धत, प्रमाण याविषयी माहिती असायला हवी. प्रमाण - फळांविषयी माहिती घेताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळे आहाराच्या ऐवजी खाणे योग्य ठरू नये. आहारातला एक भाग इतक्‍या प्रमाणातच फळांचे सेवन करणे योग्य होय. महिन्यातून एक-दोन दिवस केवळ फलाहार करणे काही प्रकृतीसाठी सोसवणारे असू शकले किंवा विशेष वैद्यकीय देखरेखीखाली काही दिवस केवळ द्राक्षासारखा पथ्यकर फळांचे सेवन करता येत असले तरी उपवास किंवा डाएटच्या नावाखाली फक्‍त फलाहार दीर्घकाळपर्यंत किंवा वारंवार करणे योग्य नाही.

वेळ - फळे सकाळी रिकाम्या पोटी, विशेषतः अननस, संत्री, मोसंबीसारखी आंबट फळे, घेण्याने पित्त वाढताना दिसते. साधारणतः जेवणानंतर फळे खाण्यानेही ती पचणे अवघड होताना दिसते. साधारणतः जेवताना किंवा नाश्‍ता व दुपारच्या जेवणाच्या दरम्यान किंवा दुपारच्या जेवणानंतर व सूूर्यास्ताच्या दरम्यान फळे खाणे चांगले असते.

पद्धत - दूध व फळे एकत्र करून किंवा एकापाठोपाठ लगेच खाणे आयुर्वेदाने विरुद्ध अन्नात मोडले आहे. विरुद्ध अन्न सेवन करण्याने आम्लपित्त, आतड्यांना सूज येणे, ऍलर्जी, अंगावर गांधी, खाज वगैरे अनेक समस्यांना आमंत्रण मिळू शकते. तेव्हा फ्रुटसॅलड, मिल्कशेक वगैरे स्वरूपात फळे खाणे टाळणेच उत्तम. सध्या जगभरातल्या सर्व देशातली फळे सर्वत्र 12 महिने उपलब्ध असतात पण त्या त्या देशातील फळ त्या त्या देशातील लोकांच्या प्रकृतीला जसे मानवते व पचते ते तसेच इतर देशातल्या लोकांना पचेल असे नाही. तेव्हा रोज खायचे फळ आपल्याच देशातले आणि त्या फळांच्या ऋतूत तयार झालेले असणे चांगले.

फळांचे रस किंवा फळांचे तुकडे टिकण्याच्या दृष्टीने त्यावर विशेष प्रक्रिया करून हवाबंद डब्यात भरून हवे तेव्हा वापरण्याचीही आजकाल पद्धत आहे पण अशा फळांचे किंवा रसाचे सेवन करताना त्यात पोषणमूल्ये किती आहेत आणि ती शरीराला खरोखरच उपयोगी पडणार आहे का, याचे भान ठेवायला हवे. फळे कापल्यावर वा फळांचे रस काढल्यावर लगेच घेणे उत्तम असते. सहज उपलब्ध असणाऱ्या काही फळांची माहिती आपण घेणार आहोत.

द्राक्षे
आयुर्वेदात द्राक्षांना फलोत्तम म्हणजे सर्व फळात श्रेष्ठ असे सांगितले आहे,

पक्वं द्राक्षाफलं स्वर्यं मधुरं तृप्तिकारकम्‌ ।पाके स्निग्धं चातिरुच्यं चक्षुष्यं मूत्रलं गुरु ।।

तुवरं च सरं चाम्लं वृष्यं शीतं श्रमापहम्‌ ।। पित्तं श्‍वासं च कासं च छर्दिं शोथं भ्रमं ज्वरम्‌ ।।

दाहं मदात्ययं वातं वातपित्तं क्षतक्षयम्‌ ।....निघण्टु रत्नाकर

पिकलेली द्राक्षे चवीला गोड, किंचित आंबट व तुरट असतात, वीर्याने शीत असतात, चवीला रुचकर असतात, स्वर सुधारतात, तृप्तीकर असतात, गुणाने स्निग्ध असतात, थकवा खोकला, उलटी, ताप, चक्कर, दाह, क्षय, सूज वगैरे रोगात हितकर असतात.

द्राक्षा च गोस्तनी शीता हृद्या वृष्या गुरुर्मता ।

वातानुलोमनी स्निग्धा हर्षदा श्रमनाशिनी ।।

दाहमूर्च्छा श्‍वासकासकफपित्तज्वरापहा ।

रक्‍तदोषं तृषां वातं हृद्‌व्यथा चैव नाशयेत्‌ ।।....निघण्टु रत्नाकर

सबीज काळी द्राक्षे विशेषतः हृदयासाठी हितकर असतात, शुक्रधातूचे पोषण करतात, थकवा घालवतात व मनाला उल्हसित करतात, वाताचे अनुलोमन होण्यास सहायक असतात; दाह, मूर्च्छा, दमा, खोकला, ताप, रक्‍तदोष, तापात हितकर असतात, तहान शमवतात, वात-पित्त-कफ अशा तिन्ही दोषांना संतुलित करतात आणि हृदयातील वेदनेचा नाश करतात.

लघवी अडखळत होत असल्यास वा जळजळ होत असल्यास गोड द्राक्षांच्या रसात थोडीशी जिरेपूड टाकून घेण्याने बरे वाटते. याने लघवीचे प्रमाण वाढण्यासही मदत मिळते. पाळीच्या वेळेला कमी रक्‍तस्राव होत असल्यास, काळपट रंगाचा किंवा गाठींनी युक्‍त रक्‍तस्राव होत असल्यासही द्राक्षांचा रस, बडीशेप व जिऱ्याचे चिमूटभर चूर्ण टाकून घेण्याने सुधारणा होते. द्राक्षे खाण्यापूर्वी किंवा द्राक्षांचा रस काढण्यापूर्वी ती अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवणे व नंतर वाहत्या पाण्यात स्वच्छ धुणे चांगले होय.

Friday, September 12, 2008

प्रश्‍न न संपणारे!!

प्रश्‍न न संपणारे!


आरोग्याबद्दलचे प्रश्‍न विचारताना आपण आपल्या सोयीचे उत्तर मिळण्याची वाट तर पाहत नाही ना, हे प्रत्येकाने तपासले पाहिजे. आरोग्य हीच जीवनातील महत्त्वाची संपत्ती. त्यासाठी प्रत्येकाने हवे तेवढे प्रश्‍न विचारून उत्तर मिळवावे; पण उत्तर मिळाल्यावर मात्र त्यानुसार शंभर टक्के आचरण करण्याची तयारीही हवी.
(बालाजी तांबे)
विक्रम वेताळाच्या गोष्टी आपणा सर्वांना परिचयाच्या आहेत. या गोष्टीतील पिशाचयोनीतील वेताळ झाडावर लटकत असे व प्रेत खांद्यावर घेऊन विक्रम निघाला, की तो त्याला अनेक प्रश्‍न विचारत असे. विचारलेल्या प्रश्‍नाचे त्याने उत्तर दिले नाही तर पंचाईत असे व तोंड उघडून उत्तर द्यावे तर वेताळ पुन्हा झाडावर लटकू लागे व विक्रमादित्याला पुन्हा जाऊन त्याला काढून आणावे लागत असे. म्हणजे, उत्तर दिले तरी पंचाईत व नाही दिले तरी पंचाईत, असे हे प्रश्‍न. म्हणून त्याला "यक्षप्रश्‍न' म्हणायलाही हरकत नाही.

मला वाटते आरोग्याबाबतचे प्रश्‍न हे असेच न सुटणारे कोडे आहे. प्रश्‍न विचारीत असताना प्रत्येक जण स्वतःला सोयीचे उत्तर मिळण्याची वाट पाहतो. त्यामुळे दिलेल्या उत्तराने समाधान कधीच होत नाही. बऱ्याच वेळा रोग्याचे प्रश्‍न खूपच जास्त असतात आणि जणू प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही म्हणून रोग बरा होत नाही असाच त्याचा समज असतो. आरोग्य टिकविण्याच्या संबंधीही अनेक प्रश्‍न असतात. निरोगी राहावे किंवा बलवान व्हावे अशी इच्छा प्रत्येकालाच असते. त्यातूनही अनेक प्रश्‍न निर्माण होतात.

जीवन कशा तऱ्हेने जगल्यास निरोगी राहता येईल याचे विवेचन आयुर्वेदाने स्वस्थवृत्तात केले आहे; पण जीवनशैली बदलण्याचे हे मार्गदर्शन एकतर रुचत नाही किंवा रुचले तर आचरणात आणले जात नाही. सध्याच्या आधुनिक जीवनात हे कसे काय शक्‍य आहे हा एक नवा प्रश्‍न पुन्हा उत्पन्न होतो; पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे नैसर्गिक जीवनपद्धती ५०-६० वर्षांपूर्वीसुद्धा त्या वेळच्या जीवनपद्धतीला मानवत नव्हतीच. असे फार पूर्वीपासून चालत आलेले असावे. म्हणून आजारपणाची परंपरा वाढत वाढत सध्या मनुष्य इलाज पद्धतीच्या हाताबाहेर गेले असावेत, असे वाटणाऱ्या रोगांच्या चक्रात सापडलेला दिसतो.

आयुर्वेदिक जीवनपद्धती अवलंबण्यात काय अडचण असावी? असा प्रश्‍न विचारला, "तर त्यात फार काही अवघड नाही,' असे उत्तर मिळते. सकाळी लवकर उठावे व सर्व नित्यकर्मे आटोपून कामाला लागावे. निसर्गाने हात दोन तर तोंड मात्र एकच दिलेले असताना, दोन हातांनी भरपूर कष्ट केले, तर एक तोंड भरण्यासाठी खरे पाहता अन्नाची कमतरता भासू नये. शेवटी अन्न शरीरासाठी आहे की नुसते आवडी-निवडी भागविण्यासाठी? पण मनुष्याला आहारासंबंधीचे मार्गदर्शन कधीच रुचलेले नाही. सेवन केलेल्या अन्नाचा परिणाम मनावर होतो; पण अन्न मनासाठी नसते ही गोष्ट मनुष्य कधीच लक्षात घेत नाही. नवीन नवीन कल्पना पुढे आल्या, ज्या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात; पण त्यात धंदा करणे हा हेतू मुख्यत्वे असावा ही शंका टाळता येत नाही.

त्यातून निघाल्या अनेक सूचना. यातूनच सकाळी नुसता फळांचा रस घेण्याचा किंवा नुसती फळे खाण्याचा सल्ला मिळतो, कोबीच्या पानावर दही टाकून खाण्याचा सल्ला मिळतो, दूध वा साखर न टाकता लिंबू पिळून चहा पिण्याचा सल्ला मिळतो किंवा सकाळी उठून कडुलिंबाच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला मिळतो. काहीही ऐकून न घेणे हा तर मनाचा स्वभावच आहे. त्यामुळे प्रश्‍न विचारल्यावर उत्तर येण्यापूर्वीच मन दुसरीकडे पळत राहते. त्यामुळे दिलेले उत्तर ऐकायला प्रश्‍न विचारणाऱ्याचे मन जागेवर नसते.

अशा यक्षप्रश्‍नांना उत्तर देणारे अनेक जण पुढे सरसावतात व त्यातून प्रश्‍नोत्तरांचा सावळा गोंधळ सुरू होतो. एखाद्या प्रश्‍नाला हो किंवा नाही या दोन शब्दांत उत्तर दिल्याने होणारा गोंधळ वा विनोद सर्वांनाच परिचित असतो. बऱ्याच वेळा, विशेषतः एखाद्याला अडचणीत आणायचे असल्यास प्रश्‍नच असा विचारला जातो, की उत्तर देणाऱ्याला स्वतःच्या मनातील खरे उत्तर देताच येत नाही व भलत्याच दिशेने उत्तर द्यावे लागते. उदा. जेव्हा एखादा रुग्ण विचारतो, की कधी विशेष प्रसंगी थोडीशी दारू घ्यायला हरकत नाही ना? हे विशेष प्रसंग कुठले, तर प्रत्येक महिन्याची शेवटची तारीख, पहिली तारीख, शनिवार, रविवार, विशेष सुटी, कोणी पाहुणा घरी आला तर तो दिवस अशा रीतीने विशेष प्रसंग मोजल्यास जणू रोजच दारू घेण्याची परवानगी रोगी मागत असतो. "थोडीशी' या शब्दाची तुलना एका बैठकीला पूर्ण बाटली पिणाऱ्यांबरोबर करायची, की काही विशेष माप ठरवायचे याविषयी डॉक्‍टरांचे मार्गदर्शन अपुरे पडू शकते. वैद्यकशास्त्राला धरून उत्तर मिळावे असा प्रश्‍न विचारला तरच रुग्णाला उपयोगी पडेल असे उत्तर मिळू शकते. प्रश्‍न विचारत असताना मिळालेल्या उत्तरानुसार आपल्याला आचरण ठेवायचे आहे, याची जबाबदारी घेतलेली नसली तर विचारलेल्या प्रश्‍नाला काहीच अर्थ राहात नाही.

एखाद्याने पत्रातून प्रश्‍न विचारलेला असतो व मी "फॅमिली डॉक्‍टर'चे सर्व अंक नियमित वाचतो, असेही त्या पत्रात लिहिलेले असते; पण गंमत म्हणजे त्याच दिवशीच्या "फॅमिली डॉक्‍टर'च्या अंकात तशाच प्रकारच्या प्रश्‍नाचे उत्तर दिलेले असते. त्या व्यक्‍तीला असे कळवले, की तुम्ही प्रश्‍न विचारला आहे, पण त्याच दिवशीच्या अंकात याच स्वरूपाच्या प्रश्‍नाचे उत्तर सविस्तरपणे आहे. तर त्यावर त्याचे उत्तर मिळते, की पण तो प्रश्‍न मी विचारलेला नव्हता; पण जर तशाच प्रश्‍नाचे उत्तर आपसूकच मिळालेले असले, तर त्यानुसार आचरण करायला काय हरकत आहे? "पुढच्यास ठेच मागचा शहाणा' ही म्हण कशासाठी आहे? तसेच दोन वर्षांपूर्वी अंकात एखाद्या प्रश्‍नाला उत्तर दिलेले असेल; पण त्या वेळी आपल्याला त्या प्रकारचा त्रास नसल्याने तसे आचरण करण्याची गरज नसेल; पण आज आपल्याला तसा त्रास होऊ लागल्यास त्या उत्तरानुसार आचरण करायला काहीच हरकत नाही. इतर सर्व विषयांवरचे प्रश्‍न विचारले वा न विचारले तरी एकवेळ चालेल; पण आरोग्याचे प्रश्‍न वेळेवर विचारावे, त्याचे उत्तर मिळवावे व त्यानुसार आचरण करावे. कारण, आरोग्य हेच सर्वांत महत्त्वाचे असते. आरोग्य हीच जीवनातील महत्त्वाची संपत्ती. त्यासाठी प्रत्येकाने पाहिजे तेवढे प्रश्‍न विचारून उत्तर मिळवावे; पण उत्तर मिळाल्यावर मात्र त्यानुसार शंभर टक्के आचरण करण्याची तयारी असावी.

वास्तुशास्त्रासंबंधी काही सूचना व मार्गदर्शन देण्याची काम मी पूर्वी करत असे. त्या वेळी मी सांगत असे व सध्याही सांगतो, की मार्गदर्शनानुसार तुम्ही सुधारणा केल्या नाहीत तर त्याचा दोष दुप्पट असतो. घरातील वास्तूचा जो काही दोष असेल तो तर होईलच; पण त्यावरचा इलाज कळलेला असून आपण त्यानुसार फेरबदल केले नाही याचे शल्य टोचत राहण्याचा दुसरा दोष तयार होतो. त्याचप्रमाणे अजाणतेपणी चुकून खाल्लेल्या वस्तूचा त्रास फक्‍त पोटाला होतो, मनाला होत नाही; पण खाऊ नये, असे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर तीच गोष्ट खाल्ली तर पोटाला तर त्रास होतोच; पण मनाला माहीत असते, की आपण ही चूक करत आहोत व त्यामुळेही रोगाला आमंत्रण मिळते. तेव्हा आरोग्याचे प्रश्‍न अवश्‍य विचारावेत व त्यानुसार वर्तन ठेवले, त्यानुसार औषधयोजना केली, सांगितलेले पंचकर्मादी उपचार केले तर नक्कीच आरोग्य उत्तम राहून जीवन सुखमय होईल.

Wednesday, May 21, 2008

हेल्थ फॅक्‍ट्‌स

हेल्थ फॅक्‍ट्‌स


(मंदार कुलकर्णी)
- केळ्यांमध्ये सुमारे १५ टक्के क जीवनसत्त्व असते. या जीवनसत्त्वामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते. लोह शरीरात समाविष्ट होण्यास मदत होते, तसेच रक्त तयार होण्यासही या जीवनसत्त्वामुळे मदत होते. .......
- संत्र्यामध्येही क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. पण ते एकदा कापले किंवा दाबले की या जीवनसत्त्वाचे प्रमाण खूप लवकर कमी होते. कापलेले संत्रे साध्या तापमानात बाहेर ठेवले किंवा २४ तास फ्रिजमध्ये ठेवले तरी सुमारे वीस टक्के क जीवनसत्त्व कमी होते.
- आंब्यामध्ये बीटा-कॅरोटिन मोठ्या प्रमाणावर असते. हे बीटा-कॅरोटिन पूरक जीवनसत्त्व म्हणून काम करते.
- गाजराला मिळणारा भगवा-केशरी रंग हा बीटा-कॅरोटिनमुळे असतो.
- सफरचंदामध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ जास्त असल्याने अन्नाचे पचन होण्यास त्याचा उपयोग होतो. विशेषतः पोटाच्या विकारांवर सफरचंद उपयोगी ठरते.
- सर्वच फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर ग्लुकोजच्या स्वरूपात साखर असल्यामुळे तत्काळ ऊर्जा देण्यासाठी फळे उपयोगी पडतात. व्यायामानंतर किंवा मोठ्या क्रीडा स्पर्धांच्या वेळी केळ्यांसारखी फळे खाल्ली जातात, त्यामागचे कारण तेच असते.
- फळांमध्ये नैसर्गिक साखर जास्त असते. ही साखर तुमच्या मेंदूला उत्तेजना देण्याचे काम करते, त्यामुळे स्मृती वाढवण्यासाठीसुद्धा नियमित फळे खाल्ल्याने उपयोग होऊ शकतो.

Thursday, April 17, 2008

फळे खा! आरोग्य राखा!!


फळे खा! आरोग्य राखा!!


(डॉ. श्री बालाजी तांबे)
"ऍपल अ डे कीप्स द डॉक्‍टर अवे' असं म्हणतात खरं. पण, फळं आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त म्हणतात ते नेमकं कशामुळे, हे अनेकदा आपल्याला माहीत नसतं. ........
आयुर्वेदात औषधीद्रव्यांची जशी माहिती दिलेली आहे, तशी आहारद्रव्यांचेही सविस्तर वर्णन केलेले आहे. धान्यवर्ग, कडधान्यवर्ग, शाकवर्ग, फलवर्ग असे निरनिराळे वर्ग आयुर्वेदिक संहितांमध्ये दिलेले आहेत. रसाळ फळे दिसायला आणि चविलाही छान असतात. योग्य प्रमाणात, योग्य तऱ्हेने प्रकृतीचा विचार करून खाल्लेली फळे आरोग्यासाठीही उत्तम असतात. फळ नेहमी ताजे व योग्य ऋतूत तयार झालेले असावे. कच्चे किंवा अनेक दिवसांचे जुने फळ खाणे टाळावे. सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या व नियमित सेवन केल्या जाणाऱ्या फळांची आयुर्वेदातील माहिती या प्रमाणे सांगता येईल.

द्राक्षे
फळांचा राजा म्हणून जरी आंबा प्रसिद्ध असला तरी गुणांच्या दृष्टीने विचार करता द्राक्षे सर्व फळात उत्तम समजली जातात. आयुर्वेदात तर "द्राक्षा फलोत्तमा 'असे सांगितलेले आहे.
पक्वं चेन्मधुरं तथा।म्लसहितं तृष्णास्रपित्तापहम्‌ ।
पक्वं शुष्कतमं श्रमार्तिशमनं सन्तर्पणं पुष्टिदम्‌ ।।
... राजनिघण्टु

पिकलेली द्राक्षे चवीला गोड व थोडी आंबट असतात. तहान, रक्‍तविकार व पित्तदोष यामध्ये हितकर असतात. व्यवस्थित पिकलेली तसेच सुकविलेली द्राक्षे थकवा दूर करतात, वेदना शमवितात, तृप्ती करतात व पौष्टिक असतात. ताज्या द्राक्षांचा रस घेणेही आरोग्यासाठी उत्तम असते. एका वेळेला साधारण ४०-५० मिली इतका रस घेता येतो. यातच चमचाभर मध घातल्यास चवही छान लागते व पोषक गुणही वाढतो. द्राक्षांच्या रसाने पित्त कमी होते, लघवीला साफ होते, शरीरातील विषारांचे प्रमाणही कमी होते. कच्ची, आंबट द्राक्षे मात्र पित्त वाढवत असल्याने न खाणेच चांगले. वास्तविक सर्वच फळे खाण्यापूर्वी वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची असतात. द्राक्षांवर कीटकनाशकांचा फवारा मारलेला असल्याने व द्राक्षांची साल काढणे शक्‍य नसल्याने द्राक्षे फारच काळजीपूर्वक स्वच्छ करावी लागतात. यासाठी द्राक्षे मीठ विरघळवलेल्या पाण्यात अर्धा तास भिजत घालावीत व नंतर वाहत्या पाण्यात व्यवस्थित धुवून खावीत.

डाळिंब
हेही आरोग्यासाठी उत्तम फळ असते.
अम्लं कषायमधुरं वातघ्नं ग्राहि दीपनम्‌ । मधुरं पित्तनुत्‌ तेषां पूर्व दाडिमुत्तमम्‌ ।।
... चरक सूत्रस्थान

चवीला गोड, आंबट व तुरट लागणारे डाळिंब वातदोषाचे शमन करते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते व जाठराग्नीला प्रदीप्त करते. तर गोड डाळिंब पित्तशामक असते व उत्तम समजले जाते. डाळिंब हृदयासाठीही हितकर असते.

गोड डाळिंबाचा रस उत्तम पित्तशामक असतो, विशेषतः घशा-पोटात जळजळ होत असताना, लघवीस आग होत असताना, मळमळत असताना खडीसाखर मिसळलेला डाळिंबाचा रस घोट घोट घेण्याचा उपयोग होतो. डाळिंबामुळे रक्‍तधातूचे पोषण होत असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी गोड डाळिंबाचा रस उत्तम असतो. गर्भारपणात सुरुवातीचे तीन-चार महिने पित्ताचा त्रास होतो, उलट्या होतात, अन्न नकोसे वाटते अशा वेळी गोड डाळिंबाचा रस थोडा थोडा घ्यावा. याने पित्त तर शमतेच पण ताकदही नीट राहते. त्रास होत नसला तरी गर्भारपणात डाळिंब खाणे चांगलेच असते. डाळिंबाच्या रसापासून बनविलेला दाडिमावलेह पित्तासाठी प्रभावी औषध समजले जाते.

सफरचंद
बाराही महिने मिळणारे हे फळ आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असते.
कषायमधुरं शीतं ग्राहि सिम्बितिकाफलम्‌ ।
... चरक सूत्रस्थान

चवीला गोड, किंचित तुरट असणारे सफरचंद वीर्याने शीत व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मसदत करते. सफरचंद पचनसंस्थेतील अतिरिक्‍त उष्णता कमी करणारे असल्याने वारंवार तोंड येणे, शौचाला न बांधता होणे, अन्नपचनाची शक्‍ती कमी होणे, पित्तामुळे पोटात दुखणे वगैरे तक्रारींसाठी वापरता येते. पचन खालावलेले असताना, भूक मंद झालेली असताना वाफवलेले सफरचंद खाणे अधिक चांगले असते. लहान मुलांना, वाढत्या वयाच्या मुलांना सफरचंदाचा गर (पल्प) चिमूटभर वेलची व केशर टाकून देण्याने पोषक ठरतो, शरीर भरून येण्यासाठी उपयोगी पडतो.

पपई
तत्पक्वं मधुरं रुच्यं पित्तनाशकरं गुरु ।
... निघण्टु रत्नाकर
पिकलेली पपई चवीला गोड, अतिशय रुचकर व पित्तशामक असते. अति प्रमाणात सेवन केल्यास गुरु म्हणजे पचायला जड वाटली तरी योग्य प्रमाणात घेतली असता पाचक असते. दुपारच्या जेवणासह किंवा जेवणानंतर पपईच्या एक-दोन फोडी खाल्ल्यास अन्नपचन व्यवस्थित होते. ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी अंगावरून कमी प्रमाणात जाते, पोट दुखण्याचा त्रास होतो, त्यांनी रोज दुपारी पपईची एक फोड खाण्याचा उपयोग होतो. पपईचे पळ गर्भाशयसंकोच करणारे असल्याने बाळंतपणानंतर घेण्यासही उत्तम असते, मात्र गर्भारपणात पपई घेऊ नये.

अंजीर
तर्पणं बृंहणं फल्गु गुरु विष्टम्भि शीतलम्‌ ।
... चरक सूत्रस्थान
अंजीर शीत वीर्याचे, शरीर तृप्त करणारे, मांसधातूला पोषक असते. अंजिराचे ताजे फळ पित्त तर कमी करतेच पण रस-रक्‍तधातूसाठी पोषक ठरते. संगणकावर काम करणाऱ्यांनी, सातत्याने उपवास करणाऱ्यांनी, रात्रपाळी किंवा जागरणे करणाऱ्यांनी अंजिराच्या ऋतूत रोज एक-दोन अंजिर खावेत. पाळीच्या वेळेस कमी रक्‍तस्राव होणाऱ्या स्त्रीने तसेच हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी अंजिरे अवश्‍य खावीत. पिकलेल्या अंजिराचा जॅमही रक्‍तवृद्धी करण्यास उत्तम असतो.

आंबा
पक्वमाम्रं जयेत्‌ वायुं मांसशुक्रबलप्रदम्‌ ।।
... चरक सूत्रस्थान
पिकलेला आंबा वाताला जिंकतो अर्थात कमी करतो, मांसधातू, शुक्रधातूला पोषक असतो, शरीरशक्‍ती वाढवतो. आंब्याचे फळ तीन महिन्यांचे झाले की झाडावरून खाली काढले जाते व गवताच्या अढीत ठेवून पिकवले जाते. पूर्ण पिकलेले आंब्याचे फळ दिसायला, चवीला तसेच वासाला उत्तम असते. पूर्ण पिकलेला आंबा खाण्यापूर्वी साधारण तासभर साध्या पाण्यात भिजत ठेवावा व नंतर रस काढून खावा. वाटीभर आंब्याच्या रसात एक-दोन चमचे साजूक तूप व चिमूट-दोन चिमूट मिरपूड वा सुंठीचे चूर्ण टाकून घेतल्यास आंबा पचायला मदत होते व पचलेला आंबा ताकद वाढवतो, हृदयाला पोषक ठरतो, शुक्रघातू वाढवतो, शरीर भरायला व वजन वाढायला मदत करतो. कच्चा आंबा अर्थात कैरी मात्र पित्तकर असते. उन्हाळ्यामध्ये कैरीचे पन्हे अधून मधूून पिणे योग्य असले तरी अति प्रमाणात कैरीचा वापर न करणेच चांगले. मधुमेहाच्या व्यक्‍तींनी मात्र आंबा खाऊ नये.

संत्रे
मधुरं किञ्चिदम्लं च हृद्यं भक्‍तप्ररोचकम्‌ ।
दुजर्रं वातशमनं नागरङफलं गुरु ।।
... चरक सूत्रस्थान
संत्री चवीला आंबट-गोड असतात, हृदयाला पोषक असतात, जेवणाची रुची वाढवितात, वातदोषाचे शमन करतात, गुरु गुणाची असतात. संत्रे आंबट असल्याने पित्तप्रकृतीसाठी अनुकूल नसते.

मोसंबे
मोसंबी चवीला गोड असल्याने पित्तप्रकृतीसाठीही उत्तम असतात. पथ्यकर असल्याने तापात, आजारपणातही मोसंबीचा रस देता येतो. मोसंबीचा रस गाळून घेतला तर कफदोषही वाढवत नाही.
मोसंबी चवीला संत्र्यापेक्षा गोड असल्याने अधिक गुणकारी असतात. या दोन्ही फळांचा रस रसधातूसाठी उत्तम असतो. अतिरिक्‍त श्रम झाल्याने थकवा आला, उन्हामुळे किंवा व्यायामामुळे घाम आल्याने शरीरातील जलांश कमी झाला की संत्र्या-मोसंबीचा रस घेणे चांगले असते. संत्री तसेच मोसंबी हृदयाला हितकर व रुचकर असल्याने अकारण धडधड होत असल्यास, छातीत अस्वस्थता जाणवत असल्यास मध तसेच खडीसाखर टाकलेला संत्र्या- मोसंबीचा रस घोट घोट घेण्याचा फायदा होतो. अर्थात हृदयामध्ये विकृती असल्यास बरोबर ीने इतर औषधांची आवश्‍यकता असतेच. भूक लागते पण जेवायची इच्छा होत नाही अशा वेळी संत्र्या-मोसंबीचा रस मीठ-जिरे-ओवा यासह घोट घोट घेण्याने तोंडाला रुची येते. पित्ताची प्रकृती असणाऱ्यांनी किंवा पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी संत्र्यापेक्षा मोसंबीचा वापर अधिक करणे चांगले. वारंवार सर्दी, खोकला होणाऱ्या व्यक्‍तींनी संत्र्याचा वापर वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करू नये.

जांभूळ
जांभळ्या रंगाची जांभळे पावसाळ्याच्या सुरुवातीस मिळतात.
कषायमधुरप्रायं गुरु विष्टम्भि शीतलम्‌ ।
जाम्बवं कफपित्तघ्नं ग्राहि वातकरं परम्‌ ।।
... चरक सूत्रस्थान
गोड व तुरट चवीची जांभळे शीत वीर्याची असतात, कफ व पित्तदोष कमी करतात पण मलावष्टंभ करतात, पचायला जड असतात आणि वातवर्धक असतात. पित्त वाढल्यामुळे मळमळत असल्यास किंवा जुलाब होत असल्यास थोडी जांभळे खाण्याने बरे वाटते.. मधुमेहाच्या व्यक्‍तींसाठी जांभूळ पथ्यकारक समजले जात असले तरी ती फार प्रमाणात खाणे अयोग्य होय.

कलिंगड
बाहेरून हिरवट-काळपट व आतून लाल रंगाचे कलिंगडाचे वर्णन आयुर्वेदात या प्रमाणे केलेले आहे.
कलिंगं शीतलं बल्यं मधुरं तृप्तिकारकम्‌ ।
गुरु पुष्टिकरं ज्ञेयं मलस्तम्भकरं तथा ।।
कफकृत दृष्टि पित्ते च शुक्रधातोश्‍च नाशनम्‌ ।।
... निघण्टु रत्नाकर
कलिंगड चवीला गोड, वीर्याने शीत व तृप्ती करणारे असते. कफवर्धक व गुरु गुणाचे असल्याने पुष्टिकर व बलवर्धक असते, मात्र अति प्रमाणात घेतल्यास मलावष्टंभ होतो, दृष्टी तसेच शुक्रधातूचा नाश होतो. जून कलिंगड पित्तवर्धक असते.

केळे
केळ्याच्या अनेक जाती आहेत. त्यांच्या गुणांमध्ये थोडा-फार फरक असतो. त्यातल्या त्यात सोनकेळी किंवा वेलची केळी उत्तम समजली जातात.
सुवर्णमोचा मधुरा हिमा च स्वल्पाशने दीपनकारिणी च ।
तृष्णापहा दाहविमोचनी च कफावहा वृष्यकरी गुरुश्‍च ।।
... राजनिघण्टु
सोनकेळे चवीला गोड, वीर्याने शीत व गुरु गुणाचे असते. थोड्या प्रमाणात सेवन केले असता अग्निदीपन करते, तहान शमवते, दाह कमी करते, कफदोष वाढविते, शुक्रधातूला हितकर असते.
छातीत, पोटात जळजळ होणे, पित्तामुळे पोटात दुखणे वगैरे त्रास वारंवार होत असल्यास केळ्याचे नियमित सेवन करण्याचा उपयोग होतो. अकारण वजन कमी होत असल्यास, अशक्‍तता जाणवत असल्यास किंवा वजन वाढत नसल्यास केळे-मध-तूप एकत्र करून खाण्याचा उपयोग होतो. वात व पित्तप्रकृतीसाठी केळे चांगले असतेच मात्र कफप्रकृतीच्या व्यक्‍तीने केळ्यावर मध व वेलची पूड टाकून खावे.

टरबूज
हनुमान जयंतील? ?र्साद म्हणून खाल्ले जाणारे टरबूज स्वादिष्ट, वीर्याने शीत व कफवर्धक असते, तृप्ती देते, ताकद वाढवते, शुक्रधातूला हितकर असते. टरबूजाच्या सेवनाने कोठा शुद्ध होतो, शरीरश्रम नाहीसे होतात, दाह शमतो, वात व पित्त दोषांचे शमन होते. टरबूज उन्मादावर म्हणजे मनोभ्रम, वेड्यासारखे वागण्यावरही उपयुक्‍त असते. कलिंगडाप्रमाणे टरबूजही जुने झाल्यास पित्त वाढवते.

पेरू
पिकलेला पेरू चवीला गोड आणि कफवर्धक असतो, तर कच्चा पेरू तुरट असतो. कच्चा पेरू खाऊ नये आणि पिकलेला पेरू शक्‍यतो बिया काढून खावा. पिकलेला पेरू खाण्याने मलप्रवृत्ती साफ व्हायला मदत मिळते, जेवणानंतर पोटात आग होणाऱ्यांनी पेरूच्या एक- दोन फोडी खाण्याचा उपयोग होतो. वारंवार सर्दी, खोकला होणाऱ्यांनी, दम्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी पेरू खाऊ नये. तसेच रात्री पेरू खाणे टाळावे.

सिताफळ
सीताफलं तु मधुरं शीतं हृद्यं बलप्रदम्‌ ।
... निघण्टु रत्नाकर
सिताफळ चवीला मधुर, वीर्याने शीत, रुचकर व ताकद देणारे असते, पित्तशामक व कफवर्धक असते. उष्णतेचा त्रास असणाऱ्यांसाठी सिताफळ चांगले असते, मात्र ते पचायला जड असल्याने पचनशक्‍तीचा विचार करून खावे. विशेषतः उन्हाच्या दिवसात, शरद ऋतूत पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून सिताफळ खावे. वारंवार सर्दी, खोकला, दमा होण्याची सवय असणाऱ्यांनी, अंगावर सूज येणाऱ्यांनी, वजन जास्ती असणाऱ्यांनी मधुमेहाच्या रोग्यांनी सिताफळ खाऊ नये.

अननस
पिकलेला अननस आंबट-गोड व सुगंधी असतो. अननस योग्य प्रमाणात घेतल्यास पचनास सहायक ठरू शकतो. विशेषतः कफदोष वाढल्यामुळे पचन मंदावले असल्यास अननसाच्या फोडी चावून खाण्याचा उपयोग होतो. मात्र रिकाम्या पोटी अननस मुळीच घेऊ नये, गर्भवतीने अननस खाऊ नये. पित्ताचा त्रास होणाऱ्यांनी, पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी, वारंवार सर्दी होणाऱ्यांनी अननस न खाणेच चांगले. अशा प्रकारे आपापल्या प्रकृतीचा, दोषप्रकृतीचा विचार करून योग्य त्या फळांचे सेवन करण्याने आरोग्य टिकवण्याचा प्रयत्न करता येतो. फळे खाताना लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे फळे किंवा फळांचा रस उपाशीपोटी, विशेषतः सकाळी नाश्‍त्यासाठी घेऊ नये. तसेच, रात्रीच्या जेवणानंतरही घेऊ नये. जेवणासह किंवा मधल्या वेळेत फळे खाणे उत्तम असते. फळे व दूध एकत्र करून खाऊ नये. तसेच, फळे खाल्ल्यावर लगेच दूध पिऊ नये.

----------------------------------------------------------------------
आजार रोखणारी फळे!
फळांमुळे आजारांना प्रतिबंध करता येतो तसाच आजारांनंतर शरीराची कमी झालेली शक्ती भरून काढण्यासाठीही फळांचा उपयोग होतो. फळांतील विविध पोषक घटकांमुळे हे शक्‍य होते. अन्नपदार्थांचे पचन लवकर व्हावे यासाठी त्यांत पाण्याचे प्रमाण चांगले असावे लागते. फळांमध्ये निसर्गतःच पाण्याचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्यांचे पचन लवकर होते. चांगले होते.

फळांतील शर्करेचे ज्वलन शरीरात लवकर होते आणि या क्रियेत निर्माण होणारी द्रव्ये शरीराला त्रासदायक नसतात. या तुलनेत मेद आणि प्रथिनांचे शरीराला आवश्‍यक असलेल्या ऊर्जेत रूपांतर करणे अधिक गुंतागुंतीचे असते. या प्रक्रियेत निर्माण होणारी रसायने शरीराला त्रासदायक ठरू शकतात. प्रथिनांची निर्मिती अमायनो ऍसीडस्‌पासून होते. आपल्या शरीरात एकूण २० वेगवेगळ्या अमायनो ऍसीडस्‌चा वापर केला जातो. त्यापैकी आठ अमायनो ऍसीडस्‌ शरीराला अत्यावश्‍यक असतात. केळ्यासारख्या अनेक फळांमध्ये ही सर्व अमायनो ऍसीडस्‌ असतात.
----------------------------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला.

Tuesday, April 15, 2008

हेल्थ फॅक्‍ट्‌स - आरोग्यासाठी फायबर्स

हेल्थ फॅक्‍ट्‌स - आरोग्यासाठी फायबर्स


प्रा णी आणि वनस्पतींमध्ये पेशी एकत्र धरून ठेवण्यासाठी तंतूंची आवश्‍यकता असते. काही तंतू विरघळत नाहीत, पाणी शोषून घेतात. त्यामुळे आतड्यांतून अन्न कमी वेळात सहज पुढे सरकते, मलाचा आकार वाढतो आणि घट्टपणा कमी होतो. विरघळणाऱ्या तंतूंमुळे आरोग्याच्या दृष्टीने अन्य अनेक लाभ होतात. ......
तृ णधान्ये, फळे, भाज्या आणि डाळींतून आपल्याला तंतू मिळतात. धान्ये, फळे आणि भाज्यांच्या सालींमध्ये तंतूंचे प्रमाण अधिक असते. दळणे आणि पॉलिश करणे या प्रक्रियांमुळे या तंतूंचा नाश होतो. म्हणून साली न काढलेल्या संपूर्ण धान्यांचा समावेश आहारात असावा, असे म्हटले जाते.

Monday, April 7, 2008

हेल्थ फॅक्‍ट्‌स

फळे तुमच्या मेंदूला उत्तेजना देण्याचे काम करतात. जे लोक फळे नियमितपणे खातात, त्यांची स्मरणशक्ती इतरांपेक्षा तल्लख असते. .......
- मोठ्या व्यायामानंतर निर्माण होणारी जीवनसत्त्वे आणि खनिज द्रव्यांची पोकळी भरून काढण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात.

- बारा महिन्यांच्या आतील बाळांना प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका सर्वांत जास्त असतो.

- त्वचेचा कर्करोग होण्याच्या ऐंशी टक्के केसेस केवळ योग्य काळजी घेतल्यामुळे नियंत्रणात आणता येतात।

संधर्भ:
फॅमिली डॉक्‍टर

Monday, March 31, 2008

नक्की खायचं तरी काय?

- प्रा. कुंदा महाजन
फूड सायन्स अॅण्ड न्यूट्रिशन , एसएमआरके कॉलेज, नाशिक

पुष्कळदा काय खायचं नाही हे सांगितलं जातं पण काय आणि कसं खाल्लं पाहिजे हे मात्र समजत नाही. वाढत्या वयातल्या मुलींचा साधारणपणे दिवसभराचा आहार पुढीलप्रमाणे असू शकतो. यात खाद्यसवयींप्रमाणे, मुलींच्या वेळापत्रकाप्रमाणे बदल होऊ शकतात.

* सकाळचा नाश्ता भरपूर आणि चांगल्या पोषणमूल्यांनी युक्त असावा. यामध्ये ग्लासभर दूध असायलाच हवं. उकडलेलं अंडं, होल ब्रेड, व्हेज सॅण्डविचेस, कधीतरी चीझ सॅण्डविचेस, पोहे, उपमा, थालिपीठ, कमी तेलातले भाज्यांचे पराठे, तयार असेल तर अगदी पोळी भाजीची न्याहारी करायलाही हरकत नाही.

* दिवसभरात एक फळ खायलाच हवं. त्यातही सिझनल आणि स्थानिक फळांना प्राधान्य द्यावं. त्या त्या सिझनमध्ये आवश्यक असलेल्या फळांची योजना निसर्गानेच केलेली असते. बोरं, आवळे, चिंचा ही फळं या वयात आवडतात. मुलींना ती भरपूर खाऊ द्यावीत. शक्यतो अख्खं फळच खावं, कधीतरी ज्यूसही चालेल.

* मोठ्या शहरांमध्ये दुपारचा डबा नेण्याची सवय मोडत आहे. घरचं अन्न उत्तमच. पोळ्या, फुलके, इडल्या, पराठे यांंपैकी काहीतरी. भात आणि डाळ. डाळीही मिश्र प्रकारच्या असल्यास उत्तम. दोन भाज्यापैंकी एक पालेभाजी असावी. मुलींना पालेभाज्या आवडत नाहीत, अशा वेळी पराठे नाहीतर सूपचा पर्याय आहे. हिरव्या भाज्या केवळ आयर्नसाठीच नव्हे तर चेहऱ्यावरचा तजेला टिकून राहण्यासाठीही हव्यात. सॅलड किंवा कोशिंबीरीच्या माध्यमातून कच्चा भाजीपाला आहारात असावा. दही, ताक, लस्सी, छास मुलींना आवडतं.

* संध्याकाळचा न्याहारी हा मुलींच्या आरोग्यामधला कळीचा मुद्दा ठरू पाहतोय. या वेळीच जास्तीतजास्त अनारोग्यकारक पदार्थ आहारातून जातात. चहाबरोबर ढोकळा, पॉपकॉर्न, सॅण्डविचेस, फार मसालेदार नसलेली कडधान्यांची चाट, कॉर्नचे पदार्थ, भुट्टा, फुटाणे, खारवलेले दाणे असे पदार्थ संध्याकाळी खायला हरकत नाही.

* आजकाल नोकरी करणाऱ्या महिलांना दररोज ताजे पदार्थ करणं अशक्य असतं. सुट्टीच्या दिवशी खाकरे, वेगवेगळे लाडू, चिवडा, तिखटमिठाच्या पुऱ्या, दशम्या असे पदार्थ करून ठेवता येतील. तयार पदार्थांमध्ये कॉर्नफ्लेक्स, पफ्ड राइसही चालेल.

* संध्याकाळचं जेवण हलकं असावं. ते शक्यतो सकाळच्या जेवणाची पुनरावृत्ती करणारं नसावं. पुष्कळ कुटंुबामध्ये एकदाच स्वयंपाक करून तेच अन्न दोन वेळा खाल्लं जातं. मुलं साहजिकच यामुळे कंटाळतात.

टीन एजर मुलींची कॅलरीजची गरज.(नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या नॉर्म्सनुसार)

एकूण कॅलरीज : २०६० कॅलरीज

प्रोटिन : ६३ ग्रॅम्स

कॅल्शिअम : ५०० मिलिग्रॅम

आयर्न : ३०मिलिग्रॅम

व्हिटॅमिन ए : ६०० मायक्रोग्रॅम

बिटा कॅरोटिन : २४०० मायक्रोग्रॅम

बी १ थायमिन : १ मिलिग्रॅम

रायबोफ्लेविन : १.२ मिलिग्रॅम

नायसिन : १४ मिलिग्रॅम

फोलिक अॅसिड : १०० मायक्रोग्रॅम

व्हिटॅमिन सी : ४० मिलिग्रॅम
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2744831.cms

ad