Showing posts with label घरात ठेवा मंगलकलश. Show all posts
Showing posts with label घरात ठेवा मंगलकलश. Show all posts

Tuesday, August 24, 2010

घरात ठेवा मंगलकलश - भाग - ५

संजय पाटील, sanjuspatil@hotmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it


सध्या आपण मंगलकलशाची माहिती घेतोय. त्यामुळे मला येणारे एसएमस, मेल खूप कमी झालेयत. सर्वाना झटपट चमत्कार करणारं काहीतरी हवंय. बस्स, मार्केटमध्ये जायचं ती वस्तू घेऊन यायची, घरात ठेवायची की फुटलीच नशिबाची लॉटरी असं काहीतरी हवं. (शक्य झाल्यास ती वस्तुही घरपोच मिळायला हवी. त्यासाठी मार्केटमध्ये तरी कशाला जायचं ?) हे मंगलकलश वगैरेचं झंझट कोण करत बसणार ? पूर्वी रांगोळीबद्दल लिहिलं होतं. त्यावेळी ‘अहो, ही रांगोळी दररोज कोण काढणार , एवढा वेळ कसा काढणार', असे तक्रारवजा सूरात गृहिणींचे फोन  यायचे. गंमत म्हणजे या गृहिणी नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या होत्या. माझ्या मित्राची मामी आहे. ती न्यायाधीश आहे. अशा पोस्टवर काम करणारी मामी दररोज स्वतच्या हातानं रांगोळी काढून मग कोर्टात जाते. करायचं ठरवलं तर सगळं जमतं हो! कंटाळाच करायचा असेल तर हे कसं जमणार, ते कसं जमणार अशा नकारघंटा वाजतच राहणार.
भारतात लोक दिवसाकाठी सरासरी  तीन तास टीव्ही बघण्यात घालवतात असं एक पाहणी अहवाल सांगतो. (ज्यांना हे स्टेटमेन्ट मान्य नसेल ते लोक यापेक्षाही जास्त वेळ घालवत असतील.) टीव्हीप्रेम इतकं असेल तर बाकीच्या गोष्टींसाठी वेळ कुठला उरायला?.. मग कमर्शियल ब्रेकमध्ये  फोन करून पीडणार मला. काय तर म्हणे , दररोज रांगोळी काढायची कुणी?..  कुणी म्हणजे काय, तुम्हीच! तुमच्या घरी येऊन काय दूधवाला रांगोळी काढणार..?  
मंगलकलशाची स्थापना वर्षांतून एकदाच म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला करायची आहे. (प्रत्येक साडेतीन मुहुर्तावर केल्यास आणखी चांगलं.)  मागील लेखात जे मंत्र व विधी दिले आहेत ते वाचून काढा. साहित्य तयार ठेवा. आणि स्थापना करा.  स्थापनेसाठी किती वेळ लागतो माहीत आहे. जेमतेम २५ मिनिटं.  वर्षांकाठी टीव्ही बघण्यात किती वेळ जातो माहितेय?  एक हजार ९५ तास.. अरे देवा! हे सर्व मी काय सांगत बसलोय.  त्यापेक्षा एका वाक्यात सांगतो, पटलं तर करा नाहीतर सोडून द्या.
मला वाटतं आता थोडीच लोकं माझ्याबरोबर उरलीयत. (बाकीच्यांनी टीव्ही ऑन केला का?) या थोडय़ांसाठी अधिक माहिती देतो.
सर्वसाधारण कलशाची माहिती भाग क्र. तीन मध्ये दिली होती. ती रीपीट करणं गरजेचं वाटतंय.
एक तांब्याचा  कलश घ्या. त्याच्या अधोभागावर हळद व कुंकवाच्या एकाआड एक रेषा ओढा. रेषा किती असाव्यात यासाठी  काही नियम नाही. मध्यभागी अष्टगंधाने किमान दोन स्वस्तिक काढा. उध्र्वभागी चंदन किंवा गोरोचनाच्या तीन आडव्या रेषा (त्रिपुंड) ओढा. तांब्याच्या गळ्याला पिवळा-नारंगी धागा (नाडा) बांधा. तांब्या पाण्यानं अर्धा भरा. त्यात गोमूत्राचे चार थेंब, मोठी सुपारी, थोडय़ा, अक्षता चांदीचं (देवादिकांचं चित्र असलेलं नको) किंवा साधं चलनातलं नाणं आणि शक्य झाल्यास दुर्वा, चंदन, सवरेषधी, सुगंधी द्रव्य, सप्तमृत्तिका, पंचरत्नं टाका, तांब्याच्या तोंडावर विडय़ाची किंवा अशोक वा आंब्याची पाच पानं किंवा पंचपल्लव (वड, पाकर किंवा शिरिष, औदुंबर, आंबा व पिंपळ यांची पानं) ठेवा. त्यावर नारळ ठेवा. हा कलश लाकडी पाटावर तांदळाचं/ गव्हाचं (किंवा सप्तधान्याचं) स्वस्तिक किंवा चक्र काढून त्यावर स्थानापन्न करा. लाकडी पाट जमिनीवरच ठेवलंत तर बरं. एवढं सगळं झालं की तुमचा परिपूर्ण मंगलकलश तयार झाला. पानं सुकत असल्यानं दर दिवसाआड ती बदलणं गरजेचं आहे. पाणी दररोज किंवा आठवडाभरात बदललं तरी चालेल. किमान पंधरा दिवसांतून एकदा तांब्याची घासपूस करावी. तांदळाचं- गव्हाचं स्वस्तिक विस्कटल्यानंतर नवं तयार करावं. तांदूळ खराब झाल्यास पक्ष्यांना, गायीला खाऊ घालावेत किंवा झाडाच्या बुंध्याशी सोडावेत. बाकी नारळ, सुपारी, नाणं वगैरे वारंवार बदलण्याची गरज नाही. दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाला ते बदलावं. जुन्या वस्तू पाण्यात सोडून द्याव्यात.
अशा प्रकारे विधिवत स्थापन झालेला मंगलकलश घराच्या कोणत्याही भागातील ऊर्जा वृद्धिंगत करू शकतो. घराच्या कोणत्या दिशेला तो ठेवल्यास काय शुभ परिणाम मिळू शकतात ते आता पाहू. कलशाची सर्वसाधारण रचना आपण वर पाहिलीच आहे. काही समस्यांचं निराकरण करण्यासाठी दिशानुरूप त्याची मांडणी करतो तेव्हा काही बदल त्यात करावे लागतात. त्याबद्दल थोडक्यात विवेचन आता करतो.
उत्तर
उत्तर ही जलतत्त्वाची दिशा आहे. करियर, नोकरी, व्यवसाय, नोकरीतील नव्या संधी या दिशेवरून बघतात. ही कुबेराची दिशा आहे. करियरमध्ये व्यवसायात काही अडचणी असतील, चांगलं शिक्षण असूनही नोकरी मिळत नसेल तर या दिशेला मंगलकलश ठेवावा. चंदेरी वर्ख असलेल्या किंवा आकाशी रंगाच्या पाटावर त्याची स्थापना करावी. कलशात चांगल्या प्रतीचा मोती टाकावा. तत्पूर्वी । ओम श्रां श्रीं श्रौं स: सोमाय नम:। या बीजमंत्राने त्यावर १०८ वेळा जलाभिषेक करावा. चांदीचे किंवा जस्ताचे चंद्रकोरीच्या आकाराचे तुकडे टाकावेत. चांदीचाच कलश वापरू शकलात तर सोन्याहून पिवळं. स्वस्तिक तांदळाचंच काढावं आणि पानं विडय़ाची वापरावीत. पानांची संख्या दहा ठेवावी. शक्य असेल तर प्लक्ष (पाकर) या झाडाची पानं वापरावीत. उर्वरित रचना वर सांगितल्याप्रमाणं सर्वसाधारण पद्धतीनं करावी.
ईशान्य
ईशान्य ही जलतत्त्वाची दिशा आहे. ही ज्ञानाची दिशा आहे. या दिशेत श्रीशंकर उभे असतात. मुलं अभ्यास नीट करीत नसतील, स्मरणशक्तीच्या एकाग्रतेच्या काही समस्या त्यांना असतील तर या दिशेत मंगलकलश ठेवा. येथेही चंदेरी वर्खाच्या किंवा आकाशी रंगाच्या लाकडी पाटावर त्याची स्थापना करावी. कलशात चांगल्या प्रतीचं स्फटिक लिंग -बाण टाकावं. (स्फटिक लिंग म्हणजे पिंड नाही हे कृपया लक्षात घ्या). चांदीचं छोटं त्रिशूळ आणि चंद्रकोरीच्या आकाराचे चांदीचे आठ तुकडे पाण्यात टाकावेत. स्फटिक लिंग कलशात ठेवण्यापूर्वी त्यावर ओम नम:शिवाय। ही शिवपंचाक्षरी उच्चारत १०८ वेळा जलाभिषेक करावा. त्यानंतर
 ओम त्र्यंबक यजमाहे सुगंधि पुष्टीवर्धनम
ऊर्वारुकमिव बंधनान मृत्योमृक्षीयमामृतात
हा महामृत्युंजय मंत्र १०८ वेळा जपत जलाभिषेक करावा. शक्यतो चांदीचा कलश वापरावा. स्वस्तिक तांदळाचं काढावं आणि विडय़ाची आढग पानं वापरावीत, बाकीची रचना नेहमीप्रमाणे करावी.
पूर्व
पूर्व ही जलतत्त्वाची दिशा आहे. ती संततीची कारक आहे. आरोग्य, कुटुंब आणि वडीलधारी त्यावरून बघतात. संततीसंदर्भात काही समस्या असतील, कुटुंबात वाद असतील, आरोग्याच्या कटकटी असतील तर या दिशेत मंगलकलश ठेवा. पोपटी रंगाच्या किंवा तांब्याचा वर्ख असलेल्या लाकडी पाटावर त्याची स्थापना करावी. कलशात पिरॅमिडच्या आकाराचं स्फटिक टाकावं. (परवडत असेल तर हिरा टाकावा) हिरा किंवा स्फटिक कलशात ठेवण्यापूर्वी ओम द्रां द्री द्रौ स: शुक्राय नम:। या बीजमंत्राचा उच्चार करीत १०८ वेळा त्यावर जलाभिषेक करावा. वडाच्या झाडाची तीन किंवा चार पानं वापरावीत. बाकीची रचना सर्वसाधारणपणे करावी.
(क्रमश:)
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Monday, August 16, 2010

घरात ठेवा मंगलकलश - भाग - २




संपर्क-  sanjuspatil@hotmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बौद्ध धर्मातील पुरातन प्रतीकांपैकी कलश हे एक प्रतीक आहे. उपयुक्त पात्र व रहस्यमय प्रतीक अशा दोन्ही अर्थानी बौद्ध धर्मात कलश आढळतो. कलशाची योजना व्यवहारात पाणी तर तत्त्वज्ञानात जीवनामृत साठविण्यासाठी असते असं बौद्ध धर्म सांगतो. कलश हे अवलोकितेश्वराचं विशेष अभिज्ञान चिन्ह आहे. अवलोकितेश्वर आपल्याजवळील कलशात करुणामृत साठवून ठेवतात अशी कल्पना आहे. पाच मोठे सच्छिद्र कलश पाच ज्ञानी बुद्धांची प्रतीकं म्हणून वेदीवर ठेवण्याची प्रथा बौद्ध धर्मात आहे.
 लग्नासारख्या मंगलकार्यात, शांतिकर्मात, स्वारीवर निघण्याच्या वेळी, राज्यरोहणप्रसंगी, धान्याची कापणी झाल्यानंतर धान्याच्या राशीवर कलशस्थापना करण्याची प्रथा होती. राज्याभिषेकाच्या प्रसंगी सिंहासनाजवळ चार समुद्रांच्या जलानं भरलेले चार कलश ठेवीत. या राजाचं राज्य समुद्रवलयांकित किंवा सार्वभौम होवो, ही भावना त्यामागं असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी विद्वान गागाभट्टांनी सात नद्यांच्या
पाण्यानं भरलेले कलश मागवले होते आणि या सप्तकलशांतील पाण्यानं त्यांनी महाराजांना अभिषेक केला असे उल्लेख आढळतात.
प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाचं वर्णन कालिदासानं केलंय. एका श्लोकात तो म्हणतो-
सरित्समुद्रान्सरसीश्च गत्वा
रक्ष:कपीन्दैरुपपादितानि
तस्यापतन्मूर्घनि जलानि जिष्णा
विन्धस्य मेघप्रभवा इवाप:
अर्थात राक्षस व वानर यांच्या नायकांनी भिन्न भिन्न नद्या, समुद्र व सरोवरे यांतून आणलेले पाणी जयशील रामाच्या डोक्यावर विंध्य पर्वताच्या डोक्यावर मेघातलं पाणी पडावं त्याप्रमाणं सुवर्णकलशातून पडलं.
भारतीय शिल्पकलेत मोठय़ा प्रमाणावर कलशाची योजना केली गेलेय. भरहूत, सांची, अमरावती येथील बौद्ध शिल्पात कमलपुष्पानं युक्त असे नक्षीदार मंगलकलश आढळतात. मंदिराच्या शिखरावर शेवटी जो कलश असतो तो मंगलकलशच होय. भारतीय शिल्पकलेतला कलश वाटोळा किंवा अंडाकृती असतो तर गांधार शिल्पातला टोकदार असतो. मैत्रेय, बोधिसत्त्व, वसुंधरा या बौद्ध देवता व धन्वंतरी ही पौराणिक देवता कलशधारी आहेत. देवांचा खजिनदार असलेल्या कुबेराचा उजवा पाय  एका लवंडलेल्या कलशावर दाखवतात. अनेक देवळांत कलशधारी स्त्रीची मूर्ती आढळते.
प्राचीन वास्तुकलेतील कलश ‘सवरेपरि विराजते’ असा आहे. यालाच आपण कळस असं म्हणतो. मंदिर म्हटलं की त्याला कळस हवाच. कळस उभारल्याशिवाय मंदिररचना पूर्ण होत नाही. कलहान्तानि हम्र्याणि म्हणतात, त्या धर्तीवर ‘कलशान्तंच मंदिरम्’ असं नवं सुभाषित रचायला हरकत नाही. कुटुंबाचा शेवट कलहात तसा मंदिराचा शेवट कळसात असा त्याचा अर्थ होईल. मंदिराच्या शिखराकडे तुम्ही पाहिलंत तर वाटोळा कलश, त्यावर पल्लव आणि त्यावर शेंडी उभी करून नारळ अशीच रचना दिसेल. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेला मंदिर म्हटलं असून तिच्या शेवटच्या अध्यायाला कलशाध्याय म्हटलंय.
कलश जरा मोठा केला की तो घट बनतो. नवरात्रात देवीचा घट बसतो तोही कलशच. संक्रांतीला सुवासिनी सुगडं देतात, तो घटदानाचाच प्रकार होय. अक्षय्यतृतीयेस पितरांच्या उद्देशानं आमान्नासहित कलशदानच सांगितलंय.  मत्स्यपुराणात अनेक महादानं सांगितलीत. त्यात एक महाभूत घटदान आहे. हिरण्यगर्भदान सांगितलं आहे तेही कलशाच्या आधारानं. याचा मत्स्यपुराणातील विधी आहे तो पुढीलप्रमाणं- शुभदिनी एक मोठा सुवर्णकलश करावा. तो दुधातुपानं भरावा. तिळांच्या राशीवर ठेवावा. मग यजमानानं मंगलस्नान करून त्या कलशात उत्तराभिमुख बसावं. ब्रह्माची प्रतिमा मुठीत धरावी. ही प्रतिमा हाच हिरण्यगर्भ. ब्राह्मणांनी त्या हिरण्यगर्भाचे सर्व संस्कार करावेत. मग यजमानानं त्या कलशातून बाहेर येऊन ती मूर्ती आचार्याना दान द्यावी आणि ऋत्विजांनी अन्य कलशांतल्या जलानं यजमानास अभिषेक करावा.
नवरात्रीतील गुजराती महिलांचा गरबा म्हणजेही कलश. पण हा कलश सजल नसतो तर सतेज असतो. त्याच्या आत पाण्याऐवजी दिवा तेवत असतो. कलशाचा दीपज्योतीशी संबंध येतो तेव्हा त्याची शोभा काही आगळीच बनते. घटात दिवा म्हणजे हृदयात प्रकाशित आत्मा. तुकोबांचं एक सुंदर चरण आहे-
सांडिली त्रिपुटी। दीप उजळला घटी।
उत्तर प्रदेशातील चरकला आणि पंजाबातील जागो ही दोन लोकनृत्ये म्हणजे घटनृत्येच होत.
महाभूतघटदान, हिरण्यगर्भदान, अभिषेक, जलकलश, दीपकलश आदी कोणत्याही विधानाचं सार काढू गेल्यास  हे स्पष्ट होतं की, कलश हे मानवशरीराचं प्रतीक आहे. म्हणूनच तो धान्यपुंजावर स्थापतात. कारण अन्न हे मानवदेहाचं आधारभूत तत्त्व आहे. अन्नमय प्राण आणि प्राणमय पराक्रम अशी एक म्हण आहे. अन्नं प्राणमन्नमपानमाहु या श्रुतीचाच तो अनुवाद आहे. कलश म्हणजे जीवनरूपी जल आणि प्राणरूपी ज्योत यांचं धारण करणारा सुघटित देह होय. सकल संतांनी देहाला घट म्हणून संबोधलं आहेच..
(क्रमश:)
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Saturday, July 24, 2010

घरात ठेवा मंगलकलश - भाग - १



संजय पाटील
संपर्क- 
 sanjuspatil@hotmail.com







फेंगशुईतील एक उपाय आहे. त्यात एक काचेचा वाडगा घेतात. त्यात पाणी भरतात. पाण्यात एक नाणं, निळ्या रंगाच्या गोटय़ा
ठेवतात. फुलांच्या पाकळ्या पसरतात. मेणबत्तीचा छोटा तुकडा पाण्यावर तरंगत ठेवतात. घराच्या कोणत्याही कोन्यात हा वाडगा
 ठेवून तेथील ऊर्जा तुम्ही वृिद्धगत करू शकता. पंचगुणांची वृद्धी करणारा हा उपाय आहे. कारण पाणी, निळ्या गोटय़ा (पृथ्वी),
मेणबत्ती (अग्नी), नाणं (धातू), फुलाच्या पाकळ्या (लाकूड) अशा पाचही तत्त्वाचं प्रतीकात्मक संतुलन यात राखलं जातं. पण
 थांबा! लगेच जमवाजमव करायला धावू नका! पंचगुणांची वृद्धी करण्यासाठी या उपायापेक्षा किती तरी पटीनं समर्थ, पवित्र
 आणि अस्सल भारतीय उपाय मी आपणाला आता सांगणार आहे. त्या उपायाच्या तयारीला लागा. हा जबरदस्त उपाय म्हणजे
 मंगलकलश. घरात मंगलकलश ठेवा. मंगल होणारच!
मंगलकलश हा जोडशब्द आहे. मंगल आणि कलश या दोन शब्दांनी तो बनलाय. मंगलकलशाबद्दल जाणून घेण्यासाठी आपणाला
 या दोन्ही शब्दांची फोड करावी लागेल. प्रथम कलश या शब्दाबद्दल जाणून घेऊ या.










कलशाची व्याख्या
गोलाकार, उभट पात्र म्हणजे कलश. कालिका पुराणात त्याच्या उत्पत्तीची कथा सांगण्यात आलीय. त्यानुसार देव आणि दानव
अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन करीत असताना अमृत धारण करण्यासाठी दस्तुरखुद्द विश्वकम्र्यानं एक पात्र बनवलं. ते पात्र म्हणजे
 कलश. या पात्राचं नामकरण कलश असंच का करायचं याचाही खुलासा हेमाद्रीच्या व्रतखंडात करण्यात आलाय.
 तो पुढीलप्रमाणे :-
                       कलं कलं गृहीत्वा च देवानां
                      विश्वर्कमणा निर्मितो
                     य: सुरैर्यस्मात् कलशस्तेन उच्यते
                     (हेमाद्री व्रतखंड)
अर्थात.. विश्वकम्र्यानं देवांच्या कलेकलेचं ग्रहण करून तो बनवला म्हणून तो कलश होय.
तंत्रसमुच्चयात कलशाच्या मोजमापांची माहिती देण्यात आलीय.
               पञ्चादशागलुव्याम उत्सेध: षोडषाडगुल:
              कलशानां प्रमाणं तु मखमष्टाजडगुलं स्मृतम्
                 (तंत्रसमुच्चय)
अर्थात ५० अंगुळं परिघ, १६ अंगुळं उंची व ८ अंगुळं मुख असं त्याचं आकारमान सांगितलंय.  आता एक अंगुळ म्हणते
 किती हे पाहण्यासाठी आपल्याला मानसारममध्ये डोकवावं लागेल. मानसारम ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक
४० ते ५८ मध्ये परिमाणाची माहिती दिली आहे. त्यानुसार लहानात लहान कण, की ज्याला फक्त ऋषीमुनी पाहू शकतात, तो
कण म्हणजे परमाणू (अणू) होय. परमाणूच्या आठपट मोठा असणारा कण म्हणजे रथधुळी (रेणू), रथधुळीच्या आठपट मोठा
 कण म्हणजे वालग्र (केसाचं टोक), आठ वालग्र म्हणजे एक लीक्ष (डोक्यातील लीख) आठ लीक्ष म्हणजे एक युक (ऊ), आठ
युक म्हणजे एक यव (जन) आणि आठ यव म्हणजे एक अंगुळ (बोटाची जाडी). आहे ना गमतीशीर! ऋषीमुनींचं ज्ञान किती
सूक्ष्म होतं त्याची कल्पना यावरून यावी.
अगदी ऋग्वेदातही कलशाचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदातला हा कलश मातीचा किंवा भोपळ्याचा बनविलेला असे. याशिवाय
द्रोणकलश, पूतभृत व आधवनीय असे कलशाचे आणखी प्रकार वैदिक साहित्यात आढळतात. सोमरस साठविण्यासाठी तयार
केलेला मातीचा मोठा कलश म्हणजे आधवनीय व पृतभूत कलश होत. (सोमरस म्हणजे दारू नव्हे हे वाचकांनी कृपया लक्षात
घ्यावं. ऋग्वेदातील बहुसंख्य ऋचांमध्ये सोमरसाचा उल्लेख आहे. अमृताशी तुलना करू शकेल असं ते एक पवित्र द्रव्य होतं.
विशिष्ट वनस्पतीपासून ते बनवलं जात असे. आजच्या काळात मात्र सोमरस म्हणजे दारू असला अपप्रचार करून त्या पवित्र
 द्रव्याला बदनाम करण्यात आलंय.) द्रोणकलश हा द्रोणाच्या आकाराचा चौकोनी किंवा वाटोळा कलश होय. याव्यतिरिक्त कलशाचे
 नऊ प्रकार सांगितले गेलेयत. त्यांची नावं पुढीलप्रमाणे :- १ क्षितींद्र, २ जलसंभव, ३ पवन, ४ अग्निसंभव, ५ यजमान,
६ कोशसंभव, ७ सोम, ८ आदित्य, ९ विजय. यापैकी विजयकलश पंचमुख असून महादेवासमान आहे. त्याला पिठाच्या
मध्यभागी स्थापतात तर बाकीचे आठ पूर्व, पश्चिम, वायव्य, आग्नेय, नैर्ऋत्य, ईशान्य, उत्तर व दक्षिण असे अनुक्रमे
स्थापतात. कालिका पुराणाच्या राज्याभिषेकवर्णन या प्रकरणात वरील नऊ प्रकारांसह कलशाचे आणखीही प्रकार सांगितले
आहेत. त्यांची नावं अशी- १ गोह्योपगोह्य, २ मरुत, ३ मयुख, ४ मनोहाचार्य, ५ भद्र, ६ तनुदूषक, ७ इंद्रियघ्न.
वेदामध्ये सापडणारा कलश लोकगीतांमध्येही सापडतो. ‘अमृताचा करा घेऊनी बहिनीस निंगाली भावासंगं’ हे लोकगीत तुम्ही
ऐकलं असेल. यातील करा म्हणजे कलश. नवरदेवाची बहीण हा करा डोक्यावर घेते म्हणून तिला करवली म्हणायचं. लग्नातच
नव्हे तर कोणत्याही मंगलकार्यात पूजा संस्कारात, शांतिक- पौष्टिकात कलशावाचून चालायचं नाही. कलश हा हवाच आणि
तो सर्वप्रथम हवा. रोजच्या देवपूजेतही देवाच्या आधी कलशाची पूजा करावी लागते. कार्यारंभी श्रीगणेशाची पूजा सांगितलेय.
 पण त्याच्याही आधी गंधाक्षता लागतात त्य कलशाच्या कपाळी. कलश हे भारतीय संस्कृतीचं सर्वागीण आणि अग्रमानाचं
प्रतीक आहे. कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी पुण्याहवाचन करतात. हे कार्य दोन कलशांच्या साक्षीनं होतं.    
 (क्रमश:) 
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad