Showing posts with label तुळस. Show all posts
Showing posts with label तुळस. Show all posts

Wednesday, December 5, 2012

लग्न तुळशीचे


लग्न तुळशीचे
डॉ. श्री बालाजी तांबे
विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. संस्कारांची व्यवस्थित जाणीव व्हावी आणि तुळशीपासूनचे आरोग्याचे फायदेही मिळावेत, या हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला. तुळशीचे लग्न ही संकल्पना राबवून भारतीय संस्कृतीने खरोखरच लोककल्याण व आरोग्यशास्त्र यात आपले श्रेष्ठत्व अबाधित राखले आहे. 
आश्‍विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. उत्तम संतानप्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी. उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नये, यासाठी संस्कारांचा बराच भर दिलेला दिसतो. या सर्वांची व्यवस्थित जाणीव व्हावी अशा हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला.

प्रत्येक अणुरेणूत असलेली आदिशक्‍ती जागृत होण्याच्या दृष्टीने साध्या कृष्णमूर्तीत वा शालिग्राम शिळेत असलेले देवत्व व शक्‍ती प्रकट करण्यासाठी विविध वनस्पतींचा, तुळशीच्या झाडाचा उपयोग करून घेतला जातो. पुरुषाची व स्त्रीची कर्तृत्वशक्‍ती व असलेली सुप्त आत्मशक्‍ती दोघांच्या मिलनात एकमेकांना पूरक ठरून जागृत व्हावी असे सांगणारा हा तुळशीविवाहाचा उत्सव.

त्यामागची कथा अशी. वृंदा नावाच्या एका स्त्रीला श्रीकृष्णांशी लग्न करायचे होते, पण ती विवाहित होती. ""कलियुगात तू तुळशीच्या रूपात प्रकट होशील, तेव्हा तुझे माझ्याशी लग्न होईल,'' असा श्रीकृष्णांनी तिला वर दिला. म्हणून कार्तिक महिन्यात एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत श्रीकृष्ण व तुळस यांचे लग्न लावण्याची पद्धत रूढ आहे.

कन्यादानाचे पुण्य ही कथा हा विषय सविस्तर समजावत असली तरी आता पावसाचा मंदाग्नीचा ऋतू संपून शरदाच्या व हेमंताच्या आगमनाबरोबर स्त्री-पुरुषांच्या मिलनासाठी उत्तम काळ असल्याची सूचना हा उत्सव देतो. त्यातून पुढे अत्यंत नैसर्गिक पद्धतीने आरोग्यवान संतती प्राप्त होऊ शकेल, ही सूचनाही देतो. गर्भसंस्कारांना भारतीय परंपरेने, भारतीय आरोग्यशास्त्राने किंवा वेदासारख्या भारतीय जीवनशास्त्रांनी किती महत्त्व दिलेले आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच.

कन्यादानाचे पुण्य मोठे असते व देणाऱ्याचा हात वर असतो, हे लक्षात घेतले तर स्त्रीचे महत्त्व किती जास्त आहे हे भारतीय परंपरेतील लग्नामुळे समजते. तसेच त्या निमित्ताने सर्व उत्सवांमध्ये हा एक मोठा प्रसंग प्रत्येकाला करता यावा म्हणून ज्यांना आपल्या घरात लग्नविधी करण्याचा योग नसेल त्यांच्यासाठी तुळशीचे लग्न करण्याची अमूल्य संधी असते.

सर्व व्हायरस, दुष्ट शक्‍ती, विषारी वायू, संकटे यांना बाहेर थोपवून धरणारी तुळस प्रत्येक भारतीयाच्या दारात उभी असते. शिवाय सर्दी, पडसे, ताप अशा बारीकसारीक तक्रारींवर उपयोगी पडणारी तुळस बहुमूल्य असून, ती पूजनीय ठरते. स्त्रियांच्या हॉर्मोनल संस्थेवर काम करत असल्याने तुळशीचे महत्त्व त्यांच्या लेखी अधिकच असते. त्यांना या वनस्पतीच्या सहवासाचा अधिक फायदा व अधिक परिणाम होत असावा असे वाटते.
मोठ्या चौसोपी वाड्यात मागच्या-पुढच्या अंगणात तुळशीवृंदावन असणे हे सौंदर्याचे व मांगल्याचे प्रतीक असते. पण दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्यांसाठीसुद्धा दारासमोर छोट्या शिंकाळ्यात तरी तुळस लावलेली असते. साधारणतः तुळशीवर आम जनता प्रेम करताना दिसते.

तुळशीपत्राचे महत्त्व 

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठीची तुळशीचे उपयोग सर्वज्ञात आहेत. त्या दृष्टीनेही दारात-अंगणात तुळशीचे झाड असणे महत्त्वाचे ठरते. अन्नावर तुळशीचे पान ठेवण्याने त्या ठिकाणी दुष्ट शक्‍तींचे तरंग व जीवजंतू येत नाहीत. म्हणून प्रसादावर तुळशीचे पान ठेवले जाते. दान देताना वर तुळशीपत्र ठेवण्याची पद्धत त्यातूनच रूढ झालेली आहे. एखादी व्यक्‍ती सर्व सोडून जेव्हा जाते तेव्हा त्या व्यक्‍तीने सर्व संपत्तीवर तुळशीपत्र ठेवले असे म्हटले जाते. याच्या मागे दुसरेही एक कारण असे, की श्रीकृष्णांची सुवर्ण व रत्न यांच्या वजनाने तूला करत असताना तुळशीच्या पानाचे महत्त्व संपत्तीपेक्षा अधिक असते, हे सिद्ध झाले. विष्णू ही देवता शरीरातील चेतासंस्थेशी संबंधित असते आणि म्हणूनच तुळशी विष्णूला व श्रीकृष्णांना प्रिय समजली जाते. तुळशीचे लग्न ही संकल्पना राबवून भारतीय संस्कृतीने खरोखरच लोककल्याण व आरोग्यशास्त्र यात आपले श्रेष्ठत्व अबाधित राखले आहे. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

आरोग्यदायी तुळस


आरोग्यदायी तुळस
डॉ. श्री बालाजी तांबे
तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणांच्या योगे तुळस अनेक कार्ये करते; मात्र तुळशीमधला सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे शरीरात प्रवेश केल्यावर तुळस लगेच कामाला लागते.

बाग असो किंवा छोटीशी बाल्कनी असो, तुळशीचे झाड नाही, असे घर भारतात शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक घरात तुळस मुलीच्या हक्काने राहते आणि घरामध्ये दर वर्षी विवाह प्रसंग तिच्यामुळेच होऊ शकतो. तुळशीला इतके अनन्यसाधारण महत्त्व का आहे, याचे उत्तर आयुर्वेदात व आरोग्यशास्त्रात सापडते.

तुळशीच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. रामतुळशी व कृष्णतुळशी हे दोन प्रकार सर्वांच्या परिचयाचे असतीलच, पण पास्ता, पिझ्झा वगैरे खाद्यपदार्थांवर बेसिल म्हणून वापरली जाणारी पानेसुद्धा एका प्रकारच्या तुळशीचीच असतात. कापरासारखा वास असणारी तुळशी कर्पूरतुळशी म्हणून ओळखली जाते. याशिवाय लिंबासारखा वास असणारीही एक जात असते. सर्व प्रकारच्या तुळशींना एक प्रकारचा विशिष्ट गंध असतो. त्यामुळे सुगंधी तेल काढण्यासाठीही तुळशीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

तुळशीचे उपयोग अनेक तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणाच्या योगे तुळस अनेक कार्ये करते; मात्र तुळशीमधला सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे ती शरीरात प्रवेशित झाली की लगेच कामाला लागते. शरीरातील लहानातील लहान पोकळीत पोचू शकते. यामुळे आत्यंतिक अवस्था (इमर्जन्सी) असली, की मुख्य औषधांसमवेत तुळशीचा रस देण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो.

थंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे घेण्याने लगेच बरे वाटते. हातापायाच्या तळव्यांना तुळशीचा रस चोळण्याचाही उपयोग होतो. दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळीसुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो.

लघू, रुक्ष, तीक्ष्ण गुणांच्या योगे तुळशी लेखन (अनावश्‍यक चरबी कमी करण्याचे काम) करते. तुळशीच्या पानांचे चूर्ण, नागरमोथा, जव वगैरे द्रव्यांपासून बनवलेले उटणे अंगाला चोळले असता, वाढलेली चरबी कमी होते. कफदोषामुळे झालेल्या त्वचारोगात त्वचा जाड, निबर होताना दिसते, त्यावरही तुळशीचा रस चोळण्याचा उपयोग होताना दिसतो.

तुळशीमध्ये शुद्ध करण्याचा, स्वच्छ करण्याचाही गुणधर्म असतो. मुखामध्ये कफदोष चिकटपणा तयार करतो किंवा जिभेवर पांढरा थर जमा होतो, तो काढण्यासाठी तुळस उपयोगी असते. तुळशीची दोन-तीन पाने चावून खाण्यानेही हे काम होताना दिसते. जखम शुद्ध करण्यासाठीही तुळशीचा हा गुण उपयोगी पडताना दिसतो. विशेषतः पू झालेल्या जखमेवर तुळशीच्या पानांचे बारीक चूर्ण भुरभुरवण्याचा उपयोग होतो. जंतुसंसर्ग झालेली जखम तुळशीच्या पानांच्या काढ्याने धुण्याने जखम शुद्ध व्हायला व भरून यायला मदत मिळते.

शरीरात कुठेही जडपणा, जखडलेपण जाणवत असेल तर त्यावर तुळस उपयोगी पडते. डोके जड होऊन दुखत असेल, कफ भरून राहिला असेल, तर डोक्‍यावर पानांचा शेक करण्याचा फायदा होतो. सायनसमध्ये कफ भरला असेल, जडपणा जाणवत असेल तर बाहेरून तुळशीच्या पानांनी शेक करण्याने लगेच बरे वाटते.

पचनसंस्थेमध्ये कफदोष वाढल्यामुळे पोट जड होणे, सुस्ती वाटणे, तोंडाला चव नसणे वगैरे लक्षणे जाणवतात, अशा वेळी तुळशीची पाने व आले यांचा चवीपुरती साखर टाकून बनवलेला चहा घोट घोट पिण्याने बरे वाटते.

पर्यावरणशुद्धीसाठी तुळस तुळशीची कार्ये चरकसंहितेमध्ये पुढीलप्रमाणे समजावलेली आहेत,
हिक्का कासविषश्‍वास-पार्श्‍वशूलनिनाशनः ।
पित्तकृत्‌ कफवातघ्नः सुरसः पूतिगन्धहा ।। ...चरक सूत्रस्थान 

उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळस उपयुक्‍त असते. कफ तसेच वातदोषाचे शमन करणारी, पित्त वाढवणारी तुळस दुर्गंधीचा नाश करण्यास सक्षम असते. तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो. तुळशीच्या आसापास रोगसंक्रामक जीवजंतूंचे प्रमाण निश्‍चित कमी असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढते, जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो. तुळशीची पाने, मंजिऱ्या वाळवून त्याचा धूप करण्याने तुळशीच्या जंतुघ्न गुणाचा फायदा मिळू शकतो. तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते.


तुळस सेवावी 
आयुर्वेदिक औषधे बनविताना तुळशीच्या पंचांगाचा म्हणजे पाने, फुले, बिया, देठ, मूळ या सर्वांचा वापर केला जातो. घरच्या घरी मात्र सहसा तुळशीची पाने वापरली जातात. तुळशीच्या पानांचा रस काढण्याची पद्धत, पानांचा चहा करण्याची पद्धत, तुळशीच्या बीपासून खीर बनविण्याची पद्धत आपण पाहणार आहोत, जेणेकरून आवश्‍यकतेनुसार लगेच तुळस वापरणे शक्‍य होईल.

तुळशीच्या पानांचा रस काढण्याची पद्धत - साधारण चमचाभर रस हवा असला तर 10-15 पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत व सुती कापडाने पाणी टिपून कोरडी करावीत. खलबत्त्यामध्ये पाने टाकून त्यांची चटणी होईपर्यंत नीट कुटावीत. स्वच्छ सुती कापडावर ही कुटलेली चटणी ठेवून त्याची पुरचुंडी करून पिळावी व तुळशीच्या रसाचे थेंब गोळा करावेत. रस काढल्यावर तो शक्‍य तितक्‍या लवकर वापरणे चांगले. रस शिळा झाला तर त्यातील औषधी गुणधर्म कमी होऊ शकतात. सुती कापडातून पिळून रस काढताना कापडालाच बराचसा रस लागून वाया जाऊ शकतो, त्यामुळे थोडासा रस काढायचा असल्यास कुटलेला गोळा डाव्या हाताच्या तळव्याच्या मध्यावर ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्याने दाबून रस काढता येतो.
तुळशीचा रस मधाबरोबर किंवा साखरेबरोबर घेतला जातो. मधामुळे तुळशीतील कफसंतुलनाचा गुण अधिक वाढतो, तर साखरेमुळे उष्णता, तीक्ष्णता कमी होण्यास मदत मिळते.

तुळशीच्या पानांपासून बनविलेला चहा - एक कप चहा बनविण्यासाठी कपभर पाणी घ्यावे, त्यात तुळशीची चार-पाच पाने टाकावीत, किसलेले आले पाव चमचा घालावे, चवीनुसार साखर टाकावी, एक मिनिट उकळल्यावर वर झाकण ठेवून गॅस बंद करावा. दोन मिनिटांनी गाळून घेऊन गरम गरम प्यायला द्यावा.

तुळशीच्या बियांचा फालुदा - तुळशीच्या बिया पित्तशामक म्हणजे उष्णता कमी करणाऱ्या, लघवी साफ होण्यास मदत करणाऱ्या व पौष्टिक असतात. या बिया पाण्यात 25-30 मिनिटे भिजवून ठेवल्या तर फुलतात व गुळगुळीत बनतात. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा शरद ऋतूत तसेच पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी तुळशीच्या बिया दुधाबरोबर किंवा नारळाच्या दुधाबरोबर घेणे उत्तम असते.

तुळशीचे बाह्य उपयोग त्वचारोगात, विशेषतः खाज येणाऱ्या त्वचारोगात तुळशीच्या पानांचा रस लावण्याचा उपयोग होतो.
तुळशीची पाने वाफवून त्यांचा छातीवर लेप केल्यास कफयुक्‍त खोकला कमी होतो.
विंचू चावला असता दंशस्थानी तुळशीचा रस लावणे चांगले असते.
टॉन्सिल्सच्या सुजेमुळे घसा दुखत असेल, घशात कफ साठल्यासारखे वाटत असेल, तर तुळशीची पाने वाफवून त्यांचा लेप करण्याने बरे वाटते.
सायनस, सर्दी, डोके जड होणे वगैरे तक्रारींवर तुळशीच्या पानांचा वाफारा घेण्याचा फायदा होतो.
तुळशीच्या सान्निध्यात सकाळ-संध्याकाळ काही वेळ बसण्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित होण्यास मदत मिळते.

तुळशीच्या बियांना तकमारिया असेही म्हटले जाते. चमचाभर तुळशीच्या बिया थोड्याशा पाण्यात भिजत घालाव्यात. साधारण तीस मिनिटांनी फुलतात. कपभर कोमट किंवा सामान्य तापमानाच्या दुधात चमचाभर साखर किंवा शतावरी कल्प, आवडत असल्यास अर्धा चमचा रोझ सिरप, भिजवलेल्या तुळशीच्या बिया टाकून एकत्र करून नीट हलवून प्यावे.

तुळशीचे सिरप - तुळशीच्या पानांचा रस काढावा. रसाच्या दुप्पट साखर किंवा गूळ टाकून मंद आचेवर शिजवण्यास ठेवावे. पाण्याचा अंश उडून गेला की सिरप तयार झाले असे समजून भरून ठेवावे. लहान मुलांना देण्यासाठी तसेच बारा महिने तुळशी उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणी हे सिरप उत्तम होय.
दमा, खोकला, घशामध्ये सतत कफाचा चिकटपणा जाणवणे, तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, जंत होणे वगैरे त्रासांमध्ये हे सिरप अर्धा ते एक चमचा इतक्‍या प्रमाणात घेता येते. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Monday, November 7, 2011

तुळस

डॉ. श्री बालाजी तांबे
तुळस हे घरगुती औषध म्हणून उत्तम आहेच, पण आयुर्वेदिक औषधे बनवितानासुद्धा तुळस मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. औषध घेताना अनुपान म्हणूनही तुळशीचा रस वापरला जातो. तुळसीची पाने, बी आणि मूळ औषधात वापरले जाते.

भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला, वृक्षांना, फुला-फळांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. वडाची पूजा, आवळीभोजन, तुळशीचे लग्न वगैरे परंपरा वनस्पतींचा आदर करणे, त्यांचे संरक्षण करणे, वर्धन करणे, त्यांना आपल्या घरातील सदस्याप्रमाणे मानणे, हे आपल्या मनावर बिंबावे यासाठी मुद्दाम सुरू झालेल्या असाव्यात. वनस्पतींना एवढे महत्त्व असण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यात असलेली आरोग्यरक्षणाची क्षमता. अंगणातील किंवा कुंडीतील साध्या वनस्पतींमध्ये किती उत्तमोत्तम गुण आहेत, हे पाहिले तर आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

प्रत्येक घरात असायलाच हवी अशी तुळस पूजेसाठी, कृष्णाला-विष्णूला वाहण्यासाठी तर वापरतातच, पण दर वर्षी तुळशीविवाह करण्याचीही पद्धत असते. तुळशी हे घरगुती औषध म्हणून उत्तम आहेच, पण आयुर्वेदिक औषधे बनवितानासुद्धा तुळशी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. औषध घेताना अनुपान म्हणूनही तुळशीचा रस वापरला जातो. तुळसीची पाने, बी आणि मूळ औषधात वापरले जातात.

वनस्पतिशास्त्रानुसार तुळशीला ऑसिमम सॅन्क्‍टम (Ocimum scantum) म्हटले जाते. यातील ऑसिमम शब्दाचा अर्थ गंध असा आहे, तर सॅन्क्‍टम शब्द पवित्र या अर्थाने आला आहे.

तुळशी संपूर्ण भारतात उगवते, तिचे कृष्ण तुळस आणि पांढरी, हिरवी किंवा रामतुळस असे दोन मुख्य प्रकार असतात. कृष्ण तुळस पांढऱ्या तुळशीपेक्षा अधिक गुणकारी असते. तुळशीला मंजिऱ्या येतात. मंजिऱ्यांमध्ये बारीक बी धरते. मंजिऱ्या आल्या की तुळशीच्या पानातील गुण कमी होतो, असे सांगितले जाते.

त्यामुळे औषधासाठी तुळशीची पाने हवी असतील तेव्हा ती मंजिऱ्या न आलेल्या तुळशीची घ्यायची पद्धत आहे.

तुळस औषधी गुणांची
आयुर्वेदिक ग्रंथात तुळशीचे गुणधर्म पुढीलप्रमाणे दिलेले आहेत-
कटु तिक्‍ता हृद्योष्णा दाहपित्तकारिणी दीपनी कुष्ठकृच्छ्ररक्‍तपित्त पार्श्‍वशूलहिक्काश्‍वासकासविषपूतिगन्धकफनाशिनी।
...रसरत्नसमुच्चय


रस - तिखट, कडू व तुरट
वीर्य - उष्ण
विपाक - तिखट
गुण - लघू, रूक्ष, तीक्ष्ण व सुगंधी
या प्रकारे आपल्या रस, वीर्य, विपाक व गुणांच्या योगे तुळशी पुढील शरीरभावांवर काम करते-

हृद्य - हृदयासाठी हितकर असते.
दीपनी - जाठराग्नीला उत्तेजित करते.
रक्‍तवहस्रोतस - त्वचाविकारांवर उपयुक्‍त असते.
प्राणवहस्रोतस - खोकला, दमा, उचकी वगैरेंत उपयुक्‍त असते.

याखेरीज तुळशी शरीरातील विषद्रव्यांचा नाश करते, दुर्गंधाचा नाश करते. वात-पित्तशामक असल्याने तुळशी श्‍वसनसंस्थेवर उपयोगी पडते, तसेच ती इतरही अनेक अवयवांसाठी, संस्थांसाठी गुणकारी असते.

श्‍वसनसंस्था -
- कफयुक्‍त सर्दी, खोकला असल्यास, अंग जड होऊन ताप आला असल्यास अर्धा चमचा तुळशीचा रस व अर्धा चमचा शुद्ध मध एकत्र करून घेण्याचा उपयोग होतो.
- छातीत कफ आहे पण सुटत नाही, अशा अवस्थेमध्ये अर्धा चमचा तुळशीचा रस खडीसाखरेसह दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास लगेच बरे वाटते.
- अगदी लहान, तान्ह्या बाळाला खोकला झाल्यास, विशेषतः कफ होऊन खोकला झाल्यास थेंबभर तुळशीचा रस मधासह चाटविण्याचा फायदा होतो.
- पडसे झाल्यास, विशेषतः डोके जड होऊन सर्दी झाली असल्यास, तुळशीच्या पानांचे चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाद्वारा ओढल्यास लगेच बरे वाटते. डोक्‍यातील जडपणा, वेदना लगेच कमी होतात.
- दम्याचा त्रास असणाऱ्यांनीही अधूनमधून तुळशीचा रस मधासह किंवा खडीसाखरेसह घेण्याची सवय ठेवावी. दमट हवामानात किंवा दम्याचा त्रास सुरू होईल, अशी लक्षणे दिसायला लागली की त्रास वाढण्याआधीच सितोपलादी चूर्ण किंवा वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणसॅन योगसारखे चूर्ण मध व तुळशीच्या रसातून घेणे चांगले असते.
- पाणी पिऊनही जी उचकी थांबत नाही, त्यावर तुळशीचा रस व मधाचे मिश्रण थोडे थोडे चाटण्याचा उपयोग होतो.
- कफाचा ताप असल्यास म्हणजे अजिबात भूक लागत नाही, जीभ पांढरी होते, तहान लागत नाही, अंग जड होते, अशी लक्षणे असणारा ताप असल्यास अर्धा चमचा तुळशीचा रस अर्धा-पाऊण चमचा मधाबरोबर घेतल्यास घाम येऊन ताप उतरण्यास मदत मिळते.

पचनसंस्थेसाठी तुळस
- भूक लागत नसली, जिभेवर पांढरा थर साठला असला तर तुळशीची पाने चावून खाण्याचा किंवा मधासह तुळशीचा रस घेण्याचा उपयोग होतो.
- तुळशीला शूलघ्नी असे पर्यायी नाव आहे. पोट दुखत असल्यास लिंबाचा रस, तुळशीचा रस व मध हे मिश्रण घेण्याचा उपयोग होतो.
- लहान मुलांना कफयुक्‍त उलटी होत असल्यास सकाळी तुळशीच्या पानांचा पाव चमचा रस मधासह देण्याचा उपयोग होतो.
- आव झाली असता, कुंथून कुंथून शौचाला होत असता तुळशीचे बी पाण्यात भिजवून ते उमलले की त्याची खीर घेण्याचा उपयोग होतो.
- उलट्या व जुलाब असे दोन्ही त्रास एकदम होत असतील तर तुळशीचे बी पाण्यात भिजवून कोळून ते पाणी पिण्याने बरे वाटते.

मूत्रवहसंस्थेसाठी तुळस बी
- तुळशीचे बी मूत्रल म्हणजे लघवी साफ होण्यास मदत करणारे असते. लघवी अडखळत होणे, जळजळणे वगैरे त्रास होत असल्यास तुळशीचे बी रात्रभर पाण्यात भिजवावे, उललेले बी सकाळी हाताने कुस्करून घ्यावे व गाळून घेतलेले पाणी प्यावे. याने मूत्रमार्गाचा क्षोभ लगेच कमी होतो.
- वारंवार मुतखडा होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी तुळशीच्या बियांचे पाणी किंवा पाण्यात भिजवलेल्या तुळशीच्या बियांची खीर खाणे चांगले असते.

रक्‍तवहस्रोतसाठी तुळशीरस
- तुळशी जंतुनाशक असते. रक्‍तशुद्धीसाठीही उत्तम असते. विशेषतः ज्या त्वचारोगांमध्ये खाजेचे प्रमाण अधिक असते, त्यावर तुळशी उत्तम असते. खाज कमी होण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस चोळण्याचा उपयोग होतो.
- नायट्याच्या डागांवर बाहेरून तुळशीच्या पानांचा रस चोळण्याने डाग कमी होण्यास मदत मिळते.
- गांधिलमाशी किंवा इतर कोणताही किडा चावला तर त्यावर लगेच तुळशीचा रस चोळण्याने बरे वाटते.

अजून काही
तुळशीच्या झाडाजवळ मलेरियाचे डास सापडत नाहीत, त्यामुळे घराजवळ तुळशी अवश्‍य असावी. विशेषतः दमट हवामान असणाऱ्या प्रदेशात प्रत्येक घरात तुळशी असायलाच हवी.

तुळशीचा चहा - तुळशी, आले, गवती चहा, पुदिन्याची पाने यांचा साखरेसह बनवलेला चहा (चहापत्तीशिवाय बनविलेला चहा) अतिशय रुचकर असतो, पचनास मदत करतो, सर्दी-ताप-खोकला वगैरे त्रासांना प्रतिबंध करतो. विशेषतः पावसाळ्यात व थंडीच्या दिवसांत असा चहा पिणे फायद्याचे असते. चार कप चहा बनविण्यासाठी सात-आठ तुळशीची पाने, दोन गवती चहाच्या पाती, थोडेसे आले, चार-पाच पुदिन्याची पाने, चवीनुसार तीन-चार चमचे साखर घ्यावी. पाण्याला उकळी फुटली की त्यात या सर्व गोष्टी टाकाव्यात. एक-दोन मिनिटे मंद आचेवर उकळले की वर झाकण ठेवून गॅस बंद करावा. पाच मिनिटांनी तुळशीचा चहा गाळून घ्यावा व गरम असताना प्यावा.

या प्रकारे तुळशी घराघरात असायलाच हवी, अशी बहुगुणी वनस्पती आहे. पूजेअर्चेच्या निमित्ताने तिला आपलेसे केले आणि गरजेनुसार वापरले तर आरोग्याचा लाभ होण्यासाठी निश्‍चितच हातभार लागेल.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

वृंदावनातील क्रीडा

डॉ. श्री बालाजी तांबे
भारतीय संस्कृतीचे जणू प्रतीक असणारी "तुळस' ही घराघरात आपले हक्काचे स्थान टिकवून आहे. भारतात सर्वत्र तुळस उगवतेच; फक्‍त हवामान व जमिनीनुसार तिचे स्वरूप थोडेफार बदलते. उष्ण हवामान असणाऱ्या ठिकाणची तुळस गडद रंगाची, काळसर असते, तर थंड प्रदेशातील तुळस हिरवी असते. गडद रंगाची पाने व जांभळी फुले येणाऱ्या तुळशीला कृष्णतुळशी म्हणतात, तर हिरव्या रंगाची पाने व पांढरी फुले येणाऱ्या तुळशीला श्‍वेततुळस वा रामतुळस म्हणतात. तुळशीच्या या प्रकारांशिवाय "वनतुळस' हाही एक प्रकार असतो, जिची पाने व मंजिऱ्या घरात लावल्या जाणाऱ्या तुळशीपेक्षा मोठी व थोडी राठ असतात.

तुळशीचे संपूर्ण झाडच औषधी गुणधर्मांनी युक्‍त असते, विशेषतः तुळशीची पाने, देठ, बी व मूळ औषध म्हणून वापरले जाते.

प्राचीन ग्रंथात तुळस कधी तोडावी यासंबंधी काही गोष्टी दिलेल्या आहेत. पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती, द्वादशी या तिथींना; मंगळवार, शुक्रवार व रविवार या वारी, ग्रहणकाळात, जननशौच, मृताशौच काळात तुळस तोडू नये. रात्रीच्या वेळी, तसेच दोन्ही संधिकाळात तुळस तोडू नये.

घरात कोणत्याही प्रकारची दुर्गंधी, दुष्टी येऊ नये म्हणून दारात तुळस ठेवण्याची प्रथा आहे. वाळलेली रानतुळस घरात टांगली असता त्याच्यावर मच्छर बसतात असा अनुभव येतो. तसेच पाणी साठलेल्या ठिकाणी तुळस लावली असता मच्छरांचा उपद्रव कमी होतो. तुळस उत्तम जंतुघ्न व कृमिघ्न असते. साथीचे रोग पसरू नयेत यासाठी तुळस उपयुक्‍त असते. मध्ये बसण्यासाठी चौथरा तयार करून त्याच्या भोवती चारी बाजूने तुळशीची झाडे लावावीत किंवा तुळशीच्या कुंड्या ठेवाव्यात. या चौथऱ्यावर रोज काही वेळ बसण्याने अस्थमा, छातीचे विकार, हृदयविकार, फीट वगैरे विकारांवर उत्तम गुण येतो, असा अनुभव आहे.

तुळशीला संगीत कळते. किर्लियन कॅमेऱ्याने ऑराचा फोटो काढला असता त्यातून तुळशीतून उत्सर्जित होणारी प्राणशक्‍ती लक्षात येऊ शकते.

भारतीय परंपरेपुढे व आपल्या ऋषिमुनींपुढे नतमस्तक व्हावे असे वाटते. त्यांनी काय कल्पना केल्या असतील व या सामाजिक रीतीरूढी कशा बसविल्या असतील, याचे आश्‍चर्य वाटते. तुळशीविवाहाची पद्धत समाजाला अनेक चांगल्या गोष्टी देते. हा एक धार्मिक विधी आहे, असे वाटण्याची शक्‍यता आहे; पण यात धार्मिक असे काहीही नाही. आपल्या रोजच्या जीवनात सुखसमृद्धी नांदावी व आपल्या जीवनाचे नाना तऱ्हेचे अर्थ समजावेत या दृष्टीने हा सर्व विधी केलेला आहे. आपण असे पाहतो, की तुळशीची माळ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मोलाची आहे. गळ्यात असलेली सोन्याची साखळी व तुळशीची माळ या दोन्हीपैकी सोन्याची साखळी कोणीतरी ओढून नेली व तुळशीची माळ राहिली तर तो देवाचे आभार मानतो की "बरे झाले; माझी तुळशीची माळ राहिली आहे, सोन्याची साखळी तर मी पुन्हा विकत घेईन,' अशी या तुळशीच्या माळेची महती आहे.

पांडुरंगाला प्रिय असलेल्या तुळशीचे महत्त्व काय असावे? लग्न ही आपल्या पृथ्वीवरच्या तमाम मनुष्यजातीला आवश्‍यक असणारी गोष्ट आहे. लग्न कुठल्या पद्धतीने केले जाते याला फारसे महत्त्व नाही. रजिस्टर लग्न करा, ऍग्रिमेंट लग्न करा किंवा तसेच एकत्र राहा; पण स्त्री-पुरुषांनी एकत्र राहणे अभिप्रेत असते.

दानातील अत्युच्च दान म्हणजे कन्यादान. अनेक जण आपल्याला मुलगा व्हावा म्हणून प्रयत्नशील असतात; परंतु कन्यादान दिले नाही तर आयुष्य विफल जाईल. कन्यादान देण्यासाठी मुलगी पाहिजे की नाही? मुलगी नसली तर कन्यादान कसे करणार? ज्यांना मुलगी नाही, म्हणजे ज्यांना कन्यादान करणे शक्‍य नाही, त्यांनी तर हे तुळशीचे लग्न अवश्‍य करायला पाहिजे. एखाद्या घरात एकच मुलगा किंवा एकच मुलगी असली तर त्याचे लग्न झाले की अनेक वर्षे घरात काही लग्नकार्यच होत नाही. त्या मुलाला मूल होऊन ते मोठे झाल्यावर जे मुंज, लग्न कार्य होणार तेच त्यांच्या घरातील कार्य. घरात मुंज, लग्न असे काही नसले की घरातील वातावरण बदलत नाही, वातावरण थंड पडत जाते. घरात कुठलेतरी मंगलकार्य झाले तर आपला उत्साह वाढतो. या दृष्टीने घरात एकदा तुळशीचे लग्न करायची पद्धत उत्तम आहे. साधे तुळशीचे लग्न असले तरी घरात चार दिवस उत्साह संचारतो.

आपण आज हाकाटी करतो आहे की स्त्रीला महत्त्व यायला पाहिजे, तिला हक्क असायला पाहिजे; पण पूर्वीच्या ऋषीमुनींनी याचा किती खोलवर विचार केला आहे हे आपल्याला कळते. अनेक गोष्टींचा विचार करून तुळशीच्या लग्नाची आखणी केलेली दिसते.

तुळशीचे दुसरे नाव वृंदा असे होते. जेथे तुळशी असते ते वृंदावन. या वृंदावनातील श्रीकृष्णांच्या सर्व लीला आपल्या सर्वांना माहिती असतात. वृंदा ही जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती. दुसऱ्याला पिडणे हे या दानवाचे काम होते. सुख देणारा तो देव व पिडणारा तो दानव, ही व्याख्या आहेच. मस्ती आली की दोन गोष्टी असतात. मस्ती आली की चैन वाढत जाते आणि प्रत्येक वस्तूवर आपलाच हक्क आहे असे वाटत राहते. जालंधराने एकदा स्वर्गावर स्वारी केली, स्वर्ग जिंकला, इंद्राला बंदिवान केले, इंद्राणीला उचलून स्वतःकडे आणले, बंदिवासात टाकले व तिला त्रास द्यायला सुरुवात केली. मुळात दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर ठेवणे किंवा दुसऱ्या स्त्रीला घरात आणणे हे घरातल्या स्त्रीला आवडत नाही. जालंधराने इंद्राणीला घरी आणल्याने अनेक शत्रू तयार झाले. तो इंद्राणीला त्रास देत असे, हे त्याच्या बायकोला म्हणजे वृंदेला मुळीच आवडले नाही. वृंदेने मागच्या दाराने इंद्राणीला मदत करायला सुरवात केली. इंद्राणीला उपाशी ठेवायचे जालंधराने ठरविले तर वृंदा तिला अन्न पोचवत असे. इंद्राला बंदिवासातून कसे सोडवायचे याबद्दलची निरोपानिरोपी करायला मदत करायला सुरवात केली. विष्णूशी संधान बांधून इंद्र-इंद्राणीला सोडवण्याची खटपट वृंदेने सुरू केली.

वृंदेचे हे कार्य अर्थातच जालंधराला आवडले नाही. तो खवळला. "जोपर्यंत तुझी बायको तुझ्या मताप्रमाणे चालेल, जोपर्यंत ती तुझी अनुगामिनी असेल तोपर्यंत तू मरणार नाहीस; पण ज्या दिवशी तुझी बायको तुझ्या विरोधात जाईल, त्या दिवशी तुझी सगळी शक्‍ती नष्ट होईल' असा वर पूर्वी जालंधराला मिळालेला होता. वृंदा आपल्या विरोधात काम करते आहे, विष्णूला निरोप पोचवते, त्याची प्रार्थना करते असे पाहून जालंधराने "तू मला समर्पित असलेच पाहिजे' असा हेका धरला. ती ऐकत नाही असे पाहून त्याने तिची जीभ कापून टाकली. तिला आता बोलता येणार नाही, त्यामुळे आता ती विष्णूची प्रार्थना करू शकणार नाही असे त्याला वाटले. श्रीविष्णूंना हे सर्व जेव्हा कळले तेव्हा त्यांनी उद्धार करण्याच्या दृष्टीने तिची सुटका केली. ती म्हणाली, ""तुम्ही मला या राक्षसाच्या जाचातून तर सोडवाल; पण मला तुमच्या चरणाशी राहता यावे अशी योजना करा.'' विष्णू म्हणाले, ""ठीक आहे, तुझे रूपांतर तुळशीत होईल आणि यापुढे लोक ती तुळस मला वाहतील. या दृष्टीने तुझे-माझे मिलन नेहमीच होत राहील.'' विष्णुरूपी शाळिग्रामावर तुळशी वाहण्याची पद्धत तेव्हापासून सुरू झाली. या कथाभागाचे मर्म लक्षात घेऊन आपल्या ऋषीमुनींनी तुळशीविवाहाची योजना केली.

आपल्या मानेच्या ठिकाणी असणाऱ्या जय, विजय या ग्रंथींचे नाव जालंधर आहे. योगामध्ये जालंधरबंध नावाची क्रिया असते. आपल्या मस्तकातून खाली पडणारा अमृतरस सरळ सूर्यचक्रात पडला तर सूर्य या अमृतरसाला जाळून टाकतो. असे झाल्यास आपल्या शरीराला ताकद मिळत नाही, ग्रंथी नीट काम करत नाही. तेव्हा हा अमृतरस घरंगळू द्यायला हवा. आपल्या मस्तकातील सर्व केंद्रे आपले जीवन चालवतात म्हणून ह्या केंद्रांना (देवतांना) तसेच हा अमृतरस मिळावा यासाठी जालंधरबंध असतो. जालंधरबंधाच्या वेळी श्‍वास थांबवला जातो व हनुवटी दाबून धरली जाते. मेंदूत असणारे केंद्र (देवता) जे शरीराच्या सर्व क्रिया व चेतासंस्था चालवते, त्या शक्तिकेंद्राला विष्णू हे नामकरण केले, तर विष्णुप्रिया तुळशीच्या औषधी गुणांचा आणि श्रीकृष्ण व श्रीविष्णूंचा संबंध समजून येईल.

तुळशीचा व थायरॉइड ग्रंथीचा, तसेच तुळशीचा व आपल्या प्राणशक्‍तीचा संबध आहे. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केलेली आहे. तुळशीच्या आजूबाजूला असलेल्या वायूत ओझोनचे प्रमाण अधिक असते व तेथे प्राणशक्‍तीचा संचार अधिक असतो. आपल्याला कुणी प्राणशक्‍ती दिली तर अजून काय हवे? आपण प्राणशक्‍तीवरच जिवंत असतो. प्राणशक्‍ती तुळशीतून उत्सर्जित होत असते म्हणून ज्या ठिकाणी तुळशी लावलेली आहे, त्या ठिकाणी दुष्टशक्‍ती सोडाच; पण तेथे कुठल्याही प्रकारची रोगराई, वाईट विचार वा वाईट शक्‍ती राहू शकत नाही, उलट प्राणशक्‍तीचा प्रभाव अनुभवता येतो.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad