Showing posts with label स्मरण. Show all posts
Showing posts with label स्मरण. Show all posts

Thursday, July 15, 2010

मरण नको, स्मरण पाहिजे

डॉ. श्री बालाजी तांबे

'तो' असला तरच स्मरण व तो नसला तर मरण. तेव्हा स्मृतीसाठी निसर्गाने मेंदूत केलेली व्यवस्था अशासाठी असते, की "तो' सतत बरोबर आहे याची जाणीव राहावी. आपण जिवंत आहोत म्हणूनच आपल्याला सर्व जगताची जाणीव होऊ शकते, हे लक्षात घेऊन जो परमेश्‍वराचे आभार मानतो त्याची स्मरणशक्‍ती वाढते.

स्मरण व मरण ह्यांच्यात फक्‍त फरक आहे "स' चा. इंग्रजीत परमेश्‍वराचा निर्देश "दॅट' म्हणजे "तो' अशा शब्दाने केला जातो. "तो' या संबोधनामुळे कुठे, काय, कसा, केवढा ह्याचा काही बोध होऊ शकत नाही. संस्कृतमध्ये ह्याचाच निर्देश "सः' शब्दाने केला जातो. "तो' असला तरच स्मरण व तो नसला तर मरण. तेव्हा स्मृतीसाठी निसर्गाने मेंदूत केलेली व्यवस्था अशासाठी असते, की "तो' सतत बरोबर आहे याची जाणीव राहावी. आपण आहोत, आपल्यात प्राणतत्त्व ओतप्रोत भरलेले आहे, आपण जिवंत आहोत म्हणूनच आपल्याला सर्व जगताची जाणीव होऊ शकते, आनंद मिळू शकतो, हे सर्व लक्षात घेऊन जो परमेश्‍वराचे आभार मानतो त्याची स्मरणशक्‍ती वाढते. स्मरण नसले तर मरण. स्मरणाच्या विरोधी शब्द विस्मरण आहे असे आपण म्हणतो, विशेषत्वाने "त्या"चा अभाव हे सुद्धा एक प्रकारचे मरणच. ज्या मेंदूत "त्या'चे स्मरण राहावे, "त्या'चे अस्तित्व राहावे अशी व्यवस्था केलेली असते तो मेंदू जर ब्रह्मस्थान ठरला नाही तरच नवल. म्हणूनच मेंदूचे स्थान सर्वात वर असते, त्याचे महत्त्व अतिशय मोठे आहे. खरे तर मेंदूच्या कर्तबगारीवर प्रत्येक प्राणिमात्राचे विशेषत्व व सामर्थ्य ठरते. क्षुद्र कीटकांना फारच थोड्या गोष्टींचे व तेही क्षणिक काळासाठी स्मरण राहू शकते. उंदराची स्मरणशक्‍ती फक्‍त चार मिनिटे की चार तास असते असते असे म्हणतात. उंदरापुढे एखादा खायचा पदार्थ ठेवला, उंदराने त्या पदार्थाला तोंड लावल्याबरोबर उंदराला एक लहानसा विजेचा धक्का देण्याची व्यवस्था केली तर उंदराला एकदम धक्का बसल्यामुळे तो पळून जातो. पण या अनुभवानंतर लगेच काही वेळातच तो पुन्हा पदार्थ खाण्यासाठी जातो. कारण आपल्याला येथे धक्का बसतो आहे हे त्याच्या लक्षात राहात नाही.

स्मरणशक्‍तीची कल्पना आपल्याला करून घ्यायची असेल तर संगणकातील हार्ड डिस्कची तुलना करून ती कल्पना आपल्याला समजून घ्यावी लागेल. म्हणजे संगणकातील मेमरी (स्मृती)साठी करावी लागणारी सर्व व्यवस्था मेंदूत असावी लागते. रेकॉर्डिंगसाठी जेव्हा टेप वापरत असत तेव्हा हा स्मृतीपट्टा लांबीच्या दिशेत फिरत असे. किंवा रेकॉर्डवर असलेले चरे (चॅनेल्स) वर्तुळाकार फिरत असत. गती असेल तेथे काही गोष्टींची मर्यादा आपोआप तयार होते व त्याचे दोषच अधिक प्रमाणात तयार होतात. पण सध्या तंत्र खूपच प्रगत झालेले असून छोटी मेमरी कार्डस्‌ वापरली जातात. या कार्डांमध्ये लांबीच्या दिशेत वा चक्राकार फिरण्याची गरज नसते.

ज्या ठिकाणी स्मृती साठवायची त्या डिस्कची क्षमता काय आहे यावरही लक्ष ठेवावे लागते व त्यावरच डिस्कची गुणवत्ता ठरते. सध्या उपलब्ध असलेल्या मेमरी कार्डवर चुंबकाचा परिणाम होत नाही किंवा ते कार्ड पाण्यात पडले तरी काही हानी होत नाही. या कार्डमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष उत्पन्न होणार नाही किंवा साठवलेली स्मृती नष्ट होणार नाही, साठवलेल्या स्मृतीत "ध' चा "मा' होणार नाही, विशिष्ट कप्प्यात साठवलेली स्मृती विशिष्ट प्रकारेच राहील व विशिष्ट प्रकारे उपलब्ध होईल या गुणालाही विशेष महत्त्व द्यावे लागते. सरतेशेवटी जेव्हा एखादी गोष्ट आठवावी किंवा उपलब्ध व्हावी असे वाटत असेल तेव्हा ती कमीत कमी वेळेत म्हणजे तत्क्षणी उपलब्ध व्हावी लागते. मेंदूत स्मृती साठवलेली असते व त्याचा वापर करून जीवनातील सगळे व्यवहार चालविले जातात. अशा मेंदूची रचना पाहिली तर आपण आश्‍चर्यचकित होतो. मेंदूला मेंदूने जाणण्याचे काम स्वतःने स्वतःला ओळखण्याएवढेच अवघड असते. इंद्रियांमार्फत आलेल्या सर्व संवेदना मुळात व्यवस्थित मिळवाव्या लागतात. दृश्‍य, ध्वनी, स्पर्श किंवा चव काहीही समजून घ्यायचे असेल तर त्यात विकृती न येऊ देता सर्व माहिती जशीच्या तशी मेंदूपर्यंत पोचवावी लागते. एखादी वस्तू पाहात असताना डोळ्यांनी तेथे लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक असते, मन इकडे तिकडे जाऊ न देता समोरच्या दृश्‍याचे ग्रहण करून मेंदूकडे पाठवणे अपेक्षित असते.

मेधा ही प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही तर मेंदूत चुकीची माहिती जमा होते. संगणकाच्या हार्ड डिस्कचे मटेरियल जेवढे शुद्ध असेल तेवढी हार्ड डिस्कची गुणवत्ता अधिक असते त्याचप्रमाणे मेंदू शुद्ध राहण्यासाठी मुळात मेंदूकडे कुठलाही दोष जाता कामा नये.

तसेच मेंदू तयार होण्यासाठी जे रक्‍त, पेशी वगैरे गोष्टी वापरल्या जातात त्या शुद्ध व सात्त्विक असणे आवश्‍यक असते. असे असल्यास पुढे आयुष्यभर मेंदूचे कार्य व्यवस्थित चालू राहू शकते. कुठल्या स्त्री-पुरुषाच्या जोडीतून मनुष्याचा जन्म झालेला आहे हेही महत्त्वाचे असते. स्त्री-पुरुषाचे शरीर, स्वभाव व प्रकृती जेवढी शुद्ध व सात्त्विक असेल तेवढा अपत्याचा मेंदू शुद्ध असू शकतो. म्हणून रक्‍तसंबंधांना खूप महत्त्व दिलेले दिसते. गर्भधारणा झाल्यावर मेंदू तयार होत असताना त्याच्यावर वात-पित्त-कफादिक दोषांचा परिणाम न होता सर्व विकास समत्वात व्हावा यासाठी आयुर्वेदाने बरेच नियम तयार केले. गर्भसंस्कार करून गर्भाचा मेंदू विशेष पद्धतीने तयार करण्याकडे लक्ष दिले गेले. अशा प्रकारे मेंदू जितका शुद्ध असेल तितकी स्मृती साठवणे, तिचा वेळेवर उपयोग करणे हे काम सोपे होऊ शकते. जसे आजूबाजूच्या चुंबकीय तत्त्वांचा, शक्‍तीचा, हवेचा, पाण्याचा, उष्णतेचा परिणाम मेमरी कार्डावर होऊ शकतो, तसाच परिणाम मेंदूवरही होऊ शकतो. म्हणून मेंदूला अशा संरक्षक कवचाची गरज असते की तो कुठल्याही वातावरणात गेला तरी भ्रष्ट न होता व्यवस्थित कार्यरत राहावा.

खरे पाहता शरीराला कुठेच अपाय होऊ नये, वाहनावरून जाताना आपण डोक्‍यावर हेल्मेट घालतो तसे हातावर, छातीवर, पायावर चिलखत का घालत नाही? मेंदूचे महत्त्व अधिक आहे ही गोष्टच खरी. मेंदूचा मूळ गाभा (न्यूक्‍लिअस) धरून ठेवणे खूप आवश्‍यक असते. त्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितल्यानुसार "मुखी अखंड नाम' म्हणजे सतत "त्या'चे स्मरण ठेवण्याचा उपयोग होतो, सतत "त्या'चे स्मरण करण्याने जीवन नीतीमूल्यावर आधारित राहते, चुकीचे निर्णय घेण्याची प्रवृत्ती कमी होते, "कामवासनां'कडे प्रवृत्ती कमी होतो, मेंदूने योग्य निर्णय घेतल्यामुळे व प्रखर बुद्धीमुळे जीवन आनंदाने जगता येते. मेंदूच्या स्मरणशक्‍तीचा विचार करताना स्मरणशक्‍ती किंवा एकूणच त्यातून पुढे निर्माण केलेल्या सृजनात्मक कल्पनांचा विचार गृहीत धरलेला असतोच. मेंदूच्या पेशींमध्ये पूर्वजन्माच्या (म्हणजे माता-पिता, त्यांचे माता-पिता वगैरे) आणि जन्मलेल्या जिवाने बरोबर आणलेल्या संकल्पना दडवलेल्या असतात. तसे पाहता "पिंड ब्रह्मांड' न्यायाने सर्व विश्‍वाची माहिती मेंदूत स्मृतींमध्ये साठवलेली असते. ह्या स्मृती जागृत करून त्यांचा उपयोग व्यवहारात करता येण्याची सिद्धी मिळवावी लागते.

स्मरणशक्‍ती वाढविण्याचा सोपा उपाय म्हणजे "त्या'चे अखंड स्मरण, अखंड ॐकार गूंजन !!

- डॉ. श्री बालाजी तांबे ---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Saturday, March 6, 2010

विसरणे


डॉ. ह. वि. सरदेसाई

साचविलेल्या अनुभवाची पुनःपुन्हा पुनरावृत्ती करण्याने साठवणे टिकते व पुनरावृत्ती सहज होते. असे केले गेले नाही, तर पुनरावृत्ती कठीण होते. जी गोष्ट आपल्याला आठवणे आवश्‍यक आहे तिचे स्मरण रोज करणेच इष्ट.


आलेला अनुभव साचविणे आणि त्याची पुन्हा जाणीव करता येणे असे स्मृतीचे स्वरूप असते. अनुभवाची आठवण न होणे म्हणजे विस्मृती, विसरणे. अनुभव आपल्या ज्ञानेंद्रियांतून मेंदूकडे जातात. स्पर्श, चव, दृष्टी, ऐकणे आणि वास या संवेदना आपल्या अनुभवाला पायाभूत असतात. दोन किंवा अधिक संवेदना मिळून ओळख पटते. विशिष्ट रंग, रूप, वास, चव इत्यादींमुळे आपण हे फळ "आंबा' आहे असे ओळखू शकतो. ओळखलेल्या अनुभवाकडे आपले लक्ष गेले, तरच हा अनुभव आपल्या मेंदूत रेखाटला जातो. दररोज हजारो अनुभव विविध संवेदनांमार्फत मेंदूत जातात; पण ज्यांच्याकडे लक्ष गेले असेल तेवढेच अनुभव मेंदूत रेखाटले जातात (रजिस्ट्रेशन registration) रेखाटलेले अनुभव मेंदूच्या काही भागांत साचवून ठेवले जातात. एनकोडिंग (encoding) ऍण्ड रिटेंशन (retantion) ही साचविण्याची पद्धत विद्युत रासायनिक असते. अशा तऱ्हेच्या साठविलेल्या अनुभवाला पुनरावृत्त करणे (recal ) म्हणजे आठवणे, तो अनुभव जाणिवेच्या क्षेत्रात आणणे. रेखाटन, संचय आणि पुनरावृत्ती यांपैकी कशातही दोष झाला, तर विस्मृती होते.

संवेदनाच झाली नाही, तर रेखाटन होण्याचा प्रश्‍नच येणार नाही. संवेदना एकत्र येऊन ओळख पटली; परंतु तेथे लक्ष गेलेले नसले, तरी देखील रेखाटन होणार नाही. आपल्याला कोणीतरी एक काम सांगते; पण ऐकताना आपले तिकडे लक्ष नसेल, तर या संदेशाचे रेखाटन होणार नाही, झालेच तर फारच पुसट होईल. अभ्यास करताना आपण काय वाचतो आहोत इकडे ध्यान नसेल, तर विषय लक्षात राहणार नाही. आपले लक्ष जाणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. हेतुपुरस्सर लक्ष देणे म्हणजे मन एकाग्र करणे, याला प्रयत्न लागतात. या एकाग्र मनाला (consentration) मनाच्या चंचलतेला आवर घालण्याची सवय लावावी लागते (stop distraction) व (every thing eles)अशा मनाच्या एकाग्र स्थितीत रेखाटन योग्य होते. मनाची एकाग्रता कधी कधी सहजही होऊ शकते. एखाद्या विषयात रस असेल, तर मन एकाग्र होणे सोपे जाते. हा रस निर्माण करणे हे चांगल्या शिक्षकाचे प्रथम कर्तव्य आहे. रसाची निर्मिती विषयाचे मृदृत्व पटण्यावर असते. हा विषय समजून मला काय फायदा होणार आहे, हे समजण्याखेरीज विषयात मन रस घेऊ शकणार नाही. कुतूहल देखील रस निर्माण करू शकते. विषयाची आवड ही अनेक विषय शिकविणाऱ्या शिक्षक - शिक्षिकेबद्दलच्या भावनाचे रूपांतर असते. शिकविणारी व्यक्ती आवडली, तर विषयही आवडू लागतो. आपले ज्ञान, शिकविण्याचे कौशल्य आणि विद्यार्थ्यांबद्दल असणारी आत्मीयता या गुणांची विद्यार्थ्यांना आलेली प्रचिती, यावर आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात कसे राहतो हे ठरते, हे प्रत्येक शिक्षकाला समजले पाहिजे. शिक्षकाचे दर्शन देखील काही वयात महत्त्वाचे ठरते. कोणत्याही कारणाने अनुभव घेताना तिकडे लक्ष दिले गेले नाही, तर तो अनुभव आठवणीत साठला जाणार नाही. विस्मृती अटळ आहे.

मेंदूच्या अनेक भागांचा स्मरणशक्तीशी निकटचा संबंध असतो. या सर्व भागांचे कार्य चांगले चालले, तरच अनुभवाचे विद्युत रासायनिक स्वरूपात रूपांतर (एनकोडिंग) व साठवण (retantion) शक्‍य आहे. मेंदू हा विलक्षण अवयव आहे. त्यात १२०००००००००००० (बारा हजार कोटी) इतक्‍या पेशी असतात. प्रत्येक पेशीला योग्य प्राणवायू, ग्लुकोज, शर्करा, ओमेगा, ३ मेदाम्ले, सर्व जीवनसत्त्वे, विविध सार आणि अत्यावश्‍यक अमायनी आम्ले मिळावी लागतात. मेंदूला इजा होणे (हेड इन्जुरी head enjury), विविध रासायनिक द्रव्यांशी संपर्क येणे (उदाहरणार्थ- मद्यपान, कोकेन, गांजा, भांग, झोपेची औषधे इत्यादी), मेंदूला रक्तपुरवठा कमी पडणे (रोहिणी काठीण्य, आजार, धूम्रपान) मेंदूचे आजार (ब्रेन ट्युमर्स लीरळपर् brain tumor दाह इत्यादी) विषाणू व जिवाणूंमुळे होणारे आजार, अशी मेंदूला इजा होणाऱ्यांची यादी मोठी आहे. आपली प्रकृती उत्तम ठेवणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. कोणत्याही कारणाने मेंदूचे काम नीट न झाल्यास स्मरणशक्तीवर मोठाच आघात होणे संभवते.

साचविलेल्या अनुभवाची पुनःपुन्हा पुनरावृत्ती करण्याने हे साठवणे टिकते व पुनरावृत्ती सहज होते. असे केले गेले नाही, तर पुनरावृत्ती कठीण होते. जी गोष्ट आपल्याला आठवणे आवश्‍यक आहे तिचे स्मरण रोज करणेच इष्ट. उदा.- रोज पाढे म्हटले तरच सतरा साते किती हे आठवेल! अभ्यास याचा अर्थच तीच तीच गोष्ट पुनःपुन्हा वाचणे, पुनःपुन्हा आठवणे. समजलेली गोष्ट दीर्घकाळ साचते, न समजता केवळ ऐकलेली गोष्ट लक्षात दीर्घकाळ राहणार नाही, विसरून जाईल. विसरणे हे जरी मेंदूच्या आजाराचे महत्त्वाचे लक्षण असले, तरी दैनंदिन व्यवहारात लक्ष नसणे हेच महत्त्वाचे कारण असते. आपण जे पाहतो आहोत, जे ऐकतो आहोत तेथे लक्ष देणे ही चांगल्या स्मरणशक्तीची गुरुकिल्ली आहे. सकस आहार, नियमाने केलेला व्यायाम, आंतर्बाह्य स्वच्छता, कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाणे, वेळोवेळी अभ्यास आणि पाठांतराची नियमित उजळणी यामुळे स्मरणशक्ती तीव्र राहील

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad