Showing posts with label मधुमेह. Show all posts
Showing posts with label मधुमेह. Show all posts

Sunday, July 22, 2018

आरोग्यसंपदा : औषधी औदुंबर


औदुंबर वृक्ष दत्तगुरूला भारी प्रिय… पण त्याबरोबरच उंबराच्या झाडाचे इतरही अनेक उपयोग आहेत.
दत्तगुरू ज्या वृक्षाखाली असतात अशी भावना असलेला वृक्ष म्हणजे औदुंबर… उंबर… उंबराची फळं उपयुक्त असतातच, पण उंबराच्या वृक्षाची लाकडे यज्ञासाठी वापरली जातात. त्याव्यतिरिक्त हा वृक्ष कुणी तोडत नाही. कच्ची उंबरे हिरव्या रंगाची तर पिकल्यावर लाल, गुलाबी रंगाची बनतात. मार्च ते जूनदरम्यान फळं येतात. उंबराच्या जवळ जर विहीर खोदली तर भरपूर पाणी लागते. त्याची फळे भरपूर मिळतात, परंतु उंबराला फुले मात्र दिसत नाहीत.
उपचारासाठी उंबराची साल, पाने, मुळं तसेच त्यातून निघणारा दुधासारखा पांढरा द्रव या सगळ्याचा उपयोग केला जातो. उंबराचे फळ चवीला तुरट असते, पण शरीरातील कफ व पित्तदोषांचे हे संतुलन ठेवते. सूज कमी करणारा, वेदनाशामक, पचायला जरा जड. तात्पर्य पोटातील अग्नी विझविणारा तसेच असह्य वेदना कमी करणारा म्हणून हा प्रसिद्ध आहे. आगीत होरपळल्यावर जळलेल्या त्कचेकर याच्या सालीचा लेप लावल्यास वेदना हमखास कमी होतात.
अनेक विकारांवर गुणकारी
उंबराचा पांढरा द्रवही शरीरातून बाहेर पडणाऱया अनेक स्रावांना रोखतो. जसे रक्त, मल-मूत्र आदी. याच्या फळांचे सेवन केल्याने पुरुषाचे वीर्य व शक्ती वाढते. तसेच मन सदैव प्रसन्न राहते. फोडं-मुरुमावर याचा रस लावल्यास ते लवकर पिकतात. याच्या मुळांचा रस शरीराची आग शांत करतो. रक्तस्राव रोखणारा तसेच नियमित सेवन केल्यास क्षयरोग व मधुमेह सामान्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.
उंबराचे असेही उपयोग
> नाकातून रक्त येत असेल तर उंबराच्या पिकलेल्या फळाचा रस त्यात गूळ वा मध घालून प्यावा. हाच उपाय मासिक पाळीत अधिक रक्तस्राव असल्यासही हेच प्रमाण घ्याके.
> ग्रीष्म ऋतूतील गरमी किंवा आग उत्पन्न करणारे विकार तसेच देवीच्या आजारासारख्या विकारात फोड आल्यावर पिकलेल्या फळाचा रस त्यात साखर टाकून तयार केलेलं सरबत प्यावे.
> मधुमेह झाल्यास उंबराच्या कोवळ्या पानांचा रस त्यात २० मिली. मध घालून प्रत्येक दिवशी २-३ वेळा प्यायल्याने वारंवार लघवीला जावे लागत नाही. तसेच लघवीतील साखरेचे प्रमाण सामान्य होण्यास मदत होते.
> जिभेला फोडं येणे, चट्टे पडणे, हिरडय़ांतून रक्त वाहणे, दातदुखी, दात हलणे या विकारांवर याची साल किंवा पानांचा काढा तयार करून तो तोंडात ठेवावा.
डोळ्यांची होणारी जळजळ थांबवतो
> उंबराचा आणखी एक चांगला उपयोग म्हणजे हातापायांची त्वचा फाटल्यास किंवा पायांच्या तळव्यांना कात्रे पडल्यास होणाऱया वेदना कमी करण्यासाठी उंबराच्या पांढऱया द्रव्याचा लेप लावल्याने जखम भरून सामान्य होण्यास मदत होते. डोळे लाल होणे, पाणी येणे, डोळ्यांची जळजळ आदी लक्षणं उत्पन्न झाल्यास उंबराच्या पानांचा काढा करून स्वच्छ कपडय़ाने गाळून घ्यावा व थंड झाल्यावर डोळ्यांत त्याचे२-२ थेंब दिवसातून ४ वेळा टाकावे. नेत्रज्योती तेज होते.
> त्वचाविकारात त्वचेचा रंग बिघडला तर उंबराच्या फांदीला येणारे कोंब वाटून तो लेप त्वचेला लावावा. उंबराची पिकलेली फळं खाल्ली तर गर्भाशयाच्या मांसपेशींना बळ मिळते आणि गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.
> लहान मुलांना पातळ शौचास होत असेल तर उंबराच्या रसात साखर घालून ते सेवन करावे. शरीरातील रक्त व पित्त दूषित होऊन अंगाची जळजळ झाल्यास उंबराच्या सालीचा काढा पोटात घ्यावा. सतत तहान लागत असल्यासही हाच काढा घेतल्यास फायदा होतो. तसेच नाक, तोंड व गुदद्वारातून रक्त पडले तर हाच काढा फायद्याचा आहे.


#Ayurveda, #Vastu shastra, #healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Thursday, March 3, 2016

तरुणांमधील उच्च रक्तदाब

- डॉ. श्रीपाद खेडेकर
आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात तरुणांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यातूनच मग आरोग्याचे प्रश्न सुरू होतात. उच्च रक्तदाब हा त्यातूनच उद्‌भवतो. नंतर हा आजार धोकादायक बनतो. अकाली वृद्धत्वाकडे झुकणे, तसेच हृदयविकाराच्या समस्या निर्माण होणे, हे प्रकार सुरू होतात. वयस्कर व्यक्तींना हृदयविकाराच्या समस्या जाणवतात, हे आपण जाणतोच. पण आता तरुणांमध्येही या समस्या सर्रासपणे दिसून येऊ लागल्या आहेत. 
त  रुणांमधील उच्च रक्तदाबाची काही प्रकरणं अभ्यासल्यानंतर असे लक्षात आले आहे की, हा आजार त्यांना नंतर हृदयविकाराकडे नेतो. प्रसंगी हृदयविकाराचा तीव्र झटकादेखील येतो. उच्च रक्तदाब ही समस्या अगदी १८ वर्षांच्या मुलांमध्येदेखील दिसून आली आहे. २० वर्षांच्या मुलांमध्ये असे आजार आढळल्यानंतर त्याचे परावर्तन हे नंतर हृदयविकाराच्या गंभीर समस्येमध्ये झाल्याचेही दिसून आले आहे. ही मुलं जेव्हा ३५ ते ५० वयोगटात जातात, तेव्हा हृदयविकाराची समस्या त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. रक्तदाब सामान्य असला तरी त्यांना ही समस्या भेडसावते.
तरुणांमध्ये उच्च रक्तदाब आढळण्याची काही ठराविक कारणे आहेत. ती अशी -  

-  वेगाने बदलणारी जीवनशैली, गतिमान व तणावग्रस्त आयुष्य.
-  व्यायामाचा अभाव, अतिव्यग्र जीवनशैलीमुळे व्यायाम करण्यासाठी वेळ नसल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते.
-  आनुवंशिकता हेही एक महत्त्वाचे कारण आहे. कुटुंबातील कुणा व्यक्तीला अशी समस्या असल्यास ती पुढच्या पिढीत दिसून येते.
-  चुकीचा आणि अपायकारक आहार. मेदयुक्त व अतिक्षार असलेल्या पदार्थांचे सेवन करणे हे वाढत आहे.
-  पुरेशी झोप नसणे, हा या तरुण पिढीला शाप म्हणता येईल. प्रत्येक रात्री किमान सहा तास झोप आवश्‍यक असून, ती नसेल तर ही समस्या अधिकांश प्रमाणात जाणवते.
-  मद्यपान हे उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरणारे महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे.
  धूम्रपान.
-  लठ्ठपणा व वजनवाढीवर नियंत्रण नसणे. हा लठ्ठपणा हा पुन्हा अयोग्य जीवनशैलीशी निगडित आहे.  
उच्च रक्तदाबांची लक्षणे उच्च रक्तदाबाची जाणीव होताच स्वतःच्या पद्धतीने त्याच्यावर उपचार करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने हा आजार अधिकच बळावू शकतो. ताबडतोब तज्ज्ञ डॉक्‍टरांना भेटून त्यांच्याशी सल्लामसलत करून उपचाराला सुरवात करावी. उच्च रक्तदाबाची अनेक लक्षणे आहेत, ती ध्यानात घेऊन त्यानुसार आपण आपली काळजी घ्यावी.

-  डोळ्यात रक्तासारखे ठिपके दिसू लागतात. डोळ्यात रक्तासारखे ठिपके दिसणे हे या आजारात आढळणारे सर्वसामान्य लक्षण आहे.
-  मधुमेह असलेल्या किंवा रक्तदाब असलेल्यांमध्ये रक्ताचे स्पॉट्‌स ही सामान्य बाब आहे.
-  चेहऱ्याचा उजळपणा काहीवेळा चिंताजनक असू शकतो. कारण रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन चेहरा लालसर दिसू लागतो. त्याचबरोबर चेहऱ्याला जळजळ जाणवते. सूर्यप्रकाश, थंड हवामान, मसालेदार पदार्थ, गार वारा, गरम पेय, मद्यपान, व्यायामाचा अभाव अशा बाबीदेखील हा परिणाम घडवून आणतात. त्यामुळे त्वचेची काळजीदेखील घ्यावी लागते. चेहऱ्यातील हा फरक भावनिक बदलदेखील घडवतो. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा रक्तदाबदेखील वाढतो. वाढता रक्तदाब हा चेहऱ्याच्या उजळपणाशी संबंधित असतो. जर आपला रक्तदाब सामान्य असेल तर चेहऱ्यावर फरक जाणवणार नाही.
-  उच्च रक्तदाबामुळे चक्कर येत नाही, तर त्यासाठी आपण घेत असलेल्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे हा त्रास जाणवतो. चक्कर येत असल्याचे ध्यानात येताच त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीराचा तोल जाणे तसेच चालताना त्रास होणे ही हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे आहेत. उच्च रक्तदाब हा असे झटका येण्याचे कारण असतो.

उच्च रक्तदाबाचे निदान तपासा  आरोग्यदायी वाटत असले तरी तरुणांनी दोन वर्षांनी एकदा तरी त्यांच्या रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी, असा निष्कर्ष एका अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. ज्यांच्या घरी, कुटुंबात, अगोदरच्या पिढींमध्ये किंवा आई-वडिलांना रक्तदाबाचा आजार आहे, त्यांनी तर ही काळजी विशेषत्वाने घेतली पाहिजे. अशा घरातील तरुण मुलांना लहानवयातच ही समस्या होऊ शकते. त्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे वेळीच तपासणी केली तर जोखीम कमी करता येते. पान
अठरापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीने आपले रक्तदाबाचे प्रमाण कितपत आहे, याची माहिती व मोजमाप वर्षातून एकदा तरी करून घेतले पाहिजे. रक्तदाब नसेल तर ठीक किंवा त्याचे प्रमाण कितपत आहे आणि ते कितपत होऊ शकते, याचा अंदाज घेऊन त्यानुसार पथ्ये पाळणे सोपे होते. तरुणपणातील तपासणी व उपचारांमुळे त्याचे भविष्यातील प्रमाण कमी-जास्त राहते. तपासणी केली नाही, तर वयोमानानुसार तो वाढत असल्याने नंतरच्या काळात त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. उच्च रक्तदाबामुळे आपल्या हृदयाचे तसेच रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्याचे वेळीच निदान व्हायला हवे. तसे झाले तर तो नियंत्रणात ठेवण्यास व आपल्या शरीराचे नुकसान थांबवण्यास मदत होऊ शकते.

उपयुक्त उपचारपद्धती-  सुदैवाने, रक्तदाब कमी असेल तर उपचार घेणे सोपे होते आणि उत्तम आरोग्यदेखील राखता येते. आपल्या जीवनशैलीत त्यानुसार आपण बदल करू शकतो. तसेच होणारा अधिक त्रास कमी करू शकतो.
-  वजन नियंत्रित ठेवले तर उच्च रक्तदाबाचा धोका कमी आणि शरीर निरोगी राहते.
-  दररोज व्यायाम करा - उच्च रक्तदाबाची जोखीम कमी करण्यासाठी दररोज व्यायाम आवश्‍यक आहे.  दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातील सर्व दिवस आपला व्यायाम होईल, यानुसार आपल्या कामाचे नियोजन करा.
-  पोषक आहार घ्या -  फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, आणि कमी चरबी असलेली उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ असा सकस आहार रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतो.
-  मीठ कमी खा. अन्न बनवण्याच्या प्रक्रियेत मिठाचा वापर होतो. हे मीठ सूप तसेच भाजलेल्या-शिजवलेल्या पदार्थांतून मिळते. पण त्याचे प्रमाण कमी अथवा संतुलित असेल, तर रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
-  धूम्रपान करू नका - धूम्रपानामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, झटका आणि अन्य आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते टाळा.
-  रात्री चांगली झोप घ्या. रात्री मिळणारी चांगली झोप ही रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.
--------------------------------
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Thursday, September 13, 2012

नको भीती भाताची

डॉ. श्री बालाजी तांबे
मधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, असं सांगितलं जातं, परंतु भात खाणे वाईट नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. म्हणून पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.

मधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, भात खाण्याने शरीर फुगते, वजन वाढते अशा प्रकारचा बराच प्रचार आतापर्यंत झालेला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भात खाणे वाईट नाही. ग्लायसेमिक इंडेक्‍स (glycemic index - I) म्हणजे एखादा अन्नपदार्थ सेवन केल्यावर दोन तासांमध्ये रक्‍तामध्ये साखर किती प्रमाणात वाढते, याची मोजणी असते. वेगवेगळ्या 233 प्रकारच्या तांदळाची पाहणी केल्यानंतर असे आढळले, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. अनेक प्रकारचे तांदूळ अस्तित्वात असतात. भातामुळे रक्‍तात वाढणारी साखर 48 ते 92 या गुणांमध्ये मोजली जाते. भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाच्या सेवनामुळे 68 ते 74 संख्येपर्यंत साखर वाढते (भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाचा जी.आय. 68 ते 74 आहे), तर सुवर्णा किंवा मसुरी या तांदळांच्या सेवनामुळे साखर वाढण्याचे प्रमाण 55 पेक्षा कमी आहे. हातसडीचा तांदूळ पचायला जरा जड असतो, पण त्यातून जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात मिळू शकतात. अन्यथा तो पॉलिश केलेल्या तांदळाप्रमाणेच काम करतो. तांदळात कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असल्यामुळे भात खाल्ल्यावर मनुष्याने हालचाल करणे म्हणजेच काम करणे आवश्‍यक असते. भात खाऊन नुसते बसून राहिले तर चांगले नसते, असेही निष्पन्न झालेले आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र (International Rice Research Institute - IRRI)  आणि युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलॅंड या दोन्ही संस्थांनी मिळून केलेले आहे. या संशोधनात असे आढळले आहे, की दहा प्रजातींपासून केलेला भात सेवन केल्यास रक्‍तात साखर वाढण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. चीनमध्ये तयार होणार तांदळाचा जी. आय. 45 इतका कमी आहे, तर लाओसमध्ये तयार होणाऱ्या तांदळाचा जी.आय. 92 आहे.

ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नाचे पचन सावकाश होते व तो शरीरात सावकाश सावकाश जिरतो, म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नापासून थोडी साखर शरीरात सोडली जाते. म्हणून अशा प्रकारचा तांदूळ खाल्ल्यास मधुमेहींसाठी कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नसल्याने खायला हरकत नाही, असा एकूण या संशोधनाचा निष्कर्ष निघाला. तसेही योग्य प्रमाणात तांदूळ-भात खाल्ला तर रक्‍तात साखरेचे प्रमाण वाढत नाही, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.

आयुर्वेदाकडून भातप्रशंसा
"फॅमिली डॉक्‍टर' व "सकाळ'च्या वाचकांना, तसेच फॅमिली डॉक्‍टरच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेल्यांना आठवत असेल, की आयुर्वेदाने भात खाण्याची प्रशंसा वेळोवेळी केलेली आहे. ज्या ठिकाणी भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो तेथे, तसेच भात हे मुख्य अन्न असलेल्या चीनमध्ये लोकांचे आरोग्य उत्तम असल्याचे दिसते. (चीनमधील तांदळाचा जी.आय. 45 इतका कमी आहे.) ज्या देशातील लोकांचे किंवा भारतातील ज्या प्रदेशातील लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे त्यांचे आरोग्य गहू वा इतर अन्न खाणाऱ्या लोकांपेक्षा चांगले असलेले दिसते. भात खाणाऱ्यांचा सडसडीतपणा डोळ्यांत भरण्यासारखा असतो. अनेक मंडळींना प्रत्यक्ष विचारल्यानंतर असे दिसून आले, की भात मुख्य अन्न असणाऱ्यांच्या आई-वडील, आजी-आजोबा वगैरेंचे वजन कधीच मर्यादेच्या बाहेर नव्हते, त्यांना कधीही स्थूलत्वाचा त्रास झालेला नव्हता. मधुमेह वगैरे तर सोडाच, पण त्यांनी निरामय आरोग्य सांभाळत शंभरी पार केलेली होती.

तीन महिने, सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे नाश्‍त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत केवळ तांदळाचे पदार्थ सेवन केल्यास आरोग्याचा लाभ होतो हे दाखवून दिले. दही-भात, ताक-भात, वरण-भात, डाळ-भात, मेतकूट-भात, गोड भात, तांदळाची भाकरी वगैरे तांदळाचे वेगवेगळे पदार्थ खाता येतात. त्याबरोबर काही अंशी तांदळापासून बनविलेले पोहेसुद्धा खाता येतात. दही-पोहे खाणारी अनेक मंडळी असतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते. तांदळाच्या कण्यांचा उपमा खाता येतो. तांदळापासून पक्वान्ने बनवूनही खाता येतात. तेव्हा नुसता तांदूळ खायचा म्हटल्यावर आता माझे कसे होणार, याची चिंता करायचे कारण नसावे.

तांदूळ पचायला सोपा
संतुलन पंचकर्म व शरीरातील पेशी शुद्ध करण्याच्या चिकित्सेच्या दरम्यान सर्व रोग्यांना (यात हृद्रोगी, मधुमेहाचे रोगीही अंतर्भूत आहेत) सकाळी नाश्‍त्यासाठी साळीच्या लाह्या, दुपारच्या व रात्रीच्या जेवणात भात देण्यात आला. एवढे करून कुणालाही कसलाही त्रास झाला नाही, कुणाचेही कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्‌स वाढले नाही, साखरही वाढली नाही, उलट कमी झाली. अर्थात रोग्यांच्या दिनक्रमात अंतर्स्नेहन, बाह्यस्नेहन, स्वेदन, विरेचन, बस्ती वगैरे उपचार, योग, संगीत वगैरेंचाही समावेश होता. त्यांची कुठल्याही प्रकारे उपासमार केली गेली नाही. त्यांच्या आहारात तांदळाचा समावेश होता.

तांदूळ हे अधिक पाण्यावर उगवणारे पीक आहे. त्यातल्या त्यात साठ दिवसांत तयार होणारा तांदूळ पचायला अधिक सोपा असतो. तांदूळ भाजून घेऊन त्यापासून केलेला भात पचायला सोपा असतो व कुठलाही त्रास न होता त्यापासून सहज शक्‍ती मिळते. भात शिजवण्यासाठी वा डाळ-तांदळाची खिचडी बनवताना फारसे कौशल्य असण्याची गरज नसते.

या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर भात खाण्याचा प्रयोग करून पाहावा व प्रकृतीत सुधारणा अनुभवावी, आनंद मिळवावा.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून



डॉ. श्री बालाजी तांबे
तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायलाच हवा. बहुतेक सर्व रोगांमध्ये तांदूळ हा पथ्यकारक म्हणून सांगितला आहे. आयुर्वेदाने भाताचा नेहमीच आग्रह धरला आहे.

जगात सर्वत्र मिळणारे आणि अन्न म्हणून सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे धान्य म्हणजे तांदूळ. जगभरात सुमारे 40हजार जातींचे तांदूळ होतात. भारतामध्येही तांदळाच्या पारंपरिक अनेक जाती आहेत. बासमती, आंबेमोहोर, सोना मसुरी, कोलम वगैरे भाताची नावे बहुतेकांच्या परिचयाची असतात; मात्र याखेरीज साठेसाळ, रक्‍तसाळ, चंपा, चंपाकळी, जिरगा, काळी गजरी वगैरे अनेक जाती असतात. बासमती, आंबेमोहोर भात सुगंधामुळे अधिक प्रचलित असला तरी साठेसाळ, रक्‍तसाळ वगैरे पारंपरिक तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतो. उदा. रक्‍तसाळ भातात लोह अधिक प्रमाणात असते, साठेसाळ भात पचण्यासाठी अतिशय सोपा असतो. जिरगा, काळी गजरी वगैरे भात रुग्णांसाठी विशेष हितकर असतो.

आयुर्वेदात तांदळाची अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. तांदूळ तयार झाल्यावर वर्षभर साठवून मग खाण्यासाठी वापरावा असेही सांगितलेले आहे. बहुतेक सर्व रोगांमध्ये अशा प्रकारच्या जुन्या तांदळाचा पथ्य म्हणून उल्लेख केलेला सापडतो. वेदांमध्येही तांदळाचा उल्लेख सापडतो. भारतीय संस्कृतीनुसार यज्ञ, पूजा, लग्नकार्यात तांदळाचा उपयोग केला जातोच, पण जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये तांदूळ हे भरभराटीचे, समृद्धीचे व वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते.

"भावप्रकाश' या आयुर्वेदाच्या ग्रंथात तांदळाच्या काही मुख्य जातींचा उल्लेख याप्रमाणे केलेला आहे, रक्‍तशाली, सकलम, पांडुक, शकुनाहृत्‌, सुगंधक, कर्दमक, महाशाली, दूषक, पुष्पांडक, पुंडरीक, महिष, मस्तक, दीर्घशूक, कांचनक, हायन, लोध्रपुष्पक. मात्र, विस्तारभयामुळे सर्व जातींचा निर्देश करणे शक्‍य नाही असे याच्यापुढे म्हटलेले असल्याने प्रत्यक्षात त्या वेळीही यापेक्षा अनेक जाती अस्तित्वात होत्या, हे समजते.

तांदळाचे गुणधर्म
तांदळाचे गुणधर्म व उपयोग पुढीलप्रमाणे सांगितले आहेत,
शालयोः मधुराः स्निग्धा बल्या बद्धाल्पवर्चसः ।
कषाया लघवो रुच्या स्वर्या वृष्याश्‍च बृंहणाः ।।
अल्पानिलकफाः शीताः पित्तघ्ना मूत्रलास्तथा । ...भावप्रकाश

तांदूळ चवीला गोड, गुणाने स्निग्ध व वीर्याने थंड असतात, बल वाढविणारे व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात, स्वरासाठी हितकर असतात. शुक्रधातूला वाढवितात, इतर धातूंचेही पोषण करतात, पित्तशमन करतात, थोड्या प्रमाणात वात-कफाला वाढवतात, पचण्यास सोपे असतात, तसेच लघवी साफ होण्यासही मदत करतात.

हे झाले सामान्य तांदळाचे गुण. मात्र, सर्व तांदळांत साठेसाळी तांदूळ श्रेष्ठ आहेत, असे सांगितले आहे. हे तांदूळ साठ दिवसांत तयार होतात व त्यांचे गुण या प्रकारे असतात.

षष्टिकाः मधुराः शीता लघवो बद्धवर्चसः ।
वातपित्तप्रशमनाः शालिभिः सदृशा गुणैः ।। ...भावप्रकाश

चवीला मधुर, वीर्याने शीतल व पचायला हलके असतात, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात. वात तसेच पित्तदोषाचे शमन करतात; ताकद देतात, तसेच तापात हितकर असतात.

रक्‍तशाली म्हणजे लाल रंगाचे तांदूळ. यांची विशेषता अशी, की ते डोळ्यांसाठी चांगले असतात.

रक्‍तशालिर्वरस्तेषु बल्यो वर्ण्यस्त्रिदेषजित्‌ ।
चक्ष्युष्यो मूत्रलः स्वर्यः शुक्रलस्तृङज्वरापहा ।।
विषव्रणश्‍वासकासदाहनुत्‌ वपिष्टिदः । ...भावप्रकाश

सर्व तांदळांपैकी रक्‍तसाळ तांदूळ डोळ्यांना हितकर असतात, ताकद वाढवितात, कांती सुधरवतात व तिन्ही दोषांना संतुलित ठेवतात; आवाजासाठी हितकर असतात, लघवी साफ होण्यास मदत करतात, शुक्रवर्धन करतात. तहान, ताप, विष, व्रण, दमा, खोकला, दाह यांचा नाश करतात व अग्नीची पुष्टी करतात.

विविध जातींच्या तांदळाचे अंगभूत गुण याप्रमाणे सांगितले आहेत; मात्र, तांदूळ कशा प्रकारे उगवले आहेत यावरही त्यांचे गुणधर्म बदलतात.
अगोदर जाळून घेतलेल्या जमिनीमध्ये लावलेले तांदूळ किंचित तुरटसर चवीचे व पचायला सोपे असतात. हे तांदूळ मल-मूत्र विसर्जनास मदत करतात, कफनाशक असतात.
नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ विशेषतः शुक्रवर्धक असतात आणि तुलनेने कमी हलके असतात, धारणाशक्‍ती वाढवितात, ताकद देतात, या तांदळापासून मलभाग फारसा तयार होत नाही.
अजिबात न नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ वात वाढवितात.
आपोआप उगवलेले म्हणजे मुद्दाम पेरणी न करता आलेले तांदूळ गुणाने कमी प्रतीचे असतात.
एकदा आलेल्या तांदळाच्या लोंब्या कापून घेऊन त्याच फुटीवर पुन्हा आलेले तांदूळ गुणांनी रुक्ष असतात, पित्त वाढवितात व मलावबंध करतात.

मधुमेहीनो, भात खा!
अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने, नीट पेरणी, मशागत करून उगवलेले तांदूळ वर्षभरानंतर वापरणे अतिशय आरोग्यदायी आहे, हे सहज लक्षात येते.
मधुमेही व्यक्‍तींनी, वजन जास्त असणाऱ्यांनी भात खाऊ नये असा प्रचार बऱ्याचदा केला जातो; मात्र, आयुर्वेदातील पुढील संदर्भावरून यामध्ये अजिबात तथ्य नाही, हे स्पष्ट होते.
मधुमेहावरचे औषध खाल्ल्यानंतर तूप व भात खावा असे सांगितले आहे,

सुभावितं सारजलैला हि पिष्ट्‌वा शिलोद्‌भवाः ।
शालिं घृतैश्‍च भुञ्जानः ।। ...रसरत्नाकर

चंदनाच्या पाण्यात वेलची व शुद्ध शिलाजित टाकून घ्यावे व वर तूप-भात खावा.
मधुमेही व्यक्‍तीसाठी पथ्यकर पदार्थ सांगताना म्हटले आहे,
यवान्नविकृर्तिमुद्‌गाः शस्यन्ते शालिषष्टिकाः । ...रसरत्नाकर

जवापासून बनविलेले पदार्थ, मूग, तांदूळ, विशेषतः साठेसाळीचे तांदूळ मधुमेही व्यक्‍तींसाठी हितकर आहेत.
स्थूलता कमी करण्यासाठीसुद्धा तांदळाचा आधार घेतलेला आहे.

उष्णमत्रस्य मण्डं वा पिबन्‌ कृशतनुर्भवेत्‌ ।
...भैषज्य रत्नावली

रोज सकाळी तांदळाची मंड (14 पट पाणी घालून केलेली भाताची पेज) घेण्याने स्थूल व्यक्‍ती कृश होते.
स्थूल व्यक्‍तीसाठी हितकर काय आहे सांगताना तांदळाचा उल्लेख केलेला आहे.

पुराणशालयो मुद्गकुलत्थयवकोद्रवाः ।
लेखना बस्तयश्‍चैव सेव्या मेदस्विना सदा ।। ...भैषज्य रत्नावली

एक वर्ष जुने तांदूळ, मूग, कुळीथ, यव, कोद्रव (एक प्रकारचे धान्य), लेखन (मेद कमी करणाऱ्या औषधांनी संस्कारित तेलाची वा काढ्याची बस्ती, हे मेदस्वी व्यक्‍तीने नित्य सेवन करण्यास योग्य आहे.

तांदूळपाण्याचे अनुपान
तंडुलोदक म्हणजे तांदळाचे पाणी हे अनुपान म्हणूनही वापरले जाते. बारीक कांडलेले तांदूळ आठपट पाण्यात भिजत घालावेत, 15-20 मिनिटांनी हातांनी कुस्करून गाळून घ्यावेत. हे तंडुलोदक अतिशय तहान लागणे, उलटी, मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित न होणे, आव, जुलाब वगैरे रोगांमध्ये उपयोगी असते. स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अति रक्‍तस्राव होणे, वारंवार पाळी येणे वगैरे तक्रारींवर द्यायचे औषध तंडुलोदकाबरोबर दिल्यास अधिक लवकर व चांगला गुण येतो.

तांदळापासून बनविलेल्या साळीच्या लाह्या आम्लपित्त, उलटी, जुलाब वगैरे तक्रारींवर औषधाप्रमाणे उपयोगी असतात.

पिंडस्वेदन या विशेष उपचारासाठी औषधी काढ्यात तांदूळ शिजवला जातो व असा भात पुरचुंडीत बांधून मसाज करण्यासाठी वापरला जातो. काही वातशामक लेपसुद्धा तांदळाच्या पेजेमध्ये मिसळून लावायचे असतात.

अशा प्रकारे तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. तेव्हा रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायलाच हवा.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, December 28, 2011

मानसोपचाराने ठेवा हृदय शाबूत


डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ, पुणे
हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधं, व्यायाम व पथ्यं याबरोबरच मनःस्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रं, तसंच गायडेड इमेजरी यांचा मानसिक-शारीरिक दोन्ही दृष्टींनी चांगला उपयोग होऊ शकतो.

गेल्या काही वर्षांत एक महत्त्वाची संकल्पना मान्यता पावू लागली आहे, ती म्हणजे सायकोन्युरोइम्युनॉलोजी (पीएनआय). शरीर व मन एकमेकांवर कसे परिणाम करतात याचा तो अभ्यास आहे. भारतीयांसाठी खरं तर ही संकल्पना वेद काळापासून आहे. या संकल्पनेवर आधारित एक परिणामकारक तंत्र म्हणजे गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायझेशन.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा शरीरस्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे.

हे तंत्र इतर वैद्यकीय उपचारांना पूरक असेच आहे. मन आणि शरीर यांचा परस्परसंबंध वैद्यकशास्त्राने मान्य केला आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधं, व्यायाम व पथ्यं याबरोबरच मनःस्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रं, तसंच गायडेड इमेजरी यांचा मानसिक-शारीरिक दोन्ही दृष्टींनी चांगला उपयोग होऊ शकतो. ताणतणाव, क्रोध, दुःख, अपराधगंड, भीती आणि इतर नकारात्मक भावना हृदयरोग तसंच मधुमेहासाठी अतिशय घातक आहेत. संशोधनाअंती सिद्ध झालंय, की गायडेड इमेजरी, तसंच इतर स्वास्थ्य तंत्राद्वारा निर्माण होणारी स्वस्थ अवस्था या भावनांचा निचरा करते. रक्तदाब व नाडीची गती, तसंच रक्तातील शर्करा नियंत्रणात आणायला मदत करते. हृदयरोग संशोधनामधील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या डॉ. डीन ओर्निश यांनी सिद्ध केलं होतं, की आहार, व्यायाम तसंच स्वस्थतेची तंत्रं यांनी सीएचडी (कोरोनरी हार्ट डिसीज) वर मात करता येते. याच स्वस्थतेच्या तंत्रांमध्ये गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन फार मोलाचं योगदान देऊ शकते.

अशा पद्धतीची स्वस्थतेची तंत्रं अनेक प्रगत देशांतील क्‍लिनिकमध्ये व इस्पितळात वापरली जातात. त्यानं हॉस्पिटलमध्ये कमी काळ राहावं लागणं, वेदना कमी होणं व काही केसेसमध्ये औषधांचा परिणाम लवकर होणं, ती कमी लागणं, हेही घडलंय.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन -
मन व शरीराचं एकमेकांशी असलेलं नातं व मनाचा शरीरावर होणारा परिणाम या तत्त्वावर हे तंत्र आधारित आहे.

गायडेड इमेजरी ही एक प्रणाली आहे- ज्यामध्ये तुम्ही कल्पनेचा वापर करून स्वस्थता व शांततेच्या निवांत प्रदेशात जाता. निसर्गातील प्रतिमा व दृश्‍यांचा परिणामकारक उपयोग केला जातो. त्यासाठी तज्ज्ञ थेरपिस्टची गरज असते. निवांत व तरल अवस्थेत गेल्यावर तुम्ही तज्ज्ञांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण लक्ष शरीरातील आजारी अवयवावर किंवा विशिष्ट सिस्टिमवर केंद्रित करता. उदा. हृदयरोगात, कोरोनरी हार्ट डिसीज (सीएचडी) मध्ये रोहिणीकाठीण्य म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमध्ये मेद जमा होतो. रोहिण्या अरुंद होतात. या अवस्थेतील व्यक्तीला हृदयाची आजारी स्थिती डोळ्यांसमोर आणायला सांगितली जाते. त्या स्थितीवर फोकस करून रोहिण्यांमधील मेद विरघळत आहे, रोहिण्या रुंद होत आहेत, हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत आहे व प्राणवायू मिळत आहे, हे चित्र तीव्रपणे उभे केले जाते. हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं.

मधुमेहासाठी -
आपला कोमट श्‍वास डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतोय. तिथं विरघळतोय. तेथील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या उघडल्या जातात. त्यांच्यात आवश्‍यक ते बदल, दुरुस्ती होतेय. त्या सक्षम होतात. काही काळ तिथं थांबून हा श्‍वास मेंदूच्या अफलातून अशा जाळ्यांमध्ये शिरतोय. तेथील नाजूक मज्जातंतू व अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांची जाळी उघडली जातात, स्वस्थ होतात. निर्माण झालेले व होऊ शकणारे अवरोध, अडथळे दूर होतात. माझ्या प्रत्येक श्‍वासागणिक विलक्षण तेजस्वी, शीतल आणि सुखद असा प्रकाश जादू करतोय. शरीरातील सर्व सिस्टिम स्वस्थ होत जातात. हाच प्रकाश स्वादुपिंडामध्ये प्रवेश करतोय. तिथं अस्तित्वात असलेल्या पेशींच्या समूहाला उत्तेजित करतोय- ज्यायोगे त्या शरीराला आवश्‍यक तेवढं व शरीर वापरू शकेल एवढंच इन्शुलिन तयार होतंय, ते शरीरातील पेशींपर्यंत व्यवस्थित पोचतं आहे, हे इन्शुलिन एखाद्या किल्लीप्रमाणे काम करत आहे- ज्यायोगे जणू काही अन्नासाठी भुकेल्या पेशींचे दरवाजे उघडत आहेत आणि पेशींना व्यवस्थित अन्नरस मिळत आहे, हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं. वारंवार व प्रभावीपणे उभ्या केलेल्या कल्पनाचित्रांचा, अंतर्मनाच्या शक्तीचा हा विलक्षण आविष्कार असतो.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशनदरम्यान मेंदूतील भावना नियंत्रण केंद्रांकडे सकारात्मक सूचना पाठवल्या जातात, ज्या पुढे ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम व इम्यून सिस्टिमकडे जातात, ज्याचा चांगला परिणाम हार्ट रेट, रक्तदाब, रक्तशर्करा यावर होतो. चांगली संप्रेरकं स्त्रवली जातात. आजार लवकर बरा होण्याच्या दृष्टीनं, शरीर अनुकूल व तत्काळ प्रतिसाद देऊ लागतं. सेशननंतर व्यक्तीला अतिशय शांत, उत्साही व टवटवीत वाटतं. याप्रमाणे प्रकृतीनुसार अनेक सेशन्स केली जातात. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. रक्तशर्करा व लिपीड प्रोफाईलवर अनुकूल परिणाम होतो, आत्मविश्‍वास वाढतो, ताण नाहीसा होतो.
ही उदाहरणं फक्त कल्पना येण्यासाठी दिली आहेत. प्रत्यक्षात आजारी व्यक्तीची भावनिक जडणघडण, एकूण मानसिक स्थिती वगैरे लक्षात घेऊन तज्ज्ञ संहिता तयार करतात. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी संहिता असू शकते व सेशन्सची संख्या वेगळी वेगळी असू शकते. होऊन गेलेला आजार पुन्हा उद्‌भवू नये यासाठीही या तंत्राचा उपयोग होतो.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन तंत्राचा उपयोग पुढील आजारातही होऊ शकतो ः 1) कर्करोग, केमोथेरपी सुसह्य करण्यासाठी, 2) वेगवेगळे ट्यूमर्स, 3) गरोदरपणात, 4) शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेनंतर तब्येतीत सुधारणा होण्यासाठी, 5) शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, 6) नैराश्‍य व मानसिक अस्वस्थतेचे आजार, 7) निद्रानाश व झोपेचे विकार, 8) वजन कमी करणे, 9) मायग्रेन, 10) होऊन गेलेले विकार पुन्हा होण्यापासून प्रतिबंध होणे इत्यादी. डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधे, व्यायाम, पथ्ये यांच्या जोडीला या तंत्राचा, तज्ज्ञांच्या साह्यानं अतिशय परिणामकारक असा उपयोग होऊ शकतो.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Sunday, June 21, 2009

मधुमेह टाळता येतो ?

आहार आणि व्यायाम यांच्या साह्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

कोणताही आजार हा होण्यापेक्षा जर टाळता आला तर? किंवा त्याचा प्रतबंध करता आला तर? मधुमेह हा आजार म्हणजे नुसतेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते असे नव्हे, तर हा आजार व्यक्तीचे शरीर पोखरून, चुंबकासारखे कार्य करतो व विविध आजारांना निमंत्रित करतो. उदा.- उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंडाचे रोग, न बरी होणारी जखम (Gangrene) इ. या आजाराची भीती बाळगण्यापेक्षा आणि तो आपणास होऊन शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केला तर?
होय, शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे, की तुम्ही मधुमेह टाळू शकता किंवा त्याचा प्रतिबंध करू शकता.
प्रतिबंध कसा करता येईल, हे पाहण्याआधी आपण मधुमेह होण्याची शक्‍यता कोणाकोणास आहे हे विचारात घेऊ.
आपल्या कुटुंबात मधुमेहाचा रुग्ण आहे. उदा.- आपली आई किंवा वडील किंवा दोघेही अथवा आपल्या कमरेचा घेर ८० सें.मी. (महिला) किंवा ९० सें.मी. (पुरुष) पेक्षा जास्त आहे. अथवा आपल्या व्यवसायाचे स्वरूप बैठ्या पद्धतीचे आहे अथवा आपले वय वर्षे ३५ पेक्षा जास्त आहे. असे असल्यास त्या व्यक्तीस मधुमेह होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा व्यक्तींनी स्वतःहून तपासणी करून घेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा. भविष्यात मधुमेह होण्याची शक्‍यता असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पाहण्यापेक्षा, शरीर साखरेचा भार (लोड) सहन करू शकते किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे (Glucose Tolerance Test) - जेणेकरून ती व्यक्ती मधुमेही (Diabetic)आहे की मधुमेहाच्या पूर्वस्थितीत (Pre-diabetic)आहे हे जाणता येते.
मधुमेहाच्या पूर्वस्थितीतील (Pre-diabetic) व्यक्तींनी नियंत्रित आहार व नियमित व्यायाम (Life Style Modification) -केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास व पूर्ववत येण्यासही मदत होते व मधुमेहाचा प्रतिबंध होतो. आहार व व्यायाम हे दोन्ही मधुमेहाच्या उपचारासाठीचे व प्रतबंधात्मक उपायासाठीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. नियंत्रित आहार म्हणजे काय? महाराष्ट्रीय मध्यमवर्गाचा आहार समतोल असला, तरी नियंत्रित नसतो. त्यास नियंत्रित करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. दिवसाचा पूर्ण आहार हा चार भागांत विभागून (सकाळचा नाश्‍ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी नाश्‍ता व रात्रीचे जेवण) घेतला पाहिजे.
आहाराच्या चारही भागांपैकी कोणताही भाग कमी केला अथवा टाळला जाऊ नये. बाह्य पदार्थाचे (fast food उदा.- पिझ्झा, बर्गर, वडा-पाव इ.) सेवन टाळावे. खाद्यतेलाचे सेवन मर्यादित स्वरूपात व मिश्रण करून केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो इत्यादीचा वापर जास्त प्रमाणात करावा.
रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान २-३ तासांचे अंतर असावे. अतिसेवन व कडकडीत उपवास- दोन्हीही टाळावे. आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा (calories) योग्य वापर हा नियमित व्यायामामुळे होतो. व्यायाम सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. घरकाम, बागकाम, कार्यालयीन काम यामध्ये खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कितीतरी जास्त ऊर्जा खर्च करणे गरजेचे असते. भरभर चालणे, पोहणे, योगासने, मैदानी खेळ (वैद्यकीय सल्ल्यानंतर) या प्रकारांनी हे साध्य होऊ शकते. नियमित व्यायाम हा दिवसातून ३०-४५ मिनिटे व आठवड्यातून कमीत कमी पाच वेळा करायला हवा.
नियंत्रित आहार व नियमित व्यायामाचे फायदे- वजन नियंत्रित राहते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. गुडघेदुखीचा त्रास कमी होतो, बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. नियंत्रित आहार व नियमित व्यायाम या जीवनशैली बदलामुळे (Life-style modification) मधुमेहाचा प्रतिबंध होऊ शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैली बदलणे अवघड आहे, पण अशक्‍यप्राय नाही. जीवनशैली बदलरूपी लसीने मधुमेहाचा प्रतिबंध करता येतो. दुर्दैवाने कोणत्याही औषधीनिर्मिती कंपनीला ही लस बनवता येत नाही, म्हणून ही लस आजच सर्वांनी स्वतःहून घेतली पाहिजे व मधुमेह झाल्यानंतर त्याच्याशी लढा देण्यापेक्षा मधुमेह होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक लढा दिला पाहिजे.
- डॉ. अभिजित मुगळीकर, मधुमेहतज्ज्ञ, लातूर

ad