Wednesday, December 28, 2011

मानसोपचाराने ठेवा हृदय शाबूत


डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ, पुणे
हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधं, व्यायाम व पथ्यं याबरोबरच मनःस्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रं, तसंच गायडेड इमेजरी यांचा मानसिक-शारीरिक दोन्ही दृष्टींनी चांगला उपयोग होऊ शकतो.

गेल्या काही वर्षांत एक महत्त्वाची संकल्पना मान्यता पावू लागली आहे, ती म्हणजे सायकोन्युरोइम्युनॉलोजी (पीएनआय). शरीर व मन एकमेकांवर कसे परिणाम करतात याचा तो अभ्यास आहे. भारतीयांसाठी खरं तर ही संकल्पना वेद काळापासून आहे. या संकल्पनेवर आधारित एक परिणामकारक तंत्र म्हणजे गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायझेशन.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा शरीरस्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे.

हे तंत्र इतर वैद्यकीय उपचारांना पूरक असेच आहे. मन आणि शरीर यांचा परस्परसंबंध वैद्यकशास्त्राने मान्य केला आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधं, व्यायाम व पथ्यं याबरोबरच मनःस्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रं, तसंच गायडेड इमेजरी यांचा मानसिक-शारीरिक दोन्ही दृष्टींनी चांगला उपयोग होऊ शकतो. ताणतणाव, क्रोध, दुःख, अपराधगंड, भीती आणि इतर नकारात्मक भावना हृदयरोग तसंच मधुमेहासाठी अतिशय घातक आहेत. संशोधनाअंती सिद्ध झालंय, की गायडेड इमेजरी, तसंच इतर स्वास्थ्य तंत्राद्वारा निर्माण होणारी स्वस्थ अवस्था या भावनांचा निचरा करते. रक्तदाब व नाडीची गती, तसंच रक्तातील शर्करा नियंत्रणात आणायला मदत करते. हृदयरोग संशोधनामधील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या डॉ. डीन ओर्निश यांनी सिद्ध केलं होतं, की आहार, व्यायाम तसंच स्वस्थतेची तंत्रं यांनी सीएचडी (कोरोनरी हार्ट डिसीज) वर मात करता येते. याच स्वस्थतेच्या तंत्रांमध्ये गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन फार मोलाचं योगदान देऊ शकते.

अशा पद्धतीची स्वस्थतेची तंत्रं अनेक प्रगत देशांतील क्‍लिनिकमध्ये व इस्पितळात वापरली जातात. त्यानं हॉस्पिटलमध्ये कमी काळ राहावं लागणं, वेदना कमी होणं व काही केसेसमध्ये औषधांचा परिणाम लवकर होणं, ती कमी लागणं, हेही घडलंय.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन -
मन व शरीराचं एकमेकांशी असलेलं नातं व मनाचा शरीरावर होणारा परिणाम या तत्त्वावर हे तंत्र आधारित आहे.

गायडेड इमेजरी ही एक प्रणाली आहे- ज्यामध्ये तुम्ही कल्पनेचा वापर करून स्वस्थता व शांततेच्या निवांत प्रदेशात जाता. निसर्गातील प्रतिमा व दृश्‍यांचा परिणामकारक उपयोग केला जातो. त्यासाठी तज्ज्ञ थेरपिस्टची गरज असते. निवांत व तरल अवस्थेत गेल्यावर तुम्ही तज्ज्ञांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण लक्ष शरीरातील आजारी अवयवावर किंवा विशिष्ट सिस्टिमवर केंद्रित करता. उदा. हृदयरोगात, कोरोनरी हार्ट डिसीज (सीएचडी) मध्ये रोहिणीकाठीण्य म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमध्ये मेद जमा होतो. रोहिण्या अरुंद होतात. या अवस्थेतील व्यक्तीला हृदयाची आजारी स्थिती डोळ्यांसमोर आणायला सांगितली जाते. त्या स्थितीवर फोकस करून रोहिण्यांमधील मेद विरघळत आहे, रोहिण्या रुंद होत आहेत, हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत आहे व प्राणवायू मिळत आहे, हे चित्र तीव्रपणे उभे केले जाते. हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं.

मधुमेहासाठी -
आपला कोमट श्‍वास डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतोय. तिथं विरघळतोय. तेथील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या उघडल्या जातात. त्यांच्यात आवश्‍यक ते बदल, दुरुस्ती होतेय. त्या सक्षम होतात. काही काळ तिथं थांबून हा श्‍वास मेंदूच्या अफलातून अशा जाळ्यांमध्ये शिरतोय. तेथील नाजूक मज्जातंतू व अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांची जाळी उघडली जातात, स्वस्थ होतात. निर्माण झालेले व होऊ शकणारे अवरोध, अडथळे दूर होतात. माझ्या प्रत्येक श्‍वासागणिक विलक्षण तेजस्वी, शीतल आणि सुखद असा प्रकाश जादू करतोय. शरीरातील सर्व सिस्टिम स्वस्थ होत जातात. हाच प्रकाश स्वादुपिंडामध्ये प्रवेश करतोय. तिथं अस्तित्वात असलेल्या पेशींच्या समूहाला उत्तेजित करतोय- ज्यायोगे त्या शरीराला आवश्‍यक तेवढं व शरीर वापरू शकेल एवढंच इन्शुलिन तयार होतंय, ते शरीरातील पेशींपर्यंत व्यवस्थित पोचतं आहे, हे इन्शुलिन एखाद्या किल्लीप्रमाणे काम करत आहे- ज्यायोगे जणू काही अन्नासाठी भुकेल्या पेशींचे दरवाजे उघडत आहेत आणि पेशींना व्यवस्थित अन्नरस मिळत आहे, हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं. वारंवार व प्रभावीपणे उभ्या केलेल्या कल्पनाचित्रांचा, अंतर्मनाच्या शक्तीचा हा विलक्षण आविष्कार असतो.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशनदरम्यान मेंदूतील भावना नियंत्रण केंद्रांकडे सकारात्मक सूचना पाठवल्या जातात, ज्या पुढे ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम व इम्यून सिस्टिमकडे जातात, ज्याचा चांगला परिणाम हार्ट रेट, रक्तदाब, रक्तशर्करा यावर होतो. चांगली संप्रेरकं स्त्रवली जातात. आजार लवकर बरा होण्याच्या दृष्टीनं, शरीर अनुकूल व तत्काळ प्रतिसाद देऊ लागतं. सेशननंतर व्यक्तीला अतिशय शांत, उत्साही व टवटवीत वाटतं. याप्रमाणे प्रकृतीनुसार अनेक सेशन्स केली जातात. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. रक्तशर्करा व लिपीड प्रोफाईलवर अनुकूल परिणाम होतो, आत्मविश्‍वास वाढतो, ताण नाहीसा होतो.
ही उदाहरणं फक्त कल्पना येण्यासाठी दिली आहेत. प्रत्यक्षात आजारी व्यक्तीची भावनिक जडणघडण, एकूण मानसिक स्थिती वगैरे लक्षात घेऊन तज्ज्ञ संहिता तयार करतात. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी संहिता असू शकते व सेशन्सची संख्या वेगळी वेगळी असू शकते. होऊन गेलेला आजार पुन्हा उद्‌भवू नये यासाठीही या तंत्राचा उपयोग होतो.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन तंत्राचा उपयोग पुढील आजारातही होऊ शकतो ः 1) कर्करोग, केमोथेरपी सुसह्य करण्यासाठी, 2) वेगवेगळे ट्यूमर्स, 3) गरोदरपणात, 4) शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेनंतर तब्येतीत सुधारणा होण्यासाठी, 5) शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, 6) नैराश्‍य व मानसिक अस्वस्थतेचे आजार, 7) निद्रानाश व झोपेचे विकार, 8) वजन कमी करणे, 9) मायग्रेन, 10) होऊन गेलेले विकार पुन्हा होण्यापासून प्रतिबंध होणे इत्यादी. डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधे, व्यायाम, पथ्ये यांच्या जोडीला या तंत्राचा, तज्ज्ञांच्या साह्यानं अतिशय परिणामकारक असा उपयोग होऊ शकतो.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

1 comment:

  1. वाचून खूप छान माहिती मिळाली, मला अजून थोडी माहिती हवी होती या बद्दल.

    ReplyDelete

ad