Showing posts with label हेमंत ऋतू. Show all posts
Showing posts with label हेमंत ऋतू. Show all posts

Wednesday, December 5, 2012

आवळा


आवळा
डॉ. श्री बालाजी तांबे
आयुर्वेदात असंख्य औषधांमध्ये, रसायनांमध्ये आवळा वापरला जातो. ताजा आवळा कधी वापरायचा, वाळवलेली आवळकाठी कशी वापरायची, काढा कसा करायचा हे सर्व आयुर्वेदात सांगितलेले आहे. आधुनिक शास्त्रही व्हिटॅमिन "सी'चा सर्वोत्तम स्रोत म्हणून आवळ्याकडे पाहते. 

आपल्या भारत देशाला सर्वच बाजूंनी निसर्गाने भरभरून देणी दिलेली आहेत. औषधी गुणांनी परिपूर्ण वनस्पती हे त्यातलेच एक मुख्य देणे. अनंत काळापासून या वनस्पती आपले जीवन व आरोग्य संपन्न करत आहेत. अशीच एक अतिशय उपयुक्‍त भारतीय वनस्पती म्हणजे "आवळा'. आवळा हे मोठे औषध तर आहेच, पण त्याच्या रुचकर गुणामुळे आवळा स्वयंपाकघरातही वापरला जातो.

आवळ्याचे झाड लावल्यावर त्याला कमीत कमी सात - आठ वर्षांनंतर फळ येते. कच्चे फळ हिरवे असते, ते पिकले की पिवळ्या रंगाकडे झुकते. आवळ्याची फळे व्यवस्थित पिकल्यानंतरच औषधात वापरायची असतात. यामुळे कार्तिक महिन्यातील शुद्ध पक्षाच्या नवमीला आवळीपूजन करून मगच पूर्णपणे तयार झालेले वीर्यवान आवळे औषधात वापरण्याची प्रथा आहे. आधुनिक संशोधनानुसार सुद्धा या महिन्यात काढलेल्या आवळ्यात सर्वाधिक प्रमाणात ऍस्कॉर्बिक ऍसिड (सी व्हिटॅमिन) असते असे सिद्ध झालेले आहे. 

पूर्ण वाढ झालेले आवळ्याचे झाड दरवर्षी साधारण 50 ते 70 किलो आवळे देते. झाडाची व्यवस्थित देखभाल केली तर 70 वर्षांपर्यंत आवळ्याच्या झाडाला फळे येऊ शकतात.

आवळा गुणाचा 
आयुर्वेदात असंख्य औषधांमध्ये, रसायनांमध्ये आवळा वापरला जातो. ताजा आवळा कधी वापरायचा, वाळवलेली आवळकाठी कशी वापरायची, काढा कसा करायचा हे सर्व आयुर्वेदात सांगितलेले आहे. आधुनिक शास्त्रही व्हिटॅमिन "सी'चा सर्वोत्तम स्रोत म्हणून आवळ्याकडे पाहते. आवळ्याची विशेषतः ही की आवळा शिजवला तरीसुद्धा त्यातील "सी' व्हिटॅमिन नष्ट होत नाही. आयुर्वेदाने आवळ्याचे गुणधर्म याप्रमाणे सांगितले आहेत,

आमलकं कषायाम्लं मधुरं शिशिरं लघु ।
दाहपित्तवमीमेह शोफघ्नं च रसायनम्‌ ।।...राजनिघण्टु
श्रम-वमन-विबन्धाध्मान-विष्टम्भ-दोषप्रशमनम्‌ अमृताभं चामलक्‍याः फलं स्यात्‌ ।। ...राजनिघण्टु 


आवळा तुरट, आंबट व गोड असतो; शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा दिलेली आढळते.

याशिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो. आवळ्याचे फळ तर मुख्यत्वे औषधात वापरले जातेच, पण आवळ्याच्या बिया, सालसुद्धा औषधी गुणांच्या असतात.

आवळा रसायन गुणाचा आणि तारुण्य टिकवून ठेवणाऱ्या द्रव्यांमध्ये श्रेष्ठ समजला जात असल्याने बहुतेक सर्व रसायनांमध्ये असतोच. च्यवनप्राश, ब्राह्मरसायन, आमलकावलेह, धात्री रसायन वगैरे रसायनांमध्ये आवळा हाच मुख्य घटक असतो.

कसा वापराल? 
आवळा असंख्य प्रकारांनी वापरला जातो. त्यातले सर्वांत महत्त्वाचे व अनुभवाचे काही उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील.
पित्तशामक - उष्णता कमी करण्यासाठी आवळा उत्तम असतो.
पित्तामुळे उलट्या होत असल्यास आवळ्याचे पाव चमचा चूर्ण चंदन उगाळून बनविलेल्या गंधात मिसळून थोडे थोडे चाटल्याने बरे वाटते.
डोळ्यांची आग होत असल्यास पाच - सहा तास पाण्यात भिजवलेली आवळकाठी आणि तीळ बारीक वाटून त्याचा लेप बंद डोळ्यांवर करण्याचा फायदा होतो.
पोटात, छातीत, घशात पित्तामुळे जळजळत असेल तर पाव चमचा आवळ्याचे चूर्ण, त्यात अर्धा चमचा साखर व एक चमचा घरी बनविलेले साजूक तूप यांचे मिश्रण थोडे थोडे घेता येते.
नाकातून रक्‍त येत असल्यास आवळ्याच्या चूर्णाचा पाण्यात केलेला लेप टाळूवर करण्याने रक्‍त येणे थांबते.
आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ताजे आवळे मिळणाऱ्या दिवसात रोज एका आवळ्याचा रस, त्यात खडीसाखर व जिऱ्याची पूड टाकून तयार केलेले मिश्रण घ्यावे. याने फार चांगला गुण येतो.

रसायन, वयःस्थापन 
आवळा, गोखरू आणि गुळवेल यांचे समभाग चूर्ण तूप-साखरेसह घेण्याने धातुवृद्धी होते, शक्‍ती वाढते. थकवा दूर होण्यास मदत मिळते.
आवळ्याचा ताजा रस व तूप यांचे मिश्रण घेण्याने वीर्यवृद्धी होते.

आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्याच रसाच्या अनेक भावना देऊन तयार झालेले चूर्ण, साखर, मध व तूप यांचे मिश्रण सेवन केल्यास वय वाढले तरी म्हातारपणामुळे होणारे त्रास होत नाहीत असे सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेले आहे.

तारुण्य टिकून राहण्याच्या दृष्टीने जी अभ्यंगतेले सांगितलेली आहेत, त्यात आवळा असतोच.

रक्‍तशुद्धी, कांतिवर्धन 

आवळ्याचे चूर्ण उटण्याप्रमाणे वापरण्याने त्वचा स्वच्छ तर होतेच, पण सुरकुत्या पडत नाहीत, कांती उत्तम राहते, काळसरपणा दूर होतो.
त्वचेवर खरूज होते, त्यावर आवळकाठी जाळून तयार झालेली राख तिळाच्या तेलात मिसळून लावण्याचा उपयोग होतो.

स्त्रीरोग 

आवळ्याच्या बिया पाण्यात वाटून त्यात साखर व मध घालून तीन दिवस घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून जाणे थांबते.

आवळ्याच्या बिया (बियांचे कडक कवच फोडल्यावर निघणाऱ्या आतील छोट्या बिया) मात्र या बिया मदकारक असल्याने त्यांची मात्रा वैद्यांच्या सल्ल्याने ठरविणे चांगले.
अंगावरून पांढरे जात असताना आवळा व हळद यांच्या काढ्याने योनीभाग धुण्याचा उपयोग होतो.
पित्त वाढल्यामुळे पाळीच्या दिवसात अतिरक्‍तस्राव होत असल्यास आवळ्याच्या रसात खडीसाखर टाकून घेण्याचा उपयोग होतो.
योनीच्या ठिकाणी जळत असल्यासही आवळ्याचा रस साखर टाकून घेण्याचा उपयोग होतो.

प्रमेह, ताप वगैरे विकारांवर 

एक किंवा दोन ताज्या आवळ्याचा रस, पाव चमचा हळद पूड, अर्धा चमचा मध यांचे मिश्रण घेणे प्रमेहामध्ये हितकर असते. यामुळे लघवी साफ होण्यासही मदत मिळते.
शीतल वीर्यामुळे आवळा तापातही हितकर असतो. विशेषतः पित्तामुळे आलेल्या तापात आवळ्याच्या काढ्यात साखर व मध टाकून घेण्याने बरे वाटते.
जीर्ण ज्वरामध्ये म्हणजे अंगात मुरलेल्या तापावर आवळ्याने सिद्ध केलेले तूप घेण्याचा उपयोग होतो.

-----------------------------------------------
असा करा मोरावळा 
कार्तिक, मार्गशीर्ष वगैरे महिन्यांमध्ये ताजा आवळा सहज उपलब्ध असतो. वर्षभर वापरता यावा यासाठी आवळ्याचा मोरावळा करून ठेवण्याची पद्धत आहे. मोरावळा अनेक प्रकारांनी करता येतो, मात्र त्यातल्या त्यात सोपी व सर्वांना जमेल अशी पद्धत याप्रमाणे होय.

ताजे आवळे स्वच्छ धुवून कोरडे करावेत. त्यांना टोचणीच्या साहाय्याने बीपर्यंत टोचावे. उकळत्या पाण्यात टाकून थोडे शिजवावेत. बाहेर काढून सुती कापडाने पुसून कोरडे करावेत. साखर किंवा खडीसाखरेच्या चार तारी पाकात आवळे बुडवून ठेवावेत. असा हा मोरावळा वर्षभर खाता येतो आणि दोन - तीन वर्षेदेखील चांगला टिकतो.

आवळ्याच्या पाचक, रुचिवर्धक वड्यासुद्धा करून ठेवता येतात. आवळे उकडून त्यांचा गर वाटून घ्यावा. त्यात जिरे, मिरे, धणे, सुंठ, दालचिनी, सैंधव यांचे चूर्ण मिसळावे. याच्या वड्या करून उन्हात वाळवाव्या. जेवणाच्या आधी अशी वडी खाण्याने भूक लागते, रुची वाढते तसेच अन्न पचण्यासही मदत मिळते. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

आवळी पूजन-भोजन


आवळी पूजन-भोजन
डॉ. श्री बालाजी तांबे
आवळ्याच्या वृक्षाच्या छायेपासून ते आवळ्याचे फळाचे अगणित उपयोग असल्याने त्याला "अमृतफळ' म्हणायला हरकत नाही. आवळा हे फळ दुर्लक्षिले जाऊ नये, या हेतूने व आवळ्याच्या फळात व वृक्षात असलेल्या जाणिवेशी संपर्क वाढविण्याच्या हेतूने योजलेले असते आवळीपूजन व आवळीभोजन. साधारणतः आवळीपूजन पुरुष करत असले, तरी आवळ्याच्या झाडाच्या परिसरात काही वेळ घालवणे, भोजन करणे, खेळ खेळणे हा विषय स्त्रियांचा व मुलांचा असलेला दिसतो. तेव्हा आवळीच्या झाडाभोवती असलेले वातावरण व त्यातून बाहेर पडणारी तरंगशक्‍ती यांचा लाभ घेण्याच्या निमित्ताने आवळ्याच्या झाडाचे वर्षभर संवर्धन केले जाते. 

हेमंत ऋतूत ऋतुबदलाचा व ऋतुमानाचा अधिकाधिक फायदा घेता यावा, या दृष्टीने आवळ्याच्या झाडाची पूजा, आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसणे, तेथे भोजन करणे असे संस्कार भारतीय परंपरेत असलेले दिसतात. साधारणतः आवळीपूजन पुरुष करत असले, तरी आवळ्याच्या झाडाच्या परिसरात काही वेळ घालवणे, भोजन करणे, खेळ खेळणे हा विषय स्त्रियांचा व मुलांचा असलेला दिसतो. तेव्हा आवळीच्या झाडाभोवती असलेले वातावरण व त्यातून बाहेर पडणारी तरंगशक्‍ती यांचा लाभ घेण्याच्या निमित्ताने आवळ्याच्या झाडाचे वर्षभर संवर्धन केले जाते. आवळ्याचे रसायन म्हणून असलेले माहात्म्य सर्वांच्या कायम लक्षात राहावे, हाही आवळीपूजनाचा हेतू.

घराजवळ लावाव्या अशा ज्या वनस्पती भारतीय आयुर्वेद शास्त्रात सांगितल्या आहेत त्यात आवळ्याचे स्थान वरचढ आहे. जवळजवळ सर्व रोग बरे करण्यासाठी सुंठीचा उपयोग होत असतो, लिंबू सर्व प्रकारच्या भौतिक, मानसिक, आध्यात्मिक असंतुलनावरचा उपाय आहे. अनेक तक्रारींवर उपयोगी ठरणारे त्रिफळा चूर्णाचे घटक असणारे आवळा, हिरडा व बेहडा हे वृक्ष खूप महत्त्वाचे आहेत. आमलकी रसायन, च्यवनप्राश, आवळा खाणे, आवळ्याचा रस घेणे, आवळा चूर्ण सेवन करणे अशा अनेक प्रकारे आवळ्याचे सेवन करता येते. आवळा हा सर्वांना परवडणारा व रसायन गुणाने अत्युत्तम, आयुष्यवृद्धी करणारा, अमृतासमान असणारा आहे.

हेमंत ऋतूत रसायनाचे सर्वांत अधिक महत्त्व असते. रसायनात सर्वोत्तम, वर्षभर टिकणारे, कायम सेवन करता येणारे, आबालवृद्धांना उपयोगी पडणारे रसायन म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राशात बनविताना इतर 30 ते 35 वनस्पती आवश्‍यक असल्या तरी आवळा हा च्यवनप्राशातील मुख्य घटक आहे. च्यवनप्राश बनविताना विशिष्ट वनस्पतींचा काढा करताना त्यात आवळे शिजवून घेतले जातात. आवळे शिजताना फुटून जाऊन वनस्पतींमध्ये मिसळून जाऊ नयेत म्हणून ते चाळणीत ठेवून किंवा पोटलीत बांधून शिजवणे आवश्‍यक असते. त्यानंतर आवळ्यातील बिया व रेषा (धागे) काढून टाकून आवळ्याचा मऊ व सुंदर असा गर लेह रूपाने सुटा केला जातो. आवळे ज्या वनस्पतींच्या काढ्यात शिजवले तो काढा एकचतुर्थांश झाल्यानंतर काढा गाळून घेऊन वनस्पती टाकून दिल्या जातात. काढा मंद आचेवर आटवला जातो. काढा चाटणासारख्या अवस्थेत आला की त्यात खडीसाखरेचा पाक, तेला-तुपावर परतलेला आवळ्याचा गर टाकला जातो. हे मिश्रण शिजवले की च्यवनप्राशाची प्राथमिक अवस्था तयार होते. या रसायनात नंतर सुंठ, मिरी, पिंपळी वगैरे द्रव्ये टाकली जातात. शेवटी मध मिसळला की च्यवनप्राश तयार होतो. या च्यवनप्राशात वीर्यवर्धन करणारी इतर द्रव्ये, सोन्या-चांदीची भस्मे वा वर्ख टाकून त्याची ताकद वाढवली जाते. आवळ्याबरोबर दुसरे कुठले तरी फळ मिसळणे, स्वस्तात मिळालेल्या चार-पाच वनस्पतींचे चूर्ण साखरेच्या पाकात टाकून बनविलेला च्यवनप्राशसदृश पदार्थामुळे कुठलाच फायदा होऊ शकत नाही. योग्य विधीने बनविलेल्या च्यवनप्राश सेवन केल्याने मेंदूने दिलेल्या संवेदना इंद्रियांपर्यंत पोचवणे ही क्रिया योग्य रीतीने घडते, मेरुदंडाचे स्वास्थ्य, लहान व मोठ्या मेंदूचे आरोग्य सांभाळले जाते, मनुष्याला तारुण्यशक्‍ती, बुद्धी, मेधा यांचा लाभ होतो.

आवळे चोचवून साखरेत ठेवून केलेला मोरावळा उत्तम औषधी असतो. चांगले आवळे वाळवून केलेले चूर्ण शिकेकाईमध्ये मिसळून केस धुणे केसांना हितकर असते. आवळ्याचे चूर्ण सेवन करण्याचेही अनेक लाभ होतात. हे सर्व आवळ्याचे उपयोग लक्षात घेतले तर आपल्या परंपरेत ठेवलेले आवळीपूजन किती आवश्‍यक आहे याची कल्पना येऊ शकेल.

एकूण आवळ्याच्या वृक्षाच्या छायेपासून ते आवळ्याचे फळाचे अगणित उपयोग असल्याने त्याला "अमृतफळ' म्हणायला हरकत नाही. आवळा हे फळ दुर्लक्षिले जाऊ नये या हेतूने व आवळ्याच्या फळात व वृक्षात असलेल्या जाणिवेशी संपर्क वाढविण्याच्या हेतूने योजलेले असते आवळीपूजन व आवळीभोजन.

www.balajitambe.com


Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

लग्न तुळशीचे


लग्न तुळशीचे
डॉ. श्री बालाजी तांबे
विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. संस्कारांची व्यवस्थित जाणीव व्हावी आणि तुळशीपासूनचे आरोग्याचे फायदेही मिळावेत, या हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला. तुळशीचे लग्न ही संकल्पना राबवून भारतीय संस्कृतीने खरोखरच लोककल्याण व आरोग्यशास्त्र यात आपले श्रेष्ठत्व अबाधित राखले आहे. 
आश्‍विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. उत्तम संतानप्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी. उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नये, यासाठी संस्कारांचा बराच भर दिलेला दिसतो. या सर्वांची व्यवस्थित जाणीव व्हावी अशा हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला.

प्रत्येक अणुरेणूत असलेली आदिशक्‍ती जागृत होण्याच्या दृष्टीने साध्या कृष्णमूर्तीत वा शालिग्राम शिळेत असलेले देवत्व व शक्‍ती प्रकट करण्यासाठी विविध वनस्पतींचा, तुळशीच्या झाडाचा उपयोग करून घेतला जातो. पुरुषाची व स्त्रीची कर्तृत्वशक्‍ती व असलेली सुप्त आत्मशक्‍ती दोघांच्या मिलनात एकमेकांना पूरक ठरून जागृत व्हावी असे सांगणारा हा तुळशीविवाहाचा उत्सव.

त्यामागची कथा अशी. वृंदा नावाच्या एका स्त्रीला श्रीकृष्णांशी लग्न करायचे होते, पण ती विवाहित होती. ""कलियुगात तू तुळशीच्या रूपात प्रकट होशील, तेव्हा तुझे माझ्याशी लग्न होईल,'' असा श्रीकृष्णांनी तिला वर दिला. म्हणून कार्तिक महिन्यात एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत श्रीकृष्ण व तुळस यांचे लग्न लावण्याची पद्धत रूढ आहे.

कन्यादानाचे पुण्य ही कथा हा विषय सविस्तर समजावत असली तरी आता पावसाचा मंदाग्नीचा ऋतू संपून शरदाच्या व हेमंताच्या आगमनाबरोबर स्त्री-पुरुषांच्या मिलनासाठी उत्तम काळ असल्याची सूचना हा उत्सव देतो. त्यातून पुढे अत्यंत नैसर्गिक पद्धतीने आरोग्यवान संतती प्राप्त होऊ शकेल, ही सूचनाही देतो. गर्भसंस्कारांना भारतीय परंपरेने, भारतीय आरोग्यशास्त्राने किंवा वेदासारख्या भारतीय जीवनशास्त्रांनी किती महत्त्व दिलेले आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच.

कन्यादानाचे पुण्य मोठे असते व देणाऱ्याचा हात वर असतो, हे लक्षात घेतले तर स्त्रीचे महत्त्व किती जास्त आहे हे भारतीय परंपरेतील लग्नामुळे समजते. तसेच त्या निमित्ताने सर्व उत्सवांमध्ये हा एक मोठा प्रसंग प्रत्येकाला करता यावा म्हणून ज्यांना आपल्या घरात लग्नविधी करण्याचा योग नसेल त्यांच्यासाठी तुळशीचे लग्न करण्याची अमूल्य संधी असते.

सर्व व्हायरस, दुष्ट शक्‍ती, विषारी वायू, संकटे यांना बाहेर थोपवून धरणारी तुळस प्रत्येक भारतीयाच्या दारात उभी असते. शिवाय सर्दी, पडसे, ताप अशा बारीकसारीक तक्रारींवर उपयोगी पडणारी तुळस बहुमूल्य असून, ती पूजनीय ठरते. स्त्रियांच्या हॉर्मोनल संस्थेवर काम करत असल्याने तुळशीचे महत्त्व त्यांच्या लेखी अधिकच असते. त्यांना या वनस्पतीच्या सहवासाचा अधिक फायदा व अधिक परिणाम होत असावा असे वाटते.
मोठ्या चौसोपी वाड्यात मागच्या-पुढच्या अंगणात तुळशीवृंदावन असणे हे सौंदर्याचे व मांगल्याचे प्रतीक असते. पण दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्यांसाठीसुद्धा दारासमोर छोट्या शिंकाळ्यात तरी तुळस लावलेली असते. साधारणतः तुळशीवर आम जनता प्रेम करताना दिसते.

तुळशीपत्राचे महत्त्व 

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठीची तुळशीचे उपयोग सर्वज्ञात आहेत. त्या दृष्टीनेही दारात-अंगणात तुळशीचे झाड असणे महत्त्वाचे ठरते. अन्नावर तुळशीचे पान ठेवण्याने त्या ठिकाणी दुष्ट शक्‍तींचे तरंग व जीवजंतू येत नाहीत. म्हणून प्रसादावर तुळशीचे पान ठेवले जाते. दान देताना वर तुळशीपत्र ठेवण्याची पद्धत त्यातूनच रूढ झालेली आहे. एखादी व्यक्‍ती सर्व सोडून जेव्हा जाते तेव्हा त्या व्यक्‍तीने सर्व संपत्तीवर तुळशीपत्र ठेवले असे म्हटले जाते. याच्या मागे दुसरेही एक कारण असे, की श्रीकृष्णांची सुवर्ण व रत्न यांच्या वजनाने तूला करत असताना तुळशीच्या पानाचे महत्त्व संपत्तीपेक्षा अधिक असते, हे सिद्ध झाले. विष्णू ही देवता शरीरातील चेतासंस्थेशी संबंधित असते आणि म्हणूनच तुळशी विष्णूला व श्रीकृष्णांना प्रिय समजली जाते. तुळशीचे लग्न ही संकल्पना राबवून भारतीय संस्कृतीने खरोखरच लोककल्याण व आरोग्यशास्त्र यात आपले श्रेष्ठत्व अबाधित राखले आहे. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

ad