Showing posts with label पाठ. Show all posts
Showing posts with label पाठ. Show all posts

Wednesday, March 19, 2014

पाठदुखीमुळे मन अस्वस्थ होते, जीव त्रस्त होतो. एवढेच नव्हे, तर इंद्रियांना काम करण्यासाठी संवेदना व शक्‍ती पूर्ण न मिळाल्यामुळे जीवन यशस्वी करण्यास अडचण येऊ शकते. शरीरात घडणाऱ्या सर्व घटना, शरीराने केलेल्या सर्व हालचाली, इंद्रिये करतात ते सर्व काम मुख्यतः पाठीलाच करावे लागते. त्यामुळेच काही चांगले काम केले की शाबासकी मिळते ती पाठीलाच.

काही चांगले काम केले की पाठ थोपटायची पद्धत असते; तसेच आत्मीयतेची, मित्रत्वाची थापही पाठीवरच असते. हात, पाय, तोंड वगैरे अवयव काम करतात; पण केलेल्या कामाची शाबासकी मात्र मिळते पाठीला. असे का असावे? याचे साधे, सोपे कारण असे आहे, की शरीरात घडणाऱ्या सर्व घटना, शरीराने केलेल्या सर्व हालचाली, इंद्रिये करतात ते सर्व काम मुख्यतः पाठीलाच करावे लागते. पाठीवरच्या थापेमुळे पाठीतील ताणाला व दुखण्याला बरे वाटते. पाठ म्हणजे मुख्यतः मेरुदंड. शरीरात अनेक अंतरेंद्रिये व बहिरेंद्रिये काम करत असतात; परंतु पाठीच्या आता असलेल्या मज्जारज्जूचे संरक्षण करण्यासाठी जेवढी काळजी घेतलेली दिसते, त्याभोवती जेवढे मजबूत कवच दिलेले दिसते, तेवढे संरक्षण शरीरातील कुठल्याही अवयवाला दिलेले दिसत नाही. मज्जारज्जूचे संरक्षण करणाऱ्या मेरुदंडाची रचना खूप गुंतागुंतीची असते. शरीर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, मागे, पुढे कुठेही वाकवावे लागते त्यामुळे मेरुदंडाची विशेष रचना केलेली दिसते. जिला 24 बाय 365 नव्हे तर 24 बाय 36500 दिवस (100 वर्षांच्या आयुष्यात 24 तास) काम करावे लागते ती आहे पाठ व मज्जारज्जू. शरीराच्या सर्व तऱ्हेच्या हालचाली, मग त्या स्वेच्छेने असोत, अजाणतेपणी केलेल्या असोत किंवा रिफ्लेक्‍स म्हणून झालेल्या असोत; त्या सर्व मज्जारज्जूंच्या मार्फत चालतात. आरोग्यशास्त्रात ज्याला इफरंट व एफरंट संवेदना (मेंदूकडून येणाऱ्या व मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना) त्या सर्व मज्जारज्जूच्या मार्फत चालू असतात. मेरुदंडामध्ये रज्जू असते व त्यात विशिष्ट द्रवही असतो, जो मेंदूत असलेल्या द्रवाशी जोडलेला असतो. काही काम या द्रवात असलेल्या विशेष गुणामुळे होते व काही काम मज्जातंतूंमार्फत मज्जारज्जूतून होऊ शकते. उजव्या हाताचे पहिले बोट उंच करावे असा विचार बोटापर्यंत पोचवून ते हलवायला लागणारी शक्‍ती पुरविण्याचे काम, तसेच बोट किती उंच करायचे, किती वाकवायचे, हे सर्व कार्य मज्जारज्जूमार्फत चालते. तसेच कुठेतरी पायावर मुंगी चढली तर येणारी संवेदना मेंदूला कळविण्याचे कामही मज्जारज्जूमार्फतच चालते.

मज्जारज्जूवर ताण नको
मेरुदंड वर किंवा खाली पक्का बांधलेला नसतो. तर तो वर व खाली अशा दोन्ही बाजूंना लटकल्यासारखा असतो. मांस, मज्जा यांच्या साह्याने त्याला जागेवर ठेवलेले असते. ज्याच्या आत मज्जारज्जू असतो, तो मेरुदंड हाडांनी बनलेला असल्याने वजनदार असतो. मनुष्य काम करत असताना, उभे असताना, बसलेला असताना मेरुदंड खालच्या बाजूला सरकण्याची शक्‍यता असते. म्हणून वयानुसार मानेची लांबी कमी होऊन डोके खांद्याकडे टेकायला सुरुवात होते, मेरुदंड खाली उतरायला लागतो. उतरलेला मेरुदंड नुसतीच मनुष्याची उंची कमी करतो असे नव्हे, तर मेरुदंडातून निघणारी नस दबली गेल्यामुळे हातापायांना मुंग्या येणे, बधिरता येणे वगैरे त्रास होऊ शकतात. योगशास्त्रातील षट्‌चक्रे वैश्‍विक शक्‍ती व शरीरातील शक्‍ती, तसेच प्राणशक्‍ती, विचारांतील शक्‍ती, इच्छाशक्‍ती अशा शक्‍तीच्या अनेक स्पंदनांना एकमेकांशी पाहिजे तेव्हा संपर्क ठेवून किंवा संपर्क न ठेवता आपापल्या मार्गाने जाण्यासाठी केलेली व्यवस्था असते. हेसुद्धा सगळे मज्जारज्जूशीच जोडलेले असते.

एकूण काय, तर मज्जारज्जूवर एकूण खूप ताण असतो. मज्जारज्जूवर ताण आला तर पाठीचे स्नायू ताणले जातील, यात काही संशय नाही. त्यामुळे मानेचे, खांद्याचे, कंबरेचे स्नायू दुखतात, असा अनेकांचा अनुभव असतो. सतत चालणाऱ्या चलनवलनामुळे वातवृद्धी होते. सरळ न बसणे, काम करताना मेरुदंडाला त्याच्या मूळ आकारात न ठेवता काम करणे, गुडघ्यात न वाकता कंबरेत वाकून वजन उचलणे, खुर्चीवर वेडेवाकडे बसणे, खुर्चीच्या खाली पाय घालून उगाचच हलवत बसणे अशा तऱ्हेच्या चुकीच्या वागण्यामुळेही मज्जारज्जूवर ताण येऊन पाठदुखीची सुरवात होते.

सूर्यनमस्कार हा उत्तम उपाय
सूर्यनमस्कारासारखी आसने करणे, प्राणायामाने नाडीशुद्धी करणे, प्रकृतीला अनुकूल व सात्त्विक आहाराचे सेवन करून शरीराच्या सर्व स्नायूंमधील वात-पित्त कमी ठेवणे, योग्य वेळेस पोट साफ ठेवणे, पोटाचा घेर वाढू न देणे, कंबरेपासून मानेपर्यंत तेल लावून अभ्यंग करणे (कुंडलिनी तेल) वगैरे उपचारांद्व्रारा पाठीच्या दुखण्यावर इलाज करावा लागतो.

मेरुदंडाची वा मणक्‍याची झीज झाल्यासही मज्जारज्जूवर ताण येण्याची शक्‍यता असते, त्यामुळेही पाठदुखी होऊ शकते. अपचनामुळे झालेल्या पोटातील वायूमुळे पाठ दुखू शकते. गरोदरपणात पोटाचे वजन पुढच्या बाजूला वाढल्यामुळे मेरुदंडावर बाक आल्याने पाठ दुखू शकते. तेव्हा पाठदुखीचे कारण शोधून काढून इलाज करावा लागतो.

पाठदुखीमुळे मन अस्वस्थ होते, जीव त्रस्त होतो. एवढेच नव्हे, तर इंद्रियांना काम करण्यासाठी संवेदना व शक्‍ती पूर्ण न मिळाल्यामुळे जीवन यशस्वी करण्यास अडचण येऊ शकते. म्हणून महत्त्व आहे मेरुदंडाचे, पाठीचे तसेच पाठीच्या आरोग्याचे.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Friday, January 22, 2010

पाठ दुखणे

पाठीच्या आजारात पाठ दुखणे सहज समजू शकते; परंतु शरीराच्या अन्य भागांतील आजारांमुळे व अनेकदा मानसिक अस्वास्थ्यानेदेखील पाठ दुखते.

पाठ दुखण्याचा अनुभव नसणारी व्यक्ती विरळाच असेल. पाठ दुखण्याची कारणे बरीच असू शकतात. पाठीच्या आजारात पाठ दुखणे सहज समजू शकते; परंतु, शरीराच्या अन्य भागातील आजारांमुळे व अनेकदा मानसिक अस्वास्थ्यानेदेखील पाठ दुखते.

रुग्णाच्या तक्रारी लक्ष देऊन ऐकणे व काळजीपूर्वक शरीर तपासणे, याला पर्याय नसतो. केवळ तपासण्या करून पाठदुखीचे कारण शोधता येत नाही. कारण न समजता केलेले उपाय केवळ वाया जातात एवढेच नाही, महत्त्वाचा वेळ वाया जातो. या वेळात मूळ आजार वाढत जातो आणि नको असणाऱ्या उपचारांचे अपाय होतात. अनावश्‍यक तपासण्यांचे खर्चही होतात, ते वेगळेच. सर्वप्रथम रुग्णाची सर्वसाधारण प्रकृती कशी आहे, हे समजणे आवश्‍यक आहे. रुग्णाचे वजन कमी होत चालले आहे का, रुग्णाला ताप येतो आहे का, रात्री घाम सुटतो का, हे समजून घ्यावे. ही लक्षणे क्षयरोगाची (Tuberculosis) असू शकतात. पाठ एकाच ठिकाणी सतत दुखत राहणे, हे लक्षण पाठीच्या मणक्‍यातील विकाराचे असते. (हाडांचा क्षयरोग अथवा कर्करोग).

रुग्णाला विशेषतः पुरुषांना लघवी करताना काही त्रास होत आहे का, हे विचारले गेलेच पाहिजे. 55 वर्षांपुढील पुरुषांना आयुष्यात प्रथम पाठदुखी सुरू झाली, दोन-तीन आठवडे टिकली, तर पुरस्त ग्रंथी (Prostates) चा कर्करोग असण्याची शक्‍यता मोठी असते. दोन मणक्‍यांतील चकत्यांचे आजार सहसा लहान वयात सुरू होतात. पुढे ते वाढतात व कमरेपासून घोट्यापर्यंत दुखणे (सायाटिका) सुरू होते. 60 वर्षांनंतरच्या स्त्रियांमध्ये हाडे पोकळ होण्याचा विकार अनेकांना होतो. अशी पोकळ हाडे क्षुल्लक कारणांनी मोडतात. एका सर्वेक्षणानुसार भारतात 60 वर्षांनंतर प्रत्येक तीन स्त्रियांत एका स्त्रीचे हाड या कारणाने (ऑस्टियोपोरोसिस osteoporosis) मोडते.

मनगटाजवळ, खुब्यात आणि पाठीच्या मणक्‍यात असा हाड मोडण्याचा संभव मोठा असतो. पाठीच्या मणक्‍याचे हाड मोडल्यानंतर मणका पिचतो व पाठीला बाक येतो (कुबडेपण). पाठीच्या कण्यात झालेल्या कोणत्याही आजाराने पाठीच्या मणक्‍याची हालचाल मोकळी होऊ शकत नाही. पुढे किंवा मागे वाकणे, उभ्याने पाठ फिरवून मान व खांदे फिरविणे कठीण होते. पाठीच्या कण्याच्या काही आजारांत पाठीची कोणतीच हालचाल होत नाही. आपल्या श्‍वसनाच्या क्रियेत फासळ्यांची हालचाल महत्त्वाची असते. पाठीच्या कण्याच्या आजारांत (अँकिलोझिंग स्पॉंडिलायटिस Ankylosing spondylitis) पाठीच्या कण्यावर टेकलेल्या फासळ्या हलू शकत नाहीत. अशा व्यक्तींनी दीर्घ श्‍वास घेतला तरी छाती फारशी फुगत नाही. चांगल्या प्रकृतीतील व्यक्तीची छाती किमान पाच सेंटिमीटर्स फुगावी. अँकिलोझिंग स्पॉंडिलायटिसच्या रुग्णाची एक सेंटिमीटरसुद्धा छाती फुगत नाही. या साध्या तपासणीने निदान करता येते. हातापायांच्या शिरांच्या तपासणीतून मज्जारज्जूतून पायात जाणाऱ्या शिरांवर दाब येत असल्याचे सहज कळू शकते.

जेव्हा रुग्णांच्या तक्रारी समजून व शरीराची काळजीपूर्वक तपासणी करून आजार कोठे असेल, याचा अंदाज बांधला जातो, तेव्हा पुढच्या तपासण्यांची योजना आखता येते. साध्या रक्त-लघवी-क्ष-किरणाचे फोटो इथपासून विविध प्रकारचे स्कॅन्स व बायॉप्सीपर्यंत (तुकडा काढून तपासणी) तपासण्या करता येतात.

कोणती तपासणी आवश्‍यक आहे, हे आपले डॉक्‍टर ठरवू शकतात. ज्या तपासण्या आवश्‍यक असतात, त्यांना पर्याय नसतो. कधी कधी सुरवातीच्या काळात क्ष-किरणांनी काढलेल्या फोटोत आजार दिसत नाही. मग काही दिवसांनी परत काढलेल्या फोटोत दिसतो. कोणता तपास केव्हा करावा, हे त्या विषयातील ज्ञान व अनुभव असणारी व्यक्तीच ठरवू शकते.

पाठीच्या कण्याचे आजार प्रथम शोधावे लागतात. ते नसल्यास शरीराच्या इतर भागांतील दोष पाहावे लागतात. हृदयविकारात कधी कधी छातीत दुखण्याबरोबर किंवा ऐवजी पाठीत दुखते व रुग्णाचा गैरसमज होतो. अन्ननलिकेच्या व महारोहिणीच्या आजारातदेखील पाठ दुखते. पोटात असणाऱ्या स्वादुपिंडांच्या आजारांत सुरवात पाठ दुखण्याने होते. स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या आजारात कंबर दुखण्याचे प्रमाण मोठे असते. अशा सर्व आजारांत पाठीच्या कण्याच्या हालचाली मोकळ्या होत असतात. त्यामुळे शारीरिक तपासणीत या आजारांचा संशय येतो.

दीर्घ काळ पाठ दुखण्यामागे मानसिक कारणे असू शकतात. तथापि, शरीरात एकाच ठिकाणी वेदना होत राहणे, हे सहसा मानसिक नसते. सोमॅटायझेशन (कनव्हर्जन, हिस्टेरिया) अशा आजारांत आंधळेपण, अंगावरून वारे जाणे, फिट्‌स येणे असे त्रास जास्त प्रमाणात होतात. कोणताही आजार मानसिक आहे, हे ठरविणे मानसविकारतज्ज्ञ (सायकियाट्रिस्ट) यांचे काम असते. शारीरिक आजार आपल्याला सापडला नाही म्हणून रुग्णाचा आजार मानसिक आहे, असे समजण्याची चूक अनेकदा होऊ शकते. एकाच जागी सातत्याने होणारी वेदना मानसिक असण्याची शक्‍यता नसते, हे ध्यानात ठेवले पाहिजे.

पाठदुखीचे सर्वांत महत्त्वाचे कारण, पाठीच्या स्नायूंचा थकवा, हे असते. नियमाने पाठीचे व्यायाम करावेत. बसताना पाठ सरळ ठेवून बसावे. पोक काढून बसणे किंवा उभे राहणे या सवयी कटाक्षाने सोडाव्यात. हे अशा पाठदुखीवर प्रभावी उपचार होत.Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad