Showing posts with label महावीर्य. Show all posts
Showing posts with label महावीर्य. Show all posts

Sunday, July 22, 2018

आरोग्यसंपदा : औषधी औदुंबर


औदुंबर वृक्ष दत्तगुरूला भारी प्रिय… पण त्याबरोबरच उंबराच्या झाडाचे इतरही अनेक उपयोग आहेत.
दत्तगुरू ज्या वृक्षाखाली असतात अशी भावना असलेला वृक्ष म्हणजे औदुंबर… उंबर… उंबराची फळं उपयुक्त असतातच, पण उंबराच्या वृक्षाची लाकडे यज्ञासाठी वापरली जातात. त्याव्यतिरिक्त हा वृक्ष कुणी तोडत नाही. कच्ची उंबरे हिरव्या रंगाची तर पिकल्यावर लाल, गुलाबी रंगाची बनतात. मार्च ते जूनदरम्यान फळं येतात. उंबराच्या जवळ जर विहीर खोदली तर भरपूर पाणी लागते. त्याची फळे भरपूर मिळतात, परंतु उंबराला फुले मात्र दिसत नाहीत.
उपचारासाठी उंबराची साल, पाने, मुळं तसेच त्यातून निघणारा दुधासारखा पांढरा द्रव या सगळ्याचा उपयोग केला जातो. उंबराचे फळ चवीला तुरट असते, पण शरीरातील कफ व पित्तदोषांचे हे संतुलन ठेवते. सूज कमी करणारा, वेदनाशामक, पचायला जरा जड. तात्पर्य पोटातील अग्नी विझविणारा तसेच असह्य वेदना कमी करणारा म्हणून हा प्रसिद्ध आहे. आगीत होरपळल्यावर जळलेल्या त्कचेकर याच्या सालीचा लेप लावल्यास वेदना हमखास कमी होतात.
अनेक विकारांवर गुणकारी
उंबराचा पांढरा द्रवही शरीरातून बाहेर पडणाऱया अनेक स्रावांना रोखतो. जसे रक्त, मल-मूत्र आदी. याच्या फळांचे सेवन केल्याने पुरुषाचे वीर्य व शक्ती वाढते. तसेच मन सदैव प्रसन्न राहते. फोडं-मुरुमावर याचा रस लावल्यास ते लवकर पिकतात. याच्या मुळांचा रस शरीराची आग शांत करतो. रक्तस्राव रोखणारा तसेच नियमित सेवन केल्यास क्षयरोग व मधुमेह सामान्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.
उंबराचे असेही उपयोग
> नाकातून रक्त येत असेल तर उंबराच्या पिकलेल्या फळाचा रस त्यात गूळ वा मध घालून प्यावा. हाच उपाय मासिक पाळीत अधिक रक्तस्राव असल्यासही हेच प्रमाण घ्याके.
> ग्रीष्म ऋतूतील गरमी किंवा आग उत्पन्न करणारे विकार तसेच देवीच्या आजारासारख्या विकारात फोड आल्यावर पिकलेल्या फळाचा रस त्यात साखर टाकून तयार केलेलं सरबत प्यावे.
> मधुमेह झाल्यास उंबराच्या कोवळ्या पानांचा रस त्यात २० मिली. मध घालून प्रत्येक दिवशी २-३ वेळा प्यायल्याने वारंवार लघवीला जावे लागत नाही. तसेच लघवीतील साखरेचे प्रमाण सामान्य होण्यास मदत होते.
> जिभेला फोडं येणे, चट्टे पडणे, हिरडय़ांतून रक्त वाहणे, दातदुखी, दात हलणे या विकारांवर याची साल किंवा पानांचा काढा तयार करून तो तोंडात ठेवावा.
डोळ्यांची होणारी जळजळ थांबवतो
> उंबराचा आणखी एक चांगला उपयोग म्हणजे हातापायांची त्वचा फाटल्यास किंवा पायांच्या तळव्यांना कात्रे पडल्यास होणाऱया वेदना कमी करण्यासाठी उंबराच्या पांढऱया द्रव्याचा लेप लावल्याने जखम भरून सामान्य होण्यास मदत होते. डोळे लाल होणे, पाणी येणे, डोळ्यांची जळजळ आदी लक्षणं उत्पन्न झाल्यास उंबराच्या पानांचा काढा करून स्वच्छ कपडय़ाने गाळून घ्यावा व थंड झाल्यावर डोळ्यांत त्याचे२-२ थेंब दिवसातून ४ वेळा टाकावे. नेत्रज्योती तेज होते.
> त्वचाविकारात त्वचेचा रंग बिघडला तर उंबराच्या फांदीला येणारे कोंब वाटून तो लेप त्वचेला लावावा. उंबराची पिकलेली फळं खाल्ली तर गर्भाशयाच्या मांसपेशींना बळ मिळते आणि गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.
> लहान मुलांना पातळ शौचास होत असेल तर उंबराच्या रसात साखर घालून ते सेवन करावे. शरीरातील रक्त व पित्त दूषित होऊन अंगाची जळजळ झाल्यास उंबराच्या सालीचा काढा पोटात घ्यावा. सतत तहान लागत असल्यासही हाच काढा घेतल्यास फायदा होतो. तसेच नाक, तोंड व गुदद्वारातून रक्त पडले तर हाच काढा फायद्याचा आहे.


#Ayurveda, #Vastu shastra, #healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Sunday, April 17, 2011

शाकाहारीच महावीर-बलवान

डॉ. श्री बालाजी तांबे
प्राणीदया, भूतदया आणि ऍनिमल प्रोटेक्‍शन संबंधी गप्पा मारणारे लोक एका बाजूने शिकारीच्या विरोधात बोलतात, इतकेच नव्हे तर सर्कसमध्ये प्राण्यांकडून काम करवून घेण्यावर पण बंधने आणू इच्छितात. पण नंतर स्वयंपाकघरात गाय, बकरी, कोंबडी यांच्यावर ताव मारतात. जोपर्यंत जगातला मांसाहार संपूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत भूतदया, प्राणीदया याविषयी बोलण्याचा कुणालाच अधिकार नाही. हिंसा - अहिंसा, पचनशक्‍ती, मेंदूचे स्वास्थ, आक्रमक व हिंसक वृत्तीमुळे समाजास होणारा त्रास या सर्वांचा विचार मांसाहार करण्यापूर्वी करावाच लागेल. पण खरे पाहता शाकाहार हाच नैसर्गिक आहार आहे.

भगवान महावीरांचे मनुष्यमात्रावर असंख्य उपकार आहेत. त्यांनी दिलेल्या उपदेशातील एक महत्त्वाचा उपदेश म्हणजे अहिंसा, मनुष्याचा आहार शाकाहारीच असावा व सूर्यास्तानंतर रात्री जेवू नये. आरोग्याच्या तंबूचा आहार हा मुख्य खांब. वीरत्व हे सात्त्विक वीर्यावर अवलंबून असते व खरा ताकदवान वीर मनाला जिंकतो. यासाठी लागतो शाकाहार. भगवान महावीरांनी दिलेली ही शिकवण मनुष्यमात्रावर खचितच उपकार करणारी आहे. भगवान महावीर यांची उद्या (शनिवारी) जयंती. भगवान महावीरांप्रमाणेच मनाला जिंकणारे बलवान म्हणजे महावीर हनुमान होत. या महारुद्र हनुमानांची जयंतीही आणखी तीन दिवसांनी (18 एप्रिल) येत आहे. हनुमानजी वानरस्वरूप आहेत. वानर पण शुद्ध शाकाहारी असतात. त्यामुळे त्यांना बुद्धी व उडण्यासाठी हलकेपण व ताकद साहजिकच मिळते.

च्याही आधी वनस्पतींची सृष्टी होती. आणि जीवनाची मुख्य गरज वनस्पतीच आहेत. शरीराच्या सर्वच्या सर्व गरजा वनस्पतिजन्य अन्नच भागवू शकते. मांसाहार करायचा ठरवला तरी वनस्पतिज द्रव्ये, मसाले वगैरे लावल्याशिवाय मांस खाता येणार नाही आणि पचवताही येणार नाही, आणि बरोबरीने शाकाहारी अन्न हे तर खावेच लागेल. जीवनाच्या दोन महत्त्वाच्या गरजा, अन्न-पाणी व संरक्षण या आहेत. उत्क्रांतीबरोबर संरक्षणासाठी प्राणी अधिकाधिक हिंस्र बनत गेले. 'जीवो जीवस्य जीवनम्‌" या न्यायाने मोठे प्राणी छोट्या प्राण्यांना खाणे साहजिक होते. यात मोठे म्हणजे केवळ आकाराने मोठे असा अर्थ नाही, तर हिंसक वृत्तीने मोठे. गाय कुत्र्यापेक्षा मोठी असते आणि हत्ती वाघ-सिंहापेक्षा मोठा असतो. परंतु गाय व हत्ती दोन्ही शाकाहारी आहेत. तसं पाहता अनेक प्राणी सुद्धा शाकाहारीच आहेत. मनुष्याच्या जास्त जवळ असणारे व मनुष्याला विशेष उपयोगी असणाऱ्या प्राण्यातील बकरी, गाय व घोडा हे प्राणी शाकाहारी आहेत. गाय अन्न देते व घोडा संरक्षणासाठी उपयोगी येतो. एकंदरीत गाय, घोडा, उंट, हत्ती, शेळी, मेंढी ह्या सर्वांचा मनुष्यजातीस एवढा उपयोग होतो की जणू त्यांच्यावाचून जीवन चालणारच नाही. मनुष्याने मांस खाण्याचे ठरवले ते नेमके ह्या शाकाहारी प्राण्यांचे! अर्थात मांसाहारी प्राण्यांची हत्या करणे व त्यांचे मांस पचवणे तेवढे सोपे नाहीच! जाठराग्नीने जरी यदा कदाचित ते पचवले तरी त्यामुळे निर्माण होणारी वृत्ती व मनोधारणा पचणे मात्र शक्‍य नाही. 'अन्नाद्‌ भवन्ति भूतानि" असे श्रीमद्‌भगवद्‌गीतेत म्हटलेले आहे. हे सांगताना अन्नामुळे केवळ शरीर तयार होते एवढेच सांगण्याचा उद्देश नसून एकूण प्राणिमात्र, त्यांच्यातील भेद, त्यांचे विशेषत्व व त्यांचे स्वभाव हे सर्व अन्नावर अवलंबून असतात व अन्नाच्या गुणधर्माप्रमाणे शरीराचे गुणधर्मही तयार होतात. भौगोलिक परिमितीप्रमाणे ज्या ठिकाणी मानवाची वस्ती असेल त्या ठिकाणी राहण्यासाठी काहीतरी खावे लागत असताना प्राणिज मांस खाण्याची वेळ आली असावी. पण त्यानंतर मनुष्याच्या विकासाबरोबर काय खावे, काय खाऊ नये, कसे खावे, हे सर्व ठरत असताना शेवटी शाकाहार सोपा, सर्वोत्तम व सर्वगुणसंपन्न असल्याचे माणसाच्या निदर्शनास आले. खायचेच झाले तर कोणत्या प्राण्याचे मांस खावे, कशासाठी खावे, त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम काय होतील हे सर्व शोधून काढले. आयुर्वेदाने त्याचे वात-पित्त-कफ व इतर गुण यांचा अभ्यास करून मांसाहार कोणी करावा, कोणी करू नये, हे शास्त्र विकसित केले. मजबूत बाहू व भरदार छाती असताना तलवार किंवा बंदूक उचलणे सोपे जाते आणि पायात व मांड्यात ताकद असताना दऱ्याखोऱ्यात पळणे, घोड्यावर मांड टाकून बसणे सोपे जाते. तेव्हा ही कामे करणाऱ्यांसाठी मांसाहार सुचवला गेला असावा. स्वसंरक्षणासाठी असो किंवा देशरक्षणासाठी असो, निधडी छाती, धाडशी स्वभाव पण मांसाहारामुळे कदाचित मिळत असावा. परंतु शरीरातल्या बऱ्याच अवयवांना मांसाहार अजिबात मानवत नाही. किंबहुना हृदय व मेंदूच्या रोगांची कारणे मांसाहारात सापडतील. प्राणी मरताना जो त्रास मारणाऱ्याच्या हृदय व मेंदूला होईल व जो आघात सहन करावा लागेल त्यामुळे मनुष्य शाकाहाराकडेच वळेल. सध्या बऱ्याच वेळा चालणे, योग, व्यायाम या गोष्टी तर नियमाने केल्या जात नाहीतच, बाहेर जाण्यासाठी सहसा वाहनाचाच उपयोग होतो, जिने चढण्याऐवजी लिफ्ट चा वापर होतो, ऑफिस मध्ये किंवा कामाच्या ठिकाणी दिवसभर वातानुकूलित बंद खोलीत बसून राहावे लागते अशा वेळी मांसाहार हा आरोग्याऐवजी रोगच वाढवेल आणि त्याचबरोबर मांसाहाराने उत्पन्न झालेल्या धातूंचा शरीरपुष्टीसाठी उपयोग न झाल्यामुळे मानसिक अस्वास्थ्य, चंचलता, क्रोध, आक्रमकता या तामसिक प्राण्यांकडून आलेल्या गुणांचीच वाढ होऊ शकेल. वेगवेगळ्या प्राण्यांच्या स्वभावाचा त्यांच्या शरीरावयवात, मांसात पण गुण असतो. शेळी, बकरी, डोंगरात खूप फिरून अनेक औषधींचा समावेश असलेला झाडपाला खाते, तिचा स्वभाव वेगळ्या गुणाचा आणि कोंबडी, जी उकिरड्यावर फिरून केरकचरा, जंतू, अळ्या खाते तिचा स्वभाव वेगळा. मांसाहाराचा उपयोग शारीरिक मजबुतीसाठी झाला तर होऊ शकतो पण त्याचा मन व मेंदूूच्या आरोग्यासाठी उपयोग न होता नुकसानच होते. ज्यांना सतत मेंदूची किंवा बुद्धीची कामे करावी लागतात आणि शारीरिक हालचाली व व्यायाम होत नाही त्यांच्यासाठी उत्तम आहार म्हणजे शाकाहार! प्राण्यांमध्ये असलेले रोग सहसा मांसाहाराशिवाय मनुष्यात प्रविष्ट होत नाहीत. एका संशोधनाद्वारे असेही निदर्शनाला आलेले आहे की एड्‌स चा व्हायरस फार पूर्वी प्रथम प्राण्यात तयार झाला आणि त्या प्राण्याचे मांस खाल्ल्याने माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर तो वाढला.

शाकाहार की मांसाहार हे ठरवताना पर्यावरणाचा पण विचार महत्त्वाचा ठरतो. अनेक प्राणी त्यांच्या प्राणीवंशातून नष्ट होत असल्याने त्यांना मारण्यावर बंदी घालावी लागलेली आहे.

प्राणी पाळून, तो वाढवून म्हणजे त्याचे उत्पादन करून, मांसाहारासाठी वापरण्याची पद्धत सोयीची झाली परंतु त्यात त्यांना दिलेले खाणे व त्यांचे वजन वाढवून आरोग्य टिकवण्यासाठी दिलेल्या औषधांचे दुष्परिणामही मांस खाणाऱ्यांना भोगावे लागतात. मॅड काऊ डिसीज  (Mad Cow Disease), कोंबड्यांचा पक्षीरोग ही नुकतीच घडलेली उदाहरणे सर्वांना माहीत आहेतच. मुळात प्राण्यांना वाढवण्यासाठी जेवढा शाकाहार दिला जातो त्याचे गणित पण उलटेच आहे. म्हणजे एका विशिष्ट अन्नसंख्येत जेवढी शाकाहारी माणसे पोट भरू शकतात तेवढेच अन्न प्राण्यांना देऊन त्या मांसाहारातून फारच कमी माणसांचे पोट भरेल. म्हणून मांसाहार खूप महाग असतो. मांसाहार व मासे-आहाराची चटक लागल्यामुळे रोज जेवणात त्या वस्तू पाहिजेतच या अट्टहासापायी अनेक कुटुंबे अत्यंत गरीब राहतात, त्यांना मुलांचे शिक्षण किंवा महत्त्वाच्या कौटुंबिक गरजा सुद्धा भागवता येत नाहीत. महाग असल्यामुळे पूर्वीच्या काळी काहीतरी विशेष मेजवानी म्हणून भारतात व परदेशातही क्वचित प्रसंगी मांसाहार केला जात असे. म्हणजे जरी एखाद्या मनुष्य मांसाहार करत असला तरी फार क्वचित प्रसंगी होत असे त्यामुळे एकूणच जीवन शांततापूर्ण व्यतीत होत असे.

ह्यूमन राइट्‌स म्हणजे मनुष्याला जगण्याच्या हक्काची चर्चा जगात सर्वत्र चालते. पण इतर प्राणिमात्रांच्या हक्काचे काय? प्राणीदया, भूतदया आणि ऍनिमल प्रोटेक्‍शन संबंधी गप्पा मारणारे लोक एका बाजूने शिकारीच्या विरोधात बोलतात इतकेच नव्हे तर सर्कसमध्ये प्राण्यांकडून काम करवून घेण्यावर पण बंधने आणू इच्छितात पण नंतर स्वयंपाकघरात गाय, बकरी, कोंबडी यांच्यावर ताव मारतात. जोपर्यंत जगातला मांसाहार संपूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत भूतदया, प्राणीदया याविषयी बोलण्याचा कुणालाच अधिकार नाही. बऱ्याच वेळा स्वतः पाळून, स्वतः मारून मांसाहार करावा असे मुद्दाम एवढ्यासाठीच सांगितले जाते की मांसाहार खाल्ल्यानंतर स्वतःच्या हृदय व मेंदूला होणाऱ्या पचनोत्तर शारीरिक त्रासापूर्वी प्राण्याला मारताना व प्राणी मरताना जो त्रास मारणाऱ्याच्या हृदय व मेंदूला होईल व जो आघात सहन करावा लागेल त्यामुळे सहसा मारणारा मनुष्य शाकाहाराकडेच वळेल, परंतु हा प्रयोग प्रत्यक्ष करण्याची गरज नाही. साध्या तर्काने ही गोष्ट समजू शकते.

हिंसा, अहिंसा, पचनशक्‍ती, मेंदूचे स्वास्थ, आक्रमक व हिंसक वृत्तीमुळे समाजास होणारा त्रास या सर्वांचा विचार मांसाहार करण्यापूर्वी करावाच लागेल. पण खरे पाहता शाकाहार हाच नैसर्गिक आहार आहे.

- डॉ. श्री बालाजी तांबे
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Friday, January 22, 2010

तरुणांची स्वास्थ्याबद्दल जागरुकता

- डॉ. आरती दिनकर
होमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशक, पणजी-गोवा

उदास, खिन्न राहून स्वतःवरच दया, कीव करायची व मानसिक संतुलन बिघडवून घ्यायचं, असे अनेक तरुण बघण्यात येतात. विशेषतः तरुणांमध्ये निरुत्साह जाणवतो. आजच्या तरुणांना स्वामी विवेकानंदांसारखी निष्ठा, जागृती व जोम यांची आवश्‍यकता आहे.

आजच्या तरुणाला गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, तर तरुण वयात अनेक विकृतींमध्ये तरुण गुरफटला जातो. मन विकृत असेल किंवा स्वतःमध्ये मोठा काहीतरी दोष आहे, असा विचार मनात आणला, तर आपण आयुष्यात आनंद उपभोगू शकणार नाही. उदास, खिन्न राहून स्वतःवरच दया, कीव करायची व मानसिक संतुलन बिघडवून घ्यायचं, असे अनेक तरुण बघण्यात येतात. विशेषतः तरुणांमध्ये निरुत्साह जाणवतो. आजच्या तरुणांना स्वामी विवेकानंदांसारखी निष्ठा, जागृती व जोम यांची आवश्‍यकता आहे.

निनाद- कॉलेजमध्ये जाणारा मुलगा. अशक्त, निरुत्साही. क्‍लिनिकमध्ये आला तेव्हा संकोचाने बोलतच नव्हता. "मी...मला ' असं त्याचं चाललेलं. "हं, बोल ना, काय होतंय?' "नाही.... कसं सांगू, याचा विचार करतोय.' "तू सांगितल्याशिवाय मला तुझा प्रॉब्लेम कसा कळणार? तू असं कर, बाहेर थांब. मनाची तयारी कर. मनात पक्कं ठरव काय बोलायचं ते. तोपर्यंत मी दुसरा पेशंट घेते,' असं मी त्याला म्हटलं. तेव्हा तो दबकतच म्हणाला, "नाही, सांगतो ना. मला झोपेत वीर्यपात होतो. बहुतेक वेळा रोजचं. अभ्यासात लक्ष लागत नाही. अतिशय थकवा जाणवतो.' एका दमात तो बोलला. "तुला स्वप्नं पडतात?' मी. "हो.' तो. "कसली?' निनाद गप्पच. "सांग ना तुला स्वप्न कशाविषयी पडतात?' निनाद खाली जमिनीकडे बघून सांगू लागला. "मला, कॉलेजमधील एक मुलगी आवडते. मी तिला आवडतो की नाही, ते माहीत नाही. आम्ही भेटतो, बोलतो. घरी आलो, की वारंवार तिचा विचार मनात येतो.'

निनादचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. मी म्हटलं "निनाद, तुला असं वाटत नाही का, की तुझं लक्ष अभ्यासावर केंद्रित व्हायला हवं. तुझं शिक्षण अजून पूर्ण व्हायचं आहे. मग व्यवसाय किंवा नोकरी, त्यात स्थिरस्थावर होणं, मग संसार. हे जीवनातले टप्पे आहेत. मन चांगल्या उद्योगात गुंतव. अभ्यास तर करच. त्याचबरोबर चांगली पुस्तकं वाच. थोर महात्म्यांची चरित्र वाच. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, लोकमान्य टिळक वगैरे; तसंच मूड बदलेल असं विनोदी साहित्य वाच. असं वाचन तुझ्या मनावर चांगला परिणाम करील. मी तुला त्यावर होमिओपॅथिक औषधं देते; पण रात्री लवकर झोप, सकाळी लवकर ऊठ. व्यायाम, सूर्यनमस्कार घाल. मुख्य म्हणजे तुझ्या मनोवृत्तीला समर्थन मिळेल, असं प्रेरणात्मक वाचन कर. वेळ मिळत नाही, अशी फुटकळ कारणं सांगू नकोस. टीव्हीसमोर बसून वेळ जातोच ना. असा कितीतरी वेळ दिवसभरात वाया जातच असतो.'

तरुण वयात असं होणं हे नैसर्गिक आहे; पण वारंवार वीर्यपात होत असेल तर मात्र अशक्तपणा, निरुत्साह जाणवतो. बरेचदा अनेक तरुणांना इच्छेविरुद्ध वीर्यपात होतो, तर काहींना स्वप्नं पडून, तर काहींना झोपेत स्वप्नाशिवायही वीर्यपात होतो; तसंच जंत, शौचास साफ न होणं, अजीर्ण, ताप, हस्तमैथुनासारख्या सवयी त्याला कारणीभूत आहेत.

निनादनं विचारलं, "होमिओ औषधांचे साइड इफेक्‍ट होणार नाहीत ना? किंवा वीर्य कमी होणार नाही ना?' मी म्हटलं, "अजिबात नाही. जे नैसर्गिक आहे, त्याविरुद्ध होमिओ औषधं कार्य करीत नाहीत. त्यामुळे वीर्य कमी होणार नाहीत व या औषधांचे साइड इफेक्‍ट्‌सही नाहीत, हे सर्वश्रुत आहे. तू काळजी करू नकोस. सगळं नीट होईल. तरुण वयात असं घडणं साहजिक आहे; पण फार प्रमाणात असं होऊन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून तर होमिओपॅथी औषधं देते, ती घे.'

ओम व्यवसायानं आर्किटेक्‍ट आहे. नुकताच स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. अजून लग्न व्हायचंय; पण आताच केस पांढरे व्हायला लागलेत. अपचनाच्या तक्रारी, गॅस, पोट फुगतं, भयंकर भूक लागते. भुकेच्या वेळी काही खाल्लं नाही, तर पोटात जळायला लागतं. भगभगतं, तहान खूप लागते. थोडे श्रम केले तरी थकवा येतो. कोणत्याही ऋतूत तळपायाला, तळहाताला, केसात घाम येतो. व्यवसाय नुकताच सुरू केल्यामुळे टेन्शन असतं. आई-वडील म्हणत होते नोकरी कर; पण स्वतःचा व्यवसाय करायचा असा माझा हट्ट; पण आता खूप टेन्शन येतं. रात्री कधी झोप येते, कधी नाही. ओमनं विचारलं, खूप केस पिकलेत, त्याचं प्रमाण कमी होईल ना? केस काळे होतील ना. मी हसत म्हटलं, तू मनावर घेतलंस तर... म्हणजे होमिओ औषधांबरोबर तुझ्या खाण्याच्या सवयी बदलायला हव्यात. वेळच्या वेळी खायला हवं. जागरणं नकोत. तुझे केस पांढरे होण्याचं मुख्य कारण कळलं. औषधं सुरू केल्यावर ओमची पचनशक्ती सुधारली. घाम येणं कमी झालं. आता थकवा येत नाही. कामात उत्साह आहे. होमिओ औषधांबरोबर त्याच्या खाण्याच्या सवयी, आहारविहार योग्य ठेवला, त्यामुळे त्याला लवकर गुण आला.

पूर्वी म्हाताऱ्या लोकांना पांढऱ्या केसांचा अभिमान असायचा. त्यानुसार अनुभवाचं मोजमाप केलं जायचं. म्हातारी माणसंही "माझे केस अनुभवांनी पांढरे झालेत' हे अभिमानानं सांगायची. म्हातारपणी केस पांढरे होणे नैसर्गिक आहे; पण आजकाल मात्र काही तरुण-तरुणींचे केस पांढरे होताना दिसतात. आता या तरुणांना तरुण वयातच केस पांढरे झाल्यामुळे अनुभव सांगायची सोय उरली नाही. आरोग्याबाबतची जागरूकता वाढली, तरी त्याबाबतचे नियम जाणिवेतून उणिवेकडे गेलेले आढळतात. केसांना तेल लावा, मालिश करा असे उपाय सांगितले, तर ते वेळेचे कारण देतात; पण वेळ मात्र कुणासाठी थांबत नाही. काळ पुढे जातो. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात. ज्याला वेळेवर वेळेचं गणित साधायचं कळतं, तो आरोग्य जपतो. आधुनिकपणाच्या नावाखाली तेलाशिवाय केस कोरडे ठेवले, तर ते राठ होऊन गळू लागतात. केस पांढरे होऊ लागतात; तसेच अन्नात लोह, प्रथिनांची कमतरता केस गळणं, केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरू शकते.

काही पेशंट्‌स विचारतात, डॉक्‍टर मी खात्रीनं बरा होईन ना? तेव्हा मला पेशंटना सांगावंसं वाटते. अरे, आपल्या आयुष्यात इतक्‍या घटना घडतात. पुढे पाच मिनिटांनी काय होईल, माहीत नसतं. त्याची कोण गॅरंटी देतं? मी पेशंटना सांगते, गॅरंटी द्यायला हे कुठल्या वस्तूचं दुकान नाही. हे "प्रोफेशन' आहे. इथे गॅरंटी, वॉरंटी नाही. विश्‍वासानं औषधं वेळच्या वेळी घ्या. डॉक्‍टर सांगतात त्याप्रमाणे आहार-विहार करा. तुमच्या निरोगी जीवनाची गॅरंटी तुमच्याच हातात आहे. मग तुम्हाला बरं होण्यास कितीसा वेळ लागणार?

वीर्यपतन किंवा स्वप्नावस्था यावर काही होमिओपॅथिक औषधं देत आहे; पण ती डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार घेणं योग्य.

1) चायना - अत्यंत वीर्यनाश होऊन अशक्तपणा येतो.
2) नक्‍सव्हॉमिका- पचनाच्या तक्रारी असतात. अनेक वेळा स्वप्नावस्था होऊन कंबर दुखते. थोड्याशा वाचनानं डोकं दुखतं.
3) सेलिनियम - एकाच दिवशी एकाहून अधिक वेळा स्वप्नावस्था होते. शौचास साफ होत नाही. शौचाच्या वेळी कुंथल्यावर वीर्यपात होतो.
4) फॉस्फरस- कामुक स्वप्नं न पडता स्वप्नावस्था होते. इंद्रियाचं वारंवार उत्थापन होतं व वेदना होतात.

याशिवाय सल्फर बर्याटाकार्ब, थुजा, बेलीस पेरीन्नीस, जल्सेमियम, ऍसिडफॉस, पिकरिक ऍसिड ही औषधंही लक्षण साधर्म्यानुसार देता येतील; पण लक्षात ठेवा डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाशिवाय औषधं घेऊ नयेत.
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Friday, April 10, 2009

महावीर्य

रामायणातील सर्वात महत्त्वाची व्यक्‍ती म्हणजे श्री मारुतीराय. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत उत्तम भक्‍ताची लक्षणे सांगितली आहेत. भक्‍तोत्तम कोण, याचा पुरावा देण्याची वेळ आली असता मारुतीरायांनी स्वतःची छाती फाडून त्यात श्रीरामांचे वास्तव्य आहे हे दाखविले. ज्या गोष्टीत राम नाही त्याला जगात काही स्थान नाही, ज्या मोत्याच्या कंठ्यात राम नाही त्याचे मला काम नाही. किंबहुना जेथे राम नाही तेथेच "काम' आहे. मारुतीरायांच्या हृदयात रामाचे वास्तव्य सतत असल्यामुळे त्याने कामावर विजय मिळविला व त्यामुळे त्यांना महावीर ब्रह्मचारी हे विशेषण प्राप्त झाले. जे मनात तेच डोळ्यात, जे मनात तेच हातात व जे मनात तेच वागणुकीत असते. एकदा का मनात श्रीराम स्थिरावले की सर्व इंद्रिये विश्राम पावतात म्हणजे त्याच्यातही श्रीरामांचा ठसा उमटतो. समर्थ रामदासांनीही मनाच्या श्‍लोकात म्हटले आहे, "मुखी राम विश्राम तेथेचि आहे'. साहजिकच त्या ठिकाणी कुठलाही मानसिक ताण नसतो व कुठलाही प्रज्ञापराध नसतो. अशा वेळी केलेली प्रत्येक कृती श्रीरामार्पण होऊन कर्मबंधन निर्माण होत नाही.

ब्रह्मचर्य दोन्ही बाजूंनी समजून घ्यावे लागेल. चैतन्य, जाणीव म्हणजेच ब्रह्म म्हणून जाणिवेला अनुसरून जो वागतो, राहतो, जगतो तो ब्रह्मचारी. सर्व जगताच्या गाभ्याचे एकच सत्य आहे व ते म्हणजे श्रीराम. म्हणून आतून येणारे उत्तर "अहं ब्रह्मा।स्मि' असेच असते. जो स्वतःच्या अंतःप्रेरणेला, संपूर्ण ब्रह्माडातील व्यक्‍तिगत ब्रह्मचैतन्याला म्हणजेच निसर्गाला व सर्वांभूती असलेल्या परमेश्‍वराला स्मरून कार्य करतो तो ब्रह्मचारी. दुसरे म्हणजे ज्याने कामावर विजय मिळविला तोही ब्रह्मचारीच.
केवळ स्त्री-पुरुषाच्या मिलनाशी ब्रह्मचर्याचा संबंध नसावा. मेंदूत असलेल्या हृदयग्रंथीच्या ठिकाणी सर्व शक्‍ती एकवटण्याच्या केलेल्या प्रयत्नालाच ब्रह्मचर्य असे म्हटलेले आहे. मेंदूला व हृदयाला ओजाची पूर्ती होणे आवश्‍यक असते. मेंदूला वा हृदयाला ओज पुरेशा प्रमाणात न पुरवता शक्‍ती अधोगामी करून वीर्यरूपाने विसर्जित केली गेली तर ही कृती ब्रह्मचर्याच्या विरोधी समजली जात असावी. म्हणूनच शक्‍तीचा क्षय वा अपव्यय न करता शक्‍ती सत्कारणी लावणे, तिला जाणिवेपर्यंत पोचविणे व निसर्गचक्राला धरून चालणे याला ब्रह्मचर्य म्हटलेले असते.
ब्रह्मचर्याचा महिमा मोठा आहे. आयुर्वेदानेसुद्धा सांगितले आहे की त्रिदोष, मल व अग्नी संतुलित असताना शक्‍तीचे रूपांतरण सप्तधातूत होऊन शेवटी शक्‍ती वीर्य अवस्थेपर्यंत पोचते. या वीर्याचे सूक्ष्म शक्‍तीत रूपांतरण होऊन ती शक्‍ती ओजरूपाने हृदय व मेंदूला मिळते. याच शक्‍तीमुळे सर्व इंद्रियव्यापार चालतात. या दृष्टीने पाहिले असता ब्रह्मचर्य व वीर्य यांचा कुठेतरी संबंध आहेच. शरीरातील सर्व दोष, धातू, अग्नी, मल हे संतुलित असताना मन प्रसन्न होऊन ते आतील आत्मारामाला संपूर्ण शरण राहू शकते व त्याचवेळी समाधान व शांतीचा अनुभव येतो. म्हणूनच साहजिकच वीर्यनाश हा दोष समजून ती ब्रह्मचर्याच्या आड येणारी एक घटना आहे असा ब्रह्मचर्य शब्दाचा लौकिक अर्थ लावला गेला असला तर नवल नाही.
"ब्रह्मचर्य हेच जीवन' असे श्री शिवानंद स्वामींनी म्हटले आहे. वीर्याच्या एका थेंबाचासुद्धा नाश करू नये असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. हे वाक्‍य समजून घेत असता "नाश करणे' या संकल्पनेविषयी सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. झाडावरून फळे काढणे म्हणजे फळांचा नाश नव्हे. या फळांचा मुरांबा वा भाजी करणे म्हणजे फळांचा नाश नव्हे. फळांपासून बनविलेले अन्न खाणे म्हणजे अन्नाचा नाश होणे, असे आपण म्हणत नाही. अन्नाचे शक्‍तीत रूपांतरण झाले नाही वा ज्याने अन्न खाल्ले त्याचे जीवन ताणपूर्ण व दुःखमय होऊन जीवन नकोसे झाले तर मात्र अन्नाचा नाश झाला असे म्हणता येईल. या व्याख्येप्रमाणे नैसर्गिक रीतीने व आवश्‍यक धातू म्हणून सहजतेने वीर्याचा वापर झाल्यास ब्रह्मचर्य मोडले असे समजता येणार नाही.
प्रत्येक व्यक्‍तीची प्रकृती वेगळ्या ताकदीची असते त्यामुळे नैसर्गिक व साहजिक म्हणजे काय हे ठरविताना गोंधळ होऊ शकतो. यासाठी वेगवेगळ्या पातळीवरचे जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या शक्‍तीची पूर्ती होऊन उरलेली शक्‍ती इतर मार्गासाठी वापरली गेली तर त्याला काही समस्या असू नये.
शरीरातील सर्व इंद्रियात व एकूणच सर्व जीवनात जर "राम" शिल्लक ठेवता आला तर "काम" वर्जित ठरविण्याचे कारण नाही. ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्याने मुळात वीर्यवर्धन होईल असा आहार करावा. जिभेवर "राम' असला की खाण्याच्या बाबतीतले जिभेचे चोचले कमी होतात. जे अन्न सकस नाही, ज्या अन्नात वीर्य नाही म्हणजेच ज्या अन्नात राम नाही ते अन्न स्वीकारू नये. तेव्हा योग्य आहार-विहार ठेवून बाह्य जगतात सर्वांभूती बाळगावे प्रेम व अंतरात्म्यापर्यंत पोचण्यासाठी मनातील काम विसर्जित करून शांततेचा अनुभव घेणे आवश्‍यक ठरते.
ब्रह्मचर्याची उपासना करत असताना अनेक प्रश्‍न उत्पन्न होतात. मुलगा वा मुलगी वयात आली असता कामशक्‍ती जोर धरू लागते. अशा वेळी शरीरात तयार होणाऱ्या वीर्यापैकी बाहेरच्या उत्तेजनेमुळे जागेपणी सहजगत्या, मुद्दामहून वा स्वप्नात वीर्य स्खलित होऊ शकते. ही घटना पुरुष किंवा स्त्री या दोघांच्या शरीराच्या बाबतीत घडू शकते. अशा घटनांमुळे शरीरातील शक्‍ती कमी पडून दैनंदिन व्यवहार करण्यात अडचण उत्पन्न होत नसेल तेव्हा अशी क्रिया साहजिक म्हणावी, पण असे वारंवार घडू लागले तर शरीरातील अग्नीचे संतुलन बिघडून ब्रह्मचर्य पाळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून वीर्यशक्‍तीचा योग्य वापर योग्य वेळी केला तर ब्रह्मचर्याला बाधा येऊ नये.
सतत झालेला किंवा केलेला वीर्यस्राव चांगला नव्हे. यामुळे पुरुषांना पुढे आयुष्यात लैंगिक समस्या येऊ शकतात. तसेच स्त्रियांच्या बाबतीत नेहमी अंगावर पांढरे जाण्याने पाळीचे, गर्भाशयाचे वा हाडे पोकळ होण्याचे त्रास होऊ शकतात. स्त्री-पुरुष आकर्षण नैसर्गिक आहे व वीर्यउत्तेजना पण साहजिक आहे. त्याला मुद्दाम उत्तेजना दिली तर ते ब्रह्मचर्यपालनाच्या विरुद्ध समजले जावे.
ब्रह्म हे सर्वव्यापी आहे व म्हणून ब्रह्मचाऱ्याने ज्ञानोपासना करावी. त्याबरोबरच सर्वांभूती ब्रह्म पाहण्याच्या संकल्पनेनुसार आपपरभाव न ठेवता सर्वांभूती सारखेच प्रेम अनुभवावे म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन होऊ शकेल. समर्थ श्रीरामदास स्वामींनी "काम' व "राम' याविषयी मनाच्या श्‍लोकांमध्ये बरेच मार्गदर्शन केलेले दिसते.
राम त्या काम बाधू शकेना
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ।
हरीभक्‍त तो शक्‍त कामास मारी
जगी धन्य तो मारुची ब्रह्मचारी ।।

सकाळी उठून प्रथम श्रीरामांचे चिंतन करावे व कामविसर्जनासाठी मुखी सतत राम नाम असावे.
- डॉ. श्री. बालाजी तांबे

ad