Showing posts with label fitness. Show all posts
Showing posts with label fitness. Show all posts

Tuesday, May 26, 2009

सिगारेटपासून सुटका हवी आहे ?

व्यसनाच्या आहारी जाणे आणि त्यानंतर व्यसनाच्या आधीन होणे हे मानसिक कमकुवतपणाचे लक्षण आहे. मग ते कुठलेही व्यसन असो.
व्यसन या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट अपरिहार्यपणे करत राहावी लागणे. ती करत असताना विशेष आनंद होतोच असे नाही; पण ती केली नाही तर विलक्षण अस्वस्थता, कासाविशी आणि परिणामी दुःख होतेच होते. व्यसनाच्या आधीन गेलेल्याला त्यापासून वंचित राहिल्यामुळे मानसिक व नंतर शारीरिक त्रास होऊ लागतो. तो टाळण्यासाठी तो सतत व्यसनाच्या गुंगीमध्ये राहतो.
तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट (निकोटिन), दारू (अल्कोहोल) पासून मारिजुआना अर्थात हशीशसारख्या अमली पदार्थांचे व्यसन तरुण वयापासून सुरू होते. सुरवातीला मित्रांच्या संगतीचा परिणाम होऊन एक क्रेझ म्हणून किंवा तथाकथित यशस्वी सिनेतारकांची नक्कल म्हणून ही गोष्ट आयुष्यात शिरते. बेसावधपणात त्याची पाळेमुळे खोलवर रुजतात. खरे तर या सर्व व्यसनी पदार्थांचे सेवन हे आरोग्याला निर्विवादपणे घातक असते.
निसर्गात कुठलाही मनुष्येतर प्राणी या पदार्थाचे सेवन करू शकत नाही. शरीराला या पदार्थांची अजिबात गरज नसते. तरीही हे पदार्थ मनाला चटक लावतात. यांच्या सेवनाने होणाऱ्या विशिष्ट संवेदना सारख्या हव्याहव्याशा वाटू लागतात आणि माणसाचे मन त्यामध्ये अधिकाधिक गुरफटून जाते. व्यसनमुक्त राहण्यासाठी त्यापासून मुळातच लांब राहणे हे फार उत्तम. त्यासाठी लहानपणापासून मनावर झालेले संस्कार, आजूबाजूला नेहमी वावरणाऱ्या लोकांच्या सवयी, स्वास्स्थाविषयीची जागरूकता, भावनिक व्यसनरहित असणे हे सकस मानसिकतेचे लक्षण आहे.
नैतिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक पातळीवरची कारणे त्यामागे असतात. मुळातच व्यसनापासून लांब असलेल्याला व्यसनाधीन न होण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. खरा प्रश्‍न हा त्यामध्ये अडकलेल्यांचा असतो.
सिगारेट, गुटखा, दारू यापैकी कुठलेही व्यसन असलेल्या व्यक्तीला हे पदार्थ स्वास्थ्याला हानिकारक आहेत हे नक्की माहीत असते. त्याचा अनुभवही अधूनमधून येत असतो. तरीही ती गोष्ट सोडता येत नाही. "कळते पण वळत नाही' अशी स्थिती असते. अनेक जण दारू, सिगारेट सोडण्याचा वारंवार निश्‍चय करून, आपल्या जिवलगांना व्यसनमुक्त होण्याच्या आणाभाका देऊनही यातून बाहेर पडू शकत नाहीत. एकीकडे व्यसन वाढत जाते आणि त्याचबरोबर दुसरीकडे एखादी गोष्ट सोडू न शकल्याचे शल्य वाढत असते. त्यामुळे मनात खोलवर नैराश्‍य निर्माण होतं. निराशेच्या या गर्तेतून बाहेर येण्यासाठी मानसिक सामर्थ्याची गरज असते, आत्मविश्‍वास आणि जिद्दीची गरज असते.
दारूमुक्त होण्याची मनापासून इच्छा असणाऱ्यांना दारूमुक्ती केंद्रामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून मानसिक आधार दिला जातो. तसेच "ऍव्हरजन थेरपी' दिली जाते. त्यामध्ये "डायसल्फिराम'सारखी औषधे दिली जातात. या औषधांचे शरीरात जोपर्यंत अस्तित्व असते तोपर्यंत दारू प्राशन केल्यास प्रचंड शारीरिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे दारूपासून लांब राहण्यास मदत होते.
काही दिवस व्यसनमुक्त राहिल्यानंतर त्यापासून कायमचे मुक्त होण्यासाठी मात्र दीर्घकालीन निर्धारच लागतो. दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन करणारी व्यक्ती एका विशिष्ट क्षणाची वाट पाहत असतात. ज्या क्षणी त्यांना "किक बसते', त्या क्षणी मेंदूवर झालेल्या रासायनिक परिणामांमुळे त्यांचे वास्तवाशी असलेले भान सुटते. आयुष्यातल्या सर्व दुःखांचा काही काळासाठी विसर पडतो.
थोड्या काळासाठी एका आभासित जगतामध्ये मनाचा संचार असतो. त्याचे आकर्षण असल्यामुळेच माणसे दारूच्या आहारी जातात. कालांतराने तो क्षण येण्यासाठी लागणारी दारूची अथवा अमली पदार्थाची मात्रा वाढत जाते आणि शरीरावर त्याचे विघातक परिणाम होतात. कुठल्याही व्यसनातून खऱ्या अर्थाने मुक्त होण्यासाठी सजग आत्मपरीक्षणाची गरज असते. अनेक कलाकार मानसिक ताण कमी करण्यासाठी सिगारेट ओढत असतात.
वस्तुतः सिगारेट हे केवळ निमित्त (आणि स्टाइल) असते. ती ओढत असताना तणाव निर्माण करणारे विचार, भावना थांबतात अशी मनाची धारणा असते. ही धारणाच तणावमुक्तीचे काही क्षण देते; पण याची जाणीव न झाल्यामुळे सिगारेटमुळेच ताण कमी झाल्याचा आभास होतो. वास्तविकपणे सिगारेट पिताना मन दुसरीकडेच असते. आध्यात्मिक परिभाषेत हे सिगारेटचे आलंबन तोडणे गरजेचे असते. संपूर्ण जाणीव निर्माण झाल्याशिवाय सिगारेटचा फोलपणा कळणे अवघड असते. त्यासाठी झेन तत्त्वज्ञानात सांगितल्या जाणाऱ्या पुढील तंत्राचा वापर व्यसन खंडित करू शकतो.
पहिली गोष्ट - सिगारेट सोडण्याचे आश्‍वासन स्वतःला किंवा दुसऱ्याला देऊ नये. ते पाळता न आल्याने येणाऱ्या नैराश्‍यातून जास्त व्यसनाधीनता येते.
दुसरी गोष्ट - सिगारेट ओढताना पाचही इंद्रियांनी त्याचा परिपूर्ण आस्वाद घ्यायचा. बोटांना आणि ओठांना होणारा सिगारेटचा स्पर्श, जिभेला कळणारी चव, नाक, घसा आणि तोंडातून येणारा वास, डोळ्यांना दिसणारी धुराची वलये, कानाला ऐकू येणारा भुरक्‍याचा आणि लायटरचा आवाज संपूर्णपणे अनुभवायचा. त्या वेळी मन इतरत्र भरकटता कामा नये, विचाराधीन होता कामा नये.
तिसरी गोष्ट - सिगारेट ओढण्याची संपूर्ण प्रक्रया एखाद्या क्रियाकर्माप्रमाणे मनोभावे आणि संथपणे करायची. त्यामध्ये कुठेही घाई करायची नाही.
चौथी गोष्ट - प्रत्येक वेळी हाताला चटका बसेपर्यंत १००% सिगारेट ओढायची. थोटके टाकायची नाहीत.
पाचवी गोष्ट - कधीही सिगारेट ओढावीशी वाटली तरी वरील प्रकारेच ओढायची. ज्या दिवशी ओढावीशी वाटणार नाही त्या दिवशी ओढायची नाही; पण भविष्यात ओढणार नाही, अशी प्रतिज्ञाही करायची नाही. संपूर्ण जाणीवेत केलेल्या कृतीने कुठल्याही पदार्थाची आसक्ती हळूहळू कमी होते.
माणूस सिगारेट सोडत नाही तर सिगारेटच माणसाला सोडते. या सोडण्यात सक्ती नसते, सोडण्याचे ओझे नसते. स्वतःच्या अनुभवाने येणाऱ्या परिपक्वतेने ते सहज घडून जाते.
हेच तंत्र इतर पदार्थांनाही लागू पडते. दारूच्या बाबतीतही हे सर्व नियम लागू केले आणि पहिली किक बसल्यावर थांबले, की दारूवरचे प्रेम आटोक्‍यात राहून कालांतराने त्यापासूनही स्वतंत्र होता येते. मुळात व्यसन ही मानसिक गुलामगिरी आहे. चांगल्या गोष्टीचेही व्यसन जडू शकते.
सतत काम केल्याशिवाय राहू न शकणाऱ्यांना वर्कोहोलिक संबोधले जाते. निवृत्तीनंतर स्वस्थ बसण्याचा त्यांना खूप त्रास होऊ शकतो. टी.व्ही. चे व्यसन तर थोड्या-अधिक प्रमाणात प्रत्येकालाच असते. त्यात ऊर्जेचा आणि वेळेचा भरमसाट अपव्यय होतो. आनंद, स्वस्थता मिळविण्यासाठी सतत काहीतरी करावे लागणे ही खरी समस्या आहे. त्या करण्याने स्वतःचे व इतरांचे नुकसान न होणे सर्वांत महत्त्वाचे आहे.
- डॉ. हिमांशु वझे

Tuesday, May 5, 2009

जपा व्यावसायिक आरोग्य



व्यवसाय वा नोकरी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. म्हणूूनच त्याचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. काळाप्रमाणे व्यवसायाचे स्वरूप बदलत जाणे स्वाभाविक आहे पण प्रकृतीनुसार व्यवसाय निवडणे आणि व्यवसायानुसार प्रकृतीची काळजी घेणे आवश्‍यक होय. 
आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये पूर्वीच्या काळाला अनुसरून घोड्यावर बसल्याने काय होते, अग्नीजवळ काम करण्याने काय होते, उन्हात राहण्याने काय होते वगैरे विषयांचे मार्गदर्शन केलेले आहे. उदा. 
घोटकारोहणं वातपित्ताग्निश्रमकृन्ममतम्‌ ।
मेदोवणर्कफघ्नं च हितं तद्‌ बलिनां परम्‌ ।।
... योगरत्नाकर

घोडा चालवणे हे वात-पित्त दोषांना वाढविणारे, अग्नी प्रदीप्त करणारे पण श्रम उत्पन्न करणारे असते; तसेच मेद, वर्ण व कफ यांचा नाश करणारे असते. म्हणूून घोड्यावरून प्रवास करणे हे केवळ बलवान मनुष्यासाठी हितकर होय. 
आधुनिक जीवनशैलीमध्ये घोड्यावर बसण्याची पाळी क्वचितच येत असली तरी अशा प्रकारच्या मार्गदर्शनावरून आधुनिक व्यवसाय करताना आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी हे समजून घेता येऊ शकते. एकंदरीत आयुर्वेदशास्त्रात व्यवसायिक आरोग्याचा विचार करावा लागतो हे समजते. 
प्रकृती व व्यवसायाचा विचार करणेही या ठिकाणी आवश्‍यक आहे. प्रकृतीचा आपल्या आवडीनिवडी, एकंदर शरीरशक्‍ती व प्रवृत्ती यांच्यावर मोठा प्रभाव असतो. व्यवसाय आवडीचा असला, स्वतःच्या स्वभावाला एकंदर प्रकृतीला साजेसा व अनुकूल असला तर त्यामुळे आरोग्य चांगले राहतेच पण व्यवसायातही प्रवीणता, कार्यक्षमता उत्तम राहते. 
व्यवसाय बैठ्या स्वरूपाचा व धावपळीचा अशा दोन प्रकारचा असू शकतो. 
कफ हा स्वभावतःच शांत, स्थिर, उत्तम बलयुक्‍त आणि उत्तम सहनशक्‍ती असणारा असल्याने धावपळ, प्रवास, ताण-तणावांनी युक्‍त व्यवसाय कफपकृतीच्या व्यक्‍ती निभावून नेऊ शकतात. मात्र वात-पित्त हे स्वभावतःच चंचल, तापट, नाजूक व संवेदनशील असल्याने अशा प्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी फारसे ताणतणाव नसणारा, शांत व स्थिर स्वरूपाचा व्यवसाय अधिक योग्य असतो. 
आपल्या प्रकृतीला अनुरूप व्यवसाय निवडणे शक्‍य असले तर ते सर्वोत्तम होय. पण प्रत्येक व्यक्‍तीला ते शक्‍य होईलच असे नाही. अशा वेळी आपल्या व्यवसायाचे स्वरूप, आपल्या प्रकृतीचे स्वरूप आणि व्यवसायामुळे प्रकृतीवर होणारा परिणाम यांची माहिती करून घ्यायला हवी व तो आरोग्यासाठी प्रतकूल ठरणार नाही यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करायला हवी. 
सध्याच्या युगात संगणकावर काम करणारी असंख्य मंडळी असतात. मुख्य म्हणजे हे बैठ्या स्वरूपाचे काम असते. यात डोळ्यांवर अतिताण येणे साहजिक असते. प्रखर स्क्रीनच्या सान्निध्यात राहण्याने डोळ्यांमध्ये त्यांच्यामार्फत व संपूर्ण शरीरात उष्णता वाढत असते. संगणकावर काम करताना विशिष्ट रीतीने बसावे लागत असल्याने मान व पाठीवर ताण येत असतो. तसेच की बोर्ड व माऊस याच्या वापराने खांदे, हात, बोटे, मनगट यांच्यावर परिणाम होत असतो. शिवाय संगणकावर काम करणे हे बुद्धीला ताण देणारे व मेंदूला सतत व्यस्त ठेवणारे असते. या सर्व गोष्टींचा विचार करता संगणकावर काम करणाऱ्यां व्यक्‍तींना खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.
* उष्णता कमी करणे, विशेषतः डोळ्यांची काळजी घेणे
* यासाठी पादाभ्यंग उत्तम असतो. 
पादाभ्यंगस्तु सुस्थैर्यनिद्रादृष्टिप्रसादकृत्‌ ।।
... योगरत्नाकर
पादाभ्यंगामुळे शरीरात स्थिरता उत्पन्न होते, झोप येण्यास मदत मिळते व मुख्य म्हणजे नजर प्रसन्न होते. पादाभ्यंग घृत तळपायाला लावून काशाच्या वाटीच्या साहाय्याने पादाभ्यंग करण्याने शरीरातील उष्णताही कमी होते.
* मौक्‍तिकभस्म, त्रिफळा घृत वगैरे डोळ्यांना हितकर द्रव्यांपासून तयार केलेले अंजन, उदा. "सॅन अंजन (क्‍लिअर किंवा ग्रे)' डोळ्यात घालण्यानेही डोळ्यांवरचा ताण कमी होतो.
* खांदे व पाठीची काळजी घेणे - मानेचे व पाठीचे व्यायाम उत्तम असतात तसेच नियमितपणे "संतुलन कुंडलिनी तेला'सारखे नसांना पोषक तेल लावण्यानेही उत्तम उपयोग होताना दिसतो.
* बुद्धीची व मेंदूची काळजी घेणे - बुद्धी-मेंदूला पोषक असे पंचामृत व साजूक तूप यांचा रोजच्या आहारात समावेश करता येतो. एकाग्रता वाढावी, मेंदूची कार्यक्षमता वाढावी व मुख्य म्हणजे मेंदूवरचा ताण कमी व्हावा यासाठी नेमाने ॐकार गूंजन, अनुलोम-विलोम, संतुलन अमृत क्रिया यांचा अवलंब करण्याचा उपयोग होताना दिसतो.
प्रवास आणि आरोग्य
आधुनिक काळात "प्रवास' हाही व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग होय. रोजच्या रोज गाडीतून वा रेल्वेतून प्रवास करणे, वारंवार देशातल्या देशात वा देशाबाहेर विमानाने प्रवास करणे असे प्रवासाचे अनेक प्रकार असू शकतात.
प्रवासामुळे वात वाढतो असे आयुर्वेदशास्त्र सांगते. विशेषतः सातत्याने प्रवास करण्याने व दूरदेशीचे प्रवास करण्याने हवा, पाणी, तापमान यांच्यात मोठे बदल होत असल्याने वात वाढण्याबरोबरच पचनसंस्थेवर ताण येतो, शरीरशक्‍ती कमी होते. प्रवास करणाऱ्यांनी खालील गोष्टी सांभाळण्याचा उपयोग होतो, 
* वातशमनासाठी प्रयत्न करणे - यात अंगाला नियमित अभ्यंग करणे, नाकात साजूक तुपाचे किंवा औषधांनी सिद्ध केलेल्या"नस्यसॅन घृता' सारख्या सिद्ध घृताचे थेंब टाकणे.
शक्‍य असेल तेव्हा तज्ज्ञ आयुर्वेदिक परिचारकाकाडून शास्त्रोक्‍त पद्धतीने अभ्यंग व स्वेदन करून घेणे.
* पचनाची काळजी घेणे - प्रवासामुळे अन्न आणि जागा बदलली तरी शक्‍यतोवर जेवणाच्या वेळा सांभाळण्याचा खूप उपयोग होतो. प्रवासामुळे पचनावरचा ताण कमी होण्यासाठी जेवणानंतर "संतुलन अन्नयोग गोळ्या' किंवा अविपत्तिकर चूर्णासारखे पाचक चूर्ण घेता येते. जेवण प्रकृतीला अनुकूल व पचायला हलके असण्याकडे लक्ष देणेही उत्तम असते. 
* प्रवासामध्ये सर्वाधिक लक्ष द्यावे लागते ते पाण्याकडे. पाणी बदलले तरी पचन बिघडण्याचा सर्वाधिक संभव असतो. त्यामुळे शक्‍यतो प्रवासातही उकळलेले 
पाणी पिण्याकडे लक्ष द्यावे. 
* नियमित प्रवास करणाऱ्यांनी वातशमनासाठी आणि पचन व्यवस्थित राहण्यासाठी अधून मधून अनुवासन बस्ती घेण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो.
रात्रपाळी आणि आरोग्य
रात्रपाळीचा व्यवसाय हा सर्वात अवघड व्यवसाय समजावा लागतो. निसर्गाच्या विरोधात जाऊन कराव्या लागणाऱ्या या व्यवसायामुळे वात तसेच पित्त असे दोन्ही दोष असंतुलित होतात, पचनसंस्थेवर ताण येतो तसेच हळूहळू शरीरशक्‍तीही कमी कमी होत जाते. त्यातल्या त्यात कफप्रकृत्तीसाठी असा व्यवसाय सहन होऊ शकला तरी त्यांनीही प्रकृतीची खूप काळजी घ्यावीच लागते. रात्रपाळी करावी लागणाऱ्यांना खालील गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, 
* झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा "सॅनकूल चूर्णा'सारखे चूर्ण घेणे. यामुळे पचनसंस्थेतील वाढलेल्या पित्ताचे शमन होते.
* स्नानाच्या पूर्वी अंगाला अभ्यंग करण्याने वाढलेला वात संतुलित होण्यास मदत मिळते तसेच शरीरशक्‍ती भरून येण्यास उपयोग होतो. 
* सकाळी गुलकंद, मोरावळा, "संतुलन पित्तशांती'सारख्या गोळ्या घेण्याने पित्त कमी होते. 
* आहारात साजूक तूप, लोणी, पंचामृत यांचा समावेश करण्यानेही वात-पित्तदोषांचे शमन होऊन शरीरशक्‍ती चांगली राहण्यास मदत मिळते. 
* पादाभ्यंग करण्याने अतिरिक्‍त उष्णता कमी होते. 
बैठे काम आणि आरोग्य
अनेकांचा बैठ्या स्वरूपाचा व्यवसायही असतो. अशा लोकांना नियमित व्यायाम करण्याची सवय लावून घेणे इष्ट असते. 
* बसून बसून पाठ-मानेत विकार उत्पन्न होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे लागते. त्यासाठी मान-पाठीचे विशेष व्यायाम करण्याचा, आठवड्यातून दोन-तीन वेळा पाठीला व मानेला "संतुलन कुंडलिनी तेल' लावण्याचा उपयोग होताना दिसतो.
* या व्यक्‍तींनी रात्रीचे जेवण अगदी हलके घेणे चांगले असते. 
* दुपारची झोप टाळणे हितावह असते. 
* बसून बसून मन व बुद्धी कंटाळले तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तंबाखू किंवा वारंवार चहा-कॉफी पिण्याची, सतत काही खाण्याची सवय लागू शकते. यातून नंतर अजूनच नुकसान होणार असते हे लक्षात ठेवणे चांगले.
बोलणे आणि आरोग्य
काही व्यवसायात सातत्याने बोलणे हा एक मुख्य भाग असतो. डॉक्‍टर, वकील, शिक्षक वगैरे व्यवसायात तर बोलणे महत्त्वाचे असते. बोलण्याने शक्‍तीचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असतो. म्हणूनच आयुर्वेदाने अति प्रमाणात बोलणे हे "साहस' म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने अहितकर सांगितले आहे.
* व्यवसायामुळे फार बोलावे लागणाऱ्या व्यक्‍तींनी सकाळी च्यवनप्राश, धात्री रसायन किंवा "सॅनरोझ'सारखे रसायन सेवन करण्याची सवय ठेवावी
* आठवड्यातून एक-दोन वेळा हळद-मीठ टाकलेल्या गरम पाण्याच्या गुळण्या करण्याचा उपयोग होताना दिसतो. 
* दिवसभर थोडे थोडे पाणी पिण्याचाही फायदा होताना दिसतो.
थोडक्‍यात, प्रत्येकाने आपापल्या व्यवसायानुरूप व प्रकृतीनुरूप आहार-आचरणात योग्य ते बदल केले, आवश्‍यक त्या औषध-रसायनांचा उपयोग करून घेतला तर त्यातून आरोग्य टिकवता येईल व कामाची प्रतही वाढवता येईल.

Wednesday, April 1, 2009

कलासाधनेचा श्वास

शरीरामध्ये प्राणवायूयुक्त शुद्ध हवा आत खेचण्याची आणि कार्बनडायऑक्‍साईडयुक्त अशुद्ध हवा बाहेर सोडण्याची यंत्रणा आहे. तिलाच आपण श्‍वसन म्हणतो. ही यंत्रणा शरीराच्या अस्तित्वाचा मूळ आधार आहे. जन्माच्या पहिल्या श्‍वासापासून मृत्यूच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत ही प्रक्रया अव्याहतपणे चालू असते. श्‍वास हा आपोआप घेतला जातो. तो आपण घेत नाही. तरीही सदैव गडबडीत असणाऱ्या व्यक्ती "मला श्‍वास घ्यायला वेळ नाही,'' असे म्हणताना आपण ऐकतो.
श्‍वासाचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे. मनातील विचारांचा श्‍वासावर सतत परिणाम होत असतो. विचार आणि भावनांमुळे श्‍वासाची गती आणि स्नायू अस्थिबंधाची हालचाल बदलत असते. संतप्त माणसाचा श्‍वास धाप लागल्याप्रमाणे चालतो. यात चिडणे आणि धाप लागणे या गोष्टी एकाच वेळी होत असतात. आधी चिडला आणि नंतर धाप लागली, असे होत नाही. म्हणजेच मन आणि श्‍वासाचा संबंध एका वेळेला आहे; वेगळ्या वेळेला नाही. याउलट निवांतपणे बसलेल्या व्यक्तीचा श्‍वास हा संथ चालतो. तणावयुक्त व्यक्ती छातीने श्‍वास घेते, तर निरागस आणि निष्पाप अशा बालवयात श्‍वास छाती जराही न हलता फक्त पोटाने चालू असतो.
श्‍वासाचे निरीक्षण निरंतर हवे. थोडासा आनंद झाल्यावरचा श्‍वास, जास्त आनंद झाल्यावरचा श्‍वास, हर्षवायू झाल्यावरचा श्‍वास, ओक्‍साबोक्‍शी रडतानाचा श्‍वास, खदाखदा हसतानाचा श्‍वास, स्मितहास्याचा श्‍वास, द्वेषयुक्त श्‍वास, नैराश्‍याचा श्‍वास, आत्महत्येपूर्वीचा श्‍वास, बिलगून बसलेल्या प्रेमवीरांचा श्‍वास; प्रत्येक श्‍वास वेगळा असतो. राग, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अहंकार या मनाच्या सहा शत्रूंना सामोरं जाताना श्‍वासात वेगवेगळे बदल होतात. त्यामुळे श्‍वास हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक असतो.
अभिनयाच्या प्रशिक्षणामध्ये कलाकाराच्या चेहऱ्यावर बुरखा घालून त्याच्या श्‍वासावरून मनातला भाव ओळखण्याचा प्रयत्न सहकलाकार करतात. श्‍वासाची पद्धत, गती, हालचालीची कक्षा इत्यादींमध्ये ढोबळ आणि सूक्ष्म स्वरूपाचे बदल भावनानुरूप होत असतात. सक्षम अभिनयात हे सूक्ष्मातिसूक्ष्म बदल श्‍वासात आपोआप घडून येतात. अभिनयाच्या सरावामध्ये मनामध्ये अपेक्षित भाव पूर्ण ताकदीने निर्माण होण्यासाठी श्‍वासांमधील बदलांचा अभ्यास आणि निदिध्यास साह्यभूत ठरतो.
अभिनय-कलेत प्रत्येक जण आयुष्यभर वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो. विवक्षित भूमिका करताना तदनुसार श्‍वास बदलतो. भूमिका संपल्यानंतरही हा श्‍वास मात्र तसाच चालू राहू शकतो. यासाठी जागरूकता हवी. अभिनय संपला की लगेच श्‍वास पूर्ववत म्हणजेच नैसर्गिक व्हायला हवा. तसा तो झाला नाही, तर श्‍वास विचित्र पद्धतीने कायमचा बदलून जातो आणि त्याची मोठी किंमत अनारोग्याच्या रूपाने कलाकाराला मोजावी लागते. कारण खरोखरीचा राग आणि रागाचा "खराखुरा'' अभिनय, यांतला फरक शरीराला कळत नाही.
दोन्हीतही शरीरात ऍड्रेलिनसारखी तणाव निर्माण करणारी संप्रेरके निर्माण होतात आणि रक्तात पंप केली जातात. रक्तदाब वाढतो. हृदयाची गती वाढते. रक्तातील साखर वाढते, वगैरे हे झालेले विघातक बदल पूर्वस्थितीला येण्यासाठी क्रोधाचा अभिनय झाल्यानंतर शांत, पोटाने श्‍वास सुरू होण्याची गरज असते.
संगीत कलेच्या रियाझातही श्‍वासांचे महत्त्व सतत जाणवते.
मैफलीमध्ये गायक आणि वादक कलाकारांना श्‍वासावर हुकमत कमवावी लागते. दोन आहत नादांमध्ये येणारी अनाहत नादाची कक्षा अनुभवण्यासाठी नैसर्गिक प्राणशक्तीची निरंतरता जागरूकतेने पाहावी लागते. भारतीय संगीताचं प्रवाहीत्व हे या शक्तीशी साधर्म्य असणारं आहे.
ज्याप्रमाणे वाहणाऱ्या जलप्रवाहात खड्डा आला की भोवरा तयार होतो, तसंच गाताना किंवा वाजविताना मला जमेल का, किंवा तत्सम स्वतःविषयी अन्य प्रश्‍न मनाच्या पात्रात पडला, की त्या क्षणी काहीतरी चूक होते. किंबहुना कलाकार कितीदा चुकतो यावरून त्याच्या मनात "मी' किती वेळा डोकावला हे कळतं. कारण "मी'' आला की श्‍वास अडकलाच! "मी'' संपूर्ण नाहीसा होईपर्यंत कलासाधक हा कलासिद्ध होत नाही. तोपर्यंत सूर, शब्द, भाव यांचा श्‍वासाशी असलेला संबंध त्याला परत परत पडताळून पाहावा लागत राहतो.
- डॉ. हिमांशू वझे

श्‍वासाचे व्यायाम

प्रत्येक श्‍वासागणिक साधारणतः पाचशे सीसी हवा आत घेतो. किंबहुना ही हवा शरीरात आपोआप खेचली जाते. कुठलाही प्राणी स्वतःच्या इच्छेने दीर्घ काळ श्‍वास थांबवू शकत नाही.
स्वस्थ शरीरामध्ये दर मिनिटाला बारा ते चौदा श्‍वास घेतले जातात. दोन नाकपुड्यांपैकी एकाच नाकपुडीचा वापर एका वेळी केला जातो. दर तीन ते चार श्‍वासांनी नाकपुडी बदलत राहते. माणसाला याची जाणीव सर्दी-पडसे झाल्यावरच होते. निसर्गतः श्‍वास घ्यायला लागणारा वेळ हा तो सोडायला लागणाऱ्या वेळापेक्षा थोडासा अधिक असतो. आरामदायक अवस्थेत श्‍वास आत घेताना पोट फुगते व सोडताना पोट आत जाते.
प्राणवायूची अतिरिक्त गरज भासल्यास छातीचा वापर केला जातो. श्‍वासावाटे अगणित अणुरेणू शरीरात जातात व उच्छ्वासावाटे शरीरातील अणुरेणू बाहेर टाकले जातात. त्यामुळे प्रत्येक श्‍वासाबरोबर शरीराला फक्त प्राणवायूच मिळत नाही, तर शरीराच्या हठयोगशास्त्रामध्ये प्राणायामाच्या क्रियांचा उल्लेख आढळतो. प्राणशक्तीच्या संतुलनाने अनेक रोगांचे निर्मूलन होते व रोगप्रतबंधक शक्तीही निर्माण होते.
प्राणायामाच्या या क्रियाप्रकारांमध्ये पद्मासनात किंवा सुखासनात बसावे. पाठीचा कणा ताठ असावा. त्यासाठी तीन ते चार इंच जाडीचे बसकर घेऊन मांडी पुढे सोडावी. प्राणायामाचे व्यायाम दिवसात एक ते तीन वेळा करावे. प्रत्येक वेळी सुमारे 10 ते 15 मिनिटांचा कालावधी पुरेसा होतो. प्राणायामामधील व्यायाम खालीलप्रमाणे केले जातात :
* भस्रिका - यामध्ये श्‍वास घेण्याची व सोडण्याची क्रिया नेहमीपेक्षा अधिक ताकदीने करावी. गती दीडपट व दुप्पट असावी. या क्रियेमध्ये प्रामुख्याने पोट व काही अंशी छातीची लोहाराच्या भात्याप्रमाणे हालचाल होते. आळस, सुस्ती, जडत्व घालवण्याचा हा प्रभावी उपाय आहे. शरीरात तत्काळ नवचैतन्य निर्माण होते. सर्दी-पडसे-कफाचे विकार दूर होतात.
* कपालभाती - प्रथम दीर्घ श्‍वास घेऊन त्यानंतर सर्व लक्ष एका लयीमध्ये श्‍वास सोडण्यावर केंद्रित करावे. म्हणजे श्‍वास मुद्दामहून बाहेर टाकायचा. आत येताना तो आपोआप येतो. हे निसर्गनियमाच्या बरोबर उलटे आहे. एरवी आपण श्‍वास घेताना ऊर्जा खर्च करतो. सोडताना तो आपोआप जातो. कपालभाती दीडपट ते दुप्पट वेगाने करावी. यामध्ये पोटाची हालचाल हिसका दिल्याप्रमाणे होते. पोटाचा किंवा पाठीचा विकार असणाऱ्यांनी, तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी कपालभाती करू नये. कपालभातीचा उपयोग कफाच्या तक्रारीसाठी होतो. वार्धक्‍य उशिरा येते. चेहऱ्यावर तेज उत्पन्न होते. भस्रिका आणि कपालभातीच्या नियमित सरावाने अनेक अवयवांची कार्यक्षमता सुधारते. वजन, तसेच पोट कमी होते.
* नाडीशुद्धी - नासिकामार्ग मोकळा राहण्यासाठी विशेष उपयुक्त. उजव्या हाताचा वापर करावा लागतो. मनःशांतीसाठी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, उत्साह वाढविण्यासाठी नाडीशुद्धी नियमितपणे करावी. उजव्या हाताच्या अंगठ्याचा उपयोग उजवी नाकपुडी बंद करण्यासाठी, तर करंगळीशेजारील दोन बोटांचा उपयोग डावी नाकपुडी बंद करण्यासाठी करावा. श्‍वास संथपणे घ्यावा व सोडावा.
अ) पहिला प्रकार - प्रथम डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्‍वास घ्यावा व सोडावा. नंतर उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्‍वास घ्यावा व सोडावा. दोन्ही वेळा क्रिया सलगपणे किमान पाच वेळा करावी.
ब) दुसरा प्रकार (अनुलोम विलोम) - प्रथम डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्‍वास घ्यावा. नंतर उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्‍वास सोडावा. मग डावीने श्‍वास घेऊन डावी बंद करून उजवीने सोडावा. याप्रमाणे उलटसुलट ही क्रिया किमान पाच वेळा करावी.
क) तिसरा प्रकार - दोन्ही नाकपुड्यांनी श्‍वास घेऊन नंतर दोन्ही नाकपुड्या बंद करून तोंडाने फुंकर मारत श्‍वास सोडावा. नंतर तोंडाने श्‍वास घेऊन तोंड बंद करून दोन्ही नाकपुड्यांतून बाहेर सोडावा.
* भ्रामरी -
अ) कंठभ्रामरी - प्रथम दीर्घ श्‍वास घेऊन, श्‍वास सोडताना जबड्याची हालचाल करत घशातून भुंग्यासारखा आवाज काढावा.
ब) कर्णभ्रामरी - यामध्ये उच्छ्वास करताना तळहात कानांवर ठेवून बोटांनी मानेच्या मणक्‍यावर दाब द्यावा. त्यानंतर तर्जनी दोन्ही कानांमध्ये घालून उच्छ्वास सोडायचा व नंतर तर्जनीने कानाला हलका मसाज करावा.
क) नेत्रभ्रामरी - भ्रामरी करताना डोळे मिटून हाताच्या बोटांनी डोळ्यांवर हलका दाब द्यायचा.
भ्रामरीच्या नियमित अभ्यासाचा उपयोग आवाजाच्या साधनेमध्ये होतो. घशाला, स्वरयंत्राला व्यायाम मिळतो. कान व डोळ्यांचे स्वास्थ्य सुधारते. मानेतला जडपणा कमी होतो. मेंदूमधील पेशींची कार्यक्षमता वाढते. मानसिक ताण कमी होऊन सजगता वाढते.
* उज्जयी - प्रथम दीर्घ श्‍वास घेऊन श्‍वास सोडताना घशाचे स्नायू थोडेसे आवळून नाकाने श्‍वास सोडावा. तोंड बंद ठेवावे. श्‍वास सोडताना घोरल्याप्रमाणे आवाज आला पाहिजे, किंवा हाऽऽऽ असा खर्जस्वर लागला पाहिजे.
* शीतलीकरण - जीभ भरपूर बाहेर काढून जिभेचे पन्हाळे करून त्यामधून भरपूर श्‍वास घ्यावा व सोडावा. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी गुणकारी ठरते.
* शीतकारी - दातावर दात घट्ट मिटून जीभ टाळूला उलटी लावून दातांच्या फटीतून दीर्घ श्‍वास घेऊन तोंड बंद करून नाकाने उच्छ्वास सोडावा. हिरड्या व दातांचे आरोग्य यामुळे सुधारते.
* गाल फुगवण्याचा व्यायाम - नाकाने भरपूर श्‍वास घेऊन गालाचा फुगा करून फुंकर मारत तोंडाने श्‍वास सोडावा. गालांना व्यायाम होऊन गालांवरील सुरकुत्या कमी होतात.
* सिंहमुद्रा - दोन्ही तळहात जमिनीवर घट्ट रोवून, मान वर करून, डोळे विस्फारून गालांना ताण देत जीभ जास्तीत जास्त बाहेर काढावी आणि मोठ्यांदा सिंहगर्जना करावी. सिंहगर्जना जास्तीत जास्त लांबवावी. घशाचे आरोग्य सुधारते. मरगळ दूर होऊन आत्मविश्‍वास वाढतो.
- डॉ. हिमांशु वझे

ad