Thursday, November 19, 2009

अन्नयोगः फळे

फळे रसाने युक्‍त असल्याने स्वादिष्ट असतात. अंजीर व पपई पित्त कमी करतात. सफरचंद शक्तिवर्धक आहे, तर संत्रे थकवा दूर करते.
डॉ. श्री बालाजी तांबे.

बहुतेक सर्व फळे दिसायला आकर्षक असतात व रसाने युक्‍त असल्याने खाण्यासही स्वादिष्ट असतात. प्रकृतीनुरूप फळांचे सेवन आरोग्यासाठी निश्‍चितच लाभदायक असते. आज आपण सहसा सर्व प्रकृतीच्या व्यक्‍तींना मानवणारी काही फळे पाहणार आहोत.

अंजीर
अंजीर शीतलः स्वादुर्गुरु रक्‍तरुजाहरः । दाहं वातं पित्तं च नाशयेत्‌ तृप्तिदो मतः ।। ... निघण्टु रत्नाकर
* अंजीर चवीला मधुर व शीत वीर्याचे असते. वात, तसेच पित्तदोषाचे शमन करणारे असते. शरीरात दाह होत असल्यास, रक्‍तदोष असल्यास अंजीर खाणे विशेष हितावह असते. अंजीर तृप्ती करणारे असते.
* ताजे अंजीर फक्‍त उन्हाळ्यात उपलब्ध असते. सुके अंजीर मात्र वर्षभर मिळते.
* अशक्‍तपणा, हातापायांची जळजळ, तोंड कोरडे पडणे वगैरे तक्रारी असल्यास काही दिवस एक-दोन ताजी अंजिरे खडीसाखरेसह खाण्याचा उपयोग होतो.
* उपवास, उन्हात जाणे, जागरणे करणे यामुळे वाढणारे पित्त कमी होण्यासाठीही ताजे अंजीर खाणे उत्तम असते. पिकलेल्या अंजिराचा जॅम पित्तशामक व रक्‍त वाढविणारा असतो.

सफरचंद
कषायमधुरं शीतं ग्राहि सिम्बितिका फलम्‌ ।...चरक सूत्रस्थान
* सफरचंद चवीला गोड, किंचित तुरट असते. वीर्याने शीत असते व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते.
* आतड्यांची शक्‍ती कमी झाल्याने शौचाला पातळ होत असल्यास वाफवलेले सफरचंद खाणे उत्तम असते.
* नियमित सफरचंद खाण्याने रक्‍त वाढण्यास मदत मिळते. लहान मुलांसाठी, तसेच गर्भारपणातही सफरचंद खाणे उत्तम असते. सफरचंद खाण्याने क्वचित मलावष्टंभाचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी सफरचंद वाफवून खावे.
* अतिताण, कमी झोप, अति श्रम यामुळे स्टॅमिना कमी होत असल्यास, अनुत्साह वाटत असल्यास सफरचंद वाफवून काढलेला गर व साखर एकजीव करून खाण्याचा उपयोग होतो.
* कीटकनाशके वापरलेली असल्याची मोठी शक्‍यता असल्याने सफरचंद खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुणे व साल काढून खाणे श्रेयस्कर ठरते.

पपई
तत्पक्वं मधुरं रुच्यं पित्तनाशकरं गुरु । ... निघण्टु रत्नाकर
* पिकलेली पपई चवीला मधुर, अतिशय रुचकर व पित्तनाशक असते.
* पपई उष्ण असते असा सामान्यतः समज दिसतो, पण पपईमुळे पित्त कमी होते, असा आयुर्वेदात स्पष्ट उल्लेख आहे.
* पपईच्या एक-दोन फोडी खाल्ल्याने अन्नपचन सुधारते, भूकही चांगली लागण्यास मदत मिळते.
* आहारात पपईचा नित्य अंतर्भाव केल्यास जंत होण्याची प्रवृत्ती नष्ट होते.
* मासिक पाळीच्या वेळेस अंगावरून कमी रक्‍तस्राव होत असल्यासही पपईच्या एक-दोन फोडी रोज आहारात असल्यास उपयोग होतो.
* पपईमध्ये गर्भाशयाचा संकोच करण्याचा गुण असल्याने गर्भारपणात पपई खाऊ नये.
* कच्च्या पपईची भाजी करण्याची पद्धत असते, पण कच्च्या पपईने कफदोष व वातदोषाचा प्रकोप होतो.

संत्रे
विशदं गुरु रुच्यं च सरं चोष्णं सुगन्धिकम्‌। स्वादु चामं कृमीन्वातं श्रमं शूलं च नाशयेत्‌।। ...निघण्टु रत्नाकर
* ताजे व गोड संत्रे रुचकर व सुगंधी असते. वीर्याने उष्ण असते, गुणाने विशद म्हणजे स्वच्छ करणारे व सारक असते. आम, जंत, वात, श्रम, तसेच वेदना कमी करणारे असते.
* ताज्या संत्र्याचा रस थोडेसे मीठ टाकून घेतल्यास थकवा दूर होतो. विशेषतः उन्हातून आल्यावर किंवा शरीरश्रमांमुळे घाम येऊन शीण येतो तो दूर करण्यासाठी संत्रे उत्तम असते.
* गर्भारपणात होणाऱ्या उलट्या, मळमळ, अन्न न जाणे अशा वेळी थोड्या थोड्या वेळाने संत्र्याचा रस घेण्याचा उपयोग होतो.
* भूक लागली तरी अन्न खावेसे वाटत नाही, अशा वेळी संत्र्याची साल व बिया काढलेली संत्र्याची फोड मीठ व मिऱ्याची पूड टाकून खाण्याचा उपयोग होतो.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405

No comments:

Post a Comment

ad