Showing posts with label पौर्णिम. Show all posts
Showing posts with label पौर्णिम. Show all posts

Saturday, November 3, 2012

शरदातील पित्तसंतुलन


आयुर्वेदाने फक्‍त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते. चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते. चांदीसुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्तसंतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच. 

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य तीन कालविभाग सर्वांना माहिती असतात. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मधला ऋतू म्हणजे शरद ऋतू. साहजिकच या ऋतूमध्ये एखाद्‌दुसऱ्या सरीचा अपवाद सोडला तर पाऊस जवळजवळ थांबलेला असतो. पावसाळ्यातील काळे ढग जाऊन त्यांची जागा पांढऱ्या ढगांनी घेतलेली असते. दिवसा सूर्याच्या तीव्र किरणांमुळे वातावरण चांगलेच तापते, तर रात्री हवेत गारवा जाणवतो. झेंडू, शेवंती वगैरे लाल फुले फुलतात. निसर्गात आणि वातावरणात हे बदल व्हायला लागले, की शरद ऋतू सुरू झाला असे समजता येते.

निसर्गातील प्रत्येक बदलाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. पावसाळ्यात वातदोषाचा प्रकोप होतो, त्याचबरोबर पाण्यात वाढलेल्या आम्लतेने पित्तदोष साठायला सुरवात झालेली असते. पावसाळ्यातील थंड वातावरण बदलून त्याऐवजी तीव्र सूर्यकिरणे तळपू लागली व हवेतील उष्णता वाढली, की त्याचा परिणाम म्हणून अगोदर साठलेले पित्त अजूनच वाढते. पित्ताचा प्रकोप होतो. पित्ताचा प्रकोप झाला की पित्ताचे अनेक त्रास होऊ शकतात. म्हणून शरद ऋतूची सुरवात झाली, की लगेच पित्त संतुलनासाठी प्रयत्न करणे श्रेयस्कर असते.

पित्त खवळले तर... 
  • शरद ऋतूमध्ये पित्त वाढल्याने होऊ शकणारे त्रास पुढीलप्रमाणे सांगता येतात-
  • हातापायांच्या तळव्यांची आग होणे.
  • डोळे लाल होणे, जळजळणे, पापणीवर रांजणवाडी येणे.
  • शरीर स्पर्शाला गरम लागणे, ताप आल्यासारखे वाटणे.
  • अंगावर गळू येणे, त्यात पाणी किंवा पू होणे.
  • डोळ्यांसमोर अंधारी येणे, चक्कर येणे.
  • त्वचेवर लालसर पुरळ उठणे.
  • मळमळणे, डोके दुखणे, उलटी होऊन पित्त पडून जाणे.
  • घशाशी आंबट येणे.
  • तोंड येणे.
  • नाकातून रक्‍त येणे.
  • लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे.
  • फार तहान लागणे, पाणी प्यायले तरी समाधान न होणे.

अर्थात व्यक्‍तीची प्रकृती, तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराची प्रवृत्ती यासारख्या अनेक मुद्‌द्‌यांवरून यापैकी नेमका कोणता त्रास होईल व त्याची तीव्रता कशी असेल हे ठरत असते. मात्र, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शरद ऋतू सुरू होतो आहे याचे भान ठेवले, खाण्यापिण्यात, वागण्यात आवश्‍यक ते बदल केले तर हे त्रास टाळताही येऊ शकतात.

ऐसा घ्यावा आहार 
पित्त संतुलनासाठी शरद ऋतूत पुढीलप्रमाणे आहारयोजना करायला सांगितली आहे-
  • तत्रान्नपानं मधुरं लघु शीतं सतिक्‍तकम्‌ ।
  • पित्तप्रशमनं सेव्यं मात्रया सुप्रकांक्षितैः ।। ...चरक सूत्रस्थान
  • खाण्यापिण्यात मधुर रस म्हणजेच गोड चव मुख्य असावी.
  • पचण्यास हलके पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करावेत.
  • आहारात काही प्रमाणात कडू चवीच्या पदार्थांचाही समावेश असावा.
  • थंड स्वभावाचे, पित्तशमन करणारे अन्न सेवन करावे.

भारतीय उत्सव, परंपरा आणि आरोग्य यांचा कायम संबंध असतोच. शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या दिवशी खारीक, बदाम, खसखस, साखर वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून, चांदण्यात बसून पिण्याची प्रथा आहे. हा पित्तशमनाचा एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदाने फक्‍त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते. चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते. चांदीसुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्त संतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच.

शरद ऋतूत दूध, घरचे लोणी-साखर, साजूक तूप या गोष्टी अमृतोपम होत, कारण हे सर्व पित्तशमनासाठी उत्तम असतात. मुगाचे लाडू, नारळाची वडी, गोड भात, उकडीचे मोदक, दुधी हलवा, कोहाळेपाक हे गोड पदार्थही शरदामध्ये सेवन करण्यास योग्य असतात. कारले, कडवे वाल, मेथीची भाजी या चवीला कडवट असणाऱ्या भाज्याही अधूनमधून खाणे चांगले असते. साळीच्या लाह्या, मनुका, अंजीर, खडीसाखर हे पदार्थ सेवन करणे, फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, आवळा, डाळिंब, सफरचंद, केळे, ऊस यांना अधिक प्राधान्य देणे, मोरावळा, गुलकंद, दाडिमावलेह सेवन करणेही शरद ऋतूत पथ्यकर असते.

उकळून गार (सामान्य तापमानाचे) पाणी पिणे, पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्ये टाकणे हेसुद्धा या ऋतूत पित्त संतुलनास मदत करते.

भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, घोसाळी, दोडका, भेंडी, कोहळा, पडवळ, परवर, चाकवत, पालक अशा पचायला हलक्‍या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडणे; भाज्या करताना जिरे, हळद, धणे, कोकम, मेथ्या, तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरणे, हिरव्या मिरचीऐवजी शक्‍यतो लाल मिरची, आले वापरणे हेसुद्धा शरदात पित्त वाढू नये म्हणून मदत करणारे असते.

पित्तदोषाला प्रतिबंध 
शरदामध्ये पित्ताचा प्रकोप होतो हे आपण सुरवातीला पाहिले. कोणत्याही दोषाचा प्रकोप होतो तेव्हा तो दोष वाढलेला तर असतोच, पण स्वतःच्या स्थानातून बाहेर पडलेला असतो. म्हणूनच या अवस्थेत त्याला बाहेर काढून टाकणे सहज शक्‍य असते. साहजिकच शरद ऋतूमध्ये विरेचन करून प्रकुपित पित्तदोष शरीराबाहेर काढून टाकला, तर पुढे वर्षभर पित्तासंबंधी कोणताही विकार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अर्थात विरेचन म्हणजे नुसते जुलाबाचे औषध घेणे नव्हे, तर शास्त्रोक्‍त पद्धतीने स्वेदन, स्नेहन वगैरे सर्व पूर्वतयारी करून पित्तदोष लहान आतड्यापर्यंत आणून विरेचनाद्वारा शरीराबाहेर काढून टाकणे हे खरे विरेचन होय. प्रत्येक शरदात जर असे शास्त्रोक्‍त विरेचन करून घेतले तर पचन नीट राहणे, वजन नियंत्रणात राहणे, पर्यायाने कोलेस्टेरॉल, रक्‍तदाब, मधुमेह, हृद्‍रोग वगैरे सर्वच अवघड रोगांना प्रतिबंध करणे शक्‍य असते.

शरदामध्ये पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी नियमित पादाभ्यंग करणेसुद्धा अतिशय उपयुक्‍त असते. शतावरी कल्प, अविपत्तीकर चूर्ण, पित्तशांती गोळ्या वगैरे पित्तशामक रसायने, औषधे या ऋतूत घेणे; जागरणे, उन्हात जाणे टाळणे; धूम्रपान, मद्यपान, मांसाहार वर्ज्य करणे यासारखी काळजी घेतली तर शरदात पित्ताचा त्रास सहन करावा लागणार नाही, उलट शरदातील चांदण्याचा आनंद घेता येईल.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

चंद्राचा अमृतरस दुधात!


शुद्ध दुधाचे माहात्म्य जाणून घ्या. केवळ कोजागरीलाच नव्हे, तर रोजच पित्त शमन करण्यासाठी पाव कप थंड दूध थोडी साखर घालून घेण्यास आयुर्वेदाने सुचविलेले आहे. शरद ऋतूत प्रकुपित झालेला पित्तरूपी अग्नी सगळे अन्न जाळून टाकणार नाही, पण केवळ पचनासाठी मदत करेल, हे पाहणे इष्ट असते. सर्जनप्रक्रियेचे चक्र निरंतर सुरू राहावे, या हेतूने शरद पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणाऱ्या अमृताचा स्वीकार केलेले दूध सेवन केले जाते. सर्वांनी निसर्गाबरोबर आनंद साजरा करावा, या हेतूने कोजागरी साजरी केली जाते. 

शरद ऋतूचे आगमन झाले, पावसाळा संपला. पहिल्या पावसाचे पहिले थेंब मातीवर पडल्यावर येणारा सुवास प्रत्येक प्राणिमात्रास मोहित करतो. हा सुवास कशामुळे येतो व तो पसरतो कसा? उन्हाळ्याने पृथ्वीच्या मातीला भाजून काढलेले असते. गरम तव्यावर पाणी पडल्यास त्याचा सुंदर आवाज होऊन वाफ होऊन उडून जाते, तसेच पृथ्वीच्या पोटात साठवलेल्या उष्णतेमुळे पहिल्या पावसाच्या पाण्याची वाफ होते व या वाफेबरोबर भूमितत्त्वाचा वास सगळीकडे पसरतो व सर्व जण मोहित होतात.

पावसाळ्यामध्ये मनुष्याच्या शरीरात साठलेला पित्तदोष बाहेर ऊन पडल्यावर अशाच तऱ्हेने उफाळून येतो. शरीरातील पित्त काढून टाकण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला विरेचन विधी तसा वर्षभर करता येत असला तरी शरदात विरेचन विधी केल्यास शरीरात अनायासे प्रकुपित झालेले पित्त बाहेर टाकायला मदत होते. शरीरात झालेला अग्नीचा प्रताप म्हणजे पित्तदोष असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संपूर्ण जीवन माणसाच्या नात्यातील उष्णतेच्या उबेवर, कर्तृत्वशक्‍तीसाठी लागणाऱ्या अग्नीच्या शक्‍तीवर, शरीराचे व्यवहार नीट चालण्यासाठी हॉर्मोन्सच्या अग्नीवर अवलंबून असते. अग्नीला जीवनात एकूणच अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो अग्नी संतुलित राहावा व पित्तदोष वाढू नये ही अपेक्षा असते, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे रोग किंवा शारीरिक, मानसिक त्रास पित्तामुळेच होत राहतात. त्वचा लाल होणे, त्यावर बारीक पुटकुळ्या येणे, गांधी येणे, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, आंबट-कडू उलट्या होणे, छोट्याशा कारणाने राग येणे, राग मस्तकात जाणे, असे अनेक त्रास पित्तामुळे होत राहतात.

शक्तिपरिवर्तनासाठी... 
पित्तदोष वाढून त्रास होऊ नये यासाठी अनेक नियम सांगितलेले असतात. अग्नी हा वायूचा मित्र आहे. तेव्हा पित्तदोषाबरोबरच वातदोषही वाढतो व पावसाळ्यातील वातदोष पित्ताला उफाळण्यास मदत करत असावा. म्हणून वात-पित्ताची जोडी सांभाळावीच लागते. त्यासाठी आहार-विहारावर नियंत्रण ठेवावे लागते. निसर्गातील ऋतुबदल प्राणिमात्रांच्या शरीरातही परिणाम घडवतात. त्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने भारतीय परंपरेत सणावारांची योजना केलेली आहे.

ऋग्वेदातील पुरुषसूक्‍तातील 16 ऋचांपैकी सहाव्या ऋचेत म्हटले आहे-
यत्‌ पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत । 
वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः ।।6।। 

शरीराची व एकूणच आरोग्याची काळजी घेणारी व देवत्व धारण करणारी केंद्रे अन्नाचे ऊर्ध्वगमन करून शक्‍ती व जाणिवेत रूपांतर करण्यासाठी होणाऱ्या यज्ञाला वातावरणातील बदल जबाबदार असतात, असे या ऋचेत सुचविलेले आहे. वसंत ऋतू एक प्रकारे या सर्व क्रियेचे नियमन करतो व आज्य म्हणून मदत करतो; ग्रीष्म ऋतू अग्नी पेटविण्यासाठी व अग्नी प्रकट करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचे काम करतो व त्यातून शरद ऋतूत अन्न तयार होते, जे आहुती म्हणून यज्ञात द्यावे लागते. मनुष्याच्या जीवनातील सर्व स्थित्यंतरे या यज्ञावरच म्हणजे या शक्‍तिपरिवर्तनाच्या क्रियेवर चालतात. त्यासाठी आवश्‍यक असते अन्न. "अन्नाद्‌ भवन्ति भूतानि' म्हणजे सर्व प्राणिमात्र अन्नानेच अस्तित्वात येतात, अन्नानेच वाढतात, अन्नानेच त्यांचा उत्कर्ष होतो, असे म्हटलेले आहे. असे अन्न शरद ऋतूत शरीररूपी यज्ञात आहुतीरूपाने व्यवस्थित दिले गेले तर पुढे वर्षभर ताकद व स्फूर्तीचा लाभ होतो. पण या ऋतूत प्रकुपित झालेला पित्तरूपी अग्नी सगळे अन्न जाळून टाकणार नाही, पण केवळ पचनासाठी मदत करेल हे पाहणे इष्ट असते. म्हणून शरद ऋतूत प्रथम येणाऱ्या नवरात्रोत्सवात शक्‍तीची उपासना करून शक्‍तीला एका विशिष्ट मार्गाने आशीर्वादाच्या मर्यादेत आणून नंतर भौतिक पातळीवर शरद पौर्णिमेच्या दिवशी एक खास उत्सव केला जातो.

सर्जनाची प्रक्रिया जेथून सुरू झाली ते लक्षात राहावे या हेतूने ज्येष्ठ अपत्याला मान दिला जातो. नंतर हे चक्र सतत चालू राहावे या हेतूने शरद पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणाऱ्या अमृताचा दुधामध्ये स्वीकार करून ते दूध सेवन करावे आणि सर्वांनी निसर्गाबरोबर आनंद साजरा करावा, या हेतूने कोजागरी साजरी केली जाते. आपल्या शरीरात होणारे बदल बाहेरील निसर्गात होणाऱ्या बदलांना समांतर राहिले तर आयुष्य व्यवस्थित राहते, अन्यथा ऋतुमानातील प्रत्येक बदल प्रकृती अस्वास्थ्य उत्पन्न करू शकतो.

पित्त शमवणारी कोजागरी 
शरीरात साठलेले पित्त शरद पौर्णिमेला किंवा कोजागरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता दूध पिऊन शांत व्हावे ही झाली सुरवात; परंतु संपूर्ण शरद ऋतूत किंवा एरवीही वाढलेल्या पित्ताचे शमन करण्यासाठी पाव कप थंड दूध थोडी साखर घालून घेण्यास आयुर्वेदाने सुचविलेले असते. शरीरातील पित्त अशा प्रकारे संतुलित राहिल्यानंतर वर्षभर शरीराला ताकद मिळू शकेल, असे अन्न दीपावलीच्या निमित्ताने प्रत्येकाने खावे, अशी योजना असते. ही सर्व उत्सवांची योजना पाहिल्यानंतर भारतीय परंपरा व आयुर्वेद एकमेकांत हात घालून कसे जातात व एकूण मनुष्यमात्राचे जीवन सुखी कसे करतात, हे लक्षात येईल.

प्रत्येकाने दूध अवश्‍य प्यावे, पण ते होमोजिनाइज केलेले नसावे. शुद्ध ताजे दूध मिळाले तर उत्तम, अन्यथा पाश्‍चराइज केलेले दूध चालू शकते; पण ते उकळण्याच्या बिंदूपर्यंत किंवा साय धरून फुगा येईल इथपर्यंत एकदा तापवलेले असावे. ज्या दुधात किमान पाच-सात प्रतिशत स्निग्धांश आहे असे दूध अमृतासमान असते व ते शरीराला कायम उपयोगी पडू शकते. दूध हे रोगहारक आहे. दुधाचा सत्त्वांश म्हणजे तूप. पारंपरिक व आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले तूप अमृतासमान असते व ते आरोग्यासाठी अप्रतिम असते, हे लक्षात ठेवून दीपावलीच्या शुभमुहूर्तावर तुपाचा उपयोग संपूर्ण स्वयंपाकासाठी करावा. योग्य प्रकारे बनविलेले तूप सेवन केले असता शरीरातील अतिरिक्‍त चरबी तर घटतेच, पण शरीरात साठलेले इतर दोष शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते. अमृताने जसे आयुष्य वाढते तसे तुपामुळे शरीरातील दोष दूर झाल्यानेही आयुष्य वाढते.

या कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनाच या अमृताचा लाभ व्हावा व आता तरी शुद्ध दुधाचे माहात्म्य ओळखून पुन्हा एकदा भारतवर्षात शुद्ध दुधाचे पर्व सुरू होईल हा विश्‍वास! 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

ad