Showing posts with label शांत झोपेसाठी. Show all posts
Showing posts with label शांत झोपेसाठी. Show all posts

Thursday, January 28, 2010

झोप न लागणे

  डॉ. ह. वि. सरदेसाई
झोप न येणे हे दुर्लक्ष करण्याजोगे लक्षण नाही. निद्रानाशामागचे कारण शोधून त्यावर उपचार करणे महत्त्वाचे असते. झोपेचे औषध घेणे हा क्वचितच योग्य उपचार ठरतो. किंबहुना बहुतेक वेळा तो चुकीचाच मार्ग ठरतो.

आपल्याला पुरेशी झोप येत नसल्याची तक्रार अनेकांची असते. तथापि, झोप लागावयाला लागणाऱ्या वेळेचा अंदाज बहुतेकांचा बरोबर नसतो. आपण जास्त वेळ जागे होतो, असे व्यक्तीला वाटत राहते. त्याचप्रमाणे आपल्याला झोप फारच थोडा वेळ लागल्याचे वाटणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या अंदाजाच्या मानाने जास्त वेळ झोप लागलेली असते. हे खरे असले तरीही झोप अनेक कारणांनी कमी पडू शकते. जेव्हा झोप मानसिक तणावांनी कमी पडते, तेव्हा बहुतेक वेळा झोप लागावयाला लागणारा वेळ लांबलेला असतो. जेव्हा माणसाला खिन्नता येते तेव्हा सहसा जाग पहाटे लवकर येते व फक्त झोप लागत नाही. शारीरिक आजारांनी झोपेत मधे मधे व्यत्यय येत राहतो.

झोप न येणे हे दुर्लक्ष करण्याजोगे लक्षण नाही. निद्रानाशामागचे कारण शोधून त्यावर उपचार करणे महत्त्वाचे असते. झोपेचे औषध घेणे हा क्वचितच योग्य उपचार ठरतो. किंबहुना बहुतेक वेळा तो चुकीचाच मार्ग ठरतो. बहुतेक झोपेच्या औषधांची सवय लागते. सवय लागली की हळूहळू औषधाची मात्रा (गोळ्यांचा डोस) वाढवावी लागते. डोस जास्त झाला की औषधांचे नको असणारे परिणाम (दुष्परिणाम) होऊ लागतात. दिवसा मांद्य येऊ लागते. चालताना तोल जाऊ लागतो. पडण्याची भीती असते. पडून हाडे मोडणे व इतर इजा होतात, वाहन चालविताना वेग व अंतर यांचे अंदाज चुकतात, रक्तदाबावर अनिष्ट परिणाम होतो. उभे राहिल्यावर रक्तदाब कमी होण्याची शक्‍यता असते.

कमी झालेल्या रक्तदाबामुळे उभ्या स्थितीत मेंदूला रक्ताचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यांसमोर अंधेरी येणे, तोल जाऊन पडणे असे प्रकार होतात. अनेक औषधांमुळे यकृताच्या व मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात. बऱ्याच औषधांनी मांड्यांचे स्नायू कमजोर होऊ लागतात व जिने चढणे कठीण होते. शिवाय बहुतेक औषधांनी आलेल्या झोपेने झोप आल्यावर ताजेतवाने वाटत नाही. एकूण झोपेची औषधे घेण्याचा निर्णय फक्त उपचार करणाऱ्या आपल्या डॉक्‍टरांनीच घ्यावा.परिस्थितीत तणाव व मानसिक चिंता हे झोप येण्याला वागणाऱ्या विलंबाचे महत्त्वाचे कारण आहे. त्याचबरोबर चहा, कॉफी किंवा धूम्रपान अशांचे सेवन हेही मेंदूला उत्तेजक ठरते. चहा-कॉफी इत्यादींमध्ये असणारा कॅफेनचा रेणू मेंदूला उत्तेजक असतो, तर धूम्रपानामुळे मिळणारा निकोटीनचा रेणूदेखील उत्तेजक असतो. मद्यपानामुळे येणारा इथाईल अल्कोहोलचा रेणू उत्तेजक नसतो; परंतु त्यामुळे लघवी जास्त होते व झोपमोड होत राहते.

ज्या व्यक्तींना पोटभर अन्न मिळत नाही, त्यांनाही झोप लागणार नाही हे सर्वश्रुत आहेच. झोप नीट न लागण्याची कारणे मानसिक अस्वस्थता असतात. "मॅनिया' या आजारात व्यक्ती अतिउत्साही असते. रात्रभर जागे राहूनही थकण्याचा नामनिशाणा नसतो. चिंतातूर व्यक्तींना झोप लागण्यास वेळ लागतो व खिन्नतेमुळे सहसा सकाळी लवकर जाग येते, हे आपण पाहिले आहे. रात्री झोपेत दचकणे हे चांगल्या प्रकृतीतदेखील होऊ शकते. कधी कधी लहान मुलांना रात्री झोपेत जाग येते व मोठ्याने रडतात, ओरडतात, याला नाईट-मेअर्स nightmares म्हणतात. या प्रसंगाची दुसऱ्या दिवशी मुलाला आठवण नसते. नाईट-मेअर्समुळे अपाय होत नाही, त्याला औषधांची गरज नसते. त्या वेळी मुलाला थोपटून परत झोपविणे एव्हढेच गरजेचे असते. दुसऱ्या एका प्रकारात मुलाला रात्री झोपेत भीतीदायक स्वप्न पडते. (night terrors) मूल घाबरून जागे होते, ओरडते, कधी कधी भीतीमुळे घाम येतो, अशा वेळी मुलाला जागे करावे व आलेला अनुभव स्वप्नाचा होता, असे समजवावे.

मूल परत झोपी जाईल, हा अनुभव दुसऱ्या दिवशी मुलाच्या लक्षात असतो व झोपेतील भीतीदायक स्वप्नही आठवते. वारंवार भीतीदायक स्वप्ने पडत राहिली, तर समुपदेशनाची (Child guidence/ councelling) आवश्‍यकता असते. रात्री झोपेत लघवी होणे हे बहुतेक वेळा लहान वयात घडते; पण मोठ्या व्यक्तींनादेखील असा त्रास होऊ शकतो. रात्री लघवी कपड्यात (बिछान्यात) होण्यास मानसिक तणाव कारणीभूत असावेत, असा वैधकशास्त्राचा पूर्वी समज होता. आता या विकाराला (nocturnal enuresis) काही तरी शारीरिक कारणच असावे, असे मानले जाते. मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पिट्युटरी ग्रंथीतून स्त्रवला जाणारा अँटी डाययुरेटिक हार्मोन (Antidiuretic hourmon) हा स्राव कमी पडण्याने अशी लघवी होते. या स्रावाचा नाकात उडविला जाणारा फवारा बाजारात मिळू शकतो. याच्या वापराने हा त्रास ताब्यात आणता येतो. मुलाला रागावणे किंवा अपराधीपणाची भावना निर्माण करणे या प्रकारांनी हे दोष वाढतात. कधी कधी वहनीतील दोषांमुळे, तर कधी कमरेच्या मणक्‍यातील दोषांमुळेसुद्धा असे घडते. योग्य मूत्रविकारतज्ज्ञांचे मत घेऊन उपचार करावेत.

झोपेत वारंवार व्यत्यय येण्याचे एक गंभीर कारण म्हणजे झोपेत श्‍वास थांबणे, स्वीप एप्नीया सिंड्रोण (slap apnoea syndrone) रात्री झोप नीट न लागण्याने दिवसा व्यक्तीला वारंवार डुलक्‍या येऊ लागतात. वाहन चालविताना मोठाच धोका निर्माण होतो. टाळू, पडजीभ आणि जीभ यांच्यामुळे श्‍वास क्षणमात्र रोखला जातो व व्यक्तीला जाग येते. प्राणवायूचा पुरवठा खंडित होण्याचा दुष्परिणाम फुफ्फुसे व हृदयावर होतो. रक्तदाब वाढतो, मूत्रपिंडांवर विपरीत परिणाम होतो. ज्या व्यक्ती रात्री झोपेत घोरतात, त्यांचे घोरणे अकस्मात बंद होते. वजन जास्त असणे, मानेचा परीघ वाढलेला असणे, पोट सुटणे इत्यादींमुळे हा विकार विकोपाला जातो. झोपेचा अभ्यास करणाऱ्या "निद्रा-प्रयोगशाळे'त तपासणी करून उपचार करून घेणे महत्त्वाचे आहे. हा आजार अंगावर काढू नये. 
 
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Wednesday, August 5, 2009

शांत झोपेसाठी

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत आपल्याला अनेक सुखे मिळत असली, तरी काही गोष्टी आपल्यापासून दूरही जातात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे शांत झोप. झोप छान लागावी, यासाठी लगेच अंमलात आणता येतील, असे काही कानमंत्र.
शहरी, धकाधकीच्या जीवनात आपण ज्या गोष्टी गमावतो, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. "काही मिळो न मिळो; पण रात्री शांत झोप लागली पाहिजे' असा आपला ऍटिट्यूड असतानाही सगळ्यात दुर्मिळ होते ती झोपच... मग दुसऱ्या दिवशी निरुत्साह, दिवसभर जांभया, अंगात कणकण, डोळे जळजळणे यांसारख्या गोष्टी हटकून वाट्याला येतात. मग त्या दिवशी लगेच आपण उपायही चालू करतो - कडक चहा किंवा कडक कॉफी किंवा कडक चहा आणि नंतर कडक कॉफी, "रेड बूल'सारखी एनर्जी ड्रिंक्‍स इनकमिंग फ्री या न्यायाने दिवसभर आपल्या पोटाची वाट धरतात.
या सगळ्यात आपल्याला एक गोष्ट लक्षातच येत नाही, की "आदल्या दिवशी आपली झोप नीट झालीच नव्हती!' त्यावर काही उपाय नको का करायला? कारण "झोप नीट व्हावी' यासाठी काही प्रयत्नच आपण केले नाहीत, तर "नाही रे, खरंच चहा- कॉफी हा कॉम्बो जाम आवडतो!' असं काहीसं बाष्कळ बोलायची वेळ आपल्यावर येते. खरे म्हणजे झोप नीट येण्यासाठी फार काही करावे लागत नाही आणि "फक्त मनोनिग्रह असला म्हणजे बास' असे मी म्हणणार नाही, कारण "... फक्त मनावर कंट्रोल हवा' असं म्हटल्यावर चेहरे किती पडू शकतात हे मला ठाऊक आहे... शांत झोपेसाठी फक्त ५ टिप्स.
१) सवय जागेची - चांगल्या झोपेसाठी झोपेशी संबंधित बहुतेक गोष्टींची सवय असणे हा एक मस्त उपाय आहे. झोपेशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जिथे झोपतो ती जागा. टीव्ही बघत बघत सोफ्यावर झोपणे, गप्पा मारत मारत दिवाणखाण्यातच "पडणे' यांसारखे प्रकार चांगल्या झोपेला अत्यंत घातक. तुमचा बेड, तुमच्या बेडवर तुमची जागा रोज एकच ठेवणे, ही गोष्ट अवघड आहे का? चांगली झोप ही एक सवय असते आणि त्या सवयीची सुरवात जागेच्या सवयीने करा.
याशिवाय झोपायची जागा, तिथला प्रकाश, खेळती हवा याही गोष्टी शांत झोपेसाठी प्रचंड महत्त्वाच्या आहे. हवा- प्रकाश त्यातल्या त्यात शक्‍य तेवढा नैसर्गिक ठेवा.
२) सवय वेळेची - लॉग टर्ममध्ये कदाचित हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाचे एक स्वतःचे असे बायॉलॉजिकल घड्याळ असते. आज मनाच्या मुसक्‍या बांधून रात्री दहाला, उद्या सारेगम बघून मग अकराला, असे तुम्ही केलेत तर तुमचे बायॉलॉजिकल घड्याळ पार बिघडून जाईल. झोपेची एक वेळ पाळणे ही आजच्या लाईफस्टाईलमध्ये सोपी गोष्ट नाही. पण ती अशक्‍यही नाही. वेळेचा काहीतरी सुवर्णमध्य गाठणे नक्कीच शक्‍य आहे. रात्री अकरा ही त्या दृष्टीने मस्त वेळ आहे. जेवणे आटोपलेली असतात. टीव्हीचा प्राईम टाईम संपलेला असतो. पार्टीतून सटकण्यासाठीही ही वेळ खूपच बावळू नाही इ. अकराचे तुम्ही दहा-साडेदहा किंवा अगदी साडेअकराही करू शकता - ठरवलेली वेळ पाळणे महत्त्वाचे.
३) "मला झोप आली नाही, मी झोपणार नाही!' - तुम्ही टीप नं . २ पाळत असाल तर हे वाक्‍य स्वतःला ऐकवायची गरज तुम्हाला पडणारच नाही. पण बेडवर झोपण्यासाठी अंग टाकल्यावर १५ मिनिटांत झोप लागली नाही तर तडक उठून झोपेचा विचार तूर्त मनातून काढून टाका. झोप आली की त्यासाठी कसलाही पुरावा लागत नाही. याच टीपचा सख्खा भाऊ म्हणजे "मला झोप आली आहे, मी आत्ता, ताबडतोब झोपणार'. हे करण-अर्जुन पाळाच पाळा.
४) दाबून जेवण, भरपूर पाणी झोपेच्या आधी नको रे बाप्पा! - पोटात अन्न-पाणी गेले की अन्नपचनाच्या नैसर्गिक प्रक्रिया चालू होतात आणि रात्रभर सलग झोपेसाठी या प्रक्रियांना काही वेळ द्यावाच लागतो. झोपेआधी किमान दोन तास जेवण करा. जेवताना भरपूर पाणी प्यायचे टाळा.
याचप्रमाणे, व्यायाम करून लगेच झोपू नका.
५) "सेकंड हाफ - नो कॅफीन' - काय करणार? ऑफिसमध्ये सतत चहा होतो' ही एक कॉमन तक्रार असते. यात काही प्रमाणात तथ्य असले तरी एक सोपा नियम करा. "सेकंड हाफ - नो कॅफीन'. साधारणपणे दुपारच्या जेवणानंतर चहा- कॉफी घेऊ नका. याचा रात्रीच्या झोपेवर होणारा परिणाम संशोधनाने सिद्ध झाला आहे.
याशिवायही अनेक टिप्स तुम्हीही सांगू शकाल. खाली कॉमेंट्‌समध्ये त्या जरूर नोंदवा.
(सौजन्य - http://ffive.in )

ad