Friday, November 26, 2010

तणावमुक्तीसाठी केळे

मालविका करकरे
केळे म्हणजे बाराही महिने उपलब्ध असणारे फळ. आरोग्याच्या दृष्टीने केळ्याचे चांगले-वाईट गुणधर्म आहेत; ते जाणून अधिक डोळसपणे केळ्याचा आहारात उपयोग करता येऊ शकतो.

कदली, केला, Musa Paradisiaca Banana अशा नावांनी केळे प्रसिद्ध आहे. केळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे उत्पादन भारतात होते. आपल्या देशात सर्वत्र केळी होतात. केळ्याचे मूळ स्थान भारत व दक्षिण आशियाचा प्रदेश आहे. कुठल्याही शुभ कार्यात केळ्याचे महत्त्व आपण मानतो. सत्यनारायण पूजा, गृहप्रवेश, लग्नकार्य अशा शुभकार्यामध्ये केळीचे खुंट वापरले जातात.

केळ्याचे प्रकार व उत्पादन
केळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या मध्यभागातून एक दांडा फुटतो. या दांड्याच्या अग्रभागी लाल फुले येतात. या फुलांचेच पुढे केळ्यात रूपांतर होते. केळ्याच्या एका घडात तीनशे ते चारशे केळी तयार होतात. केळ्याच्या फुलाला "केळफूल' म्हटले जाते. आपल्याकडे व कोकणात केळफुलाची अत्यंत चविष्ट अशी भाजी करतात. आपल्याकडे, कोकणात व दक्षिण भारतात घरोघरी केळीची झाडे आढळून येतात. जगभरात 107 देशांमध्ये केळ्याची पैदास होते. भारतात अनेक जातींची केळी पाहायला मिळतात. रानात आपोआप उगवणारी रानकेळी, रंगभेदानुसार पिवळ्या सालींची केळी, हिरव्या सालींची केळी आणि लाल सालींची केळी असे काही प्रकार आहेत. वेलची केळी आकाराने लहान असतात. पांढरी जात असलेली वेलची केळी जणू साखरच वाटते. आपल्याकडे माणिक्‍यकदली, अमृतकदली, चंपाकदली, चंपाचीनी, मर्त्यकदली, रामकला, त्रिकोणी, जाड सालीची केळी अशा सर्व जाती आढळतात, तर परदेशात  Dessert Banana व Cooking Banana  असे प्रकार पडतात.

केळे पिकताना त्यात ethylene नावाचे plant harmone तयार होते, ज्यामुळे केळ्याला स्वाद निर्माण होतो. तसेच केळ्यातील isoamyl acetate हा घटकही केळ्याला स्वाद आणतो. केळ्यापासून जॅम, चिप्स, केळ्याचे पीठ असे अनेक पदार्थ बनविले जातात. केळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे केळी बाराही महिने सहज उपलब्ध असतात.

असे म्हटले जाते, की सकाळी केळे खाल्ले, तर त्याची किंमत तांब्याइतकी असते, दुपारी खाल्ले, तर त्याची किंमत चांदीइतकी असते आणि संध्याकाळी खाल्ले, तर त्याची किंमत सोन्याइतकी असते. केळ्यामधील ग्लुकोजमुळे त्याला गोडी येते. ग्लुकोज ही नैसर्गिक शर्करा आहे, ज्यामुळे पोषण व शक्ती पुरविण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार दूध व केळ हे विरुद्ध अन्न आहे.

पौष्टिक केळीपौष्टिकतेच्या दृष्टीने केळे अत्यंत मौल्यवान आहे. त्यात पोटॅशिअम, मॅंगनीज, लोह व तांबे असते, भरपूर प्रमाणात कर्बोदकेही आढळतात. केळ्यातील जीवनसत्त्व "क' गुणकारी ठरते; कारण आपण सोलून लगेच ते सेवन करतो. त्यावर कुठलीही प्रक्रिया न झाल्याने जीवनसत्त्वांचा ऱ्हास होत नाही. केळ्याला मधुर, थंड, स्निग्ध म्हटले जाते. ते पुष्टीकारक व रुची आणणारे असते. शरीराला उष्मांक पुरवण्याची शक्ती इतर फळांपेक्षा केळ्यात अधिक असते. केळ्यामध्ये अल्फा कॅरॉटिन व बीटा कॅरॉटिन ही कॅरॉटिनाईड फायटोकेमिकल्स असतात. कच्च्या केळ्यात स्टार्च व सेल्युलोज जास्त असते. केळ पिकले, की या स्टार्चचे रूपांतर सुक्रोज, फ्रुक्‍टोज व ग्लुकोज या साध्या रेणूंच्या कार्बोहायड्रेट्‌समध्ये होते म्हणून कच्चे केळे बद्धकोष्ठतेवर व पिकलेले केळे जुलाबावर खाण्यास दिले जाते. केळ्यात ए, बी, ई, एच ही जीवनसत्त्वेही आढळतात.

केळ्याची निवड
केळी घेताना ती कधी खायची आहेत, ते ठरवून त्यानुसार घ्यावीत. ते ताजे असावे. पूर्ण काळे, तुटलेले निवडू नये. पिवळे केळे आणि त्यावर काळे ठिपके असतील, तर ते अधिक गोड असते. पिकलेले, स्वादाचे केळे निवडावे. केळी उघड्यावरच जाळी घालून ठेवावीत. सर्व वयोगटासाठी उपयुक्त असणारे केळे हे सहज व कमी खर्चात मिळणारे असल्याने आहारात अवश्‍य वापरावे असेच आहे.

रंभारस
साहित्य ः ताजी पिकलेली दोन केळी, दीड लिटर दूध, सात ते आठ चमचे साखर, अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, काजू, बदाम, खजूर, काळ्या मनुका अर्धी वाटी, दोन छोटे चमचे वेलची व जायफळ पूड.
कृती ः गॅसवर दूध उकळून एक लिटरपर्यंत करावे. मग दुधात क्रमाक्रमाने ड्रायफ्रुट्‌स घालून त्यात नारळाचा चव घालावा व शिजवावे. सर्वांत शेवटी साखर घालावी. रंभारस वाढताना पाच मिनिटे आधी केळ्याच्या गोल पातळ चकत्या आटवलेल्या दुधात घालाव्यात व रंभारस वाढावा.

केळ्यांविषयी थोडक्‍यात* केळे व तूप यांनी पित्तदोष कमी होतो.
* केळ्यांमुळे आतड्यातील काही जिवाणूंना पुष्टी मिळते व या जिवाणूंना हानिकारक असणाऱ्या इतर जिवाणूंचा नाश होतो.
* केळफुलाचा वापर मधुमेहींसाठी नक्कीच उपयुक्त ठरतो.
* पूर्ण पिकलेल्या केळ्यात antifungal, antibiotic गुणधर्म असतात. केळे हे पोटॅशिअमचा चांगला स्रोत व सोडियमचे प्रमाण कमी असलेले फळ आहे. त्यामुळे रक्तदाबाच्या आजारावर मात करण्यास उपयुक्त ठरते.
* केळ थंड व भरपूर कर्बोदकेयुक्त असल्यामुळे सकाळी अस्वस्थपणा जाणवत असताना खाल्ले, तर गुणकारी ठरते.
* गोड खाणाऱ्यांसाठी केळे उपयुक्त असते.
* केळ्याला mood-food म्हटले जाते. केळ्याचे सेवन केल्याने ताणतणाव दूर होण्यास मदत होते.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad