Sunday, August 2, 2009

प्राणिक हीलिंग

सध्याच्या काळात माणसाला अनेक प्रकारच्या विकृती, रोग यामुळे दुःख सहन करावे लागते, याची कारणे योग्य आहाराची कमतरता, व्यायाम न करणे, मानसिक ताणतणाव आणि भौतिक मोबदल्यासाठी निर्माण झालेली तीव्र इच्छाही होते.
यावर अतिशय परिणामकारकपणे, कोणतेही औषध न घेता, अगदी साधे, शास्त्रीय, नैसर्गिकपणे बरे होण्याचे तंत्र म्हणजे "प्राणिक हीलिंग'. आणि हे तंत्र शोधून काढले आहे मूळ चीनचे रहिवासी गुरू मास्टर चोआ कोक सुई यांनी. पण नंतर ते फिलिपाइन्सचे रहिवासी झाले. प्राणिक हीलिंगचे तंत्र चीन, तिबेट आणि थायलंड या जवळच्या शेजारील राष्ट्रांत विकसित झाले आणि मास्टर चोआ कोक सुई यांनी अतिशय काळजीपूर्वक या पद्धतीचे संशोधन करून हे प्राचीन तंत्र विकसित केले व त्याचे संपूर्ण शास्त्रीय परिभाषेत रूपांतर केले. जागतिक प्राणिक हीलिंग फाउंडेशनची मनिला येथे स्थापना केली.
"प्राणिक हीलिंग' म्हणजे काय व ते कसे कार्य करते?
"प्राणिक' हा शब्द संस्कृत भाषेतील असून, त्याचा अर्थ प्राण, म्हणजेच महत्त्वाची ऊर्जा अथवा वैश्‍विक जीवनशक्ती असा आहे. "प्राण' ही ऊर्जा शरीर उत्साही व निरोगी ठेवण्यास जबाबदार असते. ही ऊर्जा शरीराभोवती असते व ती ऊर्जाकेंद्र तयार करते व ती सर्वानुमते "ऑरा' किंवा "बॉयप्लास्मिक बॉडी' या नावाने ओळखली जाते. ती कीर्लियन फोटोग्राफीच्या साह्याने दिसू शकते.

"प्राणिक हीलिंग' कशा रीतीने करतात?
मूलतः "प्राणिक हीलिंग' हे बॉयोप्लास्मिक बॉडी व आभा मंडळ (ऑरा) यांच्यावर उपाययोजना करण्यात गुंतलेले असते. ही उपाययोजना अगदी साध्या पद्धतीने सिद्धीस नेली जाते. त्यामध्ये शरीरातील रोगट झालेल्या शक्तीला दूर करून, म्हणजेच शरीर स्वच्छ करून शरीरात ताजा प्राण किंवा महत्त्वाची ऊर्जा पुन्हा भरून शरीर जोमदार बनविण्याचे काम केले जाते. ताजी व महत्त्वाची जीवनशक्ती यांचा समावेश करताच संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह व ऊर्जेचे वहन होऊन शरीर सुधारते आणि शरीराला स्वतःहोऊनच बरे करण्याची क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढते. ही बरे करण्याची शक्ती तीन जीवनावश्‍यक नैसर्गिक मूलतत्त्वांतून- म्हणजेच हवा, सूर्य व जमीन यातून- मिळविली जाते. चौथे मूलतत्त्व म्हणजे "ईश्‍वरी प्राण'- की जे बरे करण्याला मदत होते, ते ईश्‍वराच्या आध्यात्मिक धाग्याने मिळते. अशा रीतीने बरे करणारा "प्राणिक हीलिंग'मध्ये शक्ती भरतो आणि त्यायोगे आजारी व्यक्तीची प्रतिकार शक्ती वाढविण्याची व्यवस्था करतो. "प्राणिक हीलिंग'ची पद्धत वापरून रोग बरे करता येतात, कमी करता येतात व त्यांना प्रतिबंधही करता येतो. सर्व प्रकारचे शारीरिक, भावनिक, मनोविकार व मानसिक विकार, अशा कठीण प्रश्‍नांच्या बाबतीत गोष्टी बऱ्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात "प्राणिक हीलिंग'चा वापर होऊ शकतो. ही बरे करण्याची उपाययोजना "जलद परिणामकारक असून, त्याचा परिणाम डोकेदुखी, घशाची सूज, गालगुंड, अल्सर, गॅस्ट्रो, दमा, फुफ्फुसांचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मुतखडा, स्त्रियांचे विकार, अशा अनेक किरकोळ व कठीण आजारांमध्ये त्वरित मिळू शकतो. ही पद्धत भावनिक व मानसिक दुःखांच्या बाबतीत, म्हणजेच शरीर व मन यांच्या संतुलनातील बिघाड, स्किझिओफ्रेनिया, मनाची दुर्बलता, सेलेब्रल पाल्सी, एपिलेप्सी अशा रोगांच्या बाबतीतही फायदेशीर ठरली आहे.

इतर फायदे
सर्वसामान्य बरीच दुःखे कमी करीत असतानाच "प्राणिक हीलिंग' शरीराची शक्ती वाढविते. रोगमुक्त होण्याची शक्ती वाढविते. भावनांचे सांत्वन करते व व्यक्तीचे "चांगले' जगणे वाढविते. अशा प्रकारे व्यक्तीच्या जीवनाचा दर्जा वाढविते.
"प्राणिक हीलिंग' शारीरिक, मानसिक, भावनिक विशेष गुणधर्म वाढविते. उदाहरणार्थ- स्वभाव, वृत्ती, वैयक्तिक ताकद, शिकण्यासाठी लागणारी वाढीव क्षमता, मुलांची बुद्धी व एखाद्या व्यक्तीमधील शारीरिक व्यायाम व खेळ यामध्ये मिळवायचे प्रावीण्य, इत्यादीमध्ये "प्राणिक हीलिंग'चा उपयोग होऊ शकतो.
"प्राणिक हीलिंग' योगाने एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रोग दिसण्यापूर्वीच तो शोधून काढणे व मोठ्या प्रमाणावर तो नाहीसा करणे शक्‍य होते.
ही पद्धत म्हणजे बिनखर्चाचे वैद्यकीय साधन असून, त्यासाठी खर्चिक औषधी गोळ्या व रोगनिदान शास्त्राच्या कसोट्यांची गरज नाही. या पद्धतीत वैश्‍विक शक्तीला प्रबळ गुणकारकता आहे.व्यक्तीला संपूर्णपणे रोगमुक्त करण्याच्या या पद्धतीच्या मुळाशी आध्यात्मिक प्रगती आहे.
सुरेखा आलमेलकर, बेंगळुरू

No comments:

Post a Comment

ad