Friday, November 5, 2010

आरोग्य दीपावली

डॉ. श्री बालाजी तांबे


दीपावली म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा महोत्सव. भारतातील सर्वात महत्त्वाचा व सर्वात मोठा असा हा सण साजरा करण्याबरोबर आरोग्याची जोपासना हा हेतूही असतोच. पावसाळ्यातील दमटपणा, अंधार, मरगळ दूर सारून पुन्हा उत्साहाने वर्षाची सुुरुवात व्हावी यासाठीच जणू दीपावली येते. पावसाळ्यात मंदावलेला अग्नी दीपावलीच्या सुमारास हळूहळू पुन्हा बलवान होण्यास सुरुवात होते.
दीपावली म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा महोत्सव. भारतीय दिनगणनेनुसार दीपावली आश्‍विन महिन्याच्या शेवटी व कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला असते. भारतातील सर्वात महत्त्वाचा व सर्वात मोठा असा हा सण साजरा करण्याबरोबर आरोग्याची जोपासना हा हेतूही असतोच. पावसाळा संपता संपता दीपावली येते. पावसाळ्यातील दमटपणा, अंधार, मरगळ दूर सारून पुन्हा उत्साहाने वर्षाची सुुरुवात व्हावी यासाठीच जणू दीपावली येते. पावसाळ्यात मंदावलेला अग्नी दीपावलीच्या सुमारास हळूहळू पुन्हा बलवान होण्यास सुरुवात होते. पचनात सुधारणा ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने सर्वात अनुकूल असते. सण, उत्सव म्हटला की खाणे-पिणे महत्त्वाचे असतेच. पण दीपावलीच्या या उत्सवात भारतीय संस्कृतीने आहाराबरोबरच शारीरिक, मानसिक आचार-विचार, प्राणी, निसर्ग, देव-देवता, नातेसंबंध, सृजनता अशा सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. या सर्वांचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतो.

निसर्गाशी संतुलित संबंधदीपावलीची सुरुवात होते आश्‍विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी म्हणजे वसुबारसेने. उत्सवाचा पहिला मान दिला जातो तो निसर्गाला, पशुधनाला. सवत्स गाईचे पूजन करून तिला चांगले अन्न देऊन आरोग्यासाठी प्राण्यांची आवश्‍यकता आहे यावर जणू दरवर्षी शिक्कामोर्तब केले जाते. दीपावलीच्या सणात प्राण्यांनाही समाविष्ट करून घेण्याने मनुष्य-निसर्गाचा संबंध संतुलित असल्याचीही ग्वाही मिळते.

वसुबारसेनंतर येते धनत्रयोदशी. आयुर्वेदाची देवता म्हणजेच पर्यायाने आरोग्याची देवता असणाऱ्या धन्वंतरीची पूजा या दिवशी केली जाते. धन्वंतरींनी हातात घेतलेले जलौका व अमृतकलश हे योग्य वेळी शरीरशुद्धी व नियमित रसायन सेवन यांचे द्योतक असतात. शरद ऋतूत शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन, बस्ती वगैरे उपचार करून घेतले आणि दीपावलीपासून प्रकृतीला अनुरूप व संपन्न वीर्यवान औषधांपासून तयार केलेले रसायन सेवनास सुरुवात केली तर ते आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरावे. शरद ऋतूत पित्तदोषाचा प्रकोप होत असतो. या पित्ताला संतुलित करण्यासाठी दीपावली उत्सवाच्या पूजेत साळीच्या लाह्या, धणे यांचा प्रसाद दाखविला जातो व सेवन केला जातो.

अभ्यंगाचे महत्त्वयानंतर येतात नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत असते. अभ्यंग आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा असतो हे आयुर्वेदातील या श्‍लोकावरून समजते.

अभ्यन्नित्यं स जराश्रमवातहा ।दृष्टिःप्रसादपुष्ट्यायुः स्वप्नसुत्वकत्व दार्ढ्यकृत्‌ ।।

*  अभ्यंगाने म्हातारपण उशिरा येते, वय वाढले तरी त्यामुळे होणारा त्रास वाचतो.
*  शरीरश्रमांनी आलेला थकवा नष्ट होतो.
*  वातदोष संतुलित राहतो, त्यामुळे वातरोगांना प्रतिबंध होतो.
*  डोळ्यांची शक्‍ती चांगली राहते.
*  शरीरबांधा व्यवस्थित राहतो.
*  दीर्घायुष्याचा लाभ होतो.
*  झोप शांत लागण्यास मदत होते.
*  त्वचेचा वर्ण उजळतो, त्वचा सुकुमार, मऊ, स्निग्ध राहते.
*  त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

अर्थात हे सर्व फायदे मिळण्यासाठी तेलही औषधांचा विधिपूर्वक संस्कार करून तयार केलेले असावे लागते. त्वचेतून आतपर्यंत जिरणारे, फक्‍त त्वचेलाच नाही तर संपूर्ण शरीराला उचित स्निग्धता देण्यास सक्षम असणारे तेल वापरणे श्रेयस्कर असते.

नितळ त्वचेसाठी उटणे
अभ्यंगस्नानात अभ्यंगाबरोबरच उटण्याचाही समावेश असतो. आयुर्वेदात उटणे लावण्यास उद्वर्तन म्हटले जाते.
उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ ।स्थिरीकरणमानां त्वक्‌ प्रसादकरं परम्‌ ।।
उटण्याने अनावश्‍यक, मलरूप कफदोष स्वच्छ होतो. मेदाचे विलयन झाल्याने लठ्ठपणा कमी होतो. त्वचा प्रसन्न अर्थात स्वच्छ, मऊ, नितळ व तेजस्वी होते. अकाली सुरकुत्या पडत नाहीत आणि सर्व अवयव रेखीव व स्थिर दिसतात. तेलात किंवा दुधात उटणे कालवून संपूर्ण अंगाला लावता येते व कोमट पाण्याने स्नान करता येते. उटणे लावण्याने अतिरिक्‍त प्रमाणात येणाऱ्या घामाचे प्रमाण कमी होते अणि उटण्यातील सुगंधी द्रव्यांमुळे मनही प्रसन्न होते. चंदन, अगरु, वाळा, हळद, यासारख्या सुगंधी, कांतिवर्धक द्रव्यांनी युक्‍त उटणे आपल्या व पर्यावरणाच्या आरोग्यासाठीही 100 टक्के सुरक्षित असते. अशा प्रकारच्या अभ्यंगस्नानाने ताजेतवाने वाटते, उत्सवाचा उत्साह येतो, शिवाय पुढील आयुर्वेदोक्‍त फायदेही मिळतात.

दीपनं वृष्यमायुष्यं स्नानमूर्जाबलप्रदम्‌ ।
कण्डु-मल-श्रम-स्वेद-तन्द्रा-तृड्‌-दाहपाप्मजित्‌ ।।
स्नानामुळे शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो. शरीरशक्‍ती, वीर्य यांची वृद्धी होते. दीर्घायुष्याचा लाभ होतो. त्वचेवरील मळ-घाम-कंड यांचा नाश होऊन श्रमाचा परिहार होतो. आळस दूर होतो, घशाला पडणारी कोरड कमी होते, शरीरदाह थांबतो आणि पापांचा नाश होतो. दीपावलीपुरते म्हणायचे झाले तर नरकचतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या तिन्ही दिवशी अभ्यंगस्नान करायचे असते.

मात्र आरोग्याच्या दृष्टीने पुढे येणाऱ्या संपूर्ण हिवाळ्यात अभ्यंगस्नान नियमित करणे अत्युत्तम होय.
पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीला आणि भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला औक्षण करायचे असते. "दीपदर्शन' हे आयुर्वेदाने मंगलकारक, भाग्यवर्धक सांगितले आहे, नात्यांमधली ओढ तेजाने उजळून जावी, अजून पक्‍की व्हावी हाही उद्देश असतोच.

फराळ नव्हे, रसायनसेवन
दीपावलीमध्ये अनारसा, लाडू, करंजी, शंकरपाळे वगैरे फराळाचे पदार्थ नुसत्या चवीसाठी नव्हे तर रसायनांचे फायदे मिळण्यासाटी योजलेले असतात. दीपावलीनंतरही संपूर्ण हिवाळ्यात "मॅरोसॅन', च्यवनप्राशासारखे रसायन नियमित घेणे उत्तम असते. आकाशकंदील बनवणे, किल्ला बनवणे, प्रियजनांना भेटवस्तू देणे या सर्व गोष्टींमुळे मनाची प्रसन्नता वाढते, सृजनतेला वाव मिळतो आणि मनाची मनाचे आरोग्य टिकायलाही मदत मिळते.
अग्नी तत्त्वाची आराधना, जोपासना आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. शरीरातील अग्नी प्रदीप्त असला की पचन व्यवस्थित राहाते, पर्यायाने आरोग्य नीट राहाते. बाह्य जगातील अग्नी व प्रकाश अंधार व शंका यांना दूर करतो. अग्नीजवळ दमटपणा, अतिरिक्‍त ओलावा, जीवजंतूंना थारा मिळत नाही, पर्यायाने रोगराई दूर राहते, मरगळ झटकून उत्साहाचा अनुभव घेता येतो. दीपावली हा अग्नीचा. तेजाचा उत्सव. म्हणूनच दीपावलीला "आरोग्य दीपावली' म्हणणे अतिशय सार्थ होय.

- डॉ. श्री बालाजी तांबे
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad