Saturday, August 22, 2009

तेलाने केस खरंच वाढतात का?

केसांचे आरोग्य प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरते. केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग आणि तेल सांगितली आहेत. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होईल. त्यामुळे अमुक तेल लावले, की केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
डोळे, दात, चेहऱ्याची ठेवण, त्वचेचा रंग वगैरे गोष्टी व्यक्‍तिविशिष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्‍तीत वेगवेगळ्या असतात. तसेच केसांची ठेवण, केसांची प्रत, केसांचा रंग तसेच केसांची लांबी वगैरे गोष्टीसुद्धा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरत असतात. म्हणूनच प्रकृतिपरीक्षणात "केस' हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो.
तेलाने केस वाढतात का हे समजण्यासाठी आधी केसांची मूलभूत माहिती घ्यायला हवी. आयुर्वेदाने केसांचा संबंध हाडांशी असतो असे सांगितले आहे.
स्यात्‌ किट्टं केशलोमास्थ्नो ।
...चरक चिकित्सास्थान
अस्थिधातूचा मलभाग म्हणजे केस व रोम होत. अस्थिधातू तयार होतानाच केस तयार होतात व म्हणूनच केसांचा हाडांशी खूप जवळचा संबंध असतो. हाडे अशक्‍त झाली तर त्याचा केसांवर दुष्परिणाम होतो असेही आयुर्वेदात सांगितले आहे.
केशलोमनखश्‍मश्रुद्विजप्रपतनं श्रमः ।
ज्ञेयमस्थिक्षये लिं सन्धिशैथिल्यमेव च ।।
..... चरक सूत्रस्थान
केस, रोम, नख, दाढी-मिशांचे केस गळणे तसेच दात तुटणे, फार परिश्रम न करताही थकवा जाणवणे, सांध्यांमध्ये शिथिलता जाणवणे ही सर्व लक्षणे हाडांचा क्षय झाल्यामुळे उद्‌भवतात.
प्रकृतीनुसारही केस निरनिराळे असतात. कफप्रकृतीचे केस आदर्श म्हणावे असे असतात. दाट, मऊ, लांब व सहसा न गळणारे, न पिकणारे केस कफाचे असतात, पित्तप्रकृतीमध्ये केस गळण्याची, पिकण्याची प्रवृत्ती बरीच असते, तसेच पित्ताचे केस मऊ असले तरी फार दाट नसतात. वातप्रकृतीचे केस राठ असतात, केसांची टोके दुभंगणे, केस तुटणे व गळणे वगैरे लक्षणे वातप्रकृतीमध्ये दिसतात.
आनुवंशिकतेचाही केसांशी संबंध असू शकतो. आजीचे, आईचे लांब केस असण्याची प्रवृत्ती असली तर मुलीचेही केस लांब असण्याची शक्‍यता मोठी असते, अर्थात आनुवंशिकता प्रकृतीमध्ये अंतर्भूत असतेच.
या सर्व माहितीवरून लक्षात येऊ शकते की केसांवर प्रकृतीचा व हाडांचा मोठा प्रभाव असतो.
केशवर्धनासाठी योग व तेले
केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग दिलेले आहेत, अनेक तेलेही सांगितली आहेत की ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहील व केस वाढतील. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. अमुक तेल लावले की माझे केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
बऱ्याचदा केसांच्या बाबतीत फक्‍त बाह्योपचार पुरेसे आहेत असे समजले जाते. अमुक तेल लावले, अमुक पदार्थ वापरून केस धुतले की चांगले राहतील, वाढतील अशी अपेक्षा ठेवली जाते, मात्र त्याहून अधिक महत्त्व अस्थिपोषक द्रव्ये घेण्याला असते. दूध, खारीक, शतावरी कल्प, नैसर्गिक कॅल्शियम असणारी शंखभस्म, प्रवाळभस्म, कुक्कुटाण्डत्वक्‌ यांसारखी द्रव्ये केसांच्या आरोग्यासाठी बाह्योपचारापेक्षा अधिक उपयुक्‍त असतात. बऱ्याचदा असे दिसते की हाडांशी संबंधित विकारांवर उपचार करत असता केसांमध्ये अनपेक्षित सुधारणा होताना दिसते किंवा च्यवनप्राश, सॅनरोझसारखी एकंदर प्रतिकारशक्‍ती वाढवणारी रसायने नियमित सेवन केली, प्रकृतीनुरूप आहार-आचरणाने दोष संतुलित ठेवता आले तर केस गळायचे थांबतात, काही लोकांचे अकाली पांढरे झालेले केस काळे होताना
दिसतात.
केसांची निगा राखण्यामध्ये तेल लावणे महत्त्वाचे असते यात संशय नाही. अस्थिधातू, केस हे शरीरघटक वाताच्या आधिपत्याखाली येतात आणि वात म्हटला की त्याला संतुलित ठेवण्यासाठी तेलासारखा दुसरा श्रेष्ठ उपचार नाही. केसांना तेल लावण्याने त्यांच्यातला वात नियंत्रित राहतो, अर्थातच केस तुटणे, कोरडे होणे, दुभंगणे, गळणे या सर्वांना प्रतिबंध होतो.
केसांच्या मुळाशी तेल लावल्याने केस मजबूत व्हायला मदत मिळते. डोक्‍यात कोंडा होणे, खवडे होणे वगैरे त्रास सहसा होत नाहीत, मात्र हे सर्व फायदे मिळण्यासाठी तेल चांगल्या प्रतीचे, केश्‍य म्हणजे केसांना हितकर द्रव्यांनी सिद्ध केलेले असावे लागते. असे सिद्ध तेल केसांच्या मुळांना लावले की लगेचच आतपर्यंत शोषले जाते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य नीट राहायला मदत मिळते. मात्र कच्चे तेल म्हणजे ज्याच्यावर अग्निसंस्कार झालेला नाही असे तेल कितीही शुद्ध असले, भेसळमुक्‍त असले तरी ते आतपर्यंत जिरण्यास अक्षम असल्याने केसांना तेलकटपणा आणण्याशिवाय फारसे उपयोगी पडत नाही. उलट केस तेलकट झाले की तेल काढून टाकण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून बनविलेले शांपू, साबण वापरावे लागतात, ज्यांचे वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात.
केस निरोगी हवेत
तेल लावण्याने केसांचे आरोग्य सुधारत असल्याने काही प्रमाणात केस लांब होण्यासाठीही फायदा होऊ शकतो; पण त्या लांब होण्याला प्रकृतीची, वयाची, एकंदर शरीरशक्‍तीची मर्यादा राहील हे लक्षात घ्यायला हवे.
केसांच्या लांबीची चर्चा करताना एक गोष्ट समजून घ्यायला हवी की केस नुसतेच लांब असण्यापेक्षा ते निरोगी असणे अधिक महत्त्वाचे असते. मूळचे लांब केसही गळत असले, तुटत असले आणि निर्जीव दिसत असले तर आकर्षक वाटणे शक्‍य नसते. त्यामुळे केसांची नुसती लांबी वाढविण्याच्या मागे न लागता केस बळकट राहतील, छान तेजस्वी राहतील, काळे राहतील याकडे लक्ष द्यायला हवे.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून उपाय
केश्‍य द्रव्यांनी सिद्ध केलेले व आतपर्यंत जिरणारे "संतुलन व्हिलेज हेअर तेला'सारखे तेल केसांना नियमितपणे लावणे केसांसाठी उत्तम असते. कृत्रिम रंग, गंध घालून तयार केलेले तेल टाळणेच श्रेयस्कर होय.
केस धुण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून तयार केलेली उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिक द्रव्ये, उदा., शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरेंचे मिश्रण किंवा तयार "संतुलन सुकेशा' वापरणे चांगले असते.
आठवड्यातून दोन वेळा केस धुवावे.
केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
आठवड्यातून एकदा, केस धुण्याआधी केसांच्या मुळाशी लिंबाची फोड चोळून नंतर अर्धा तास कोरफडीचा गर लावून ठेवण्यानेही केसांचे आरोग्य चांगले राहते. केस गळणे, कोंडा होणे वगैरेंना प्रतिबंध होतो.
आहारात दूध, खारीक, शतावरी कल्प, "कॅल्सिसॅन', "सॅनरोझ' वगैरेंचा समावेश असू द्यावा.
उन्हात फिरताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी उपाय योजणे, उष्णतेजवळ किंवा संगणकावर काम असल्यास, रात्रीची जागरणे किंवा रात्रपाळी असल्यास पित्त कमी करण्यासाठी "सॅनकूल चूर्ण', "संतुलन पित्तशांती गोळ्या', नियमित पादाभ्यंग वगैरे उपाय योजणेही केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते.
डॉ. श्री बालाजी तांबे

3 comments:

  1. Mumbai madhe "संतुलन व्हिलेज हेअर तेला'"संतुलन सुकेशा' Kuthe Milel?

    ReplyDelete
  2. केसात चाई कशामुळे होते व त्यावर उपाय काय करावेत

    ReplyDelete
  3. maze age 28 ahe maze takkl ahe tar mala kahi upay sanga pls?

    ReplyDelete

ad