Friday, December 10, 2010

सौंदर्य

डॉ. श्री बालाजी तांबे

सौंदर्य हा नैसर्गिक भाव असल्याने निसर्गाला धरून केलेल्या उपचारांचा व उपायांचा खरा फायदा होणार आहे हे विसरून चालणार नाही. क्षणिक सौंदर्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर त्यातून नुकसान होईल, हे सहज ध्यानात येऊ शकेल. म्हणून सौंदर्यरक्षणामध्ये नैसर्गिक द्रव्ये, वनस्पती, सकस आहार, संतुलित जीवनशैली यांचे महत्त्वाचे योगदान असते.

सौंदर्याची ओढ, सौंदर्याची आवड कोणाला नसते? स्त्री असो वा पुरुष, सर्वांनाच सौंदर्य व पाठोपाठ येणारी आकर्षकता हवीहवीशी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. प्राचीन काळातही देवदेवतांपासून, राजकन्येपर्यंत अगदी आश्रमात राहणाऱ्या एखाद्या ऋषीकन्येपर्यंत सर्वांनीच सौंदर्य टिकवण्यासाठी, खुलविण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. भारतासारख्या प्राचीन संस्कृतीचा वारसा असणाऱ्या देशात तर सौंदर्यसाधनेला सांस्कृतिक स्थान मिळाल्याचे दिसते. काळानुसार, देशानुसार, हवामानानुसार सौंदर्याची मोजमापे बदलली तरी एकंदरीत सौंदर्याची ओढ आणि महत्त्व कायम आहे. जन्मजात सौंदर्याची देणगी सर्वश्रेष्ठ असतेच, पण सौंदर्य टिकवणे आणि खुलवणेही तेवढेच महत्त्वाचे असते. नितळ त्वचा, सतेजता, गडद रंगाचे रेशमी, लांब केस, चेहऱ्याचा रेखीवपणा, उत्तम बांधा तसेच ओठ कोरडे नसणे, घाम अति प्रमाणात न येणे, उंची व बांधा यांचे प्रमाण योग्य असणे, शरीराला आवश्‍यक घट्टपणा, कणखरपणा असणे या सर्व गोष्टी सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत. सौंदर्य हा नैसर्गिक भाव असल्याने निसर्गाला धरून केलेल्या उपचारांचा व उपायांचा खरा फायदा होणार आहे हे विसरून चालणार नाही. क्षणिक सौंदर्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर त्यातून नुकसान होईल हे सहज ध्यानात येऊ शकेल. म्हणून सौंदर्यरक्षणामध्ये नैसर्गिक द्रव्ये, वनस्पती, सकस आहार, संतुलित जीवनशैली यांचे महत्त्वाचे योगदान असते.

त्वचा
त्वचा हा व्यक्‍तीचा खरा दागिना समजला जातो.
क्षीरस्य संतानिका इव सप्त त्वचो भवति ।...सुश्रुत शारीरस्थान
ज्याप्रमाणे दूध तापत असताना त्यावर साय येते त्याप्रमाणे शरीर तयार होताना, धातूंचे पचन होत असताना त्वचा तयार होते.
म्हणूनच सतेज त्वचेसाठी एकंदर आरोग्य चांगले राहणे, सर्व धातूंचे व्यवस्थित पोषण होणे हे सुद्धा महत्त्वाचे होय. निरोगी त्वचेसाठी पुढील प्रयत्न करता येतात.
- धातूंचे पोषण व्हावे, शरीराला तसेच त्वचेलाही आवश्‍यक स्निग्धता मिळावी आणि नितळ, सतेज त्वचा मिळावी म्हणून नियमित अभ्यंग करणे उत्तम होय. रक्‍तशुद्धिकर व वात-पित्तशामक औषधांचा संस्कार करून तयार केलेले 'अभ्यंग तेला'सारखे तेल अंगाला लावणे उत्तम असते.
- त्वचेवर सुरकुत्या पडणे, त्वचा कोरडी पडणे हे त्वचेला घातक ठरू शकते. यावरही नियमित अभ्यंग करण्याचा आणि स्नानाच्या वेळी मसुराच्या पिठात हळद, धणे पूड, दही किंवा दूध मिसळून तयार केलेले उटणे किंवा तयार "सॅन मसाज पावडर'सारखे उटणे लावण्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
- गुलाबपाण्यात चंदन, दालचिनी, हळकुंड उगाळून तयार केलेले गंध चेहऱ्यावर लावण्याने सुरकुत्यांना प्रतिबंध होतो तसेच त्वचा नितळ व सतेज राहण्यास मदत होते.
- चेहरा किंवा दंड-पाठीवर पिंपल्स येणे सुद्धा सौंदर्याला बाधक असते. यावर रक्‍तशुद्धिकर द्रव्यांनी सिद्ध केलेले "रोझ ब्युटी तेला'सारखे तेल लावण्याचा, "सॅन पित्त फेस पॅक'सारखा पॅक लावण्याचा उपयोग होतो.
- चेहरा व हातापायाच्या पंजांची त्वचा अधिकच नाजूक व संवेदनशील असते. शिवाय पाणी, धूळ, धूर, उन्हाच्या संपर्कात हे भाग अधिक प्रमाणात येत असल्याने या ठिकाणच्या त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्‍यक असते. त्या दृष्टीने आठवड्यातून एक - दोन वेळा चेहऱ्यावर, पंजांवर साय लावून ठेवणे उत्तम असते. रात्री झोपण्यापूर्वी "रोझ ब्युटी तेला'सारखे तेल लावण्यानेही या ठिकाणच्या नाजूक त्वचेचे संरक्षण होऊ शकते.
- तळहात कोरडे होणे, कडक होणे हा समस्या अनेकांना असते. लिंबाच्या रसात मध टाकून तयार केलेले मिश्रण हातांना लावून ठेवण्याचा उपयोग होऊ शकतो.

डोळे
डोळे सुद्धा सौंदर्याचा विचार करताना डोळे महत्त्वाचे होत. डोळ्यांमधली चमक व सतेजता आरोग्याशिवाय मिळू शकत नाही. डोळे सुंदर दिसावेत म्हणून वापरलेली प्रसाधने नैसर्गिक नसल्याने डोळ्यांच्या आरोग्याला व सौंदर्याला बऱ्याचदा घातक ठरू शकतात. त्याऐवजी सर्व नैसर्गिक, शुद्ध व उत्तम प्रतीच्या द्रव्यांपासून आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले अंजन (उदा. सॅन अंजन काळे, ग्रे किंवा क्‍लिअर) वापरण्याने डोळ्यांचे आरोग्यही उत्तम राहते, शिवाय डोळ्यांचे प्रसाधनही होते.

- संगणक, प्रदूषण वगैरेंमुळे थकलेल्या डोळ्यांना पुन्हा स्फूर्ती यावी यासाठी बंद डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या किंवा निरशा थंड दुधाच्या घड्या ठेवता येतात.

दात, केस, नखे
दात, केस, नखे यांची निगा राखणे हे सुद्धा सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. हे तिन्ही शरीरघटक शरीरातील अस्थिधातूंशी संबंधित असतात. दूध, डिंक, खारीक, खसखस वगैरे घटकांचा रोजच्या आहारात समावेश करण्याने यांचे आरोग्य व सौंदर्य हे दोन्ही सुरक्षित राहतात.

- दात-हिरड्यांना उपयुक्‍त द्रव्यांनी संस्कारित केलेल्या "सुमुख तेला'सारख्या तेलाच्या गुळण्या धरणे, दात घासण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांचा वापर करणे उत्तम होय.
- पाण्यात काम, घरकाम केल्याने नखांच्या कडेची त्वचा रुक्ष होऊन निघू शकते. यावर दुधावरची साय वा लोणी हलक्‍या हाताने जिरविण्याचा उपयोग होतो.
- केस मऊ व रेशमी होण्यासाठी आठवड्यातून एकदा केसांना नारळाचे दूध लावून नंतर केस शिकेकाई, रिठा वगैरे मिश्रणाने धुण्याचा उपयोग होतो.

- जास्वंदीची फुले, काड्या व पाने बारीक करून तयार केलेला लेप केसांना लावल्याने केसांचे कंडिशनिंग करता येते.
- ओठ कोरडे होऊ नयेत म्हणून ओठांना शतधौतघृत किंवा दुधावरची साय लावण्याचा उपयोग होतो.
- घाम अति प्रमाणात येणे हे पित्तदोष वाढल्याचे लक्षण असू शकते, त्यामुळे गुलकंद, पित्तशांतीसारखी पित्तशामक औषधे घेण्याचा उपयोग होतोच पण घरच्या घरी कुळथाचे पीठ, जिरे पूड , लिंबाचा रस तसेच नागरमोथा, लोध्र वगैरे वनस्पती टाकून तयार केलेले उटणे लावण्याचा उपयोग होतो.
- काखेत वगैरे ज्या ठिकाणी घाम अधिक प्रमाणात येतो तेथे स्नानानंतर तुरटीचा खडा फिरविण्याचा उपयोग होतो.

बांधा हा सुद्धा सौंदर्यामध्ये महत्त्वाचा असतो. स्त्रियांचा कमनीय बांधा, पुरुषांची भरदार छाती व एकंदर कणखरपणा टिकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या विषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या वेळेला पाहू. तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या वापराने मिळविलेले सौंदर्य आणि आतून उत्स्फूर्तपणे मिळविलेले सौंदर्य यात मोठा फरक असतो. पंचकर्माच्या साहाय्याने शरीरशुद्धी करून आतून सौंदर्य कसे मिळविता येते हेही आपण पुढच्या वेळेला पाहू.

- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad