Tuesday, September 9, 2008

घृत योजना आणि धूपन

घृत योजना आणि धूपन

(डॉ. श्री बालाजी तांबे) बाह्य उपचारांसाठी विशेष प्रक्रिया केलेल्या तुपाची योजना करणे म्हणजे "घृत योजना' आणि औषधी द्रव्यांचा धूर करून त्याच्या साह्याने उपचार करणे म्हणजे "धूपन'. अनेक प्रकारच्या व्याधींवर या दोन्ही प्रकारच्या उपचारांचा वापर केला जातो. ........आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये असंख्य औषधी योग समजावले आहेत. हे योग बनविण्यासाठी वापरलेली घटकद्रव्ये व त्यांचे प्रमाण, बनविण्याची पद्धत, उपयोग वगैरे सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. आयुर्वेदात "वृद्धवैद्याधार' ही एक संकल्पना आहे. वृद्धवैद्याधार म्हणजे परंपरेने, वैद्यांच्या अनुभवातून चालत आलेले औषधी योग. अशा योगांचा ग्रंथात उल्लेख नसतो, पण ते वृद्धवैद्याधाराच्या आधाराने बनविले जातात. शतधौतघृत हा असाच वृद्धवैद्याधार असलेला योग आहे. शत म्हणजे शंभर आणि धौत म्हणजे धुतलेले. म्हणून शंभर वेळा धुतलेले तूप म्हणजे शतधौतघृत होय. हे घृत बनविण्यासाठी तांब्याची परात व तांब्याचा तांब्या किंवा पूजेसाठी वापरतात त्या पळी भांड्यातली भांडे वापरावे, असे सांगितले जाते. तांब्याच्या परातीत तूप व तुपाच्या साधारण दुप्पट पाणी घ्यायचे असते व त्यात सर्व तूप क्रीमसारखे पाण्यात एकत्र गोळा होईपर्यंत तांब्या गोलाकार फिरवायचा असतो. असे करण्याने तूप थोडेसे फुलते व पाणी कमी होते. उरलेले पाणी काढून टाकून पुन्हा नवीन पाणी घेऊन पुन्हा तांब्या फिरवला जातो व उरलेले पाणी फेकून पुन्हा नवीन पाणी घेतले जाते. याप्रकारे शंभर वेळा पाण्याच्या साहाय्याने धुतलेले तूप म्हणजे शतधौतघृत होय. हे शतधौतघृत लोण्यासारखे पांढरे व मऊ बनते. तूप मुळात थंडच असते पाणीसुद्धा थंडच असते. म्हणूून पाण्याचा संस्कार झालेले हे शतधौतघृत अतिशय शीतल गुणधर्माचे असते. तांब्याचा संस्कार झाल्यामुळे ते जखम शुद्ध करण्याच्या व भरून आणण्याच्या दृष्टीनेही उत्तम असते. याच शतधौतघृतावर अजून काही शीतल, जंतुनाशक. रक्‍तशुद्धीकर द्रव्यांचा संस्कार केला असता ते मलमाप्रमाणे वापरण्यास उत्तम असते. याच्या वापराने चटका बसल्यामुळे होणारी आग शमते, भाजल्यामुळे झालेली जखम भरून यायला मदत मिळते, कोणतीही जखम लवकर भरून यावी व कोरडी पडू नये यासाठी मदत होते, ज्या त्वचारोगात त्वचा लाल होऊन आग होत असते त्यावर लावल्यास आग कमी होते, फुटलेल्या त्वचेवर, पायांच्या भेगांवर लावल्यास त्वचा पूर्वत होण्यास मदत मिळते, पादाभ्यंग करताना साध्या तुपाऐवजी असे तूप वापरल्यास अधिक चांगला उपयोग होतो. बाह्य उपचारांमधला आणखी एक आगळा वेगळा उपचार म्हणजे धूपन. औषधी द्रव्यांच्या साहाय्याने धूप करणे म्हणजे धूपन. धूपनाचा मुख्य फायदा म्हणजे धूप शरीरातील लहानात लहान स्रोतसात प्रवेश करू शकतो व स्वतःसमवेत औषधांचे वीर्यही आतपर्यंत पोचवू शकतो. ज्या प्रकारची द्रव्ये धूपनासाठी वापरली असतील त्यानुसार धूप निरनिराळ्या प्रकारची कार्ये करतो, पण धुपामुळे जंतुनाशकाचे दूषित द्रव्यांचा नाश करण्याचे काम प्रमुख्याने होत असते. बऱ्याचदा असा अनुभव येतो की तोंडावाटे घेतलेले औषध ईप्सित जागी पोचून जंतुनाशनाचे काम व्हायला वेळ लागतो. मात्र, हेच कार्य धुपाच्या माध्यमातून पटकन होऊ शकते. वारंवार होणारा जंतुसंसर्ग मूळापासून बरा होण्यासाठी धूपासारखी दुसरी उत्तम योजना नाही, असेही दिसते. धूपकल्पनेचा उगम होतो ग्रहचिकित्सेमध्ये. न दिसणारे सूक्ष्म जीवजंतू, दुष्ट शक्‍ती, अदृश्‍य तरंग, ग्रहबाधा यांच्यापासून रक्षण होण्यासाठी आयुर्वेदाने "धूपन' सांगितले आहे. विविध मानसरोगांवर, मेंदूशी संबंधित विकारांवरही धूपन एक महत्त्वाचा उपचार सांगितला आहे. ग्रहचिकित्सेमध्ये धुपाचे स्थान अढळ आहेच पण नेहमीच्या साध्या उपचारांतही धूपनाचे खूप फायदे होताना दिसतात. योनीधूपन, गुदधूपन, कर्णधूपन, व्रणधूूपन, सर्वांगधूपन असे धूपनाचे अनेक प्रकार आहेत. हवा शुद्ध करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठीही धूप जाळता येतात. ज्वर, उन्माद, अपस्मार, ग्रहरोग वगैरे रोगांचे उपचार सांगतानाही विविध धूपयोग सांगितले आहेत. उदा. विषमज्वरावर चरक संहितेत हा योग सांगितला आहे, पलंकषा निम्बपत्रं वचा कुष्ठं हरीतकी । सषर्पा सयवाः सर्पिर्धूपनं ज्वरनाशनम्‌ ।। ... चरक चिकित्सास्थान गुग्गुळ, कडू लिंबाची पाने, वेखंड, कुष्ठ, हिरडा, मोहरी, यव व तूप यांचा लेप दिल्यास ज्वराचा नाश होतो. अपस्मार या मानस रोगाच्या उपचारातही धूपनाचा अंतर्भाव केलेला आहे. पिप्पली लवणं चित्रां हिंगु हिंगुशिवाटिकाम्‌ । काकोली सषर्पान्‌ काकनासा कैडर्यचन्दने ।। शुनः स्कन्धास्थिनखान्‌ पर्शुकां चेति पेषयेत्‌ । बस्तमूत्रेण पुष्यर्क्षे प्रदेहः स्यात्‌ सधूपनः ।। ... चरक चिकित्सास्थान पिंपळी, सैंधव, शेवग्याचे बी, हिंग, हिंगपत्री, काकोली, मोहरी, काकनासा, कैडर्य, चंदन, कुत्र्याच्या खांद्याची व छातीची हाडे, नखे या सर्वांचे चूर्ण करावे. पुष्य नक्षत्रावर बकऱ्याच्या मूत्रासह घोटावे. तयार झालेले चूर्ण अपस्मारग्रस्त व्यक्‍तीने धूपनासाठी तसेच उटण्याप्रमाणे वापरावे. माणसाची मूळ प्रकृती, स्वभाव व जन्मजात दिसणारी कर्मबंधने, विविध त्रास व रोग होण्याची कारणे असावीत असे दिसते. ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन जन्मराशीप्रमाणे वर्गीकरण करून प्रत्येक राशीच्या व्यक्‍तीसाठी धूपचिकित्सा खूप फायद्याची ठरू शकते. ह्या चिकित्सेत विशिष्ट वारी, विशिष्ट द्रव्यांच्या मिश्रणाचा धूप करणे आवश्‍यक असते. बरोबरीने राशीवृक्षाच्या सान्निध्यात प्रार्थना करण्याचा अधिक लाभ होऊ शकतो. - डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad