Saturday, June 26, 2010

बेडरूम फक्त झोपण्यासाठी - भाग 2

आपले आजार आनुवंशिकतेवर ढकलणाऱ्यांना मी विचारू इच्छितो की, त्यांच्या आजोबांना किंवा पणजोबांनाही हा आजार होता काय? मला खात्री आहे की उत्तर नाही असंच येईल. मग फक्त दोन पिढय़ांतच हे आजार कसे काय निर्माण झाले? ..थोडा वेगळा विचारही करून पाहा..
‘आम्ही किनई मॉडर्न’ हे जगाला दाखविताना आपण अनेक दुखणी विकत घेतो. त्यापैकी सर्वात खतरनाक दुखणं म्हणजे ईएमएफ. बेडरूममध्ये एसी, टीव्ही, कॉम्प्युटर ठेवणं, पलंगाजवळ उशाशी इलेक्ट्रिकची बटणं लावणं, उशाला नाईट लॅम्प ठेवणं, पलंगाला साइड टेबल बनवून त्यावर कॉर्डलेस टेलिफोन ठेवणं, रॉट आयर्नचा पलंग- पाण्याचा बेड- इलेक्ट्रिक ब्लँकेट वापरणं.. असे अनेक नसते उद्योग करून आपण मोठय़ा आजारांना निमंत्रण देत असतो. पुष्कळ लोक सांगतात की, आम्ही नियमित योग करतो, व्यायाम करतो, आहाराची पथ्यं पाळतो, पण तरीही सतत आजारी पडतो. खात्रीनं सांगतो की, या लोकांच्या आजारपणाचं कारण त्यांच्या बेडरूममध्ये सापडेल आणि ते कारण असेल ईएमएफचं प्रदूषण.
तुमची सरासरी झोप आठ तासांची असेल तर सलग आठ तास हे उत्सर्ग तुमच्या शरीरातून अखंड वाहत असतात. तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुमची इम्युन सिस्टीमही सुप्तावस्थेत असते. त्यामुळे या उत्सर्गाची घातकता आणखी वाढते. वर्षांनुवर्षे अशा उत्सर्गात झोपणं म्हणजे अनेक व्याधींना आमंत्रण. आपण सहज बोलतो की, डायबिटीस काय आमच्याकडे आनुवंशिक आहे. ब्लड प्रेशर काय आमच्याकडे आनुवंशिक आहे.. आपले आजार आनुवंशिकतेवर ढकलणाऱ्यांना  विचारू इच्छितो की, त्यांच्या आजोबांना किंवा पणजोबांनाही हा आजार होता काय? मला खात्री आहे की उत्तर नाही असेच येईल. मग फक्त दोन पिढय़ांतच हे आजार कसे काय निर्माण झाले? ..थोडा वेगळा विचारही करून पाहा..
‘मी नऊ तास झोपतो, पण उठल्यानंतर अजिबात फ्रेश वाटत नाही’, अशी तक्रार माझा एक पत्रकार मित्र नेहमी करायचा. त्याच्या घरी गेलो. पंख्याचा इलेक्ट्रिक फिल्ड ई-डिटेक्टरच्या साहाय्यानं तपासला. तो थेट जमिनीपर्यंत येत होता. मित्र अशा पंख्याखाली रॉट आयर्नच्या पलंगावर झोपत होता. त्याच्या बेडरूममध्ये फक्त तीन बदल केले : १) पंख्याला अर्थिग दिलं २) घराच्या वीजप्रवाहाला अर्थिग दिलं ३) रॉट आयर्नचा पलंग बदलायला लावून लाकडाचा पलंग ठेवायला लावला. फक्त तीन बदलांनी सुपरिणाम मिळाला आणि तोही फक्त एका दिवसात.
वरील उपायांपैकी दोन उपाय तुम्हाला समजले असतील, पण पंख्याला अर्थिग देणं हा प्रकार कदाचित समजला नसेल. अगदी सोपं आहे. एक तीन-चार इंचाचा इन्सुलेटेड कॉपर वायरचा तुकडा घ्या. पंख्याची वरची कॅप लूज करा. वायरचं एक टोक पंख्याच्या रॉडला गुंडाळा. दुसरं टोक सिलिंगच्या हुकला गुंडाळा. झालं अर्थिग पूर्ण. आता कॅप पुन्हा फीट करा म्हणजे हा वायरचा तुकडा दिसणार नाही. (मात्र वायरची टोकं रॉड व हूकला जिथं गुंडाळता तेथील ऑईल पेंट खरवडून काढायला हवा. अन्यथा अर्थिग होणार नाही.) प्रत्येक घरात सरासरी तीन पंखे असतात आणि दिवसाचा बराचसा वेळ ते चालू असतात. पंख्याला अर्थिग दिलं नसेल तर पंखा सुरू असताना त्याच्या आजूबाजूला पाच फुटापर्यंत इलेक्ट्रिक फिल्ड तयार होतं. संपूर्ण घरभर त्यामुळे इलेक्ट्रिक फिल्डचं प्रदूषण पसरतं. त्यात टीव्ही, एसी, फ्रीज, कॉर्डलेस फोन भर टाकत असतात. दिवसा तुमची इम्युन सिस्टिम जागी असते. त्यामुळे कदाचित या फिल्डचा त्रास होणार नाही. पण रात्री झोपल्यानंतर इम्युन सिस्टिम पूर्ण कार्यरत नसताना हे फिल्ड विनाशकारी ठरतं. त्यात तुम्ही मेटलच्या पलंगावर झोपत असाल तर या फिल्डचा तुमच्या शरीरातून जमिनीत असा प्रवास सतत सुरू असतो. इलेक्ट्रिक शॉकचाच हा प्रकार आहे. फरक इतकाच हा शॉक झटका देत नाही. पण तो स्लो पॉयझनचं काम करतो. तुम्ही वर्षांनुवर्षे अशा फिल्डमध्ये झोपता तेव्हा आरोग्याची किंमत मोजावीच लागते. पाश्चात्य संशोधनानुसार त्वचेचे रॅश, निद्रानाश, अ‍ॅलर्जी, थकवा, आळस, डोकेदुखी, छातीत दुखणं, हृदयविकार, स्नायुदुखी, सांधेदुखी, मान सुजणं, दृष्टी अंधूक होणं, अंगात थरथर जाणवणं, पॅरॅलिसीस, भोवळ, मनाचा गोंधळ, लक्ष न लागणं, मेलॅटोनिनचं प्रमाण कमी होणं हे विकार बळावण्याचं एक कारण इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन असू शकतं.
एसी इलेक्ट्रिक फिल्ड, एसी मॅग्नेटिक फिल्ड, इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्हज, स्टॅटिक इलेक्ट्रिक फिल्ड, स्टॅटिक मॅग्नेटिक फिल्ड, रेडिओअ‍ॅक्टिव्हिटी, टेरेस्ट्रिअल रेडिएशन, साऊंड अँड व्हायब्रेशन्स या सर्व कंपनलहरी विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त अवतीभवती असतील तर आरोग्यावर विघातक परिणाम होतो. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी लिहीन. सध्या फक्त बेडरूम आणि तेथील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनपासून वाचण्याचे उपाय यावरच लक्ष केंद्रित करूया.     (क्रमश:)
---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad