Monday, December 22, 2008

अजेंडा व्यक्‍तिगत आरोग्याचा

अजेंडा व्यक्‍तिगत आरोग्याचा


(डॉ. श्री बालाजी तांबे)
जोपर्यंत वात-पित्त-कफ ही तीन मुख्य कार्यकारी तत्त्वे आपापले काम चोख पार पाडत आहेत, रस-रक्‍त-मांस वगैरे सप्तधातू योग्य स्वरूपात व योग्य प्रमाणात तयार होत आहेत आणि शरीरातील मलभाग वेळेवर शरीराबाहेर टाकला जात आहे तोपर्यंत आरोग्य असते. आयुर्वेदाने आरोग्य हा सहज भाव सांगितला आहे...

"आरोग्यं मूलमुत्तमम्‌' म्हणजे संपन्न आयुष्य जगण्यासाठी सर्वाधिक गरज असते ती आरोग्याची! धन संपत्तीची कितीही श्रीमंती असली, तरी तिचा आनंद घेण्यासाठी, दीर्घायुष्य असले, तरी ते सुखात घालविण्यासाठी मुळात आरोग्य भरभक्कम असावे लागते. स्वास्थ्य व अस्वास्थ्य यांचे वर्णन आयुर्वेदात या प्रकारे केलेले आहे-

विकारो धातुवैषम्यं साम्यं प्रकृतिरुच्यते।
सुखसंज्ञकमारोग्यं विकारो दुःखमेव च।।

... चरक सूत्रस्थान
धातूंमधली विषमता म्हणजे विकार, तर धातूंमधले संतुलन म्हणजे स्वास्थ्य होय. आरोग्य म्हणजेच सुख, तर अनारोग्य म्हणजे दुःख. या ठिकाणी धातू हा शब्द संतुलित दोष व प्रमाणबद्ध धातू या दोघांसाठी वापरला आहे.

जोपर्यंत वात-पित्त-कफ ही तीन मुख्य कार्यकारी तत्त्वे आपापले काम चोख पार पाडत आहेत, रस-रक्‍त-मांस वगैरे सप्तधातू योग्य स्वरूपात व योग्य प्रमाणात तयार होत आहेत आणि शरीरातील मलभाग वेळेवर शरीराबाहेर टाकला जात आहे तोपर्यंत आरोग्य असते. आयुर्वेदाने आरोग्य हा सहज भाव सांगितला आहे. म्हणजे आरोग्य हा प्रत्येक प्राणिमात्राचा हक्क आहे; मात्र तो मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

व्यक्‍तिगत आरोग्य टिकविण्यासाठी; तसेच आरोग्य मिळविण्यासाठी सर्वप्रथम स्वतःची प्रकृती माहीत असणे आवश्‍यक आहे. दिनचर्या, ऋतुचर्या पाळतानासुद्धा प्रकृतीचा विचार करावाच लागतो.

दोष-धातूंचे संतुलन म्हणजे आरोग्य हे आपण पाहिले; पण या संतुलनाचे एक विशिष्ट असे प्रमाण सांगता येत नाही, तर ते व्यक्‍तिसापेक्ष, प्रकृतिसापेक्ष असते. म्हणूूनच आयुर्वेदाने आरोग्याची लक्षणे सांगताना अमुक उंचीला अमुक वजन असायला हवे, असे सांगितलेले नाही किंवा अमुक वजनाच्या व्यक्‍तीने अमुक कॅलरीयुक्‍त आहार घ्यायला पाहिजे, असाही हिशेब केलेला नाही. व्यक्‍तीचा आहार, वागणे, शरीरयष्टी इतकेच, नाही तर स्वभावसुद्धा प्रकृतिसापेक्ष असतो.

उदा.- पित्तप्रकृती असलेल्या व्यक्‍तीचा आहार जास्त असेल, तर कफप्रकृती असलेल्या व्यक्‍तीचा आहार कमी असून, त्याचे वजन मात्र पित्तप्रकृतीपेक्षा जास्तच असेल. म्हणूनच स्वतःसाठी काय चांगले काय वाईट हे ठरविण्यापूर्वी प्रत्येकाने आपली प्रकृती समजून घ्यायला हवी.

वातप्रकृतीच्या व्यक्‍तींची शरीरयष्टी जरा कृशच असते. चंचलता, अस्थिरता ही त्यांची विशेषतः असते. त्यांची भूक, झोप, पचनशक्‍ती, मनोवृत्ती वगैरे सर्वच गोष्टी सातत्याने बदलत असतात. यांची शरीरशक्‍ती बेताचीच असते. कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला नेण्याची क्षमता कमी असते. वातप्रकृतीच्या व्यक्‍तीला अर्थातच वाताचे रोग होण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. वाताचे रोग सर्वाधिक असल्याने वातप्रकृतीला आरोग्य टिकविण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न करावे लागतात.

पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींची शरीरठेवण नाजूक; तसेच कृश नाही व जाडही नाही, अशी साधारण असते. नीटनेटकेपणा आणि तत्परता हे यांचे गुणविशेष असतात. या व्यक्‍ती स्वाभिमानी असतात; तसेच पटकन राग येणाऱ्या असतात व बुद्धिमत्तेने संपन्न असतात; तसेच चटकन निर्णय घेण्याची क्षमता यांच्यात असते. पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तीला उष्णतेचे विकार, त्वचेचे रोग होण्याची सर्वाधिक शक्‍यता असते.

कफप्रकृतीच्या व्यक्‍तीची शरीरयष्टी भरभक्कम, मजबूत व थोडी स्थौल्याकडे झुकणारी असते. त्यांची शरीरशक्‍ती व उत्साह वाखाणण्यासारखा असतो. कोणतीही गडबड-गोंधळ न घालता काम पूर्णत्वाला नेणे यांच्या स्वभावात असते. या प्रकृतीची माणसे ही हुशार असतात व स्वभावाने शांत असतात. यांना अग्निमांद्य, मधुमेह, अनुत्साह वगैरे विकार होऊ शकतात.

कुठली प्रकृती चांगली, कुठली वाईट असा प्रश्‍न बऱ्याच वेळा विचारला जातो; पण प्रकृती चांगली वा वाईट नसते, तर अनुरूप आहार-आचरण, एकंदर जीवनशैली आखली, तर प्रकृती कोणतीही असली, तरी चांगलीच असते. याउलट कोणतीही प्रकृती असंतुलित झाली, की त्रासदायक ठरते. तेव्हा आरोग्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने स्वतःची प्रकृती जाणून घ्यावी.

प्रकृती हे जसे आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे; तसेच आरोग्य सांभाळण्यासाठी आयुर्वेदाने दिलेले वरदान म्हणजे शरीरशुद्धी अर्थात पंचकर्म! अशुद्धी, अस्वच्छता असते तेथे रोगराई येते हे आपण जाणतोच. शरीर निरोगी ठेवायचे असेल, तर ते शुद्ध असावे लागते. रोजच्या रोज मलमूत्रप्रवर्तन, घाम येणे ही सुद्धा एक प्रकारची शरीरशुद्धीच असते; पण ती १०० टक्के होईलच, असे नाही.

रोज थोड्या थोड्या प्रमाणात साठणारी मलद्रव्ये किंवा आहार-आचरणामुळे प्रमाणापेक्षा वाढलेले दोष किंवा अशुद्ध द्रव्यांच्या सेवनामुळे शरीरात गेलेली अशुद्धी वेळेवर व मुळापासून काढून टाकली नाही, तर त्यातून अनेक रोग होऊ शकतात. रोग झाला असताना रोगाचे मूळ कारण काढून टाकण्यासाठी पंचकर्म आवश्‍यक असतेच; पण आरोग्यरक्षणासाठीही पंचकर्म महत्त्वाचे होय. आधुनिक जीवनशैलीचा विचार करता साधारणपणे वयाच्या पस्तिशी-चाळिशीच्या आसपास प्रकृतीनुसार शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणे उत्तम.

यथाविधी, सर्वतोपरी काळजी घेऊन केलेल्या पंचकर्माचे वैशिष्ट्य म्हणजे याने शरीराची जशी शुद्धी होते तशीच मनाचीही शुद्धी होते आणि आरोग्यरक्षणामध्ये मनाचा वाटा किती मोठा सहभाग असतो हे सर्वज्ञात आहे.

पंचकर्माचे फायदे चरकसंहितेत असे सांगितले आहेत-
इंद्रियाणि मनोबुद्धिर्वर्णश्‍चास्य प्रसीदति।
बलं पुष्टिरपत्यं च वृषता चास्य जायते।।
जरां कृच्छ्रेण लभते चिरं जीवत्यनामयः ।।
...चरक सूत्रस्थान

उचित पंचकर्माने शुद्ध झालेल्या व्यक्‍तीची कांती उजळते, मन, इंद्रिये व बुद्धी निर्मळ होते, प्रसन्न होते, शरीरशक्‍ती वाढते, अपत्यप्राप्ती होते, मैथुनशक्‍ती वाढते, म्हातारपण उशिरा येते आणि रोगविरहित दीर्घ आयुष्याचा लाभ होतो.

संपन्न, निरोगी जीवन जगण्यासाठी यासारखा सोपा व अनुभवसिद्ध उपाय नाही.
आरोग्याचा अजेंडा डोळ्यांसमोर असताना रसायन सेवनाला विसरून चालणार नाही. सर्व धातूंना संपन्न करण्यासाठी, शरीरातल्या सर्व महत्त्वाच्या अवयवांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व एकंदर शरीरशक्‍ती व स्टॅमिना नीट ठेवण्यासाठी रसायन सेवन उत्तम असते.

पंचकर्माने शरीर व मन शुद्ध झाले, की नंतर रसायन घेणे सर्वांत चांगले असते; पण एरवीही नियमितपणे रसायन घेता येते. आयुर्वेदाने या दृष्टीने अनेक उत्तमोत्तम योग सांगितले आहेत. "संतुलन चैतन्यकल्प', "संतुलन शांती रोझ'; "संतुलन मॅरोसॅन'; "संतुलन सूर्यप्राश' अशी अनेक रसायने असतात. संपूर्ण वर्षभर असे एखादे उत्तम रसायन घेतले, तर आरोग्य नक्कीच सुरक्षित राहील.

याशिवाय स्वस्थवृतातील सूचनांचे पालन करणे व्यक्‍तिगत आरोग्यासाठी अपरिहार्य होय. सकाळी लवकर उठणे, प्रकृतिनुरूप व्यायाम करणे, नियमितपणे अंगाला तेल लावणे, संगणकावर काम करणाऱ्यांनी डोळ्यांची विशेष काळजी घेणे.

उदा.- पादाभ्यंग, सॅन अंजन, सुनयन तेल घालणे, सातत्याने फोनवर बोलणाऱ्यांनी किंवा अतिशय गोंगाट कानावर पडणाऱ्यांनी कानांची विशेष काळजी घेणे. उदा.- कानात श्रुती तेलासारखे तेल टाकणे, शहरात प्रदूषणयुक्‍त जागेत राहणाऱ्यांनी हवा शुद्ध होण्यासाठी विशेष काळजी घेणे. उदा.- सकाळ-संध्याकाळ "संतुलन प्युरिफायर धूप' जाळणे यांसारख्या सोप्या, फार वेळ न लागणाऱ्या; पण अतिशय प्रभावी गोष्टी अंगीकारता येतात.

आरोग्याचा आराखडा योजताना आरोग्यरक्षण महत्त्वाचे खरेच; पण गमावलेले आरोग्य मिळविण्याकडेही लक्ष द्यायला लागेल. मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की रोगावर उपचार करताना रोगाचा त्रास होऊ नये हे एकमेव उद्दिष्ट नसावे, तर रोग पूर्णपणे बरा व्हावा, रोगाला कारणीभूत असंतुलन दूर व्हावे यासाठी प्रयत्न करायला हवेत.

उदा.- मधुमेहासारख्या रोगात रक्‍तशर्करा कमी होणे जेवढे जरुरी आहे, त्यापेक्षा मुळातच रक्‍तात साखर येऊ नये यासाठी प्रयत्न करणे कैकपटीने आवश्‍यक आहे. एखाद्या त्चचारोगात त्वचेवरील रॅश, खाज येणे वगैरे लक्षणे कमी होणे जेवढे आवश्‍यक आहे तेवढेच रॅश येण्यास कारणीभूत असणाऱ्या पित्त, दूषित रक्‍त यांची शुद्धी होणेही गरजेचे आहे.

तंबाखू, सिगारेट, दारू वगैरे काही व्यसन असल्यास सोडण्याचा प्रयत्न करणे व नव्याने कुठलेही व्यसन लागणार नाही याची काळजी घेणे या गोष्टी व्यक्‍तिगत आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील

छोट्या-छोट्या त्रासांसाठी तीव्र स्वरूपाची औषधे घेणेही आरोग्यासाठी हानिकारक होय. रासायनिक द्रव्यांचे सेवन, मग ते औषधाच्या रूपाने असो, दीर्घकाळ टिकणाऱ्या डबाबंद अन्नाच्या माध्यमातून असो किंवा रासायनिक खतांचा वापर करून पोसलेल्या भाज्या- फळांच्या सेवनातून असो, आरोग्यासाठी हानिकारक असतेच. तेव्हा होता येईल तितके अशा द्रव्यांपासून दूर राहणे, निसर्गाची, पर्यावरणाची काळजी घेऊन एकंदर जीवनशैली आखणे निश्‍चितच आरोग्याकडे घेऊन जाणारे ठरेल.

सारांश, येत्या वर्षासाठी आरोग्याचा वैयक्‍तिक आराखडा तयार करताना खालील महत्त्वाच्या गोष्टी ठरतील-
*लवकर उठणे, लवकर निजणे
*नियमित योग-व्यायाम
*प्रकृतिनुसार आहार
*नियमित विरेचन
*नियमित अभ्यंग मसाज करणे
*"रसायन' सेवन
*मैत्रिपूर्ण वागणूक
*व्यसनमुक्‍ती

- डॉ. श्री बालाजी तांबे

1 comment:

  1. आजपासुन नव्हे आत्तापासुन सुर्वात

    ReplyDelete

ad