Sunday, June 21, 2009

लठ्ठपणा वाढतोय?

वजन वाढतंय असं लक्षात आलं, की डाएटिंग आणि व्यायाम करून त्यावर नियंत्रण आणलं जातं. सर्वसामान्यतः अनेकांचं वजन यामुळे नियंत्रणात येतं. पण नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून असं निष्पन्न झालंय, की वजन वाढणं अथवा कमी होणं हे अंशतः गुणसूत्रांच्या जडणघडणीवर अवलंबून असतं. डीएनएची रचना आणि मेंदूवरील नियंत्रण ठेवणारी यंत्रणा वजन वाढणं अथवा कमी होणं हे ठरवत असते.
या रचनेवर मात करणं बऱ्याचदा अवघड असतं. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक जडणघडण त्याच्या जन्मापासून ठरलेली असते. काही संशोधनानुसार असं आढळलंय, की ज्या स्त्रियांचा आहार गर्भारपणात कमी असतो त्यांची मुलं लठ्‌ठ होण्याचं प्रमाण जास्त असतं. शास्त्रज्ञांच्या मते, प्रत्येकाचं वजन गुणसूत्रांनुसार ठरलेलं असतं. यात बदल करणं म्हणजे निसर्गनियमांविरुद्ध वागणं.
एखाद्या व्यक्तीला वजन वाढवायचं असल्यास त्याने गरजेपेक्षा जास्त खाण्याचा प्रयत्न केल्यास शरीरातील उष्मांक निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा वेग मंदावतो आणि वाढलेलं वजन लगेच पूर्ववत होतं. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी डाएटिंग केल्यास शरीरातील उष्मांक निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा वेग प्रचंड वाढतो, त्यामुळे प्रचंड भूक लागते आणि वजन पूर्ववत होतं.
पण याचा अर्थ असा नाही, की लठ्ठपणा ही नैसर्गिक देणगी आहे. गुणसूत्रांनुसार वजन ठरलेलं असलं तरीही अति लठ्ठपणा हा आहारविहारातील चुकीच्या सवयीने आलेला असतो. तो घालविणं मात्र आपल्या हाती असतं. नियमित व्यायाम आणि योग्य आहार हाच त्यावर उपाय असू शकतो.
- अपर्णा पाखमोडे

No comments:

Post a Comment

ad