Tuesday, June 15, 2010

श्रेयकारी बुद्धी

बुद्धी व मनाच्या शुद्धीसाठी आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे प्राणायाम. प्राणायामाच्या नित्य अभ्यासाने मनाची शक्‍ती वाढते. मन स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले, तर त्यामुळे बुद्धीसुद्धा आपले काम व्यवस्थित करू लागते आणि मग अर्थातच शरीर-मनाची सर्व कार्ये व्यवस्थित होऊ लागतात. प्राणायामापेक्षाही अधिक प्रभावी उपचार म्हणजे ॐकार गुंजन. यामुळे प्राणायामाचे फायदे मिळतातच; पण मन व बुद्धी अधिक चांगल्या प्रकारे शुद्ध होऊ शकतात.
सामान्यतः बुद्धी शब्दाचा अर्थ हुशारी असा केला जातो. सांगितलेले चटकन समजणे, ते लक्षात राहणे आणि योग्य वेळी आठवणे हे ज्याला सहज जमते, तो हुशार व बुद्धिमान, असा समज झालेला दिसतो; पण बुद्धीची व्याप्ती याहून खूप मोठी आहे. बुद्धीवर जबाबदारीही याहून जास्ती आहे.
अंतःकरणातील एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे बुद्धी. करण म्हणजे साधन. साधन कशाचे, तर ज्ञान करून घेण्याचे. या ज्ञानाच्या साधनांचे दोन गट पाडलेले आहेत...

1. अंतःकरण : यात मन, बुद्धी व अहंकार या तिघांचा समावेश होतो.
2. बाह्यकरण : यात पाच ज्ञानेंद्रियांचा समावेश होतो.

ज्ञानेंद्रियांचा आपापल्या विषयांशी संयोग होतो, पण त्याचे ज्ञान आत होण्यासाठी अंतःकरणाची आवश्‍यकता असते. उदा.- कानांनी ऐकले असे आपण समजत असलो, तरी कानाच्या ठिकाणी राहणाऱ्या श्रोत्रेंद्रियांचा बाहेरच्या बाजूला गाण्याशी संयोग होतो. मनाबरोबर बुद्धी व अहंकार आपला कौल देतात आणि मग आत्मा त्या गाण्याचा अनुभव घेतो. म्हणूनच मन थाऱ्यावर नसले किंवा इतर कोणत्या तरी विषयात गुंतले असले, तर कानावर पडलेला शब्द आतपर्यंत पोचू शकत नाही किंवा बुद्धी आणि अहंकाराने अगोदरपासून अमुक गोष्ट ठरवली असली, तरी शब्दाचा सरळ अर्थ आतपर्यंत पोचत नाही, पूर्वग्रहानुसार अर्थ काढला जातो. व्यवहारात ही गोष्ट अनेकदा अनुभवता येते; पण असे होऊ नये. जे जसे आहे तसेच आतपर्यंत पोचविण्याचे काम बुद्धीचे असते.
समं बुद्धिर्हि पश्‍यति, उचिता बुद्धिः समं यथाभूतं पश्‍यति ।
...चरक शारीरस्थान

बुद्धी सम म्हणजे जे जसे आहे तसे पाहते. बुद्धी उचित असली, शुद्ध असली तरच हे शक्‍य असते.
निश्‍चयात्मिका बुद्धिः ः निश्‍चयाप्रती पोचविणारी ती निश्‍चयात्मिका बुद्धी असेही म्हटले जाते. हे करू का ते करू, हे चांगले का ते चांगले, अशी मनाची दोलायमानता संपुष्टात आणून एका निर्णयाप्रत पोचविण्याचे काम फक्‍त बुद्धी करू शकते. बुद्धी जेवढी शुद्ध असेल तेवढे ती स्वतःचे काम व्यवस्थित करू शकते; पण बुद्धी भ्रष्ट झाली तर त्यामुळे अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात आणि शेवटी मनुष्याचा नाश होतो.

म्हणूनच बुद्धी फक्‍त हुशारीपुरती मर्यादित नसते, तर जीवन संपन्न करायचे असेल, खऱ्या अर्थाने जगायचे असेल आणि स्वतःचा उत्कर्ष साधायचा असेल, तर बुद्धी चांगली असायला हवी, शुद्ध असायला हवी.
बुद्धीची व्याप्ती इतकी मोठी आहे, की बुद्धीलाच काही ठिकाणी प्रज्ञा असे संबोधलेले आहे. चरकसंहितेत पहिल्या अध्यायात रोगाचे मुख्य कारण काय आहे, हे समजावताना म्हटले आहे - 

कालबुद्धीन्द्रियार्थानां योगो मिथ्या न चाति च।
द्वयाश्रयाणां व्याधीनां त्रिविधो हेतुसंग्रहः।।

काळ, बुद्धी व इंद्रिय यांचा अयोग, मिथ्यायोग व अतियोग हे सर्व रोगांचे कारण असतात. या ठिकाणी बुद्धी हा शब्द "प्रज्ञा' या अर्थाने वापरलेला आहे.
म्हणजेच बुद्धी, धृती व स्मृती हे तीन प्रज्ञाभेद असले तरी त्यात बुद्धी हीच सर्वश्रेष्ठ असते. बुद्धी बिघडली आणि प्रज्ञापराध घडला तर त्यातून अनेक शारीरिक, मानसिक विकार होऊ शकतात. 
शुद्ध बुद्धीची व्याख्या अशी केलेली आहे-
बुद्धेः निश्‍चयात्मकज्ञानकरत्वे पाटवम्‌ ।...चरक सूत्रस्थान

निश्‍चित व योग्य ज्ञान करण्याचे कौशल्य म्हणजे बुद्धीची शुद्धता. याउलट बुद्धी भ्रष्ट झाली की काय हितकर आहे, काय अहितकर आहे, काय क्षणभंगुर आहे, काय चिरंतन आहे, हे समजू शकत नाही. उलट विषमज्ञान होते, म्हणजे जे हितकर आहे ते अहितकर वाटते; जे चिरंतन आहे त्याकडे लक्ष न देता क्षणभंगुराची ओढ लागते. चांगले काय, वाईट काय हे कळेनासे होते. करायला पाहिजे त्या गोष्टी होत नाहीत, जे करायला नको ते करावेसे वाटते. मुख्य निर्णय देणारी बुद्धीच चुका करायला लागली, की नंतर सगळेच शारीरिक, मानसिक व्यवहार चुकीचे होत जातात.

शुद्धौ बुद्धिप्रसादः।...सुश्रुत चिकित्सास्थान
म्हणजे मन शुद्ध असले, तरच बुद्धी प्रसन्न राहू शकते आणि मनाच्या शुद्धीसाठी आयुर्वेदात सत्त्वावजय म्हणून उपचार सांगितला आहे. मन शुद्ध ठेवण्यासाठी, "सत्त्वावजय' होण्यासाठी चरकसंहितेत खालील उपाय सुचविले आहेत- 

ज्ञानविज्ञानधैर्यस्मृतिसमाधिभिः ।...चरक सूत्रस्थान
ज्ञान, विज्ञान, धैर्य, स्मृती व समाधी यांच्यायोगे मनावर नियंत्रण ठेवता येते. 

ज्ञानम्‌ अध्यात्मज्ञानम्‌ ।
ज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञान असे टीकाकार सांगतात. अध्यात्म हा शब्द या ठिकाणी आत्मा, निर्वाण संबंधातले अध्यात्मशास्त्र या अर्थाने वापरलेला नाही, तर "स्व-शरीर' या अर्थाने वापरलेला आहे.

आत्मशब्दो।त्र स्वशरीरवचनः ।
येथे "आत्म' हा शब्द शरीरवाचक आहे. म्हणजेच मनावर काम करण्यासाठी अगोदर स्वतःचे शरीर, स्वतःची प्रकृती माहिती हवी. आहार काय असावा, आचरण कसे असावे, कामधंद्याचे स्वरूप कसे असावे, या सर्व गोष्टींबद्दल यथार्थ ज्ञान असायला हवे. उदा.- एखाद्याची प्रकृती नाजूक व संवेदनशील असली आणि त्याला नोकरीधंद्याच्या ठिकाणी अतिरिक्‍त मानसिक ताण येत असला, तर हळूहळू मानसिक अनारोग्याची सुरवात होऊ शकेल.

विज्ञानम्‌ शास्त्रज्ञानम्‌ ।
अर्थात निरोगी मनासाठी शास्त्राची योग्य माहिती असायला हवी. यात आरोग्यशास्त्र, तसेच इतर जीवन संपन्न करण्यास मदत करणाऱ्या शास्त्रांचा अंतर्भाव होतो. यामुळे मनावर चांगले संस्कार होऊ शकतात आणि बुद्धीने, प्रज्ञेने दिलेल्या निर्णयानुसार हे संस्कारसंपन्न मन योग्य गोष्टी करण्यास प्रयुक्‍त होते. शास्त्रांची, खऱ्या ज्ञानाची माहितीच नसेल, तर बुद्धीही चुकीचा निर्णय देते. मनही संस्कारशून्य असल्याने चुकीच्या गोष्टींकडे धाव घेते.
धैर्यमविषादेन परीक्षेत्‌ ।...चरक विमानस्थान

धैर्य म्हणजे धीर. मनाने धीर सोडता कामा नये. धीर सुटला, मन खचले तर मनावर नियंत्रण ठेवणे आणखीनच कठीण होते. धीर कायम ठेवण्यासाठी मन विषण्ण होऊ न देणे गरजेचे असते. त्यामुळे किमान छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनाचा त्रागा न करणे, चुकीच्या किंवा अवाजवी अपेक्षा न ठेवणे, चांगल्या गोष्टी ऐकण्या-वाचण्याने, मन शांत करणारे संगीत ऐकण्याने, कुठल्यातरी चांगल्या गोष्टीत रमवून मन प्रसन्न व शांत ठेवले तर मनाची "धैर्यता' टिकवता येऊ शकते.

स्मृति - अनुभूतार्थस्मरणम्‌ ।
अनुभवातून शहाणपण येते असे म्हटले जाते ते खरेच आहे. चांगल्या वागण्याचे झालेले चांगले फायदे व चुकीच्या वागण्याने झालेले नुकसान स्मृतीत ठेवले, बरा-वाईट अनुभव गाठीशी ठेवला तर मनाला योग्य व चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करता येते.
समाधी-विषयेभ्यो निवर्त्य आत्मनि मनसो नियमनम्‌ ।
विषयांपासून निवृत्त होऊन मन आत्म्याच्या ठिकाणी केंद्रित होणे म्हणजे "समाधी'. ही अवस्था साध्य होणे अवघड असले, तरी त्या दृष्टीने होता येईल तेवढे प्रयत्न निश्‍चितपणे करता येतात. विषयप्राप्तीसाठी शरीरास पळविणारे मन आवरून व नियमित करून, त्याला शरीरात म्हणजे पर्यायाने आत्मरूपात समाविष्ट करणे ही समाधी. अशा प्रकारे सात्त्विकतेची परमावस्था म्हणजे समाधी.

बुद्धिन्द्रियमनः शुद्धिमारुतस्यानुलोमता।
सम्यक्‌ विरिक्‍तलिंगानि कायाग्नेश्‍चानुवर्तनम्‌ ।।

बुद्धी, इंद्रिये आणि मन यांची शुद्धी, वाताचे अनुलोमन आणि अग्नी समस्थितीत राहणे हे सर्व शास्त्रोक्‍त पद्धतीने केलेल्या योग्य विरेचनाने शक्‍य होते.
बुद्धी व मनाच्या शुद्धीसाठी आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे प्राणायाम. प्राणायामाच्या नित्य अभ्यासाने मनाची शक्‍ती वाढते. मन स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले, तर त्यामुळे बुद्धीसुद्धा आपले काम व्यवस्थित करू लागते आणि मग अर्थातच शरीर-मनाची सर्व कार्ये व्यवस्थित होऊ लागतात. प्राणायामापेक्षाही अधिक प्रभावी उपचार म्हणजे ॐकार गुंजन (सोम ध्यानपद्धत). यामुळे प्राणायामाचे फायदे मिळतातच; पण मन व बुद्धी अधिक चांगल्या प्रकारे शुद्ध होऊ शकतात.

बुद्धी व मेधा संपन्न असाव्यात असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. बुद्धी प्रगल्भ करता येते, संस्कारांच्या माध्यमातून बुद्धी तल्लख करता येते, बुद्धीला चालना देता येते. हे काम गर्भावस्थेमध्ये गर्भसंस्कारांच्या माध्यमातून करता येते. विशेषतः गर्भसंस्कार संगीतातील मंत्र, स्तोत्र, विशेष वाद्यांचे वादन यांच्या साह्याने करता येते आणि जन्मानंतर बुद्धी व मेधाकर गणाच्या साह्याने साध्य करता येते.

सतताध्ययनं वादः परतन्त्रावलोकनम्‌ तद्विद्याचार्य सेवा च इति बुद्धिमेधाकरो गणः ।...सुश्रुत चिकित्सास्थान
सतत अध्ययन-अध्ययन करणे म्हणजे नुसते पाठांतर करून चालत नाही, तर विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक असते. विषय समजणे म्हणजे नुसता शब्दांचा अर्थ लक्षात ठेवणे नाही, तर आतले ज्ञान ण्याचा प्रयत्न करणे.

वाद ः वाद म्हणजे चर्चा. ज्या शास्त्राचा अभ्यास करतो आहोत त्या शास्त्रासंबंधी इतरांशी चर्चा करणे, आपले शास्त्रसंमत मत मांडणे.

परतंत्रावलोकन ः इतर शास्त्रांकडे लक्ष ठेवणे, पण तरीही स्वतःच्या शास्त्राशी ठाम राहणे.

तद्विद्याचार्यसेवा ः शास्त्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत, निपुण आहेत, त्यांची सेवा करणे, त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे.

थोडक्‍यात काय, तर शरीर व मनाचे संपूर्ण आरोग्य राखायचे असेल, संपन्न जीवन जगायचे असेल, तर त्यासाठी शुद्ध, संपन्न बुद्धी आवश्‍यक आहे आणि हे करणे आपल्याच हातात आहे. 
 
- डॉ. श्री बालाजी तांबे 
---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad