Friday, May 16, 2008

उपाय बद्धकोष्ठतेवर

उपाय बद्धकोष्ठतेवर

(डॉ. संजीव डोळे)
आजच्या या धकाधकीच्या जीवनात मुख्यत- आढळणारी तक्रार म्हणजे बद्धकोष्ठता आज याविषयी सविस्तर जाणून घेऊ व सोबत होमिओपॅथी औषधांची माहिती पाहू. .......
पचनक्रियेमधील नैसर्गिक चक्रामध्ये पोट साफ होणे याला खूप महत्त्व आहे. पोट साफ न होणे यालाच बद्धकोष्ठता म्हणतात. सकाळी उठल्यानंतर शौचास साफ होणे, हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. अर्थात याचा परिणाम दिवसभराच्या कामावर होत असतो. दिवसभराच्या ताणतणावामध्ये व धावपळीमध्ये उत्साही राहण्यासाठी पोट साफ/मोकळे राहणे महत्त्वाचे असते.

बद्धकोष्ठतेची कारणे -
दैनंदिन जीवनातील काही सवयी, तसेच आहारातील दोष ही प्रमुख कारणे आहेत.

रात्री उशिरा झोपणे व सकाळी उशिरा उठणे, मद्यपान, जेवणाच्या अनियमित वेळा, आहारामध्ये अतितिखट, तेलकट, मसालेदार, मांसाहार या पदार्थांचा जास्त समावेश व पालेभाज्या, फळे यांचा अभाव, पाणी कमी पिणे, नियमित व्यायामाचा अभाव. पहाटे लवकर उठणे व रात्री जागरण न करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. नियमित व्यायामाने सकाळी पोट साफ होण्यास मदत होते, तसेच दिवसभर मन प्रसन्न व आनंदी राहते.

बद्धकोष्ठतेची लक्षणे -
दिवसभर बेचैन राहणे, भूक मंदावणे, मळमळणे, डोके व पोट जड राहणे, गॅसेस होणे, छातीवर दडपण येणे, चिडचिडेपणा ही लक्षणे सर्वसामान्यपणे आढळतात. यामध्ये मलाशयामध्ये मल साठून राहिल्याने त्याच्या स्नायूंची लवचिकता व कार्यक्षमता कमी होते. हा विकार जरी किरकोळ स्वरूपाचा वाटत असला, तरी काही व्यक्तींमध्ये कालांतराने यातून गंभीर समस्या निर्माण होतात. उदा. पोटातील व्रण (अल्सर) मोठ्या आतड्याचा कर्करोग इ.

यासाठी रात्री झोपताना कोमट पाणी घेणे व सकाळी उठल्यानंतर गार पाणी १ ग्लास घेणे फायद्याचे ठरते. याने मलावरोध कमी होण्यास मदत होते, तसेच पचनकार्य नीट होण्यासाठी अन्न सावकाश व चावून खावे. तसेच आहारामध्ये बटाटे, रताळे, साबुदाणा, हरभऱ्याची डाळ, चहा, कॉफी यांचा अतिरेक टाळावा. शक्‍यतो ऍल्युमिनिअमच्या भांड्यांमध्ये अन्न शिजविणे टाळावे व भरपूर पाणी प्यावे. आता यासाठी उपयोगी काही होमिओपॅथिक औषधांची माहिती घेऊ.

१) ब्रायोनिया - पोटात जड वजन असल्यासारखे वाटते. तोंडात कडवटपणा येतो. शौचास खूप जोर द्यावा लागतो. हे सर्व संधिवाताशी निगडित असते.
२) ऍल्युमिना - शौचास खूप जोर द्यावा लागतो. रुग्णास शौचास जायची इच्छा नसते किंवा गेल्यावर होत नाही. बटाटा आवडत नाही/त्रास होतो. हे औषध जुनी सर्दी, अर्धांगवायू यासाठीही उपयुक्त आहे.
३) मॅग मूर - हे औषध मुख्यत- यकृताशी निगडित आहे. लहान मुलांमध्ये मलावरोध दात येताना झाल्यास अत्यंत गुणकारी औषध आहे. शौचाला थोडीच होते. दूध पचवू शकत नाही.
४) सल्फर - मलावरोध झाल्यामुळे गुदद्वाराची खूप आग होते व सूज येते. हा रुग्ण जेवणात खाण्यामध्ये पाणीच खूप पितो. शौचास खूप जोर द्यावा लागतो.
५) ग्रॅफायटीस - हे औषध जाड, गोऱ्या स्त्रियांना किंवा मुलींना ज्यांना पाळीचे विकार असतील त्यांना उपयोगी पडते. शौचावाटे रक्त पडते. मल जड असतो.
६) नक्‍स व्होमिका - मलावरोधासाठी अत्यंत गुणकारी औषध असते. यामध्ये तक्रारी या मद्यपान, बाहेरचे खाणे, मांसाहार यामुळे होतात. शौचास खूप जोर द्यावा लागतो. शौचास खूप कडक व थोडी होते.

अपचन, मूळव्याध व गॅसेस यासाठीही उपयुक्त औषध आहे.

- डॉ. संजीव डोळे
होमिओपॅथी तज्ज्ञ, पुणे.

No comments:

Post a Comment

ad