Thursday, May 1, 2008

फिटनेस राखणाऱ्या छोट्या गोष्टी

फिटनेस राखणाऱ्या छोट्या गोष्टी

व्यायाम करायला वेळ मिळत नाही, अशी सबब सांगणाऱ्यांनी दैनंदिन जीवनात काही छोट्या गोष्टींचं भान राखलं तरी फिटनेसची किमान पातळी राखता येऊ शकेल.
वरच्या दिशेने ताण - वारंवार वापराव्या लागणाऱ्या वस्तू थोड्या उंचावर ठेवा. त्याने तुम्हाला शरीराला वारंवार वरच्या दिशेने ताण द्यावा लागेल. त्यासाठी चवड्यावर उभं राहावं लागेल. त्यानं पोटऱ्यांच्या स्नायूंनाही व्यायाम होईल.

सतत हिंडते राहा - तुमची नेहमीची आवडती कामं करताना शक्‍य तितके हिंडते राहा. त्यासाठी वाटल्यास ठराविक काळाने कामातून छोटी विश्रांती घ्यायला हरकत नाही. त्याने पायांना व्यायाम मिळेल.

पोट आत ओढून घ्या - काम करता करताच ठराविक वेळाने पोट आत ओढून घेण्याचा व्यायाम करा. एरवी शरीराच्या या भागाला व्यायाम होतच नाही.

बसलेले असताना - शरीराळा थोडा ताण द्या. एक-एक पाय सरळ करून त्यांना आळीपाळीने ताण द्या. शक्‍यतो पाठीचा कणा ताठ ठेऊन बसा.

उन्हात जा - सतत बंद दाराआड राहू नका. थोडावेळ तरी सूर्यकिरण अंगावर पडतील याची काळजी घ्या. ऊन आणि ताजी हवा याने तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील. फक्त फार वेळ उन्हात राहणं टाळा.

डोळ्यांना व्यायाम द्या - वाचन करताना चांगला उजेड असू द्या. संगणक-टीव्हीच्या पडद्यांचा प्रकाश डोळ्यांना आरामदायी राहील अशा पातळीपर्यंत नियंत्रित करा. डोळे बंद करून बुबुळं वर्तुळाकार फिरवा. दिवसातून एकदा तरी डोळे बंद करून हाताच्या तळव्याने त्यावर हलका दाब द्या.

पाठीच्या कण्याला बाक द्या ः दिवसातून किमान तीन-चार वेळा पाठीच्या कण्याला पुढच्या आणि मागच्या दिशेने बाक द्या. एखाद्या खांबाला किंवा जड कपाटाला धरून असा व्यायाम करता येईल.

No comments:

Post a Comment

ad