Thursday, May 1, 2008

दूर ठेवा संधिवात

दूर ठेवा संधिवात

(वैद्य मीरा ठाकूर, आयुर्वेदतज्ज्ञ, पुणे)
उतारवयात हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधे दुखी सुरू होणे हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मात्र, जीवनशैलीतील काही मोजके बदल, आहारावरील नियंत्रण आणि नियमित व्यायाम याच्या योगाने संधीवात दूर ठेवता येऊ शकतो.
तहान, भूक, झोप या शरीराच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत, त्याप्रमाणेच वृद्धत्व हीसुद्धा निसर्गचक्रातील एक अवस्था आहे. या काळात शरीरात नवीन काही तयार होत तर नाही, पण आहे त्याच शरीरातील अवयवांची आणि त्यांच्या क्रियांची झीज व्हायला लागते. या झिजेच्या प्रक्रियेत एक प्रमुख अवयव चाळिशीनंतर झिजायला लागतो, तो म्हणजे हाडे. आणि त्यामुळे होते वेगवेगळ्या प्रकारची सांधेदुखी किंवा संधिवात.

डोक्‍यापासून पायांच्या बोटांपर्यंत जीभ सोडून सर्वत्र हाडांचा सापळा असतो. या हाडांमुळेच आपल्या शरीराला आकार येतो. आपल्या हालचालींना सुलभता येते. मानेपासून कंबरेपर्यंत असलेला पाठीचा कणा किंवा मेरुदंड ही तेहतीस मणक्‍यांची माळ असून, जीवनाचा आधार आहे. त्याच्याभोवती पाठ म्हणजेच स्नायूंची एक भक्कम भिंत आहे. दोन मणक्‍यांमध्ये कुर्चा किंवा डिस्क असतात. या कुर्चा गादीसारख्या, पण लवचिक असतात. त्यामुळे हालचालींच्या वेळी मणक्‍यांना बसणारे धक्के या कुर्चा शोषून घेऊन दोन मणक्‍यांत घर्षण होऊ देत नाहीत.

दुसरा शरीरातील महत्त्वाचा सांधा म्हणजे गुडघा. हासुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी आणि संधिबंधांनी तयार होतो. आपल्याकडे भारतात आपण गुडघ्याचा वापर जरा जास्तच करतो. मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे, नमाजाला बसणे या आणि अशा अनेक क्रियांमुळे गुडघ्यांच्या हालचाली अधिक होऊन तेथील हाडे झिजणे, तेथील वंगण कमी होणे, किंवा अतिउष्णतेमुळे गुडघ्याला सूज येते.

शरीरातील प्रत्येक सांध्यातील हाडाचे, त्यातील संधिबंध स्नायू यांचे स्वतंत्र महत्त्व आहे. जेव्हा आपण दैनंदिन जीवनात सुरळीतपणे त्याचा वापर करत असतो तेव्हा आपल्याला त्या कशाचेच महत्त्व कळत नाही, पण जेव्हा सांध्यांतून, हाडांतून आवाज यायला लागतो, ते आपापली कामे नीट करेनाशी होतात तेव्हाच आपल्याला त्याचे महत्त्व समजायला लागते.

संधिवात होण्याची अनेक कारणे आहेत. काहींच्या हाडांत जन्मजात विकृती असते. सूज, दाह, जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याने अपघातामुळे हाडांना मार लागण्यामुळे किंवा तुटणे सरकण्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांनी हाडांना पोचणाऱ्या इजेमुळे, वयोमानानुसार मणक्‍यांची/ हाडांची होणारी झीज, शिवाय हाडे ठिसूळ होण्यामुळे, या आणि अशा अनेक कारणांमुळे संधिवात होत असतो.

आपल्याला ज्या सवयी लागलेल्या असतात त्यामुळे काही दुखण्यांना आपण स्वतःहूनच निमंत्रण देत असतो. उदाहरणार्थ- बसण्याची, उभे राहण्याची पद्धत, जास्त वजन असणाऱ्यांच्यासुद्धा शरीराचा भार गुडघ्यांवर पडल्यामुळे तेथील सांध्यांतील हाडांवर, संधिबंधांवर परिणाम होऊन पायांना बाक येणे, गुडघे दुखणे, सुजणे, हालचाली करताना त्रास होणे, खाली उठता-बसता न येणे, अशा तक्रारी सुरू होतात. वाकण्याची पद्धत, व्यायामाचा अभाव, जास्त वजन उचलणे, नैराश्‍य, मानसिक ताण, व्यावसायिक चिंता या सर्वांमुळेही सांधेदुखी आपल्या नकळत सुरू होऊन वाढत जाते.

पचनाच्या तक्रारींमुळे किंवा जास्त प्रमाणात अनियमित खाल्ल्याने, मलप्रवृत्तीच्या अनियमितपणामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शरीरात एक प्रकारची विषारांची किंवा आमाची निर्मिती होते. तो "आम' सांध्यांच्या ठिकाणी साठून वातदोषांच्या साह्याने तेथे विकृती निर्माण करून आमवाताची सुरवात होते. तसेच स्त्रियांच्या रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात जे काही अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावात बदल होतात त्यामुळे वजन वाढते. हाडे झिजायचे प्रमाणही या काळात अधिक असल्याने संधिवात या वयात सुरू होतो.

पाठदुखी, कंबरदुखी किंवा इतर सांधे दुखण्याचा अनुभव जरी प्रत्येकानेच कधी ना कधी घेतला असला, तरी दुखण्याची तीव्रता वाढणे, हातापायांत जडपणा किंवा बधिरपणा येणे, मुंग्या येणे, आग आग होणे, स्नायू कडक होणे, पायांत गोळे येणे, शरीर एका बाजूला कलणे, लघवी आणि शौचावर नियंत्रण न राहणे, तसेच खाली बसणे, वाकणे या क्रियांच्या वेळी दुखण्याची तीव्रता वाढू लागली की उपचार करण्याची वेळ आली आहे, असे समजायला हरकत नाही. ती म्हणजे.

आयुर्वेदानुसार अस्थिधातूची निर्मिती ही वातदोषापासून होते. जेव्हा एखाद्या हाडाच्या ठिकाणी विकृती निर्माण होते तेव्हा त्या ठिकाणी वातप्रकोप होतो आणि वातवृद्धीचे लक्षण म्हणून तेथे शूल किंवा दुखणे सुरू होते. आपल्या शरीराची व्याख्या "शीर्यते इति शरीरम्‌।' म्हणजे ज्याची झीज होते ते शरीर, अशी केलेली आहे. झीज होण्याची प्रक्रिया नैसर्गिक असली तरीसुद्धा ती योग्य क्रमाने होणे आवश्‍यक आहे. जर एखाद्याची लहान वयातच हाडे झिजायला लागली किंवा पुढे होणारी दुखणी व्हायला लागली की दुखणी दुःखाला कारण होतात.

रोजच्या जीवनात आपण जे खातो त्याचा उपचारासाठीही उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ - लवंगा, दालचिनी, जिरे, मोहरी, धने, सुंठ, पुदिना, मनुका. सांधेदुखीवर उपचार करताना पचन सुधारणे आवश्‍यक आहे, की ज्यामुळे शरीरात "आम'निर्मिती होणार नाही. तसेच शरीरात विकृत वातनिर्मिती थांबवून त्या वातावर नियंत्रण ठेवण्यासाठी एखादा दिवस पूर्ण उपवास, लंघन करणे उपयोगी ठरू शकते; पण डायबेटिस, ब्लडप्रेशरसारखे आजार असतील, इतर काही औषधे चालू असतील तर वैद्यकीय सल्ल्याने लंघन करावे.

दोन-तीन लसणीच्या पाकळ्या तुपावर किंवा एरंडेलावर परतून दिवसातून एकदा, असे दोन- तीन महिने खाव्यात. रोज रात्री झोपताना सुंठीच्या काढ्याबरोबर एरंडेल आपल्या कोठ्यानुसार व वैद्यकीय सल्ल्याने घेणे. आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा संधिवातासाठी खूप उपयोगी पडते. यात स्नेहन-स्वेदनपूर्वक बस्तिचिकित्सा, रक्तमोक्षणासारखी चिकित्सा केली जाते.

स्नेहन - यात स्नेहन/मसाज हा विशिष्ट औषधी तेलाने दुखणाऱ्या सांध्याला विशिष्ट पद्धतीने करावा. हा तज्ज्ञ व्यक्तींकडूनच करून घ्यावा. सांध्याच्या रचनेनुसार मसाज करण्याची दिशा ठरते. यासाठी विषगर्भ तेल, सहचरादी, प्रसारणी, धान्वंतर तेल, चंदनबलालाक्षादी तेलांचा उपयोग होतो. दुखणाऱ्या सांध्यांबरोबरच सर्वांगाला मसाज केल्यास चांगलेच. मसाजामुळे अस्थिधातूतील वाताचे शमन होते. हाडांची झीज होत नाही. अस्थिसंधी, मांस, स्नायू यांचे पोषण होते. पर्यायाने दृढता वाढून तेथील दुखणे कमी होते, सूज कमी होते. हालचालींना सुलभता येते.

स्वेदन - विशिष्ट औषधी द्रव्यांची वाफ विशिष्ट पद्धतीने दुखणाऱ्या सांध्यांना देण्यात येते. उदाहरणार्थ - नाडीस्वेद, पिण्डस्वेद, वालुकापोट्टली स्वेद. जेव्हा एखाद्या हाडाला पोषणाची आवश्‍यकता ?सेल, तेथील रक्तपुरवठा सुरळीत करावयाचा असेल तेव्हा पिण्डस्वेद पत्रपोट्टली स्वेद करता येतो. यासाठी साठेसाठीचा भात, गाईचे दूध, गुळवेल, देवदार- निर्गुंडीसारखी औषधी द्रव्ये वापरली जातात. त्यांचा उपयोग हाडांची झीज कमी होण्यास आणि तेथील घनता वाढवण्यात होतो.

बस्ती - या स्नेहन-स्वेदनानंतर, म्हणजेच मसाज आणि शेकानंतर काही औषधी द्रव्यांच्या काढ्यांचा आणि औषधी तेलांचा बस्ती किंवा एनिमा दिला जातो. बस्तिचिकित्सा ही वातावरची श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. सांधेदुखीबरोबरच पचनाच्या तक्रारीसाठी वजन कमी करून पर्यायाने गुडघ्यांवरील भार कमी करण्यासाठी या उपचारांचा उपयोग होतो. या सर्व पंचकर्मांच्या क्रिया या तज्ज्ञ वैद्यांकडूनच करून घ्याव्यात.

याशिवाय औषधोपचारामध्ये काही गुग्गुळ कल्प- उदाहरणार्थ - लाक्षादिगुग्गुळ, त्रयोदशांग गुग्गुळ, सिंहनाद, महावातविध्वंस, काही बृहत्‌वातचिंतामणी, सुवर्णभूपतीसारखे सुवर्णकल्प वापरले जातात. ही औषधेही योग्य वैद्याकडून व त्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

आहारात जंक फूड उदा. पिझ्झा, पावभाजीसारखे पदार्थ नियमित घेऊ नयेत. नियमित दूध घ्यावे. कढीपत्ता, कडवे वाल, गाजर, बीट, दुधी भोपळा, मुळा, कोबी, पडवळ, दोडक्‍यासारख्या भाज्या, पालेभाज्यांचे सूप, नारळाचे पाणी घ्यावे. मुगाची खिचडी, नाचणीची भाकरी खावी. शिंगाड्याचे थालीपीठ, शिरा हे उपवासाला घ्यावे. जेवणात अतिशय तेलकट, मसालेदार पदार्थ वर्ज्य करावेत. मसाल्यांऐवजी धने, जिरे, बडीशेप, हिंग, आले, लसूण घालून स्वयंपाक करावा. फ्रिजमधील थंड पदार्थ, शिळे अन्न, जास्त प्रमाणात चहा, कॉफी, मद्य, तंबाखूसेवन करू नये. दैनंदिन जीवनातील असे काही फेरबदल, योग्य आणि नियमित आहार, व्यायाम आणि योग्य औषधोपचाराने संधिवात नक्कीच पळून जाईल.

No comments:

Post a Comment

ad