Friday, May 16, 2008

आहार हेच औषध

आहार हेच औषध


(डॉ. श्री बालाजी तांबे)
औषधांसाठी अनुपान म्हणून आहारद्रव्यांचा वापर करणे किंवा आहाराचाच औषधासारखा वापर करणे यासाठी आयुर्वेदाने विकसित केलेल्या काही "आहारकल्पनां'ची माहिती आपण गेल्या अंकात घेतली. आता लाजाम्ण्ड, पेया, विलेपी आणि यवागू या कल्पनांची माहिती पाहू. .......
आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये, लाजमण्ड, म्हणजे साळीच्या लाह्यांच्या मण्ड, ही एक अतिशय उपयुक्‍त कल्पना सांगितलेली आहे.

लाजमण्ड
साळीच्या लाह्यांच्या १४ पट पाणी घ्यावे व मंद आचेवर एकत्र शिजवावे. लाह्या शिजून अगदी मऊ झाल्या की अग्नीवरून काढून गाळून घ्यावे. मिळालेल्या द्रवामध्ये चवीनुसार सैंधव, सुंठ, मिरी, पिंपळी, तूप, साखर व कोकम, लिंबू वा चांगेरीची पाने यापैकी एखादे आंबट द्रव्य मिसळून प्यायला द्यावे.

असा हा लाजमण्ड बनविणे अतिशय सोपे असते, चवीला अतिशय रुचकर असतोच, शिवाय याचे खालीलप्रमाणे अनेक उपयोगही असतात,
- लाजमण्डामुळे अग्नी संधुक्षित होतो, पचनशक्‍ती सुधारते.
- शरीरातील अनुलोमनाची प्रक्रिया सुधारल्याने मलविसर्जन सहज होण्यास उपयोग होतो.
- हृदयासाठी हितकर असतो.
- विशेषत- वमन-विरेचनाने ज्यांचे शरीर शुद्ध झालेले आहे, त्यांच्यासाठी लाजमण्ड अतिशय पथ्यकर असतो.
- लाजमण्ड पिण्याने श्रमपरिहार होऊन थकवा दूर होतो.
- ताप आला असता, जुलाब होत असता, न शमणारी तहान लागत असता लाजमण्ड पिणे उत्तम असते.
- चक्कर, मूर्च्छा, दाह वगैरे त्रासातही लाजमण्डाचा उपयोग होतो.
- पित्त-कफदोषांचे असंतुलन दूर होते व रस-रक्‍त वगैरे सर्व धातू सम-अवस्थेत येण्यास हातभार लागतो.

असा हा गुणांनी संपन्न व सात्त्विक असल्याने कल्याणकारी असतो असेही चरकाचार्य सांगतात.
- हा लाजमण्ड बालक, वृद्ध, स्त्रिया व नाजूक प्रकृतीच्या सर्व व्यक्‍तींसाठी अतिशय हितकर असतो.

पेया
मण्डानंतर येते "पेया'. या दोघांमध्ये एवढाच फरक असतो की मण्डाध्ये अन्नाची शिते नसतात, तो पूर्णपणे गाळून घेतलेला असतो तर "पेया'मध्ये अन्नाची शिते तशीच ठेवली जातात.

तांदळाची पेया बनविण्यासाठी तांदूळ भरडून जरा बारीक केले जातात. त्यात १४ पट पाणी घालून मंद आचेवर शिजविले जातात. तांदूळ शिजले की त्यात चवीनुसार सैंधव, सुंठ, मिरी, पिंपळी, तूप वगैरे द्रव्ये टाकून पिण्यासाठी दिली जाते.

पेया पचायला हलकी असते, अग्नी प्रदीप्त करते, मूत्राशयाची शुद्धी करते, वाताचे अनुलोमन करते, घाम येण्यास मदत करते, ताप व उदररोगामध्ये हितकर असते.

विलेपी
पेयानंतर येते "विलेपी'. विलेपीमध्ये द्रवभाग कमी तर अन्नांश जास्ती असतो.

तांदळाची विलेपी बनविण्यासाठी तांदूळ भरडून बारीक केले जातात. तांदळाच्या चार पट पाणी घालून शिजवले जातात. तांदूळ पूर्णपणे शिजले की त्यात सैंधव, पिंपळी, सुंठ, मिरी, पिंपळी, तूप मिसळून खायला दिली जाते.

अशी ही विलेपी पचायला हलकी व तृप्तीकर असते, हृदयासाठी हितकर असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, पथ्यकर असते, ताकद वाढविते, पित्ताचे शमन करते, तहान तसेच भूक शमवते व बृंहण म्हणजे शरीर भरायला मदत करते.

लहान मुलांसाठी, वजन कमी असणाऱ्यांसाठी, पचन मंद असणाऱ्यांसाठी, पित्ताचा त्रास होणाऱ्यांसाठी अशी विलेपी खाणे उत्तम असते, नुसत्या तांदळाऐवजी तांदूळ-मुगाच्या मिश्रणापासूनही विलेपी बनविता येते.

यवागू
पथ्य कल्पनेत यानंतर येते "यवागू'. यवागू बनविताना किती पाणी घ्यायचे याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. आपण शारंगधरसंहितेत दिलेली पद्धत पाहणार आहोत,

साध्यं चतुष्पलं द्रव्यं चतु-षष्टिपले।म्बुनि ।
तत्क्वाथेनार्धशिष्टेन यवागुं साधयेत्‌ घनाम्‌ ।।
... शारंगधर

तांदूळ कुटून जाडसर बारीक करावेत. तांदळाच्या १६ पट पाणी घालून शिजवायला ठेवावेत व निम्मे पाणी उडून जाईपर्यंत शिजवावेत व दाट यवागू तयार करावी. यात आवश्‍यकतेनुसार सैंधव, पिंपळी, सुंठ, मिरी, पिंपळी, तूप मिसळून गरम गरम खायला द्यावे.

विलेपी व यवागू या दोन्ही कल्पना तयार झाल्यावर जवळजवळ एकसारख्याच दिसतात मात्र विलेपीपेक्षा यवागूवर अग्निसंस्कार अधिक काळ होत असल्याने ती पचायला अधिक हलकी असते.

यवागुर्ग्राहिणी बल्या तर्पणी वातनाशिनी ।
यवागू वातदोष शमवते, शरीराची तृप्ती करते, ताकद वाढवते व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते.
यवागू बनविताना तांदूळ-मूग, तांदूळ-उडीद, तांदूळ-मूग-तीळ असे मिश्रणही वापरले जाते.

मण्ड, पेया, विलेपी, यवागू या पथ्यकल्पना बनविताना साध्या पाण्याऐवजी कैक वेळा औषधीजलाचाही वापर केला जातो. उदा. भूक लागत नसली, अजीर्णामुळे पोट दुखत असले तर पिंपळी, पिंपळीमूळ, चव्य, चित्रक, सुंठ ही द्रव्ये पाण्यासह उकळून सर्वप्रथम औषधीजल तयार करावे मग त्याच्या साहाय्याने यवागू सिद्ध करावी असे, आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले आहे. जुलाब होत असताना, पचनशक्‍ती मंदावलेली असताना कवठ, बेल, चांगेरी, डाळिंबाचे दाणे, ताक यांच्या साहाय्याने बनविलेली पेया नुसत्या पाण्यापासून बनविलेल्या पेयापेक्षा अधिक गुणकारी असते.

चरकसंहितेमध्ये अशा २८ पथ्य-कल्पना वर्णन केलेल्या आहेत.

- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad