Thursday, March 3, 2016

तरुणांमधील उच्च रक्तदाब

- डॉ. श्रीपाद खेडेकर
आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात तरुणांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यातूनच मग आरोग्याचे प्रश्न सुरू होतात. उच्च रक्तदाब हा त्यातूनच उद्‌भवतो. नंतर हा आजार धोकादायक बनतो. अकाली वृद्धत्वाकडे झुकणे, तसेच हृदयविकाराच्या समस्या निर्माण होणे, हे प्रकार सुरू होतात. वयस्कर व्यक्तींना हृदयविकाराच्या समस्या जाणवतात, हे आपण जाणतोच. पण आता तरुणांमध्येही या समस्या सर्रासपणे दिसून येऊ लागल्या आहेत. 
त  रुणांमधील उच्च रक्तदाबाची काही प्रकरणं अभ्यासल्यानंतर असे लक्षात आले आहे की, हा आजार त्यांना नंतर हृदयविकाराकडे नेतो. प्रसंगी हृदयविकाराचा तीव्र झटकादेखील येतो. उच्च रक्तदाब ही समस्या अगदी १८ वर्षांच्या मुलांमध्येदेखील दिसून आली आहे. २० वर्षांच्या मुलांमध्ये असे आजार आढळल्यानंतर त्याचे परावर्तन हे नंतर हृदयविकाराच्या गंभीर समस्येमध्ये झाल्याचेही दिसून आले आहे. ही मुलं जेव्हा ३५ ते ५० वयोगटात जातात, तेव्हा हृदयविकाराची समस्या त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. रक्तदाब सामान्य असला तरी त्यांना ही समस्या भेडसावते.
तरुणांमध्ये उच्च रक्तदाब आढळण्याची काही ठराविक कारणे आहेत. ती अशी -  

-  वेगाने बदलणारी जीवनशैली, गतिमान व तणावग्रस्त आयुष्य.
-  व्यायामाचा अभाव, अतिव्यग्र जीवनशैलीमुळे व्यायाम करण्यासाठी वेळ नसल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते.
-  आनुवंशिकता हेही एक महत्त्वाचे कारण आहे. कुटुंबातील कुणा व्यक्तीला अशी समस्या असल्यास ती पुढच्या पिढीत दिसून येते.
-  चुकीचा आणि अपायकारक आहार. मेदयुक्त व अतिक्षार असलेल्या पदार्थांचे सेवन करणे हे वाढत आहे.
-  पुरेशी झोप नसणे, हा या तरुण पिढीला शाप म्हणता येईल. प्रत्येक रात्री किमान सहा तास झोप आवश्‍यक असून, ती नसेल तर ही समस्या अधिकांश प्रमाणात जाणवते.
-  मद्यपान हे उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरणारे महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे.
  धूम्रपान.
-  लठ्ठपणा व वजनवाढीवर नियंत्रण नसणे. हा लठ्ठपणा हा पुन्हा अयोग्य जीवनशैलीशी निगडित आहे.  
उच्च रक्तदाबांची लक्षणे उच्च रक्तदाबाची जाणीव होताच स्वतःच्या पद्धतीने त्याच्यावर उपचार करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने हा आजार अधिकच बळावू शकतो. ताबडतोब तज्ज्ञ डॉक्‍टरांना भेटून त्यांच्याशी सल्लामसलत करून उपचाराला सुरवात करावी. उच्च रक्तदाबाची अनेक लक्षणे आहेत, ती ध्यानात घेऊन त्यानुसार आपण आपली काळजी घ्यावी.

-  डोळ्यात रक्तासारखे ठिपके दिसू लागतात. डोळ्यात रक्तासारखे ठिपके दिसणे हे या आजारात आढळणारे सर्वसामान्य लक्षण आहे.
-  मधुमेह असलेल्या किंवा रक्तदाब असलेल्यांमध्ये रक्ताचे स्पॉट्‌स ही सामान्य बाब आहे.
-  चेहऱ्याचा उजळपणा काहीवेळा चिंताजनक असू शकतो. कारण रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन चेहरा लालसर दिसू लागतो. त्याचबरोबर चेहऱ्याला जळजळ जाणवते. सूर्यप्रकाश, थंड हवामान, मसालेदार पदार्थ, गार वारा, गरम पेय, मद्यपान, व्यायामाचा अभाव अशा बाबीदेखील हा परिणाम घडवून आणतात. त्यामुळे त्वचेची काळजीदेखील घ्यावी लागते. चेहऱ्यातील हा फरक भावनिक बदलदेखील घडवतो. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा रक्तदाबदेखील वाढतो. वाढता रक्तदाब हा चेहऱ्याच्या उजळपणाशी संबंधित असतो. जर आपला रक्तदाब सामान्य असेल तर चेहऱ्यावर फरक जाणवणार नाही.
-  उच्च रक्तदाबामुळे चक्कर येत नाही, तर त्यासाठी आपण घेत असलेल्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे हा त्रास जाणवतो. चक्कर येत असल्याचे ध्यानात येताच त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीराचा तोल जाणे तसेच चालताना त्रास होणे ही हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे आहेत. उच्च रक्तदाब हा असे झटका येण्याचे कारण असतो.

उच्च रक्तदाबाचे निदान तपासा  आरोग्यदायी वाटत असले तरी तरुणांनी दोन वर्षांनी एकदा तरी त्यांच्या रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी, असा निष्कर्ष एका अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. ज्यांच्या घरी, कुटुंबात, अगोदरच्या पिढींमध्ये किंवा आई-वडिलांना रक्तदाबाचा आजार आहे, त्यांनी तर ही काळजी विशेषत्वाने घेतली पाहिजे. अशा घरातील तरुण मुलांना लहानवयातच ही समस्या होऊ शकते. त्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे वेळीच तपासणी केली तर जोखीम कमी करता येते. पान
अठरापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीने आपले रक्तदाबाचे प्रमाण कितपत आहे, याची माहिती व मोजमाप वर्षातून एकदा तरी करून घेतले पाहिजे. रक्तदाब नसेल तर ठीक किंवा त्याचे प्रमाण कितपत आहे आणि ते कितपत होऊ शकते, याचा अंदाज घेऊन त्यानुसार पथ्ये पाळणे सोपे होते. तरुणपणातील तपासणी व उपचारांमुळे त्याचे भविष्यातील प्रमाण कमी-जास्त राहते. तपासणी केली नाही, तर वयोमानानुसार तो वाढत असल्याने नंतरच्या काळात त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. उच्च रक्तदाबामुळे आपल्या हृदयाचे तसेच रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्याचे वेळीच निदान व्हायला हवे. तसे झाले तर तो नियंत्रणात ठेवण्यास व आपल्या शरीराचे नुकसान थांबवण्यास मदत होऊ शकते.

उपयुक्त उपचारपद्धती-  सुदैवाने, रक्तदाब कमी असेल तर उपचार घेणे सोपे होते आणि उत्तम आरोग्यदेखील राखता येते. आपल्या जीवनशैलीत त्यानुसार आपण बदल करू शकतो. तसेच होणारा अधिक त्रास कमी करू शकतो.
-  वजन नियंत्रित ठेवले तर उच्च रक्तदाबाचा धोका कमी आणि शरीर निरोगी राहते.
-  दररोज व्यायाम करा - उच्च रक्तदाबाची जोखीम कमी करण्यासाठी दररोज व्यायाम आवश्‍यक आहे.  दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातील सर्व दिवस आपला व्यायाम होईल, यानुसार आपल्या कामाचे नियोजन करा.
-  पोषक आहार घ्या -  फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, आणि कमी चरबी असलेली उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ असा सकस आहार रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतो.
-  मीठ कमी खा. अन्न बनवण्याच्या प्रक्रियेत मिठाचा वापर होतो. हे मीठ सूप तसेच भाजलेल्या-शिजवलेल्या पदार्थांतून मिळते. पण त्याचे प्रमाण कमी अथवा संतुलित असेल, तर रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
-  धूम्रपान करू नका - धूम्रपानामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, झटका आणि अन्य आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते टाळा.
-  रात्री चांगली झोप घ्या. रात्री मिळणारी चांगली झोप ही रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.
--------------------------------
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad